रविवारचा दिवस होता आणि सवयीप्रमाणे इंग्लिश पेपरातले मेगॅ-क्रॉसवर्ड सोडवत बसलो होतो. हे सोडवणे म्हणजे डोक्याचा भुगा होतो. सगळे कोडे कधी सुटत नाही पण निम्मे सुटले तरी मी आनंद मानतो. या कोडयातले एक शोधसूत्र लक्षवेधी होते. ते असे:
‘ओलीस व्यक्तीस तिच्या अपहरणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम’
ओळखायचा शब्दसमूह तब्बल १७ अक्षरी (९+८) होता. अन्य उभ्या-आडव्या शब्दांच्या मदतीने त्यातला दुसरा शब्द Syndrome असा सुटला. पण पहिल्यातले फक्त पहिलेच अक्षर S एवढेच कळत होते. खूप वेळ जाम डोके खाजवले पण शेवटी थकलो. पण डोक्यात किडा वळवळत होता आणि जाम अवस्थ होतो. मग गेलो गुगलराजाला शरण. त्यावर S ने सुरु होणारे सिंड्रोम माझ्या पुढ्यात दाखल झाले. आता उत्तर सापडले होते - स्टॉकहोम सिंड्रोम ! अगदी कुतूहल वाटले या शब्दाचे. स्टॉकहोम ही तर स्वीडनची राजधानी. मग तिचे नाव या ‘अवस्थेला’ का बरे दिले असावे? मग झपाटल्यासारखे त्याबद्दल वाचून काढले. प्रकरण एकदम रंजक वाटले.
मानसशास्त्रातील या अनोख्या प्रकाराची ओळख झाली आणि स्वतःवर खूष झालो. एव्हाना या वाचनाने थकवा आला होता. जरा आळोखेपिळोखे देत होतो. तेवढ्यात कन्या जवळ आली. म्हणाली काय चहा हवाय वाटतंय. मी अर्थातच हो म्हणालो. मग चहा पिता पिता तिला या सिंड्रोमबद्दल उत्साहाने सांगू लागलो. तिच्या चेहऱ्यावर मला अधीरतेचे भाव दिसत होते. माझे बोलणे संपते ना संपते तोच ती म्हणाली, “अरे बाबा, मग तू नेटफ्लिक्स वरची Money Heist ही मालिका पहिलीच पाहिजेस, अगदी मस्ट- वॉच. या सिंड्रोमवरच आधारित आहे”. आता माझे कुतूहल अधिकच चाळवले गेले. मग पुढचे दोन आठवडे ही मालिका अगदी अधाशीपणे पाहत होतो. एकदम गुंगवून ठेवणारी. खूप आवडली हे सांगायला नकोच. माझ्या मुलीने त्या मालिकेचा ३ दिवसात फडशा पाडला होता हे ऐकून तिचा हेवा वाटला.
नंतर कधीतरी जालशोध घेत असता अचानक ‘मदारी’ हा हिंदी चित्रपट गवसला. गमतीचा भाग म्हणजे यातही या सिंड्रोमची संकल्पना घेतली आहे. म्हणजे चित्रनिर्मात्यांना भुरळ पडावी असा हा विषय दिसतोय. इथल्या वाचकांना तो रंजक वाटेल या आशेने मी तो लेखनास निवडला आहे. आता या लेखात आधी स्टॉकहोम सिंड्रोमचा परिचय आणि नंतर ती मालिका आणि त्या चित्रपटाची थोडक्यात माहिती देतो.
स्टॉकहोम सिंड्रोम
समजा काही गुंडांनी काही निरपराध माणसांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले आहे. मुळात या गुंडांचे त्या ओलीसांशी काहीच वाकडे नसते. स्वतःच्या काही मागण्या अन्य कोणाकडून तरी मान्य होण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेले असते. यात सुरवातीस ओलीस खूप घाबरतात. त्यांच्या मनात या गुंडांबद्दल घृणा निर्माण होते. पण जसा ओलीसपणाचा कालावधी वाढत जातो तसे त्यांची मानसिक प्रक्रिया बदलते. एव्हाना त्यांना कळले असते की हे गुंड त्यांना कुठलीच इजा करत नाहीयेत आणि खाऊपिऊ पण घालताहेत. पण आपण जर त्यांच्या तावडीतून पळायचा प्रयत्न केला तर मात्र ते आपला जीव घेतील, हे स्पष्ट असते. त्यामुळे ओलीस शांत बसणे पसंत करतो. पुढे जसा हा कालावधी वाढत जातो तसे ओलीस आणि ते गुंड यांच्यात एक भावनिक बंध निर्माण होऊ लागतो. यामागे काही कारणे असतात. एकतर हे दोन्हीही गट बाहेरच्या समाजापासून दूर असे कोठडीत बंदिस्त असतात. या अति निकट संपर्कातून ओलीसाच्या मनात त्या गुंडांबद्दल काहीशी कणव उत्पन्न होते. काही व्यक्तींच्या अपहरण प्रसंगी जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्याला स्टॉकहोम सिंड्रोम असे म्हणतात.
आता या मानसिक प्रक्रियेला स्टॉकहोमचे नाव का दिले गेले हे समजण्यासाठी १९७३ मधील एक घटना जाणून घेऊ.
तेव्हा स्वीडनच्या तुरुंगातील एक कैदी पॅरोलवर सुटला होता. त्याचा अन्य एक साथीदार तुरुंगात होता. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी याने स्टॉकहोममधील एका मोठ्या बँकेवर दरोडा घालून तिथल्या ४ कर्मचाऱ्यांना पकडून ओलीस ठेवले. एकूण ६ दिवस हे लोक ओलीस होते. नंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. पुढे त्या अपहरणकर्त्याच्या विरोधात न्यायालयात खटला उभा राहिला. आता पोलिसांनी त्या ४ लोकांना साक्षीदार म्हणून तयार केले. पण आता त्या चौघांनी त्या गुंडाच्या विरोधात साक्ष द्यायला चक्क नकार दिला. उलट त्याच्या बचावासाठी ते पैसे जमवू लागले !
