समाधीवरचा गाव (एक भयकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
29 Jul 2019 - 10:25 am

'सावरगाव' जेमतेम हजार-दीडहजार लोकसंख्या असलेल छोटस गाव. तस पाहायला गेल तर, सभोवताली असलेल जंगल आणि त्यात असणाऱ्या प्राण्याशिवाय गावाला दुसरी काही ओळख नाही. उतरत्या छपराची घरे, समोर अंगण आणि त्याभोवती ताराचे कुंपण अशी साधारण घरांची रचना. जंगलातील प्राणी घरात घुसू नये म्हणून तारेचे कुंपण हमखास घराभोवती पहायला मिळत होते. जंगलातील प्राणी कधी घरात घुसून पाळीव प्राण्याचा, लहान मुलांच्या गळ्याचा घोट घेईल याची याची शाश्वती नसायची. गाव मधोमध जंगलात असल्यासारखे होता. तिन्ही बाजूला जंगल आणि उरलेल्या एका बाजूला नदी. त्यामुळे गाव जंगलात असल्यासारखेच भासायचे. शेती हा गावातील एकमेव व्यवसाय. दुसरा व्यवसाय क्वचित पाहायला मिळायचा. गावात एक लोहाराचे घर, दोन-तीन सुताराचे घरे आणि गावाच्या मधोमध असलेले मारूतीचे मंदीर. अशा काही ठळक डोळ्यात भरणार्‍या गोष्टी गावात होत्या. इतर भौतिक गोष्टी पासून गाव अजून दूरच होता. जगण्याचा गोष्टी जेवढ्या आवश्‍यक होत्या त्याही कशाबशा उभारण्यात आल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळी एक खटारा बस आपली नेहमीची फेरी मारायची. बाकी सर्व गाव साधारण शांत, आपल्या कामात व्यस्त असल्यासारखा कामात बुडून जायचा. बाकी जगात घडणाऱ्या गोष्टीचा गावाला मागसुम नसायचा. रात्री निपचित शांत पडायचा गाव.

  या सर्व गोष्टी साधारणपणे गावात आढळणार्‍या असल्या तरी गावाची परिसरात ओळख होती ती, 'समाधीवरचा गाव' म्हणून. सावरगाव चे दुसरे नावच होते समाधीवरचा गाव. गावाला ही ओळख काही चांगल्या कारणाने पडली नव्हती. ती ओळख एका भितीदायक प्रवासाने, तिथे घडलेल्या मृत्युच्या भयानक तांडवाने गावाला पडली होती. बाहेर गावातील माणूस सावरगावत यायला घाबरायचा. भीतीने बाहेर गावातील लोक सावरगावत पाऊल ठेवत नसत. कदाचित पुढचा मृत्यू आपला असेल या भीतीने कोणी सावरगावत पाय ठेवण्याचा विचार पण करायचा नाही. याला कारण होते, गावाबाहेर अर्धा मैल असणारी 'एकनाथची समाधी'. आणि याच समाधीच्या नावावरून सावरगावला मिळालेली एक विकृत ओळख म्हणजे 'समाधीवरचा गाव'.जी ओळखच गावाला एक शाप म्हणून लाभली. ज्या ओळखीने गावातील शांतता भंग केली. अशांततेच एक युद्ध इथ निर्माण झाल. ज्या मधे होरपळून गेले सगळे सावरगाववासी.
      
गाव तसा पूर्वी खूप सुखाने, आनंदाने जगत होता. गावात सर्वजण आप-आपल्या कामात व्यस्त असायचे. गावाला आपल्या रोजच्या दिनचर्येततून फुरसत मिळायची नाही. सण-उत्सव आनंदाने साजरा व्हायचा गावात. कुस्तीचे आखाडा रंगायचा, थाटामाटात जत्रा भरायची. पण एकनाथच्या मृत्यूनंतर आणि त्याच्या मृत्युच्या ठिकाणी बांधलेल्या त्याचा समाधीनंतर गावाचे नशीब एका विकृत पाशवी शक्तीच्या हातात गेले. गावात विचित्र घटना घडू लागल्या. अनैसर्गिक घटनांनी गावातील वातावरण काळवंडून गेले. गावात मृत्यूचे थैमान सुरू झाले होते. गावावर एक भयानक पाशवी संकट ओढवले गेले होते. ज्या संकटांची सुरवात झाली होती आणि त्याचा शेवट काय होणार याची कोणालाच माहिती नव्हती. एका संकटाने आपले पुढचे आयुष्य ध्वस्त होणार आहे याची साधी कल्पनाही कोणाला नव्हती. या संकटाला सुरुवात झाली ती, बंडू सुताराच्या मृत्यूने.
      
  बंडू सुतार गावातील एक नावाजलेला सुतार. गावकर्‍यांना  शेतीसाठी लागणारे औजारे तो बनायचा. औजारे बनविण्यासाठी लागणारे लाकडे तोडण्यासाठी तो नेहमी जंगलात जायचा. सकाळी जंगलात जाणे, लाकडे घेऊन येणे हा त्याचा दिनक्रम ठरलेला. त्यामुळे जंगलाचे त्याला भय वाटायचेच नाही. परंतु एकनाथच्या मृत्यूनंतर आणि त्याच्या बांधलेल्या त्या समाधीनंतर त्याला जंगलातील वातावरण बदल्यासारखे जाणवू लागले. एकदा असाच तो जंगलात चांगले लाकडे शोधण्यासाठी गेला. चांगले लाकडे मिळावीत यासाठी तो बराच आत जंगलात चालत गेला. लाकड शोधत शोधत तो कधी एकनाथच्या समाधीजवळ येऊन पोहोचला त्याला कळलेच नाही. त्याला कळाले की, आपण समाधीजवळ आलो आहोत. त्याला आता भीती वाटू लागली. आपण समाधीजवळ कधी आलो? हेच त्याला कळेना. पण आता कळून तरी काय फायदा, हा विचार ही त्याच्या डोक्यात येऊन गेला. इथून लवकर बाहेर पडायला हवे, काही अघटित घडण्या अगोदर येथून पोबारा करायला हवा अस त्याने स्वतःच्या मनाला समजावले आणि हळू हळू तो तेथून काढता पाय घेऊ लागला. पण त्याचे पायातील त्राण कमी झाल्यासारखे त्याला जाणवू लागले. कोणीतरी पाय जख्ख धरुन ठेवल्यासारखे भासत होते. तेवढ्यातच वातावरण हळू हळू अचानक बदलू लागले. वातावरणातील बदल त्याला जाणवू लागला. पाखरांची किलबिलाट थांबली होती,जंगली प्राण्यांचे आवाज, चित्कार शांत झाले होते, झाडांच्या पानांची सळसळ मंद झाली होती तर सरपटणाऱ्या प्राण्यांचे वळवळ करणारे देह कुठेतरी लपून बसल्यासारखे स्थिर झाले होते. हवेचा साधा छोटा झोतही अंगाला लागत नव्हता. सगळी सृष्टी अचेतन झाल्यासारखी त्याला भासत होती. कोणीतरी पृथ्वीला घट्ट धरून ठेवल्यासारखी सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. एवढी अशांतता कधी त्याला जाणवली नव्हती. ही शांतता नैसर्गिक नाही याची जाणीव त्याचा अंतरमनाला राहून राहून होऊ लागली.
       
त्याच्या श्वासांची आत-बाहेर होणारी घरघर तेवढी सुरू होती. तेवढीच काय वातावरनात हालचाल होत होती. श्वासांच्या हालचाली वरुणच तो जिवंत आहे, याची त्याला स्वतःलाच खात्री पटत होती. बंडू सुताराला काहीच कळेना. तो स्तब्ध झाला होता. अचानक वातावरनात हा बदल कसा झाला? याचे कोडे काही केल्या त्याला सुटेना. त्याला आता भीतीने ग्रासले होते. हात पायाला कंप सुटू लागला. काहीतरी अनैसर्गिक आपल्या आसपास फिरत आहे याची त्याला राहून राहून जाणीव होऊ लागली. तो मनात देवाचा धावा करू लागला. त्याचा मनातील आत्मविश्वास कमी होऊ लागला. भीतीने त्याला घेरून टाकले.  स्वतःच्या चेतना हरवल्याचा भास त्याला झाला.
       
अचानक त्याला पाठीमागे काहीतरी खुसपुस जाणवली. काहीतरी सरपटत होते. वाळवलेल्या पानावर पाऊल पडल्यासारखा आवाज येऊ लागला. दातांचा खटखट आवाज येत होता. कोणीतरी धीम्या गतीने त्याच्याकडे येत होते. सुताराचे त्राण गळू लागले, पाठीमागे बघण्याची त्याची हिम्मत होईना. पुढे काय वाढून ठेवलय त्याला काहीच कळेना. पण काहीतरी हालचाल करावी लागेल नाहीतर भीतीनेच हृदय बंद पडून कपाळमोक्ष व्हायचा. तो हळू हळू पाठीमागे वळू लागला. भीतभीतच त्याने पाठीमागे वळून बघितले. आणि त्याचे राहिले-साहिले त्राण गळून गेले. भीतीने त्याचे हात, पाय, ओठ थरथर कापू लागले. समोरचे दृश्य त्याच्या मनाला भीतीचे धक्के देऊ लागले. हे कसे शक्य आहे? हा प्रश्न मनात घुमू लागला. समोर साक्षात एकनाथ उभा होता. हो हो ज्याच्या समाधी जवळ तो उभा होता, तो एकनाथ त्याच्या समोर यम बनून उभा होता. ज्याचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता, मृत्यू नव्हे खून झाला होता. हो खूनच झाला होता. आणि त्या खुनाला खुनाला जबाबदार असणार्‍यापैकी तो एक होता. हा विचार मनात येताच बंडू सुताराचि बोबडीच वळाली. आपला मृत्यू निश्चित आहे. ही जाणीव त्याला राहून राहून होऊ लागली. एकनाथ  जिवंत होऊन त्याच्या समोर उभा होता. पण एकनाथ खूप भयानक दिसत होता. केस वाढलेले, नख धारधार वाढलेले होते,डोळे शेंदूरासारखे लालभडक होते. दात अणकुचीदार होते, तोंडातून लाळ गळत होती, नजरेत विखारी आणि अनैसर्गिक अस काहीतरी होत. जिवंत माणसाच एकही लक्षण त्यात दिसत नव्हत. तो जमिनीपासून दोन फुट हवेत तरंगत होता. शरीरावर जागोजागी जखमा दिसत होत्या. त्या जखमा मध्ये आळ्या वळवळत होत्या. काही त्याच्या तोंडात जात होत्या. अचानक त्याने एका जखमे वरच्या अळ्या उचलल्या आणि तोंडात टाकल्या आणि सुताराकडे तीक्ष्ण नजरेने बघू लागला. त्याच्या नजरेत खुनशी भाव दिसू लागले. एखादा हिंस्र प्राणी गरीब भक्षाकडे लालची नजरेने आणि अधाशी नजरेने पाहतो तसे भाव सुताराला त्याच्या नजरेत दिसू लागले. त्याचे ते ओंगळवाणे आणि भीतिदायक रूप पाहून सुतार थरथर कापू लागला.  पळून जाण्यासाठी तो पाय उचलू लागला पण पाय कोणीतरी जमिनीत गाडून ठेवले आहेत असे त्याला जाणवू लागले. त्याची हालचाल बंद झाल्यासारखी झाली. शरीर अचेतन झाले. त्याला साक्षात त्याचा मृत्यू समोर दिसत होता. आणि मृत्यू पण असा अनैसर्गिक होता की ज्याची कोणी कल्पना पण करणार नाही. एकनाथचा असा भयानक अवतार बघून त्याचा अर्धा जीव तर कधीच गेला होता. जगण्याची उमेद कधीच लोप पावली होती.

