लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!
कशी गम्मत असते बघा.... लग्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तू लग्न करून सुखी आहेस का तर तो/ती नक्कीच म्हणतात की उगाच या फंदात पडलो/पडले. एकटं असणं जास्त सुखाचं असतं.... आणि तरीही या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मुलांनी लग्न करायला हवंच असतं. असे किती पालक असतील जे म्हणतात की बाळा, तू अजिबात लग्न करू नकोस.
अगदी धीट मत मांडायचं तर लग्न हे उमेदीच्या काळात शरीरसौख्यासाठी आणि उतरत्या वयात सोबतीची गरज म्हणून केलं जातं. भावनिक गुंतवणूक - आयुष्य जोडीने जगण्यासाठी - तिचे/त्याचे विचार पटले म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला....... ही सगळी अनेकदा स्वतःला किंवा समोरच्याला फसवण्यासाठी सांगितलेली कारणं असतात. अर्थात लग्नानंतर जोडीदाराची आपल्या आयुष्यात असण्याची सवय आपल्याला होते; आणि मग आपण त्याला 'प्रेम' हे गोंडस नाव देतो. मात्र अनेकदा या नात्याच्या सुरवातीच्या काळातील एकमेकांबरोबरची शारीरिक सुखातील अनुरूपता या नात्याचं भविष्य ठरवते; असं मला वाटतं.
मागील पिढ्यांमध्ये याबाबतीतील स्त्रियांचं मत/गरज/इच्छा/अपेक्षा यांचा विचारच केला जात नसे. आपलं देखील याविषयी काही मत/गरज/इच्छा/अपेक्षा असू शकतात याचा विचार स्त्रिया देखील दुर्दैवाने करत नसत. मात्र आताची स्त्री याबाबतीत विचार करायला लागली आहे. आपलं देखील मत असू शकतं याची तिला जाणीव व्हायला लागली आहे. ....स्त्रीची याबाबतीत होणारी कुचंबणा हा विषय खूप मोठा आहे. याविषयी पुन्हा कधीतरी नक्की लिहीन. मात्र अजूनही तिचं याविषयी काही मत/इच्छा असू शकते; अपेक्षा/गरज असू शकते; याचा विचारही पुरुषांच्या आणि समाजाच्या मनात येत नाही हे दुर्दैवी सत्य आहे!
आज मात्र मला लग्नसंस्था आणि सामाजिक मानसिकता याविषयी थोडं बोलायचं आहे. ज्याप्रमाणे स्त्रीचं शरीर सुखाबद्दल काही मत/गरज/इच्छा/अपेक्षा असू शकते तसंच पुरुषाचं देखील असूच शकतं; हे मला मान्य आहे! अनेकदा पुरुषदेखील स्वतःच निर्माण केलेल्या मानसिक बंधनामुळे आपल्या पत्नीकडे याविषयी मोकळेपणी बोलत नाहीत. दोघांची याबाबतीतली अनुरूपता असणे फार महत्वाची असते. त्यामुळे दोघांनीही याविषयी एकमेकांशी मोकळेपणी बोलले पाहिजे. कदाचित आताच्या पिढीमध्ये हा मोकळेपणा असेल देखील मात्र मागील पिढ्यांमध्ये नव्हता हे खरं.
अर्थात ही अनुरूपता नाही म्हणून किमान भारतीय संस्कृतीमध्ये सहसा लग्न मोडले जात नाही. शक्यतोवर जुळवून घेण्याचा प्रयत्न होतो. पुन्हा एकदा हे देखील योग्य की अयोग्य हा मोठ्या चर्चेचा विषय होऊ शकतो. अनेकदा मनातून कुढत देखील राहिलं जातं; आणि मग कधीतरी चुकून किंवा ठरवून लग्नबाह्य संबंध निर्माण होतात. अनेकदा आपल्या साथीदाराच्या अशा लग्नबाह्य संबंधाबद्दल कळल्यानंतर सुरवातीला बरीच आदळ-आपट केली जाते किंवा जोडीदाराला या संबंधांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यामागील कारण समजून घेण्याची गरज समजून घेतली जात नाही. मग असे लग्नबाह्य संबंध असलेला जोडीदार हा कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला जातो. त्याचं मत/गरज/इच्छा/अपेक्षा याविषयी कधीच विचार केला जात नआहि; हे दुर्दैव!
