शहराबाहेरचं ते तळं खूप शांत आणि गूढ असं वाटायचं. रोज कामावरून परत येताना रमेश थोडा वेळ आपली कार रस्त्याकडेला थांबवी आणि दुरूनच त्या तळ्याकडे पाही. दिवसभराच्या कंटाळवाण्या कामानंतर त्या शांत तळ्याकडे पाहताना त्याला खूप चांगलं वाटे. कधीकधी सूर्यास्ताच्या तयारीत असलेले पिवळे, केशरी आकाश तर कधी ताऱ्यांनी सजलेले काळेभोर आकाश, कधी कृष्णमेघ तर कधी निरभ्र निळं आभाळ त्या तळ्याच्या पाण्यात स्वतःला पाहायला धडपडे.
एका शुक्रवारी रमेशनं घरी आल्यावर प्रीतीला तयार व्हायला सांगितलं.
"चल आज मी तुला एका खूप वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. लवकर तयार हो."
"आज काय विशेष? आणि कुठं जायचं आहे आपण? सांग आधी. आणि हे बघ जेवण तयार आहे घरात त्यामुळं बाहेर कुठं जेवायला जायचा घाट घालणार असशील तर मला त्यात मला काहीही इंटरेस्ट नाही, आधीच सांगून ठेवते. आणि काय रे, आज तुला एवढा उशीर कसा काय झाला यायला?"
"फक्त १५ मिनिटं उशीर झालाय स्वीटू, आणि ते पण खूप ट्रॅफिक होत ना म्हणून."
"तुला एवढी कारणं मिळतातच कशी रे?"
"खरं सांगायला कारण शोधायची काय गरज? आणि हो, तू म्हणतीयेस तसं काही आपण बाहेर जेवायला चाललेलो नाहीये, तेव्हा उगाच प्रश्न विचारू नकोस, फक्त तयार हो लवकर. आल्यावर जेवून घेऊ."
रात्री नऊ वाजता एक कार त्या तळ्यापाशी थांबली. रस्त्यापासून तळ्यापर्यंत जायला एक छोटी पायवाट होती पण जणू काय बरीच वर्षं न वापरल्यासारखी ती धूसर वाटत होती,
"उतर खाली, पोचलोय आपण."
"क्काय? इथं? अरे ठीक आहेस ना तू रमेश? कसली विचित्र जागा आहे ही . रमेश, मी इथं उतरणार नाहीये आणि तू पण उतरत नाहीयेस, घरी चाललोय आपण... आत्ता"
"का? काय वाईट आहे या जागेत? शांत आणि स्तब्ध आहे इथं सगळं. किती छान वाटतंय ना?"
"हीच शांतता अंगावर येतीय माझ्या. सगळं किती भयाण आणि स्मशानासारखं आहे."
"आपण दिवसभर कुणा ना कुणाच्या तरी बरोबर असतो, कोणी नसेल तर मोबाईलच्या आभासी दुनियेत तरी वावरतो. त्या सगळ्या पासून दूर इकडं किती शांत वाटतंय बघ. तुला सवय नाहीये अशा शांततेची म्हणून अंगावर आल्यासारखी वाटतीय. बघ की, रातकिडे पण नाहीयेत इथली शांतता भंग करायला."
"मला बाकीचं काही माहित नाही पण आपण जाऊया इथून लवकर, बस्स."
"आयुष्यभर तुला काय वाटेल तेच करत राहिलो ना आपण, कुठं जायचं झालं तर प्लॅन तुझा, काही खायचं झालं तर चॉईस तुझा, माझ्या शर्टचा रंग पण तूच ठरवणार. इथं तुला घेऊन यावं वाटलं तरी पण नकारही तुझाच. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. ठीक आहे, नकोय ना तुला? जाऊया आपण इथून."
रमेश चा वाढत जाणारा चिडका आवाज बघून प्रीती क्षणभर दचकली. खरं तर काही चुकीचं सांगत नव्हता रमेश. घरातले सगळे निर्णय प्रीतीच घ्यायची आणि रमेश कधीच तिला कशालाच नाही म्हणायचा नाही. तिचा कसलाही हट्ट असो, कुठंही बाहेर जायचं असो; रमेशनं "नाही" म्हटलंय असा प्रसंग अगदी विरळच. असं असताना उगाचच आपल्याला ह्या जागेची भीती वाटतीय म्हणून रमेशला हिरमुसलं करून येथून जाण्याचा हट्ट तिचा तिलाच पटेना.
"अरे चिडू नकोस रे राजा. चल जाऊया तिकडं तळ्याजवळ. पण माझा हात घट्ट धर. मला खूप भीती वाटतेय."
