✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 01/16/2019 - 14:50  ·  लेख
लेख
रविवारचा दिवस होता आणि सवयीप्रमाणे इंग्लिश पेपरातले मेगॅ-क्रॉसवर्ड सोडवत बसलो होतो. हे सोडवणे म्हणजे डोक्याचा भुगा होतो. सगळे कोडे कधी सुटत नाही पण निम्मे सुटले तरी मी आनंद मानतो. या कोडयातले एक शोधसूत्र लक्षवेधी होते. ते असे: ‘ओलीस व्यक्तीस तिच्या अपहरणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम’ ओळखायचा शब्दसमूह तब्बल १७ अक्षरी (९+८) होता. अन्य उभ्या-आडव्या शब्दांच्या मदतीने त्यातला दुसरा शब्द Syndrome असा सुटला. पण पहिल्यातले फक्त पहिलेच अक्षर S एवढेच कळत होते. खूप वेळ जाम डोके खाजवले पण शेवटी थकलो. पण डोक्यात किडा वळवळत होता आणि जाम अवस्थ होतो. मग गेलो गुगलराजाला शरण. त्यावर S ने सुरु होणारे सिंड्रोम माझ्या पुढ्यात दाखल झाले. आता उत्तर सापडले होते - स्टॉकहोम सिंड्रोम ! अगदी कुतूहल वाटले या शब्दाचे. स्टॉकहोम ही तर स्वीडनची राजधानी. मग तिचे नाव या ‘अवस्थेला’ का बरे दिले असावे? मग झपाटल्यासारखे त्याबद्दल वाचून काढले. प्रकरण एकदम रंजक वाटले. मानसशास्त्रातील या अनोख्या प्रकाराची ओळख झाली आणि स्वतःवर खूष झालो. एव्हाना या वाचनाने थकवा आला होता. जरा आळोखेपिळोखे देत होतो. तेवढ्यात कन्या जवळ आली. म्हणाली काय चहा हवाय वाटतंय. मी अर्थातच हो म्हणालो. मग चहा पिता पिता तिला या सिंड्रोमबद्दल उत्साहाने सांगू लागलो. तिच्या चेहऱ्यावर मला अधीरतेचे भाव दिसत होते. माझे बोलणे संपते ना संपते तोच ती म्हणाली, “अरे बाबा, मग तू नेटफ्लिक्स वरची Money Heist ही मालिका पहिलीच पाहिजेस, अगदी मस्ट- वॉच. या सिंड्रोमवरच आधारित आहे”. आता माझे कुतूहल अधिकच चाळवले गेले. मग पुढचे दोन आठवडे ही मालिका अगदी अधाशीपणे पाहत होतो. एकदम गुंगवून ठेवणारी. खूप आवडली हे सांगायला नकोच. माझ्या मुलीने त्या मालिकेचा ३ दिवसात फडशा पाडला होता हे ऐकून तिचा हेवा वाटला. नंतर कधीतरी जालशोध घेत असता अचानक ‘मदारी’ हा हिंदी चित्रपट गवसला. गमतीचा भाग म्हणजे यातही या सिंड्रोमची संकल्पना घेतली आहे. म्हणजे चित्रनिर्मात्यांना भुरळ पडावी असा हा विषय दिसतोय. इथल्या वाचकांना तो रंजक वाटेल या आशेने मी तो लेखनास निवडला आहे. आता या लेखात आधी स्टॉकहोम सिंड्रोमचा परिचय आणि नंतर ती मालिका आणि त्या चित्रपटाची थोडक्यात माहिती देतो. स्टॉकहोम सिंड्रोम समजा काही गुंडांनी काही निरपराध माणसांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले आहे. मुळात या गुंडांचे त्या ओलीसांशी काहीच वाकडे नसते. स्वतःच्या काही मागण्या अन्य कोणाकडून तरी मान्य होण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेले असते. यात सुरवातीस ओलीस खूप घाबरतात. त्यांच्या मनात या गुंडांबद्दल घृणा निर्माण होते. पण जसा ओलीसपणाचा कालावधी वाढत जातो तसे त्यांची मानसिक प्रक्रिया बदलते. एव्हाना त्यांना कळले असते की हे गुंड त्यांना कुठलीच इजा करत नाहीयेत आणि खाऊपिऊ पण घालताहेत. पण आपण जर त्यांच्या तावडीतून पळायचा प्रयत्न केला तर मात्र ते आपला जीव घेतील, हे स्पष्ट असते. त्यामुळे ओलीस शांत बसणे पसंत करतो. पुढे जसा हा कालावधी वाढत जातो तसे ओलीस आणि ते गुंड यांच्यात एक भावनिक बंध निर्माण होऊ लागतो. यामागे काही कारणे असतात. एकतर हे दोन्हीही गट बाहेरच्या समाजापासून दूर असे कोठडीत बंदिस्त असतात. या अति निकट संपर्कातून ओलीसाच्या मनात त्या गुंडांबद्दल काहीशी कणव उत्पन्न होते. काही व्यक्तींच्या अपहरण प्रसंगी जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्याला स्टॉकहोम सिंड्रोम असे म्हणतात. आता या मानसिक प्रक्रियेला स्टॉकहोमचे नाव का दिले गेले हे समजण्यासाठी १९७३ मधील एक घटना जाणून घेऊ. pict तेव्हा स्वीडनच्या तुरुंगातील एक कैदी पॅरोलवर सुटला होता. त्याचा अन्य एक साथीदार तुरुंगात होता. