- डॉ. सुधीर रा. देवरे
सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का?
या कार्यक्रम शरण समाजात माणूस संपला तरी कार्यक्रम चुकत नाहीत. दु:ख आवरून कंबर खोचून कार्यक्रम साजरे करायचे असतात. नाहीतर लोक काय म्हणतील! याला मुळी प्रेमच नव्हतं. म्हणून कार्यक्रम करत नाही.
माणूस वारला. लोकांची गर्दी जमली पाहिजे म्हणून दु:ख आवरून फोनाफोनी करून लोक गोळा करू. (आवश्यक ते नातेवाईक जमलेच पाहिजेत.) गल्लीने मिरवत प्रेतयात्रा निघते, हे ठीक आहे. शेवटची यात्रा नीट निघाली पाहिजे, हे ही समजण्यासारखं आहे. प्रचंड गर्दीने स्मशानात जाऊन प्रेताला अग्नीडाग देण्याचा कार्यक्रम. आता या कार्यक्रमात भाषणांचाही कार्यक्रम आवश्यक झाला आहे.
दुसर्याण दिवशी सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम. दारावर येणार्यार लोकांसमक्ष (विशेषत: महिलांनी) रडून शोक प्रदर्शनाचा कार्यक्रम. नदीत अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम. दहाव्याला पुरूषांच्या डोक्याचे केस काढण्याचा कार्यक्रम. कपाळाला टिळा लावण्याचा कार्यक्रम. जेवणाची पंगत देण्याचा कार्यक्रम. अकराव्या दिवशी अकरा सवाष्णी जेऊ घालण्याचा कार्यक्रम. बाराव्याला दिवस म्हणतात. दिवसाला जेऊ घालण्याचा कार्यक्रम. काशीला जाऊन आलेल्या माणसाचा तेराव्याला पुन्हा जेवणाचा कार्यक्रम.
महिण्याचा पित्तर म्हणजे जेवणच. बारा महिणे होईपर्यंत दर महिण्याला पितरांचं जेवण. शेवटी वर्षाचा पित्तर म्हणजे पुन्हा जेवणच. (दरवर्षी भादव्यात पुन्हा पित्रांचा कार्यक्रम ठरलेला.) बाप रे! दम लागून आला नुसतं सांगूनच. परंपरेतून एवढे कार्यक्रम करणार्यां चं काय होत असेल? (म्हणजे आपल्या सगळ्यांचंच...)
अशा कार्यक्रमांना फाटा देत वाचवलेल्या पैशांतून, जगाचा निरोप घेऊन गेलेल्याच्या स्मरणार्थ चांगलं सामाजिक काम उभं राहू शकतं. हयात नसलेली व्यक्तीही अशा चांगल्या कामांमुळे नाव रूपाने अमर होऊ शकते. याचा विचार वारसांनी करायचा असतो.
(अप्रकाशित. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
1 Oct 2019 - 5:55 pm | मुक्त विहारि
हा सर्वात जास्त वेळखाऊ. .
2 Oct 2019 - 2:04 pm | डॉ. सुधीर राजार...
बरोबर
2 Oct 2019 - 6:42 pm | कंजूस
मरणपंथाला लागलेल्या व्यक्तीनेच किंवा इतरांनी वारंवार इच्छा व्यक्त केली की "माझं कार्य करू नका, काही पैसे सेवाभावी संस्थांना द्या" तरच या पितर श्राद्ध वगैरेंना आळा बसतो. नाही तर घाबरून सर्व विधी ,जेवणावळ चालूच राहाते.
2 Oct 2019 - 7:40 pm | मुक्त विहारि
जवळपास सर्वच धर्मात आहे.
3 Oct 2019 - 3:58 pm | अनिंद्य
गेली काही वर्ष एक बदल विशेष बघतोय - मृत्यूचा 'इव्हेंट' जोरदार साजरा करण्याकडे कल आहे.
राजकारणी आणि सेलेब्रेटींचं सोडा, अन्य लोकही २-३ दिवस पार्थिव तसेच ठेवणे, मोठी गर्दी जमेपर्यंत अंत्यसंस्कार पुढे ढकलत राहणे, प्रेतयात्रेचे स्मार्टफोनवर एकमेकांना थेट प्रक्षेपण आणि साग्रसंगीत 'दिवस' साजरे करणे असे करत आहेत. प्रचंड खर्च ओघानेच आला.
