‘एकाच जागी ठोंब्यासारखं बसून राहणं म्हणजे काय, हे आपल्याशिवाय अधिक चांगलं कोण सांगणार?’, रोजसारखा आजही भुकोबाच्या मनात हाच विचार आला.
उन्हं कलली. सायंकाळ झाली. पण भुकोबाच्या घरात सांजवात लावायला अजून कोणी आलं नव्हतं. वारा सुटला तसं भुकोबा ज्या कडुनिंबाच्या खाली बसला होता, त्याची पानं सळसळली. काही गळून तरंगत खाली आली. डोक्यावरच्या छोट्याश्या कळसावर त्यातली एक दोन पानं पडल्याचा आवाज खसखसला.
‘पानगळ अजून सुरूच आहे. अशा किती पानगळी झाल्या आतापर्यंत? कुणी मोजल्या? या एवढ्याश्या घरात हा इतकुसा झरोका. यातनं काय कळणार? आलीच एखादी वाटचुकी झुळूक तर तीही आल्यापावली परत जाते हा आपल्या अंगावरचा शेंदराचा, या खवूट खोबऱ्याचा अन् जळकट तेलाचा वास नाकात भरून. मग महिनो न् महिने हवा काही हलत नाही स्वत:हून.
तोही पानगळीचाच मौसम होता- आपण इथे आलो ते. खूप काळ लोटला या गोष्टीला, नाही? हा कडुनिंब नव्हता तेव्हा. याचा बाप होता...- हं... बाप काय अन् माय काय, आयुष्यभर थोडीच पुरतात? शेवटी आपली मुळं आपल्यालाच पसरावी लागतात आणि आपली पानं आपल्यालाच गाळावी लागतात- असंच म्हणतो हा निंब नेहमी. झाडांचं काय, त्यांचा बाप एकच असला तरी ते मात्र हजारभर रोपट्यांचे न् कलमांचे बाप असतात. कोण कुठल्या गोत्राचा, वंशावळ कोण ठेवणार? आणि आपला बाप ...
आपला कोणी बाप होता? कुणी सांगावं? आठवतं तेव्हापासून आपण हे असंच एकटं पडलो आहोत कडेला. पण कधीकधी पावसाळ्यातली एखादी काळोखी रात्र असते. विजांच्या लखलखाटात कडुनिंबाच्या पानांचे भेसूर छायाखेळ या पटांगणात चालत असतात. अचानक दूर कुठेतरी गडगडाट होतो. वाटतं, ती वीज डोक्यावरच्या या भगव्या कळसावरच पडणार... पण त्या अंधारात आपण तिला दिसलोच नाही. नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. आपल्या अंगाखाली गारठून गर्दी केलेल्या मुंगळ्यांना तरी काय माहीत, दगडासारखा दगड असून आपणही भीतीने किती गारठलो ते! मग अशा वेळी या झरोक्यातून दिसणाऱ्या चमचाभर आभाळात चमकणारे काळे–जांभळे ढग पाहताना कधीकधी आठवण होते- त्या अंधाराची...
असाच अंधार होता तेव्हा. आपला बाप तेव्हा समुद्राच्या पोटातच होता. बापच म्हणायचा- त्याच्यापासून निर्माण झालो म्हणून- त्याच्या अंगावर अजून उन्हाचं जळमट पडलं नव्हतं की वाऱ्याचं अस्तर पसरलं नव्हतं. नुसतं खारट पाण्याचं गच्च भिजकेपण. एक दिवस दुरून कुठूनतरी वाहत वाहत आलेला एक जमिनीचा मोठा तुकडा दुसऱ्या तुकड्याला भिडला. उगाच. काही कारण नसताना. मोठा कलह झाला. रेटारेटी झाली. दोघांनी मिळून बापाला पाण्याच्या बाहेर काढलं. कितीतरी वर्षं तो नुसता धुमसतच होता म्हणे. बरोबर होतं, आपल्या जागेवरून उठवलं की भुंगासुध्दा नाराज होतो.