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी याने स्टॉकहोममधील एका मोठ्या बँकेवर दरोडा घालून तिथल्या ४ कर्मचाऱ्यांना पकडून ओलीस ठेवले. एकूण ६ दिवस हे लोक ओलीस होते. नंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. पुढे त्या अपहरणकर्त्याच्या विरोधात न्यायालयात खटला उभा राहिला. आता पोलिसांनी त्या ४ लोकांना साक्षीदार म्हणून तयार केले. पण आता त्या चौघांनी त्या गुंडाच्या विरोधात साक्ष द्यायला चक्क नकार दिला. उलट त्याच्या बचावासाठी ते पैसे जमवू लागले ! त्यांच्या अशा विचित्र वर्तनाने पोलीस चक्रावून गेले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांचे मन वळवायचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी पोलिसांनी Nils Bejerot या मनोविकारतज्ञाला पाचारण केले आणि त्याची मदत मागितली. त्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून त्या व्यक्तींच्या अवस्थेला स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव दिले. या घटनेनंतर अपहरणाच्या अन्य काही घटनांचाही अभ्यास करण्यात आला आणि त्यापैकी काहींत अशाच स्वरूपाचा अनुभव आलेला दिसला. त्यातून मानसशास्त्रज्ञांना अशा अवस्थेचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांच्या अभ्यासातून ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाले. या मनोवस्थेची काही वैशिष्ट्ये अशी आहेत: १. या अवस्थेचे मूळ माणसाच्या जिवंत राहण्याच्या अंतःप्रेरणेत दडले आहे. २. जेव्हा अपहरणकर्ता ओलीसास ठार मारणार नाही याची ग्वाही देतो तेव्हा ओलीसाच्या मनात त्याच्याबद्दल नकळत कृतज्ञता दाटून येते. ३. काही झाले तरी आपण मरणार नाही अशी ओलीसाची खात्री झाली की त्याच्या मनातला अपहरणकर्त्याबद्दलचा द्वेष मावळू लागतो. ४. काही वेळेस अपहरणकर्त्याच्या ज्या मागण्या असतात त्या योग्य आहेत असे ओलीसासही तात्त्विकदृष्ट्या पटते. त्यातून त्या दोघांत एक भावबंध निर्माण होतो. त्यातून ओलीसाचा पोलीस अथवा सरकारबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. विशेषतः जेव्हा अपहरणकर्ता आणि ओलिसांचे कुठलेच वैयक्तिक शत्रुत्व नसते तेव्हा ही भावना अधिक बळावते. ५. ही अवस्था स्त्रियांमध्ये तुलनेने अधिक दिसून येते. ६. काही प्रसंगात तर अपहरणकर्त्याच्या मनात देखील त्याच्या ओलिसाबद्दल प्रेमभावना निर्माण होते. अशा या वैशिष्ट्यपूर्ण सिंड्रोमचा मानसशात्रात सतत अभ्यास चालू आहे. आता ही संकल्पना फक्त अपहरणासंदर्भातील गुन्ह्यापुरतीच मर्यादित नाही. अन्य काही प्रकारच्या गुन्ह्यांतही तिची नोंद झाली आहे. हे गुन्हे खालील प्रकारचे आहेत: १. घरगुती हिंसाचार २. धार्मिक अथवा पंथीय विद्वेष ३. युद्धकैद्यांचे अत्याचार ४. बलात्कार आणि सक्तीचा वेश्याव्यवसाय ५. बाल-लैंगिक अत्याचार. ६. रॅगिंगचे गुन्हे अशा गुन्ह्यांतील पिडीत व्यक्तीस काही वेळेस संबंधित गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अर्थात त्यामुळे गुन्हेगारास शासन मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात हा यातून उद्भवलेला एक मोठा सामाजिक तोटा आहे. कित्येकदा बलात्काराच्या प्रकरणात पिडीत स्त्रीला आपला जीव वाचल्याचे समाधान इतके असते की त्यापुढे ती तो अत्याचार मुकाटपणे सहन करते. अपहरणाच्या प्रकरणांत जेव्हा ओलिसांची सुखरूप सुटका होते त्यानंतर मात्र त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला जाणवतो. अर्थातच त्याची तीव्रता ओलीसपणाच्या कालावधीवर अवलंबून असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी बरेचदा मानसिक