त्यांच्या अशा विचित्र वर्तनाने पोलीस चक्रावून गेले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांचे मन वळवायचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी पोलिसांनी Nils Bejerot या मनोविकारतज्ञाला पाचारण केले आणि त्याची मदत मागितली. त्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून त्या व्यक्तींच्या अवस्थेला स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव दिले. या घटनेनंतर अपहरणाच्या अन्य काही घटनांचाही अभ्यास करण्यात आला आणि त्यापैकी काहींत अशाच स्वरूपाचा अनुभव आलेला दिसला. त्यातून मानसशास्त्रज्ञांना अशा अवस्थेचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांच्या अभ्यासातून ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाले. या मनोवस्थेची काही वैशिष्ट्ये अशी आहेत:
१. या अवस्थेचे मूळ माणसाच्या जिवंत राहण्याच्या अंतःप्रेरणेत दडले आहे.
२. जेव्हा अपहरणकर्ता ओलीसास ठार मारणार नाही याची ग्वाही देतो तेव्हा ओलीसाच्या मनात त्याच्याबद्दल नकळत कृतज्ञता दाटून येते.
३. काही झाले तरी आपण मरणार नाही अशी ओलीसाची खात्री झाली की त्याच्या मनातला अपहरणकर्त्याबद्दलचा द्वेष मावळू लागतो.
४. काही वेळेस अपहरणकर्त्याच्या ज्या मागण्या असतात त्या योग्य आहेत असे ओलीसासही तात्त्विकदृष्ट्या पटते. त्यातून त्या दोघांत एक भावबंध निर्माण होतो. त्यातून ओलीसाचा पोलीस अथवा सरकारबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. विशेषतः जेव्हा अपहरणकर्ता आणि ओलिसांचे कुठलेच वैयक्तिक शत्रुत्व नसते तेव्हा ही भावना अधिक बळावते.
५. ही अवस्था स्त्रियांमध्ये तुलनेने अधिक दिसून येते.
६. काही प्रसंगात तर अपहरणकर्त्याच्या मनात देखील त्याच्या ओलिसाबद्दल प्रेमभावना निर्माण होते.
अशा या वैशिष्ट्यपूर्ण सिंड्रोमचा मानसशात्रात सतत अभ्यास चालू आहे. आता ही संकल्पना फक्त अपहरणासंदर्भातील गुन्ह्यापुरतीच मर्यादित नाही. अन्य काही प्रकारच्या गुन्ह्यांतही तिची नोंद झाली आहे. हे गुन्हे खालील प्रकारचे आहेत:
१. घरगुती हिंसाचार
२. धार्मिक अथवा पंथीय विद्वेष
३. युद्धकैद्यांचे अत्याचार
४. बलात्कार आणि सक्तीचा वेश्याव्यवसाय
५. बाल-लैंगिक अत्याचार.
६. रॅगिंगचे गुन्हे
अशा गुन्ह्यांतील पिडीत व्यक्तीस काही वेळेस संबंधित गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अर्थात त्यामुळे गुन्हेगारास शासन मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात हा यातून उद्भवलेला एक मोठा सामाजिक तोटा आहे.
कित्येकदा बलात्काराच्या प्रकरणात पिडीत स्त्रीला आपला जीव वाचल्याचे समाधान इतके असते की त्यापुढे ती तो अत्याचार मुकाटपणे सहन करते.
अपहरणाच्या प्रकरणांत जेव्हा ओलिसांची सुखरूप सुटका होते त्यानंतर मात्र त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला जाणवतो. अर्थातच त्याची तीव्रता ओलीसपणाच्या कालावधीवर अवलंबून असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी बरेचदा मानसिक समुपदेशनाची गरज भासते. आता कित्येकदा त्यांना अपराधी वाटू लागते. तेव्हा “केवळ जीव वाचवण्यासाठीच तुम्ही त्या गुंडाबद्दल प्रेम व सहानुभूती दाखवलीत”, असे त्यांना पटवून द्यावे लागते.
...
...
स्टॉकहोम सिंड्रोमच्या संकल्पनेची अनेक चित्रनिर्मात्यांना भुरळ पडली आहे. त्यावर आधारित काही चित्रपट व जालमालिका लोकप्रिय झाल्या आहेत. त्यापैकी ज्या दोन कलाकृती मी पाहिल्यात त्यांचा आता परिचय करून देतो.
Money Heist (हाइस्ट) ही मुळातली स्पॅनिश टीव्हीमालिका. त्याचे इंग्लिश रुपांतर नेटफ्लिक्सवर पाहण्यास उपलब्ध आहे. ही बऱ्यापैकी स्टॉकहोममधील बँक दरोड्यावर आधारित वाटते. ‘हाइस्ट’ म्हणजे दरोडा. यात स्पेनच्या राजधानीतील चलनछपाईच्या छापखान्यावर धाडसी सशस्त्र दरोडा टाकला जातो. या गुन्ह्याचा सूत्रधार एक बुद्धिमान पुरुष असून तो स्वतःला ‘प्रोफेसर’ म्हणवतो. तो निरनिराळ्या ठिकाणांहून ८ ‘हटके’ जणांना गाठून आणतो आणि त्यांची एक टोळी बनवतो. तो त्यांना सांगतो की दरोड्यादरम्यान आपली २ मूलभूत तत्वे असतील:
१. आपण कुठल्याही ‘व्यक्ती’चा पैसा लुबाडणार नाही आहोत. आपण त्या छापखान्यावर दरोडा टाकून तिथे पूर्णपणे नव्या युरोच्या नोटा छापणार आहोत, आणि
२. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खूनखराबा करायचा नाही. एकाही ओलीसास थोडी सुद्धा इजा होता कामा नये.
दरोड्याचा कार्यक्रम अत्यंत विचारपूर्वक ठरवला जातो. या टोळीचे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. ते दरोडा टाकतात आणि तिथल्या ६७ कर्मचाऱ्यांना अकरा दिवस ओलीस ठेवतात. या कालावधीत ही टोळी आणि ओलीस यांच्या दरम्यान जी दोन प्रेमप्रकरणे निर्माण होतात त्यांचा पाया या सिंड्रोमवर उभारला आहे. त्यापैकी एकात ओलीसांतील एक स्त्री त्या टोळीतील एकाच्या प्रेमात पडते आणि चक्क टोळीला सामील होते. तर दुसऱ्यात या प्रकरणाचा तपास लावणारी पोलीस स्त्री नकळत खुद्द त्या ‘प्रोफेसर’च्याच प्रेमात पडते. या उत्कंठावर्धक सुंदर मालिकेबद्दल अधिक लिहून रहस्यभेद करीत नाही. इच्छुकांनी जरूर पहावी.
