नमस्कार!
मधेच एकदम झटका आल्यासारखे मीर तकी मीरच्या "जिक्रेमीर" या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करायला घेतले आणि पूर्णही केले. थोड्याच दिवसात ते मी छापणार आहे. ज्यांना पाहिजे आहे त्यांनी कृपया प्रतिक्रियेत लिहावे म्हणजे त्या प्रमाणात प्रती छापता येतील. या पुस्तकासाठी लिहिलेले "मनोगत" खाली देत आहे..
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर उर्दूसदृश जी कॅलिग्राफी केली आहे ती आपल्या "आभ्या" ने. त्यांनाही मनापासून धन्यवाद !
जिक्रे मीर या पुस्तकाचे मनोगत...
फार पूर्वी मिर्झा ग़ालिबच्या खालील ओळी वाचल्या होत्या आणि त्याच वेळी माझ्या मनात मीरच्या काव्याबद्दल कुतुहल जागे झाले होते. त्या कुतुहलाचाच परिणाम म्हणजे हे मराठीत अनुवादित केलेले पुस्तक...‘‘ जिक्रे मीर’’
रेख़्ते के तुम्ही उस्ताद नही हो ‘ग़ालिब’
कहते है अगले ज़माने में कोई ‘मीर’ भी था..
मीरने ही आत्मकहाणी लिहिली फार्सीमधे. त्या काळात पुस्तके छापण्याची कला या प्रदेशात अवगत नव्हती. लोक आपल्याला आवडलेल्या पुस्तकांच्या नकला काढून घेत. ज्याला ते पुस्तक पाहिजे आहे तो ते स्वतः करत असे किंवा त्यासाठी काही खास माणसे असत त्यांच्याकडून करून घेत. पण या नकला लोकांच्या कपाटात पडून रहात. अशीच एक एक नकललेली प्रत इराणमधे मिळाली. इटावा येथे ख़ानबहादुर मौलवी बशिरुद्दीन अहमद यांच्या हाती एक फ़ारसी प्रत लागली. ती १९२८ साली छापण्यात आली. उर्दूमधे याचा अनुवाद फार नंतर झाला आणि १९५७ साली तो केला निसार अहमद फ़ारुकी यांनी. ज्या अनुवादावरून मी हा मराठीत अनुवाद केला आहे ते मूळ फार्सीतून हिंदीमधे आणले श्री. अजमल अजमली यांनी.
मीर तकी मीरच्या आयुष्यावर आणि काव्यावर सुफी पंथाचा लक्षात येण्याइतका प्रभाव होता. त्याचे बडील एक फ़कीर होते आणि त्यांनी मीरवर सुफी विचारांचे संस्कार केले. परमेश्वराची भक्ती (इष्क) आणि इतर प्राणीमात्रांवर प्रेम हे त्यांच्या शिकवणीचे सुत्र होते. म्हणून मीर म्हणतो, - इष्क नसते तर ना आम्ही असतो ना आमचे आयुष्य. मीरने त्याच्या आयुष्यात इतके अनुभव घेतले की त्याच्या कवितांचा शायरीचा गाभा हा करुणा हाच राहिला आहे. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक फटके खाल्ली. पण प्रत्येक फटका त्याला जमिनीवर पाडे आणि तो तेवढ्याच जोमाने पुढच्या प्रवासासाठी उठून उभा राही. त्याची शायरी वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याची शायरी जवळची वाटते कारण वाचक केव्हा ना केव्हा तरी त्या अनुभवातून गेलेला असतोच. मीरची भाषाही सर्व सामान्यांना कळेल अशी आहे. फार्सीत काव्य रचण्यापेक्षा त्याने हिंदी-उर्दूमधे शायरी केली त्याने तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. उर्दू, हिंदी व काही फार्सी शब्द वापरून रचलेली त्याची शायरी वाचकाच्या ह्रदयाला भिडते याचे कारण ही भाषाच आहे हे नाकारुन चालणार नाही.
जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात उतरला त्याच काळात औरंगाबादला वली दख्खनी नावाचा एक शायर रहात होता. असं म्हणतात त्याने प्रथम उर्दूमधी गज़ल लिहिली आणि दिल्लीमधे लोपप्रिय केली पण उर्दूमधे काव्य रचण्याचे श्रेय मला वाटते अमीर खुस्रोला दिले पाहिजे. मीर तेकी मीरने वली दख्खनीप्रमाणे उर्दूमधे काव्य रचले आणि तोही त्या काळात प्रसिद्ध झाला.