हळुहळू झाला मग तो शांत. प्रकाशाच्या काहिलीची, वाऱ्याच्या छळाची त्याला सवय झाली. झाली काय, करावीच लागली. मग एका पहाटे तो जागा झाला ते भेदरतच... अचानकच त्याच्या अंगावर कुठुनसे पाण्याचे थेंब आले. पाण्याचा स्पर्शच तो विसरलेला. पण ते नुसते थेंब नव्हते, तो होता ओघळ. फार मोठा, विशाल ओघळ. या नदीपेक्षाही मोठा. वाहता. आजूबाजूच्या सगळयांना सोबत खेचून नेणारा. कुठून आला आणि कुठे चालला, कुणास ठाऊक? वाऱ्याच्या माराने व धरणीच्या कंपाने बाप लवकरच म्हातारा झालेला. आतून ठिसूळ कधी झाला, त्याचं त्यालाही कळलेलं नव्हतं…
…मग त्याच पावसाळी रात्री शेवटी बापाचं अवसान गळालं. विजांच्या उजेडवणव्यात पावसाच्या रानमाऱ्याने त्याला आपला भार असह्य झाला. त्याने स्वत:ला आपल्यापासून मुक्त केलं आणि ढकलून दिलं आपल्याला त्या अजस्त्र ओघळात. नशीब नेईन तिकडे वाहत जायला. तीच बापाची शेवटची अन् पहिली आठवण. त्याआधी आपण होतोच कुठे? तो अन् मी एकच तर होतो. जवळचा दूर गेलानंतरच तो जवळचा होता याची जाणीव होते.’
भुकोबाने उसासा सोडला. बाकी काही सोडण्यासारखं नव्हतंच त्याच्याकडे. हलता येत नाही हे माहीत असूनसुध्दा त्याने जागेवरून उठून पाहण्याचा प्रयत्न केला, मनातच. सवय कुणाला गुलाम करून घेताना काही भेदभाव करत नाही, माणूस असो की दगड.
‘आज शनिवार, म्हातारी अजून आली नाही. शनिवार आला अन् म्हातारीचं विटकं पिवळं लुगडं दिसलं नाही असं कधी होत नाही. सुना आल्या, नातू झाले, पणतू झाले पण ते लुगडं काही म्हातारीनं बदललं नाही आणि लुगड्याने म्हातारीला. सुईच्या नाकातून जाणार्या तलम मखमली वस्त्रापेक्षाही विरलेल्या चिंध्यांमध्येच माणसाचं मन गुरफटत असावं. कुणास ठाऊक? आपल्याला काही अनुभव नाही. नाही म्हणायला ही शेंदराची खोळ तेवढी अंगाला चिकटून राहिली आहे.
कसं दिसतो या भगव्या रंगात आपण, काय माहीत? हा रंगही आपला नाही, नावही आपलं नाही आणि जागाही आपली नाही. आपलं म्हणावं असं काय असतं म्हणा? म्हातारीचंच पहा, सगळे आहेत पण आपलं म्हणावं असं कुणी नाही- हेच रडगाणं गाते नेहमी. आपल्याला तिने नदीतून उचलून आणलं त्या दिवसापासून. प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगायची. आपण तिला कसं सापडलो ते. कितीदा ऐकलं ते कौतुक. पहिल्या बाळंतपणाच्या गोष्टीसारखं.
म्हातारी तेव्हाही म्हातारीच होती. तिला बघतोय तेव्हापासून म्हातारीच आहे. या म्हातारीचीच एक बहीण होती. म्हातारीच. बहिणी-बहिणी जावा-जावा. पण मोठ्या बहिणीच्या मनात म्हातारीबद्द्ल कढच. एकदा म्हातारी मुलीकडे गेली. तालेवार जावई. तूप रोटी खाऊन आली. पण अंगावर चढलेलं मूठभर मांस काही थोरलीला पाहवलं नाही. बहिणीलाच बहिणीची नजर अशी लागली की म्हातारीची भूकच मेली म्हणे ती तेव्हापासून. भूक लागेना, अन्न जाईना की औषधाचा गुण दिसेना. शरीराचं चिपाड झालं अन् मनाची भिंगरी. म्हातारी भिंगरीसारखी गावभर गोल गोल फिरू लागली. खप्पड तोंड आणि वाटोळे डोळे पाहून लहान पोरंच काय शेळ्याही दूर पळत.
