चाची ४२० तसा जुना चित्रपट आहे , टीव्हीवर अनेकदा लागून गेला आहे ... बहुतेक लोकांनी किमान एकदातरी पाहिला असेल असं वाटतं ... मीही बऱ्याच वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिला होता आवडलाही होता पण 1 - 2 आठवड्यांपूर्वी युट्यूब वर पाहिला आणि त्यांनतर मधले मधले सीन असे काही वेळा पाहिले गेल्या 1 - 2 आठवड्यात ... आजच तो ज्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे तो अव्वाई शानमुगी पाहिला .
दोन्ही चित्रपट मिसेस डाऊटफायर या इंग्रजी चित्रपटावर आधारीत आहेत . मिसेस डाऊटफायर मागेच कधीतरी पाहिला होता .
पण चाची ४२० ची सर अव्वाई शानमुगीला नाही आणि मिसेस डाऊटफायरला तर नाहीच नाही . रिमेक मूळ चित्रपटापेक्षा उत्कृष्ट बनवण्याचं श्रेय कमल हसनला द्यावं लागतं .
खरं तर विनोदी चित्रपटावर एवढी स्वतंत्र पोस्ट लिहिण्याएवढा तो भारी वगैरे आहे का असा विचार आला होता मनात ... टीकेची सुद्धा भीती वाटत होती . पण एवढा आवडला आहे तोपण इतक्या वर्षांनी पुन्हा पाहिल्यानंतर तर का ते लिहावंच असं वाटलं .
छोटे छोटे प्रसंग खूप लक्ष देऊन सुंदर चित्रित केले आहेत ... विशेषतः अव्वाई शानमुगी पाहिल्यानंतर तर हिंदी कलाकारांचा अभिनय खूपच चांगल्या दर्जाचा वाटू लागतो . अव्वाई वेगळ्या दिग्दर्शकाने बनवला आहे तर चाची ४२० कमल हसनने दिग्दर्शित केला आहे .. अव्वाई मधले सीन , संवाद , ओव्हरऍक्टिंग यातलं काहीही चाची ४२० मध्ये येऊ दिलेलं नाही ..
दोन्ही चित्रपटांमधल्या त्या - त्या पात्राच्या कलाकाराकडे पाहिलं की प्रत्येक हिंदी कलाकाराने किती अप्रतिम अभिनय केला आहे हे जाणवतं . खुद्द कमल हसनचा अभिनयही चाची ४२० मध्ये अधिक नैसर्गिक आहे .
चाची ४२० मधली मनाला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे कमल हसन / जय आणि त्याच्या मुलीचं दाखवलेलं नातं ... बाप मुलीचं इतकं सुंदर नातं दुसऱ्या कुठल्याही हिंदी मराठी चित्रपटात पाहिल्याचं मला तरी आठवत नाही ... अव्वाई मध्ये ते अजिबात जमून आलेलं नाही ... चाची मध्ये छोट्या भारतीचं काम केलेल्या बालअभिनेत्रीने जबरदस्त अभिनय केला आहे आणि कमल हसननेही बापाचं पात्र अव्वाईपेक्षा अधिक चांगलं साकारलं आहे ... दोघांमधली जवळीक आणि केमिस्ट्री इतकी नैसर्गिक दाखवली आहे की खरोखरच वडील - मुलगी आहेत की काय असं वाटावं .... कमल चाची बनून आल्यावर बायको सासरा ओळखत नाहीत पण मुलगी ओळखते , तरी सुरुवातीला तो आपली ओळख झाकण्याचा प्रयत्न करतो पण ती रडकुंडीला येऊन जुनी दोघा - दोघांतलं खास कडवं म्हणते तेव्हा नाटक सोडून देऊन गहिवरून जाऊन तिला उराशी कवटाळतो तो सीन बघताना एकाच वेळी डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू येतं ....
स्वयंपाकिणीने चटका दिल्यावर ती ज्या पद्धतीने बापाला तक्रार सांगते , मांडीवर बसून ... विश्वासाने की आता माझा बाबा नक्की काहीतरी करेल ते पाहताना खरे बाप - लेक पाहत आहोत स्क्रिन वर असं वाटतं .