"अगं भागुबाई, मी असताना तुला कसली आलीय भीती, ये इकडं" प्रितीने जायला होकार देताच रमेशचा मूड लगेच बदलला आणि प्रीतीचा हात धरून रमेशनं तिला खाली उतरवलं.
"हे बघ इथून छोटीशी पायवाट दिसतेय, चल हळूहळू इकडूनच .. हो.. थांब मोबाईल चा टॉर्च लावतो."
म्हणायला पायवाट असली तरी पूर्ण वाटेवर सगळीकडं गवत उगवलं होत. पायवाट पुढं जाऊन एका ठिकाणी अचानक वळत होती आणि त्या पुढचा रस्ता अलीकडून दिसतच नव्हता. हळू हळू एक एक पाऊल टाकत शेवटी ते त्या वळणापर्यंत पोचले आणि प्रीतीच्या अंगावर एकदम शहारा आला कारण त्यानंतर पुढं वाट अशी नव्हतीच, खूप उंच झाडं, माणसापेक्षा जास्त उंचीचं गवत ह्यांनी भरलेला तो एक मैदानासारखा भाग होता.
"चिडू नकोस रमेश, पण खरंच जाऊया का परत, हवं तर नंतर सकाळच्या वेळेत येऊ आपण. कसला भयानक भाग आहे हा. खूप भीती वाटतेय मला." प्रीतीने रमेशचा हात घट्ट पकडला.
"एवढं छान चंद्राचं चांदणं पडलंय आणि तुला कुणीकडून अंधार दिसतोय? चल माझा हात घट्ट पकड आणि माझ्या बरोबर चाल बरं "
कसातरी ह्या सगळ्यातून मार्ग काढत ते शेवटी त्या तळ्या पर्यंत पोचले. अगदी निरव स्मशानशांतता, काळाभोर अंधार आणि त्यात विचकटून हसतंय असं पिठूर चांदणं, समोर खूप दूर पर्यंत पसरलेलं एक तेवढंच काळभोर तळं.
"अरे हे पाणी इतकं शांत कसं काय आहे, एकही तरंग नाही पाण्यावर की झाडाची एकही फांदी हालत नाहीये आणि कसलातरी जुना गंजलेला असा विचित्र दर्प येतोय."
"अहाहा किती चांगलं वाटतंय नाही, फक्त स्वतःच्या श्वासांचा आवाज येतोय. म्हणतात ना जेव्हा सभोवती शांतता असते तेव्हा तुम्ही स्वतःचा शोध घेता."
रमेशनं प्रीतीकडं बघितलं तेव्हा तिची नजर शेजारच्या झाडाकडे होती. त्या अंधुक उजेडात पण मन लावून ती त्या झाडावर काहीतरी बघायचा प्रयत्न करत होती.
"प्रीती, अगं ए, काय बघतीयास एवढं टक लावून?"
"मी? कुठं काय? काही नाही रे. ते समोरच झाड केवढं पसरलेलं आहे हे बघत होते. पण एक सांगू, मी म्हणत होते तशी काही इतकी पण भयानक नाही आहे हि जागा. बघ की चंद्राचं प्रतिबिंब किती छान दिसतंय पाण्यात."
"अहं .. हो" अनिश्तिततेने रमेश पुटपुटला. एवढा वेळ ह्या जागेला घाबरलेली प्रीती एका क्षणातच एवढी कशी बदलली असा विचार करत असताना त्यानं बघितलं कि प्रीती आणखी पुढं त्या तळ्याकडे चालत चाललीय.
अगदी एकटीच चालत प्रीती पुढं चालली होती, मागून रमेश हि भरभर चालत तिला हाक मारत होता पण प्रीतीनं मागं वळूनही बघितलं नाही. गुडघ्याभर पाण्यात पोचलेली प्रीती जणू काही एक प्रेत चालावं तशी निर्जीवपणे चालत होती. धावत पुढं जाऊन रमेशनं त्या पाण्यात पाय ठेवला तर त्या थंड पाण्याच्या स्पर्शाने त्याला शिरशिरी आली. तसंच पुढं जाऊन त्यानं प्रीतीचा हात धरला आणि तिला मागं खेचलं.
"चल इथून आधी, काय करतेयस काही कळतंय का? असं म्हणत त्यानं प्रीतीला जवळजवळ ओढतच तळ्याबाहेर आणलं. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता, डोळे निस्तेज आणि अंग थंडगार पडलं होतं. तिनं रमेशचा हात पकडला आणि त्याला फरफटत तळ्याकडे घेऊन चालली. जवळपास कमरेएवढ्या पाण्यापर्यंत येईस्तोवर तिनं आपल्या एका हातानं रमेशची कॉलर घट्ट पकडली होती. एका झटक्यात तिनं रमेशला पाण्यात ढकललं आणि त्याचं डोकं पाण्याखाली दाबलं. बराच वेळ पाण्यात झटापटीचा आवाज येत होता. हळूहळू तो थांबला आणि पाणी पूर्वीसारखं शांत झालं.
