मागील दुवा http://misalpav.com/node/44307
मी काय काय बोलत होतो आणि आई ते ऐकत होती. त्यावेळी माझ्या पेक्षा माझा चेहेराच कदाचित जास्त बोलत असावा. कारण आईचे माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या चेहेर्याकडेच जास्त लक्ष्य होते.
सोमवारी सहलीला जायचे या विचारांनीच माझ्या चेहेर्यावर काहितरी मजेदार रंगीत रांगोळी उमटत असावी. माझ्यासारखीच ,आई पण त्या नक्षीत हरवून गेली.
यवतेश्वर म्हणजे धगांचा डोंगर. पाटणला असताना पाऊस खूप असायचा. कधीतरी कोयनानगरला गेलो तर जंगली जयगड चा डोंगर ढगात झाकलेला दिसायचा पण त्या ढगात कधी गेलो नव्हतो. आपण एखाद्याला उडवून लावायच्म असेल तर " ए जा जा गेला ढगात " असे म्हणायचो. इथे प्रत्यक्षात ढगात जाणार होतो. एकदा लहानपणी तानुमामाने मला सिनेमाला नेले होते. त्यात जितेंद्र का कोणतरी हीरो होता. त्यात तो मरतो आणि स्वर्गात जातो . स्वर्गात सगळे देव सरबत पीत बसलेले असतात. तेथे अप्सरा ढगात नाचत असतात. ते ढग बघून मी तानुमामाला शंका विचारली होती. या लोकाना पायाखाली नाचताना काटा खिळे असे काही आले तर दिसणार कसे. त्याहूनही मोठा प्रश्न पडला होता की अशा ढगाम्च्या रस्त्यावरून रथ चालवताना जर रथाचे चाक खड्ड्यात गेले आणि पंक्चर झाले दिसणार कसे. पण माझ्य आगोदरच्या शंकेवर तानुमामाचा वाकडा झालेला चेहेरा पाहिला आणि प्रश्न आवरता घेतला. पण एक बरे आहे. ढगात चालताना पायात स्लिपर आहे की बूट ते कोणाला समजत नसेल .
यवतेश्वर ला ढग असतील तर मग तेथे देव सरबत पीत बसलेले असतील असे उगाचच वाटून गेले.
यवतेश्वरला जायची पहिली तयारी म्हणजे अभ्यास ग्रुहपाठ उरकून घेणे. सुदैवाने तो काही फार मोट्ठा भाग नव्हता. इंग्लीशचा एक धडा आणि मराठीची एक कविता वाचायची होती. इंगलीशचा धडा वाचणे हे थोडे कठीण होते. सरांच्या मदतीशिवाय काही वाचणे शक्य नव्हते. मनातल्या मनात वाचताना स्पेलिंग नुसार उच्च्चार चा करतायायचे. पण ते बरोबर अस्तील याची खात्री नसते. आणि मोठ्याने वाचायला गेलो की धडा बाजूला रहातो आणि स्पेलिंगच्या उच्चाराशी कुस्ती सुरू होते. ही इंग्रजीची स्पेलिंग कुणी लिहायला सुरू केली कोण जाणे. निदान काही नियम वगैरे तरी असावेत. बरे कुणाला शंका विचारावी तर त्यांची प्रतिक्रीया काय असेल ते सांगता यायचे नाही. मी एकदा तानुमामाला विचारले होते की टी ओ चा उच्चार टु असा होतो. डी ओ डू होतो मग जी गो चा उच्चार गो असा का करतात. या प्रश्नात हसायसारखे काय होते देवजाणे तानुमामा लालबुंद होईपर्यंत जमिनीवर लोळून हसत होता. त्याचे हसून सम्पल्यावर म्हणाला शाळेत हे विचारू नकोस मास्तर धोपटतील
काही वेळा तर एकच स्पेलिंग असले तरी उच्चार वेगळा कसा होतो तेच कळत नाही रीड, रेड स्पेलिंग तेच पण उच्चर वेगळा. आपले मराठी बरे आहे. माय असे लिहीले तर ते मुणीही वाचले तरी तेच वाचतो. इथे नटुरे फुटुरे वॉल्कड लाफ्ड स्पेलिंग प्रमाणे वाचताच येत नाहीत.
