(मिपा आयडी घेतल्यावर प्रथमच लिखाण पोस्ट करतोय. लिहायला नुकतीच सुरुवात केली आहे, सुचना/मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच उपयोगी ठरेल)
“मने, काय पसारा केलायसं एवढा ?” ऑफिस मधून घरी आल्या आल्या फरशीवर पडलेली खेळणी, चित्रकलेचे पेपर, रंग आणि कागदाचे असंख्य कपटे बघून नेहमीप्रमाणे माझा पारा चढला. मनू मला दाखवण्यासाठी म्हणून तिने चितारलेलं चित्र घेवून माझ्याकडे येत होती, ती माझा चेहरा बघून तिथेच थबकली. चेहरा पडला तिचा, मग मी सुद्धा ओशाळलो अनं जवळ घेतलं तिला. तिचं चित्र पहायला घेतलं खरं पण चित्रात दिसू लागला तो माझा भुतकाळ.
माझ्या अनं सुलूच्या लग्नाला 15-16 वर्षे झाली होती, सगळं काही छान चाललं होतं, दोघांची करियर, आवडीनिवडी जपणं, हिंडणं-फिरणं, हौसमौज, नातेवाईकांची उस्तवार सगळं जागच्या जागी. सुलू प्रत्येक आघाडीवर पुढे होती. पण घरात दोघांच्या व्यतिरिक्त असलेलं रितेपण आत पोखरून टाकत होतं. दोघांमधेही तसा काही दोष नसतांना हे सुख मात्र आमच्या पासून लांबच होतं. मला वाईट वाटेल म्हणून सुलू जरी कधी बोलली नाही तरी तिचं दुःख मला कळत होतं. आणि एक दिवस सुलूने विषय काढला, मुल दत्तक घेवूया म्हणून. मला हा विचारच सहन झाला नाही. खुप वाद घातला मी सुलूसोबत. अजून आठवतोय तो प्रसंग.
मी – “तु मला आग्रह करू नकोस प्लिज, मला नाही शक्य होणार ते”
सुलू – “अरे, आपण दोघं आता पंचेचाळीशीत आहोत, अजून किती वाट बघायची?”
मी – “ते मान्य आहे गं मला पण...”
सुलू – “अरे, जर मान्य आहे तर मग पण कसला?”
मी – “सुलू, स्पष्टचं सांगतो रागावू नकोस, दुसऱ्या कोणाचं तरी मुल, ‘माझं’ कसं होईल, गं”
सुलू – “म्हणजे?”
मी – “ते ना माझ्या रक्ताचं ना मासाचं, ते माझी छबी कशी काय बनेल? आईबाप मुलांमधे स्वतःला शोधतात, त्या बाळात ‘मी’ मला कसा दिसेल? त्याच्या आवडी, सवयी सगळचं वेगळं असणार, माझ्याशी त्याची नाळ कशी जुळेल? मला नाही वाटत कि मी त्या बाळाशी कनेक्ट होवू शकेल”
सुलू – “तुझ आपलं काहितरीच, अरे, काय शब्द वापरतोयस, म्हणे ‘कनेक्ट’. तुझं आणि माझं तरी रक्ताच नातं कुठय रे, पण झालो कि नाही आपण ‘कनेक्ट’
सुलू हा वाद जिंकली, शोध सुरू झाला आणि यथावकाश मनू आमच्या घरी आली. घराचं चित्र पार बदललं. त्या लहानग्या जीवाने नविन रंग भरले आमच्या सुखी संसाराच्या चित्रात. सुलूचं तर जगचं बदललं, मनूच्या आगमनानं ती नव्याने उमलली, फुलली, खुलली. आधिच लाघवी असलेल्या सुलूने मनूला लगेच आपलसं केलं. एकमेकांच्या आयुष्यात अगदी सहज प्रवेश केला त्या दोघांनी. आणि मी? होतो की मीही त्या चित्रात त्रिकोणाचा तिसरा कोन म्हणून, पण कुठेतरी अंतर राखून होतो त्या एकत्रित दोघांपासून. बाप म्हणून मी माझी कोणतीचं जबाबदारी जरी टाळली नाही तरी कुठेतरी सगळं यंत्रवत सुरू होतं माझ्याकडून. मनूशी जरी माझा संवाद होता तरी आतून मी अलिप्तच होतो, कोरडाचं होतो. सुलूच्या ते कधिच लक्षात आलं होतं पण मुळातच तिचा स्वभाव सावरून घेणारा असल्यानं ती संयम राखून होती. सारं काही उमजत होतं मला पण मनूशी कसा कनेक्ट होवू ते कळत नव्हतं अजून.