.............
‘मदारी’ हा निशिकांत कामत दिग्दर्शित आणि इरफानची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट. यात इरफानने ‘निर्मल’ची भूमिका केली आहे. त्याचा मुलगा एक पूल कोसळून झालेल्या अपघातात मरण पावला आहे. तो पूल निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच कोसळला होता. त्या बांधकामास राज्याच्या गृहमंत्र्यांसकट अनेक सरकारी मंडळी जबाबदार होती. उद्विग्न झालेला निर्मल याचा सूड घेण्यासाठी गृहमंत्र्यांच्या मुलाचे अपहरण करतो. खूप काळ तो लपून राहतो. त्या दरम्यान रोहन व त्याच्यात एक मैत्रीपूर्ण नाते तयार होते.
पुढे निर्मल रोहनच्या सुटकेच्या बदल्यात त्याची ‘मागणी’ जाहीर करतो. ती म्हणजे गृहमंत्र्यांसह त्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जाहीरपणे त्यांच्या ‘खाबूगिरीची’ कबुली द्यायची आणि त्याचे थेट टीव्ही प्रक्षेपण होईल. अखेर ती मागणी मान्य होते आणि तो रोहनला सोडून देतो. त्या प्रसंगी रोहन त्याच्या वडिलांकडे जाण्यापूर्वी निर्मलला प्रेमाने घट्ट मिठी मारतो. हा प्रसंग या सिंड्रोमचेच निदर्शक म्हणता येईल. निर्मलने रोहनचे अपहरण करण्याचे कारण रोहनला मनापासून पटलेले आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल त्याच्या मनात तिडीक उठलेली आहे.
.........
......
तर असा हा कुतूहल वाटावा असा स्टॉकहोम सिंड्रोम. दोन चित्रकृतींच्या निमित्ताने मला त्याची ओळख तुम्हास करून द्यावी वाटली. प्रतिसादांचे स्वागत !
*************************************
प्रतिक्रिया
16 Jan 2019 - 2:59 pm | आंबट गोड
याच सिंड्रोम वर आधारीत आलीया भट चा हाय वे सिनेमा पण होता.
16 Jan 2019 - 3:01 pm | शाम भागवत
ओळख आवडली
16 Jan 2019 - 3:40 pm | श्वेता२४
तुमचे लेख नेहमीच वेगळे, माहितीपूर्ण व साध्या सोप्या भाषेत असतात. खूप आवडला लेख
17 Jan 2019 - 12:55 pm | Nitin Palkar
हेच म्हणतो.....___/\__
16 Jan 2019 - 4:47 pm | कुमार१
मनापासून आभार !
यावर आधारित अन्य चित्रकृती कोणी पहिल्या असल्यास त्यावर जरूर लिहा.
16 Jan 2019 - 5:07 pm | गवि
उत्तम विषय आणि मांडणी.
यामध्ये ओलीस व्यक्ती (victim) हिला अपहरणकर्त्याविषयी वाटणाऱ्या भावना कणव, दया किंवा सहानुभूती या गटापेक्षाही त्याच्याकडे असलेली absolute superiority , पॉवर, आपलं जगणं मरणं त्याच्या हाती असणं या प्रकारच्या असून त्यापोटी आपला जीव वाचवणारी व्यक्तीदेखील हीच (तूच तारक मारक) अशा विचारातून आकर्षण उत्पन्न होत असावं असं वाटतं. (भयजन्य).
याचं कारण असं की ओलीस असण्याच्या काळात स्वतःखेरीज अन्य ओलिसांपैकी काहींची हत्या, छळ इत्यादि अत्यंत unjustifiable गोष्टी अपहरणकर्त्यांनी केल्या आणि तरीही त्यांच्याविषयी आकर्षण, कृतज्ञता, समर्थन मनात राहिलं (किमान निरोप घेताना) असं अनेक केसेसमध्ये घडतं.
16 Jan 2019 - 5:48 pm | कुमार१
अशा विचारातून आकर्षण उत्पन्न होत असावं असं वाटतं. (भयजन्य).>>>>>+११
16 Jan 2019 - 6:31 pm | टर्मीनेटर
सहज कुतूहल म्हणून या सिंड्रोम वर आधारीत चित्रपटांचा शोध घेतला तर Movies with Stockholm Syndrome theme हि यादी imdb वर सापडली.
यातले काही आधी बघितले आहेत पण कथानक कशावर आधारित आहे त्याचा संदर्भ आज लागला :)
माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!
16 Jan 2019 - 6:41 pm | कुमार१
जबरी लांब यादी आहे ती !
धन्यवाद
16 Jan 2019 - 9:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक विषय आणि सुंदर मांडणी !
16 Jan 2019 - 11:07 pm | बाप्पू
इंटरेस्टिंग विषय. बॉलीवूड मध्ये बऱ्याच सिनेमात नायिकांना हा सिंड्रोम होतो...
17 Jan 2019 - 1:48 pm | Chandu
Tere naam.by Salman and bhumika
17 Jan 2019 - 7:45 am | वन
तुमचे लेख नेहमीच वेगळे, माहितीपूर्ण व साध्या सोप्या भाषेत असतात. >>>>> +१
अर्थात त्यामुळे गुन्हेगारास शासन मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात हा यातून उद्भवलेला एक मोठा सामाजिक तोटा आहे. >>> +१
17 Jan 2019 - 7:54 am | चामुंडराय
लिखाण आवडल.
या बद्दल आधी कुठेतरी वाचलं होतं हे आठवतंय परंतु नक्की काय हे माहित नव्हतं.
आता मदारी बघणे मस्ट !
17 Jan 2019 - 8:08 am | ट्रम्प
छान लेख !!!
पूर्ण लेख वाचून काढला आधशा सारखा !! स्वीडन ची केस खूपच इनट्रेस्टिंग वाटली .