अचानक हवेत उडत एकनाथ बंडू सुताराच्या जवळ आला. अचानक असा त्याला जवळ आलेल पाहून सुतार थरथर कापू लागला. भीतीने त्याच्या तोंडातून चित्कार निघाला. पण तो मनातच ओरडत होता. भीतीने आवाज बाहेर येत नव्हता. एखादे हिंस्र श्वापद जवळ आल्यावर जी तरफड होते, ती तडफड त्याची होऊ लागली. माणसाला विरोध करता येतो, पण इथे यम बनवून साक्षात एकनाथचा हिडीस रूप असलेला आत्मा होता. तो सुताराच्या एवढा जवळ आला, की त्याच्या हिडीस श्वासाची घरघर त्याला मोठ्याने ऐकू येऊ लागली. त्याच्या अंगावर वळवळ करणार्‍या आळ्या त्याला स्पष्ट दिसू लागल्या. त्याच्या जखमेतून गळणारे घाणेरडे रक्त, पु पाहून त्याला भीती सोबतच मोठी शिसारी आली. एवढा भयानक आणि किळसवाणा अंत आपला होणार याची कल्पना त्याला प्रचंड दुःख देऊन गेली.

अचानक एकनाथने एका हाताने सुताराचे मुंडके पकडून त्याला हवेत तोलून धरले, त्याने सुताराचा गळा आवळला गेला. त्याचे पाय तडफडू लागले. श्वास घुसमटू लागला. तोंडातून लाळ गळू लागली. एकनाथने अचानक आपले मोठाले दात बाहेर काढून सुताराच्या नरडीला लावले. तहानलेला माणूस जसा गटागटा पाणी पितो तसे सुताराचे रक्त तो पिऊ लागला. रक्ताची धार सुताराच्या गळ्यातून खाली जमिनीवर आली होती. सुताराची हळूहळू शुद्ध हरवत चालली होती. शेवटी त्याला तो एकनाथ चा हिडीस चेहरा तेवढा दिसला आणि त्याचा तो घाणेरडा वास त्याच्या नाकात शिरला, आणि त्याच वेळी सुताराचा देह निपचिप होऊन खाली पडला. आंब्यातुन सगळा रस पिऊन घेतल्यावर जसा आंबा उरतो तसा सुताराचा देह चिपाटासारखा निष्प्राण होऊन पडला होता. त्याच्या देहात फक्त हाडे उरली होती. एक सापळा वाटावा असा त्याचा देह पडला होता. त्याचा तो अचेतन देह पाहून जंगलाचा पण प्राण सुन्न झाला. ऐंशी-नव्वद किलोचा तो देह वीस-तीस किलोचा झाला होता. रक्त, मांस नसलेला आणि केवळ अस्थी उरलेला तो एक निष्प्राण देह, जंगलात निपचिप पडला होता. आता कधीच कोणाला कळणार नव्हते की, सुताराचा मृत्यू कसा झाला? त्याचा असा चिपाटासारखा देह कसा झाला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहणार होते.

एकनाथ अचानक समाधी मध्ये गायब झाला. हवेत कापूर जसा विरून जातो तसा एकनाथ अदृश्य झाला. त्याची रक्ताची तहान, भूक भागली होती. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्‍या सुताराचा सूड घेऊन त्याने त्याची पहिली भूक भागवली. आता ही भूक वाढतच जाणार. ती कधीही न शमणारी भूक बनली होती. जी फक्त मानवी रक्ताने भागवली जाणार. त्यासाठी आता अनेक बळी जाणार होते. बंडू सुताराच्या बळीने एका भयानक खेळाला सुरुवात झाली होती. ज्यात एका बाजूला हिडीस, भयानक, रक्ताला सोकावलेला एकनाथचा आत्मा होता आणि दुसर्‍या बाजूला कशाचीही खबर नसलेले, निष्पाप सावरगावातील गावकरी होते. ज्या गावकर्‍यांनी आतापर्यंत पाहिलेले सुखी दिवस संपणार होते. आनंदाची जागा पाशवी दुःख घेणार होते. नकळत त्यांच्या हातून घडलेल्या पापाची फळे त्यांना अशा अघोरी पद्धतीने फेडावि लागणार होती. प्रत्येक जण मृत्युच्या पडछायेत आला होता. आणि ज्याची जाणीव लवकरच त्यांना होणार होती.

       एकनाथ साधारण पंचवीस-सव्वीस वर्षाचा तरुण. जन्मतःच मंद, भोळा म्हणून जन्माला होता. त्यानंतर त्याचा मंद पणा वाढत गेला होता. तरुण वयात येईपर्यंत तो वेडा झाला. राहून राहून फिटीचे झटके त्याला येत होते. वेड्यासारखे हसणे, बोलणे, हावभाव करणे ही लक्षणे त्याच्यात दिसू लागली. एक हात लुळा पडलेला, तोंडातून सतत गळणारी लाळ, पायावर, हातावर, चेहर्‍यावर उगवलेले केस, बोबडे बोलणे आणि अंगाचा येणारा घाण, कुबट वास त्याच्या ओंगळवाण्या अवतारात अजूनच किळस उत्पन्न करत होता. त्याच्या  या अवताराकडे बघुन कोणीच त्याच्या आसपास फिरकत नसे. तरुण मुल, माणसे त्याला जवळ उभा करत नसत. तो जवळ आला की त्याला हाकलून लावत. त्याची चेष्टा करत. काहीजण महाभाग तर त्याला दगड फेकून मारत. त्यामुळे एकनाथ एकटाच रहात असे. स्वताच मनाशी बोलायचा. वेड्यासारखे हावभाव करायचा. उगाच जागोजागी थुंकायचा. यामुळे त्याच्या वेडेपणात भर पडत गेली आणि त्याचे वेडेपण वाढत जाऊ लागले.
    एकनाथ तसा स्वभावाने प्रेमळ होता. कधी कोणाला वाईट बोलणे नाही, शिवी देणे नाही, भांडण नाही असे कधी त्याने केले नाही. तरुण मूल, माणसे त्याच्या आसपास जात नसत पण लहान मुले मात्र त्याच्या सोबत खेळत. तोही लहान मुलात चांगला रमायचा. स्वतःचे वेडेपण विसरून तो खेळात रमायचा. कधी त्याने लहान मुलाबरोबर भांडण, मारामारी केली नाही. की कधी त्यांची खोडी काढली नाही. प्रेमळपणे तो त्यांच्यात रममाण होयचा. लहान मुलांचा त्याला लळा होता. पण कधी कधी मुलांचे आईबाप एकनाथ बरोबर खेळताना त्यांना पाहिले की, मुलांना मारहाण करायचे. त्या वेड्या बरोबर खेळत जाऊ नका अशे सांगायचे. अस पाहून एकनाथ रडायचा. रडत घरी जाऊन आईला हे सगळ सांगायचा. ती माऊली त्याला कुशीत घेऊन त्याची समजूत काढायची. आणि आतल्या आत कुढत बसायची.
   

   एकनाथचे आई-वडील दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. घरात सतत देव देव चाले. त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती. दहा-बारा एकर जमीन होती. पीकपाणी चांगले पिकत असत. थोडक्यात घरी सुबत्ता होती. पण एकुलता एक असणारा एकनाथ वेडा निघाल्यामुळे त्यांचा जीव सतत चिंताग्रस्त असायचा. देवाला नेहमी प्रार्थना करायचे, 'देवा एकनाथाला बर कर'. त्याच्या इलाजासाठी त्यांनी अनेक औषधोपचार केले. आयुर्वेदिक दवाखाने दाखविले पण त्याच्या वेडेपणात काही फरक पडला नाही. देवाचे नवस, बुवा-महाराजांचा आशीर्वादही याकामी आला नाही. शेवटी सगळे करूनही त्याच्या वेडेपणात फरक न पडल्याने त्यांनी त्याला आहे तसेच ठेवले. जे होईल ते होईल. ईश्वराच्या मनात असेल तेच होईल. या आशेवर ते दिवस काढू लागले.
     

एकनाथच्या आई वडीलांना वाटायचे एकनाथचे लग्न व्हावे. त्याचा संसार थाटावा. वंशाला एक वारस मिळावा. घरात लहान मुलांचे हसणे खिदळणे व्हावे, रडण्याचा, हसण्याचा आवाज गुंजारावा अस राहून राहून त्यांच्या मनाला वाटायच.
पण आई वडील कितीही चांगले असले, धार्मिक वृत्तीचे असले आणि घरी कितीही सुबत्ता असली तरी एकनाथच्या वेडेपणाकडे पाहून कोणी त्याला मुलगी देत नसे. परिसरात सगळ्यांना त्याचा वेडेपणा माहीत होता. कुठे मुलगी पहायला गेल की मुलीचा बाप म्हणायचा, ' या वेड्याला मुलगी द्यायला आम्हाला वेड लागले नाही. आमची मुलगी आम्हाला जड नाही झाली. पोरगी विहिरीत ढकलून देऊ, पण त्या खुळ्याला पोरगी देणार नाही. समाजातील लोक आमच्या तोंडात शेण घालतील. या वेड्याला पोरगी देण म्हणजे पोरीला नरकात ढकलल्यासारख आहे. कोण देणार याला आपली पोरगी'. लोकांच अस बोलण ऐकून, एकनाथच्या आई वडीलांचा जीव तिळ तिळ तुटू लागला. जीवनात काही राम उरला नव्हता त्यांच्या.
    