मीरचा जन्म १७२२/२३ साली झाला. त्याच्या मृत्यूची तारीख निश्चित माहीत नाही पण जिक्रे मीरमधे त्याने शेवटची जी कहाणी लिहिली होती ती गुलाम कादीरने दिल्लीचा ताबा घेतला त्याची, ते साल होते १७८८. म्हणजे १७२२ ते १७८८ (६६) वर्षे तरी तो जगला होता याची खात्री आहे. मीरने त्या काळातील घडामोडीत त्रयस्थ राहून भाग घेतला व त्याच्या नोंदी केल्या. जिक्रे मीर म्हणज फक्त मीरची कहाणी नसून त्या काळातील दिल्ली. आग्रा व लखनौची कहाणी आहे. त्या काळात ज्या घडामोडी होत होत्या त्यात महत्वाच्या घटना सांगायच्या म्हणजे, मराठ्यांचे राज्य, अब्दालीची स्वारी, इंग्रजांचा शिरकाव, राजपूत व तशा अनेक राजांच्या लढाया. या धामधुमीत कलाकरांचे जे हाल झाले त्याचीही ही कहाणी आहे. खर तर जिक्रे मीरमधे मीरबद्दल फारच कमी लिहिले गेले आहे ना त्यात शेरोशायरी आहे. त्या काळातील घडामोडी प्रत्यक्ष पाहणाऱ्या माणसाने त्या घडामोडी लिहिल्या तेच जिक्रे मीरे चे महत्व आहे.
मीरच्या शायरीमधे ‘इष्क’ या शब्दाचा वारंवार उल्लेख होतो. सुफी पंथाच्या सर्वच शायरीमधे या इष्कला फारच महत्व आहे. या शब्दाचा थोडाफार उहापोह करणे वावगे ठरणार नाही. जिक्रे मीर मधेही मीरच्या वडिलांच्या उपदेशात इष्कचा उल्लेख वारंवार होतो. सामान्य भाषेत किंवा समजुतीप्रमाणे स्त्रीपुरुषांच्या शारीरीक जवळीकीने किंवा कदाचित मानसिक जवळीकीने जे नाते त्यांच्यात उत्पन्न होते त्याला ‘इष्क ’ म्हणतात. या इष्कात बुडून जाणे, इष्कात जगाचा विसर पडणे, इष्कात प्रेयसी किंवा प्रियकराशिवाय दुसऱ्या कशाचीही शुद्ध नसणे असे अनेक वाक्यप्रयोग आपण नेहमी वाचतो. थोडक्यात एकदा इष्क झाले की त्या माणसाला किंवा स्त्रीला या जगाचा विसर पडतो. इष्कात तो किंवा ती देहभान विसरून जाते. सुफी अध्यात्मात साधकाला परमेश्वराशी याच प्रकारचे इष्क होत असते आणि या इष्कात बुडणे हेच त्याचे इतिकर्तव्य असते.
‘‘....बाळा प्रेम (इष्क) कर ! प्रेमाशिवाय या जगात दुसरे काही महत्त्वाचे नाही. हा संसार टिकला आहे तो प्रेमामुळेच. प्रेम भावना नसती तर हा संसार नसता. प्रेम नसेल तर जीवन निरस होऊन जाते. प्रेम नसेल तर हे आयुष्य ओझे वाटते. प्रेमाने ह्रदय उचंबळून येणे योग्यच आहे. प्रेम निर्मिती करते आणि नष्टही करते. या जगात जे काही आहे ते प्रेमाचेच एक रूप आहे. अग्नी म्हणजे प्रेमाची आग आहे तर पाणी हे प्रेमाची गती आहे. माती ही प्रेमाचा थांबा आहे. हवा म्हणजे प्रेमाने आलेला अस्वस्थपणा आहे. मृत्यू म्हणजे प्रेमाची धुंदी आहे आणि प्रेमाची शुद्ध असणे म्हणजे जीवन. रात्र म्हणजे प्रेमाची निद्रा आहे दिवस म्हणजे प्रेमाचे जागे होणे. मुसलमान ही प्रेमाची सुंदरता आहे आणि काफ़िर म्हणजे प्रेमाचे भीतीदायक रूप. प्रेमाच्या जवळ असणे हे पुण्य आहे तर प्रेमाला दूर लोटले तर त्यातून पापच निर्माण होते. स्वर्ग ही प्रेमाची इच्छा आहे तर नरक प्रेमाचा रस. प्रेमाचे स्थान पूजेपेक्षाही वर आहे, ज्ञानापेक्षा वर आहे एवढेच काय तुम्हांवर जडलेल्या प्रेमापेक्षाही त्याची जागा वर आहे. भक्ती म्हणजे परमेश्वराला ओळखणे तर प्रेम सत्याची निरागसता ! परमेश्वराची आस म्हणजे स्वत:ला विसरणे व त्याच्या जवळिकीचा अनुभव घेणे ! जगातील सर्व गोष्टींपेक्षा प्रेमाची जागा सगळ्यात उंचावर आहे.....‘‘ मीरला तो सात आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी हा जो उपदेश केला त्यातील इष्कचा अर्थ हा आहे...