प्रीती पाण्याबाहेर चालत आली आणि जंगलातून बाहेर निघून गेली.
_____________________________________________________________________
महिन्याभरानंतर दुपारी दारावरची बेल वाजली तेंव्हा दारात इन्स्पेक्टर जाधव उभे होते.
"या इन्स्पेक्टर साहेब, काही पत्ता लागला का रमेशचा?" प्रितीने काळजीनं विचारली.
रमेश हरवल्याची केस करून आता एक महिना झाला होता पण त्यात काहीच प्रगती झाली नव्हती. महिन्याभरात प्रीतीची हालत मात्र अगदीच वाईट झाली होती. हाडांचा सापळा, खोल गेलेले डोळे आणि डोळ्याखालची वर्तुळं तिच्या सध्याच्या परिस्थितीची पूर्णतः कल्पना देत होते.
"काय झालं इन्स्पेक्टर साहेब, काहीतरी सांगा की , कुठपर्यंत पोचलाय तपास?"
"अजूनपर्यंत काहीच प्रगती नाही. महिन्याभरापूर्वी आपल्याला रमेशची कार हायवे जवळ सापडली, त्यासभोवतालचा सगळा परिसर पिंजून काढला पण काहीच मिळालं नाही."
"महिन्यापूर्वी रमेश घरी आला आणि थोड्यावेळाने बाहेर जाऊन येतो असं म्हणाला तो आलाच नाही परत. काही तरी करा इन्स्पेक्टर साहेब पण माझ्या रमेशला हुडकून काढा." प्रीती आता हुंदके देऊन रडत होती.
"आम्ही प्रयत्न करतोय मॅडम, काही लीड मिळाली तर तुम्हाला नक्कीच कळवू. पण आज इथं यायचं कारण म्हणजे तुम्ही मागं सांगितलं होतं ना की तुमचे नातेवाईक लंडनला आहेत आणि तुम्हाला इकडं जवळचं कुणीच नसल्यानं तिकडं जायचं आहे. परंतु त्यावेळी कायद्याप्रमाणे तुम्ही देशच काय पण शहर सोडूनही बाहेर कुठं जाऊ शकत नसल्याने आम्ही परवानगी दिली नव्हती. पण या महिन्याभरात ह्या केस मध्ये कोण गुन्हेगार आहे हे कळलं नसलं तरी तुम्ही काहीही केलं नाहीये हे सिद्ध झालंय आणि त्यामुळं तुम्ही देश सोडून जाऊ शकता."
"धन्यवाद साहेब." प्रीती हात जोडत म्हणाली.
______________________________________________________________
फ्लाईट टेक ऑफ झाल्यावर तिनं आधी पोटभर खाऊन घेतलं. महिनाभर रोगट दिसावं म्हणून फक्त एक वेळ थोडंसं खाऊन तिला कंटाळा आला होता. त्या रात्री रमेशबरोबर खरं तर तिला जायचंच नव्हतं पण त्यानं जायचंच म्हणून डोकं फिरवल्यानं तिला त्या तळ्यापर्यंत जावं लागलं होतं . त्या गडबडीत फोन पण घरी विसरला होता. शहराबाहेरच्या बंगल्यात राहत असल्याने सेक्युरिटी, कॅमेरा किंवा इतर कुणी बघायचा प्रश्नच नव्हता. तळ्याकाठी पोचेपर्यंत रमेशनं तिच्याकडं लक्षच दिलं नव्हतं, त्याच आपलं ते तळं कसं सुंदर आहे, शांत आहे हेच तुणतुणं चाललेलं होतं आणि तिला ते अजिबात आवडलेलं नव्हतं. तिला सगळं कसं तिला हवं तसंच पाहिजे असायचं, जर समोरच्यानं ते नाही केलं तर मात्र तिचं डोकं प्रचंड दुखायचं आणि मग स्वतःवर नियंत्रण करणं पण तिला अवघड वाटायचं.