   पण एकनाथच्या आई वडीलांची भक्ती फळाला आली. एक चांगले स्थळ त्याच्यासाठी चालून आल. मुलगी दिसायला चांगली होती. काही व्यंग नव्ह. तिला सात बहिणी होत्या. घरची परिस्थिती गरीब होती. त्यामुळे पोरीचा बाप हुंडा देऊ शकत नव्हता. त्यामुळे पोरीचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे मग एकनाथच्या आई वडिलांकडे आणि त्यांच्या आर्थिक सुबत्तेकडे बघुन तो एकनाथाला पोरगी द्यायला तयार झाला होता. एकनाथ आणि त्याच्या आई-वडीलांना खूप आनंद झाला. मनोमन त्यांनी देवाचे आभार मानले.
   

  एक चांगला मुहूर्त बघून. एकनाथ आणि आशा च लग्न झाल. त्याच्या बायकोच नाव आशा होत. लग्न चांगल झाल. काही लोकांनी दोघांना शुभाशीर्वाद दिले. नावे ठेवणारी पण अनेक जण होती. ह्या वेड्याला काय संसार करता येईल याचाच विचार ते करत होते. पण लग्नात एकनाथ चांगल्या समजूतदार मुलासारखं वागला. शांत ऊभा राहून सगळे विधी पार पाडले त्याने. अनेक लोक म्हणू लागले. लग्नानंतर एकनाथ बरा होईल. पोरगी चांगला पायगुण घेऊन घरात येत आहे. अस ऐकून एकनाथ च्या आईवडिलांचे आनंदाने डोळे भरून आले.
  

लग्न झाल्यानंतर एकनाथ आणि आशा चा संसार सुरू झाला. लग्न झाल्यावर पाहिल्या रात्री एकनाथ खूप आनंदी होता. कितीही वेडा असला तरी, त्यालाही काही भावना कळत होत्या. वयात आल्यानंतर जे बदल शरीरात घडून येतात ते बदल त्याच्या मध्ये ही घडून आले होते. ज्या वयात जे लागते ते मिळायलाच हवे नाहीतर मनाची बैचेनी वाढून माणूस वाईट कृत्याच्या पाठिमागे लागतो. एकनाथ पाहिल्या रात्री प्रथमच त्याच्या बायकोचा चेहरा जवळून बघत होता. दोघेही पलंगावर बसले होते. आशाला त्याच्या वेडेपणाची कल्पना होती. त्यामुळे तीच बोलू लागली. तोही तिला उत्तर देऊ लागला. वेडा असला तरी त्याला जाणवले की, आपली बायको प्रेमळ आहे,तिचे आपल्यावर प्रेम आहे. दोघांची चांगली गट्टी जमली. आणि त्या रात्री दोघही एकमेकांच्या बाहूपाशात स्थिरावली.

लग्नाच्या चार महिन्यानंतरच एकनाथच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकनाथचा एक मोठा आधार गळून पडला. पतीच्या निधनानंतर एकनाथच्या आईला मोठा धक्का बसला. त्या नंतर सतत आजारी राहू लागल्या. पतीच्या मरणाचे दुःख आणि मुला - सूनाची चिंता यांनी त्यांना ग्रासून टाकले. आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला. एकनाथ एकाकी पोरका झाला. मायेचे दोन्ही छत्र क्षणात पोरके झाले. त्याला असणारा आधार गळून पडला. वेडा असला तरी त्याला मायेची पाखर हवी होती. बायको सोडली तर आता मायेच अस कोणी उरल नव्हत या जगात. आणि याच क्षणापासून एकनाथच दुर्दैव सुरू होणार होत. त्याच्या आयुष्यात एक मोठ संकट ओढणार होत. ज्या संकटाला तोंड देताना होणार होता त्याचा करून अंत आणि त्यातून घडणार होते एक रक्तरंजित पाशवी महाभारत.

दत्ताराम' एकनाथचा मोठा चुलता. नावात दत्ताचे नाव असले तरी, प्रवृत्तीने, स्वभावाने राक्षसासारखा होता. एकनाथ चे वडील आणि दत्ताराम सख्खे भाऊ भाऊ. परंतु एकनाथचे वडील धार्मिक, आध्यात्मिक स्वभावाचे होते आणि अगदी त्याच्या उलट दत्ताराम होता. दारू, जुगार, गांजा याचे व्यसन असलेला, गावातील एक बिघडलेला व्यसनी माणूस म्हणून तो कुविख्यात होता. दारूच्या, जुगाराच्या व्यसनात जमीन, दागिने विकून मोकळा झाला होता तो. गावातील काही माणसे सोबतीला घेऊन, मारामारी, भांडण करणे हे त्याचे रोजचे काम असे. कोणाला शिव्या दे, कोणाची खोड काढ तर कोणाच्या आई - बहिणीकडे वाईट नजरेने पाहणे या कामा शिवाय दुसरा काही उद्योग नव्हता त्याला. त्याच्या बरोबर असणारी काही टोळकीही त्याच्या बरोबर राहून बिघडली होती. बंडू सुतार (ज्याचा पाहिल्या भागात एकनाथने जीव घेतला तो), महादू गुराखी, गावातील प्रीतम पुजारी, आप्पा वाणी ही दत्तारामची दोस्त मंडळी. जी गावात बिघडलेली मंडळी म्हणून कुप्रसिद्ध होती. गावात कोणी त्यांच्या नादाला लागत नसे. हात दाखवून कोण अवलक्षण करेल? बंडू सुतार नावाजलेला सुतार होता पण तोही दत्तारामच्या नादाला लागून वाम मार्गाला लागला होता. गावातील बायाकडे वाईट नजरेने बघणे, टिंगल टवाळी करणे, मारामारी करणे ही कामे त्यांच्या माथी नेहमी लिहिलेली असायची. गावाला लागलेले ग्रहण होते ही मंडळी.

   आई वडीलांच्या मृत्युनंतर एकनाथ एकाकी पडला होता. त्याला बायकोशिवाय कोणाचा आधार उरला नव्हता. आणि नेमकी हीच संधी दत्तारामला आयती चालून आली. स्वतःची शेतजमीन विकून तो मोकळा झाला होता. त्याच्या हातात काहीच शिल्लक उरल नव्हत. आणि आता त्याची नजर एकनाथच्या जमिनीवर पडली होती. त्याची पाहिल्या पासूनच एकनाथच्या जमिनीवर नजर होती. पण एकनाथचे आई वडील जिवंत असताना त्याला काही करता आले नाही. गावात एकनाथ च्या आई वडीलांना मान सन्मान होता त्यामुळे त्याला तेव्हा काहीच हालचाल करता आली नव्हती. पण एकनाथ च्या आई वडीलांच्या मृत्यू नंतर त्याला सगळे रान मोकळे झाले होते. त्याला आता एकनाथ च्या जमिनीचा लोभ सुटला होता. काहीही करून ती जमीन मिळवायची ही अघोरी इच्छा त्याच्या मनात घोळत होती. आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जाणार होता.
     
आई वडीलांच्या मृत्यू नंतर एकनाथ जरी एकटा पडला होता तरी त्याच्या बायको ची त्याला सोबत होती. एकनाथ ची बायको आशा हुशार, समजूतदार निघाली होती. तिने एकनाथ ला कधी आई वडिलांची कमी भासू दिली नाही एकनाथ ला ती आई वडीलां सारखे सांभाळत असत. एकनाथ पण आता समजदार माणसा सारख वागू लागला. स्वतःचे वेडेपण समजून तो चांगला वागत होता. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. गावातील लोक त्यांना चांगले वागवु लागले. पण एकनाथ च्या बायकोला दत्ताराम चा स्वभाव माहीत होता. त्याचा वाईट इरादा तिला कळाला होता. त्याची नजर त्यांच्या जमिनीवर आहे हे तिने ओळखले होते. त्याची तिच्यावर असलेली वाईट नजरही तिने ओळखली होती. ती दत्ताराम पासून सावध होती. ती त्याला आसपास फिरकू देत नसत. त्याच्या पासून ती दोन हात दूर राहत असे. एकनाथ चा चुलता असला तरी त्याला बोलणे ती टाळत असे. एकनाथ लाही ती त्याच्यापासून दूर राहण्याचे तिने सांगितले होते.

पावसाळ्या चे दिवस होते. बाहेर पाऊस पडत होता. एकनाथ रेडिओ ला काहीतरी खटपट करत बसला होता. त्याची बायको स्वयंपाक करत होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. कोणीतरी दाराची कडी जोर जोरात वाजवत होत. एकनाथ ची बायको एकनाथ ला कडी उघडा म्हणून सांगू लागली. पण एकनाथ काही ऐकेना.
"अहो ती दाराची कडी उघडा, कोणीतरी आलय बाहेर." ती पुन्हा जोरात ओरडली.
एकनाथ गप गुमाने उठला आणि कडी उघडायला गेला. त्याने कडी उघडली आणि बघतो तर, दारात दत्ताराम होता.
"काय रे खुळ्या तुझी बायको कुठे आहे? दिसत नाही कुठे."
बाहेर पुरुषाचा आवाज ऐकून, आशा बाहेर आली. समोर दत्ताराम ला पाहून ती घाबरलीच. काय बोलाव तिला कळेनाच.
दत्ताराम तिला न्याहाळत बोलला, "काय सूनबाई घरात नाही का बोलवणार, इथेच दारात भिजत ठेवणार आहात."
"या आत बसा मी चहा करते."
अस बोलून ती स्वयंपाक घरात निघून गेली. तिला अस दत्ताराम ला घरी आलेल बघून खूप भीती वाटू लागली. ती मनातून घाबरून गेली. दत्तारामची ती वाईट नजर तिला असह्य झाली होती.
ती असा विचार करत होती तेवढ्यात तिला मागे कोणीतरी आले आहे असे जाणवले. तिने मागे वळून पाहिले, तर तो दत्ताराम होता. ती अजूनच हादरली.
"तुम्ही तिकडे घरात बसा मी चहा आणते." ती घाबरून म्हणाली.
"मी काय चहा प्यायला आलो नाही इथ, म्हणल तुझ्यासोबत चार गप्पा माराव्यात, त्या खुळ्या संग राहून वैतागून गेली असशील म्हणून तुझ मन थोड हलक कराव, त्यासाठी एवढ्या लांबून भर पावसात आलो मी."
अस बोलून तो तिच्या जवळ जाऊ लागला.
" हे बगा तुम्ही अस काही बोलू नका आणि लांब राहून बोला, जवळ यायच काम नाही. घरात एकटी बाई बघून अस येत जाऊ नका. मुकाट्याने इथून चालते व्हा. तुमचे सगळे नखरे कळत आहेत मला. पुन्हा जर आम्हाला त्रास द्यायला आलात तर, ओरडून सगळा गाव गोळा करेल." आशा आता संतापून बोलत होती.