मीरच्या या आत्मकहाणीत त्याने त्याला वेड लागले त्याची कहाणी काव्यात सादर केली आहे. त्याला वेड लागले तेव्हा त्याचे वय होते अवघे १७. त्याचा मी या पुस्तकात अंतर्भाव केला आहे कारण ‘‘मला वेड लागले होते‘‘ हे सांगणे धाडसाचे आहे आणि त्याने ज्या छंदात ती कहाणी रचली आहे तो प्रकारही मला आवडला. हे वेड त्याला लागले त्याचे कारण त्याने या आत्मकहाणीत परिस्थितीचा दबाव असे दिले आहे पण काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की त्याचे हे वेड प्रेमभंगातून उदभवलेले होते. मला तेच कारण खरं वाटते कारण परिस्थितीने वेड लागण्याइतका मीर कमकुवत मनाचा नव्हता. पण प्रेमभंगाने मात्र अनेक कणखर मने दुंभंगलेली मी पाहिली आहेत आणि आपणही पाहिली असतील... या वेडात त्याला चंद्रावरून एक सुंदर युवती भेटण्यास येत असे असा भ्रम होत असे. अर्थात या परिकथेत विशेष काही नाही पण दुर्दैवाने या परीला मानवाचे सर्व गुण, दुर्गूण चिकटलेले होते. ती कधी प्रेम करत असे तर कधी पराकोटीचा द्वेष करीत असे. कधी हट्ट करत असे तर कधी मीरला लाथाडत असे. मीरचे वेड कालांतराने ओसरले पण प्रेमभंगाचे दुःख मात्र त्याला आयुष्याभर जाळत राहिले. त्याच्या काही काव्यातून ते आपल्याला स्पष्ट जाणवते..
उदा..
जब नाम तेरा लीजिये तब अष्क भर आवे ।
इस जिन्दगी करने को कहाँ से जिगर आवे?
अष्क आँखों से कब नही आता।
लहू आता है जब नही आता ॥
लगती नही पलक से पलक इन्तजार में ।
आँखे अगर यही है तो फिर ‘मीर’ सो चुका ॥
मीर जरी इस्लामधर्मीय असला तरी पक्का सुफी होता. (अर्थात सुफी धर्मगुरुंनी त्या काळात इस्लामच्या प्रसारामधे महत्वाची भूमिका बजावली होती हे नाकारण्यात अर्थ नाही. ते या प्रसारास कसे मदत करीत हे श्री सेतू माधवराव पगडी यांच्या ‘सुफी संप्रदाय’ या पुस्तकात वाचण्यास मिळते. भारतातील सुफी संत पक्के राजकारणी होते व सुलतान त्यांचा राज्यप्रसारासाठी व्यवस्थित उपयोग करून घेत व तेही सुलतानांचा धर्मप्रसारासाठी कामासाठी वापर करून घेत.)
पण मीर व त्याच्या वडिलांना परमेश्वराला भेटण्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब होतो आहे याच्याशी काही घेणे देणे नव्हते. म्हणून मीर म्हणतो -
उसके फ़रोगे हुस्न से झलकते है नूर ।
शमा हरम हो या कि दिया सोमनाथ का ॥
त्याच्या भक्तीच्या तेजाने हा प्रकाश सर्वत्र फाकला आहे
मग तो अल्लाच्या घरातील दिवा असो किंवा सोमनाथच्या मंदीरातील दिवा. ॥
मीरने एके ठिकाणी नादिरशाहाने दिल्ली जाळून बेचिराख केली, लुटली त्याचे अत्यंत ह्रदयद्रावक वर्णन केले आहे.. ते आता येथे लिहित नाही.. पुढे आपल्याला ते वाचण्यास मिळेलच. पण त्याच्या काव्यात ते वर्णन येथे वाचण्यास हरकत नसावी...