अर्थात असे संबंध होण्यापूर्वी जर पती-पत्नींना एकमेकांच्या सोबतीची; एकमेकांच्या असण्याची सवय झाली असेल; तर या सोबतीमुळे किंवा झालेल्या सवयीमुळे अशा लग्नबाह्य संबंधांकडे काही काळानंतर दुर्लक्ष केलं जातं. याला अजूनही एक कारण असतं. दोघांची मिळून असणारी मुलं, दोघांचेही वृद्ध पालक आणि सामाजिक स्थान! हळूहळू आपल्या साथीदारांची केवळ 'असण्याची' सवय व्हायला लागते. काळ जात राहातो.
त्याचे/तिचे हे लग्नबाह्य संबंध आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत मान्य नसल्यामुळे किंवा त्यादोघांची सोबत असण्याची गरज संपल्यामुळे किंवा आपल्या वयात आलेल्या मुलांमुळे/वृद्ध पालकांमुळे हे संबंध काही कालावधी नंतर संपतात. तो/ती परत एकदा आपल्या लग्नाबांधनाने बांधल्या गेलेल्या जोडीदाराकडे परतात. तोपर्यंत अनेकदा संसार स्थरावलेला असतो.... आर्थिक सुबत्ता आलेली असते... मुलं मोठी होऊन आपापल्या मार्गाने जायला मोकळी झालेली असतात. त्यामुळे मनातून एक वेगळाच एकटेपणा जाणवायला लागलेला असतो. आणि मग स्वतःची गरज म्हणून जोडीदाराचं परत येणं देखील तो/ती स्वीकारतात............. लग्न संस्था पुढे सरकते! अर्थात परत एकदा...... हे योग्य की अयोग्य हे फारच वयक्तिक मत आहे; असं मला वाटतं.
प्रतिक्रिया
26 Jul 2019 - 8:50 pm | कंजूस
लग्न आगामि भावी पिढिच ठरवते.
26 Jul 2019 - 10:36 pm | जालिम लोशन
असे सरसकट जनरलायझेशन लग्न या संस्थेबद्दल करता येणार नाही. किंवा एकदम लेबर क्लास वा मनोरंजन ऊद्योगतील मंडळी अपवाद सोडुन यांना हे लागु पडेल. जिथे पाट लावणे आणी काडीमोड दर आठवड्याला होते.
27 Jul 2019 - 12:05 am | Rajesh188
लग्न
हे कशा साठी करायचे रीत परंपरा म्हणून करायचे ,?की सर्वच करतात म्हणून आपण सुधा करायचे ?.
की प्रेम झाले आणि जाणवायला लागलं की ह्या व्यक्ती शिवाय जीवनात मजा नाही म्हणून त्या व्यक्तीशी लग्न करायचं?.
अशी बरीच प्रश्न चिन्ह आहेत .
मुळात लग्न हा प्रकार चालू होण्या मागे काय हेतू असावा ह्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे .
शारीरिक सुख मिळावे म्हणून समजावे तर लग्न न करता सुद्धा ते मिळत.
निसर्गाचे काही नियम आहेत त्याला माणूस अपवाद नाही .
सेक्स ही भावना निसर्गाने निर्माण केली आहे त्या पाठीमागे उत्पत्ती हाच एकमेव हेतू आहे .
त्या साठी ती कृती सुखदायक वाटते कष्टमय वाटत असती तर उत्पत्ती थांबली असती .
असा आपण विचार करू या की लग्न आणि कुटुंब हे दोन्ही विचार कालबाह्य झाले आहेत आणि आपण ह्या दोन्ही संस्था मोडीत काढल्या पाहिजेत
ह्या संस्था मोडीत निघाल्या किंवा अमान्य केल्या की मुलांची जबाबदारी कोण्ही घ्यायची ,त्यांचे शिक्षण कोण्ही करायचे,( शिक्षण पूर्ण होण्यासाठी २५ वर्ष लागतात).
ह्या उभ्या राहणाऱ्या प्रश्नाला काय उत्तर आहे.
अन्न मिळवण्यासाठी वणवण फिरणारा माणूस शेती करायला लागला आणि स्थिर झाला .
मुलाचे संगोपन करण्यात सुद्धा स्थिर पना असणे गरजेचे नाही का .
ती संगोपनाची शास्वती लग्न आणि कुटुंब ही संस्था देते हे तर अमान्य करता येणार नाही .
मुक्त संबंधात जबाबदारी कोण्ही घेणार नाही ही भीती गैर नाही .