दत्ताराम खुनशीपणे हसला आणि अचानक पुढे जाऊन त्याने तिचा हात धरला. त्याने अचानक असा हात धरल्याने ती घाबरली. तिला काय कराव काहीच कळेना. तिने एक हिसडा देऊन हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याची पकड मजबूत होती. त्याने अजून जोर लाऊन तिचा हात पकडला. ती जोरात ओरडली "एकनाथsss एकनाथ ss"
बायकोचा आवाज एकूण रेडिओ सोबत खेळणारा एकनाथ स्वयंपाक घरात आला. दत्ताराम ने बायकोचा हात धरलेला पाहून त्याला राग आला. वेडा असला तरी चांगले वाईट कळत होते त्याला. तो दत्ताराम ला बुक्कीने मारत, "सोड तिला, सोड तिला" म्हणू लागला. दत्ताराम ने त्याला पायाने झटका दिला. त्या झटक्याने तो कोलमडून खाली पडला. त्याच्या डोक्याला लागले. त्याला खूप राग आला. त्याने सरपणातील एक काठी उचलली आणि तिने दत्ताराम ला जोरात मारू लागला. अचानक अंगावर काठी पडल्याने, दत्ताराम ने आशा चा हात सोडून दिला. काठीचा चांगलाच मार त्याला बसू लागला. तेवढ्या त्याला आशा ने खाली ढकलून दिले. अचानक झालेल्या या माराने दत्ताराम गोंधळून गेला. वरुन एकनाथ सारख्या काठ्या त्याला मारत होता. दत्ताराम ला कळाले आता इथे थांबलो तर हा वेडा आणि त्याची बायको जीव घेतील आपला. तो गडबडीत उठला आणि दाराबाहेर पळू लागला.

जाताना तो म्हणाला "बघुन घेईल तुम्हाला, तुमच्या दोघांचे मुडदे पाडल्याशिवाय मी थांबणार नाही. तुम्हाला चांगलाच हिसका दाखवतो. एकटा होतो म्हणून वाचला तुम्ही, पण पुढल्या वेळेला नाही वाचणार. याची चांगलीच फळे मिळणार तुम्हाला, लक्षात ठेवा." आणि तो दाराबाहेर पळून गेला.

या प्रकारानंतर आशा खूप घाबरून गेली. तिला दत्ताराम ची भीती वाटू लागली. तो धमकी देऊन गेला होता. उद्या काही बरे वाईट केले तर कोणाकडे बघायचे? हा प्रश्न राहून राहून तिला पडू लागला.

दत्ताराम या अपमानाने तडफडत होता. रागाने तो बेफाम झाला होता. त्याला आता बदला हवा होता. इरेला पेटला होता तो. एकनाथच्या घरून निघून गेल्यानंतर तो तडक बंडू सुताराकडे गेला. दोघ मिळून दारूच्या ठेक्यावर गेले. दारू पीत पीत, दत्ताराम रागाने बोलू लागला. बंडू सुताराला त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला.
"बंड्या आपल्याला एकनाथ ला धडा शिकवायचा आहे. त्याची जमीन काहीही करून मिळवायची आहे. त्याला आणि त्याच्या बायकोला आपल्याला संपवायच आहे".
त्याच्या बोलण्याने बंडू सुतार हादरलाच. मारहाण ठीक आहे पण एकदम जीव मारायचा म्हणजे जरा अवघडच आहे. दत्ताराम ने बंडू सुताराला आपली सगळी योजना समजून सांगितली. सोबतील महादू गुराखी, प्रीतम पुजारी आणि आप्पा वाण्याला घेऊन ही योजना पुरी करायची.    तो बंड्याला सांगू लागला,
"तुम्ही मला या योजनेत साथ दिली तर, भेटणाऱ्या जमिनीतील अर्धी जमीन तुम्हाला देईल. तुमच्या दारु, गांजाचा सगळा खर्च मी करील. फक्त तुम्ही मला साथ द्या."
एका दिवशी ही सगळी टवाळ मंडळी एकत्र बसली. एकनाथ आणि त्याच्या बायकोला कस संपवायच याची योजना ते आखू लागले.

श्रावण महिना उजाडला. गावात जत्रा भरली होती. सगळीकडे जत्रेचा माहोल होता. वर्षातून एकदा येणार्‍या जत्रेचा सावरगाववाशी चांगलाच आनंद लुटत होते. जत्रेत तमाशा आला होता. रात्री तमाशा होणार होता. सगळा गाव तमाशा बघायला गेला. एकनाथ आणि त्याची बायको घरीच होते. दिवसभर एकनाथ आणि ती जत्रेत फिरल्यामुळे लवकर झोपेच्या आधीन झाले. रात्रीच्या 11 च्या सुमारास अचानक दाराच्या कडीच्या आवाजाने आशा ला जाग आली. एवढ्या रात्री कोण आल असेल? सगळा गाव तर तमाशाला गेला आहे? अचानक तिच्या मनात तो विचार डोकावून गेला. दत्ताराम तर नसेल? ती आतून घाबरून गेली. तिने आतून विचारल कोण आहे? काहीच आवाज आला नाही. तिने पुन्हा जोरात विचारल कोण आहे?
"मी प्रीतम पुजारी आहे देवळातला. देवळातल तेल संपल आहे. दिवा लावायला तेल हव होत. गावात कोणीच घरी नाही. म्हणून इकडे आलोय. जरा तेवढ तेल द्या."
प्रीतम पुजार्‍या चा आवाज ऐकून तिला हायस वाटल. संकट गेल्यासारख वाटल. पण तीला काय माहीत संकट पुजार्‍याच्या रूपानं आल होत.
   
तीने दरवाजा उघडला. आणि समोर पाहील. तिचे भीतीने पाणी पाणी झाले. समोर खदाखदा हासत प्रीतम पुजारी उभा होता. त्याच्या बरोबर खुनशी पनाने तिच्याकडे बघत दत्ताराम उभा होता. महादू गुराखी, आप्पा वाणी, बंडू सुतार दरवाज्याच्या एका बाजूला उभे होते. अचानक समोर येऊन दत्ताराम ने तिला घरात ढकलले. ते पाचही जण घरात शिरले. बंड्या सुताराणे दाराला आतून कडी लाऊन घेतली.

ते पाचही जण नशेत धून होते. दत्ताराम पुढे झाला. त्याने आशा चे दोन्ही हात धरले. तिला जवळ ओढू लागला. बाकीचे चौघे जण खुनशीपने हसु लागले. त्यांच्या सगळ्यांच्या मनात वासना खदखदत होती. वासनेची भूक वाढत होती. दत्ताराम च्या अचानक झालेल्या हल्ल्याने आशा भयभीत झाली. ती त्यांना गयावया करू लागली. "तुमच्या पाया पडते सोडा, मी तुमची सून आहे. तुमच्या मुली सारखी आहे. सोडा मला सोडा. तुमच्या पाया पडते."
पण वासनेने पेटलेल्या त्या पाच ही जणांवर तिच्या बोलण्याचा काही एक परिणाम झाला नाही. दत्ताराम ने तिच्या कमरेला दोन्ही हातानी घट्ट मिठी मारली. आशा चा जीव गुदमरून लागला. तिच्या डोळ्यातून अश्रूची धार वाहू लागली. त्या धडधाकट हैवाना पुढे ती हतबल ठरू लागली. त्याने तिच्या पदराला हात घातला. ती ओरडू लागली. दयेची भीक मागू लागली. पण तिचा आवाज कोणापर्यन्त पोहचत नव्हता. एकनाथ गाढ झोपेच्या आधीन होता. दत्ताराम ने तिची साडी फेडली. ती आता असह्य होत गेली. त्याने तिला खाली पाडले. एक श्वापद जसा शिकारीवर तुटून पडतो तसा तो तिच्यावर तुटून पडला. ती विव्हळत होती त्या विव्हळन्यायाने तो आणखीन पेटून उठत होता.
 
  ते पाचही जण अघोरीपणे तिच्यावर तुटून पडले. तिच्या देहाचा कोणीच विचार करत नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या देहाची आग भागवायची होती. थोड्यावेळाने सगळ शांत झाल. आशा बेशुद्ध पडली होती. तिची जगण्याची आशा तेव्हाच मावळली होती, जेव्हा तिच्या पदरावर दत्ताराम ने हात घातला.

दत्ताराम ने पाहिले तिचा श्वास सुरू होता. तिला जिवंत ठेवले तर ही आपला बोभाटा सगळ्या गावात करेल. त्याने महादू गुराख्याला खूण केली. महादू पुढे झाला. तो आशाचा गळा आवळू लागला. आशा तडफडू लागली. पाय झाडू लागली. त्या नराधमांना तिची थोडीसुद्धा दया आली नाही. महादू अजून जोराने तीचा गळा आवळू लागला. आशा ची तडफड शांत झाली. तिचा देह निपचिप पडला. तिचा अंत झाला होता.

  अचानक एकनाथला जाग आली. तो बाहेरच्या खोलीत आला. त्याला समोरचे दृश्य दिसले. तो घाबरला. हे पाचही जण त्याला पाहून गोंधळले. एकनाथ पळून जाऊ लागला. पण बंडू सुताराने त्याला धरले.
"दत्ताराम या खुळ्याचे काय करायचे" बंड्या म्हणाला.
एक काम करा त्याला ती दारू पाजा. पुढे होऊन महादू त्याच्या तोंडात दारू ओतू लागला. एकनाथ झटापट करू लागला. तोंडात जाणारी दारू त्याला असह्य होऊ लागली. पण बंडू सुताराणे त्याला घट्ट धरून ठेवले होते.

