मन्या व्हर्सेस अंबानी..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
6 Jan 2020 - 5:48 pm

आमच्या मन्यानी नवीन वर्षाचा संकल्प वगैरे करणं कधीच सोडलं आहे. वारंवार संकल्प करून तो पूर्ण न करणं, मग त्याची लाज वाटणं,मग स्वतःला दोष देणं आणि ह्यातून हळूहळू निगरगट्ट होण्याकडे झुकणं अन फायनली निगरगट्ट होणं ह्या सगळ्या स्टेजेस मन्याने पार केल्या आहेत. आता त्याच्यासमोर कोणी न्यू इयर रिझोल्युशन वगैरे गोष्टी सुरु केल्या की मन्या मनातल्या मनात हसतो. तरीसुद्धा खूप वर्षांपासून मनात असलेला पण कधीही पूर्णत्वास न गेलेला, सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर उठण्याचा निर्णय यंदा मन्याने घेतला होता. फक्त ह्यावेळी त्याने त्याला संकल्प वगैरे नाव देऊन जाहिरात करणं कटाक्षाने टाळलं.आता जानेवारीचा पहिला आठवडा संपत आला तरी मन्या रोजच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशीराच उठतोय. कारण थंडीचं तशी पडलीये ना ! पण काल शनिवारी रात्री मन्याने ठरवलं की काहीही झालं तरी उद्या सकाळी लवकर उठायचंच..

आणि सकाळी सव्वा आठ वाजता मन्याचा डोळा उघडला..!

स्वयंपाकघरात गेल्यावर मिश्किल हास्याने बायकोने त्याचे स्वागत केले. नऊ वाजता मन्या चहा पिता पिता पेपर वाचत होता. तिकडून बायकोने घरात काहीही भाजी नसल्याचे जाहीर केले.आणि मन्याला संभाव्य संकटाची चाहूल लागली. त्याने लगेच "मी आणतोय" अशी घोषणा केली. आणि लेकीला सोबत घेऊन तो निघाला सुद्धा. तसं भाजी आणणं हे मन्याचं आवडतं काम. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून त्याच्या घराजवळची मंडई बंद पडली होती. त्यामुळे मन्याला जवळच्या रिलायन्स फ्रेश मधून भाजी आणावी लागायची. तिथं जाणं मन्याला अजिबात आवडत नाही. सुपरमार्केट,शॉपिंग मॉल इथे मन्या गुदमरतो. इथला प्रत्येक माणूस आपल्याला लुटायलाच बसलाय ही त्याची धारणा आहे. नेहमीचा भाजीवाला एक किलो मटार मोजल्यावर दोन शेंगा अजून टाकतो ही गोष्ट मन्याला सुखावते. पण रिलायन्समध्ये ह्याचसाठी एक हजार नऊ ग्रामचे पैशे मोजावे लागतात. तिथं कुठंतरी मन्याचं मध्यमवर्गीय मन दुखावतं. आणि कोथिंबीरच्या जुडीला उगाचच कोरिएण्डर लीव्ज म्हणून विकत घ्यायला त्याचं मराठी मनही धजावत नाही.

असो. तर रिलायंस फ्रेशमध्ये मन्या फार वेळ घालवत नाही. चार-पाच भाज्या भराभरा निवडून बाहेर पडायचं हे त्याचं ठरलेलं आहे. आठवड्याच्या भाजीच्या नावाखाली चार-पाच दिवस पुरेल एवढीच भाजी आणायची अन उरलेले दोन दिवस बायकोला पिठलं किंवा खिचडी करायला लावायची ह्यामागेही मन्याचं एक छुपं आर्थिक नियोजन आहे. त्यासाठी बायकोला "तुझ्या हातच्या पिठल्याची चवचं खास" असंही तो अधूनमधून म्हणत असतो.