समुपदेशनाची गरज भासते. आता कित्येकदा त्यांना अपराधी वाटू लागते. तेव्हा “केवळ जीव वाचवण्यासाठीच तुम्ही त्या गुंडाबद्दल प्रेम व सहानुभूती दाखवलीत”, असे त्यांना पटवून द्यावे लागते. ... ... स्टॉकहोम सिंड्रोमच्या संकल्पनेची अनेक चित्रनिर्मात्यांना भुरळ पडली आहे. त्यावर आधारित काही चित्रपट व जालमालिका लोकप्रिय झाल्या आहेत. त्यापैकी ज्या दोन कलाकृती मी पाहिल्यात त्यांचा आता परिचय करून देतो. Money Heist (हाइस्ट) ही मुळातली स्पॅनिश टीव्हीमालिका. त्याचे इंग्लिश रुपांतर नेटफ्लिक्सवर पाहण्यास उपलब्ध आहे. ही बऱ्यापैकी स्टॉकहोममधील बँक दरोड्यावर आधारित वाटते. ‘हाइस्ट’ म्हणजे दरोडा. यात स्पेनच्या राजधानीतील चलनछपाईच्या छापखान्यावर धाडसी सशस्त्र दरोडा टाकला जातो. या गुन्ह्याचा सूत्रधार एक बुद्धिमान पुरुष असून तो स्वतःला ‘प्रोफेसर’ म्हणवतो. तो निरनिराळ्या ठिकाणांहून ८ ‘हटके’ जणांना गाठून आणतो आणि त्यांची एक टोळी बनवतो. तो त्यांना सांगतो की दरोड्यादरम्यान आपली २ मूलभूत तत्वे असतील: १. आपण कुठल्याही ‘व्यक्ती’चा पैसा लुबाडणार नाही आहोत. आपण त्या छापखान्यावर दरोडा टाकून तिथे पूर्णपणे नव्या युरोच्या नोटा छापणार आहोत, आणि २. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खूनखराबा करायचा नाही. एकाही ओलीसास थोडी सुद्धा इजा होता कामा नये. दरोड्याचा कार्यक्रम अत्यंत विचारपूर्वक ठरवला जातो. या टोळीचे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. ते दरोडा टाकतात आणि तिथल्या ६७ कर्मचाऱ्यांना अकरा दिवस ओलीस ठेवतात. या कालावधीत ही टोळी आणि ओलीस यांच्या दरम्यान जी दोन प्रेमप्रकरणे निर्माण होतात त्यांचा पाया या सिंड्रोमवर उभारला आहे. त्यापैकी एकात ओलीसांतील एक स्त्री त्या टोळीतील एकाच्या प्रेमात पडते आणि चक्क टोळीला सामील होते. तर दुसऱ्यात या प्रकरणाचा तपास लावणारी पोलीस स्त्री नकळत खुद्द त्या ‘प्रोफेसर’च्याच प्रेमात पडते. या उत्कंठावर्धक सुंदर मालिकेबद्दल अधिक लिहून रहस्यभेद करीत नाही. इच्छुकांनी जरूर पहावी. ............. ‘मदारी’ हा निशिकांत कामत दिग्दर्शित आणि इरफानची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट. यात इरफानने ‘निर्मल’ची भूमिका केली आहे. त्याचा मुलगा एक पूल कोसळून झालेल्या अपघातात मरण पावला आहे. तो पूल निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच कोसळला होता. त्या बांधकामास राज्याच्या गृहमंत्र्यांसकट अनेक सरकारी मंडळी जबाबदार होती. उद्विग्न झालेला निर्मल याचा सूड घेण्यासाठी गृहमंत्र्यांच्या मुलाचे अपहरण करतो. खूप काळ तो लपून राहतो. त्या दरम्यान रोहन व त्याच्यात एक मैत्रीपूर्ण नाते तयार होते. pict पुढे निर्मल रोहनच्या सुटकेच्या बदल्यात त्याची ‘मागणी’ जाहीर करतो. ती म्हणजे गृहमंत्र्यांसह त्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जाहीरपणे त्यांच्या ‘खाबूगिरीची’ कबुली द्यायची आणि त्याचे थेट टीव्ही प्रक्षेपण होईल. अखेर ती मागणी मान्य होते आणि तो रोहनला सोडून देतो. त्या प्रसंगी रोहन त्याच्या वडिलांकडे जाण्यापूर्वी निर्मलला प्रेमाने घट्ट मिठी मारतो. हा प्रसंग या सिंड्रोमचेच निदर्शक म्हणता येईल. निर्मलने रोहनचे अपहरण करण्याचे कारण रोहनला मनापासून पटलेले आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल त्याच्या मनात तिडीक उठलेली आहे. ......... ...... तर असा हा कुतूहल वाटावा असा स्टॉकहोम सिंड्रोम. दोन चित्रकृतींच्या निमित्ताने मला त्याची ओळख तुम्हास करून द्यावी वाटली. प्रतिसादांचे स्वागत ! *************************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
65598 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

