माझा दवाखाना ज्या इमारतीत आहे त्यातच वरच्या मजल्यावर आमचे आई वडील राहतात. आमच्या वसाहतीचा पुनर्विकास झाला त्यात मी दवाखान्याची जागा घेतली आहे आणि वरच्या मजल्यावरचेच घर वडिलांना मिळाले.
आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला होता आणि त्याचा इलाज चालू होता आणि ते सुधारत होते. १९ जून २०१९ रोजी संध्याकाळी ८ वाजता दवाखान्यात कुणी नव्हते म्हणून मी त्यांना पाहायला गेलो. तेंव्हा आईने सांगितले कि अरे आज मी चेहऱ्याला पावडर लावायला गेले तर मला मानेला डावीकडे थोडं सुजल्यासारखं वाटतंय.
आमच्या आईला मानेचा आणि कंबरेच्या स्पॉनडायलॉसिस चा त्रास ८-१० वर्षे तरी आहे. आणि माझ्या अस्थिरोग तज्ज्ञ मित्राकडे ती मधून मधून जात असते. त्याने तिला स्वच्छ शब्दात सांगितले आहे कि तुम्ही आयुष्यभर काढलेल्या कष्टामुळे तुमची हाडे झिजली आहेत, ती काही पुन्हा पूर्ववत होणार नाही. तुम्ही माझ्याकडे आलात तर मी प्रत्येक वेळेस औषध बदलून देइन. तुम्हाला कायमचा उपाय करणे कुणालाही शक्य नाही. मी पाठीला लावायचा पट्टा दिला आहे तो लावून जेवढे चालणे फिरणे व्यायाम करणे शक्य आहे ते तुम्ही करत जा. थ्रो बॉल खेळून कंबर दुखणारच तेंव्हा ते कसं जमवायचं ते तुम्हीच ठरवायचं. (आमची आई अजून ७७ व्या वर्षी मुलुंड जिमखान्याच्या थ्रो बॉल खेळायला जाते.)
महिन्यात दोन वेळेस तरी ती कंबर दुखते पाठ दुखते हि तक्रार माझ्याकडे करत असते आणि मी ती "ऐकून" घेतो.
पण आता तिने मानेला सूज आले सांगितले ते काही तरी वेगळे होते. मी हात लावून पाहिले तर माझ्या लक्षात आलं कि तिच्या थायरॉईड ग्रंथीला डावीकडे फुगवटा आला आहे.
मी तिला म्हणालो कि चल "लगेच" खाली, तुझी आत्ता सोनोग्राफी करायची आहे.
आई म्हणू लागली कि अरे तू "ह्यांना" बघायला आला आहेस तर त्यांची तपासणी अगोदर होऊ दे. मी म्हणालो ते आता सुधारत आहेत त्यांची काळजी नको करुस. तू लगेच खाली चल.
आढेवेढे घेत ती माझ्या बरोबर दवाखान्यात आली. तिची सोनोग्राफी करायला सुरुवात केली तेंव्हा तिच्या थायरॉईड ग्रंथीत एक गाठ होती आणि त्याच्या शेजारी रसग्रंथींच्या बऱ्याच गाठी (LYMPH NODES) दिसत होत्या. तिची सोनोग्राफी करत असताना माझे विचारचक्र चालूच होते.
हि गाठ कर्करोगाची आहे याची मला तांबडतोबच खात्री पटली.
आता काही प्रश्न माझ्या डोक्यात नाचू लागले. हि सूज बाहेरून फारशी दिसत नाहीये. पण आतमध्ये वाढून इतक्या पटकन मोठी झाली याचा अर्थ हा कर्करोग फार आक्रमक आहे (AGGRESSIVE).
मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे काम केलेले असल्यामुळे कर्करोगाची कुंडली लगेच मांडता येऊ शकते.
मला लक्षात आले कि हा कर्करोग दोन प्रकारचा असू शकेल
१) ANAPLASTIC- या तर्हेचा रोग फार लवकर सर्वत्र पसरतो आणि त्यात रुग्ण साधारण १ वर्षात दगावतो
२) DLBCL -- DIFFUSE LARGE B CELL LYMPHOMA यात रुग्णाला ४-५ वर्षे मिळतात.
यापैकी पहिल्या प्रकारचा असण्याचीच शक्यता जास्त वाटत होतीकारण DLBCL मध्ये सहसा थायरॉईड ग्रंथीला सूज येत नाही. मी आठवड्यात तीन चार वेळेस तरी आई कडे जातोच त्यामुळे तिच्या मानेत अशी गाठ आहे हे मला तरी जाणवले नव्हते.