अब ख़राबा हुआ जहानाबाद ।
वरना हर इक क़दम पे यां घर था ॥
दिल वह नगर नहीं कि फिर आबाद हो सके,
पछताओगे, सुनो हो, यह बस्ती उजाड के ॥
दिल की आबादी की इस हद है खराबी कि न पुछ,
जाना जाता है कि राह से लष्कर गुज़रा. ॥
खुश न आई तुम्हारी चाल हमें ,
युँ न करना था पायमाल हमे .॥
शाहां कि कुहले जवाहिर थी जिनकी खाके पा,
उन्ही की आँ मे फिरती ल्लाइयाँ देखी ॥
दिली मे आज भीख भी मिलती नही उन्हे,
था कल तलक दिमाग़ जिन्हे ताजो-तख़्त का ॥
नाकाम रहने का तो तुम्हे ग़म है आज मीर,
बहुतों के काम हो गये है कल तमाम याँ ॥
दिल की वीरानी का क्या मजकूर है,
यह नगर सौ मरतबा लूटा गया ॥
त्याला ते पाहून वेदना झाल्या असतील त्या खालच्या ओळीत स्पष्ट दिसतात.
वो दस्त-ए-कौफनाक रहा है मेरा वतन
सुन कर जिसे खिस्र ने सफ़र से हज़्र किया ॥
माझ्या देशाचे भयानक वाळवंट झाले आहे,
ते पाहून खिज्रचाही थरकाप उडाला. ॥
तू है बेचारा गदा ‘मीर‘ तिरा किया मज़कूर
मिल गए ख़ाक मे याँ साहब अफ़सर कितने ॥
तू एक भिकारी मीर कोण तुला विचारतो !
इथे किती राव उमराव आणि साहेब राखेत मिळाले॥
शहा कि कोहल-ए-जवाहर थी ख़ाक-ए-पा जिन की
उन्हीं की आँखों में फिरते सलाइयाँ देखी॥
ज्याच्या पायाची धूळ अनेकांच्या डोळ्याचा सुरमा आहे,
पण त्याच्याच डोळ्यात सळया फिरताना मी पाहिल्या ॥
दिल्ली में आज भीक भी मिलती नही उन्हें,
था कल तलक दिमाग जिन्हें तख्त-ए-ताज का॥
आज दिल्लीमधे त्यांना भीकही मिळत नाही,
ज्यांना कालपर्यंत त्यांच्या सिंहासनाची आणि मुकुटाची घमेंड होती ॥
काही टिकाकार मीरला ‘‘आह‘‘ चा शायर व सौदाला ‘‘वाह‘‘ चा शायर म्हणतात. पण हे पूर्ण सत्य नाही. मीरची शायरी ज्याने वाचली आहे त्याला असे आढळून येईल की त्याने काव्याच्या व भावनांच्या सर्व प्रांतात संचार केला होता.
मीरच्या काव्याच्या भाषेचे एक विशेष आहे ते म्हणजे ती अत्यंत सोप्पी, आणि त्यात हिंदी, फारसी आणि उर्दू भाषेतील शब्द अगदी चपखलपणे वापरले आहेत.
उदा.
सिरहाने मीर के अहिस्ता बोलो,
अभी अभी रोते रोते सो गया है ।
मीरच्या उशाशी हळू बोला
आत्ताच रडता रडता झोपी गेलाय।
किंवा
बावले से कब तलक बकते थे सब करते थे प्यार..
अकल की बातें किया क्या हम से नादानी हुई ।
अर्थहीन बडबड करत होतो तेव्हा सगळे करत होते प्रेम,
अक्कल वापरून बोललो काय आणि लक्षात आले, फार मोठी चूक झाली.
एका मैफिलीत कोणीतरी मीरला एक थोर शायर म्हणून संबोधले त्यावर मीर ने उत्तर दिले,
हमको शायर न कहो ‘मीर’ की साहब हमने,
दर्दो-गम कितने किये जमा तो दिवान किया ॥
मला शायर म्हणू नका. या आयुष्यात मी इतकी दुःखे पचवली आहेत की ती शब्दात सांगता सांगता त्याचे एक पुस्तक झाले बस्स.....
मला वाटते या ओळीच मीरबद्दल बरेच काही सांगून जातात. आता अजून लिहिण्यासारखे काही नाही... वाचकांनी पुढे वाचावे ही विनंती करून हे मनोगत संपवतो.