म्हातारी आली फिरत फिरत त्या दिवशी नदीकडे… हेच दिवस होते… पाणी आपल्याला वाळूतच उघड्यावर उन्हात शेकायला मोकळं सोडून स्वत:च हवा झालेलं. पण त्या कड्याच्या खाली बसलेलं असल्याने पश्चिमेचं दुपारऊन तरी निदान पडत नव्हतं अंगावर.
टळटळ दुपार. मेल्यासारखं पडलो होतो. कडयावरनं काहीतरी हलल्याची सावली पडली. सावलीच्या त्या एवढ्याश्या फुंकरीनेही किती बरं वाटलं होतं. आता उन्हाची एखादी तिरीप अंगावर पडावी म्हणून जीव कासावीस होतो. म्हातारीच्या पिवळ्या पातळाचा पदर तेव्हा पहिल्यांदा झळकला. त्याचीच ती सावली.
म्हातारीच सांगते- तिने काहीही विचार केला नाही. धाडकन् उडी मारली. सरळ आपल्या अंगावर. डोक्याला डोकं लागलं आपलं. म्हातारीचे डोळे खोल गेलेले म्हणून तिला एवढीशी खोलीही खोल वाटली. पावसात नदीला पाणी असतं तेव्हा लहान पोरांची उड्या मारून पोहायची जागा ती. म्हातारी कशी मरणार? खोक पडली तिला कपाळावर. थोडं रक्त लागलं आपल्यालाही. म्हातारीही मेल्यासारखी पडून राहिली बराच वेळ. मग दुसऱ्यांदा सूर्य बुडायला आला तेव्हा तिला जाग आली ती आयुष्यभराची भूक पोटात घेऊनच.
मग म्हातारीची कुदळ चालली. आपण वाळूतून बाहेर आलो अन् वाजतगाजत बसलो या कडुनिंबाखाली. म्हणाली-“भुकोबाराया, पावला रे बाप्पा मले! तुह्या क्रिपेनं पोटोबा भेटला. पोटोबाच नसंन तं इठोबातरी कुठे भेटते? नरकच भेटला असता मले बुढीले…”
कडुनिंबही आपल्या नव्या नावावर पानं गाळत हसला. नवं नाव म्हणजे नवा जन्मच, नाही? आपण तेच नाव नवीन. नदी तीच पण पाणी नवीन. कडुनिंब तोच पण वसंतातली पालवी नवीन. आभाळ तेच पण रंग नवीन. दगड तोच पण आकार नवीन.
भुकोबा, भुकोबा! जिकडे तिकडे नाव झालं. गावभर झालं, गावाबाहेर झालं. नदी नाल्यांमध्ये झालं, रान शिवारात झालं. समोरच्या शिवारात दर हंगामात एक अवतार संपवून दुसऱ्याची बीजं मागे सोडून जाताना पिकं मातीला निरोप सांगत- “आम्ही तर चाललो आता. पण तू येणाऱ्या अंकुरांना सांगशील नक्की, भुकोबाच्या अंगावर पोचणारा वारा आपल्याच अंगावरून गेला असलेला पाहिजे. आपल्याच ओल्या ओंब्यांचा गंध त्याच्या चरणी वाहत गेला पाहिजे.” सगळं ऐकत होतो इथे बसून. प्रसाद म्हणून ठेवलेल्या गूळ-खोबऱ्यावर बसलेल्या माश्या प्रत्येक घास घेताना हात जोडू जोडू नमस्कार करत. कडुनिंबावर बसलेल्या पाखरांनीही कधी घाण नाही केली आपल्यावर.
पण पाण्याचं ओलेपण जसं त्याला शेवटपर्यंत सोडत नाही तसं नव्याचं नवेपण त्याला चटकन् सोडतं. आपलंही नवेपण तसंच. शेवटी सोडून गेलंच. निळं आभाळही शेवटी काळंच होतं. हिरवं पानही शेवटी पिवळंच होतं- म्हातारीच्या लुगड्यासारखं. जन्मभराची कंटाळधूळ जमते त्याच्यावर. काळाचे मोड पडतात. जमान्याच्या बोलण्याचे डच्चू पडतात. पण लुगडं काही विटत नाही आणि जीव काही आटत नाही. जुनं हाड म्हातारीचं, आपल्यासारखंच. जमिनीत घट्ट रुतून बसलेलं. कोणी मुद्दाम कुदळ मारल्याखेरीज निघणारं नाही.’