पण अजुन थोड़ी स्वीडन केस ची माहिती द्या ना , पुढे काय झाले ? ते चार जण आणि त्या दोघांचे पुढे काय झाले?
17 Jan 2019 - 11:17 am | कुमार१
@ ट्रम्प,
ती कथा रंजक आहे. एकून ६ दिवस अपहरणकर्ते व ओलीस अगदी प्रेमाने तिथे राहत होते. नंतर पोलिसांनी आत अश्रुधूर सोडला आणि अपहरणकर्ते शरण आले. तिथून बाहेर पडताना दोन्ही गटांनी मिठ्या मारल्या व चुंबनेही घेतली ! नंतर अपहरणकर्त्यांना पुन्हा तुरुंगात टाकले गेले. तेव्हा पूर्वीचे ओलीस त्याना तिथे चक्क भेटायला जात होते. मुख्य अपहरणकर्त्याने शिक्षा संपवून बाहेर आल्यावर S Synd.
या नावानेच आत्मचरित्र लिहीले.
17 Jan 2019 - 7:27 pm | वन
दोन्ही गटांनी मिठ्या मारल्या व चुंबनेही घेतली ! >>>>
हद्द झाली बुवा ! हे खरे आहे की एखादी मालिकाच बघतोय असे वाटू लागले ☺️
17 Jan 2019 - 8:44 am | लई भारी
रोचक आहे! छान लिहिलंय तुम्ही!
माझ्या पण डोक्यात 'हायवे' चित्रपट आला होता, पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे :)
अलीकडेच 'अपहरण' ही हिंदी वेब-सिरीज पाहिली त्यात पण हा सिंड्रोम दिसतोय. (बरी आहे सिरीज)
Money Heist बघायला हवी!
17 Jan 2019 - 9:17 am | कुमार१
आभार !
मदारी व money h जरूर बघा.
वन, सहमत आहे.
ट्रम्प, ती दरोडा फसला होता एवढे माहीत आहे. अजून शोधतो.
17 Jan 2019 - 10:05 am | कुमार१
स्टॉकहोम सिंड्रोमच्या विरुद्ध एक अवस्था असते. त्याला ‘लिमा’ सिंड्रोम म्हणतात. यात अपहरणकर्त्याना त्यांच्या ओलिसांबद्दल दया वाटू लागते !
ह्या सिंड्रोमची कथा अशी. ‘पेरू’ची राजधानी लिमा येथे १९९६मध्ये काही दहशतवाद्यांनी जपानी दूतावासावर धाड घालून महत्वाच्या लोकांना ओलीस ठेवले होते. पण नंतर त्यांचे मन द्रवले आणि त्यांनी ओलीसंना चक्क सोडून दिले.
अपहरणाच्या काही घटनांत स्टॉकहोम व लिमा हे दोन्ही सिंड्रोम एकत्रही अनुभवास येतात.
17 Jan 2019 - 10:38 am | गवि
खूप खूप पूर्वी नाना पाटेकर, पल्लवी जोशी असा एक ओलीसनाट्य आधारित सिनेमा आला होता. कोणाला आठवतो का? सुपरहिट नसावा पण उत्कृष्ट होता. पल्लवी जोशीचं पात्र अपंग असतं आणि तिच्या घरातच घुसून तिला एकजण ओलीस ठेवतो. नाव पटकन आठवत नाही.
17 Jan 2019 - 10:44 am | विजुभाऊ
अंधा युद्ध. https://en.wikipedia.org/wiki/Andha_Yudh
17 Jan 2019 - 11:06 am | गवि
येस.
धन्यु विजुभौ..
17 Jan 2019 - 10:09 pm | मालविका
मला पण अगदी हाच सिनेमा आठवा फक्त नाव मलाही आठवत नव्हतं . खूप वर्षांपूर्वी बघितला होता .
17 Jan 2019 - 2:18 pm | महासंग्राम
मणिरत्नम चा रावण पण याच कॅटेगरीत येतो.
17 Jan 2019 - 8:21 pm | अथांग आकाश
रोचक माहिती! मदारी बघितला आहे money h बघतो!
17 Jan 2019 - 8:39 pm | कुमार१
बऱ्याच दिवसांनी तुमची खास 'मुद्रा' इथे उमटली आहे. धन्यवाद !
... कोण आहेत ते फोटोतले सद्गृहस्थ ? ☺️
17 Jan 2019 - 9:39 pm | अथांग आकाश
>>>कोण आहेत ते फोटोतले सद्गृहस्थ ? >>>
काही कल्पना नाही बुवा :-) मी आपला https://giphy.com/ या site वर जातो आणि विषयाला धरून इमेज सर्च करतो व इथे चिटकवतो.
17 Jan 2019 - 10:59 pm | शलभ
तुमचं सगळंच लेखन भारी असतं. मस्त लेख.
18 Jan 2019 - 10:23 am | वन
Money Heist बघायला सुरवात केली आहे.मस्त थ्रिलर आहे.
त्या ‘प्रोफेसर’च्या टोळीतील पात्रांना मोठ्या शहरांची नावे दिली आहेत – टोकियो, मॉस्को, बर्लिन, नैरोबी, इ.
हे मजेदार वाटते.
18 Jan 2019 - 10:13 pm | ट्रेड मार्क
एकदम मस्त मालिका आहे. काय बघावं असा शोध घेता घेता ही मालिका सापडली आणि मग अधाश्यासारखी बघून काढली. प्रोफेसर भारी आहे आणि त्यातील इतर पात्र सुद्धा मस्त आहेत.
19 Jan 2019 - 7:38 am | कुमार१
सर्वांचे आभार!
वन आणि ट्रे मा। >>>>+१
मालिकेत शेवटी प्रोफेसर त्याच्या नव्या नोटा छापण्याचे जे समर्थन देतो ते अफलातून आहे.
20 Jan 2019 - 4:13 am | ट्रेड मार्क
ते स्पष्टीकरण खरंच मस्त आहे. अजून एक म्हणजे Bella ciao हे गाणं पण मला आवडलं.
कठीण परिस्थितीतही मानवी भावभावना मस्त दाखवल्या आहेत.