दारूच्या नशेमुळे एकनाथ गुंग झाला. अंगात जोश आल्यासारखा झाला. त्याने अचानक बंडू सुताराला झटका दिला. बंडू सुतार कोलमडून मागे उताणा पडला. एकनाथ एकदम उघड्या दारातून बाहेर पळून गेला. दत्ताराम ने बंडू सुताराला शिवी हासडली आणि ते सगळे एकनाथ च्या मागे पळू लागले. पण अचानक समोर तमाशावरून येणारे लोक त्यांना दिसू लागले. लोक पाहताच बंड्या म्हणाला, "दत्ताराम आता काय करायच, लोक समोरून येत आहेत."
दत्ताराम ने थोडा विचार केला आणि प्रीतम पुजार्‍याला मारू लागला, त्याचे कपडे त्याने फाडले आणि जवळ असलेला दगड हलकेच त्याच्या डोक्यात मारला. दगड मारल्यामुळे पुजार्‍याचे डोके फुटले, रक्ताची धार वाहू लागली. पुजारी दत्ताराम वर ओरडला," अरे दत्तारामा हे काय केलस माझ डोक का फोडल?"
दत्ताराम लगेच म्हणाला, "हे बघ मी हे मुद्दाम नाही केल. तुझ डोक एकनाथ न फोडल आहे. अस गावकर्‍यांना सांगायच. ही आपली पुढची योजना आहे. आपल्याला या खुनातून वाचायच असेल तर मी सांगतो तसच कराव लागेल."
त्यांची योजना त्यांनी ठरवली. एकनाथच्या मागे ते पाचही जण पळू लागले. पुजारी रक्तबंबाळ डोक घेऊन पळू लागला.  जसे गावकरी त्यांना जवळ आलेले दिसले, तसे ते ओरडू लागले,
   "अरे त्या येड्या एकनाथ ला पकडा. त्याच्या अंगात भूत शिरल आहे. त्याने त्याच्या बायकोचा गळा दाबून खून केलाय. पुजाऱ्याच डोक फोडलय. पुजाऱ्याचा जीव घेत होता तो पण आम्ही सोडवल त्याला. तो दिसेल त्याला जीव मारत आहे. बाजूला सरका. त्याच्या जवळ नका जाऊ." आप्पा वाण्याचे हे बोलणे ऐकून सगळे गावकरी एकनाथ पासून लांब पळू लागले.

दारू पाजल्यामुळे आणि धावल्यामुळे एकनाथचा अवतार भुतासारखाच दिसत होता. त्यामूळे गावकर्‍यांना खरच वाटायला लागले की एकनाथच्या अंगात भूत शिरल आहे. केस विस्कळीत झालेले, तोंडातून लाळ गळत होती, कपडे जागोजागी फाटले होते आणि त्यातल्यात्यात त्याला पाजलेल्या दारूमुळे तो विचित्र हावभाव करू लागला, तोंडातून विचित्र आवाज काढू लागला.
तेवढ्यात अचानक एक छोटा पोरगा धावणार्‍या एकनाथच्या समोर आडवा आला. एकनाथ बेधुंद होऊन धावत असल्यामुळे त्याला एकनाथचा जोरात धक्का लागला. ते पोरग लांब उडून एका दगडावर पडल आणि जागीच मेल.
"अरे त्या पोराला पण मारल त्या येड्या ने"
कोणीतरी गर्दीतून ओरडल. त्याचा फायदा घेऊन दत्ताराम ओरडला, "अरे त्याला आता सोडू नका. नायतर सगळ्या गावाला एक एक करून मारीन तो. त्याला आता जिवंत ठेवणे धोकादायक आहे. चला सगळे मिळून त्याला मारु."
गावकर्‍यांना दत्ताराम चे म्हणणे पटले. एकनाथ खरच भूत झाला आहे असे त्यांना पटले. त्याने बायकोला मारले, पुजार्‍याला जखमी केले आणि आता एका लहान पोराला त्याने एका झटक्यात मारले म्हणजे त्यात नक्कीच भूत शिरले आहे.
   
हे पाच जण आणि सगळा गाव एकनाथ च्या मागे पळू लागला. काठ्या, दगड हातात घेऊन जो तो "त्याला मारा, त्याला मारा" अस म्हणु लागला. एकनाथ जंगलाच्या दिशेने पळू लागला पण पळून पळून तो दमून एका ठिकाणी खाली पडला. ती तीच जागा होती, जिथे त्याची समाधी होती.

गावकरी त्याच्या मागावरच होते. त्याला एका ठिकाणी पडलेले पाहून. लोक धावत त्याच्या दिशेने जाऊ लागले. लांबून त्याला दगडे फेकून मारू लागले, शिव्या देऊ लागले.  भिरभिरत एक दगड जोरात येऊन एकनाथ च्या डोक्यात लागला. एक मोठी सणक त्याच्या मेंदूपर्यंत गेली. भळभळत रक्त डोक्यातून वाहू लागले. एकनाथ च्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागले. त्या बिचार्‍याला काहीच कळेना हे लोक आपल्याला का मारत आहेत, मागे मागे काठ्या, दगडे घेऊन का येत आहेत. काय अपराध केलाय मी. स्वतःशीच बोबडे बोलत तो ढसाढसा रडू लागला. बायकोचा मरुन पडलेला देह त्याला आठवू लागला, आई बापाची माया त्याला आठवु लागली.
   एव्हाना सगळा गाव त्याच्या जवळ धावत आला. सगळ्यांच्या चेहर्‍यावर राग, संताप होता. दत्ताराम आणि त्याचे सोबती सगळे होते त्यात.
"मारा त्याला मारा, नाहीतर सगळा गाव मरेल." कोणीतरी गर्दीतून ओरडल. आणि त्याच बरोबर भिरभिर करीत एक काठी त्याच्या डोक्यात बसली. आता सगळा गाव चेकाळून उठला. सपासप काठ्या एकनाथच्या देहावर पडत होत्या. लाथा, चपला पडत होत्या. एकनाथ वेदनेने तडफडत होता. हाताने काठ्याचे वार अडवत होता. बोबडे बोलत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. मला का मारत आहात? मी काहीही केल नाही? कदाचित बोबड्या बोलण्यातून हे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. पण गाव शुद्धीत कुठे होता, तो सपासप निर्बुद्ध पने त्याच्यावर वार करत होता.

तो आता असह्य झाला, त्याची शुद्ध हरवु लागली. आता त्याच्या डोळ्यात दये ऐवजी अंगार फुलला, क्रोधाने तो लाल लाल झाला. बोबड्या भाषेत तो जोरात ओरडू लागला, "मारा अजून मारा, माझ मरण निश्चित झालय. जो अपराध मी केलाच नाही त्याची शिक्षा सगळा गाव मिळून मला देताय. या दत्ताराम आणि त्याच्या साथीदारांच्या सांगण्यावरून माझा जीव घेत आहात. लक्षात ठेवा मी आता हतबल, असह्य, एकटा आहे. पण मी मरुन पुन्हा येणार. एक क्रूर नरपिशाच बनून गावाच्या मानगुटीवर बसणार. तुमच्यातल्या एकालाही सोडणार नाही . तुम्ही काठीने ठेचून माझे रक्त काढले याचा बदला तुमच्या नरडीच्या रक्ताचा घोट घेऊन घेणार. मी परत येणार. मी परत येणार".
लालबुंद नजर एक एकावर फिरवत तो जोरजोरात ओरडू लागला. त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त क्रूर अंगार दिसत होता. सुडाने पेटला होता तो. तो एक एकाला निरखून पाहात होता. सगळ्यांच्या नरडीचा घोट तो घेणार होता. तो एक क्रूर नरपिशाच बनणार होता. अचानक दत्तारामची भिरभिर करत आलेली एक काठी धडदिशी त्याच्या डोक्यात पडली डोक्याच्या दोन भांगा झाल्या. एकनाथचा जीव निघून गेला. धाडदिशी त्याचा देह जमिनीवर पडला. एकनाथ संपला.

एकनाथ भूत होऊ नये म्हणून आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ज्या जागी त्याला मारण्यात आले त्या जागी त्याची समाधी गावकर्‍यांनी बांधली. दत्ताराम ने पद्धतशीरपणे एकनाथची जमीन लाटली. सगळ्यांना वाटल आता सगळ शांत झाल. सगळा गाव आपापल्या कामात व्यस्त झाला. गाव सगळ विसरून गेला.

दिवस मावळायला आला तरी बंडू सुतार घरी आला नाही म्हणून, त्याची बायको चिंताग्रस्त होऊन त्याची वाट पाहू लागली. ती जाणार्‍या- येणार्‍याला विचारत होती, "अहो आमच्या ह्यांना पाहील का कुठे?"
रात्र पडायला आली तरी बंडू सुतार घरी आला नाही. ही बातमी हा हा म्हणता सगळ्या गावात पसरली. लोक बंडू सुताराच्या घरासमोर जमले. त्याची बायको रडत होती. दत्ताराम म्हणला, "हे बघा आता त्याची वाट पाहण्यात काही अर्थ नाही, आपल्यालाच त्याला शोधायला जाव लागेल. "
अस म्हणून गावातील पंचवीस - तीस माणस हातात कंदील काठ्या घेऊन, जंगलात सुताराला शोधायला निघाली. बराच वेळ शोधल्यावरही तो काही सापडेना. एक जण म्हणाला, "अर त्या समाधी जवळ जाऊन बघू, तिथ असल तर घावण तो. "
थोड घाबरतच ते सगळे समाधीजवळ आले. तिथे त्याला शोधू लागले.
"अरे देवा! हे काय हाय. आता काय खर नाही. हे बघा र, किती वंगाळ दृश्य आहे." महादू गुराख्याच्या ओरडण्याने सगळे जण तिकडे धावले. त्यांनी समोरचे दृश्य पाहिले आणि सगळे जण भयभीत झाली. समोर बंडू सुताराचा चिपाटासारख पडलेला देह होता. नुसता सापळा उरला होता त्याच्या देहाचा. ऐंशी किलोचा देह वीस किलोचा दिसत होता. कोणीतरी रक्त आणि मास शोषून घेतले होते. हाडाला चिटकून कातडी तेवढी उरली होती. त्याचा देह पाहून सगळे खूप घाबरले. हा मृत्यू नैसर्गिक नाहीच अस आता प्रत्येकाला वाटू लागल.
 
  त्याचा तो हाडाचा सापळा बनवलेला देह घेऊन ते सगळे गावात आले. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. "एकनाथ परत आला, तो आता कोणाला सोडणार नाही." ही भूमका सगळ्या गावात झाली. जो तो सुताराचा देह पाहून, भीतीने थरथर कापू लागला. आपण आता एका भयानक संकटात सापडलो आहोत याची जाणीव गावकर्‍यांना होऊ लागली.

