मे महिन्याचे अखेरचे दिवस. शनिवारची रात्र. ९:३० वाजून गेले असावे. बाहेर बारीक पाऊस लागलेला, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच सामसूम. रस्ते सगळे ओलेकच्च झालेले. कुठच्या तरी सरकारी योजनेखाला लावलेल्या खांबावरील दिव्यांचा अंधुक उजेड चिमुलवाड्यावरच्या पायवाटेवर पडला होता. त्या उजेडात पावसाची बारीक भुरभुर देखील चांगली ठसठशीत वाटत होती. धुपकरांच्या सालात चिमुलवाड्यावरील सगळ्या पुरुष मंडळींचा अड्डा बसला होता. टीव्हीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगला होता. ऑस्ट्रेलिया वाल्यानी आधी फलंदाजी करून २० षटकांत २१८ धावा कुठल्या होत्या. भारताची फलंदाजी व्हायची होती. मधल्या वेळच्या बडबडीमध्ये टाईम पास म्हणून मंडळींनी पत्त्यांचा अड्डा बसवला होता. १० चा ठोका पडल्यावर काका कामतांनी शेवटचे पान खाली टाकले. एक अगडबंब अशी जांभई देऊन ते म्हणाले, "पुरे बुवा ! बस्स ! ..कंटाळा आला अन आता हे आमचे बॅट्समन एवढ्या धावा काढतील असेही काही वाटत नाही आणि उशिराही झाला आहे फार." पण गावकर काकांनी पुन्हा पत्ते पिसले. हातवारे करून ते म्हणाले, "बसा हो काका, आणखी थोडा वेळ....!"
"छे, छे, एक मिनिटसुद्धा नाही थांबणार !" एवढे बोलून काका उठलेच. सगळ्यांमधून वाट काढत जात खुंटाळ्यावरचा कोट घेतला आणि तोंडासमोर चुटक्या वाजवीत काका निघणार इतक्यात खालीच बसलेल्या गुरव गुरुजींनी त्यांच्या धोतरालाच हात घातला !
"आता बघू कसे निघतात ते !" - गुरव गुरुजी
"अहो गुरुजी काय कुरल्यो धरतत ?!"- गर्दीतून कोणी तरी प्रश्न करून पुन्हा हश्या पिकवला
"अहो गुरुजी, आमच्या धोतरात काय सापडणार आहे तुम्हाला ?! फस्श्यात हो !"- असे म्हणत काका कामतांनी धोतराला १ - २ हिसके देऊन पाहिले.पण पकड काही ढिली झाल्याचे त्यांना जाणवले नाही. शेवट अगदी नाईलाज म्हणून ते खाली बसले. काही मिनिटे पुन्हा डाव चालला आणि सामना पुन्हा सुरु झाला. पहिल्या षटकात बॅट्समन ने सहाच्या सहाही बॉल खाल्ले.
"ह्यांच्या फळकुटयाला बॉल लागणे जरा कठीणच दिसतेय बाकी आज, अरे यांना सांगा कोणीतरी २०च षटके आहेत म्हणून !" डोक्यावरील आठ्या तश्याच ठेऊन काका कामत म्हणाले.मध्ये दोन षटकांमधली, टीव्हीवरली पान-पट्टीची जाहिरात जाहिरात पाहून कोपऱ्यात बसलेल्या विसूभाऊंना पान खाण्याची लहर आली आणि कुठल्या तरी खेळात मागे संगीत लावून नसती वस्तू वगैरे पास करतात तसेच पानाचे तबक घडवंचीवरून विसूभाऊंपर्यंत पास झाले खरे, पण वाटेत ते पास करताना कित्येक मंडळींनी "विडे उचलल्याने" विसूभाऊंच्या हाती आलेल्या तबकात पानांचे देठ, एक सुपारी आणि चुन्याची डबी तेवढी आली. नाईलाज म्हणून मग विसूभाऊंनी फक्त सुपारीच आडकित्त्यावर घेतली.
"काय हो विसुभाऊ ?! मळमळतेय वैगेरे का पोटात ?- तसेही तबकांतले शेवटचे पान तर मी उचललेंन ! नाही म्हणजे नुसतीच सुपारी खाताय म्हणून म्हटले हो, बाकी काही नाही !"- गंगाधरभाऊ कुठून तरी ओरडले. विसूभाऊंनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सुपारी तोंडात टाकली. पण पानाविना काही त्यांना करमेना. आजूबाजूला कुठे एक पान तरी दिसतेय का हे ते बघू लागले. काही सेकंद फांदीवरल्या कावळ्यासारखी टेहळणी केली आणि विसुभाऊ तबकासकट दचकन उठले. विसूभाऊंस थुंकण्याची घाई आहे असे समजून सगळ्या मंडळींनी आपापले पाय दुडले आणि त्यांना वाट दिली.