छोट्या छोट्या प्रसंगांतून कथेत खोलपणा आणायचा प्रयत्न केला आहे .... पहिल्याच भांडणाच्या सिन मध्ये जेव्हा कमल " मुझे बीबी चाहीए , तुम्हे टीव्ही चाहीए , झगडा किस बात का " म्हणत पडतं घेत भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो संसारात क्लेश होऊ नयेत म्हणून आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहे हे दिसतं .
पण पुढे याच सीन मध्ये तो तब्बूवर हात उचलतो ... तेव्हाही तो भांडण मिटवण्याचा करत असलेला प्रयत्न आणि ती अधिकाधिक आक्रमक पवित्रा घेत आहे आणि शेवटी ती नेमकं खूप अपमान करणारं बोलते तेव्हा त्याचा ताबा सुटून हात उचलला जातो ... आणि लगेच क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसतो की हे काय घडून गेलं आपल्या हातून , असा ताबा सुटू दयायला नको होता ... ही इमिजीएट रिऍक्शन सांगते की असा हात उचलला जाणं त्याच्या स्वभावाच्या अगदी विपरीत आहे .... अव्वाई मध्ये असे काहीही पश्चातापाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दाखवलेले नाहीत आणि मारणंही ताबा सुटून नाही तर रागाने जाणीवपूर्वक शिक्षा देण्याकरता मारलं आहे असं वाटतं . ते कमल हसनने चाची मध्ये होऊ दिलेलं नाही .
कोर्टामध्ये मुलीचा ताबा आईकडे देण्यात येणार असल्याचा निर्णय जज देतात तेव्हा अडखळत विरोध करण्याचा प्रयत्न करत " मैं अच्छेसे देखभाल कर सकता हूं ..... " " हर रोज मैं उसका चेहरा देख कर सोया हूं , उसके बिना नही रह सकता " सांगतो... यावेळचा अभिनय अप्रतिम आहे .... त्यातही मान हलवून मुलीला रडू नको म्हणून सांगतो , तीही बापाचं ऐकायचं म्हणून लगेच हाताने अश्रू पुसते पण त्याची मान वळल्यावर आवाज न करता ओक्साबोक्शी रडू लागते तेव्हा क्षणभर चित्रपट आहे याचा विसर पडून जीव कळवळतो .... त्यावेळीही तब्बूच्या चेहऱ्यावर आपण बापमुलीची ताटातूट करत आहोत याचं किंचित दुःक आणि अपराधीभाव जाणवतो .... एवढे बारीकसारीक बारकावे दिग्दर्शकाने लक्षात घेतले आहेत ....
मुलीला सांभाळणाऱ्या बाईसाठीच्या इंटरव्ह्यूला आलेला असताना बाजूला बसलेली बाई सहज मांडीवर हात ठेवते तेव्हा एकदम दचकणं ... अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या अव्वाई मध्ये नव्हत्या त्या कमल हसनने चाची मध्ये ऍड केल्या आहेत .
तब्बूच्या उशीच्या कव्हर मध्ये कमलचा फोटो सापडतो त्यावेळी "पती थे मतलब ? अब नहीं रहे ?" विचारल्यावर ती चटकन " धत् " म्हणते , त्यावेळी अजूनही तिचं आपल्यावर प्रेम आहे हे समजल्याचे भाव कमलच्या चेहऱ्यावर दिसतात ..
ती तो फोटो फाडते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव - अगं_ अगं .... आणि नंतर कधी या बाईला कळणार माझं किती प्रेम आहे तिच्यावर आणि ती समजते तसा मी नाही , कधी मोडलेला संसार सावरणार ..
तिच्या ड्रॉवर मध्ये मंगळसूत्र दिसतं तेव्हाचे भाव ... ती म्हणते ड्रॉवर मध्ये कचरा फार झाला आहे , उद्या साफ करायला आठवण कर तेव्हाचे भाव ...
