Kingआख्यान:- डोलोरस क्लेबोर्न

शा वि कु's picture
शा वि कु in जनातलं, मनातलं
29 Nov 2019 - 7:47 pm

नववीत गेलो आणि वाचनासाठी नवी दारं खुली झाली. वडीलांच्या अँड्रॉइड फोनवर पीडीएफ फाइल्स डाउनलोड करून मून रीडर किंवा adob reader ऍप वर वाचणे. यातून मोठया कटकटी दूर झाल्या, लायब्ररीत चकरा मारायला नकोत, पैसे देऊन नवी पुस्तकं पण घ्यायला नकोत. आणि पुस्तकांचा तर नुसता महापूरच. जवळजवल सगळी प्रसिद्ध पुस्तकं फुकट उपलब्ध.याआधी घरातली वाचलेलीच पुस्तकं परत परत वाचायची असा प्रकार होता. आता मात्र जगभरातल्या सगळ्या पुस्तकांचा खुल्ला acces होता !
मग सॉंग ऑफ आईस अँड फायर झालं. ते आजपर्यँत हॅरी पॉटरच्या पुढे न गेलेल्या माझ्यासाठी फारच भारी अनि रोमांचक होतं. त्याच्या धुंदीत नववी संपली. त्या नंतर डॅन ब्राउन, अगाथा ख्रिस्ती, जेफ्री आर्चर ,ऑरवेल, निल गेमन ,जॉन ग्रीन, एडगर अॅलन पो, Tolkien वगैरे सापडले. ह्यामध्येच एक सापडला तो म्हणजे स्टिफन किंग. Goodreads वर याच नाव आणि बहुतेक हा प्रसिद्ध लेखक आहे असं कळालं. आणि बघतोय तर या बाबानी ढीगभर पुस्तकं लिहिली होती ! एवढी मोठी यादी बघून सुरुवात कुठून करायची हा पण एक प्रश्नच होता. शेवटी best stephen king book किंवा असच काहीतरी गूगल केलं, तर बऱ्याच याद्या समोर आल्या. तर त्यात पण काही ठिकाणी बरीच मतभिन्नता होती. पण सर्वोत्तम पुस्तकाबद्दल मात्र सगळ्या याद्या एकच नाव निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर झळकवत होत्या. हे म्हणजे "द शायनिंग". अर्थातच मी ते डाउनलोड करून वाचले. स्टिफन किंगचे वाचलेले पहिले पुस्तक !
अजून स्टिफन किंगची शैली माझ्यासाठी नवीन होती. आणि द शायनिंग ची कथाच अशी फक्कड आहे की यंव रे यंव. फारच थरकाप उडाला वाचून. नंतर स्टॅनले क्युब्रिकचा सिनेमा पण पहिला. अर्थात निव्वळ सिनेमा म्हणून हा भारी होता तरी पण पुस्तकाला न्याय देता आला नाही असं जाणवलच. पुस्तकात पात्रांना जास्त खोली होती असं कुठं तरी जाणवत राहिलं. शेवटी सिनेमातला जॅक टोरेन्स फक्त All work and no play makes Jack a dull boy आणि कुऱ्हाड घेऊन धावणारा जॅकच लक्षात राहतो. तर पुस्तकामध्ये जॅक आणि डॅनी मधील काही ह्रदयद्रावक प्रसंग आहेत. त्यामुळे जॅक आणि डॅनी दोघांच्या स्वभावातले काही कंगोरे सिनेमात सुटून गेलेत अस वाटतं.
त्यांनतर 11वी 12वी त गेल्यावर हातात किंडल आलं. पायरेटेड पुस्तकं वापरली तर किंडल "ब्रिक" होतं असा एका भावाचा इशारा दुर्लक्षुन मी आपला मार्ग चालू ठेवला. शायनिंग नंतर द स्टॅन्ड, इट, कॅरी, मिसरी, पेट सीमेट्री, क्रिस्टीन, सालेम्स लॉट, ड्रीमकॅचर आणि आणखी बऱ्याच कादंम्बऱ्या वाचल्या, तर काही कथासंग्रह सुद्धा वाचले (नाईट शिफ्ट, स्केलेटन क्रू, बाझार ऑफ बॅड ड्रिम्स इ.). किंगचे कथासंग्रह मला जास्त प्रिय. कारण किंगच्या