20 Jan 2019 - 8:56 am | कुमार१
@ट्रे मा,
सहमत. एक सूचना.तुमची ही मालिका पाहिल्याची आठवण ताजी असेल तर त्यावर वेगळा धागा जरूर काढा.
त्या ‘प्रोफेसर’ चे जे अजब अर्थशास्त्र आहे ते छान काथ्याकूट चा विषय आहे !
M H च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. २ मोसमात झालेल्या तिचा तिसरा मोसम या वर्षी येणार आहे.
19 Jan 2019 - 10:58 am | सुधीर कांदळकर
अनेक सत्य घटनातील पात्रांच्या वागण्यातले कोडे उलगडले. नानांचा तो अप्रतिम चित्रपट मी देखील पाहिला आहे. एका सुरेख, सुरेख लेखाबद्दल अनेक धन्यवाद.
रच्याकने काही वेगळे ओलीसः
आपले एक आय ए अस अधिकारी फुलपाखरांच्या अभ्यासाठी ईशान्य भारतात गेले असतांना त्यांचे उल्फा अतिरेक्यांनी अपहरण केले होते. काही आठवडे त्यांची फरफट केल्यावर त्यांना सोडून दिले. या अनुभवांवर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अतिरेक्यांबद्दल सौम्य भाषा वापरली आहे आणि दोनतीन दिवस हाल केल्यावर चांगली वागणूक दिल्याचे लिहिले आहे.
कवी निरंजन उजागरे यांना पण ईशान्य भारतातल्या अतिरेक्यांनी पकडले होते. हा माणूस कवी आहे आणि याला सोडायला कोणीही पैसे मोजणर नाही हे समजल्यावर सोडून पण दिले.
12 Jan 2022 - 3:14 pm | Trump
मराठी कवी, तो काय कमावणार!!!
19 Jan 2019 - 11:33 am | कुमार१
हा माणूस कवी आहे आणि याला सोडायला कोणीही पैसे मोजणर नाही हे समजल्यावर सोडून पण दिले. >>>>
‘कवी’ वरून विजय तेंडूलकरांच्या ‘बोटभर काव्य विचार’ या लेखाची आठवण झाली. त्यात एका प्राध्यापकांचे कवीबद्दल मत दिले आहे. ते म्हणतात, ““सगळे कवी एका बोटीत बसवून ती समुद्रात बुडवली, तर समाजाचे काहीही अडणार नाही” !
धन्यवाद !
19 Jan 2019 - 7:13 pm | बबन ताम्बे
खूप वर्षांपूर्वी काश्मिरी अतिरेक्यांनी एका सरकारी उच्चंपदस्थाचे अपहरण केले होते. नन्तर त्यांची सुटका झाली. अपहरण कालावधीत अतिरेक्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली होती असे त्यांचे म्हणणे होते. सुटल्यांनंतर ते भाषणे पण देत होते. त्यांचे नाव आठवत नाही .
20 Jan 2019 - 8:35 am | तुषार काळभोर
रामाने (किंवा धोब्याने) सीतेवर संशय घेण्याचे हे पण एक कारण असू शकेल.
20 Jan 2019 - 9:29 am | कुमार१
तुमचा कल्पनाविलास लै भारी बुवा ☺️
21 Jan 2019 - 12:36 pm | वन
वरील मुद्द्यावरून ...
मागे एकदा पाहिलेला जुही चावलाचा सिनेमा (?नाव) आठवला. त्यात तिच्यावर एकजण बलात्कार करतो. पुढे कोर्ट त्याला शिक्षा सुनावते. पण जुही तिच्या भाषणात कोर्टाला सांगते की त्याला तुम्ही शिक्षा दिलीत हे ठीक. पण आता आपल्या समाजात माझ्याशी कोण लग्न करणार? म्हणजे तुम्ही एक प्रकारे मलाच अप्रत्यक्ष शिक्षा दिलीत.
त्यावर न्यायाधीश त्या आरोपीला तिच्याशी लग्न करण्याची शिक्षा देतात व सिनेमा संपतो.
21 Jan 2019 - 4:25 pm | अनिंद्य
हा येडचापपणा उत्तर भारतात प्रत्यक्षातही भरपूर चालतो, विशेषतः खाप पंचायतींच्या न्यायालयात :-(
21 Jan 2019 - 4:26 pm | अनिंद्य
@ कुमार१,
रोचक लेखन आणि प्रतिक्रिया.
स्टोकहोमच्या विरुद्ध लिमा सिंड्रोम पहिल्यांदाच माहित झाला
21 Jan 2019 - 4:57 pm | कुमार१
आभार आणि वरील मुद्द्यावर सहमती.
तुमचा प्रतिसाद आल्याने आता सिंड्रोम ची सांगता झाली ☺️
21 Jan 2019 - 8:03 pm | शेखरमोघे
कठिण विषयावर छान सोप्या शब्दात माहिती दिल्याबद्दल अभिनन्दन!
7 Jun 2019 - 10:46 am | कुमार१
नवरा-बायको या नात्यातील 'स्टॉकहोम सिंड्रोम' अनुभवायचा असेल तर ‘The Wife’ हा चित्रपट जरूर बघा. NF वर उपलब्ध आहे.
कथानक थोडक्यात लिहितो. ज्यांना हे वाचण्यापूर्वी आधी बघायचा आहे त्यांच्यासाठी रहस्यभेद इशारा..........
......यातील नवऱ्याला साहित्यातील ‘नोबेल’ जाहीर झालेले आहे. तो अगदी खुशीत आहे. पण त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर मात्र खिन्नता आहे.
तर अंदरकी बात अशी आहे...
ती बायको खरे तर नवर्यापेक्षा उत्तम लेखिका आहे. किंबहुना त्याच्या बहुतेक कथांची बीजे तिनेच रोवली आहेत. लेखनकष्टाचे काम त्याने तिच्याकडून सक्तीने करवून घेतले आणि पुस्तके मात्र त्याच्याच नावावर प्रसिद्ध होत राहिली.