तिला पिन सापडत नाही तेव्हा मंगळसूत्रात अडकवलेली पिन चाची काढून देते ... मध्यमवर्गीय / वयस्कर स्त्रियांच्या वेषभूषेतले बारकावे टिपले आहेत .
एकूणच चित्रपटात भव्यदिव्य सेट , बंगले गाड्या वगैरे फार नाही ... चाळीचं वातावरण , भाजी बाजाराचा सीन अशी खऱ्या आयुष्याचं चित्रण करणारी दृष्यं जास्त आहेत .... बंगला आहे पण बंगल्याच्या थाटापेक्षा पात्रांवर , संवादांवर लक्ष जास्त केंद्रीत केलं आहे .
अमरिश पुरी यांनी पैशाचा , श्रीमंतीचा गर्व असलेल्या खानदानी वगैरे बिझनेसमन आणि मुलीला कशी परत आपल्याकडे आणली याचा अहम असलेल्या बापाच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे .
परेश रावल आणि ओम पुरी यांच्या भूमिका चित्रपटात किती जान आणणाऱ्या होत्या हे अव्वाई मधला चाळमालक आणि सेक्रेटरी बघितल्यावर समजतं ...
या वयात तुम्हाला जोडीदार हवासा वाटतो तर तुमची मुलगी कशी राहणार अशी एकटी आणखी किती दिवस , तिचा संसार परत नीट सुरू व्हावा याची काळजी नाही वाटत का तुम्हाला असं कमल / चाची अमरिश पुरीना विचारते तेव्हाचा अभिनय अगदी संयत समजूतदार अशा वयस्कर बाईचा उत्कृष्ट अभिनय केला
आहे .
कमल / जयचा टीव्हीवर इंटरव्ह्यू पाहिल्यावर 5 - 7 मिनिटात तब्बूला भेट कशी झाली तिथपासून प्रेमात पडणं , लग्न , एकत्र राहणं त्यातले छोटेसे प्रसंग - मिळून कपडे धुणं मिळून स्वयंपाक करणं , पुढे प्रेग्नन्सी , मुलीचा जन्म , मुलगी मोठी होताना दोघांनी पाहणं , तिघांचे आनंदाचे दिवस असं सगळं डोळ्यासमोरून जातं आणि नकळत डोळ्यातून अश्रू झरू लागतात ... तेच अव्वाई मध्ये स्फुंदून रडणं आणि जुन्या आठवणींऐवजी हिरो हिरोईनचं सतरा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कपड्यात फिरून नाचून म्हटलेलं टिपिकल गाणं आहे .
अव्वाई मध्ये सुरुवातीला तो बायको ही कॉमिक पात्र / कटकटी बायको दाखवण्याचा प्रयत्न केला आहे , जी सतत माझ्या वडिलांच्या घरी हे होतं , ते होतं , मी आता या खुराड्यात कशी राहणार आयुष्यभर , कसलं विहिरीचं पाणी प्यावं लागतं अशा सतत तक्रारी करत असते , उलट चाची मधली तब्बू ऍडजस्ट करत आपल्या परीने सुखाने राहण्याचा प्रयत्न करत असताना अमरीश पुरी पद्धतशीर पणे हळूहळू तिच्यात आणि नवऱ्यात दुरावा निर्माण करतो . तब्बूचं पात्र तुलनेने खूप समजूतदार आहे .... अव्वाईतल्या बायकोच्या अभिनेत्रीपेक्षा तब्बूचा अभिनयही खूप संयत आणि तरीही अधिक जिवंत आहे .
कमलचा सासरा चाचीशी बोलत असताना मुलीने आपल्या मनाविरुद्ध गरीब अशा माणसाशी पळून जाऊन लग्न केलं , पण मी तिला आणलीच शेवटी परत ... हळूहळू पध्दतशीर प्रयत्न करून असं बोलून दाखवतो .... त्याचवेळी त्याला हार्ट अटॅक येतो ... ज्या माणसाने आपला संसार मोडण्यात हातभार लावला त्याला वाचवण्यासाठी कमल ट्रॅफिक , गाड्या कशाची पर्वा न करता लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलात ऍडमिट करतो .... इथे परत त्याचा चांगुलपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे ...