भुकोबा भानावर आला तो खारीने त्याच्या कळसावर उडी मारल्यानं. ‘खार आली म्हणजे म्हातारी आली वाटतं. म्हातारीनं आज कशाचा प्रसाद आणला काय माहीत? खारीला म्हातारीची ही वेळ बरोबर माहीत आहे. कुणाचा प्रसाद चढवायचा नेम तर कुणाचा खायचा!’, भुकोबा हसला. तोवर खार त्याच्या समोर उतरली होती. लाल रंगाच्या जाळीच्या दारातून तिने तोंड घालायचा प्रयत्न केला, तो ते खडखड वाजलं. आतली हवा थोडीशी हलली. पण तेवढ्याश्या हवेने कळसाच्या आतले निगरगट्ट कोळी आणि त्यांचे जाळे थोडीच थरथरणार होते? सांडलेल्या तेलावर बसलेले मुंगळे तेव्हढे थोडेशे बिचकले, बस! आत जाता येत नाही हे पाहून खारीने तो नाद सोडला. उगाचंच अंगाला एक झटका दिला. सर्रकन मागे वळली. म्हातारीची वाट बघू लागली. भुकोबाही समोर पाहू लागला. त्याला दुरूनच तो पिवळा रंग दिसला. पाठोपाठ म्हातारीने हळूचकन काठी टेकवल्याने उडालेली बारीकशी धूळही त्याने टिपली. भुकोबाला हायसं वाटलं.
म्हातारी एकदाची पोचली. चालून चोथा झालेल्या चपला तिने सावकाश काढल्या. एक हात टेकवत हळुहळू खाली बसली. हातातली स्वत:इतकीच वाकडी काठी खाली ठेवली. भुकोबाला आपले थरथरते हात जोडले. भुकोबा पाहतच होता. आता ती काय करणार त्याला माहीत होतं. ती थोडी पुढे झुकली. दाराची कडी काढून ते उघडलं. थोडा अजून हात लांबवून डावीकडच्या खिडकीतली तेलाची चिकट काचेची बरणी व वातीची डबी काढली. तेलवात टाकून, अंगारडबीची एक काडी ओढून दिवलाणी लावली. मग कमरेच्या चंचीतून थोडीशी खडी साखर काढली. तिथेचं पडलेलं, एकाच रंगाचं झालेलं, हळद -कुंकू भुकोबाला वाहिलं. पुन्हा हात जोडले-
"जय हो भुकोबाराया! मले म्हाईत हाय बापा आज तुले लय वाट पाहा लागली. पन काय करता बापा? शरीर साथ देत नाई आता. ढोरं गेले चरायले तवा निंगलो मी तं आस्ते आस्ते अथी पोचेस्तोरच अंधार झाला. त्यात पुना परसाद काय आनायचा याचा घोर? पन्तू- गिन्तू म्हनतात, बुढे ,तू नेमी ते खडीसाखरंच आन्ते. मलेइ आता काही सुदरत नाई. बरं आजकालचे पोट्टेही अशे हाये का ज्याचं नाव ते! माह्याबरोबर चला म्हनलं तं बरोबर टाईमवर चाट मारते. खान तशी माती!
…पन मी आज तुले हे सांगायले आलो की आता तुहा हा खडीसाखरेचा उकडा बंद होनार हाये. आता तं काय बापा पेढे काय, बरफि काय, बासुंदी काय, काही इचारू नका!... काहून?... कालच मोठा नातू म्हने की आमी आता भुकोबाचं देऊळ मोठ्ठं करनार आहे म्हने. वर्गनीही जमा करनं चालू केलं म्हने. पलीकडच्या गावात मोठ्ठा दोनशे का चारशे फुटी मारूती बांधला कानी, तो पाहा त्याच्या हातातली गदा दिसते. तसं मंदिर पाहिजे म्हन्ते गावात.” म्हातारीने खिडकीकडे इशारा केला.