असेच काही दिवस लोटले. महादू गुराखी रोजच्या सारखा गुर घेऊन जंगलात गेला. सुताराचा मृत्यू झाल्यापासून त्याच्या समाधीकडे कोणी जात नसत. दुपारची वेळ होती. गुर चरत होती. महादू झाडाखाली बसला होता. अचानक गुर ओरडू लागली, पाखरे जोरजोरात किंकाळुन उडून जाऊ लागली. सगळे गुर सैरावैरा पळू लागली. पाखरांचा चिवचिवाट, झाडांची सळसळ, जंगली प्राण्यांची डरकाळी, चित्कार, गुरांचे हंबरने, सरपटणाऱ्या जिवांची सळसळ आणि जोरात वाहणारा वारा यांनी सगळ जंगल दणाणून गेल. धुळीचे लोट उडत होते. महादू घाबरून गेला. काय होतय त्याला काही कळेना. अचानक एक बैल जोर जोरात हंबरू लागला.  कोणीतरी त्याला जोरात वेगाने जमिनीवरून फरफटत नेऊ लागले. आश्चर्य म्हणजे फरफटत जाताना फक्त बैल दिसत होता पण त्याला फरफटत कोण नेत होते हे काही केल्या दिसेना. महादू घाबरून त्या बैलाच्या पाठीमागे धावु लागला. बैल पुढे आणि हा मागे धावू लागला अचानक बैल कोलमडून एका ठिकाणी जाऊन पडला. धडपडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला. महादू ने इकडे तिकडे पाहील तो समाधी जवळ आला होता. तो भीतीने थरथर कापू लागला. अचानक तो बैल हवेत उडाला. तो हवेत तरंगत होता. एवढे मोठे ते बैलाचे धूड पानासारखे हवेत लटकले होते. अचानक बैलाच्या गळ्यावर दाताचे मोठाले वण उमटू लागले. कोणीतरी त्याच्या नरडीला दात लाऊन रक्त पिऊ लागले. बैल वेदनेने जोरात हंबरू लागला, पाये झाडू लागला. एखाद्या मोठ्या रबरी चेंडू मधून हवा काढल्यावर तो जसा लहान लहान होत जातो. तसा तो बैल होऊ लागला. त्याचे सगळे रक्त कोणीतरी शोषून घेतले, सगळे मास कोणीतरी ओरबाडून घेतले. सगळे आतडे फाडून मास खाली लोंबु लागले. कोणाच्या तरी तोंडाचा मचमच आवाज येऊ लागला. मास तोंडा खाली धरून कोणीतरी ते खात असल्याचा तो आवाज होता. पण कोणीच दिसत नव्हते. हवेत टांगलेला बैल आणि त्याचे ओरबाडत असलेले मास फक्त दिसत होते. तोंडाचा मचमच आवाज वाढत होता. अचानक आवाज थांबला आणि धाडदिशी ते बैलाचे धूड जमिनीवर पडले. हे अघोरी दृश्य पाहून महादू च्या अंगावर काटा उभा राहीला. तो पळू लागला. काही करून जंगलाच्या बाहेर जावा लागेल. नाहीतर मरण अटळ आहे. तो वेगाने पळू लागला.

अचानक महादू हवेत उडाला. आणि हवेतच तो पाठीमागे खेचला जाऊ लागला. तो हेलकावे खात खात एका ठिकाणी येऊन पडला. त्याने आजुबाजुला पाहिले. त्याची भीतीने गाळण उडाली. त्याच्या समोर मरून पडलेला बैल होता आणि पाठीमागे एकनाथ ची समाधी. त्याला आता कळून चुकले एकनाथचा आत्मा आला आहे. आपल मरण निश्चित आहे. त्याला कसला तरी घाण वास आला. त्याने नाक दाबून धरले. हा वास त्याला ओळखीचा वाटू लागला. कुठे तरी हा घाण वास आधीपण त्याला आला होता. अचानक त्याला आठवल हा तर एकनाथच्या अंगाचा येणारा वास आहे. त्याने इकडे तिकडे पाहिले. आजुबाजूला कोणाच्या तरी श्वासांची घरघर मोठ्याने त्याला ऐकू येऊ लागली. दातावर दात घासल्याचा कटकट आवाज येऊ लागला. कोणीतरी झाडाला नखाने ओरबडत होत. त्याच्या त्या आवाजाने महादूच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्याला मागे कोणीतरी सरपटत त्याच्याकडे येत असल्याचे जाणवले. थरथर कापत त्याने मागे बघितले. त्याच्या तोंडचे पाणी पळाले. विजार आपोआप ओली झाली. भीतीने दात एकमेकांत रुतून बसुन दातखिळी बसली. जाग्यावर थरथर कापून, सगळे अंग थंड पडले त्याचे. समोर झोपून कोणीतरी सरपटत त्याच्या कडे येत होते. अंगभर केस वाढलेले, नखे वीतभर झालेले, गुळगुळीत झालेली बिळबिळीत घाण वास मारणारी त्वचा, श्वासांची मोठ्याने होणारी घरघर. आणि सरपटत खुरडत खुरडत येणारी त्याची चाल. बीभत्स अस त्याच रूप पाहून. महादू गार झाला. अचानक त्याने महादू च्या अंगावर झेप घेतली. महादूच्या पोटावर जाऊन तो बसला. महादू ने त्याचा चेहेरा पहिला आणि तो भीतीने गर्भगळित झाला. तो एकनाथ होता. तो खाली वाकला. त्याची लाळ खाली गळत गळत महादूच्या तोंडात गेली. तो त्याची जीभ बाहेर  काढून त्याच्या तोंडावरची ती लाळ चाटू लागला. वळवळनारी जीभ त्याच्या तोंडावर सारखी फिरवु लागला. महादूच्या नाकात त्याच्या तोंडाचा घाण दर्प गेला. त्याला जोराची शिसारी आली. त्याच्या अंगावरच्या आळ्या, जखमा, रक्त, पु पाहून महादूच्या पोटात ढवळून आल. असा भयानक आणि बीभत्स मृत्यू येईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. अचानक एकनाथ ने जोराची आरोळी ठोकली, त्याच्या डोळ्यात क्रोध निर्माण झाला, नजर खुनशी बनली. त्याने महादूचा गळा धरला आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला. गटागटा आवाज करत तो त्याच रक्त पिऊ लागला. रक्ताच्या चिळकांड्या इकडे तिकडे उडू लागल्या. महादू तडफडू लागला, हात पाय झाडू लागला. आणि काही वेळात तो शांत झाला. तो संपला. त्याचा देह शांत झाला. दुसरा बदला पूर्ण झाला. अजून खूप बाकी आहेत. सगळा गाव बाकी आहे. एकनाथ पुन्हा एकदा गायब झाला.

बंडू सुतारा पाठोपाठ महादू गुराख्याच्या मृत्यू ने गाव हादरून गेला. दोन्ही मृत्यू तेही एक सारख्याच पद्धतीने. हा काही योगायोग नाही. काहीतरी अनैसर्गिक याच्या पाठीमागे आहे. याची जाणीव त्यांना होऊ लागली. गावभर या मृत्युची चर्चा होऊ लागली. जो तो "एकनाथ परत आला आहे, एकनाथ परत आला आहे" अस बोलू लागला. दत्ताराम, आप्पा वाणी आणि प्रीतम पुजारी यांच्या तर पायाखालची वाळूच सरकली. त्यांच्या पाचजणांनपैकी दोघांचा असा भयानक अघोरी मृत्यू हा एकनाथ परत आल्याचा संकेत होता.

पुढचा मृत्यू आपलाच आहे याची जाणीव तिघांना झाली. काहीतरी कराव लागेल नाहीतर. मृत्यू अटळ आहे. दिवस जाऊ लागले. पुन्हा एकदा सगळे झाल गेल विसरून गेले. हळू हळू हे तिघे पण विसरू गेले. आता त्यांना वाटू लागले की तो योगायोग झाला असेल.

संध्याकाळची वेळ होती. लोक शेतातून परत येत होते. बरेच जण पारावर गप्पा मारत बसले होते. प्रीतम पुजारी आणि आप्पा वाणी दारू ढोसून पारावर गप्पा मारत थांबले होते. शेजारच्या मैदानात लहान - मोठे मुल खेळत होते.
अचानक जोरात वारा सुटला. हवा जोरात वाहू लागली. जंगलाच्या बाजूने जोर जोरात विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. कोणीतरी वेगाने जंगलातून गावाच्या दिशेने येत होते. झाडे मोडल्याचा, दगडे उडाल्याचा भास होत होता. गावकरी घाबरून गेले. अचानक काय होत आहे काहीच कळेना. एवढा विचित्र आवाज कोणाचा असेल? अनेक प्रश्न त्यांच्या मनात उमटू लागले. एकदम प्रीतम पुजारी आणि आप्पा वाणी हवेत उडाले आणि शेजारच्या झाडावर उलटे टांगलेले दिसले. खाली मुंडके आणि वर पाय असे दोघे टांगले होते. ते दोघे जोरजोरात ओरडू लागले. सगळे गावकरी स्तब्ध, घाबरून तो नजारा पहात होते. अचानक त्यांची नजर जंगलाच्या रस्तावर गेली. केस, नखे वाढलेला,डोळे लालभडक असलेला,तोंडातून लाळ गळत असलेला आणि विचित्र आवाज करत त्यांच्या कडे येत असलेला एकनाथ त्यांना दिसला. त्याला पाहून सगळे घाबरले. त्याने एकदम हवेत उडी घेतली, ते दोघे ज्या झाडावर टांगलेले होते त्या झाडावर गेला. रागाने लालबुंद झालेली नजर त्या दोघावर त्याने रोखली. त्याला पाहून ते दोघे भीतीने ओरडू लागले, "वाचवा, वाचवा" असे बोंबलू लागले. गावकरी स्तब्ध होऊन सगळ पहात होते. एकनाथने त्याचे अणकुचीदार नखे आप्पा वाण्याच्या पोटात खुपसली. गरागरा ती नखे त्याच्या पोटात फिरवली. सगळा कोथळा बाहेर काढला आणि अधाशीपणे तोंडात कोंबला. दोन्ही हात त्याच्या पोटात घालून त्याचे पोट टराटरा फाडले. जोरात आरोळी ठोकून त्याचा मुडदा खाली फेकून दिला. आप्पा वाण्याचे मरण पाहून पुजारी हादरून गेला. तो गयावया करू लागला,देवाच नाव घेऊ लागला. एकनाथने त्याच्यावर जळजळीत नजर टाकली. जिभेने त्याचे तोंड, नाक कपाळ चाटू लागला. त्याची मान त्याने हातात धरली आणि एका झटक्यात त्याची मान धडापासून वेगळी केली. त्याचा मुडदाही त्याने खाली फेकून दिला. आप्पा वाणी आणि प्रीतम पुजारी संपले. एकनाथ ने जोराची आरोळी ठोकली आणि खुनशी नजरेने लोकांकडे बघू लागला, त्याची नजर दत्ताराम वर स्थिर झाली. दत्ताराम भीतीने पाणी पाणी झाला. "पुढची बारी तुझी हाय, लक्षात ठेव आणि मग सगळ्या गावाची" अस म्हणून तो गावकर्‍यांकडे पाहून जोरजोरात हसू लागला. दत्तारामकडे पाहून पुन्हा एकदा क्रूर हसला आणि हवेच्या गतीने जंगलात निघून गेला.