विनोदी म्हणूनसुद्धा खूप उजवा आहे ... हलकाफुलका .. खूप जड , ताप नाही डोक्याला .. मधूनच कधीतरी पाहिला तरी सगळे विनोद पाहिल्यावेळ इतकेच फ्रेश वाटतात एवढा सगळ्यांचा अभिनय सुरेख आहे .
अजून पाहिला नसाल तर एकदा नक्की पाहण्यासारखा आहे .
प्रतिक्रिया
30 May 2019 - 4:45 pm | प्रसाद_१९८२
छान लिहिलेय,
माझा ही आवडता चित्रपट आहे हा.
30 May 2019 - 6:46 pm | nishapari
धन्यवाद :)
30 May 2019 - 5:00 pm | समीरसूर
लेख सुंदरच आहे.
हा भारी चित्रपट आहे. सगळ्यांची कामं अगदी खतरनाक!
ही भारती म्हणजेच 'दंगल'मधली मोठी मुलगी - गीता फोगाट. तिचं खरं नाव फातिमा सना शेख.
30 May 2019 - 6:45 pm | nishapari
हो ..... ते लिहायचं राहून गेलं .
30 May 2019 - 5:21 pm | उगा काहितरीच
छान लिहीलंय !
चित्रपटही ठिक ठिक आहे.
30 May 2019 - 6:46 pm | nishapari
धन्यवाद ...
30 May 2019 - 7:40 pm | अभ्या..
भारी पिक्चर होता, आणि तो जुना अव्वाई शानमुगी नाही, षण्मुगी. षण्मुगी.
बाकी नटासोबत आयेशा झुलका, बिज्जलदेव नासर आणि जॉनी वॉकर राहिले. त्यांचाही तडका भारी होता.
कमल्हासनाच्या बहुतेक चित्रपटात बाईक असली तर बुलेटच असते (मुंबई एक्स्प्रेस वगळता, कारण त्यात मौत का कुआ वाली बाईक दाखवायची होती) ह्याही चित्रपटात चाचीने झोकात बुलेट हाणली आहे.
कमल हसन मेकअप , सिनेमॅटोग्राफीतले प्रयोग आणि व्हिएफएक्स चा चाहता आहे. त्याने कित्येक नवनवीन प्रयोग कायम केले आहेत. ह्या चित्रपटात त्याने प्रोस्थेटिक मेकअप सोबत कम्प्युटर जनरेटेड मॉर्फिंग करून पाह्यलं आहे. त्याकाळात ते नवीनच तंत्र होते.
30 May 2019 - 11:06 pm | nishapari
हे माहीत नव्हतं ... बाकी युट्यूब वर कमेंट्स मध्ये पण जॉनी वॉकरचा उल्लेख आहे पण तो कुठे दिसलाच नाही चित्रपटात 3 - 4 वेळा पाहिला तरी ... नक्की कुठल्या सीन मध्ये आहे ?
31 May 2019 - 4:48 am | सोन्या बागलाणकर
अहो काय सांगताय? जॉनी वॉकर मेकअपमन दाखवलाय (दारुड्या जोसेफ) जो कमल हसनला चाची बनवतो, त्याला कसं काय मिस केलं तुम्ही?
3 Jun 2019 - 5:35 pm | चौथा कोनाडा
आणि चाची ४२० हा जॉनी वॉल्कर यांचा शेवटचा चित्रपट होता.
विस्मृतीत गेलेल्या एका दिग्गज कलाकाराला शोधून त्याला सिनेमात झळकावल्याबद्दल कमल हसन यांच्या वाट्याला कौतुक आले.
मेकअपमनच्या छोट्या भूमिकेत त्यांनी झोकात काम केले होते !
31 May 2019 - 7:17 am | nishapari
हो खरंच की ... लक्षातच नाही आलं .. आता पुन्हा पाहिल्यावर समजलं . :)
30 May 2019 - 7:14 pm | प्रियाभि..
चित्रपट आवडता आहेच पण तुमचं लेखनही आवडलं..