मला "आतल्या आत" धक्का बसला होता पण चेहऱ्यावर ते काहीही न दाखवण्याची पराकाष्ठा मी केली. परंतु जवळजवळ १५ ते २० मिनिटे मी सोनोग्राफी करत होतो त्यावरून हा प्रकार काहीतरी गंभीर आहे असे आईला लक्षात आले.
मी दोनदा तीनदा पाहून खात्री करून घेतली आणि तपासणी संपवली. चेहरा जमेल तितका निर्विकार ठेवला आणि आईला सांगितले कि या गाठी "क्षयरोगाच्या" असू शकतील( तो क्षयरोग नाही याची मला १०० % खात्री होती) आणि यासाठी आपल्याला सिटी स्कॅन करायला लागेल. त्यासाठी उद्या सकाळी तू काहीही खाऊ नकोस.
आई म्हणाली कि नाहीतरी उद्या संकष्टी आहे तेंव्हामाझा उपासच आहे. मी काहीच खात नाही. केंव्हा जायचंय ते मला सांग म्हणजे तशी तयारी करू या.
मी ठाण्याच्या सिटी स्कॅन केंद्राच्या डॉक्टरना (ते पण रेडीऑलॉजिस्ट असल्याने त्यांना मी आग्रह करू शकतो) फोन केला आणि सांगितले कि मला "उद्याच" आईचा सिटी स्कॅन करायचा आहे. दुसऱ्या दिवशी दुपारची १२ ची अपॉइंटमेंट मिळाली. ती परत फोन करून मी आईला सांगितली.त्यासाठी सकाळी तिच्या रक्ताची तपासणी करायची आहे त्याबद्दलच्या सूचना दिल्या. सुदैवाने त्यानंतर रुग्ण आलेला नव्हता.
आई बाथरूम मध्ये गेली तेंव्हा मी दवाखान्यातील माझ्या खोलीत मी २ मिनिटे डोळे मिटून शांत बसलो. आल्याला मातृसुख अजून किती दिवस आहे हे मला नक्की समजत नव्हते. २०२० चा सूर्योदय आई पाहू शकेल का? मुलीचे लग्न ठरलेले आहे पण होणारा जावई एम बी ए करतो आहे ते शिक्षण संपवून नोकरीत स्थिर होईपर्यंत लग्न करता येणार नाही म्हणजे २०२० डिसेंबर तरी. मुलीच्या लग्नात आई असेल का?
सरासरी एक वर्ष म्हणजे सहा महिने पण असु शकतात आणि दीड वर्ष सुद्धा. २०१९ वर्ष सरेल का? डोळ्यात पाणी आणून असे विचार चालू होते.
अशी कोणतीही धक्कादायक बातमी मिळालीकी माणूस चार अवस्थांतून जातो
१) धक्का (SHOCK) - अचानक मिळालेल्या बातमीमुळे मन सुन्न होते
२) संताप ( ANGER )-- हे आपल्याच बाबतीत का घडले सगळे जग सुखात आहे आणि आपणच या दुःखाच्या दरीत पडलो आहोत याचा राग येतो.
३) नैराश्य ( DESPERATION) -- आपलं आता काही खरं नाही हा विचार माणसाला नैराश्याच्या गर्तेत ढकलतो
४) स्वीकृती (ACCEPTANCE)-- आता जे काही आहे ते आहे. पुढे काय करायचे ते करायलाच लागणार आहे हि स्वीकृती.
मी या चारही अवस्थांतून दोन ते तीन मिनीटात गेलो आणि स्वीकृती पर्यंत आलो.
तेंव्हा मला लष्करातील एक गोष्ट आठवली. राष्ट्रीय रक्षा अकादमीच्या (एन डी ए) च्या मुख्य इमारतीत एक विशाल पंख पसरलेला गरुड आहे आणि त्याखाली लिहिलेले आहे
TRAIN YOUR MEN TO WIN
THERE IS NO RUNNERS UP AWARD IN WAR
मी मनात म्हटले.
I SHALL FIGHT TILL LAST BULLET AND LAST DROP OF BLOOD.
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Jul 2019 - 11:39 am | विजुभाऊ
खूप पटले हे वाक्य डॉ साहेब
आपल्या मातोश्री लवकर बर्या व्हाव्यात त्याना लवकर आराम पडावा
26 Jul 2019 - 11:39 am | गवि
ही सत्यकथा आहे?
विलक्षण मनस्थिती झाली असणार त्या क्षणी तुमची. पेशंट्सबाबत एकवेळ ऑब्जेक्टिव्ह राहता येईलही सवयीने.