हो

आंबट गोड
Wed, 01/16/2019 - 14:59 नवीन
याच सिंड्रोम वर आधारीत आलीया भट चा हाय वे सिनेमा पण होता.
  • Log in or register to post comments

ओळख आवडली

शाम भागवत
Wed, 01/16/2019 - 15:01 नवीन
ओळख आवडली
  • Log in or register to post comments

खूपच छान

श्वेता२४
Wed, 01/16/2019 - 15:40 नवीन
तुमचे लेख नेहमीच वेगळे, माहितीपूर्ण व साध्या सोप्या भाषेत असतात. खूप आवडला लेख
  • Log in or register to post comments

तुमचे लेख नेहमीच वेगळे, माहितीपूर्ण व साध्या सोप्या भाषेत असतात.

Nitin Palkar
गुरुवार, 01/17/2019 - 12:55 नवीन
हेच म्हणतो.....___/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

सर्व प्रतिसादकांचे

हेमंतकुमार
Wed, 01/16/2019 - 16:47 नवीन
मनापासून आभार ! यावर आधारित अन्य चित्रकृती कोणी पहिल्या असल्यास त्यावर जरूर लिहा.
  • Log in or register to post comments

उत्तम विषय आणि मांडणी.

गवि
Wed, 01/16/2019 - 17:07 नवीन
उत्तम विषय आणि मांडणी. यामध्ये ओलीस व्यक्ती (victim) हिला अपहरणकर्त्याविषयी वाटणाऱ्या भावना कणव, दया किंवा सहानुभूती या गटापेक्षाही त्याच्याकडे असलेली absolute superiority , पॉवर, आपलं जगणं मरणं त्याच्या हाती असणं या प्रकारच्या असून त्यापोटी आपला जीव वाचवणारी व्यक्तीदेखील हीच (तूच तारक मारक) अशा विचारातून आकर्षण उत्पन्न होत असावं असं वाटतं. (भयजन्य). याचं कारण असं की ओलीस असण्याच्या काळात स्वतःखेरीज अन्य ओलिसांपैकी काहींची हत्या, छळ इत्यादि अत्यंत unjustifiable गोष्टी अपहरणकर्त्यांनी केल्या आणि तरीही त्यांच्याविषयी आकर्षण, कृतज्ञता, समर्थन मनात राहिलं (किमान निरोप घेताना) असं अनेक केसेसमध्ये घडतं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, गवि

हेमंतकुमार
Wed, 01/16/2019 - 17:48 नवीन
अशा विचारातून आकर्षण उत्पन्न होत असावं असं वाटतं. (भयजन्य).>>>>>+११
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख.

टर्मीनेटर
Wed, 01/16/2019 - 18:31 नवीन
सहज कुतूहल म्हणून या सिंड्रोम वर आधारीत चित्रपटांचा शोध घेतला तर Movies with Stockholm Syndrome theme हि यादी imdb वर सापडली. यातले काही आधी बघितले आहेत पण कथानक कशावर आधारित आहे त्याचा संदर्भ आज लागला :) माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

टर्मिनेटर,

हेमंतकुमार
Wed, 01/16/2019 - 18:41 नवीन
जबरी लांब यादी आहे ती ! धन्यवाद
  • Log in or register to post comments

रोचक विषय आणि सुंदर मांडणी !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/16/2019 - 21:55 नवीन
रोचक विषय आणि सुंदर मांडणी !
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग विषय. बॉलीवूड

बाप्पू
Wed, 01/16/2019 - 23:07 नवीन
इंटरेस्टिंग विषय. बॉलीवूड मध्ये बऱ्याच सिनेमात नायिकांना हा सिंड्रोम होतो...
  • Log in or register to post comments

Stockholm syndrom

Chandu
गुरुवार, 01/17/2019 - 13:48 नवीन
Tere naam.by Salman and bhumika
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

मस्त लेख !

वन
गुरुवार, 01/17/2019 - 07:45 नवीन
तुमचे लेख नेहमीच वेगळे, माहितीपूर्ण व साध्या सोप्या भाषेत असतात. >>>>> +१ अर्थात त्यामुळे गुन्हेगारास शासन मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात हा यातून उद्भवलेला एक मोठा सामाजिक तोटा आहे. >>> +१
  • Log in or register to post comments

लिखाण आवडल.