चित्रपटातील आपल्याला समजलेले आणि आवडलेले बारकावे अजून कुणालातरी समजले आणि आवडलेही ही भावनाच गंमतशीर आहे. त्यामुळे लेख अधिक भावला.
चित्रपटाबद्दल थोडंसं: ओढून ताणून विनोदी सीन्स न घालता फक्त शब्दाच्या कोट्या वापरून कितीतरी गम्मत आणली आहे. सर्व कलाकारांनी अप्रतिम कामे केली आहेत.
30 May 2019 - 11:04 pm | nishapari
धन्यवाद :)
30 May 2019 - 7:51 pm | प्रसाद_१९८२
या चित्रपटात ओम पुरीचा, विनोदी अंगाने जाणारा अभिनय मला जास्त भावला.
त्या आचार्याला "चलो गायत्री मंत्र बोलो" असे तो ज्या खूबीने म्हणतो ते अगदी लाजवाब आहे.
30 May 2019 - 10:28 pm | nishapari
हो :) म्हटलं तर दुय्यम पात्र आहे पण सिनेमा एवढा छान होण्यात त्यांच्या अभिनयाचाही बरोबरीचा वाटा आहे ... विशेषतः अव्वाई षण्मुगी मधला सेक्रेटरी अगदी सामान्य व्यक्तिमत्व दाखवलं आहे , त्या पार्श्वभूमीवर ओम पुरींनी रंगवलेलं पात्र अधिकच भावलं ..
30 May 2019 - 8:59 pm | ज्योति अळवणी
छान लिहिलं आहात. सिनेमा देखील अप्रतिम आहे
30 May 2019 - 8:59 pm | ज्योति अळवणी
छान लिहिलं आहात. सिनेमा देखील अप्रतिम आहे
30 May 2019 - 11:07 pm | nishapari
धन्यवाद
31 May 2019 - 4:37 am | सोन्या बागलाणकर
सुंदर लेख!
खरंच उत्कृष्ट सिनेमा आहे. कमल हसन आणि त्या छोट्या फातिमा सना शेख यांचा अभिनय इतका नैसर्गिक आहे कि दोघं खरोखरीच बाप लेक आहे असं वाटतं. मुख्य कलाकारांबरोबरच परेश रावल, ओम पुरी, जॉनी वॉकर, अमरीश पुरी या सर्वांचा अभिनय लाजवाब!
31 May 2019 - 7:26 am | बबन ताम्बे
पण जास्त धमाल परेश रावल, ओम पुरी यांच्या भूमिकांनी येते.
जॉनी वाकर पण छोट्या रोल मध्ये भाव खाऊन जातो.
ए भैया ये मेरे पाव है - परेश रावल
शेठजी, इस औरत का कॅरेक्टर बहुत कन्फ्युजिंग है - ओम पुरी
असल्या डायलॉगने आणि त्यातल्या प्रसंगांनी हसून हसून पुरेवाट होते
31 May 2019 - 2:03 pm | हस्तर
ये घर हैं या कंजर खाना
ओम पुरी लगेच > कंजर खाना
31 May 2019 - 10:41 pm | nishapari
हो ... माझे आवडते संवाद म्हणजे - जब जब भाडे की बात करता हूं पोजिशन टाईट हो जाता है तेरा ... साधाच डायलॉग पण परेश रावलच्या डिलिव्हरीने अधिक मजेशीर वाटतो ...
शिवाय कोर्टातले - ये आपसे किसने कहा , जानकीने ? " नहीं , जानकी के घरवालेने" " घरवाला तो मैं हूं " " घरवाला नही वकीलसाब मकानमालिक "
फोनवरून बोलताना लक्स - मी , लक्ष्मी गोडबोले , वा क्या नाम है , लक्षमी गोडबोले वही मेरा नाम है .. , नंतर लक्ष्मी क्या ? "औरत ! " " अरे वो तो तुम्हारी आवाज से पता चल रहा है , सरनेम क्या " आणि मग जे काही बाजीरावाच्या खानदानाशी अर्धवट मराठी शब्दांचा वापर करून नातं सांगतो , तेव्हा पण हसू आवरत नाही .