“मारूती जिकडे तिकडे झाले म्हने म्हून आता तुह्यवालंच मोठं मंदिर करनार हाये. आता या चैत्रात तुहा परकटदिन का काय म्हनतात तो करनार आहे म्हने बॉ… तुले म्या अथी आनलं तो दिवस… आनि त्या दिवशीच पैली कुदळ मारनार हाये… वर्शभर लागते म्हने सारं बांधाले… असंल नशीबात तं मिळंल पाहाले याच जल्मी… तुलेच मालूम बाप्पा!"
म्हातारी काठीच्या आधारानं उठली. पुन्हा हात जोडले, "बरं बाबा चलतो आता." सावकाश मागे जाऊ लागली. जाताना तिनं हातातली थोडीशी खडीसाखर केव्हाच्या ताटकळलेल्या खारीच्या दिशेने फेकली. दोघीही एकमेकांकडे पाहून हसल्या.
भुकोबाला वाटलं, ‘म्हातारी तर आता सुटणार. आज नाहीतर उद्या. मग नवे कपडे, नवा जन्म. जुन्या जन्माच्या खुणाही पुसून जातील तिच्या स्मृतीतून. पण आपल्या अंगावरची ही भगवी खोळ? एकदा चढली ती चढलीच. ती कधी गळणार? कधीच नाही, कदाचित. आणि तोपर्यंत काय? बसून राहा ठोंब्यासारखं, दुसरं काय करणार, दगडं?’
***************************************************
माझ्या या आणि इतर कथांचा समावेश असलेला "टर्मिनस" हा कथासंग्रह आता किंडल ई-बुक स्वरुपात येथे उपलब्ध.
प्रतिक्रिया
22 Dec 2019 - 1:43 pm | आनन्दा
जाम म्हणजे जामच आवडलं मला हे.
22 Dec 2019 - 4:03 pm | पलाश
वाळूच्या घड्याळातली वाळू जशी एका लयीत अनायास, सहज घसरत जाते आणि बघताबघता तास पूर्ण होतो तशी ही "भुकोबा"ची सुरेख कहाणी अनायास, सहज लयीत चालू रहाते आणि वाचतावाचता पूर्णही होते. फारच छान!! _/\_
22 Dec 2019 - 4:29 pm | आ युष्कामी
अतिशय सुंदर आणि ओघवतं लिहिलं आहे.
22 Dec 2019 - 4:46 pm | योगविवेक
वाचत राहिलो... मग आवडू लागली स्टाईल. शेवटी छान कथा वाचल्याचे समाधान झाले.
22 Dec 2019 - 7:46 pm | वामन देशमुख
खूप छान लिहिलंय हं.
23 Dec 2019 - 1:32 am | उगा काहितरीच
छान लिखाण.
23 Dec 2019 - 12:15 pm | विनिता००२
छान लिहीलय :)
23 Dec 2019 - 2:04 pm | स्वधर्म
देऊळ सिनेमाची आठवण झाली.
23 Dec 2019 - 4:53 pm | श्वेता२४
पण तुम्ही त्याच्या निर्मितीचा प्रवास छान उलगडलाय. शिवाय लिखाणाची शैलीही खूपच आवडली.
23 Dec 2019 - 3:24 pm | मुक्त विहारि
मस्त....
विदर्भातील भाषा खूप दिवसांनी वाचली...
23 Dec 2019 - 10:22 pm | जव्हेरगंज
प्रचंड सुंदर!!!
24 Dec 2019 - 1:09 pm | संजय पाटिल
अतिशय सुंदर.....
आवडले!
24 Dec 2019 - 4:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
अतिशय आवडली गोष्ट
पैजारबुवा,
29 Dec 2019 - 7:27 pm | ए ए वाघमारे
सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद!
30 Dec 2019 - 1:00 am | एस
कथा आवडली.
4 Jan 2020 - 1:15 pm | असंका
फारच सुंदर!!!
धन्यवाद!!
22 May 2020 - 1:05 am | अर्धवटराव
.