सगळ्या गावाच्या डोळ्यादेखत घडलेल्या त्या घटनेने सगळा गाव हादरून गेला. एकनाथ परत आला आहे, हे त्यांच्या डोळ्यांनी पाहिले त्यांनी. त्याचे ते भयानक रूप पाहून भीतीने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. पण गाव जास्त हादरला होता तो एकनाथच्या धमकीने, "पुढची बारी दत्ताराम आणि गावाची आहे." गावाला झोप लागेना, भूक लागेना. कधी एकनाथचा आत्मा येईल आणि नरडीचा घोट घेईल याची शाश्वती उरली नव्हती.

** एकनाथ चा बंदोबस्त करावा लागेल. गावावरील संकट दूर कराव लागेल. अस गावातील काही जाणकार लोक बोलू लागले. इकडे दत्तारामला त्याच्या जिवाचा घोर पडला होता. त्याला राहून राहून एकनाथची धमकी आठवू लागली.
     "आता पुढची बारी तुझी".
हे शब्द त्याच्या कानात सारखे घुमू लागले. त्याची भूक, झोप सगळी उडाली होती. त्याचे चार साथीदार देवाच्या दारी गेले होते आणि आता त्याची बारी होती. पण त्याला मरायची इच्छा नव्हती. स्वस्थ बसुन काहीही होणार नाही. काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा.
   गावातील सगळ्या लोकांना चावडीवर जमा व्हायला सांगण्यात आल. यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी सगळे गावकरी चावडीवर जमा झाले. दत्ताराम बोलू लागला, " हे बगा आपल्याला यावर काहीतरी तोडगा काढावाच लागेल. सगळ्यांचा जीव जाण्या अगोदर आपणच त्या हैवानाचा खातमा करू. शेजारच्या गावात, 'देवदत्त ऋषी' नावाचे एक तपस्वी आले आहेत. त्यांना जाऊन आपण भेटू. आपली समस्या त्यांना सांगू. ते आपल्याला नक्की मदत करतील. दुसरा काहीच पर्याय आपल्याकडे नाही.

देवदत्त ऋषी एक महान तपस्वी होते. अनेक वर्षांच्या साधनेनंतर त्यांनी अनेक विद्या प्राप्त केल्या होत्या. ते म्हणत, "या भूतलावर जसे ईश्वराचे अस्तित्व आहे अगदी तसेच राक्षस, भूत, प्रेत आत्मा यांचे आहे". त्यांची धारणा होती की, 'ईश्वरी शक्तीने या राक्षसी प्रवृत्तीचा नाश केला जाऊ शकतो.' ते वाईट भूत, प्रेत, आत्मा यांचा नाश करायचे. त्यांना मुक्ती मिळवून द्यायचे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन येत. ते सध्या सावरगाव नजीक एका गावात मुक्कामाला थांबले होते.
 
दत्ताराम आणि सगळे गावकरी देवदत्त ऋषीकडे आपली समस्या घेऊन गेले. देवदत्तांना त्यांनी सगळी हकिकत सांगितली. "गावात चौघांचा अगदी पाशवीपणे त्या हैवानाने जीव घेतलाय. आता तो सगळ्या गावाच्या जिवावर उठला आहे. आम्ही सगळे जीव मुठीत धरून दिवस काढत आहोत. आता तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचवू शकता. बाबा आमच्यासाठी काहीतरी करा. आम्हाला या संकटातून मुक्ती द्या." सगळे गावकरी त्यांच्यापुढे गयावया करू लागले.
देवदत्त उत्तरले,"तुम्ही चिंता करू नका. उद्या सकाळच्या प्रहरी मी तुमच्या गावात येईल. तुम्हाला संकट मुक्त करण्याचे मी वचन देतो."
देवदत्तांच्या या बोलण्याने गावकरी आनंदले. त्यांना हुरूप आला. आपले संकट आता टळेल ही आशा त्यांना वाटू लागली.
 
दुसर्‍या दिवसाच्या प्रसन्न सकाळी देवदत्त गावात आले. सर्व गावकर्‍यांनी त्यांना हात जोडून अभिवादन केले. " मला एकनाथची समाधी दाखवा. ती समाधी पाहिल्याशिवाय पुढचे काहीच करता येणार नाही." देवदत्त उद्गारले.
"पण बाबा तिथे जाणे म्हणजे स्वतःहून मरण ओढून घेण्यासारखे आहे." गावकरी त्यांना म्हणाले. "कोणाला काहीही होणार नाही. समाधी बघायला मी एकटा जाणार आहे. तुम्ही चिंता करू नका." अस म्हणून त्यांनी, प्रत्येक गावकर्‍याला एक रुद्राक्ष दिला. तो गळ्यात घालायला सांगितला आणि ते उत्तरले," मी माघारी परत येईपर्यंत सगळेजण आपापल्या घरात दारे बंद करून बसा. वाईट शक्तिपासून हे रुद्राक्ष तुमचे रक्षण करेल.
  
देवदत्त जंगलाच्या दिशेने चालत निघाले. समाधीच्या दिशेने धीमे पाऊले टाकीत ते चालू लागले. जशी जशी समाधी जवळ येऊ लागली. वातावरण बदलू लागले. अनैसर्गिक शांतता वातावरणात पसरू लागली. त्यांचे येथे येणे कोणाला तरी आवडले नाही. त्यांनी मंद स्मित केले आणि तोंडात मंत्र पुटपुटत ते पुढे चालू लागले. समाधी दृष्टी पथात आली. त्यांनी रुद्राक्षाची माळ हातात घेतली. एकदा जोरात देवाच्या नावाचा घोष केला आणि ते समाधीजवळ पोहोचले.
   
समाधीच्या बाजूला त्यांनी दोनतीन फेर्‍या मारल्या. आणि अगदी समाधी समोर स्तब्ध होऊन ते उभे राहिले. समाधीत आता हालचाल जाणवु लागली. समाधी कंप पावु लागली. समाधीमधून आवाज येऊ लागला. पण तो आवाज विचित्र नव्हता, भितीदायक नव्हता. एक शांत, संथ आवाज त्या मधून येऊ लागला. कोणीतरी समाधीतून बोलू लागले. देवदत्त शांतपणे ते बोलणे ऐकू लागले. कधी होकारार्थी कधी नकारार्थी मान ते हलवु लागले. त्यांच्या चेहर्‍यावरच्या रेषा बदलू लागल्या. त्यांच्या चेहर्‍यावर कधी क्रोधित, कधी शांत तर कधी करुण भाव तरळू लागले. देवदत्त बराच वेळ ते बोलणे ऐकत स्तब्ध उभे होते.
    
देवदत्तांनी डोळे उघडले. त्यांची मुद्रा प्रसन्न दिसत होती. त्यांनी समाधीकडे एकदा कटाक्ष टाकला आणि ते तडक गावाकडे झपाझप पावले टाकीत निघाले. दुपारच्या समयी ते गावात पोहोचले. सर्व गावकरी आपापल्या घरात दारे बंद करून बसले होते. त्यांनी सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलवून घेतले. ते सर्वांना म्हणाले,   "उद्या सकाळी सर्व गावातील लोक टेकडीवरच्या हनुमान मंदिरात जमा व्हा." तुम्हाला या संकटातून उद्या कायमची मुक्ती मिळेल.
त्यांनी दत्तारामकडे पाहिले त्याला म्हणाले, "उद्या लवकर मंदिरात ये."
 
दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर गाव मंदिरात जमा झाला. सर्व गावकरी भीतीच्या छायेत होते.  देवदत्तांनी मंदिराभोवती पावित्र पाण्याचे रिंगण मारले. प्रत्येकाला गळ्यात रुद्राक्ष घालायला सांगितला. "या रिंगणाच्या बाहेर कोणीही जाऊ नका. कोणी कितीही प्रलोभन, भीती दाखवली तरी याच्या बाहेर पडू नका. जो या रिंगणाच्या बाहेर जाईल, त्याचा मृत्यू अटळ असेल."
दत्ताराम रिंगणात भयभीत होऊन बसलेला होता. सगळ्यांच्या मध्ये बसला होता तो. त्याला राहून राहून मृत्यूची चाहूल लागु लागली.
   
देवदत्त समोर अग्नी पेटवून मंत्र पुटपुटू लागले. जसे जसे ते मंत्र पुटपुटू लागले. तसे तसे वातावरण बदलू लागले. विचित्र आवाज येऊ
लागले. सभोवताली स्मशान शांतता पसरू लागली. ढग अंधारून आले. ढळढळीत दुपार असूनही रात्रीसारखा अंधार सभोवती पसरू लागला. परिसर काळाकुट्ट झाला. कोणाच्या तरी आगमनाची चाहूल जाणवु लागली. देवदत्त आता जोरजोरात मंत्र म्हणू लागले. अचानक गुरगुर आवाज ऐकू येऊ लागला. श्वासांची जोरजोरात घरघर ऐकू येऊ लागली. कोणीतरी आसपास आले होते.