परेश रावल कुठलीही भूमिका अगदी सहज करू शकतात ... किती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत त्यांनी .. चाची मधला घरमालक वेगळा , हेराफेरी मधला बाबुराव आणखी वेगळा , क्रांतिवीर मधला घरमालक आणखी वेगळा... व्हिलन , कॉमेडी भूमिका , बिजनेसमन , श्रीमंत माणूस , गरीब माणूस , राजकारणी , कुटुंबवत्सल गृहस्थ .. अक्षरशः असंख्य वेगवेगळ्या भूमिका अप्रतिम साकारल्या आहेत .
3 Jun 2019 - 12:53 pm | अनिंद्य
@ nishapari,
सुंदर रसग्रहण !
पुरुषांनी स्त्रीपात्र रंगवणे आणि तद्दन शारीर अभिनय करत हास्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणे मला पसंत नाही, पण चाची ४२० मध्ये कमल हसन चीप होत नाही आणि तरीही खूप हसवतो. तमिळ बटबटीतपणा प्रयत्नपूर्वक टाळला आहे.
अमरीश पुरी आणि ओम पुरी दोघांचे प्रसंग धमाल आहेत - बलवा तुम अभी यहाँ से नही गये तो मै तुम्हे नौकरी से निकाल दूंगा :-) 'सिराज उर्फ शिव-राज' याचे गायत्री मंत्र पठण, त्यावर दोन्ही पुरींची प्रतिक्रिया :-) :-) 'हरिभाई कन्व्हर्ट होके गोडबोले बनेगा तो नाम बदलेगा, शकल कैसे बदलेगी? असा बिनतोड सवाल.. फार सटल पण खदखदून हसवणारे अनेक प्रसंग चाचीत आहेत.
'चाची ४२०' हे चित्रपट मी कुठंही, कुठूनही आणि कितीही वेळा बघू शकतो :-) सर्व डायलॉग पाठ आहेत. असे आणखी दोन चित्रपट म्हणजे 'जाने भी दो यारों' आणि 'अंदाज अपना अपना'. टोटल स्ट्रेसबस्टर
अनिंद्य
3 Jun 2019 - 9:03 pm | nishapari
पुरुषांनी स्त्रीपात्र रंगवणे आणि तद्दन शारीर अभिनय करत हास्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणे मला पसंत नाही, पण चाची ४२० मध्ये कमल हसन चीप होत नाही आणि तरीही खूप हसवतो. तमिळ बटबटीतपणा प्रयत्नपूर्वक टाळला आहे.
101 % खरं आहे . अंदाज अपना अपना पाहिला आहे , जाने भी दो यारो अजून पाहिलेला नाही , पाहीन आता .
10 Jun 2019 - 1:50 am | टीपीके
असाच एक लेख अंदाज अपना अपना वर येऊ देत, आत्ता 40-50 व्या वेळी बघतो आहे, बेस्ट हिंदी विनोदी चित्रपट. इतका मूर्खपणा करणं सोपं नाही.
11 Jun 2019 - 1:05 pm | चौथा कोनाडा
+१
लिहायचं मनावर घ्याच !
3 Jun 2019 - 1:19 pm | पद्मावति
मस्तं लिहिलंय nishapari तुम्ही.