आजही मन्या भाज्या अन एक दह्याचं पाकीट घेऊन बिलिंग काउंटरवर आला.लेकीसाठी भेंडीसुद्धा घेतली होती. (सुपर मिलेनियल जनरेशनची आपली मुलगी भेंडीची भाजी आवडीने खाते अन डेरीमिल्क कॅडबरीला नाक मुरडते ह्यामागचं कोड मन्याला कधीच सुटत नव्हतं.) बिलिंग सुरु असताना काउंटरवरचा मुलगा मन्याला म्हणाला,
"सर सिस्टम में कुछ प्रॉब्लेम है. दही का प्राईस एमआरपीसे तीन रुपया ज्यादा दिखा राहा है."

"ऐसा कैसे?", मन्याने विचारलं.

"कुछ एरर है सर. कर दु बिलिंग?"

"नही रुको. तुम्हारा एरर है तुम ठीक करो. हंम क्यो भुगते?," मन्याने आवाज वाढवला.

"नही हो सकता सर. आप दही मत लिजिए फिर."

ह्या एका गोष्टीची मन्याला नेहमीच चीड यायची. मागेही एकदा मॉल मध्ये असंच घडलं होतं. फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट लिहिलेल्या एका ड्रेसवर काहीच डिस्काउंट नाहीये असं पाऊण तास लायनीत उभं राहिल्यावर काउंटरवरच्या फटाकड्या पोरीने सांगितलं होतं. शेवटी बायको आणि त्याहीपेक्षा त्या फटाकड्या पोरीसमोर इज्जत जाऊ नये म्हणून मन्याने तो ड्रेस खरेदी केला होता. पण आता इथे तीन रुपयासाठी मन्या असून बसला. शेवटी दही घेण्यासाठी परत एखाद्या दुकानात जावं लागेल असं विचार करून मन्याने तीन रुपये जास्त मोजून दही घेतलं. आणि "कोई सिस्टम नही है यहापे" अश्या तीव्र शब्दात निषेध नोंदवून मन्या बाहेर आला.

गाडीजवळ येताच, एकंदरीत आपलं बिल एवढं कमी कसं झालं हा प्रश्न मन्याला पडला. त्याने बिल चेक केलं. दह्याचे पकडून एकशे सदोतीस रुपये झाले होते. एखादा आयटम बिलात घ्यायचा राहिलाय का असा विचार करताना त्याला बिलात भेंडी लावलेली कुठेच दिसली नाही. पण भेंडी पिशवीत तर होतीचं. त्याने मुलीकडे बघितल्यावर त्याला आठवलं की, भेंडी घेतल्यापासून त्याचं पुडकं मुलीने छातीशी कवटाळून धरलं होतं. आणि मन्या काउंटरवर वाद घालत असताना मुलीने कदाचित ते पुडकं पिशवीत टाकलं असावं. त्यामुळे भेंडी बिलात आलीच नाही. साधारण बावीस रुपयाची भेंडी मन्याला फुकट मिळाली होती. पण मन्याला ते काही पटेना. पैसे देण्यासाठी तो परत आतमध्ये गेला.

काउंटरसमोर मारुतीच्या शेपटीएवढी रांग लागली होती. मन्याने लायनीत उभं राहायचं ठरवलं. पण पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात त्याला दह्यासाठी मोजलेल्या जास्तीच्या तीन रुपयांची आठवण झाली. तो जागच्या जागी थबकला. आणि अचानकच रिलायन्स जियोचे वाढलेले दर, अंबानीचा प्रशस्त बंगला, आयपीएल,नोटबंदी,जीएसटी वगैरे सगळ्याविषयीच असलेला त्याचा सात्विक राग उफाळून आला.

"लावतोच चुना आता ह्या अंबान्याला" असं म्हणून मन्या बाहेर आला.

मन्या खुशीतच घरी आला. नकळतपणे का होईना अन बावीस रुपयाचंचं का होईना पण आपण अंबान्याचं नुकसान केलं ह्याचा त्याला आनंद झाला होतं. त्याने बायकोलासुद्धा सांगितलं. तिचे वेगळेच प्रश्न सुरु झाले.
"अहो ते ठीक आहे पण त्यांच्या कॅमेरात दिसलं तर?"

"काही दिसत नाही. दही आणलं आहे, तू कढी कर छान."