शेवटी त्याने नोबेल स्वीकारल्यानंतर दोघांचे कडाक्याचे भांडण होते. परिणामी त्याला हृदय-झटका येतो आणि त्याचा अंत होतो. नंतर एक पत्रकार-लेखक तिच्याशी संपर्क करतो आणि आता त्याला एक पुस्तक लिहून त्या जोडप्याचे खरे सत्य बाहेर आणायचे असते. तेव्हा मात्र ती त्याला स्पष्ट खडसावते, ‘ जर का तू असे काही केलेस तर मी तुला न्यायालयात खेचीन !”.
.... शेवटी तो लेखक तिचा नवराच होता ना. तिला त्याच्याबद्दल सहवासातून प्रेमच वाटत आलेले आहे, असेच चित्रपटातून सूचित होत आहे !
7 Jun 2019 - 12:49 pm | मराठी कथालेखक
अमृता प्रीतमच्या कादंबरीवर आधारीत पिंजर हा चित्रपट काहीसा या सिंड्रोमवर बेतला आहे असे म्हणता येईल.
अपहरणकर्त्या मनोज वाजपेयीलाच अपहृत उर्मिला मातोंडकर अखेर आपलंसं मानते.
काहीसा असं म्हणण्याचं कारण की
एक तर हे अपहरण एका सूडापोटी झालेलं असतं आणि मनोज वाजपेयी मुळातून वाईट नसतो.
दूसरं असं की आता कुणी आपली सूटका करणार का आणि सूटका झाली तरी आपलं कुटूंब आपल्याला स्वीकारेल का या अनिश्चिततेतून 'जे आता आहे तेच आपलं' मानावं या भूमिकेपर्यंत तिचा प्रवास होतो. तिचं ज्याच्याशी आधी लग्न ठरलेलं असतं तो संजय सूरी दीर्घकाळ तिची वाट बघतो आणि तिचा स्वीकार करण्यास तयार असतो पण हे तिला फार उशीरा कळतं तोवर तिच्या मनाची तयारी झालेली असते.
झालंच तर उर्मिलाचा भाऊ मनोज वाजपेयीच्या शेतांना आगी लावतो, मनोजला हे समजतं पण तरी तो तक्रार न करता गप्प बसतो कारण तिच्या भावाने हे सूडापोटी केलेलं आहे हे समजून तो त्याला माफ करतो. या घटनेचाही उर्मिलाच्या मनावर परिणाम होतो.
चांगला चित्रपट आहे हा.. थोडा लांबलचक आणि संथ वाटला तरी चांगला आहे. मी फक्त एकदाच थिएटरमध्ये पाहिला होता (जेव्हा तो रिलीज झाला होता) पुन्हा बघणे झाले नाही पण तरीही बर्यापैकी आठवतो.
7 Jun 2019 - 1:12 pm | कुमार१
चांगला चित्रपट आहे हा.. >>>>+ १११
7 Jun 2019 - 5:00 pm | स्मिता.
मीसुद्धा ही मालिका जाग-जागून बघून काढली. मधे थांबणे जिवावर येत होते. :)
प्रोफेसरचे पात्र आवडले. Bella ciao गाणे तर मस्तच!
स्पाॅयलरः
संपूर्ण मालिका बघतांना मजा आली पण शेवट फारसा आवडला नाही. इन्पेक्टरचे वागणे तिच्या आधीच्या व्यक्तिमत्व चित्रणाला साजेसे वाटले नाही. कदाचित वास्तविक आयुष्यात कोणीही तसेच वागेल पण हिंदी चित्रपटांवर पोसलेल्या माझ्या मनाला ते पटले नाही ;)
7 Jun 2019 - 5:42 pm | कुमार१
MH चे २ मोसम झालेले असले तरी ती अजून अर्धवट आहे !
येत्या १९ जुलै पासून तिसरा मोसम सुरु होत आहे.
बघूया, त्यात बहुसंख्यांना आवडणारा शेवट करतात का !!
7 Jun 2019 - 6:29 pm | स्मिता.
पुढचा भाग येणार हे माहित होतंच. आता 19 जुलैपासून बघू पुढे काय होतंय.
7 Jun 2019 - 6:29 pm | स्मिता.
पुढचा भाग येणार हे माहित होतंच. आता 19 जुलैपासून बघू पुढे काय होतंय.
8 Jun 2019 - 10:58 pm | nishapari
खूप छान लिहिलं आहे
10 Jun 2019 - 4:20 pm | जॉनविक्क
सुभाष घई यांचा हिरो चित्रपट देखिल याच पठडीतला आपण म्हणू शकतो.
21 Jul 2019 - 6:54 pm | स्मिता.
ला कासा द पापेल म्हणजेच मनी हाईस्टचा पुढचा भाग आलाय!!
21 Jul 2019 - 7:00 pm | कुमार१
नाव मस्त आहे. बघणे आठवडाभरानेच शक्य होईल.
कशी वाटतेय प्रोफेसरची गँग ? ☺️
21 Jul 2019 - 7:37 pm | स्मिता.
आताच काही बोलणं स्पाॅयलर होईल :)
21 Jul 2019 - 10:15 pm | जॉनविक्क
बघूया यावेळी कोण चांगले वाटते ते
25 Jul 2019 - 5:40 pm | स्मिता.
बर्लिन आणि त्यानंतर प्रोफेसर ही पात्रं माझी आवडती. टोकिओचे पात्रंही छान रंगवले आहे, तिचा भावनिक चढउतार व्यवस्थित टिपला आहे.
कालच तिसरा भाग संपवला, कदाचित आणखी एक भाग येईल. Bella ciao गाण्याचा इतिहास बघता ही मालिका बनवण्यामागे फक्त व्यावसायीक हेतू असावा असं वाटत नाही.
25 Jul 2019 - 6:19 pm | कुमार१
स्मिता, सहमत.
टोकियोची भूमिका अगदी बिनधास्त अन बेधडक आहे. तुमच्या प्रतिसादाने माझी उत्सुकता चाळवली आहे पण अजून थोडा दम धरावा लागतोय.
तिसऱ्या भागात किती उपविभाग आहेत ?
रच्याकने….
The Wife पाहिलात की नाही ?