"अहो विसुभाऊ देवखोलीत खिडकी नाही ! बाहेर येऊन डावीकडेच आहे बघा"- देवखोलीत घुसलेल्या विसूभाऊंना धुपकर काकांनी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला, तोच देवापुढल्या विडा-नारळाबुडल्या पानास लीलया चुना लावीत विसुभाऊ प्रसन्न मुद्रेने बाहेर आले ! सगळा प्रकार लक्षात येताच धुपकर काकांनी कपाळालाच हात लावला. एव्हाना सामना सुरु होऊन ३ षटके झाली होती आणि १ धाव काढून पहिला फलंदाज आणि माडी मारून दुसरा फलंदाज गारद झाले होते. आता खुद्द कॅप्टन फलंदाजीला आला होता.
"हा आला मेला ! बेटास नाही काडीची धार आणि म्हणे कर्णधार !"- काका कामतांनी "सगळे हसतील" अशी अपेक्षा ठेऊन केलेल्या म्हण कम कोटीवर ते स्वतः सोडून आणखी कोणीही हसले नाही. भारताची फलंदाजी गडगडण्याची हि काही पहिलीच वेळ नव्हती त्यामुळे मंडळींना त्याची सवय झाली होती. बाहेरील पावसामुळे आतील वातावरण जरा थंडच झाले होते आणि काही मंडळींनी कीर्तन ऐकल्यासारख्या माना डोलवायला सुरुवात केली.
"अहो गावकर तो तुमच्या कुशीस पडलाय तो तक्क्या टाका बघू जरा ! जरा आड पडून सामना बघू म्हणतो"- गुरव गुरुजींनी फर्मान सोडले. हात होईल तेवढा लांब करून अथक परिश्रमानंतर गावकरांना तक्क्या गवसला. एका हातात धरत त्यांनी पुढे बसलेल्या मंडळींमधून तोंड बाहेर काढले आणि नेम धरून तक्क्या भिरकावला. तसा नेम हुकला नाही पण तो तक्क्या गावकर काकांपर्यंत पोचायला अर्धा मीटर कमी पडला आणि पुढ्यात बसून डुलक्या घेणाऱ्या चिमणे आजोबांस लागला. एकदम तोंडावर बक्कन तक्क्या बसल्यावर आजोबा एकदम जागे झाले आणि जमिनीला समांतर झालेले दिसले ! त्यांना सावरून लगेच गुरव गुरुजींनी तक्क्या ताब्यात घेतला. "हा.... आता आमची झोप उडवून, आम्हाला इकडे अडकवून , आपण खुशाल झोपणार होय ?! द्या तो तक्क्या इकडे" असे म्हणत काका कामतांनी तक्क्या ओढून घेत जो भिरकावला तो सरळ गळत्या छपरासाठी ठेवलेल्या व काहीश्या पाण्याने भरलेल्या मोठ्या टबात पडला ! हा सगळा प्रकार लक्षात येताच धुपकर काका खवळले.
"अहो काय हे काका, भिजला कि हो तक्क्या !"- धुपकर काका
"भिजला ना ?! अहो भिजणारच." काकांचे शांतपणे उत्तर
"शाबास ! जागा आमची, तक्के आमचे,....तुम्हाला फेकायला काय होतंय ? परवाच भट्टीतून आणले होते. खूप कमाल केली बुवा !" - धुपकर काकांनी तक्क्या पिळत म्हटले. काका कामत आणि गुरव गुरुजी जरा शरमिंदेच झाले.
"नाही पण तक्क्याला खास घाण अशी लागलीच नाहीये बरं का, नाही म्हणजे आधी चिमण्यांच्या अंगावर आणि मग पावसाच्या पाण्यातच पडला तो. खाली नाही पडला. बघा ना !" गुरव गुरुजींनी नम्रपणे खुलासा केला. धुपकर काकांना तेवढ्यातल्या तेवढ्यात या बातमीने बरे वाटले. आणखी काही षटके गेली आणि भारताची ११ षटकांत 4 बाद ९७ अशी बाद अवस्था झाली होती. सामन्यात ड्रिंक्स ब्रेक दिला गेला तसा मंडळींनीहि ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. विसूभाऊंनी हातवारे करीत लोक मेजले. ५ कप आणि २० लोक असे समीकरण होते, त्यामुळे आधी जेष्ठ नागरिक मग चाळीशी ओलांडलेले आणि मग बाकीच्यांनी चहा ढोसावा असा प्रस्ताव गुरव गुरुजींनी मांडला. पण कित्येक मंडळींनी "आम्ही बशीत किंवा वाटीतही चहा पिऊ" असे म्हटल्याने तो पास करण्यात आला नाही.