पण आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत सब्जेक्टिव्ह होणं अनिवार्य असेल. त्यातूनही उभं राहून इतका समतोल विचार करुन खंबीर होऊन लिहिलंय. सलाम.
26 Jul 2019 - 11:44 am | सुबोध खरे
होय.
१०० % सत्य.
टाटा कर्करोग रुग्णालयात पुढील उपचार( शल्यक्रिया) होणार आहे.
26 Jul 2019 - 11:58 am | लई भारी
वाचून काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही आहे! आपली अवस्था काय असेल याची कल्पना पण करू शकत नाही. आपल्या धैर्यास सलाम.
आपल्या आई लवकर बऱ्या होवोत ही सदिच्छा!
26 Jul 2019 - 11:59 am | ज्ञानोबाचे पैजार
आपली आई लवकरात लवकर बरी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
पैजारबुवा,
26 Jul 2019 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोजच्या व्यवसायात अनेक गंभीर आजारांचे अनेक रुग्ण पहात असलो तरी जवळच्या व्यक्तीच्या (आणि तुमच्या बाबतीत तर खुद्द स्वतःच्या आईच्या) आजाराचे निदान मनात प्रचंड खळबळ माजवते. इतके असूनही त्याबाबत इतके शांत-समंजस लिहिले आहे, हे विशेष आहे.
आपल्या मातोश्रींच्या यशस्वी उपचारांसाठी व उत्तम आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.
आपल्या पिताश्रींच्याही उत्तम आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.
26 Jul 2019 - 1:17 pm | आंबट चिंच
+११११११ हेच म्हणतो.
शुभेच्छा.
26 Jul 2019 - 12:19 pm | यशोधरा
आपल्या आई नक्कीच बऱ्या होतील. यशस्वी शल्यक्रियेसाठी खूप शुभेच्छा. ऑपरेशन यशस्वी झाले अशी बातमी घेऊन या.
26 Jul 2019 - 12:27 pm | टर्मीनेटर
२००९ साली हा अनुभव घेतला आहे. एकेदिवशी अंघोळ करताना आमच्या आईला डाव्या स्तनात गाठ असल्याचे लक्षात आले. अन्य काही कारणांमुळे तिचे त्यावेळी डॉक्टरांकडे सतत जाणे येणे असल्याने तिने त्या डॉक्टरांना फोन करून त्याबद्दल सांगितल्यावर त्यांनी त्वरित काही तपासण्या करण्यास सांगितले. जी भीती होती ती खरी ठरली, त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट म्हणजे नुकतीच सुरुवात होती. मामे बहिणीने टाटा मेमोरियल मधील ओळखींचा लाभ घेऊन पुढील पंधरा दिवसांत शस्त्रक्रियेची तारीख मिळवली. शस्त्रक्रिया करून एक स्तन काढून टाकल्यावर मग पुढे ५ वेळा केमोथेरपी साठी जावे लागले.
आता १० वर्षे झाली त्या गोष्टीला, पण देवकृपेने आमचे मातृछत्र (वयानुसार काही प्रकृतीच्या तक्रारी सोडल्या तर) अद्याप शाबूत आहे!
खरे साहेब, तुमच्या आईचा आजार लवकरात लवकर बरा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना _/\_
26 Jul 2019 - 12:43 pm | राजाभाउ
आपल्या आई लवकरात बऱ्या होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना.
26 Jul 2019 - 12:49 pm | सोत्रि
इमोशनल पॅटर्नसाठी SARAH Model (Shock, Anger, Resistance, Acceptance and Hope) शिकवलेलं आठवलं ’इमोशनल कोशंट‘ ट्रेनिंग मधे. एखादा बदल स्विकारतानाही हाच पॅटर्न अनुभवास येतो.
असो, आपल्या आई लवकर बऱ्या होवोत ही सदिच्छा!
- (आशावादी) सोकाजी
26 Jul 2019 - 12:54 pm | श्वेता२४
आपल्या आईंवर यशस्वी उपचार होवोत व त्या लवकर बऱ्या होवोत हीच ईश्वराकडे प्रार्थना
26 Jul 2019 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या आई लवकर बर्या व्हाव्यात हीच देवाकडे प्रार्थना.
-दिलीप बिरुटे
26 Jul 2019 - 1:21 pm | जॉनविक्क
यातच तुमचा मिपा सोबत असलेला ऋणानूबंध दिसून येतो. मिपाकराना आपण देत असलेल्या प्रेम आणि विश्वासबद्दल आपले अत्यंत आभार.