मी भानावर आलो, मनूच्या चित्राची स्तुती केली, तिला खिशातुन चॉकलेट काढून दिलं अन चेंज करायला रूम मधे गेलो.
---------------------------------------
आज रविवार, निवांत अन संथ सकाळ. चहा एका दमात पिऊन पेपर चाळणं सुरू होतं माझं. मला चहा झटकन संपवायला आवडतो. समोर लक्ष गेलं मनूचं दुध पिणं संथ सुरू होतं, न रहावून विचार आलाचं, हिची ही सवय सुद्धा माझ्यासारखी नाही. हातात मारी बिस्किट घेवून अगदी विचित्र पद्धतीने कुरतडणं चाललं होतं बाईसाहेबांचं. मला खुप राग आला, वसकन ओरडलो तीला,
’मने, काय चाललयं हे’
मग तिचं दचकणं, भांबावणं आणि माझं ओशाळणं हे ही नेहमीप्रमाणे.
मी जवळ घेतलं तिला, कुरवाळलं मग खुलली जरा.
’मनू, काय करत होतीस?’
’पपा, मी किनई ईंडिया चा मॅप बनवत होते बिस्किट मधे’
मी बिस्किट हातात घेवून बघितलं, भारताचा मॅप तयार होईल असं कुरतडलं होतं तीनं बिस्किट.
झरकन माझ्या नजरेसमोरून लहानगा ‘मी’ धावत गेलो. आकार आकार आणि आकार, छंदच होता मला आकार शोधण्याचा. ढगांमधे मला कसले कसले आकार दिसत, कपडे, चादर, आईची साडी यांवरची नक्षी, सांडलेलं पाणी, तेलाचे ओघळ, भिंतीवर पडलेले डाग, आईच्या हातच्या पुऱ्या, भातावर वाढलेलं वरण, त्यावरचं तूप. प्रत्येक गोष्टीत मला आकार दिसे, मी लगेच माझ्या बोटाने हवेतचं त्याला गिरवण्याचा प्रयत्न करी. भारी अप्रूप वाटे मला की एक चित्रकार कोऱ्या कागदावर कसे अर्थपूर्ण आकार चितारतो, शिल्पकार ओबडधोबढ दगडातून कशी विविध आकारांची निर्मिती करतो.
आणि आता मनूने तेच केलं तेव्हा कळेना मी काय प्रतिसाद द्यावा ते. ओल्या डोळ्यांनी पहाणं मला शक्य होईना, मी मनूला फक्त माझ्या जवळ ओढलं, छातीशी घट्ट धरून कवटाळलं, दचकली ती पण भांबावली नाही. आणि मी ? शब्द नव्हतेच माझ्याकडे, होती फक्त भावना, माझीच तर आहे ही पोर, माझी लेक, माझी आणि सुलूची मनू. पपा आज नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा वागतोय हे लक्षात आलं तिच्या पण त्या लहानग्या जीवाला कसं कळावं तीने नुकताच एका 'बापाला' जन्म दिलाय ते.
प्रतिक्रिया
15 Jun 2019 - 10:06 pm | यश राज
मस्तच....
आवडली कथा
15 Jun 2019 - 10:13 pm | जॉनविक्क
या वाक्यासाठी तुम्हाला एक कडक सॅल्युट नक्कीच बनतो. क्या बात है.
16 Jun 2019 - 12:24 am | टर्मीनेटर
मस्त लिहिलंय...
कमीत कमी शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत तुम्ही..
पुढील लेखनास शुभेच्छा!
16 Jun 2019 - 8:24 am | शब्दानुज
छान आहे गोष्ट! मिपावर स्वागत. पुढील लेखनास शुभेच्छा.
16 Jun 2019 - 10:29 am | नाखु
आवडली आहे
पुलेशु
16 Jun 2019 - 10:34 am | ज्योति अळवणी
अत्यंत मोजक्या शब्दात भावना व्यक्त केल्या आहात तुम्ही. खूपच छान
लिहीत राहा. वाचायला आम्ही आहोतच
16 Jun 2019 - 11:05 am | यशोधरा
चांगलं लिहिलंय.
16 Jun 2019 - 2:09 pm | जॉनविक्क
इतके की मला तर सत्यकथाच भासून गेली.
16 Jun 2019 - 7:25 pm | यशोधरा
बेअरिंग जमके पकडे रहो.
16 Jun 2019 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूप सुंदर लिहिलंय. लिहीत रहा.
16 Jun 2019 - 1:48 pm | नावातकायआहे
पु ले शु
16 Jun 2019 - 2:48 pm | पद्मावति
खुप सुरेख लेखन. आवडले.
16 Jun 2019 - 3:32 pm | आनन्दा
छान लिहिलेय.. आवडले खूप!