कादंबऱ्या म्हणजे बहुधा 500-600 पानी बाडं. उदा - द स्टॅन्ड- 1153 पानं, इट- 1138 पानं. तर हे वाचायचे म्हणजे बराच वेळखाऊ प्रकार. ह्यांमध्ये किंग तुम्हाला कॅरॅक्टर ची बरीच जास्त माहिती देतो. जेव्हा त्या पात्राचा गोष्टीतला कळीचा भाग येईल तोपर्यंत ते पात्र आपण कोळून प्यालो असतो. त्यामुळे गोष्ट रंजक होते खरी, पण काही ठिकाणी मात्र बरीच सबूरी ठेवावी लागते. त्यापेक्षा ह्या कथांमध्ये किंग झटपट चकाचौंध करून सोडतो. तर या कथांमध्ये पण लघुकथा आणि दीर्घकथा (novella. दीर्घकथा शब्द योग्य आहे का ?)असे प्रकार. ह्या novella पैकी एक कथा चित्रपट रुपात आली- रिटा हेवर्थ अँड शॉशॅंक रिडेमप्शन (चित्रपट- Shawshank redemption) डिफ्रंट सिसन्स नावाच्या कथासंग्रहातील हि कथा "आशेचा वसंत" सिम्बॉलाइझ करते (summer of hope).या कथेवरच्या सिनेमाची ख्याती तर सर्वदूर आहे. कथेत विशेष काटछाट न करता पटकथा आहे तशी बनवली आहे, त्यामुळे सिनेमाच्या यशात किंगचा मोठाच हात आहे.
मी किंगची पुस्तक अभ्यासातून विरंगुळा किंवा नॉन फिक्शन वाचताना थोडा चेंज म्हणून वाचायचो. अर्थात याची परिणीती ती दुसरी पुस्तके लांब पडून किंगची एकामागून एक संपणे यात बहुदा होत असे. त्यामुळे 5-6 वर्षात किंगच्या 70% कादंम्बऱ्या संपवल्या. Marvel cinematic universe सारखाच स्टीफन किंग चा सुद्धा एक युनिव्हर्स आहे. हि सगळी पुस्तकं डार्क टॉवर नावाच्या कॉस्मिक स्ट्रक्चर भोवती केंद्रित आहेत. हा डार्क टॉवर म्हणजे multiverse च्या उतरंडीचे ठोस प्रारूप असते. थोडक्यात काय, तर जो कोणी डार्क टॉवरच्या सर्वोच्च मजल्यावर पोहचेल, तो देवासारखा होईल. रोलॅन्ड डेसचेन नावाचा नायक, जो भविष्यातल्या वाईल्ड वेस्ट सदृश्य जगात राहात असतो, तो किंगच्या सर्व कथांचा अंतिम नायक म्हणता येईल. तो आपल्या सहकार्यांसोबत या डार्क टॉवर ला शोधत असतो. रोलन्डची गोष्ट मुख्यत्वे सात पुस्तकात आली तरीही किंगची बहुतांश कथा या टॉवरशी किंवा रोलन्डशी काही ना काही संबंध ठेवून आहेत. रोलन्डच्या सात कथांच्या मालिकेला किंग आपला magnum opus म्हणतो.
तर 5-6 वर्षांमध्ये किंगची बहुतांश पुस्तक वाचून झाली. त्यामुळे किंगची शैली चांगलीच कळाली, आणि थोडासा अतिरेक झाल्यामुळे कंटाळा पण येऊ लागला. आणि चांगला माल आधीच वाचून सम्पवल्याने शेवट शेवट अगदीच गाळ वाचला गेला. ख्रिस्टीन,डेसपरेशन,स्लीपिंग ब्युटीज ह्या कादंम्बऱ्या तर फारच बकवास असं मत पडलं. तेच तेच वाचतोय असं वाटायला लागलं म्हणून किंगला थोडा विराम दिला.
तर आता बऱ्याच दिवसांनी किंगची नवी कादंबरी वाचली (नवी म्हणजे माझ्यासाठी नवी. कादंबरी तशी 1992 ची.)- डोलोरस क्लेबोर्न. किंगच्या बहुतांश गोष्टींमध्ये काहीना काही supernatural element असतोच. पण किंग हा भयकथा लेखक म्हणून मोडला जातो हा किंगवर थोडासा अन्याय आहे. त्याने स्वतः आणि Richard Bachman या टोपणनावाखाली अनेक प्रकारचे लिखाण केले आहे. तर ही डोलोरस क्लेबोर्न भयकथा हि नाही आणि ह्यात काही सुपरनॅचरल सुद्धा नाही. अशा किंगच्या गोष्टी सर्वोत्तम असतात.