21 Jul 2019 - 10:58 pm | Rajesh188
तुमची ही पोस्ट मानवी मनाची अस्थिर वृत्ती दर्शवते,( जीव वाचवणे हा मूळ हेतू असतो .ती सहज वृत्ती आहे सर्व मध्ये,)
पण तुम्ही जे काही विविध प्रसंगाचे वर्णन केले आहे आणि त्यात मानवी स्वभाव उलगडून दाखवला आहे त्याला दुर्मिळ मध्ये दुर्मिळ म्हणता येईल .
सर्रास असे घडत नाही .
22 Jul 2019 - 5:47 am | कुमार१
जॉन, सहमत.
'बर्लिन' ची भूमिका Pedro Alonso ने जबरदस्त केली आहे. त्याचा तो थंड खुनशीपणा त्याच्या देहबोलीतून व्यवस्थित उतरला आहे. दिसायलाही तो राजबिंडा आहे.
3 Aug 2019 - 1:03 pm | कुमार१
MH चा तिसरा मोसम बघून संपविला. छान. पण मोसम-१ व २ इतकी उत्कंठा यावेळेस नाही वाटली. त्यांची दरोड्याची ठराविक पद्धत आता अंगवळणी पडली आहे !
कथा अर्धवटच ठेवल्याने चौथा मोसम येणार असे दिसतेय.....
3 Aug 2019 - 1:33 pm | जॉनविक्क
त्यांची मोड्सऑप ठरलेलीच आहे पण यावेळी गोष्टी 100% बिघड़णार आहेत.
3 Aug 2019 - 2:11 pm | कुमार१
आता लढाईला सुरुवात तर झाली !
14 Apr 2020 - 12:39 pm | कुमार१
“मुंबई पोलिसांनी घेतली ‘मनी हाईस्ट’च्या प्रोफसरची मदत”
मजेदार बातमी इथे:
https://www.loksatta.com/manoranjan-news/mumbai-police-took-help-of-mone...
14 Apr 2020 - 5:59 pm | स्मिता.
चौथा सिजन आलाय... माझं मत एवढ्यात सांगत नाही.
14 Apr 2020 - 7:15 pm | सतिश गावडे
पहीला आणि दुसरा सिझन झपाटून गेल्यासारखे पाहीले. प्रोफेसर आणि पोलीस यांच्यातील बौद्धिक लपंडाव, चोरांमधील आपापसातील भावनिक गुंतागुंत, प्रोफेसरने प्लान ठरवलेला असतानाही काही प्रसंगांमध्ये चोरांचे ताण तणावांना शरण जाऊन ठरवलेल्या प्लानच्या विपरीत वागणं, प्रसंगी परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणे सारं काही अफलातून लिहीलं आहे आणि कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे.
या सिरिजचे विकी पेज वाचल्यानंतर त्या टीमने किती मेहनत घेतली असेल याची कल्पना येते. हेच पेज वाचताना एक मजेशीर गोष्ट कळली ती म्हणजे ही सिरिज स्पॅनिश भाषेतील असली तरी तिचे शिर्षकगीत इंग्रजीत आहे. कारण या शिर्षकगीताच्या गीतकाराला ते इंग्रजीतच सुचले.
14 Apr 2020 - 7:34 pm | कुमार१
>>> आता नेफ्ली बंद केल्याने नाही बघू शकत.
तुमच्याकडून जाणून घेईन सावकाश !
.........
>>> रोचक. मस्त मालिका.
15 Apr 2020 - 9:16 am | चौकटराजा
मला आता जे खूप गंभीर अर्थ असेल तरच फॅन्टसी चित्रपट पाहायला आवडतात जसे " चार्लीज चॉकलेट फॅक्टरी " बाकी सुपरमेन बॅटमॅन , स्पायडरमेन ड्रॅक्युला असले चित्रपटना मी कधीच गुडबाय केला आहे . काल मला एक चित्रपट आवडला " टीनएज बँक हेस्ट " व त्याच बरोबर " हॅकर " दोन्ही चे कथानक , अभिनय ,प्रिंट ऑडिओ चांगले आहेत . दोन्ही यु ट्यूब वर आहेत .
१ हॅकर " https://www.youtube.com/watch?v=rf3-L5Pzh9s&t=130s
२. टीनएज बँक हेस्ट https://www.youtube.com/watch?v=41KimZRIMCI
30 Apr 2020 - 5:39 pm | प्रचेतस
तुम्ही लॉर्ड ऑफ द रिंग्स एक्सटेंडेड अवश्य बघा. बॅटमॅन फक्त ख्रिस्तोफर नोलनचे बघा.
15 Apr 2020 - 9:42 am | कुमार१
सुचवणीसाठी धन्यवाद.
सवडीने बघतो.
30 Apr 2020 - 5:33 pm | कुमार१
इरफान यांच्या निधनाने या लेखातील 'मदारी' ची तीव्रतेने आठवण झाली. निर्मलची भूमिका छानच !
तो पुन्हा बघणार हे नक्की.
.... आदरांजली .
2 May 2020 - 10:10 pm | बिपीन सुरेश सांगळे
खूपच छान लेख
तुमचे लेख नेहमीच छान असतात
एक डायलॉग आठवला
सैय्यादको बुलबुलसे प्यार हो गया
17 Aug 2020 - 5:38 pm | कुमार१
‘मदारी’चे दोन्ही शिल्पकार आता काळाच्या पडद्याआड.
आधी इरफान आणि आज निशिकांत कामत.
आदरांजली !
18 Aug 2020 - 5:52 am | सोत्रि
१९८२ सालचा शक्ती सिनेमा लीमा आणि स्टाॅकहोम ह्या दोन्ही सिंड्रोमवर आधारित आहे.
नारंगला ओलीस बाल विजयची कणव येऊन त्याला सुटकेची संधी देणं, लीमा सिंड्रोम आणि युवा विजयने नारंगसाठी काम करणं, स्टाॅकहोम सिंड्रोम!
- (बाॅलीवुडी सिंड्रोमची लागण झालेला) सोकाजी
18 Aug 2020 - 9:37 am | माहितगार
जुना धागा वर आलाय तेव्हा हे जुने स्टॉ़कहोम गाणे जरा एंजॉय करून बघा
18 Aug 2020 - 9:47 am | कुमार१
सोत्रि व मागा,
माहितीसाठी धन्यवाद !