सेक्स म्हणजेच सर्वस्व आहे का तर नाही
तो आवेग जास्तीत जास्त १ तासभर असतो तो संपला की जी गोष्ट त्या दोन व्यक्तींना बांधून ठेवते त्याला प्रेम म्हणुया .आणि प्रेम नसेल तर आवेक संपला की कोणतीच आपुलकीची भावना राहत नाही .
स्त्री आणि पुरुष ह्यांच्या नात्यात प्रेम नसेल आपुलकी नसेल तर फक्त सेक्स ही भावना स्त्री आणि पुरुष ह्या दोघांना एकत्र बांधून ठेवू शकत नाही .
विवाह मुळे काही कायदेशीर अधिकार सुद्धा प्राप्त होतात संपत्ती मध्ये स्त्री ला सुध्दा आणि मुलांना सुद्धा विवाह च मोडीत काढला तर
मुलांनी कोणाच्या घरात राहायचं आई chya की वडिलांच्या हे कोण ठरवणार .
असे बरेच प्रश्न उभे राहतील
खूप खूप प्रश्न आहेत सर्व लिहीत नाही
27 Jul 2019 - 8:41 am | स्वलिखित
+1
27 Jul 2019 - 9:55 am | nishapari
प्रत्येक अनुभव वेगळा असतो हे पटलं .. पण बाकीचं 100 % पटलं नाही ... उत्पत्ती हा निसर्गाचा हेतू असेलही पण उत्पत्तीची इच्छा किंवा झालेल्या मुलांचं संगोपन ही जबाबदारी या भावना नातं टिकवून ठेवतात याची सध्याच्या जगात काही शाश्वती नाही.. जवळच्या परिचयातल्या काही जोडप्यांचा अनुभव बघा दोन मागच्या पिढीतली म्हणजे पन्नाशीच्या आसपासची तर 2 जरा नवीन पिढीतली 30 - 40 दरम्यानची .. आधीच्या दोन जोडप्यांना बरीच वर्षं मुलं झालं नाही , त्यातल्या एकीने ते भयंकर मनाला लावून घेतलं आणि उपचार वगैरे चालूच होते , मध्यमवर्गीयांना परवडतील ते पण व्रत - वैकल्य , उपास तापास करू लागली , बिचाऱ्या नवऱ्यालाही इतकी वर्षं तिच्या हट्टासाठी हे उपास / अमुक दिवस शाकाहार आदी नियम पाळावे लागले ... कुठे बाहेर जाणं मिसळणं तिने बंद करून टाकलं आणि मूल हा एकच ध्यास घेऊन राहिली ... दुसऱ्या जोडप्याला मुलगी झाली .. आणि त्यांच्या एकसुरी आयुष्यात जान आली .. दोघे आता पूर्वीपेक्षा खूप खुश दिसतात .. पूर्वी मला वाटायचं का मुलासाठी एवढा अट्टाहास करतात लोक , मूल असलं नसलं काय फरक पडतो , आपण जगायचं ना आनंदात एन्जॉय करत ... पण या जोडप्याच्या आयुष्यात त्या मुलीच्या नुसत्या अस्तित्वानेच जो फरक पडला ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर या प्रश्नाचं उत्तर मिळालं ... पण दुसरी अजूनही असमाधानी आहे , जे हेल्दी नक्कीच नाही .. असो . पण बरीच वर्षं मूल नसतानाही दोघींच्या नवऱ्यांनी त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं ... कधीही कटकटी न होता 12 - 15 वर्षं संसार अगदी सुरळीत झाले . ही दोन्ही अरेंज्ड मॅरेजेस होती .
दुसऱ्या पिढीत मुलीला ऑफिसमधल्या एकाने लग्नासाठी विचारलं ... लग्न झालं , मुलगा निर्व्यसनी , घरची आर्थिक गडगंज वर स्वतःची नोकरी .. पण लग्नानंतर स्वभाव जुळेनात , मुलीच्या मते नवरा अरसिक , सतत ऑफिसातलं काम किंवा मित्रांसोबत फिरणे , घरी बायकोशी बोलतानाही कमीत कमी शब्दात संवाद उरकणे , मग गप्पा टप्पा - फिरणे किंवा इतर काही हे तर नाहीच ... तरीही तिने 10 वर्षं संसार केला .. प्रेमापोटी - शारीरिक आकर्षणापोटी की संसार तुटू द्यायचा नाही या अट्टाहासाने परमेश्वरच जाणे .. त्यात मूल व्हावं म्हणून ती कष्टी होती ... 10 एक वर्षांनी मुल झालं आणि मग तिने घटस्फोट घेतला ... डिप्रेशनमध्ये गेली , त्यातून बाहेर आली आणि मग दुसरं लग्न केलं ... आता सर्व ठीकठाक चालू आहे . तेव्हा मूल होणे ह्या निकषाने इथे संसार वाचलेला दिसत नाही . दुसऱ्या एका जोडप्याची लग्नानंतर वर्षभरात मूल आणि पुढच्या वर्षी घटस्फोट अशी केस झाली आहे ...