तर या गोष्टीची नायिका आणि निवेदिका आहे डोलोरस क्लेबोर्न. हि साठीच्या घरात आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला समजते की हे निवेदन डोलोरस ने पोलिसांना केलेले वृत्तांकन आहे. डोलोरसला ती ज्या घरात साफसफाई,धुणेभांडे इत्यादी करत असते, त्या घराच्या अफाट श्रीमंत मालकीण व्हेरा डोनोव्हन हिच्या खुनाच्या संशयापोटीच पोलिसांनी तिला चौकशी साठी बोलवले असते.
लिटल टॉल नावाच्या ज्या बेटावर हि गोष्ट घडते, त्या बेटाची लोकसंख्या तुरळक असते, आणि मुख्यत: उन्हाळ्यात राहण्यासाठीचे श्रीमंत लोकांचे बंगले आणि इतर काही घरं अशी स्थिती असते. तर डोलोरस व्हेरा डोनोव्हन कडे 30-35 वर्षांपासून काम करत असते. व्हेराने तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर आपले बस्तान कायमचेच लिटल टॉलला हलवले असते. व्हेरा अगदी तापट आणि खवचट असल्यामुळे डोलोरस सोबतच्या स्वच्छतावगैरे करणाऱ्या मुली फार वेळ टिकत नसतात. व्हेरा अगदी साखरेच साल काढणाऱ्या प्रकारातली असते. उदा- पोर्चमध्ये दोरीवर चादरी वाळत घालताना 6 च चिमटे वापरायचे असा तिचा नियम असतो. तर समोरचा व्यक्ती कपडे वाळवत असताना व्हेरा घराच्या उबेत बसून खिडकीतून चिमटे मोजत असते. इथे समोरच्या व्यक्तीची बोटे थंडीमूळे जाम झाली असतात, तर इथे खिडकीतून व्हेरा चिमट्यांबद्दल ओरडत असते. तर डोलोरस एकटीच तिच्या शिस्तीत थोडीफार उतरून येत असल्याने इतक्या वर्ष टिकली असते. आता व्हेराच्या उतारवयात डोलोरस अंथरुणाला खिळलेल्या व्हेराचीही काळजी घेत असते.
तर पुस्तकांच्या पहिल्या काही पानातच डोलोरस आपला रोखठोकपणा दाखवून देते. प्रश्नकर्त्या पोलिसाला "मी तुला लहानपणी चड्डीत पाहिलं आहे" च्या equivalent काहीतरी सुनाऊन, स्टेनोग्राफरला "तू कुठली ग पोरी" विचारून प्रश्नोत्तराच्या शक्यता धुडकावून लावते, आणि कंटाळलेल्या पण पर्यायहीन पोलिसांना तिची जीवनकथा ऐकायला लावते !
पोलिसांना सुरुवातीला अपेक्षितच तेच ऐकायला मिळते, फक्त थोड्या वेगळ्या शब्दात. " I didnt kill that bitch Vera Donovan, no matter what you think." पण त्यांना पहिला धक्का बसतो, जेव्हा डोलोरस कबूल करते की तिने 29 वर्षांपूर्वी आपल्या नवऱ्याचा खून केला आहे !
तर इथं किंग त्याची नेहमीची क्लुप्ती वापरतो. एखाद्या धक्कादायक गोष्टीचा पुसटसा उल्लेख करायचा आणि मग पानोन पानो काही स्पष्टीकरण न देता वाचकाला तसेच खिळवून ठेवायचे. अर्थात पुस्तकाच्या मध्यापर्यंत आपल्याला काय झालं असेल याचा बऱ्यापैकी अंदाज येतो, पण किंग स्वतः गोष्ट कशी उलगडतो हे पाहणे नेहमीच रंजक असते.