छान गाणे
18 Aug 2020 - 6:01 pm | माहितगार
अनेक आभार, या निमीत्ताने पुन्हा एकदा नकोश्या वाटणार्या विषयावर चर्चा करतोय असे वाटण्याचा संभव आहे, पण अगदी गेल्या सहा वर्षांपुर्वी इराकात अपहृत केल्या गेलेल्या ३००० याझिदी स्त्रीयांचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही (अलिकडील संदर्भ वृत्त). एकवेळ अपहारकर्त्या मध्ययुगिनांच्या कागदोपत्री स्त्रीगुलामांच्या व्यापाराचे लैंगिक छळवणूकीचे, जबरदस्तीच्या लग्न आणि धर्मांतराचे दाखले मिळतील पण स्त्रीयांचा स्वतःचा ब्र ही निघताना दिसत नाही. एकाही पळवल्या गेलेल्या अथवा लैंगिक शोषण झालेल्या स्त्रीचा मुलगा साक्षर झाला नसेल का ? आणि त्यापैकी एकाही स्त्रीने आपली छळ गाथा नोंदवून घेऊ नये ? लैंगिक छळा विरुद्ध उठाव होणे दूरच नंतरच्या पिढ्या प्रश्नांकीत धर्मग्रंथांतील प्रश्नांकीत मांडणीचे समर्थन करताना दिसतात.
पाकीस्तान सारख्य तथाकथित स्वतंत्र देशात लोक आक्रमकांचीचे समर्थन करताना दिसतात असो.
18 Aug 2020 - 6:06 pm | माहितगार
गंमतीची गोष्ट म्हणजे अख्ख्या इराणचे ईस्लामीकरण जायदादींवर अंकुश आणून सक्तीने केले गेले, सुन्नी ते शिया असे अतंर्गत धर्मांतरणही बर्यापैकी क्रौर्याने राबवले गेले हे सगळे रेकॉर्डवर असूनही त्यांना त्याचे काहीही न वाटता ते त्याचे समर्थनच करताना दिसतात.
(अर्थात नवीन पिढ्यात इस्लामचा त्याग करणार्यांची सर्वाधिक संख्याही इराणमध्येच असल्याचे बोलले जाते, हे वास्तव आहे की पाश्चिमात्य प्रचारतंत्र ह्याची कल्पना नसली तरी त्यात तथ्य असावे असे वाटते.)
13 Jan 2022 - 7:27 am | निनाद
पहिली पीढी अंकल टॉम सिंड्रोम मध्ये असते. अंकल टॉम सिंड्रोम मध्ये धोक्याचा सामना करताना निष्क्रीयता आणि अधीनता वापरतात , ज्यामुळे त्यांचे खरे विचार आणि भावना लपवून ठेवतात. पुढे त्याचीच सवय होत जाते. पुढील पीढीला याची काहीच माहिती नसल्याने ते वरवरच्या वर्तनाला पाहतात आणि तेच घेऊन पुढे जातात.
18 Aug 2020 - 6:18 pm | कुमार१
लेखातील सिंड्रोमचे विविध अविष्कार दिसून येतात !
3 Sep 2021 - 7:42 pm | गॉडजिला
M H मध्ये स्टॉकहोम सिंड्रोम दाखवलेला तर आहेच पण सर्वात वेगळ्या प्रकारे... त्यासाठी तुम्हाला कथानकातील स्टॉकहोम उर्फ मोनिका व आर्तुरो रोमन यांची केमिस्ट्री बघावी लागेल :)
मदारी देखील छान होता
3 Sep 2021 - 7:52 pm | कुमार१
अगदी सहमत !
4 Sep 2021 - 12:37 pm | कुमार१
मनी हाइस्ट : ५
काय आहे ‘बेला चाओ’ या गाण्याचा अर्थ ? संपूर्ण देशाला पडलाय प्रश्न, पाहा Google ची आकडेवारी.
https://www.loksatta.com/manoranjan-news/what-is-meaning-of-bella-ciao-s...
5 Sep 2021 - 12:56 am | गॉडजिला
गोरे गोरे ओ बांके छोरे कभी मेरे गली आया करो… बेला चाओ चि चाल ढापलि आहे
8 Sep 2021 - 7:05 pm | कुमार१
गाण्याचा मराठी अवतार !
https://youtu.be/oQoz8OgkQoc
4 Sep 2021 - 8:47 pm | गॉडजिला
Real money heist is done by those who have watched it without subscription ;)
4 Sep 2021 - 8:52 pm | कुमार१
हा हा हा !
12 Jan 2022 - 11:12 am | कुमार१
नुकताच प्राईम वरील The heist of the century (हिंदी रुपांतर) हा चित्रपट पाहिला.
यापूर्वी बँक दरोड्याचे असे काही पाश्चिमात्य चित्रपट बघून झालेले आहेत.
अशा बहुतेक दरोड्यांमध्ये मला काही समान वैशिष्ट्ये आढळळी. त्याची ही जंत्री :
१. बहुतेक सर्व दरोडेखोर बुद्धिमान आणि उत्तम नियोजक असतात.
२. त्यांचा स्थापत्यशास्त्र, वास्तुरचना आणि मानसशास्त्र यांचा दांडगा अभ्यास असतो !
३. दरोडा घालण्यासाठी ते ड्रील व जी अत्याधुनिक साधने वापरतात त्यापुढे जगातील कुठलीही भिंत अभेद्य असते !
४. सुट्टीच्या दिवशी बँकेत दरोडा घालण्यासाठी बहुतेकदा ते बाजूच्या गटारात उतरून मग वरच्या दिशेने भगदाड पाडून आत शिरतात.
५. गुन्हयात पकडले गेल्यावर शिक्षेचे स्वरूप काय असते याचाही त्यांचा अभ्यास असतो. त्यानुसार ते गुन्ह्याची तीव्रता ठरवतात.
६. प्रत्यक्ष तिजोरी उघडल्यानंतर त्यांना नोटांच्या बरोबरीने सोन्याच्या चिपांमध्येही चांगलाच रस असतो.
... अशाप्रकारे या चित्रपटांचा एक ठराविक ‘मसाला’ तयार झालेला दिसतो. 😍