"पुरुषांनी स्त्रीपात्र रंगवणे आणि तद्दन शारीर अभिनय करत हास्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणे मला पसंत नाही, पण चाची ४२० मध्ये कमल हसन चीप होत नाही आणि तरीही खूप हसवतो. तमिळ बटबटीतपणा प्रयत्नपूर्वक टाळला आहे." +१००
3 Jun 2019 - 7:39 pm | चांदणे संदीप
या चित्रपटाशी संबंधित माझी मजेशीर आठवण म्हणजे, "चाची के पास हल है, चाची तो बिरबल है" अशा ओळी असणाऱ्या गाण्यात चाचीकडे हल (हल = हिंदीत नांगर) का असतो असा मला नेहमी प्रश्न पडायचा. नंतर पुढे कधीतरी माझा मलाच त्याचा खरा अर्थ कळाल्यावर जाम हसायला आले होते. =))
Sandy
9 Jun 2019 - 11:41 pm | बोबो
ते खुसखुशीत संवाद गुलझार यांनी लिहिले आहेत
10 Jun 2019 - 6:34 pm | मराठी कथालेखक
मी विनोदी चित्रपटांचा फारसा चाहता नाही पण चाची मलाही जबरदस्त आवडतो..ओम पूरीचं पात्र फारच भन्नाट आहे..प्रत्येकवेळी वेळ मारुन न्यायची आणि कोलांटीउडी मारायची सवय अप्रतिम रंगवलीये..
कमल हसन बद्दल बोलताना "जमाई राजा ..? "पासून "कहा का राजा ?"
किंवा स्वयंपाकीणबाईला हाकलायची वेळ येते तेव्हा "जिस चांदी की थाली मे खाती हो वही छेद करती हो.." म्हणत हळूच तिच्याकडे चांदीची थाळी देण्याचा प्रयत्न करतो...
अमरीश पुरी ला हृदयविकाराचा झटका आल्यावर लगेच त्याच्या अत्यंसंस्काराची तयारी चालू करतो..
कमल हसनचा चित्रपट असून त्याने ओम पूरीचं पात्र कदाचित आपल्यापेक्षाही उजवं ठरु शकेल याची कुठलीही फिकीर न करता ते पात्र जबरदस्त बनवलं आहे.. हे कलेवरचं प्रेम..
11 Jun 2019 - 1:17 pm | अभ्या..
मला तर ह्या चित्रपटाचे एक भारी मर्म मित्राने सांगितलेले होते. ते आठवूनही जाम हसु येते.
कमल हसन हा पास्वान असतो म्हणजेच मागासवर्गीय समाजातला, म्हणूनच भारद्वाज उच्च्वर्णीय असलेला अमरीशपुरी त्याची मुलगी त्याला देत नसतो. लग्नानंतरही अमरीशपुरीने मुलगी व तिची छोटी मुलगी(नात) ह्यांना पास्वानविषयी खोटे बोलुन स्वतःकडेच ठेवलेले असते. नातीचे नावही भारती दाखवलेले आहे. पास्वानला मदत करणारे दोघे मित्र, त्यातील एक ख्रिश्चन असतो(जोसेफ) आणि दुसरा मुस्लीम(शिराज, शिवराज) असतो.
म्हनजेच उच्चवर्णीयांनी उच्चनीचता पाळत भारतमातेला वेठीस धरले आहे, मागासवर्गीयांना आणि मुस्लिमइसाइंनाही त्यांबद्दल खरी माया व आपुलकी आहे. जोपर्यंत त्यांच्या मनातील चांगुलपणा उच्चवर्णीयांना कळणार नाही तोपर्यंत सर्वांना सुखाचे दिवस येणार नाहीत. ही भारताची सध्य स्थिती आहे असे त्या मर्माचा निष्कर्ष होता.
11 Jun 2019 - 5:43 pm | चौथा कोनाडा
हे भारी आहेय राव ! कसं लक्षात आलं नाही आपल्या ?
मर्मज्ञ लोकांना कश्यात काय काय दिसत असतं नै !
11 Jun 2019 - 7:34 pm | चांदणे संदीप
मित्राच्या पायाचा फोटू काहाडला पाह्यजे. ;=)
Sandy
12 Jun 2019 - 3:04 am | जॉनविक्क
हा प्रतिवाद त्यावेळी ऐकला होता.
जसे महेश भटच्या बऱ्याच चित्रपटात एक निष्पाप *हिंदू नसलेलं* पात्र गुड कॉजसाठी(हिरोचे भले व्हावे म्हणून) हमखास मरतेच तसेच हे ही ऐकलं आहे.