"तो" आणि "ती"

अभिनव प्रकाश जोशी's picture
अभिनव प्रकाश जोशी in जनातलं, मनातलं
11 Dec 2019 - 6:06 pm

ऑक्टोबर महिन्यातल्या कडक उन्हाचे दिवस होते. म्हाळ महिना चालू होता. परोब काकांकड़े आज म्हाळ करण्याचे ठरले होते. देवळातल्या साधले भटास लागणारे साहित्य आणि बाकी भट आणण्याची जबाबदारी दिली होती. घरात सगळीकडे लगबग सुरु होती. घराच्या उजव्या बाजूला, परसात ४ चुली तयार होत्या. कुमार मिलिंद त्यात जाळ करण्यासाठी घरातल्या शेगडीवरून पेटती कट्टी झेलवत झेलवत आणत असता त्यातील एका किटाळाणे साधले भटाने आणलेल्या एका भटाच्या धोतराला खिंडार पाडून खळबळ माजवली. धोतर पेटायच्याच मार्गावर होते ! भटाला त्या ठिणगीची ऊब लागताच त्याने पुढे मागे न बघता आचमनाला दाळून ठेवलेल्या तांब्यातील पाणी धोतरावर ओतून प्रसंग निभावून नेला ! पुऱ्या करण्याची तयारी करीत असलेल्या परोब काकूंनी सगळा प्रसंग बघून कुमार मिलिंदावर लाटणी भिरकावली, जी मिलिंदाने लीलया चुकवून आधीच धक्क्यात असलेल्या त्या भटाला चाटून जाईत भानावर आणून गेली ! मिलिंदाने तिथून लगेच पोबारा केला आणि चौकात बसून, काल आलेल्या पाहुण्यांच्या बशीत उरलेल्या शंकरपाळ्या खाणाऱ्या बाळाला जाळ करण्याचे काम सांगीत त्याचा हिरमोड केला व स्वतः बाहेर उडणारी भिरमुट पकडायच्या नादाला लागला. बाळ्याने उरलेल्या शंकरपाळ्या खिशात टाकून जाळ तयार केला.एव्हाना साधले भटाने परिस्तिथी नियंत्रणात आणली.
"चला सगळ्यांनी हात पाय धुवून घ्या रे बसायच्या आधी- कारण काय आहे, शुद्ध-" - इति साधले भट
"माझं झालं !"- भिजलेल्या धोतरातील तो भट !
त्या भटाने आपले सोवळे बदलून घेतले.स्वतःला सावरता सावरता त्याने बाजूला असलेल्या वर्तमानपत्रात छापलेल्या भविष्यावर एक तिरकी नजर टाकायचा एक असफल प्रयत्न केला व तोच तो झोपलाय असे समजून साधले भटानेv १-२ दा घंटा वाजवली ! त्या भटाने तो नाद सोडून लागलीच गंध झरवायला घेतले. हा झालेला सगळा वृत्तांत "तो", "वरून",नळ्यांतील भिंगातून बघत होता !

एव्हाना काकूंनी माळ्यावरून काढलेल्या परातीला पाणी लावले, व मैदा आणि गव्हाच्या पिठाचे भले मोठे डबे काढून परसात लावलेल्या चुलींकडे बस्थान मांडले. शेजारच्या १-२ बायकाही चुलीकडे हातभार लावायला आल्या होत्या. पुऱ्या, तांदुळाची खीर, चण्याची आमटी, भात, केळ्यांचे पंचामृत, काकडीची कोशिंबीर आणि तळण असा जुनाच बेत होता. एकाला सोडून सगळ्या भटांनी हात- पाय धुवून घेतले आणि न्याहारीची पंगत बसली. २ भटांनी सेकंड राउंडला जायचा विचार केला होता, पण साधले भटाने "आता खाणार आणि मग लवंडणार- त्यापेक्षा पुन्हा आणि नको"-असे म्हणून त्यांच्या विचाराला हरताळ फासला. आता न्याहारी होऊन केशवायनमः म्हणणार तेवढ्यात एका भटाने "लघुशंका निरसन केंद्रात जाण्यासाठी पाट सोडला ! त्याचे होताच इकडे विधी आणि तिकडे रांधप सुरु झाले. बायकांनी भाज्या निवडल्या. पाण्याचे तोप भरले आणि विळ्यांवर भाजी चिरायला बसल्या. परोब काकूंनीही चुलीवर पाणी उकळत ठेवले, आणि त्या बटाटे सोलायला बसल्या. "त्याला" ह्या सगळ्यांत काही रुची नव्हती. त्याच्या आणि बायकांमध्ये आता भिंग येत नव्हते ! तो वरून, जवळच खाली, परसात बसलेल्या बायका काय करतायत याकडे लक्ष ठेऊन होता. परोब काकूंनी बटाटे सोलून पुऱ्याना हात घातला तेव्हा तो बहुदा खुश झाला असावा. मगापासून "तो" तिथेच, "वर" बसून होता. कितिसाच वेळ गेला होता आणि परोब काकूंनी पुऱ्या तळायलाही घेतल्या होत्या. तिकडे म्हाळ संपत आला होता. नैवेद्याला पाने वाढली गेली. "त्याची" उत्कंठा शिगेला पोचली होती ! अन तेवढ्यात साधले भटाने अंगणात "वाडी" म्हणजेच कावळ्यासाठीचे पान आणून ठेवले आणि क्षणाचाही विलंब न करता परसातील तोरंगीच्या वरच्या फांदीवर बसलेल्या "त्या" कावळ्याने खाली येऊन त्या पानातली "ती" आवडती पुरी उचलली आणि साहजिकच खुशाल मनाने "तो" आपल्या वाटेने उडून गेला !
समाप्त

कथालेख

प्रतिक्रिया

विनोदपुनेकर's picture

11 Dec 2019 - 6:51 pm | विनोदपुनेकर

म्हाल म्हन्जे काय ते समजले नाहि आनि शेवटि कावल्याने पुरि पळवली हा या लेखाचा विशय आहे हे समजले ... धन्यवाद

श्वेता२४'s picture

11 Dec 2019 - 8:42 pm | श्वेता२४

पितृपक्ष, महालय असते त्याला म्हाळ म्हणतात .

विनोदपुनेकर's picture

12 Dec 2019 - 9:25 am | विनोदपुनेकर

धन्यवाद

जॉनविक्क's picture

11 Dec 2019 - 7:06 pm | जॉनविक्क

कसल्याही साहित्यिक व्यभिचाराची जबरदस्ती नसणारे असे लेख व विविधरंगी लेखकच मिपाचे खरे वैभव आहे. मिपा कात टाकतेय, सुरेख. लिखाण आवडले.

अभिनव प्रकाश जोशी's picture

11 Dec 2019 - 9:17 pm | अभिनव प्रकाश जोशी

धन्यवाद !

प्रमोद देर्देकर's picture

12 Dec 2019 - 7:51 am | प्रमोद देर्देकर

मस्त काही नवे शब्द कळले .

पाषाणभेद's picture

12 Dec 2019 - 9:41 am | पाषाणभेद

देव देवळात नसतो तर तो भुकेलेल्यांत असतो.

अभिनव प्रकाश जोशी's picture

13 Dec 2019 - 6:53 am | अभिनव प्रकाश जोशी

खराय !

गामा पैलवान's picture

13 Dec 2019 - 5:45 pm | गामा पैलवान

पाभे,

देवळांत देव असतो. फक्त तो वेगळी भूक भागवतो.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2019 - 5:48 pm | मुक्त विहारि

+1