हेच काही असे क्षण आहेत जेव्हा आयुष्य म्हणजे केवळ एक स्वप्न तर न्हवे याची जाणीव प्रकर्षाने होते. जे काही घडेल ते स्थितप्रज्ञाप्रमाणे स्वीकारून निसर्ग सर्व गोष्टी आपल्या अनुकूल करो हीच प्रार्थना.
26 Jul 2019 - 3:26 pm | अभ्या..
ह्याबाबतीत डॉक्टरसाहेब म्हणजे बावनकशी माणूस.
आम्हा दोघांची एकदाही प्रत्यक्षात भेट झालेली नाही तरीही माझ्या आईचे अँजिओग्राफीचे रिपोर्टस डॉक्टरसाहेबांना पाठवताच त्वरीत त्यानी रिप्लाय करुन संपर्क साधून योग्य ती माहीती आणि मार्गदर्शन केले. पुढील उपचारासंदर्भात काही सूचना केल्या आणि मुख्य म्हणजे माझ्या मनावरचा ताण त्यांनी प्रचंड हलका केला.
डॉक्टरसाहेब, आपल्या मातोश्रींना आपल्या सुयोग्य उपचारांने चांगल्या आरोग्याचा लाभ होवो ह्याच सर्व मिपाकरांच्या आणि अर्थात माझ्ह्याही शुभेच्छा.
26 Jul 2019 - 2:13 pm | नि३सोलपुरकर
आपल्या आई लवकरात बऱ्या होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना.
_/\_
26 Jul 2019 - 2:16 pm | जालिम लोशन
परमेश्वर आपल्याला खंबीर रहाण्याचे मानसिक बळ देवो. काळजी करु नका, हे ही दिवस जातील.
26 Jul 2019 - 2:18 pm | सस्नेह
खरेसाहेब आपल्या आईस दीर्घायुष्य व निरामय आरोग्य लाभो ही सदिच्छा !
अशा परिस्थितीत ही स्वत:चे इतके वस्तुनिष्ठ विश्लेषण केलेत याबद्दल आपले कौतुक वाटते.
26 Jul 2019 - 2:29 pm | जेम्स वांड
तुमच्याजागी मी असतो तर कळल्या बरोबरच ओक्सबोक्शी रडणे सुरू केले असते. तुम्ही मुळात डॉक्टर त्यातही लष्करी कडव्या शिस्तीत घडलेले, तरीही, स्वतःच्या आईच्या इतक्या गंभीर दुखण्याचे निदान करून त्यावर भावनाविहिन चेहरा करता येणे तुमच्या मानसिक ताकदीचे प्रतीक आहे, तुम्हाला कडक सॅल्युट सर, तुमच्या आई ह्याला हरवून बऱ्या होवोत ही ईश्वराला प्रार्थना, अन त्या होणार व्यवस्थित एका लढवय्याची आई आहे ती _/\_
26 Jul 2019 - 3:01 pm | बाप्पू
तुमच्यासारखे निष्णात डॉक्टर घरीच असल्याने मेडिकली योग्य तो डिसिजन घ्यालच. तुमच्या आई लवकर बऱ्या व्हाव्यात हि परमेश्वर चरणी प्रार्थना .
26 Jul 2019 - 3:17 pm | उपेक्षित
डॉक आपल्या आई लवकर बर्या व्हाव्यात हीच देवाकडे प्रार्थना _/\_
26 Jul 2019 - 3:29 pm | चिगो
आपल्या आई लवकरात लवकर खडखडीत बर्या होवोत, हीच सदिच्छा व प्रार्थना..
खंबीरपणे लढा द्यालच ही खात्री आहे. आपल्या भावना आम्च्यापर्यंत पोहचवताय, त्यासाठी धन्यवाद.
26 Jul 2019 - 4:05 pm | एकनाथ जाधव
आईसाहेब लवकर बर्या व्हाव्यात ह्या शुभेच्छा
____/\____
26 Jul 2019 - 5:06 pm | nishapari
आपल्या आईंना दीर्घायुष्य व निरामय आरोग्य लाभू दे ही सदिच्छा !
26 Jul 2019 - 6:20 pm | गड्डा झब्बू
आपल्या मातोश्री लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात हि परमेश्वर चरणी प्रार्थना __/\__
26 Jul 2019 - 6:29 pm | उगा काहितरीच
पुढील उपचारासाठी खूप खूप शुभेच्छा !
26 Jul 2019 - 9:28 pm | स्मिता.
बर्याच दिवसांनी डॉक्टरांचा लेख बघून घाईने वाचायला घेतला आणि वाचून काय बोलावं कळत नाहीये.