शाळेत सरांनी धडा मोठ्याने वाचायला लावला की धडा रहातो बाजूला आणि वर्गात नुसतीच खुसखुस सुरू होत रहाते. ज्याना धडा येत असतो ते हसत असतात आणि ज्याना येत नसतो त्याना यात हसण्यासारखे काय तेच कळत नसते. इंग्लीशच्या तासाला धडा समजलेला असेल तर तो लक्षात रहातो. उद्या पर्यंत आईला हा धडा वाचून ठेवायला सांगतो आणि तीच्या कडून समजावून घेतो.
मराठीच्या कविता वाचायला मजा येते. वर्गात वाचताना चाल लावली असेल तर अर्थ बाजुला रहातो आणि सगळे एका चालीत म्हणत असतात. पण म्हातारी उडता नयेची तीजला माता मदीया अशी , असो की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पीकावर. असो की मग खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या असो. कविता कोणतीही असो त्याला चाल एकच " मेरा दिल ये पुकारे आजा" चीच अशा पाठ केलेल्या कविता एकाच चाली मुळी कुठे मिसळल्या जायच्या तेच कळायचं नाही.
पण वर्गात कविता वाचायला लावली तरी फारसे काही बिघडायचे नाही. नीट वाचता येते. निदान उच्चार तरी तेच रहातात. त्यामुळे त्याची चिंता नव्हती.
इंग्रजीचा धडा उद्या आल्यावर आणि मराठी कविता थेट वर्गात सोमवारीच .
आता महत्वाचा टप्पा म्हणजे सहलीची तयारी. तशी फारशी नव्हतीच पण त्यात कसूर रहायला नको. एखादा छोटासा टॉवेल, पाण्याची बाटली इतका पाऊस पडत असताना पान्याची बाटली कशाला आणायला साम्गितलीय सरांनाच माहीत. आईची भाजीची पिशवी घेतली पण ती अगदीच मोठी होती. त्यात डबा कुठे कोपर्यात जाईल शोधताशोधात डब्याची सुट्टी संपून जाईल. दुसरी एक पिशवी होती पण ती पिशवी कोणाकडून तरी आलेली होती आणि ती त्याना ही कोणालातरी परत द्यायची होती . हे त्या बालभारतीच्या पुस्तकावरच्या चित्रातल्यासारखे झाले. पुस्तकावर एक मुलगा मुलगी पुस्तक वाचताहेत असे चित्र. त्यांच्या हातील पुस्तकावरही तेच चित्र, आनि त्या चित्रातल्या पुस्तकावरही तेच चित्र. ही मालीका बहुतेक चित्रातले पुस्तक रेणू आणि पुढे अणु इतके लहान झाल्यावर संपत असेल आणि त्या चित्रातली मुले प्रॉटॉन इलेक्ट्रॉन बनून फिरायला लागल्यावर संपत असेल.
बरेच शोधल्यावर शेवटी पिशवी मिळाली. त्याला थोडा तपकिरीचा वास येत होता. आणि पिशवी इकडून तिकडे हलवली तरी मोठमोठ्याने शिंका येत होत्या.
ती पिशवी धूवून घेतली तेंव्या शिंका कमी झाल्या.पिशवी हलवल्यावर मला शिंका येत नसत्या ना तर ती पिशवी नक्की घेवून गेलो असतो. आख्ख्या शाळेची सर्दी बरी झाली असती ट्रीप परत येईपर्यंत.
पिशवी चा प्रश्न सुटला , त्यात डब्यात आई साबुदाण्याची खिचडी देणार होती. टंप्या आणि एल्प्या रताळ्याचा खीस आणि उकडलेली बटाट्याची भाजी आणि दही आणणार होते. त्यामुळे तोही प्रश्न नव्हता.