आणि तिसऱ्या म्हणजे अगदी नवीन पिढीतली 28 वर्षांची एक मुलगी - जी इतकी मनमिळाऊ , लाघवी , स्वतःच्या घरात भरपूर काम करून शेजाऱ्यांपाजाऱ्यांची बारीकसारीक कामं , मदत आनंदाने करायची , सगळ्यांमध्ये अगदी प्रिय होती ती सासूच्या जाचाने घर सोडून आली वर्षभरात ...थाटात लग्न झालं होतं .. दोन्ही घरची परिस्थिती बऱ्यापैकी .. पण नवऱ्याला काही प्रेम उत्पन्न झालं नाही , तो बायकोसाठी स्वतंत्र संसार थाटायला तयार नाही . नवऱ्याने सांगितलं - खरं तर मला तू पसंतच नव्हतीस .... तेव्हा आता घटस्फोटाची केस सुरू होईल बहुधा ...
त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने ठेच लागेल अशा रस्त्यावर जाच कशाला मरायला असं वाटू लागलं आहे . सुखी झालेली जोडपीही खूप आहेत आजूबाजूला अर्थात .. तरीही लग्न किंवा संसार याभोवती फार पूर्वी जे काही एक आकर्षणाचं वलय होतं , जे नॉर्मली तरुण मुलींच्या डोळ्यावर असतं ते जाऊन रखरखीत वास्तवच अधिक डोळ्यात भरतं / खुपतं .... स्वतःचं सुखाचं घर सोडून परक्या लोकांकडून जज करून घ्यायला जाण्याची आपल्याला काय गरज आहे असा प्रश्न पडतो ? आपणच का ऍडजस्ट करायचं , नवरा आपल्या घरी येऊन राहणार नाही तर आपण का त्याच्या कुटुंबासोबत राहायला जायचं ? दोघांचा स्वतंत्र संसार असेल तर ठीक आहे .. शिवाय चांगला , हजार अपेक्षा न ठेवणारा , मॅच्युअर नवरा मिळणार असला तरच ... नाहीतर कशाला उगाच पायावर धोंडा मारून घ्यायचा .. चाललंय त्यात काय वाईट आहे .. सध्याही मजेत तर चाललंय आयुष्य ..
27 Jul 2019 - 10:49 am | Rajesh188
निसर्गाचा हेतू असेलही पण उत्पत्तीची इच्छा किंवा झालेल्या मुलांचं संगोपन ही जबाबदारी या भावना नातं टिकवून ठेवतात याची सध्याच्या जगात काही शाश्वती नाही.
मला हेच सांगायचे आहे .
कुटुंब पद्धती मध्ये इच्या असू किंवा नसू तुम्हाला एकत्र राहवाच लागत .
थोडी घुसमट होत असेल काही लोकांची जे कोणत्या बंधनात राहू इच्छित नसतात .
पण लहान मूल आणि ज्येष्ठ व्यक्ती ह्यांची जबाबदारी कुटुंब पद्धती घेते .
आणि सध्या तरी कोणताच सशक्त पर्याय नाही हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी .
अस्थिर वातावरणात मुल हिंसक होण्याची भीती असते आणि ते समाजासाठी घातक ठरेल.
27 Jul 2019 - 12:15 am | जॉनविक्क
असे नमूद करतो
27 Jul 2019 - 12:39 am | जॉनविक्क
थोडा विचार करता विवाहबाह्य संबंध... सवय, गरज की जुळवून घेणे असे टायटल हवे होते असं वाटतं. या प्रकाराचा अल्प परंतु प्रांजळ परामर्श घ्यायचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे
27 Jul 2019 - 9:40 am | ज्योति अळवणी
धन्यवाद जॉनविक