मातोश्री लवकर बर्या होवोत यासाठी अनेक शुभेच्छा!
27 Jul 2019 - 12:03 am | प७९
+१
26 Jul 2019 - 11:10 pm | नाखु
फक्त एक सलाम.
तुमच्यातील डॉक्टर ने मुलाच्या नैसर्गिक हळवेपणाला वरचढ होऊ दिले नाही.
ही अतिशय कठीण परीक्षा आहे.
आपल्या मातोश्रींना व्यवस्थित उपचार होऊन त्यांनी पतवंडाच्या बाललीलांचे कोडकौतुक करायला मिळो हीच परमेश्वचरणी शुभेच्छा
वाचकांची पत्रेवाला नाखु
27 Jul 2019 - 12:27 am | प७९
आपल्या मातोश्री लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात हि परमेश्वर चरणी प्रार्थना __/\__
27 Jul 2019 - 2:23 am | ट्रेड मार्क
अचानक असं काही समोर आल्यावर काय होतं ते अनुभवलं आहे. तपासणी करतानाही पुढे काय होणार हे माहित असूनही एवढ्या शांतपणे तुम्ही सांगू शकलात यातच तुम्ही किती खंबीर आहात ते दिसून येत आहे.
मातोश्रींना त्रास होऊ नये आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्या अशी देवाकडे प्रार्थना...
27 Jul 2019 - 2:46 am | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
जीवनात नेहमी सकारात्मक कसं राहावं याचे धडे स्वत:च्या उदाहरणातनं तुम्ही सतत देत असता. तुमच्या मातोश्री बऱ्या होणारंच असा विश्वास वाटतो.
आ.न.,
-गा.पै.
27 Jul 2019 - 7:15 pm | भंकस बाबा
सकारात्मक दृष्टिकोण सदैव राहुदे.
माझ्या आईची या जानेवारी महिन्यात मणक्याची शल्यक्रिया झाली. अनेक हितसंबधियानी शल्यकर्म टाळायचा सल्ला दिला. अनेक अंथरुणात पडून असलेली उदाहरणे दिली, तरीही आईच्या वेदना पाहुन निर्णय घेतला. आज आई चालुफिरू शकते. याचे श्रेय बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टर विशाल कुंदनानी व माझ्या आईच्या जबर इच्छाशक्तिला! कोणत्याही परिस्थितित हरल्याचा भाव आईसमोर तोंडावर दाखवू नका. आई सुखरूप या संकटातून बाहेर पडेल.
27 Jul 2019 - 7:15 pm | भंकस बाबा
सकारात्मक दृष्टिकोण सदैव राहुदे.
माझ्या आईची या जानेवारी महिन्यात मणक्याची शल्यक्रिया झाली. अनेक हितसंबधियानी शल्यकर्म टाळायचा सल्ला दिला. अनेक अंथरुणात पडून असलेली उदाहरणे दिली, तरीही आईच्या वेदना पाहुन निर्णय घेतला. आज आई चालुफिरू शकते. याचे श्रेय बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टर विशाल कुंदनानी व माझ्या आईच्या जबर इच्छाशक्तिला! कोणत्याही परिस्थितित हरल्याचा भाव आईसमोर तोंडावर दाखवू नका. आई सुखरूप या संकटातून बाहेर पडेल.
30 Jul 2019 - 11:02 am | सुबोध खरे
कोणत्याही परिस्थितित हरल्याचा भाव आईसमोर तोंडावर दाखवू नका.
लष्करात एक गोष्ट शिकवलेली आहे.
NO FIGHT IS LOST TILL YOU HAVE STOPPED FIGHTING.
एक गोष्ट नक्की आहे कि आमच्या आईचे आयुष्य किती आहे हे परमेश्वराचा हातात आहे.
परंतु ती "कर्करोगाला बळी" पडणार नाही एवढे नक्की.
आणि शेवटचे वाक्य लिहिलंच आहे.
I SHALL FIGHT TILL LAST BULLET AND LAST DROP OF BLOOD
29 Jul 2019 - 10:17 am | ब़जरबट्टू
आपल्या आईला लवकरच बरे वाटावे ही ईश्वराच्या चरणीं प्रार्थना !!
29 Jul 2019 - 9:26 pm | तेजस आठवले
आपण योग्य ती काळजी, उपचार घ्यालच .आमच्या सर्व मिपाकरांच्या सद्भावना तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हा सर्वाना निरोगी चांगले आरोग्य लाभो हीच प्रार्थना!