16 Jun 2019 - 3:55 pm | जालिम लोशन
पुढिल लेखनास शुभेच्छा.
16 Jun 2019 - 6:32 pm | दुर्गविहारी
मि.पा.वर स्वागत ! खुपच सुंदर लिहीले आहे. लिहीत रहा.
16 Jun 2019 - 7:32 pm | शेखरमोघे
"बापाचा जन्म" छानच साकारलाय!
16 Jun 2019 - 9:27 pm | चंद्र.शेखर
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे खुप आभार.
5-6 वर्षापुर्वी अचानक सर्फिंग करतांना मिपावर पोहोचलो आणि मग नियमित वाचत राहिलो. आपल्यालाही असं काही लिहिता येईल का ? हा विचार बरेचवेळा आला पण हिंमत झाली नाही. एकदा व्हाटसअप वर आलेल्या मेसेज ला उत्तर द्यायचं म्हणून लिहिलं, ते वाचून मित्रांनी ‘लिही’ असं म्हटलं आणि मग हिंमत केली. मला कधी काळी लिहिता येईल ही भावना माझ्यात निर्माण करण्यात मिपाचा महत्वाचा वाटा आहे असं मी मानतो, म्हणून हा विस्त्रुत प्रतिसाद.
ज्यांचे लेख मी वाचत आलो त्या माझ्या आवडत्या लेखकांचे प्रतिसाद वाचून काय भाव आले ते शब्दबध्द नाही करता येणार. परत एकदा सर्वांचे खुप आभार.
17 Jun 2019 - 11:13 am | श्वेता२४
आवडली कथा एकदम. लिहीत राहा. शुभेच्छा.
17 Jun 2019 - 12:06 pm | उपेक्षित
अतिशय सुंदर कथा, उगाच दवणीय न लिहिता मोजक्या शब्दात व्यक्त झाला आहात.
मिपावर स्वागत आहे तुमचे दादा.
17 Jun 2019 - 6:22 pm | चंद्र.शेखर
लिहिण्याचा जास्त अनुभव नाहीये, विषय जास्त फुलवता आला नसावा म्हणून कदाचित हे आपोआपच झालयं अन्यथा 'दवणीय' वाली सीमारेषा ठरवणं जरा कठीण जाईल. प्रयत्न नक्की करीन, रेषा ओलांडली गेली तर जरूर सांगा. धन्यवाद
17 Jun 2019 - 12:35 pm | खिलजि
तुम्हाला कल्पनाही नसेल कि आज या खिलजीच्या डोळ्यात भरदुपारी पाणी आलंय.
देव करो , तुम्हा दयावंतांना आयुष्यात कधीच काही कमी पडू नये . तुम्ही असेच उत्तरोत्तर सुखी होत जाल .दत्तक आणि तेही एका निष्पाप अनाथ कन्येस तुम्ही खऱ्या अर्थाने बाप झालात तसेही माणूस म्हणून जन्माला आलो आणि कन्यादान ना करताच वर गेलो कि जन्मं फुकट जातो असे म्हणतात.
तुमचा जन्म वाया नाही तर सत्कारणी लागला आहे .
17 Jun 2019 - 6:13 pm | चंद्र.शेखर
प्रतिक्रियेसाठी आभार.
एके दिवशी माझा मुलगा (वय वर्षे 8) मारी बिस्किटातून भारताचा नकाशा बनवत होता त्यावरून ही कथा सुचलीये...
बाकी सारं काल्पनिक.
18 Jun 2019 - 2:30 pm | आदिजोशी
असेच लिहित रहा. पुढील लेखनास शुभेच्छा.
18 Jun 2019 - 9:10 pm | चंद्र.शेखर
धन्यवाद
18 Jun 2019 - 9:11 pm | चंद्र.शेखर
धन्यवाद
18 Jun 2019 - 2:51 pm | अभ्या..
मस्तच लिहिलंय हो अगदी.
सेम, अगदी सेम.
18 Jun 2019 - 9:08 pm | चंद्र.शेखर
वाह मस्त. तुम्ही स्वतः कलाकार असल्याने या ओळी तुम्हाला जास्त रिलेट झाल्या. मला कधी कधी दोऱ्याचा एखादा तुकडा ही पुरतो, बोटाने त्याला वेगवेगळे आकार देता येतात. धन्यवाद
19 Jun 2019 - 12:19 pm | मराठी कथालेखक
लिहीत रहा
21 Jun 2019 - 3:41 pm | लई भारी
आवडली. पुलेशु!
21 Jun 2019 - 7:07 pm | Nitin Pardeshi
छान जमली आहे कथा.
Keep it up.
21 Jun 2019 - 7:22 pm | सुबोध खरे
सुंदर