चामुंडराय
गुरुवार, 01/17/2019 - 07:54 नवीन
लिखाण आवडल. या बद्दल आधी कुठेतरी वाचलं होतं हे आठवतंय परंतु नक्की काय हे माहित नव्हतं. आता मदारी बघणे मस्ट !
  • Log in or register to post comments

छान लेख !!!

ट्रम्प
गुरुवार, 01/17/2019 - 08:08 नवीन
छान लेख !!! पूर्ण लेख वाचून काढला आधशा सारखा !! स्वीडन ची केस खूपच इनट्रेस्टिंग वाटली . पण अजुन थोड़ी स्वीडन केस ची माहिती द्या ना , पुढे काय झाले ? ते चार जण आणि त्या दोघांचे पुढे काय झाले?
  • Log in or register to post comments

@ ट्रम्प,

हेमंतकुमार
गुरुवार, 01/17/2019 - 11:17 नवीन
@ ट्रम्प, ती कथा रंजक आहे. एकून ६ दिवस अपहरणकर्ते व ओलीस अगदी प्रेमाने तिथे राहत होते. नंतर पोलिसांनी आत अश्रुधूर सोडला आणि अपहरणकर्ते शरण आले. तिथून बाहेर पडताना दोन्ही गटांनी मिठ्या मारल्या व चुंबनेही घेतली ! नंतर अपहरणकर्त्यांना पुन्हा तुरुंगात टाकले गेले. तेव्हा पूर्वीचे ओलीस त्याना तिथे चक्क भेटायला जात होते. मुख्य अपहरणकर्त्याने शिक्षा संपवून बाहेर आल्यावर S Synd. या नावानेच आत्मचरित्र लिहीले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

सही !

वन
गुरुवार, 01/17/2019 - 19:27 नवीन
दोन्ही गटांनी मिठ्या मारल्या व चुंबनेही घेतली ! >>>> हद्द झाली बुवा ! हे खरे आहे की एखादी मालिकाच बघतोय असे वाटू लागले ☺️
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

आवडलं!

लई भारी
गुरुवार, 01/17/2019 - 08:44 नवीन
रोचक आहे! छान लिहिलंय तुम्ही! माझ्या पण डोक्यात 'हायवे' चित्रपट आला होता, पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे :) अलीकडेच 'अपहरण' ही हिंदी वेब-सिरीज पाहिली त्यात पण हा सिंड्रोम दिसतोय. (बरी आहे सिरीज) Money Heist बघायला हवी!
  • Log in or register to post comments

सर्व नवीन प्रतिसादकांचे

हेमंतकुमार
गुरुवार, 01/17/2019 - 09:17 नवीन
आभार ! मदारी व money h जरूर बघा. वन, सहमत आहे. ट्रम्प, ती दरोडा फसला होता एवढे माहीत आहे. अजून शोधतो.
  • Log in or register to post comments

अजून थोडी भर....

हेमंतकुमार
गुरुवार, 01/17/2019 - 10:05 नवीन
स्टॉकहोम सिंड्रोमच्या विरुद्ध एक अवस्था असते. त्याला ‘लिमा’ सिंड्रोम म्हणतात. यात अपहरणकर्त्याना त्यांच्या ओलिसांबद्दल दया वाटू लागते ! ह्या सिंड्रोमची कथा अशी. ‘पेरू’ची राजधानी लिमा येथे १९९६मध्ये काही दहशतवाद्यांनी जपानी दूतावासावर धाड घालून महत्वाच्या लोकांना ओलीस ठेवले होते. पण नंतर त्यांचे मन द्रवले आणि त्यांनी ओलीसंना चक्क सोडून दिले. अपहरणाच्या काही घटनांत स्टॉकहोम व लिमा हे दोन्ही सिंड्रोम एकत्रही अनुभवास येतात.
  • Log in or register to post comments

खूप खूप पूर्वी नाना पाटेकर,

गवि
गुरुवार, 01/17/2019 - 10:38 नवीन
खूप खूप पूर्वी नाना पाटेकर, पल्लवी जोशी असा एक ओलीसनाट्य आधारित सिनेमा आला होता. कोणाला आठवतो का? सुपरहिट नसावा पण उत्कृष्ट होता. पल्लवी जोशीचं पात्र अपंग असतं आणि तिच्या घरातच घुसून तिला एकजण ओलीस ठेवतो. नाव पटकन आठवत नाही.
  • Log in or register to post comments

अंधा युद्ध. https://en

विजुभाऊ
गुरुवार, 01/17/2019 - 10:44 नवीन
अंधा युद्ध. https://en.wikipedia.org/wiki/Andha_Yudh
  • Log in or register to post comments

येस. धन्यु विजुभौ..

गवि
गुरुवार, 01/17/2019 - 11:06 नवीन
येस. धन्यु विजुभौ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेख खूप छान .