फ़कीराना आये सदा कर चले ।
मियां खुश रहो हम दुआ कर चले ॥
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
10 Jan 2020 - 10:45 am | नि३सोलपुरकर
काका ,
अभिनंदन .
हे अनुवादित पुस्तक सुरेख असणार या बद्द्ल खात्री आहे .
तुमचे लेखन आणी मुखपृष्ठावर अभ्याची उर्दूमधे कॅलिग्राफी .. वाह वा .
दोन प्रती माझ्या साठी राखुन ठेवाव्यात ही विनंती .
10 Jan 2020 - 10:58 am | जयंत कुलकर्णी
धन्यवाद ! दोन प्रती राखून ठेवत आहे. छापून झाल्यावर संपर्क करतो.
2 Feb 2020 - 7:49 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
पुस्तकाच्या प्रती माझ्या हातात आल्या आहेत. माझ्या फेस्बूकवर सर्व तपशील दिलेला आहे. किंवा दोन प्रतींसाठी ९८२३२३०३९४ यावर रु ४६० पाठवावेत. पत्ता जरूर कळवावा.
धन्यवाद !
10 Jan 2020 - 8:31 pm | मनस्विता
मलादेखील एक प्रत हवी आहे. किंमत साधारण किती असेल आणि आर्थिक व्यवहार कसा पूर्ण करावा लागेल?
10 Jan 2020 - 9:58 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार ! अजून वेळ आहे. किंमत २००च्या आसपास असावी... आज मी सांगू शकत नाही....
13 Jan 2020 - 2:30 pm | गणेशा
अभिनंदन.. मी लाईन मध्ये आहेच, फक्त आधीचे पुस्तके संपवतो
13 Jan 2020 - 7:40 pm | मुक्त विहारि
अभिनंदन.
पुस्तक विकत घेऊ शकत नाही. क्षमस्व....
14 Jan 2020 - 12:34 pm | राजाभाउ
अभिनंदन.
मझ्या साठी पण एक प्रत ठेवा सर. सध्या देरसू वाचत आहे, हे येई पर्यंत ते संपेलच.
2 Feb 2020 - 7:52 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
पुस्तकाच्या प्रती माझ्या हातात आल्या आहेत. माझ्या फेसबूकवर सर्व तपशील दिलेला आहे. किंवा BHIM APPने ९८२३२३०३९४ यावर रु २५० (भारतात कोठेही घरपोच) पाठवावेत. पत्ता जरूर कळवावा.
धन्यवाद !
15 Jan 2020 - 12:54 pm | मनो
अभिनंदन.
मी एक प्रत घेईन. amazon वरती pre-release ऑर्डर घेता येतात, तसं करता येईल.
मीरने पानिपतच्या काळाबद्दल आणि सदाशिवराव भाऊबद्दल लिहिले आहे. मला पानिपतवरच्या पुस्तकात त्याचा उपयोग झाला.
उर्दू पुस्तक इथे इंटरनेटवर आहे.
https://www.rekhta.org/ebooks/meer-ki-aap-beeti-meer-taqi-meer-ebooks/
Rekhta वर फारसी प्रती आणि इतर बरेच काही अजून आहे.
2 Feb 2020 - 7:52 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
पुस्तकाच्या प्रती माझ्या हातात आल्या आहेत. माझ्या फेसबूकवर सर्व तपशील दिलेला आहे. किंवा BHIM APPने ९८२३२३०३९४ यावर रु २५० (भारतात कोठेही घरपोच) पाठवावेत. पत्ता जरूर कळवावा.
धन्यवाद !
24 Jan 2020 - 9:22 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद!
25 Jan 2020 - 12:28 am | श्रीरंग_जोशी
वाह.
प्रस्तावना लेख व मुखपृष्ठ पाहून हे पुस्तक वाचायलाच हवे असे वाटत आहे.
कृपया माझ्यासाठी एक प्रत राखून ठेवावी ही विनंती. किंडल आवृत्ती काढण्याबाबतही विचार करावा ही सुचवणी.
29 Jan 2020 - 2:28 am | एस
वाह. अभिनंदन.
2 Feb 2020 - 11:26 am | मदनबाण
अभिनंदन काका,
आभ्या ने केलेली कॅलिग्राफी सुरेख आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kal
3 Feb 2020 - 1:42 pm | चिगो
अभिनंदन, कुलकर्णी काका..