चुकीचे आहे पण बोललेले कोणालाच आवडत नाही.
6 Oct 2019 - 9:38 pm | चौथा कोनाडा
छान समर्पक लेख आहे. आवडला.
दुसऱ्याच्या मरणावर पोळी भाजून घेणारे बघितले की शिसारी येते. नुकताच एक अंतिम संस्काराचा विधीला उपस्थित राहण्याचा योग आला.तिथं एक नातेवाईक आरडाओरडा करत सूचना देणे, फक्त मलाच सर्व माहिती, मी म्हणतो तसेच करा अशी इतकी गुंठामंत्रीगिरी करत होता की किळस आली !
लोकांना मॅच्युरिटी कधी येणार ?
7 Oct 2019 - 12:08 am | नाखु
आणी दिखाऊ तोंड पुंजी ही स्मशानात सुद्धा दिसून येते की
9 Oct 2019 - 10:22 am | चौथा कोनाडा
बरोबर नाखुसाहेब !
मढ्यावरच्या टाळू वरचं लोणी खाणारी जमात !
9 Oct 2019 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंत्यविधीतल्या कार्यातला जाणकार असतो तो. अमुक करा, असं न, असं करा. अहो, ते तसं नै. असं करा. नै केलं तर विनाकारण तो मोठ्याने ओरडून सांगणारा तो कार्यकर्ता तर लेखनाचा विषय व्हावा. त्या कार्यातही आपल्याशिवाय कोणी नवं नेतृत्व उभं राहू नये असे त्याला वाटत असते. सारख्या सुचना आणि होल & सोल तो त्या कार्यक्रमाचा प्रमुख असतो. असो.
-दिलीप बिरुटे
7 Oct 2019 - 12:21 am | कंजूस
जवळच्या नातेवाइकांनाच हा इवेंट/कार्य दणक्यात व्हावे अशी इच्छा असेल तर आपण कशाला काळजी करायची?
9 Oct 2019 - 7:47 pm | बाप्पू
आमच्या गावी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ( यात अग्नी देणे, सावडने, दहावा, तेरावा हे सर्व आले ) म्हणजे एक सामाजिक शक्तिप्रदर्शन असते. कोणाच्या इव्हेंट ला किती माणसे जमली यावरून गेलेला माणूस किंवा ते शोकाकुल घर किती पावरफुल आहे ते दाखवले जाते.
दहाव्याच्या दिवशी जास्तीत जास्त पब्लिक गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः राजकारणी आणि मोठे सरकारी अधिकारी यांना तर आग्रहाचे निमंत्रण असते..
त्यांच्या हस्ते मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यात जो "मोठेपणा" असतो तो मी पामराने काय वर्णावा..
तीच गोष्ट दहाव्याच्या दिवशी होणाऱ्या किर्तन कार्यक्रमाची. मोठ्यात मोठ्या कीर्तनकाराला बोलावून त्याच्या अमृतवाणीने जमलेल्या सर्वांचे ज्ञानप्रबोधन करण्याचा तो आटापिटा.
पण प्रत्यक्षात काही माणसे सोडली तर प्रत्येकाला कधी एकदा कावळा शिवून मी मोकळा होतोय याची घाई. तिकडे मृतात्मा घेला xxxx त.
तेरावा, आणि त्यातील विधि मध्ये देखील तसेच. दुःख किंवा शोक व्यक्त करण्यापेक्षा आणि मृतात्म्यास सदगती मिळण्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा इतर बाबींना जास्त महत्व दिले जाते.
अस्थी सोडण्यासाठी जेव्हा नदीकिनारी जातात तेव्हा देखील स्वतः च्या प्रेस्टिज चा विचार केला जातो.
माझी आजी जेव्हा वारली तेव्हा अस्थी सोडायला जाताना माझ्या 6 सक्ख्या आत्या रुसून बसल्या होत्या. कारण माहितेय? गाडीमध्ये सगळ्यांनाच पुढच्या सीटवर बसायचे होते. आणि माझी आजी जाऊन फक्त काहीच दिवस झाले होते.
आमच्या इकडे "भरण्या" नावाचा पण एक कार्यक्रम होतो त्यातल्या गमती जमती पुन्हा कधीतरी. तूर्तास एवढेच.
9 Oct 2019 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मृत्युनंतरच्या क्रियेचाही इव्हेंट होत आहे. दुर्दैव दुसरं काय.
-दिलीप बिरुटे