मालविका
गुरुवार, 01/17/2019 - 22:09 नवीन
मला पण अगदी हाच सिनेमा आठवा फक्त नाव मलाही आठवत नव्हतं . खूप वर्षांपूर्वी बघितला होता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मणिरत्नम चा रावण पण याच

महासंग्राम
गुरुवार, 01/17/2019 - 14:18 नवीन
मणिरत्नम चा रावण पण याच कॅटेगरीत येतो.
  • Log in or register to post comments

रोचक माहिती!

अथांग आकाश
गुरुवार, 01/17/2019 - 20:21 नवीन
रोचक माहिती! मदारी बघितला आहे money h बघतो! Image removed.
  • Log in or register to post comments

अथांग,

हेमंतकुमार
गुरुवार, 01/17/2019 - 20:39 नवीन
बऱ्याच दिवसांनी तुमची खास 'मुद्रा' इथे उमटली आहे. धन्यवाद ! ... कोण आहेत ते फोटोतले सद्गृहस्थ ? ☺️
  • Log in or register to post comments

काही कल्पना नाही बुवा :-)

अथांग आकाश
गुरुवार, 01/17/2019 - 21:39 नवीन
>>>कोण आहेत ते फोटोतले सद्गृहस्थ ? >>> काही कल्पना नाही बुवा :-) मी आपला https://giphy.com/ या site वर जातो आणि विषयाला धरून इमेज सर्च करतो व इथे चिटकवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

तुमचं सगळंच लेखन भारी असतं.

शलभ
गुरुवार, 01/17/2019 - 22:59 नवीन
तुमचं सगळंच लेखन भारी असतं. मस्त लेख.
  • Log in or register to post comments

Money Heist..

वन
Fri, 01/18/2019 - 10:23 नवीन
Money Heist बघायला सुरवात केली आहे.मस्त थ्रिलर आहे. त्या ‘प्रोफेसर’च्या टोळीतील पात्रांना मोठ्या शहरांची नावे दिली आहेत – टोकियो, मॉस्को, बर्लिन, नैरोबी, इ. हे मजेदार वाटते.
  • Log in or register to post comments

Money Heist

ट्रेड मार्क
Fri, 01/18/2019 - 22:13 नवीन
एकदम मस्त मालिका आहे. काय बघावं असा शोध घेता घेता ही मालिका सापडली आणि मग अधाश्यासारखी बघून काढली. प्रोफेसर भारी आहे आणि त्यातील इतर पात्र सुद्धा मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

चर्चेतील सहभागाबद्दल

हेमंतकुमार
Sat, 01/19/2019 - 07:38 नवीन
सर्वांचे आभार! वन आणि ट्रे मा। >>>>+१ मालिकेत शेवटी प्रोफेसर त्याच्या नव्या नोटा छापण्याचे जे समर्थन देतो ते अफलातून आहे.
  • Log in or register to post comments

येस्स

ट्रेड मार्क
Sun, 01/20/2019 - 04:13 नवीन
ते स्पष्टीकरण खरंच मस्त आहे. अजून एक म्हणजे Bella ciao हे गाणं पण मला आवडलं. कठीण परिस्थितीतही मानवी भावभावना मस्त दाखवल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

@ट्रे मा,

हेमंतकुमार
Sun, 01/20/2019 - 08:56 नवीन
@ट्रे मा, सहमत. एक सूचना.तुमची ही मालिका पाहिल्याची आठवण ताजी असेल तर त्यावर वेगळा धागा जरूर काढा. त्या ‘प्रोफेसर’ चे जे अजब अर्थशास्त्र आहे ते छान काथ्याकूट चा विषय आहे ! M H च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. २ मोसमात झालेल्या तिचा तिसरा मोसम या वर्षी येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

सुरेख लेख ....

सुधीर कांदळकर
Sat, 01/19/2019 - 10:58 नवीन
अनेक सत्य घटनातील पात्रांच्या वागण्यातले कोडे उलगडले. नानांचा तो अप्रतिम चित्रपट मी देखील पाहिला आहे. एका सुरेख, सुरेख लेखाबद्दल अनेक धन्यवाद. रच्याकने काही वेगळे ओलीसः आपले एक आय ए अस अधिकारी फुलपाखरांच्या अभ्यासाठी ईशान्य भारतात गेले असतांना त्यांचे उल्फा अतिरेक्यांनी अपहरण केले होते. काही आठवडे त्यांची फरफट केल्यावर त्यांना सोडून दिले. या अनुभवांवर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अतिरेक्यांबद्दल सौम्य भाषा वापरली आहे आणि दोनतीन दिवस हाल केल्यावर चांगली वागणूक दिल्याचे लिहिले आहे. कवी निरंजन उजागरे यांना पण ईशान्य भारतातल्या अतिरेक्यांनी पकडले होते. हा माणूस कवी आहे आणि याला सोडायला कोणीही पैसे मोजणर नाही हे समजल्यावर सोडून पण दिले.
  • Log in or register to post comments

याला सोडायला कोणीही पैसे मोजणर नाही

Trump
Wed, 01/12/2022 - 15:14 नवीन
कवी निरंजन उजागरे यांना पण ईशान्य भारतातल्या अतिरेक्यांनी पकडले होते. हा माणूस कवी आहे आणि याला सोडायला कोणीही पैसे मोजणर नाही हे समजल्यावर सोडून पण दिले.
मराठी कवी, तो काय कमावणार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

सुधीर, रोचक किस्से !