रात्री झोपताना सकाळी लवकर उठायचे म्हणून घड्याळाचा गजर लावुन ठेवला. गजर वाजल्यावर जाग यावी म्हणून घड्याळ आईच्या उशीजवळ ठेवले. आपल्या घड्याळाचा गजर वाजला नाही तर हमखास जाग यावी म्हणून शेजारच्या राधाकाकूनाही त्यांच्या घड्याळाचा गजर लावायला सांगीतला. पांघरुण घेवून अंथरुणावर पडलो खरा पण लवकर झोप येईना. यवतेश्वराला जाताना वाटेत पडणारा धबधब्याला किती पाणी असेल? वाटेत पाऊस लागला तर काय करायचे. सरांनी दोन दोन च्या जोड्या करून जायला साम्गीतले तर आपल्या सोबत टंप्या आनि एल्प्या कसे येणार ? येताना पायर्यांवरून यायची वाट निसरडी असेल तर कसे उतरायचे? एक ना दोन प्रश्नच प्रश्न. आईला एक दोनदा विचारून झाले. " आई उद्या पाऊस असेल तर खिचडी पावसात भिजणार तर नाही ना? यवतेश्वराला वहायला फुले कोणती न्यायची असतात? यवतेश्वराच्या बाजूला कास तलावातून होणार्या पाटाचे पाणी येते. त्यात खेळायला मजा येते. असे ऐकून होतो . तेथे पाण्यात थब्बक थबाक करत आम्ही सगळ्याना भिजवून काढणार होतो. टंप्या त्यासाठी मुद्दाम पावसाळी रबरी बूट घालून येणार होता . पण मला खरी चिंता होती ती पावसामुळे सहल रद्द नाही ना होणार याची. तसे झाले असते तर सगळ्या तयारीवर पाऊस पडला म्हणावे लागले असते.
आईला दोनचार शंका विचारून पाहिल्या . तीला झोप येत होती. शेवटी वैतागून ती म्हणाली . झोप रे बाबा. उद्या सकाळी तुझे सगळे प्रश्न सुटतील आणि आता मलाही झोपू दे. आता एक जरी प्रश्न विचारलास ना तर उद्या ट्रीपला जाउ देणार नाही.बराच वेळ गेला असेल अंथरुणावर पडल्यापडल्या खिडकीतून दिसणारा अंधार बघत राहिलो.
अंधारात उगाचच तानुमामा खिडकीबार उभा आहे असे दिसायला लागले. मग तानुमामासोबत सोनसळे सरही दिसले. सोनसळे सरांबरोबर टंप्या ही दिसला.टंप्या अगदी शहाण्यासारखा उभा होता. सोनसळे सर त्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. मला अंधारात कुणाचे चेहरे दिसत नव्हते फक्त काळ्या सावल्याच दिसत होत्या.
अधूनमधून तानुमामा डोके हलवत होता पण सोनसळे सर आणि टंप्या एकदम स्तब्ध होते. ते तसे बराच वेळ उभे होते. टंप्या इतका स्तब्ध शक्य च नव्हते नक्कीच काहीतरी गडबड होती. आईला विचारायचं का? पण आईने आपली ट्रीप कँसल केली तर काय म्हणून विचारलंच नाही.
मी तानुमामाला खाणाखुणानी काय आहे म्हणून विचारले सुद्धा?
पण मग सोनसळे सर तानुमामा ,टम्प्या सगळेच काळोखात एकदम गायब झाले. अंधारात नीट दिसत नव्हते. बाहेर बहुतेक पावसाची भुरुभुरी सुरू असावी. गाव वार येत होता. मी पांघरूण डोक्यावरून ओढून घेतले.
किती वेळ झाला असेल कोण कोण जाणे, सकाळ काही होत नव्हती. घड्याळाची टीकटीक संथ पणे चालू होती. शाळेत मुले नीट भरभर पळत नसली तर शिक्षक कधीतरी पाठीवर छप्पी लगावतात तशी घड्याळाच्या पाठीवर कोणीतरी एखादी छप्पी द्यायला हवी. म्हणजे ते लवकर पळेल. गजर झाल्याशिवाय्य उठणे ही शक्य नव्हते. आपण उठलो आणि त्या नंतर गजर झाला तर गजर वायाच गेला म्हणायची की. स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊन यावे. पण उगाच पाणी घेताना ओट्यावरचे काहीतरी भांडे वगैरे खाली पडले की आईला जाग येईल. ट्रीप रद्द म्हणेल ती.