मस्त जेवण करून मन्या झोपायला गेला. त्याला झोप लागत नव्हती.अंबान्याचं नुकसान करण्याच्या नादात आपण चोरी केली आहे हे त्याच्या पांढरपेश्या मनातून जात नव्हतं. त्याने उठून परत बिल चेक केलं. बिलात शेवटल्या लायनीत Okra असं लिहून त्यासमोर बावीस रुपये लिहीलेले होते. मन्याने गूगलवर Okra शब्दाचा अर्थ चेक केला. आता भेंडीला इंग्रजीत Okra म्हणतात हे मन्याच्या बापालाही माहिती असण्याची शक्यता नाहीये. तर मन्याची काय कथा!

शेवटी आपण चोरी केलेली नाहीये हे मन्याच्या लक्षात आलं.

"बघ साल्या अंबान्या तुझ्यासारखा नाहीये मी", असं म्हणून मन्या परत झोपायला गेला.

पण आता दह्यासाठी जास्तीचे मोजलेले तीन रुपये त्याचा डोळा लागू देत नव्हते !

समाप्त..

चिनार

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

6 Jan 2020 - 6:09 pm | उगा काहितरीच

मस्त खुसखुसीत लेख !

राघव's picture

6 Jan 2020 - 6:28 pm | राघव

हा हा हा.. भारीच!

बाकी ५ भाज्या आणून उरलेले २ दिवस वेगळं काहीतरी करायचं / करायला लावायचं हे तत्व आम्ही सुद्धा वापरतोच! ;-)

मुक्त विहारि's picture

6 Jan 2020 - 6:29 pm | मुक्त विहारि

खूसखूशीत लेख.

ट्रम्प's picture

6 Jan 2020 - 6:58 pm | ट्रम्प

खुसखुशीत , कुरकुरीत लेख !!!
पीचलेले सो कॉल्ड मध्यमवर्गीय लोकांचे प्लॅन करमणूक करतात .

वाचताना खूप मज्जा आली, भारी.

"लावतोच चुना आता ह्या अंबान्याला"
हे वाचताना एकदम हसू आले..

तुषार काळभोर's picture

6 Jan 2020 - 9:35 pm | तुषार काळभोर

पाच दिवसांची भाजी
दह्यासहीत
दह्याचे रुपये तीन एक्स्ट्रा देऊन
फक्त
१३७ रुपये...?
अंबान्याचं दुकान येव्हरं स्वस्त कसा काय झालं? ;)

शा वि कु's picture

6 Jan 2020 - 9:43 pm | शा वि कु

Okra म्हणजे भेंडी हे खरंच मला (आणि माझ्या बापालाही) माहित नव्हतं. आपण लेडीफिंगर म्हणूनच वेळ मारायचो:))

हे जाम भारी लिहिलंय मजा आली :)

अथांग आकाश's picture

7 Jan 2020 - 12:12 am | अथांग आकाश

लै भारी!!!
lol

सुखीमाणूस's picture

7 Jan 2020 - 5:01 am | सुखीमाणूस

मध्यमवर्ग किती पापभीरु असतो ते खुसखुशितपणे रन्गवले आहे.
छान लेख!!

भारी लिहिलंय. :))
ओक्रा, एगप्लांट, प्लान्टिन, सिलँट्रो, शलॉट, ग्रीन आन्यन ह्यांची गोष्टच वेगळी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jan 2020 - 8:55 am | ज्ञानोबाचे पैजार

"लावतोच चुना आता ह्या अंबान्याला"

हे फार म्हणजे फारच आवडल्या गेले आहे.

पैजारबुवा,

हा हा ही ही

उन्मेष दिक्षीत's picture

15 Jan 2020 - 4:19 pm | उन्मेष दिक्षीत

लाईक ऑप्शन पाहीजे होतं राव !

1 नंबर

खुपच मस्त एकदम खुसखुशीत लिखाण!

श्वेता२४'s picture

17 Jan 2020 - 10:59 am | श्वेता२४

खुसखुशात लेख

गवि's picture

17 Jan 2020 - 12:04 pm | गवि

मस्त...

बाकी भेंडीची भाजी अजिबात न आवडणाऱ्या लोकांना ते इंग्रजी नाव सार्थ वाटत असू शकेल.. :-)