त्या रात्री तळ्यावर सगळीकडं नजर फिरवल्यावर मात्र तिला झाडावर बसलेलं 'ते' दिसलं. 'ते'च जे अश्या तिला 'न पटलेल्या किंवा आवडलेल्या' वेळी तिच्या सोबत असायचं आणि तिला नेहमीच मदत करायचं. लहानपणी आई बाबानी तिला एकदा खोटं बोलली म्हणून मारलं होतं, त्यावेळी पण 'ते' तिच्या सोबतीला आलं होतं. दुसऱ्या दिवशी आई बाबा बाहेर जाताना त्यांच्या गाडीचा ब्रेक तोडायची कल्पना पण 'त्या'चीच. त्यानंतर प्रीती जरी अनाथ झाली तरी तिच्या सोबत 'ते' नेहमी असायचं. त्या रात्री पण झाडावर बसलेल्या 'त्या'नंच तिला नजरेनंच आपला प्लॅन सांगितला होता.
रमेशला पाण्यात बुडवून मारल्यानंतर ती परत पहाटे तळ्याजवळ आली. रमेशची बॉडी बाहेर काढून तिनं गाडीच्या डिक्कीत कोंबली आणि दूर कड्यावरून खाली फेकून दिली. परत तळ्याजवळच्या रस्त्यावर कार ठेवून ती घरी निघून गेली.
______________________________________________________
महिन्याभराच्या केलेल्या नाटकामुळं प्रीती खरंच खूप थकली होती. लंडनला जाऊन रमेशची संपत्ती कशी खर्च करायची हे तिनं आधीच ठरवलं होतं. हेड रेस्ट वर डोकं टेकवून तिनं वर बघितलं. विमानाच्या छतावर लटकलेलं "ते" तिच्याकडं बघून विचकट हसत होतं.
प्रतिक्रिया
22 Jun 2019 - 4:28 pm | जॉनविक्क
काय होतं ?
22 Jun 2019 - 5:09 pm | पद्मावति
बापरे... काय खतरनाक लिहिलंय.
'ते' म्हणजे काय याचा नीट उलगडा नाही झाला मात्र. ते म्हणजे तिच्या मनाची काळी बाजू का? किंवा एखादी वाईट शक्ती?
22 Jun 2019 - 5:32 pm | उपेक्षित
आवडली, पण बरीचशी नेहमीच्या अंगाने जाणारी होती.
22 Jun 2019 - 5:40 pm | ज्योति अळवणी
अप्रतिम
'ते' काहीही असू दे. प्रत्येकाने स्वतःच्या भीतीच्या बाजूची कल्पना त्यात करावी.
खतरनाक लिहिली आहे कथा
22 Jun 2019 - 9:59 pm | जॉनविक्क
मला प्रत्येकाने हा शब्द खटकला कारण मी प्रीतीच्या बाजूने आहे आणि ते तर मदतच करतय की प्रीतीला. तर भीती कसली ?
असं स्पष्टच लिहलय की. म्हणूनच ते काय होतं हे जाणून घ्यायची मला उत्सुकता राहिली आहे.
22 Jun 2019 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं भयकथा !
22 Jun 2019 - 6:52 pm | श्वेता२४
पण तुमची अर्धवट राहिलेली 'ती' रहस्यकथा कधी पूर्ण करणार?
24 Jun 2019 - 11:28 am | कलम
मधल्या काळात बरीच बाकीची कामं आल्यानं लिंक तुटली ती तुटलीच...
परत सुरवात करायला पाहिजे
22 Jun 2019 - 7:59 pm | जालिम लोशन
(
23 Jun 2019 - 3:36 pm | टवाळ कार्टा
)
22 Jun 2019 - 8:04 pm | गड्डा झब्बू
भारी गूढकथा! अजून खुलवता आली असती.
22 Jun 2019 - 10:56 pm | चंद्र.शेखर
छान भय कथा
23 Jun 2019 - 8:04 am | एमी
:D आवडली
23 Jun 2019 - 12:51 pm | प्रमोद देर्देकर
"त्या गडबडीत फोन पण घरी विसरला होता"
आणि
"चल हळूहळू इकडूनच .. हो.. थांब मोबाईल चा टॉर्च लावतो."
हे विसंगत नाहीये का थोडं .? ?
23 Jun 2019 - 3:24 pm | तुषार काळभोर
फोन तिचा विसरला होता.
टॉर्च त्याने त्याच्या मोबाईलचा लावला होता.
24 Jun 2019 - 11:25 am | कलम
तिचा फोन घरी विसरल्यानं पोलिसांच्या तपासात ती अडकायचा प्रश्न नव्हता
23 Jun 2019 - 3:25 pm | तुषार काळभोर
धारपांची एक कथा आठवली.
24 Jun 2019 - 11:29 am | कलम
सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
24 Jun 2019 - 8:39 pm | मराठी कथालेखक
छान ..लिहीत रहा..अजून खुलवा