डोक्यावर पांघरून घेवून तसाच पडून राहीलो. हलकेच कधीतरी झोप लागली असावी. जाग आली तेंव्हा वार्याचा जोरात आवाज येत होता. आता झोप येणे शक्यच नव्हते. अंथरुणावर पडून रहाणेही शक्य नव्हते. पाटणची आज्जी तीला जाग येईल तेंव्हा उठायची भल्या पहाटे गजर न लावतासुद्धा. आणि लवकर उठून आंघोळ करून आवरून घ्यायची. आपणही तसेच करुया का? एखाद दिवशी आंघोळ लवकर झाली म्हणून काय झाले. दार लावल्यावर बाथरुममधला दिव्याचा उजेड बाहेर तसाही येत नाही. आईला जाग यायचा प्रश्नच येणार नाही.
उठलो. अंथरुणाची घडी घातली. आणि टॉवेल पंचा घेवून थेट आंघोळीला गेलो. गरम पाणी तरी कशाला हवंय. गार पाण्यानेच करुया आंघोळ .
बादली पाण्याने भरली. ताम्ब्यात पाणी घेतले आणि तांब्या थेट डोक्यावर उपडा केला. छातीत एकदम दाटून आलं. श्वास थांबला. एकदम धडधड वाढली. पाणी खूपच गार होते. पहिला ताम्ब्या काहीही विचार न करता थेट डोक्यावर घेतला होता ते बरे झाले. त्यामुळे पुढची आंघोळ सोपी झाली. साबण लावून आणखी आठदहा तांब्य पाणी अंगावर घेतले. टॉवेल ने अंग कोरडे केले आणि बाहेर आलो. बाहेरच्या खोलीत जाऊन कपडे बदलले. भिंतीवरच्या घड्याळात किती वाजले ते दिसत नव्हते म्हणुन दिवा लावला. घड्याळात रात्रीचे साडेतीन वाजत होते. घड्याळ बंद पडलेय की कसे म्हणून अगदी जवळ जाऊन पाहिले तर त्याच्या आवाज येत होता. ते चालूच होते.
मी सकाळ समजून बराच लवकर जागा झालो होतो. आणि रात्री तीन वाजता अंघोळ केली होती. आता यापुढे झोपणे शक्यच नव्हते. गजर होईपर्यंत तरी काहीतरी करुया म्हणून इंग्रजीचे पुस्तक काढले. सरांनी सांगितलेला धडा वाचून तरी पाहूया. काही समजलंच तर चांगलंच आहे. आणि आईने विचारलं काय करतो आहेस तर सांगता येईल की अभ्यास करतोय म्हणून. ती निदान ट्रीप तरी रद्द करणार नाही. ते ऐकून.
पुस्तक उघडले आणि वाचू लागलो.
"वन्स अपॉन अ टाईम. देअर लिव्हड अ किंग,......"
क्रमशः
प्रतिक्रिया
16 Jun 2019 - 12:40 am | टर्मीनेटर
दोसतार - २१ ?
छान लिहिताय पण विजुभाऊ खूप लहान भाग आहेत, कृपया दोन किंवा तीन भागांचा एक भाग करून प्रकाशित करा.
16 Jun 2019 - 12:18 pm | आनन्दा
असहमत आहे.
म्हणजे छान लिहिताय, पण अजून मोठे भाग नकोत. हे आहे हे बरोबर आहे.
16 Jun 2019 - 12:45 pm | आनन्दा
असहमत आहे.
म्हणजे छान लिहिताय, पण अजून मोठे भाग नकोत. हे आहे हे बरोबर आहे.
17 Jun 2019 - 9:54 am | विजुभाऊ
धन्यवाद
प्रयत्न करतो
15 Jul 2020 - 2:23 pm | चौथा कोनाडा
मस्त !
सहलीला जाण्यापुर्वीची मुलाचे विश्व सुंदर रंगवलेय !
तपकरीच्या पिशवीची स्टोरी भारीय .... :-)
15 Jul 2020 - 6:06 pm | चौथा कोनाडा
पुढील भाग :
दोसतार - २२