"चला हो सावईकर, तुम्ही नेहमी वहिनींच्या पदराकडेच स्वयंपाकघरात असतात. चला दाखवाच तुमच्या स्किल्स. करा बघू चांगलासा फक्कड चहा !" गुरव गुरुजींनी ह्या प्रस्तावाला मात्र अनुमोदन देण्यात आले व खांबाला टेकून लवंडणाऱ्या सावईकरांना सगळ्यांनी उठवून घातले. सावईकर पेंगत पेंगतच स्वयंपाकघरात शिरले. मिट्ट काळोख होता. सावईकर आत शिरले. काळखात खुर्चीवर त्यांना एक सावली दिसली. त्यांनी डोळे चोळले आणि दिवा लावला. खुर्चीवर धुपकर काकू एका हातात सूरी आणि दुसऱ्या हातात पेरू घेऊन बसल्या होत्या ! साहजिकच, सावईकर पुरते दचकले."भूक लागली होती हो भावोजी ,उपास होता ना आज" असे म्हणत काकूंनी पटापट पेरू खाल्ला व त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. सावईकरांनीही चहा बनवायला घेतला. धुपकरांना विचारून चहा पावडर, पाणी, दूध,साखर इत्यादी मागून घेतले.
"पाणी कमीच घाला हो, दूध कामतांकडले आहे !!" धुपकर काकांनी डोळा मारला आणि दोघांनीही हसून घेतले. इकडे धुपकरांनी पटापट चहा करून कप, बश्या, वाट्यात भरून सालात वाटला. सोबत म्हणून काहींनी एकेक विड्याहि शिलगावल्या. १२:३० वाजले होते. सामना पुन्हा सुरु झाला होता. का कोण जाणे मधल्या फळीतील फलंदाजाच्या फळ्या लागत होत्या आणि काही चौकार षटकार खेचले गेले होते. सामना रोमांचक स्तिथीत होता. ३ षटकांत ३४ धावा पाहिजे होत्या अन तेव्हाच ज्याची सगळ्यांना कल्पना होती तेच झाले. लाइट गेली. सगळ्यांनीच हुश्श्श केले. बहुतेक मंडळी ठाकली होती. सगळ्यांनाच जांभया येत होत्या. "चला हो कुलकर्णी जाऊ आपण आता उद्या दैनिक भारत वरच कळेल काय ते"- गर्दीतून कोणी तरी जांभई देत ओरडले. बहुतेक मंडळीही जांभया देत उठली आणि आपापल्या घरी जायला निघाली. जाता जाता चपलांची अदलाबदल झाल्यामुळे विजेऱ्या वैगेरे पेटल्या, अन हळू हळू मंडळी पांगली. धुपकर काकांनी जोरदार जांभई देत पसारा आवरला. काळोखातच पत्ते वैगेरे जमवून ठेवले.कप-बश्या आवरल्या आणि आपली वोळकटी पसरवली. आत जाऊन पाण्याचा तांब्या भरून घेऊन येतात तोच लाईट आली आणि सामना नुकताच संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. धावतच ओसरीवर जाऊन चालत जाणाऱ्या मंडळींना भारत हरल्याची बातमी दिली आणि आणखी ३ दिवसांनी होऊ घातलेला, मालिकेतला अखेरचा सामना बघण्यास जमण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. दार ओढून घेत काकांनी माथ्यावर खोबरेल थापले.तिथेच झोपी गेलेल्या चिमणे आजोबांच्या अंगावर आपली गोधडी घालत देवकीकृष्णाला नमस्कार केला आणि दिवा विझवला. चिमुलवाड्यावर फक्त एकाच रात्रीसाठी शांततेचे पांघरून ओढले गेले होते.
प्रतिक्रिया
10 Apr 2020 - 10:30 am | सौंदाळा
मस्त, सगळी पात्रं डोळ्यासमोर उभी राहिली
10 Apr 2020 - 12:02 pm | अभिनव प्रकाश जोशी
धन्यवाद