  एकदम रिंगणाच्या बाहेर जोरात आवाज आला. एकनाथ रिंगणाच्या बाहेर आला होता. त्याने आत नजर टाकली. सगळे गावकरी भयभीत होऊन त्याच्याकडे बघू लागले. त्याची नजर मध्यभागी बसलेल्या दत्ताराम वर पडली. तो संतापाने त्याच्याकडे धावला परंतु रिंगणात पाऊल टाकताच. त्याला जोरात झटका बसला व तो दूर जाऊन पडला. तो संतापाने लालबुंद झाला. तो बदला घेण्यासाठी आतुरला होता. त्याला देवदत्तांचे मंत्र ऐकून वेदना होऊ लगल्या. त्यानी दत्ताराम वरची नजर काढून देवदत्तांवर रोखली. "ते मंत्र बंद कर नाहीतर तुझ्या नरडीचा घोट घेईल. "तो संतापाने त्यांना म्हणाला. देवदत्तांना खूण समजली. त्यांनी त्याच्याकडे पाहून स्मित केले. ते जागेवरून उठले. रिंगणाला एक फेरी मारली. आणि अचानक त्यांनी दत्तारामचा दंड पकडला. त्याला वर उचलले. आणि त्याला रिंगणाच्या बाहेर एकनाथच्या पायाजवळ फेकून दिले.
  
त्यांच्या या प्रकाराने सर्वजण घाबरून गेले. कोणाला काही कळेना. देवदत्तांनी असे का केले? हाच प्रश्न सर्वांच्या मनात उमटु लागला. दत्ताराम सैरावैरा झाला. सगळीकडे गोंधळ माजला. देवदत्त जोरात ओरडले,
"थांबा कोणीही गोंधळ करू नका. सर्व काही सांगतो. सगळे शांत व्हा."
देवदत्त पुढे बोलू लागले,
"मी सकाळी एकनाथच्या समाधी जवळ गेलो होतो. त्याचा आत्मा बंदोबस्त करण्याचा मानस होता माझा. पण त्याचवेळी एकनाथच्या आत्म्याचा अंतर्मनाचा करूण आवाज आला मला. त्याला काहीतरी सांगायचे होते. तो आवाज मला सांगू लागला. त्याने चार जणांचा जीव घेतला तो केवळ भुक भागावी म्हणून नाही, तर त्या चार नराधमांनी आणि या दत्तारामनी जत्रेच्या दिवशी एकनाथ च्या घरात घुसून त्याच्या बायकोचा बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. तिच्या खुनाचा आरोप बिचार्‍या एकनाथवर टाकला. त्याच्या अंगात भूत शिरले असे खोटे नाटक करून त्यांनी सगळ्या गावाला त्याच्या मागावर लावले. गावही निर्बुद्धपणे त्याला मारायला धावला. तुम्ही सर्व गावकर्‍यांनी मिळून आणि त्या पाच जणांनी मिळून काठी, दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्याचा काही अपराध नसताना तुम्ही त्याला मारले. खरे आरोपी मोकाट सुटले. आणि याच आरोपींना सजा देण्यासाठी तो भयंकर आत्मा बनून परत आला."
आणि याच कारणामुळे मी दत्तारामला रिंगणाबाहेर फेकले. त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळायलाच हवी.

दत्ताराम देवदत्तांच्या कृतीने हादरून गेला. तो धडपडून उभा राहिला. एकनाथच ते भयंकर रूप पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. आता शेवटचा मृत्यू आपला आहे याची जाणीव त्याला झाली. तो थरथर कापू लागला. गयावया करू लागला. "मला सोड, मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर." अस म्हणु लागला.
ते पाहून एकनाथ जोर जोरात ओरडू लागला. भयानक हसू लागला. त्याला आसुरी आनंद होऊ लागला. तो जोरात इकडून तिकडे पळू लागला, दत्ताराम भोवती गोल गोल फिरू लागला. हिडीस पणे त्याच्या कानात ओरडू लागला. दत्तारामच्या काळजाच पाणी पाणी झाल. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. हे बघून एकनाथला अजून चेव येऊ लागला. त्याने त्याचे मुंडके एका हातात धरले आणि त्याचे तोंड त्याच्या हिडीस जिभेने चाटू लागला. तोंडावर थुंकू लागला पुन्हा ते चाटू लागला. त्याच्या त्या लाळेने, वासाने दत्तारामला किळस आली. जोरात उलटीची उबळ बाहेर आली. असा बीभत्स मृत्यू आपला होणार ही कल्पना त्याला असह्य झाली. अचानक एकनाथने त्याला खाली पाडले. धारदार नखाने त्याचे एका झटक्यात `**`कापले. रक्ताच्या चिळकांड्या सगळीकडे उडाल्या. दत्ताराम गुरासारखा ओरडू लागला. एकनाथचा चेहरा रक्ताने माखून गेला.
"कर बलात्कार कर, ऊठ कर बलात्कार, ऊठ नराधमा ऊठ." अस म्हणून तो जोर जोरात ओरडू लागला. स्वतःची छाती बडवु लागला.
"माझ्या बायकोचा जीव घेतोस हरामखोरा" अस जोरात ओरडून त्याने त्याचे दोन्ही नखे त्याच्या डोळ्यात खुपसली. दोन्ही डोळे बाहेर काढले. हाताच्या मुठीत दाबून त्या डोळ्यांचा चेंदामेंदा केला. दत्ताराम वेदनेने तडफडू लागला. त्याची शुद्ध हरवू लागली. आता एकनाथ संतापाने लालबुंद झाला. तो सपासप नखाचे वार त्याच्या पोटावर करू लागला. बेधुंद होऊन ढोल बदाडावा तसा तो सपासप वार करत गेला.
बायकोचा प्रेमळ चेहरा, तिच्या हातून घास खाताना तिचे लाड करणारे डोळे
त्याला आठवु लागले. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले आणि सोबतच संतापाने डोळे लालबुंद होऊ लागले. तो अजून चेतावला. सगळ्या शरीरावर तो नुसते वार करत सुटला. दत्तारामच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या तरी तो वार करतच होता. त्याची शांती होत नव्हती. तो स्थिर होत नव्हता. शेवटी एक मोठी आरोळी ठोकून तो चिरफाड झालेला देह त्याने जोरात हवेत भिरकावून दिला. पुन्हा एकदा जोरात एक गगनभेदी आरोळी ठोकली आणि तो शांत झाला तो स्थिर झाला.

त्याने देवदत्त आणि गावकर्‍यांकडे पाहिले आता त्याच्या नजरेत शांतता, करुणा दाटली होती. गावकर्‍यांनी जोडलेले हात पाहून गावावरचा त्याचा सगळा राग मावळला. देवदत्तांकडे पाहून त्याने हात जोडले आणि क्षणात हवेत विरून गेला. शांत मनाने त्याने इथला प्रवास थांबवला. अगदी कायमचा.
         
           *समाप्त*

-अभिप्राय नक्की कळवा. तुमचा अभिप्राय पुढची कथा लिहिण्यासाठी अजून उमेद देईल. धन्यवाद.

  वैभव देशमुख.
( राज्य कर सहायक, GST भवन मुंबई)

कथालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

29 Jul 2019 - 12:37 pm | विजुभाऊ

:(
कुठेच भयकथ वाटली नाही.
रामसे बंधुंच्या बी टीम ने लिहीलेली कथा वाटते.

यशोधरा's picture

29 Jul 2019 - 12:41 pm | यशोधरा

कथेचा ओघ आवडला.

जेम्स वांड's picture

29 Jul 2019 - 1:12 pm | जेम्स वांड

ओघ उत्तम आहे फक्त समापन थोडं अजून जोरदार पक्षी नाट्यमय केलं असतं तर अजून मजा आली असती

भयकथेपेक्षा बीभत्सरस असलेली कथा म्हणता येईल कदाचित.. कथाबीज चांगलं होतं पण विस्तार करताना खूपच अळणी - कंटाळवाणं झालं ... भुताच्या भयानक अवताराचं वर्णन किंवा म्हणजे यशस्वी भयकथा नव्हे ... फार एक्स्प्लेन नाही करता येत मला .. भयकथा लिहायची असेल तर नारायण धारपांची , रत्नाकर मतकरींची पुस्तकं आणि नव्या लेखकांमध्ये हृषीकेश गुप्ते यांची पुस्तकं किमान प्रत्येकी चारवेळा वाचून काढा ... म्हणजे भयकथा कशी असते हे समजेल .. त्यानंतरही ती तुम्हाला लिहिता येईल की नाही हे तुमच्या पोटेन्शलवर आहे पण निदान कशी लिहू नये हे तरी समजेल .

ही गुप्तेंंची एक भयकथा ऑनलाइन उपलब्ध आहे - http://bhutbanglaa.blogspot.com/2015/05/blog-post.html?m=1

आणि ही धारपांची - http://bhutbanglaa.blogspot.com/2015/06/blog-post_25.html?m=0

ही आणखी एक - http://bhutbanglaa.blogspot.com/2015/06/blog-post_4.html?m=0

कानडाऊ योगेशु's picture

29 Jul 2019 - 1:11 pm | कानडाऊ योगेशु

भयकथेपेक्षा बीभत्सरस असलेली कथा म्हणता येईल कदाचित

हेच म्हणतो.

राज्य कर सहायक, GST भवन मुंबई

तुम्ही तुमच्या पद-वर्णनानेच (Designation) लोकांना जास्त घाबरवु शकाल.कर व जीएसटी म्हटले कि भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. (ह.घे)

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2019 - 1:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

सही पाहुनच जास्त घाबरलो
पैजारबुवा,

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 2:02 pm | जॉनविक्क

इरामयी's picture

1 Aug 2019 - 8:21 am | इरामयी

भयकथेपेक्षा बीभत्सरस असलेली कथा म्हणता येईल कदाचित.. कथाबीज चांगलं होतं पण ...

+१

भयकथांचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद!

श्वेता२४'s picture

29 Jul 2019 - 2:19 pm | श्वेता२४

पण ती भयकथा वाटायला हवी असेल तर त्यात धक्कातंत्र हवे. भुताची भीती वाटावी म्हणून तुम्ही जे वर्णन केले आहे त्यात भीती कमी व किळस जास्त वाटते. पण तुमची ही जी कथा आहे ती वाचण्यास कमी व चित्रित करुन पाहण्याचे पोटेन्शिअल जास्त असलेली कथा वाटते. लिहीत राहा. शुभेच्छा.

कथा बऱ्याच अंशी प्रेडिक्टेबल होती.. पण वातावरण निर्मिती आपण चांगली केलीये..
चांगला प्रयत्न.. :)

योगी९००'s picture

29 Jul 2019 - 7:25 pm | योगी९००

चांगला प्रयत्न...कथा आवडली. विशेष म्हणजे गावाचे वर्णन आवडले.

वरील प्रतिक्रियेशी सहमत. बिभत्स रसाचा खूप वापर त्यामुळे किळस वाटते. तेवढे भाग वगळले तर बाकी कथा छान...

हस्तर's picture

1 Aug 2019 - 12:00 pm | हस्तर

नव्वद किलोचा तो देह ??