हेमंतकुमार
Sat, 01/19/2019 - 11:33 नवीन
हा माणूस कवी आहे आणि याला सोडायला कोणीही पैसे मोजणर नाही हे समजल्यावर सोडून पण दिले. >>>> ‘कवी’ वरून विजय तेंडूलकरांच्या ‘बोटभर काव्य विचार’ या लेखाची आठवण झाली. त्यात एका प्राध्यापकांचे कवीबद्दल मत दिले आहे. ते म्हणतात, ““सगळे कवी एका बोटीत बसवून ती समुद्रात बुडवली, तर समाजाचे काहीही अडणार नाही” ! धन्यवाद !
  • Log in or register to post comments

खूप छान लेख आणि माहिती.

बबन ताम्बे
Sat, 01/19/2019 - 19:13 नवीन
खूप वर्षांपूर्वी काश्मिरी अतिरेक्यांनी एका सरकारी उच्चंपदस्थाचे अपहरण केले होते. नन्तर त्यांची सुटका झाली. अपहरण कालावधीत अतिरेक्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली होती असे त्यांचे म्हणणे होते. सुटल्यांनंतर ते भाषणे पण देत होते. त्यांचे नाव आठवत नाही .
  • Log in or register to post comments

रामायण

तुषार काळभोर
Sun, 01/20/2019 - 08:35 नवीन
रामाने (किंवा धोब्याने) सीतेवर संशय घेण्याचे हे पण एक कारण असू शकेल.
  • Log in or register to post comments

पैलवान,

हेमंतकुमार
Sun, 01/20/2019 - 09:29 नवीन
तुमचा कल्पनाविलास लै भारी बुवा ☺️
  • Log in or register to post comments

वरील मुद्द्यावरून ...

वन
Mon, 01/21/2019 - 12:36 नवीन
वरील मुद्द्यावरून ... मागे एकदा पाहिलेला जुही चावलाचा सिनेमा (?नाव) आठवला. त्यात तिच्यावर एकजण बलात्कार करतो. पुढे कोर्ट त्याला शिक्षा सुनावते. पण जुही तिच्या भाषणात कोर्टाला सांगते की त्याला तुम्ही शिक्षा दिलीत हे ठीक. पण आता आपल्या समाजात माझ्याशी कोण लग्न करणार? म्हणजे तुम्ही एक प्रकारे मलाच अप्रत्यक्ष शिक्षा दिलीत. त्यावर न्यायाधीश त्या आरोपीला तिच्याशी लग्न करण्याची शिक्षा देतात व सिनेमा संपतो.
  • Log in or register to post comments

हा येडचापपणा उत्तर भारतात

अनिंद्य
Mon, 01/21/2019 - 16:25 नवीन
हा येडचापपणा उत्तर भारतात प्रत्यक्षातही भरपूर चालतो, विशेषतः खाप पंचायतींच्या न्यायालयात :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वन

@ कुमार१,

अनिंद्य
Mon, 01/21/2019 - 16:26 नवीन
@ कुमार१, रोचक लेखन आणि प्रतिक्रिया. स्टोकहोमच्या विरुद्ध लिमा सिंड्रोम पहिल्यांदाच माहित झाला
  • Log in or register to post comments

अनिंद्य,

हेमंतकुमार
Mon, 01/21/2019 - 16:57 नवीन
आभार आणि वरील मुद्द्यावर सहमती. तुमचा प्रतिसाद आल्याने आता सिंड्रोम ची सांगता झाली ☺️
  • Log in or register to post comments

कठिण विषयावर छान सोप्या

शेखरमोघे
Mon, 01/21/2019 - 20:03 नवीन
कठिण विषयावर छान सोप्या शब्दात माहिती दिल्याबद्दल अभिनन्दन!
  • Log in or register to post comments

नवरा-बायको आणि स्टॉकहोम .....