तर नवऱ्याच्या खुनाचा उल्लेख करून डोलोरस 29 वर्षे मागची गोष्ट नाही सांगत, तर त्याही मागे जाऊन ती व्हेराला पहिला कशी भेटली हे सांगून व्हेराच्या मृत्यसमयीच्या त्यांच्या संबंधांपर्यंत आणून सोडते. जर्जर आणि अंथरुणाला खिळलेली व्हेरा आणि डोलोरस यांच्यातले काही प्रसंग एकाच वेळी जाम विनोदी तर त्याच वेळी काहीसे करूण आहेत. त्याबद्दल इथं काही लिहिलं तर ते vulgar आणि बालिश वाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते skip करतो. पण किंग यातून व्हेराचा पूर्वीचा सापासारखा डौल आणि आता त्याची राहिलेली सावली मस्त डोळ्यासमोर आणतो. व्हेरा आणि डोलोरस ह्यांना एकमेकांबद्दल वाढणारी आत्मीयता आणि त्यांच्यातली विचित्र चढाओढ पण मस्त वाटती.
तर किंग पुन्हा तिच ट्रिक वापरत व्हेराच्या मृत्युपर्यंत narrative न नेता आपल्याला परत उचलून 28 वर्ष पाठी घेऊन जातो.इथे आपण डोलोरस चा नवरा आणि तिची मुलं (एक मुलगी, आणि दोन पोरं) यांना भेटतो. डोलोरसची या भागात मस्तच ओळख पडते आणि कुठेतरी ती आवडायलाही लागते. तिचे आणि नवरोबाचे संबन्ध तर भारीच घेतलेत. कसे हे दोघे नवराबायको एकमेकांविरुद्ध बुद्धिबळासारखे डावपेच रचत असतात !
तर हळूहळू नवऱ्याच्या खुनाकडे वाटचाल होते. हा खून का होतो वगैरे फारच predictable आहे, पण तरी वाचायला मजाच येते. खुनाच्या आणि त्यांनंतरच्या काही प्रसंगात किंगने भीती पेरून टाकली आहे. आपणही डोलोरस सोबत थरथरत विहिरीच्या तळाशी पुन्हा पुन्हा डोकावतो :))
तर नवऱ्याच्या खुनाचा आणि व्हेराच्या मृत्यूचा सम्बन्ध काय, व्हेरा आणि व्हेराच्या मुलांमध्ये काय बिनसलं आहे की ते तिला वर्षानुवर्षे भेटत नाहीत अशा काही गोष्टींबद्दल वाचक सतत आडाखे लावत राहतो.
एकूण काय तर पुस्तक आवडलं. पात्रनिर्मिती उत्तम. वातावरण निर्मितीही सुद्धा उत्तम. लिटल टॉल अगदी डोळ्यासमोर साकार होतं आपल्या. कथा ही ठीकच. म्हणजे फार रोमांचक किंवा भीतिदायक नाहीये, पण तरीही प्रभाव पाडून जाते.
यावर याच नावाचा सिनेमा पण आला आहे पूर्वीच. पाहिला नाहीये, पण रेटिंगमधून चांगलाच वाटतोय.

पुढचा review- द स्टॅन्ड !

क्रमश: (कदाचित)

कथामौजमजाआस्वादसमीक्षालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Nov 2019 - 8:06 pm | मुक्त विहारि

आवडली. ..

पुढच्या भागाची वाट पहात आहे. ..

कारण अनुवादित साहित्य फार कमी पण ही कमी पूर्ण झाली पाहिजे.

आपन विद्यार्थी असताना वाचनाची आवड म्हणुन वाचली असली तरी हे वाङ्मय चौर्य आहे हे लक्षात ठेवा. आपन जेव्हा कधी कमावते होणार तेव्हा न विसरता सर्व पुस्तके विकत घेऊन वाचनाची गरजू विद्यार्थांना दान करा अथवा संग्रही ठेवा.

गामा पैलवान's picture

7 Jan 2020 - 7:12 pm | गामा पैलवान

वगिश,

माझ्या मते वाङ्मयचौर्य म्हणजे दुसऱ्याने लिहिलेलं स्वत:च्या नावे खपवणं. पुस्तक पळवणं म्हणजे वाङ्मयचौर्य नव्हे.

आ.न.,
-गा.पै.