हेमंतकुमार
Fri, 06/07/2019 - 10:46 नवीन
नवरा-बायको या नात्यातील 'स्टॉकहोम सिंड्रोम' अनुभवायचा असेल तर ‘The Wife’ हा चित्रपट जरूर बघा. NF वर उपलब्ध आहे. कथानक थोडक्यात लिहितो. ज्यांना हे वाचण्यापूर्वी आधी बघायचा आहे त्यांच्यासाठी रहस्यभेद इशारा.......... ......यातील नवऱ्याला साहित्यातील ‘नोबेल’ जाहीर झालेले आहे. तो अगदी खुशीत आहे. पण त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर मात्र खिन्नता आहे. तर अंदरकी बात अशी आहे... ती बायको खरे तर नवर्यापेक्षा उत्तम लेखिका आहे. किंबहुना त्याच्या बहुतेक कथांची बीजे तिनेच रोवली आहेत. लेखनकष्टाचे काम त्याने तिच्याकडून सक्तीने करवून घेतले आणि पुस्तके मात्र त्याच्याच नावावर प्रसिद्ध होत राहिली. शेवटी त्याने नोबेल स्वीकारल्यानंतर दोघांचे कडाक्याचे भांडण होते. परिणामी त्याला हृदय-झटका येतो आणि त्याचा अंत होतो. नंतर एक पत्रकार-लेखक तिच्याशी संपर्क करतो आणि आता त्याला एक पुस्तक लिहून त्या जोडप्याचे खरे सत्य बाहेर आणायचे असते. तेव्हा मात्र ती त्याला स्पष्ट खडसावते, ‘ जर का तू असे काही केलेस तर मी तुला न्यायालयात खेचीन !”. .... शेवटी तो लेखक तिचा नवराच होता ना. तिला त्याच्याबद्दल सहवासातून प्रेमच वाटत आलेले आहे, असेच चित्रपटातून सूचित होत आहे !
  • Log in or register to post comments

पिंजर

मराठी कथालेखक
Fri, 06/07/2019 - 12:49 नवीन
अमृता प्रीतमच्या कादंबरीवर आधारीत पिंजर हा चित्रपट काहीसा या सिंड्रोमवर बेतला आहे असे म्हणता येईल. अपहरणकर्त्या मनोज वाजपेयीलाच अपहृत उर्मिला मातोंडकर अखेर आपलंसं मानते. काहीसा असं म्हणण्याचं कारण की एक तर हे अपहरण एका सूडापोटी झालेलं असतं आणि मनोज वाजपेयी मुळातून वाईट नसतो. दूसरं असं की आता कुणी आपली सूटका करणार का आणि सूटका झाली तरी आपलं कुटूंब आपल्याला स्वीकारेल का या अनिश्चिततेतून 'जे आता आहे तेच आपलं' मानावं या भूमिकेपर्यंत तिचा प्रवास होतो. तिचं ज्याच्याशी आधी लग्न ठरलेलं असतं तो संजय सूरी दीर्घकाळ तिची वाट बघतो आणि तिचा स्वीकार करण्यास तयार असतो पण हे तिला फार उशीरा कळतं तोवर तिच्या मनाची तयारी झालेली असते. झालंच तर उर्मिलाचा भाऊ मनोज वाजपेयीच्या शेतांना आगी लावतो, मनोजला हे समजतं पण तरी तो तक्रार न करता गप्प बसतो कारण तिच्या भावाने हे सूडापोटी केलेलं आहे हे समजून तो त्याला माफ करतो. या घटनेचाही उर्मिलाच्या मनावर परिणाम होतो. चांगला चित्रपट आहे हा.. थोडा लांबलचक आणि संथ वाटला तरी चांगला आहे. मी फक्त एकदाच थिएटरमध्ये पाहिला होता (जेव्हा तो रिलीज झाला होता) पुन्हा बघणे झाले नाही पण तरीही बर्‍यापैकी आठवतो.
  • Log in or register to post comments

म क,

हेमंतकुमार
Fri, 06/07/2019 - 13:12 नवीन
चांगला चित्रपट आहे हा.. >>>>+ १११
  • Log in or register to post comments

मी पण!

स्मिता.
Fri, 06/07/2019 - 17:00 नवीन
मीसुद्धा ही मालिका जाग-जागून बघून काढली. मधे थांबणे जिवावर येत होते. :) प्रोफेसरचे पात्र आवडले. Bella ciao गाणे तर मस्तच! स्पाॅयलरः संपूर्ण मालिका बघतांना मजा आली पण शेवट फारसा आवडला नाही. इन्पेक्टरचे वागणे तिच्या आधीच्या व्यक्तिमत्व चित्रणाला साजेसे वाटले नाही. कदाचित वास्तविक आयुष्यात कोणीही तसेच वागेल पण हिंदी चित्रपटांवर पोसलेल्या माझ्या मनाला ते पटले नाही ;)
  • Log in or register to post comments

स्मिता, सहमत.

हेमंतकुमार
Fri, 06/07/2019 - 17:42 नवीन
MH चे २ मोसम झालेले असले तरी ती अजून अर्धवट आहे ! येत्या १९ जुलै पासून तिसरा मोसम सुरु होत आहे. बघूया, त्यात बहुसंख्यांना आवडणारा शेवट करतात का !!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा