महामार्ग सोडून उजवीकडे वळले की दुरुनच आमच्या गावची वेस दिसते. दुरुन नुसती काळ्या चौकोनी इमारती सारखी दिसणारी ही वेस जसजसं जवळ जाऊ तसतसं आपलं सौंदर्य दाखवायला सुरवात करते. नविन माणूस जवळ आला की वेशीची भव्यता पाहून चकित होतो. सगळ्यात वरती नगारखाण्यासारखी जागा. त्याखाली बंदूकींसाठी असलेली तिरकी भोके, म्हणजे जंग्यांची रांग. दोन्ही बाजूला कोरलेली अलंकारीक फुले. मधोमध सोंड उंचाऊन चित्कारणारा हत्ती. भव्य दारांपैकी एकच शिल्लक असलेले दार. त्या दाराकडे पाहूनच वेस किती मजबूत असणार याचा अंदाज येतो. हत्ती सहज जाऊ शकेल इतक्या उंचीच्या दारावर हत्तीने धडक मारू नये म्हणून ठोकलेले खिळे काढून टाकले आहेत. आतल्या बाजूला दोन देवड्या. पुर्वी येथे बसून पहारेकरी पहारे देत असतील पण सध्या गावातील म्हातारी माणसे देवडीत बसुन पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारताना दिसतात. कुणी म्हणतं ‘थोरल्या म्हाराजांनी’ ही वेस बांधली तर कुणी म्हणते ‘पंत सरकारने’ बांधली. कुणीका बांधेना पण बांधली होती मात्र एकदम भक्कम आणि रेखीव. वेशीतुन आत प्रवेश केला की गाव सुरु व्हायचे. गेल्या काही वर्षात ही वेस गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात आली आहे. वेस आत आली म्हणन्यापेक्षा गावच वेस ओलांडून बाहेर गेलय. अगदी सगळ्याच बाबतीत. पुर्वी या वेशीच्या आत गाव होता आणि बाहेरच्या बाजूला बाजारओटे. हे मात्र ‘सायबाने’ बांधले होते. साधारण आठ बाय पंधरा फुटांचे दहा बारा ओटे साबणाच्या वड्या रांगेत मांडाव्या तसे दोरीत बांधलेले होते. प्रत्येक ओट्यावर भेंडीची दोन दोन झाडे होती. भर उन्हात या झाडांची सावली सगळ्या बाजरओट्यांना आपल्या पंखाखाली घ्यायची. येथे आठवडी बाजार भरायचा. या बाजारओट्यांच्या दुसऱ्या टोकाला दोन-अडीचशे वर्षांचा भला थोरला पिंपळ होता. त्याच्या बुंध्याला मिठी मारायला किमान चार माणसांना घेर धरावा लागे. या पिंपळाच्या नजरेखाली बाजार आणि गावाचे व्यवहार चालत. आम्ही मित्र कधी कधी संध्याकाळी या पिंपळाच्या खाली असलेल्या ओट्यावर गप्पा मारत बसायचो. वर कावळे आणि बगळ्यांची शाळा भरत असे आणि खाली आमच्या गप्पाचा फड रंगत असे.
असेच एकदा गप्पा मारत बसलो होतो. गप्पा कसल्या म्हणा. दत्त्याने कुठून तरी एक कोडं पैदा केलं होतं. ईंग्रजी यू आकाराच्या कडीमधे बदामाच्या आकाराची कडी गुंतवलेली होती. त्या दोन्ही कड्या वेगवेगळ्या करायच्या होत्या. दत्त्याने आठ दिवसांचा अवधी दिला होता कोडं सोडवायला. आजचा तिसरा दिवस. दंगा जास्त व्हायला लागल्यामुळे सगळे शाम्याच्या ओट्यावर न जमता तिन दिवस बाजारओट्यावर जमत होतो. प्रत्येकजण आपापल्या परीने कोड्यात डोकं घालत होता. मला तर वाटायला लागले की हे कोडे सोडवणे अशक्य आहे. दत्त्याने गम्मत केली असणार. आपण आठ दिवस डोकी दुखवायची आणि नंतर हा म्हणनार “काय कोडं बिडं नाय रे, उलशीक गम्मत केली तुमची.” या दत्त्याचा काही भरवसा नाही. पण एकदा त्याने आमच्याकडे पाठ करुन दोन सेकंदात कड्या वेगळ्या करुन दाखवल्या व परत एकमेकात गुंतवल्या. त्यामुळे आता सोडवणे भागच होते. वर दत्त्याचा त्रास असेच.
“काय बामना, कुठं गेली तुझी पंतोजीची बुध्दी? पंचामृत खाईना झाला का काय?” म्हणत तो शाम्याला खिजवायचा.
“लय उड्या हानतो अप्पा तू दरयेळेला, आता काय झालं?” म्हणत माझे कान पिळायचा. धोंडबाला टाळ्या द्यायचा.
शाम्या वैतागून म्हणाला “दत्त्या, मर ना तिकडे मळ्यात जाऊन. सोडवतोय ना आम्ही. पळ, कांद्याला पाणी भरुन ये परत.”
मी हातानेच त्याला ‘जा, जा’ म्हणून खुणावले. माझे डोळे कोड्यावरुन हलत नव्हते. आज सोडवल्याशिवाय घरी जायचेच नाही असं ठरऊनच मी कोडं हातात घेतले होते. मी आता हा माझ्या प्रतिष्ठेचा विषय करुन घेतला होता.
इतक्यात कुणी तरी किनऱ्या आवाजात विचारलं “मै कोशीश करु क्या भाई?”
मी दचकून मान वर करुन पाहीलं. समोर साधारण माझ्याच वयाचा मुलगा उभा होता. गोरा पान, मानेपर्यंत सरळ मऊ केस, सुरमा घातल्याने अजुनच टपोरे दिसणारे डोळे, तरतरीत नाक, साधारण लांब असलेली मान, देखणा म्हणावा असा चेहरा, निळा कुर्ता आणि खाली चांगला वितभर आखूड असा पांढरा पायजमा. मी पहातच राहीलो. माझ्या रोखून पहाण्यामुळे तो जरा गोंधळला आणि शकीलकडे पाहू लागला. शकीलने मला हलवत सांगीतले “अरे अप्पा, ये तन्वीर, माझा दुरचा चाचा आहे. सगळे गनी म्हणतात याला.”
मी फक्त मान डोलावली. गनीमध्ये काहीतरी वेगळे होते.
शकीलच पुढे म्हणाला “आपली गोडाऊनची खोली होती ना, ती दिलीये अब्बांनी यांना. आता हे येथेच रहातील. मुंबईला होते अगोदर.”
मी परत “हूं” एवढचं म्हणालो. गनीमध्ये काय वेगळं होतं तेच समजत नव्हते.
एवढ्यात गनी पुन्हा म्हणाला “सोडवू का मी हे?”
मी हातातले कोडे न बोलता त्याच्या समोर धरले. गनीने कोडे हातात घेतले आणि आमच्याकडे पाहीले. शाम्याने घाईने त्याला ओट्यावर बसायला जागा करुन दिली. गनीने प्रथम फुंकर मारुन ओट्यावरची बसायच्या जागेवरची धुळ उडवली. एका पायाने मांडी घालून दुसरा पाय मुडपुन छातीजवळ धरला. कुरत्याच्या खिशातुन पांढरा स्वच्छ रुमाल काढून समोर अंथरला. मला काही समजेना. आता हा काय जादू वगैरे करुन दाखवणार की काय. मी धोंडबाकडे पाहीले. त्याने डोळ्यानेच “पुढे काय होते ते पाहू” असं सुचवल्याने मी गप्प बसलो. गनीने हात फिरवून रुमालाच्या घड्या काढल्या. दुमडलेले कोपरे निट केले आणि हातातले कोडे रुमालाच्या मधे ठेवले. आम्ही उत्सुकतेने पहात होतो तो काय करतोय ते. मग गनी दिड दोन मिनिट गंभीरपणे त्या कोड्याकडे टक लावून पहात राहीला.
दत्त्या म्हणाला “आता ह्यो काय नजरचां खेळ दावतो का काय?”
पण गनीकडे पाहून त्याला सगळ्यांनी गप्प केले. थोड्याच वेळात गनीच्या विचारी चेहऱ्यावर हसू आले. त्याने कोड्याच्या दोन्ही कड्या रुमालापासून थोड्या वर उचलल्या. हलक्या हाताने विशिष्ट पध्दतीने मागे पुढे केल्या. सेकंदातच त्या वेगवेगळ्या केल्या आणि ओट्याखाली उतरुन, एक हात कमरेवर व दुसरा गालावर ठेवत आमच्याकडे हसत पहायला लागला. मला समजलेच नाही त्याने कसे केले ते. शाम्याने जोरात शिट्टी वाजवली. धोंडबा दत्त्याच्या पाठीत जोरात गुद्दा घालत म्हणाला “घे लेका कोडं!” दत्त्याचा चेहराच पडला. शकीलने समाधानाने गनीच्या पाठीवर थाप मारली.
“आजपासुन तू आमचा दोस्त” असं मी आनंदाने म्हणत डाव्या हाताने गनीच्या हाताचे मनगट पकडले आणि उजवा हात त्याच्या तळव्यावरुन हलकेच फिरवत एकदम जोरात टाळी दिली. आमची ती पध्दतच होती. टाळी अशी द्यायची की ज्याला दिली तो तर कळवळलाच पाहिजे पण ज्याने दिली त्याचा हातही हुळहूळला पाहीजे. माझ्या हाताला चांगल्याच झिणझीण्या आल्या. मी आनंदाने गनीकडे पाहीले तर त्याने दोन्ही हात मांड्यामधे दाबून धरले होते. माझ्या अपेक्षेपेक्षा तो जरा जास्तच कळवळला होता. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी उतरले होते.
मी घाईत विचारले “गनी, लागले का रे जोरात?”
गनीने हसत ‘नाही’ म्हणून मान हलवली. पण त्याच्या डोळ्यातले पाणी गालावर ओघळले. मी त्याचा हात हातात घेऊन पाहीला. रेशमा सारखा मऊ हात अगदी लालबुंद झाला होता. मला वाईटही वाटले आणि आश्चर्यही. इतका मऊ हात तर आमच्या इन्नीचाही नव्हता. ही गनीची आणि माझी पहिली भेट.
आम्ही संध्याकाळी गप्पा मारत बसलेलो असलो की कधीमधी गनी रस्त्त्यावरुन लगबगीने जाताना दिसायचा. त्याचा तो कुर्ता आणि आखुड पायजमा विचित्र दिसायचा पण त्याची चाल मात्र अगदी लयबध्द असायची. दोन पावलांमधे कमी अंतर टाकल्याने तो जास्तच लगबगीत असल्यासारखा वाटायचा. एकदा गनी असाच आमच्यासमोरून जात होता. डाव्या हातात त्याचा तो स्वच्छ ‘जादूचा’ रुमाल आणि उजव्या हातात कसलीशी पिशवी.
मी हाक मारली “गनी, जरा इकडे ये रे.”
गनी रस्त्यावरच थोडा वेळ थांबला मग एखाद्या बुजलेल्या जनावरासारखा जवळ येऊन म्हणाला “जी?”
दत्त्या म्हणाला “आम्हाला पाहुनबी सरळ म्होरं निघून जातो गनी, ह्यो अकडुपना बरा नव्हं”
मी दत्त्याला गप्प करत म्हणालो “काय घेऊन चाललाय रे?”
“काही नाही, अम्मीने गोश्त आणायला सांगीतले होते, ते घ्यायला चौकात गेलो होतो.” गनी.
मी म्हणालो “अरे मग कादरला किंवा गफुरला का सांगत नाही? कुणीही आणून देईल ना घरी.”
“अम्मी नको म्हणते. मी जाऊ?” गनीला कधी एकदा तिथून जातो असं झालं होतं.
मग मीही त्याला जास्त न थांबवता “बरं जा” म्हणालो.
इन्नी दारातच उभी होती. ती म्हणाली “गनी, संध्याकाळी भाईकडे ये. मी गोड शिरा आणनारे. येशील ना?”
“हो दिदी, येईन नक्की.” जाता जाता गनी हसत म्हणाला. इन्नीशी बोलताना त्याचा संकोच कुठल्या कुठे पळाला होता.
शाम्या हसुन म्हणाला “च्यायला, आपल्याशीच बोलायला याच्या जीवावर येतं आणि हिच्याबरोबर बघ कसा बोलला जाताना. इन्नी आणि गन्नी.” शाम्याचे ‘इन्नी आणि गन्नी’ हे यमक ऐकून सगळे हसले.
इन्नी ठसक्यात म्हणाली “तुम्ही फक्त दुसऱ्यांची टिंगल करा. मग कोण जवळ येईल तुमच्या?”
काकूंनी चार चार वेळा पाककृती सांगुनही आईला कधी त्यांच्यासारखा शिरा जमत नाही. त्यामुळे मी संध्याकाळी शकीलकडे हजर झालो. इन्नी नुकतीच आली होती. शकील गनीला बोलवायला गेला होता. अम्मीने डिशमधे शिरा वाढला होता. शकील आला, मागोमाग गनी. माझं लक्ष शिऱ्याकडे होतं. मी इन्नीला चमचे आणायला सांगत होतो इतक्यात अम्मीचा कापता आवाज आला “या खुदा! भाईजान काय झालं?”
मी अम्मीचा तो आवाज ऐकून चमकून पाहिले. गनी टेबलजवळ मांडी घालून बसत होता. त्याचा डावा डोळा सुजल्यामुळे जवळ जवळ बंदच झाला होता. कपाळावरही हळद लावली होती.
“गनी, काय झालं रे? पडलास का कुठे? अरे किती लागलय हे.” मी न रहाऊन विचारलं.
माझा प्रश्न ऐकला आणि गनी रडायलाच लागला. आम्ही सगळे गोंधळलो. अम्मी त्याच्या पाठीवर हात फिरवत बसुन राहीली. तिने त्याला रडू दिले. मग सावकाश विचारले “क्या हुवा भाईजान?”
पण गनीने काहीही उत्तर दिले नाही. तो चमच्याने समोरचा शिरा चिवडत राहीला. मग अम्मीही जरा सावरुन घेत म्हणाली “घ्यारे खाऊन शिरा सगळ्यांनी. पहले त्या ठोब्बाके लिए ठेवा थोडा बाजूला काढून.”
मग आम्हीही काही झाले नाही अश्या पध्दतीने शिरा खायला सुरवात केली. गनीने चमचा बाजूला ठेवला आणि हाताने शिरा खायला सुरवात केली. आम्ही गप्पा मारत शिरा संपवला. गनीने न बोलताच शिरा खाल्ला आणि अम्मीला “शुक्रीया भाभी, अब घर जाके हात धोता हूं।” म्हणत उठून गेला. तो गेला आणि अम्मीने शकीलला विचारले ‘काय झाले?’ म्हणून.
शकील म्हणाला “कुछ नही अम्मी. त्याचे अब्बू दुपारीच पिऊन आले आणि गनीला आणि त्याच्या अम्मीलाही मारलं.”
अम्मीने आश्चर्याने विचारले “पिके आया था? आणि का मारलं त्याने?”
शकील जरा वैतागूनच म्हणाला “अम्मी, आता मला काय माहित का मारले ते. आठ दिवस नाही झाले त्यांना येथे येऊन. आपल्याला कसं कळणार त्यांच्या घरी नक्की काय अडचण आहे ती? अब्बांनी खामखा आणले त्यांना येथे.”
“तू का चिडतोस एवढा. कुछ सोचकेही तेरे अब्बू ले आए होंगे उन्हे.” म्हणत अम्मीने विषय संपवला.
मधे चार दिवस गेले. आमचं कॉलेज, बाकीचे उद्योग सुरुच होते. मी गनीला विसरलो होतो. तो दिसला नव्हता कुठे. आज रविवार होता. आई बाबा स्कुटर घेऊन मावशीकडे गेले होते त्यामुळे मी पायीच गावात चाललो होतो. वेशीच्या अलीकडेच मला गनी खाली मान घालून जाताना दिसला. त्याला पहाताच मी गनीला हाक मारुन थांबायला सांगितले. पण त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि चालायची गती वाढवली. मी “गनी, अरे गनी थांब” म्हणत त्याच्या मागे धावलो.
मी त्याला धावतच गाठले “काय रे गनी. आवाज देतोय तरी का थांबला नाही?”
“कामसे जा रहा था। जल्दी है जरासी।”
“अरे हो! पण चाललाय कुठे? आणि चार दिवस दिसला नाहीस ते. बाहेर गेला होता का कुठे?” मी
“नाही येथेच होतो. अम्मीला सब्जीला काही नाही म्हणून बैदे आणायला चाललोय.” गनी परत निघायची तयारी करत म्हणाला.
“तू चल माझ्या बरोबर. अंडी पोहचवतो मी तुझ्या घरी” म्हणत मी गनीचा हात धरला आणि त्याला मागे फिरवले.
“हात सोडा मेहरबानी करुन. मी येतो.” म्हणत गनीने त्याचा हात सोडवून घेतला.
खरं तर आज रामच्या वखारीत नवा माल आला होता. तो आजच नजरेखालून घालायचा होता. दुसऱ्या दिवशी सगळी लाकडे मिलवर चढली असती. एखादी लाकडाची गाठ किंवा सुंदर साल असली तर ती हातातून जाणार होती. पण मी तिकडे दुर्लक्ष केले आणि गनीला घेऊन दत्त्याच्या मळ्याकडे निघालो.
गनीचा डोळा व्यवस्थित झाला होता. कपाळावरच्या जखमेवर खपली धरली होती. तरीही मी काहीतरी विचारायचे म्हणुन विचारले “डोळा कसा आहे तुझा? दुखत नाही ना?”
गनी त्याच्या किनऱ्या आवाजात म्हणाला “अब ठिक है. शुक्रिया आपका.”
मी त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला जवळ ओढले आणि म्हणालो “अरे, हे अहो जाहो काय लावलय गनी तू? सरळ अप्पा म्हण. माझ्याएवढाच किंवा थोडा लहानही असशील.”
त्याने अंगावर पाल पडावी तसा खांदा झटकून माझा हात काढला. “ओळख नाही ना अजुन. आता आपाच बोलूंगा.”
त्याचे ते खांदा झटकने मला खटकले पण तिकडे लक्ष न देता मी हसत म्हणालो “मी काय तुझी आपा आहे का गनी? अप्पा म्हण निट. दत्त्याला कळले तर नको नको करील आठ दिवस.”
गनी पहिल्यांदाच हसला. म्हणाला “दत्त कोण?”
मी मोठ्याने हसत म्हणालो “दत्त नाही रे, दत्ता. दत्त पण चालेल म्हणा. ते तसं अवगुणीच आहे. हवा तेंव्हा नसतो आणि नको तेंव्हा ‘दत्त’ म्हणून हजर. होईल तुला हळूहळू माहित सगळं. अजुन तुझ्या ओळखी झाल्या नाहीत ना म्हणून.”
आम्ही गप्पा मारता मारता दत्त्याच्या मळ्यात पोहचलो होतो.
एवढ्यात जोरात हाळी ऐकायला आली “अप्पा होऽऽ इकडं इकडं”
आम्ही पाहीले तर दत्त्या कांद्याच्या रानातुन हात हलवत होता. मग आम्ही रस्ता सोडून शेतात घुसलो.
आम्ही दत्त्याजवळ पोहचलो. दत्त्या गनीला पाहून खुश झाला. “मंग गनीभौ, इकडं कुणीकडं आज?”
गनी नुसताच हसला. पोटरीशी खेळणाऱ्या कांद्याच्या पाती तोडत तो कधी माझ्याकडे तर कधी दत्ताकडे पहात राहीला.
दत्त्या बाजूला पडलेली चप्पल घालून म्हणाला “असुंदे असुंदे. चल गनीभौ ताक पिवू. म्हतारीनं सकाळीच घुसळलय.”
दत्त्याला मधेच अडवत मी म्हणालो “दत्त्या, लेका तुझं ताक राहूदे जरा. आधी धोंडबाकडे जा आणि पाच सहा अंडी पोहचव अम्मीकडे. गनीच्या आईला हवी आहेत. आणि लगेच निघ”
“अरं पण ताक तं पिवू देशीन का नाय गनीला? तुझं आपलं नेहमीच घोड्यावर असतय काम.” दत्त्या कुरकूरला.
“जा रे तू. गनीची अम्मी थांबलीए स्वयपाकासाठी. मी घेईन आईकडून ताक मागून. तू हाल अगोदर.” मी दत्त्याला बळेच तेथून हाकलला. घरी गेलो. गनीला ओट्यावरच थांबऊन मी आईकडून थोडं मिठ, एक ग्लास आणि ताकाचा तांब्या आणला आणि गनीला म्हणालो “चल गनी. विहिरीवर जाऊन बसू.”
मी त्याला काठोकाठ ग्लास भरुन दिला. थोडं मिठ टाकून दिले आणि उरलेला तांब्या तसाच तोंडाला लावत त्यालाही पिण्याची खुण केली. ताक खरच गोड होतं. लोणी काढायच्या बाबतीत दत्ताच्या आईचा हात फारच हलका होता. “तेवढंच पोराबाळांच्या मुखी पडंन” असं म्हणत ती बरेचसे लोणी ताकात ठेवत असे. ते लोण्याचे छोटे छोटे दाणे मी जीभेने टाळूवर घासत गनीला म्हणालो “कसं आहे ताक?”
“मिठा आहे” म्हणत त्याने नाजूकपणे ग्लास तोंडाला लावला. ताक पिल्यामुळे मला मस्त पांढऱ्या मिशा आल्या होत्या. पण गनीच्या ओठावर ताकाचा थेंबही दिसत नव्हता. ताक पिल्यावर मी त्याच्याकडून ग्लास घेतला आणि उड्या मारत विहिरीच्या पायऱ्या उतरलो. ग्लास, तांब्या स्वच्छ विसळून वर आलो तर गनी माझ्याकडे डोळे विस्फारुन बघत होता. त्याने दोन्ही हातांचे तळवे एकावर एक ठेवून छातीवर दाबले होते. मला वाटले त्याने साप वगैरे पाहीला की काय.
मी विचारले “काय रे? किडूक वगैरे पाहीले की काय? साप रे.”
मान हलवत गनी म्हणाला “नही. तू उतरला कसा? गिर जाता तो?”
“सवय आहे रे. तू धोंडबाला पहायला पाहीजे उतरताना. दोन दोन पायऱ्या सोडून उतरतो. ते जाऊदे. बस आता निवांत.” म्हणत मी पंपाच्या खोलीतून वाकळ काढली आणि मोटेचे पाणी पडण्यासाठी असलेल्या चौकोनात अंथरली.
मी कडेच्या कट्ट्याला आरामात रेलून बसलो होतो. पण गनीमात्र फारच अवघडून बसला होता. काही मिनिट आम्ही दोघेही काहीही न बोलता शांत बसून राहीलो. तो बोलणार नाही हे माझ्या लक्षात आले. मला जे बोलायचे होते त्याची सुरवात कशी करावी ते मलाही समजेना.
मग गनी जरा सैलावून बसत म्हणाला “अप्पा, तुला बरेच काही विचारायचे असेल ना?”
“नाही रे. रामकडे चाललो होतो तर तू दिसलास. दत्ताचा मळा पाहीला नाहीस तू म्हणून इकडे घेवून आलो.” याला माझ्या मनातले कसे कळले ते मला समजेना.
तो वाकळेच्या दशांबरोबर खेळत म्हणाला “तसं नाहीए अप्पा. लेकीन मी सांगतो तूला आज सगळं. आजतक कुणासमोर दिल खोलके बोललो नाही पण तुम्ही सगळे पसंद आलात मला.”
“तसं नाही रे गनी. सगळेच चांगले आहेत गावात. हां, आता एखाद दुसरा आहे अतरंगी पण ते कोणत्या गावात नसतात?”
मी पाय पसरुन अजुन निवांत होत त्याला म्हणालो “पण तू बोल. मन मोकळं करावं रे कुणाकडे तरी. बरं वाटतं.”
गनी थोडावेळ विचार करत राहीला. मग एक एक शब्द सावकाश उच्चारत म्हणाला “अप्पा, अल्लामियाने मला किन्नर बनाके जन्माला घातले आहे.”
तो काय म्हणतोय ते मला काहीच समजले नाही. यक्ष काय, किन्नर काय. गंधर्व-किन्नर तर आपल्या कथेत असतात, मुसलमानांमध्ये कसं काय? हा काय बोलतोय ते माझ्या लक्षात येईना.
गनीने माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहीले. मला काही समजले नाही हे त्याच्या लक्षात आले.
मान वेळावत तो म्हणाला “तुझे कैसे समझाऊ अप्पा?” मग तो बराच वेळ गप्प बसला.
मी म्हणालो “हे बघ गनी, मला काही समजुदे नाही तर नाही. तू बोलत रहा फक्त. मला समजायचं असेल तर समजेल काही, नाही तर नाही समजणार. पण तुला बरे वाटेल.”
गनी म्हणाला “देख अप्पा, तू माझी फिकीर करु नकोस. तू समज नाही पाएगा. तुला माझी फिकीर वाटली ये बहोत है. कुणी आपली काळजी करत आहे याचीच मला सवय नाही राहीली आजकल.”
मला एकदम कळवळल्यासारखं झालं त्याचं बोलणं ऐकून. त्याच्या विषयी कणव दाटून आली मनात. वडीलांनी मारलं, ते पितात वगैरे ठिक आहे पण घरी प्रेमळ आई आहे, शकील-अम्मी सारखे नातेवाईक आहेत, चांगला हुशार आहे मग काय असं दुःख असेल याला या वयात?
मी त्याला खेटून बसत त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणालो “होईल रे सगळे ठिक. देव काही इतका वाईट नसतो. आणि तुमच्यातही हे असं किन्नर वगैरे असतं हे माहीत नव्हते मला, तसं आमच्यात पण देवदासी वगैरे असतं. तू तरी तुझ्या आई वडीलांसोबत रहातो. पण आमच्यात देवदासी म्हणून सोडलं ना की घरात राहू देत नाहीत. देवळातच रहावं लागतं लहानपणापासुन. आणि भुत्ये, जोगते असलं पण काय काय असतं. चालायचंच.”
मला असं वाटलं होतं की हिंदूमध्ये जसं देवीला सोडतात तसं असेल यांच्यात किन्नर म्हणून अल्लाच्या नावाने सोडायचे. शकीलकडुन तर कधी असं काही ऐकलं नव्हतं पण मुंबईचे काय सांगावे? असेलही. त्याने माझा खांद्यावरचा हात बाजूला केला. त्याच्या चेहऱ्यावर “या अप्पाला कसं समजाऊन सांगू?” असे भाव स्पष्ट दिसत होते. खरं तर मला त्याची काय अडचण आहे हे जाणून घ्यायचे होते पण ते फारसे महत्वाचे नव्हते. मला वाटत होतं की हा जर मन मोकळं करुन बोलला तर त्यालाच बरं वाटेल. असा माणसांपासुन दुर दुर रहातो. शाळेत जात नाही, मित्र वगैरे नाही, ते जरा कमी होईल. त्यामुळे मला वाटत होतं की मला त्याची अडचण नाही समजली किंवा समजुनही ती तितकिशी महत्वाची नाही वाटली तरी चालेल पण याने बोलायला हवे. अर्थात मला काही घाई नव्हती. बोलेल हळूहळू. निदान आज आग्रह करुन का होईना पण तो माझ्यासोबत मळ्यात तरी आला होता. तशी गनीची आणि आमची ओळख होऊन काही फार दिवस झाले नव्हते. पण जेंव्हा जेंव्हा मी गनीला भेटलो होतो तेंव्हा तेंव्हा मी त्याच्या हुशारीने, नेटकेपणाने प्रभावीत झालो होतो. आज इतकेच पुरे, याला जास्त त्रास द्यायला नको म्हणून मी म्हणालो “निघूयात गनी? की दत्ता येईपर्यंत थांबुयात? दत्त्याची वाट पहात बसलो तर तो आल्यावर जेवल्याशीवाय जाऊ देणार नाही.”
गनीने ऐकून न ऐकल्यासारखे केले. मला वाटले ‘जायचे का?’ विचारल्यावर तो पटकन तयार होईल. पन तो हातातल्या काडीने खालील दगडी फरशीवर उगाचच रेघोट्या ओढत राहीला.
“अप्पा पेन आहे का तुझ्याकडे?” त्याने मधेच काडीने रेघोट्या काढायचे थांबवत विचारले.
मी खिशातला पेन त्याला काढून दिला. त्याने पेनचे झाकन काढून मागच्या बाजूला व्यवस्थीत बसवले. आधीच स्वच्छ असलेला हात स्वतःच्या मांडीवर घासुन आणखी स्वच्छ केला आणि त्यावर काहीतरी लिहीले. मला समजेना त्याचे काय चालले होते. मी त्याच्याकडेच पहात होतो. त्याने पेन परत केला आणि डावा हात माझ्या समोर धरला. मी उत्सुकतेने त्याच्या हाताची बोटे धरली आणि त्याने हातावर काय लिहिले होते ते पाहू लागलो. त्याने हातावर अतिशय लफ्फेदार उर्दुमधे ‘तृतियपंथी’ या अर्थाचा एकच शब्द लिहिला होता. मी तो वाचला आणि झटकन त्याची हातात धरलेली बोटे सोडली आणि प्रक्षिप्त क्रिया व्हावी तसा चटकन त्याच्यापासुन काही अंतर लांब सरकून बसलो. मी आजवर तृतियपंथी फक्त काही चित्रपटातच पाहिले होते. मला त्याविषयी फारशी माहित नव्हती. पुण्याला गेलो असताना बसमधून एकदा दोन तिन जनांना मी पाहीले होते. पण मला जरा त्यांची भितिच वाटली होती. आणि गनी सांगत होता की तो तृतियपंथी आहे. एवढा गोड आणि हुशार मुलगा असा असणे कसं शक्य आहे तेच मला समजेना. त्याच्याबरोबर आता काय बोलावे याचा विचार करत मी त्याच्याकडे पाहीले. मी ज्या पध्दतीने त्याचा हात सोडला होता आणि दुर सरकुन बसलो होतो ते पाहून गनी दुखावल्यासारखा दिसत होता. ती क्रिया माझ्याकडून अगदी नकळत झाली होती पण त्या एका क्रियेने गेल्या काही दिवसात त्याला माझ्या विषयी वाटणारा विश्वास संपल्यासारखा दिसत होता. त्याचा चेहरा, डोळे अगदी स्पष्ट बोलत होते. गनी सवय असल्यासारखा लगेच सावरला पण मला जरा गोंधळल्यासारखे झाले होते. त्या दोन क्षणात माझ्या डोक्यात भलते सलते विचार येऊन गेले. कुठुन शहाणपणा केला आणि याला मळ्यात घेऊन आलो असंही वाटून गेलं. मी त्याच्याकडे पाहीलं आणि मला एकदम जाणवलं की याच्या चेहऱ्यावरचे भाव जसे मला चटकन समजले तसंच यालाही आपल्या चेहऱ्यावरुन बरच काही समजलं असणार. मग मात्र मी आणखीच गोंधळलो. सुरवातीला दुखावलेला गनी आता मात्र माझी मजा पहात शांत बसला होता.
तो म्हणाला “अप्पा, चले क्या अब?”
मी म्हणालो “हो जाऊयात की. पण थांब जरावेळ. दत्त्या येईलच आत्ता. मग निघूयात. तुला घाई नाही ना?”
“मुझे किस बात की जल्दी होगी अप्पा? घरातच तर बसतो काही तरी वाचत.” म्हणत गनी अगदी सहज हसावं तसं हसला.
मी म्हणालो “गनी, अरे मी मगाशी जरा विचित्रच वागलो रे. माझ्या मनात काही नव्हते. शप्पथ.”
गनीने माझा हात हातात घेतला. ‘त्याच्याही मनात काही नाही’ हेच त्याला सुचवायचे असेल. मग संथ आवाजात म्हणाला “हे पहा अप्पा, जे झालं ते होऊदे. लेकीन अब तू सफाई देऊ नकोस. मुझे अच्छा नही लगेगा. तुझा काही दोष नाही यात. मी तुला हेच तर सांगायचा प्रयत्न करत होतो की अल्लामियाने मला असं बनवलं त्याचा गम नाही पण दुनिया ज्या पध्दतीने वागते माझ्याशी, लोकांच्या त्या नियतची बहुत तकलीफ होती है अप्पा. तू तसा नाही वागलास माझ्याशी कधीही.”
त्याने माझा हात हातात घेतला होता, त्या स्पर्शानेच मला समजले की त्याच्या मनात आता खरंच काही नाहीये. मी जरी शांत झालो होतो तरी माझ्या वागण्यात अजून मोकळेपणा आला नव्हता. एक अनामिक भीती माझ्या मनात अजूनही होती. हे त्यालाही जाणवत असावे.
तो कुर्ता झटकत उठला आणि म्हणाला “अप्पा, दत्ताकडे फिर कभी आएंगे. आता मात्र निघुयात.”
आजवर गनीला ‘कधी एकदा निघतोय’ असं व्हायचं पण आज तो शांत होता आणि मला ‘कधी एकदा निघतोय’ असं झाले होते.
येताना आम्ही फारसे बोलत नव्हतो. त्याला बहुतेक अशा प्रतिक्रियांची सवय असावी त्यामुळे तो शांत होता. कदाचीत एकदाचे ‘आपले गुपित’ त्याने मला सांगितल्यामुळेही त्याच्या मनावरचे दडपण दुर झाले असावे. म्हणजे मला तरी तसे वाटत होते. येताना मी सवयीने सारखा सारखा गनीच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न करत होतो पण आता जाताना मात्र माझ्या नकळ मी त्याच्यापासुन थोडेसे अंतर ठेऊन चालत होतो. असं काय बदलंल होतं या दोन तिन तासात? तोच गनी होता, तोच मी होतो आणि तोच हजारदा तुडवलेला मळ्याचा धुळभरला रस्ता होता.
येताना रस्त्यात दत्त्या भेटला. काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले “किती अंडी फोडली दत्त्या जाईपर्यंत.”
दत्त्या म्हणाला “काढा आम्हालाच येड्यात. कोंबडी काय संभाळन अशी अज्जात पोचवली सगळी अंडी. ते मरुंदे, तू जा लवकर अप्पा. तिकडं ते मिया पेटलय तुझ्या नावानं. ‘गेल्या गेल्या लावून दे अप्पाला गावात’ म्हणत व्हता. काय बिनासलंय त्याचं काय समजंना. तू व्हय लवकर.”
मग तो गनीकडे वळून म्हणाला “काय गनोबा, पयल्यांदाच मळ्यात आलास तेबी न सांगता आन् तसाच निगाला. हे काय बरं न्हाय. आता ऐतवारी ये, तुला आळाण भाकर खाऊ घालतो कांद्याची पात घालुन. तु बी काय ध्यानात ठेवसीन!”
“अप्पा घेऊन येरं याला ऐतवारी. चल, मी गेलो.” म्हणत त्याने सायकलवर टांग मारली आणि गेलाही.
फक्त दत्त्याच ‘गनी’ चे ‘गनोबा’ करु शकतो. मी हसत गनीला म्हणालो “चल गनी, पाय उचल. शकीलला काय झालय कुणास ठाऊक. न चिडणारी माणसे पेटली की झेपत नाहीत.”
आम्ही मराठी शाळेला वळसा मारुन बाजार ओट्याकडे निघालो. समोरच पिंपळाच्या ओट्यावर शकील बसलेला दिसला. पण आम्हाला पाहूनही तो उठला नाही. मला अंदाज आला की प्रकरण जरा गरमच असणार. आम्ही रस्ता ओलांडुन बाजार ओट्यांमध्ये घुसलो आणि शकीलपुढे जाऊन उभे राहीलो. गनीने त्याला सलाम वालेकुम म्हणायला तोंड उघडलच होतं पण तेवढ्यात शकील गंभिर आवाजात म्हणाला “गनी, तू घर जा. तुरंत।”
गनीचा ‘सलाम’ येवढाच शब्द बाहेर पडला, उरलेले शब्द तोंडातच घोटाळले. त्याने चटकन खिशातुन त्याची पांढरी शुभ्र जाळीची टोपी काढली आणि ती डोक्यावर घट्ट दाबुन बसवत तो जाण्यासाठी वळला. जाताना त्याने माझ्याकडे पाहीले देखील नाही. शकील जाम चिडला होता. ‘सलाम का भी सवाब (पुण्य) मिलता है।’ असं नेहमी म्हणनाऱ्या शकीलने आज पहिल्यांदाच कुणाचा सलाम पुर्ण तर होऊ दिला नव्हताच पण स्वतः ही प्रतिनमस्कार केला नव्हता. मला आश्चर्य वाटले. त्याच्या चिडण्यामागे नक्कीच काही तरी गंभीर कारण असणार हेही लक्षात आले. मी काहीही न बोलता त्याच्या शेजारी चुळबुळत बसलो. हा नक्की अब्बांबरोबर भांडुन आला असणार. बरं भांडणही असे की ज्याला काही उत्तर नाही. यांची मटनाची दुकाने. अब्बा म्हणनार “शॉप कडे लक्ष दे” आणि याचं उत्तर “मला ते पहायलाही आवडत नाही.” मधल्या मधे अम्मीची ओढाताण. आजही खटका उडाला असणार.
मी त्याला म्हणालो “शकील, अरे जगाच्या अंतापर्यंत या वादाला उत्तर नाही. दे सोडून.”
माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन शकील म्हणाला “तू घरी कसा जाणार आहेस? सोडायला येऊ का?”
मलाही वाटले, जाऊदे, काय त्याच त्याच विषयावर बोलायचं. मी म्हणालो “नाही रे. आई बाबा मावशीकडे गेलेत. घरी बसुन काय करु? रामकडे निघालो होतो. आज लाकडाची गाडी आली आहे.”
“मरुदे ती वखार. चल मी सोडतो तुला घरी.” म्हणत त्याने बुलेटला चावी लावली.
आता मात्र मी चिडलो. भांडण याने करायचे, मी समजुन सांगतोय तर मला उडवून लावायचे आणि वर मी कुठे जायचे आणि कुठे नाही हेही यानेच ठरवायचे. हा काय चिडखोर स्वभाव आहे उगाचंच.
“हे बघ शकील, कुठला राग कुठेही काढू नकोस. स्वःतालाही त्रास करुन घेतो आणि दुसऱ्यालाही देतोस. वखारीत सोड मला आणि तुही चल. टाळकं जरा थंड होईल.”
“ठिक है. बैठ” म्हणत त्याने बुलेट सुरु केली. मला वाटलं हा आता ताणून धरतो की काय. पण त्याने इतक्या लवकर ऐकल्याने मला बरे वाटले. मी त्याच्या मागे बसत म्हणालो “तु भी ना यार. एवढा चांगला वागतोस आणि थोड्यासाठी सगळ्यावर पाणी फिरवतोस. अम्मी सुध्दा म्हणते ‘शकील सारखा मुलगा नाही. लेकीन…’ हा लेकीन कधी सुधारणार तुझा कोण जाने”
तोवर शकीलने गाडी फिरवून रस्त्यावर घेतली आणि नेहमीपेक्षा जोरात मुठ पिळली. रामच्या वखारीकडे जाण्यासाठी त्याने गाडी वेशीतुन आत घ्यायला पाहीजे होती पण तो उलट दिशेने निघाला.
मी रागातच म्हणालो “चाल्लय काय तुझं शकील? काय झालय? कुठे निघालोय आपण?”
“चुपचाप बैठ अप्पा. जरा ईदगाहच्या ओट्यावर जाऊन बसु माळावर.” म्हणत त्याने समोर चाललेल्या बैलगाडीला खेटुन गाडी जोरात पुढे काढली. मी भितिने माझ्या मांडीवर ठेवलेले हात पटकन त्याच्या खांद्यांवर घट्ट ठेवले.
गावाबाहेरच्या मैदानावरुन हायवे गेला होता. त्याच्या लगतच ईदग्याची मोठी भिंत होती. त्याच्या दोन्ही बाजुला मिनार होते. समोर दोनशे माणसे नमाज पढू शकतील असा शहाबादी फरशीचा चौथरा होता. प्रत्येक ईदच्या वेळी आमच्या गावातील मुसलमान येथे येऊन नमाज अदा करत व मग जोरात ईद साजरी होई. बाकी वर्षभर हा ईदगा म्हणजे कॉलेजच्या मुलांची वेळ घालवित बसण्याची जागा होती. शकीलने गाडी लावली. उगाचच मागच्या टायरवर लाथ मारली आणि तो चौथऱ्यावर बसला.
मी म्हणालो “शकील, तुला जे बोलायचय ते अगोदर बोल. आणि मग काय तुला पोतंभर मुग गिळुन गप्प बसायचे असेल तर बस.”
“तू गनीला मळ्यात कशासाठी घेऊन गेला होतास?”
मला एकदम जाणवलं की शकील गंभीर होऊन बोलतोय, रागात नाही. तो एकवेळ रागावला असता तर गोष्ट वेगळी होती. पण तो शांत आणि गंभीर झालाय म्हटल्यावर नक्कीच काळजीचे कारण होते.
मी म्हणालो “क्काय?”
एक एक शब्द लांबवीत शकील म्हणाला “तू गनीला कशासाठी मळ्यात घेऊन गेला होतास अप्पा?”
“अरे मी रामकडे चाललो होतो. गनी दिसला बाजारपेठेत. त्याला म्हणालो चल तुला मळा दाखवतो. म्हणून गेलो. काय झालं पण?” मला अजुनही समजत नव्हते काय चाललं आहे शकीलचे ते.
“अरे पण आपण जातोच ना दर रविवारी मळ्यात, त्यावेळी नेलं असतं त्याला. तुला काय एवढं पडलय त्याचं?” शकीलचा अजुनही तोच सुर.
मी विचारले “पण गेलो घेऊन तर एवढं काय आभाळ कोसळलं आहे लगेच. तू का त्रागा करतो आहेस इतका तेच मला कळत नाही.”
शकील जरा चिडल्यासारखा होत म्हणाला “अजुन नाही कोसळलं आभाळ तरी तुझ्या अशा वागण्याने कोसळेल लवकरच. आणि तुझ्यावर नाही गुरुजी आणि मोठ्याईंवर कोसळेल.”
माझ्या अजुन काहीच डोक्यात घुसत नव्हते. मी निकरावर येत म्हणालो “हे बघ शकील बोलायचे असेल तर स्पष्ट बोल नाहीतर मी चाललो. बस तू एकटाच येथे. खरच माझं डोकं फिरेल अशाने. दुपारपासुन त्या गनीने फिरवलेय आणि आता तू. मला झेपत नाही हे असलं आडव्यात बोललेलं”
शकील घाई घाईत उठत म्हणाला “काय केलं गनीने अप्पा? खरं सांग मळ्यात काय झालं? तू त्याला घेवून विहिरीवर तर बसला नव्हता ना?”
मी एकदा त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहीले, मागे वळून इदग्याच्या सफेदी फासलेल्या भिंतिकडे पाहीले आणि पायात चप्पल सरकवून सरळ घरचा रस्ता धरला. मी दोन पावले टाकली असतील नसतील शकीलने मागे येत माझा दंड धरुन परत मला मागे ओढत आणले आणि चौथऱ्यावर बसवले. त्याच्या धिप्पाड शरीरापुढे माझे काही चालले नाही.
शकील चिरकल्यासारखा म्हणाला “अप्प्या, काय नाटक लावलय? अल्लाने काय तुला बकऱ्याचा मेंदू दिलाय का?”
मग तो नुसताच धुमसत राहीला काही वेळ. एवढ्यावेळात त्याने गाडीचा आरसा फिरवून पार खाली वाकवला. मग गाडीची किक धरुन खाली बसत तो म्हणाला “अप्पा, तू दत्त्यासारखा मुद्दाम कळून न कळल्यासारखं करतोय की तुला खरच काही कळत नाही? का, त्रास द्यायचाय मला म्हणून करतोय सगळं?”
त्या सहा फुट उंच, सरळ, शांत शकीलची ती अवस्था पाहून मलाच कसंतरी झालं. मी राग विसरुन चौथऱ्यावरुन खाली उतरत त्याच्या शेजारी मातीतच मांडी घातली. त्याचा किकवरचा हात काढला. मांडी दाबत त्याला चौड्यावरुन व्यवस्थित मांडी घालायला लावून मी म्हणालो “तुही गनीसाठीच परेशान आहे ना शकील, कळतय मला. आपण काढू यावर काहीतरी मार्ग. चांगला पोरगा आहे रे तो. त्याला असं पाहून कुणाच्याही पोटात तुटेल रे.”
हे ऐकलं आणि शकील उठून उभा राहीला. मलाही उठवून पुन्हा चौथऱ्यावर बसवत तो घश्यातुन आवाज काढत म्हणाला “अप्पा अरे तो पोरगा नाहीये. किन्नर है वो. हिजडा समजता है? हिजडा आहे तो. कुछ पल्ले पड रहा है क्या अप्पा? अरे तो आपल्यासारखा नाहीये.”
मी काहीही बोललो नाही. त्याचा गोऱ्या चेहऱ्यावरचे धारदार नाक आता लाल व्हायला लागले होते. मी त्याच्या त्या नाकाच्या शेंड्याकडे पहात राहीलो. शकीलचं काय बिनसलं होतं ते चटकन माझ्या लक्षात आलं होतं. गनी ज्या समाजातल्या त्रास देणाऱ्या वृत्तीविषयी बोलत होता तिच वृत्ती शकीलच्या वाक्यावाक्यातुन दिसत होती. अर्थात त्याचा हा सगळा आटापिटा माझ्या भल्यासाठीच चालला होता. पण त्याच्या हित अहित याच्या कल्पना यावेळी तरी विचित्र, कुजलेल्या होत्या. लहानपणी आम्हाला शेजारी शेजारी उभे करुन अम्मीने एकाच वेळी आमच्या कुल्लांवर पानी घातले होते तेंव्हापासुनचा हा माझा मित्र, तो मला कळलाच नव्हता की काय हेच मला समजेना. इन्नीच्या वेण्यांना दर वेळी वेगवेगळ्या आकारात सुरेख रिबीनी बांधनारा हाच शकील काय असं मला वाटून गेलं. परिक्षेला जाताना आम्हा सगळ्यांबरोबर मुसलमान असुनही काकूंच्या हातचे दही खावून गंधासाठी केसं मागे सारुन कपाळ पुढे करणारा हाच शकील ना? शाम्याच्या द्वाडपणावर, दत्त्याच्या बावळटपणावर आणि माझ्या अतरंगी प्रयोग करण्यावर लक्ष ठेवून आम्हाला सांभाळणारा हाच शकील काय? स्वतःच्याच दुकानातली कापली जाणारी बकरी पाहून हळहळणारा हाच शकील ना? वाढदिवसाचे, इदीचे मिळणारे पैसे बाजुला ठेवून चौथी आणि सातवितल्या गरीब पोरांची स्कॉलरशिपच्या परीक्षेची फी भरणारा वेगळाच शकील होता का? मी सुन्न झालो. मला काय करावे ते समजेना. तिथुन उठुन जावे, परत शकीलचे तोंड पाहू नये असं झालं मला. रागाने माझे डोळे भरुन यायला लागले. मी खाली मान घालुन सुन्नसा बसुन राहीलो. माझे खाली मान घालणे पाहुन शकीलचा वेगळाच समज झाला. त्याला वाटले की गनीविषयीची ही माहिती समजल्याने मला लाजल्यासारखे झाले असावे.
तो मारे मला समजावून घेत असल्याच्या सुरात म्हणाला “हे असं दुसऱ्याचं ऐकायचं नाही, स्वतःचं खरं करायचं, फिर ऐसे मसले पैदा होते है. कोई बात नही अप्पा, झालं गेलं सोडून दे. तसही दत्त्याशिवाय कुणी पाहीलं नसेल तुम्हाला. अब आगेसे गनीबरोबर एकटा कुठे फिरु नकोस. चल, रामकडे सोडतो तुला.”
मला संतापाने काही बोलता येत नव्हतं. हाताला कंप सुटला होता. डोळ्यातुन कधीही पाणी खळकन बाहेर येईल असं वाटत होतं. आवाजावर नियत्रण ठेवायचा प्रयत्न करुनही माझा आवाज चढा लागला.
मी त्याच्या कपाळावर माझी बोटे आपटत म्हणालो “किड लागलीय इथे किड. उपचार करुन घे शकील डोक्यावर. आणि परत मला तोंड दाखवलं तर खरच थोबाडीन मी तुला. स्वतःला सच्चा मोमीन म्हणवतोस ना? कशाच्या जोरावर? गनीच्या बाबत तर निर्लज्जासारखं बोललासच पण माझ्यावर पण घाणेरडी शंका घेतलीस तू शकील? तुझ्या पेक्षा तो लाल्या परवडला. तमाशातल्या बायांच्या मागे हुंगत फिरतो पण लपवून नाही. बाजुला हो. बाजुला करायलासुध्दा तुला हात लावायची इच्छा नाही माझी.” म्हणत मी त्याची बाजुला व्हायची वाट न पहाता मागच्या मागे चौथऱ्यावर चढलो आणि पलिकडून खाली उतरुन घरी निघालो. मला अगदी सैरभैर झाल्यासारखं झालं होतं. शकीलबरोबर आजवर साध्या शब्दानेही कधी भांडण झालं नव्हतं माझं. पण आजमात्र मला त्याची लाज लाज वाटली अगदी. मी रस्त्यावर आलो. जरा वेळ थांबुन मी परत रस्ता ओलांडुन मागे फिरलो आणि गावाकडे निघालो. ना तर मला शकीलने आवाज दिला ना थांबवायचा प्रयत्न केला. तेही एकप्रकारे बरेच झाले नाहीतर मी अजुन काय बोललो असतो आणि काय केलं असतं ते माझं मलाच समजलं नसतं.
मी मख्ख सारखा ओट्यावर एकटाच बसुन होतो. डोळे लाल झाल होते. रस्त्यावरुन एखादी सायकल, एखादी मोटारसायकल जात होती. समोरच एक गाढव काहीतरी खात उभे होते. मी त्याच्याकडे टक लावून पहात होतो. इन्नी बाहेर आली. तिच्या हातात केरसुणी होती. त्यावर बराच कचरा तिने गोळा करुन आणला होता. ओट्याच्या पलीकडील टोकाला जावून तिने तो खाली टाकला, झाडु आपटुन आपटुन झटकली आणि घरात जायला वळली. मला ओट्यावर एकटाच बसलेला पाहुन हसुन म्हणाली
“एकटाच का बसलास रे अप्पा? दादा माडीवर बसलाय. वर जा.”
मी मान हलवुन “हुं” म्हणालो आणि तेथेच बसुन राहीलो.
मी उठत नाही म्हटल्यावर तिने झाडूची एक काडी माझ्या कानावर फिरवली.
“तू आणखी कशाला त्रास देतेस अजुन? काम कर तुझे.” म्हणत मी तिच्या हातातला झाडू घेऊन तो दारातुन आत फेकला.
इन्नीला आश्चर्य वाटले. “वर बघ अप्पा, रडलास की काय तू? उठ बरं अगोदर. आत चल, येथे ओट्यावर तमाशा नको. उठ नाहीतर मारीन आता.” म्हणत तिने मला अक्षरशः ओढत आत नेले. शाम्याही माडीवरुन खाली आला. इन्नी तोवर पाणी घेऊन आली. माझ्या अवताराकडे पहात शाम्या उडालाच.
“काय रे अप्पा, गाढवाबरोबर कुस्ती करुन आला की काय? कसा अवतार केलाय. काय झालं?” म्हणत शाम्या माझ्या शेजारी टेकला.
इन्नीने दिलेले पाणी प्यायल्यावर माझं डोकं थोडं शांत झालं.
मी म्हणालो “हो, गाढवाबरोबरच वाद घालुन आलोय.”
इन्नी हातातला तांब्या घेत म्हणाली “तुम्ही भांडताच कशाला रे कुणाबरोबर? आपण बरे, आपले काम बरे. कुणाशी झोंबी घेतली आज?”
मी चिडुन म्हणालो “तू कशाला आज्जीबाईसारखं नाक खुपसत असतेस आमच्यात? जा, मोदक करायला घे. तुझ्या भाईने पराक्रम केलाय आज. हवं तर आरतीचं ताटही सजव.”
इन्नीन कपाळवर हात मारत म्हणाली “रे देवा! शकील बरोबर भांडलास की काय? काय करावं अप्पा तुला!”
शाम्या तिची बाही ओढीत तिला दाराकडे ढकलत म्हणाला “तू आत जा बरं. चहा टाक. तुला काय माहित अप्पा भांडला ते, शकील कशावरुन भांडला नसेल? उगाच चोंबडेपणा करत असते सारखी.”
शाम्याला कधी कसं वागावं हे बरोबर कळतं. इन्नी आत गेली. शाम्याला काय सांगावे आणि कसं सांगावे ते मला समजेना. मला शब्दच सापडत नव्हते. जी अवस्था गनीची झाली होती तिच अवस्था आता माझी झाली होती.
मी म्हणालो “शाम तुला किन्नर माहित आहेत?”
शाम म्हणाला “हो माहितीये. कारे? हजारो कथा आहेत किन्नरांच्या आपल्या पुराणात.”
“ते नाही रे. तुला दुसरा काही अर्थ माहित आहे का? हे किन्नर असतात म्हणे आपल्यातही.”
शाम म्हणाला “अप्पा सरळ मुद्द्यावर येना. तुला गनीविषयी बोलायचं आहे का?”
मी अवाक होवून त्याच्याकडे पहात म्हणालो “तुला काय माहित मला त्याच्याविषयी बोलायचे आहे ते? तुला शकील भेटला होता का?”
शाम्या म्हणाला “नाही रे, गनी आपल्यासारखा नाही हे मला पहिल्या दिवशीच समजलं होतं अप्पा. दत्त्या भेटला होता मगाशी. त्याने सांगितले की तू आणि गनी मळ्यात गेला आहात म्हणून. तेंव्हाच मला अंदाज आला होता की तू गनीला आज बरच काही विचारनार ते. उलट मला त्या गनीचीच काळजी होती. पण तू तर शकीलबरोबर भांडुन आलास.”
मी त्याला इदग्यावर काय काय झाले ते सांगत होतो तेवढ्यात इन्नी चहा घेवून आली. आमच्या हातात कप देवून ती तिथेच बसली.
“तू काय बसलीस येथे? उठ, आमच्या पुरुषांच्या गप्पांमधे हीला काय रस असतो कुणास ठाऊक? उठ अगोदर” म्हणत मी तिला आत पाठवायचा प्रयत्न केला.
शाम म्हणाला “तिला माहित आहे रे सगळं. आमचं परवाच बोलणं झालंय गनीविषयी सविस्तर.”
मग तो इन्नीकडे पाहुन म्हणाला “इन्ने, तू जा बरं आत. नाहीतर अप्पा चल, आपणच माडीवर बसुयात.”
“हा शाम्या विचित्रच आहे पहिल्यापासुन. बहिणीली कुणी असलं काही सांगतं का?” असा विचार करत मी शाम्याच्या मागे जीना चढत होतो.
मी इदग्यावर झालेले भांडण शामला सविस्तर सांगितले. त्यालाही शकीलच्या या वागण्याचे आश्चर्य वाटले. शाम्याला वाटत होते की ‘माझाच काही तरी गैरसमज झाला असणार शकीलला समजुन घेताना’ कदाचीत शकीलला वेगळे काही तरी म्हणायचे असावे. पण त्यालाही शकीलच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले, वाईटही वाटले. पण शाम्याने एक मात्र फार चांगली गोष्ट केली ती म्हणजे शकीलचे काहीही विचार असले गनीच्याबाबतीत तरी पण तो माझ्याबरोबरीने गनीला मदत करणार होता. विशेष म्हणजे इन्नीला हे सगळं माहित असुनही तिला गनीविषयी काहीही वेगळं वाटत नव्हते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिला गनीची किव येत नव्हती किंवा सहानभुतीही वाटत नव्हती. तिच्यासाठी जसा शाम, शकील आणि आम्ही सगळे होतो तसाच गनीही होता. इन्नीच्या या समजुदारपणाची मला चक्क नजर काढावी वाटली.
दोन दिवस मी घरातुन परस्पर कॉलेजला जात होतो, गावात येत होतो, ओट्यावर गप्पा मारत होतो पण मी शकीलकडे मान वळवूनही पाहीले नव्हते. मी जशी माझी बाजू शामकडे मांडली होती तशीच त्यानेही मांडली असणार होती. पण शाम सगळ्यांमधे काही झालं नाही असाच वागत होता. इन्नीनेही शकीलचे आणि माझे भांडण मिटवायचा प्रयत्न केला नाही. एकुण आमच्या भांडणाचा कुणाला त्रास होत नव्हता आणि कुणीही आमच्यात मध्यस्थी करायचा प्रयत्न केला नव्हता. पण एक मात्र होते, सगळ्यांनाच शकीलची बाजु चुकीची वाटत होती. प्रत्येकाचे म्हणने होते की गनीला शक्य तेवढी मदत करायलाच हवी होती.
मी आणि शामने दोन दिवसात विचार करुन ठरवले होते की प्राचार्यांशी बोलुन गनीला आमच्या वर्गात बसायची परवानगी मिळवायची. दुसऱ्या वर्षापासुन त्याला रितसर दहाविला ॲडमिशन मिळवुन द्यायचे. त्याचे किमान बारावी जरी झाले तरी त्याला एखादा कोर्स करता येणार होता. गनीच्या शिक्षणाची कल्पना अर्थात शाम्याची. दोन चार दिवसात गनी दिसला नव्हताच. शकीलचे वागनेही “माझे काहीही चुकत नाही, शाम्याला आणि अप्पाला पश्चाताप करावा लागेल तेंव्हा अक्कल येईल” असे होते. त्याला समजुन सांगण्याच्या भानगडीत कुणी पडले नव्हते. आज रविवार. मी दत्त्याला दुपारी गनीला घरी घेऊन यायला सांगितले होते. सकाळीच इन्नीने रात्रभर टांगलेला चक्का आईकडे आणून दिला. पुऱ्या करण्यासाठी ती घरीच थांबली होती. आई सारखी विचारत होती की हा कोण नविन सदस्य आलाय तुमच्या मंडळींमधे की ज्याच्या स्वागतासाठी एवढा उत्साह होता इन्नीमधे पण इन्नीने “मोठ्याई आता तुच बघ ना गनी आल्यावर” म्हणून बटाट्याची भाजी करायला घेतली.
बाबा पेपर वाचता वाचता म्हणालेच “इन्नीताई, तुम्ही दर महिन्याला एखादा नविन सदस्य का घेत नाही तुमच्या मित्रमंडळात? नाही म्हणजे त्या निमित्ताने मला श्रीखंड खायला मिळेल, दुसरं काय.”
दुपारी दत्त्या गनीला घेऊन आला. त्याचा आवाज ऐकताच आईने ताटे करायची घाई केली. आम्ही पानावर बसणारच होतो इतक्यात शाम व शकील दोघेही आले. खरंतर मी आज शकीलला बोलावले नव्हते पण तो आला होता. आई बाबा नंतर जेवणार होते त्यामुळे बाबा सोफ्यावर बसुन सगळ्यांशी गप्पा मारत होते. आईने ताटे वाढली. पण तिचा उत्साह अगदीच कमी झाल्यासारखा वाटत होता. आमची जेवणे उरकली. दहा मिनिटे बसुन शाम व दत्त्या शकीलच्या बुलेटवर गेले. मी गनीला स्कुटरवर सोडवले. मी त्याला सोडवून घरी आलो. पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेलो. आणि समोर पाहुन मला प्रचंड संताप आला.
मी किचनमधुनच ओरडुन विचारले “आई हे ताट कुणाचे आहे? बाहेर का ठेवले आहे तू?”
आई किचनच्या दारात येऊन उभी राहीली आणि म्हणाली “तुझ्या नविन मित्राचे. कामवाल्या मावशी ठेवतील नंतर घासुन.”
मला राग आवरेना “अगं पण का? बाहेर कशासाठी ठेवलं आहे? मी घासुन ठेवतो हवं तर.”
आईही चिडुन म्हणाली “हे बघ अप्पा, माझ्याशी वाद घालु नकोस अजिबात. परत तो मुलगा आपल्या घरी यायला नको आणि तू देखील त्याच्याबरोबर फिरायचे नाही.”
मी अवाक होऊन आईच्या तोंडाकडे पहात राहीलो.
आईचा राग तिळमात्रही कमी झाला नव्हता. ती त्याच आवाजात म्हणाली “या मुलासाठी तू शकीलबरोबर भांडलास होय! भाभींना कळाले तर काय म्हणतील?”
आमचे बोलणे बाबा हॉलमधुन ऐकत होते. त्यांनी तेथुनच आईला नावाने हाक मारली. ते सहसा आईला नावाने हाक मारत नसत. ती हाक ऐकताच मात्र आई गप्प उभी राहीली.
बाबा म्हणाले “अगं ती मित्रांची भांडणे आहेत. त्यांना त्यांची सोडवूदे. तू कशाला मध्ये लक्ष घालतेस?”
हे ऐकुन आई माझ्याकडे रागाने पहात मागच्या अंगणात निघुन गेली.
मी बाहेर आलो. बाबा चप्पल घालत म्हणाले “चल अप्पा, जरा मठापर्यंत एक चक्कर मारुन येऊ.”
आम्ही मठापर्यंत येईपर्यंत बाबा काही बोलले नाही. मठासमोरच एक औदुंबराचा मोठा पार होता. त्यावर शेंदुर फासलेल्या दोन तिन दगडी पादुका होत्या. आम्ही पारावर बसलो. बाबांनी उभ्या उभ्या दोन चार उंबरे निवडुन तोडली आणि माझ्या हातात देत म्हणाले “किडे पाहुन खा रे.”
मग शेजारी बसत म्हणाले “अप्पा सकाळी इन्नीने मला बरच काही सांगितले गनीबद्दल. तुझी आणि शामची जी धडपड चालली आहे त्याबद्दलही बोलली. खरं सांगु का, तुम्ही पोरं ही अशी माणुसकीसाठी धडपड करताना पाहीलं ना की फार बरं वाटतं.”
मी बाबांसमोर एक उंबर धरले. ते घेत ते म्हणाले “पण एक लक्षात ठेव अप्पा, गनीची जी समस्या आहे तशी समस्या आजवर आपल्या माणसांमध्ये दुरवर कुणाला नाही. असेल तर सांगितली नसेल. त्यामुळे कसं वागायचं हे मलाही नक्की समजेना, तुम्ही तर लहान आहात अजुन. म्हणुन जे काही कराल ते अगदी विचारपुर्वक करा. असं व्हायला नको की तुमच्या वागण्याने गनीच्या अडचणी अजुन वाढतील. त्याला त्रास होईल.”
बाबांचा हा मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता. एकतर गनीचे वडील, शकील, माझी आई यांना असं वागाताना पाहुन मला धक्का बसला होता पण बाबांना माझी धडपड समजली होती. मला त्याचाच जास्त आनंद होता.
बाबा म्हणाले “आणि हे करताना कुणी विचित्र वागले तर समजुन घे अप्पा, कारण हे सगळं स्विकारणं सोपं नाहीए. तुझी आई मघाशी जसं वागली किंवा शकीलने जे विचार मांडले यात त्यांचा दोष नाही हे अगोदर लक्षात घे. तरच तुला काही करता येईल गनीसाठी. समजतय मी काय म्हणतोय ते?”
मी मान हलवली. मला जेंव्हा जेंव्हा काही अडचणी आल्या, प्रश्न पडले तेंव्हा तेंव्हा बाबांनी नेहमीच त्या फार अलगद सोडवल्या होत्या. बाबांसमोर मी जेंव्हा एखादा प्रश्न मांडला होता तेंव्हा त्यांनी तो इतका सोपा करुन सोडवला होता की मलाच आश्चयर्य वाटायचे की असा प्रश्न मुळात आपल्याला पडलाच का. आजही त्यांनी नेहमीप्रमाणे सगळं काही सोपं करुन दिले होते. आम्ही परत मठामध्ये जावून दर्शन घेतले आणि घरी परतलो.
अगोदर गनीला वर्गात बसायची परवानगी मिळऊन देऊ मग पहाता येईल पुढे काय करायचे ते असा माझा आणि शामचा विचार होता. गावात ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसणारी काही टारगट मुले होती जी गनीला त्रास द्यायची. पण किती दिवस त्रास देणार होती? एकदा नाविन्य संपल्यावर सगळं सुरळीत होईल असं आम्हाला वाटत होतं. जोपर्यंत बाबा, अम्मी, जोशीसर यांची साथ होती तोवर काही अवघड नव्हते. हेच सगळं सांगण्यासाठी मी सकाळी सकाळी गनीकडे निघालो होतो.
मी स्कुटर शकीलच्या घरासमोर लावली आणि निघालो. स्कुटरचा आवाज ऐकुन अम्मी बाहेर डोकावली पण तिने काही म्हणायच्या आत मी मागे गोडाऊनच्या खोलीकडे वळालो. गनीला बाहेरुनच हाक मारुन आम्ही मशीदीच्या मागच्या बाजुने निघालो. मशीदीला खेटूनच ओढ्याचा मोठा डोह होता. त्याच्याकडेला लहानसे शंकराचे देऊळ आणि खुप सारी चाफ्याची झाडे होती. डोहावर काही बायका धुणे धुत होत्या. आम्हाला पाहुन “मंग अप्पा, गुर्जींचं कस्काय?” सारखी चौकशी काही जणींनी केली. त्याला हसत उत्तरे देत आम्ही चाफ्याच्या झाडांखाली येऊन बसलो.
मी गनीला आनंदाने म्हणालो “गनी आता दोन दिवस थांब फक्त. तुला वर्गात बसायची परवानगी मिळाली की मग तुझा बहुतेक वेळ कॉलेजमधेच जाईल. पुढच्या वर्षी पाहु सर तुला कितवीत ॲडमिशन देतात ते. मग दोन वर्षे काढ अभ्यासात. बारावी नंतर कुठे तुला किंवा आम्हाला गावात रहायचं आहे? पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडावेच लागेल. एकदा गती मिळाली की मग गाडी मस्त धावते गनी. तू आता बाकी कसलं टेंशन घेऊ नको. तुझ्या वडीलांचं तर अजिबात नाही.”
गनी मलुल हसला. त्याने माझ्याकडे असं पाहीलं की जनुकाही मी या जगात वावरतच नाही. त्याच्या चेहऱ्यावर प्रौढ असल्यासारखे भाव पसरले.
मी वैतागुन म्हणालो “तुझ्यासाठी तो शाम्या एवढा जीव काढतोय त्याचं काही नाही, तुझं भलतच काहीतरी शिष्टासारखं असतं गनी. याला काय अर्थ आहे?”
गनी म्हणाला “गलतफहमीमे मत जी अप्पा. दुनिया इतकी सरळ नाहीए. तू जे काही करतोय माझ्यासाठी ते मला सगळं कळतय पण तसं काहीही होणार नाही. तुला वाईट वाटु नये म्हणून बोललो नाही पण सांगतो, काल तुझ्या अम्मीने मला रोटी कशी वाढली पाहीलस का तू? ते जाऊदे. माझ्या अब्बुंनी मला तिसरीत असताना हैदराबादला सोडलं होतं. आपण बिल्ली कशी जंगलात नेऊन सोडतो तसं. पुलीसने चार दिनमे मुझे घर वापस पहुंचा दिया तो अब्बु बोले इसे हम पहचानते नही, हमारा कोई वास्ता नहीं. आता बोल.”
गनीचे हा अनुभव ऐकुन मला हबकल्यासारखंच झालं. हे म्हणजे जरा जास्तच होतय असं मला वाटत होतं तेवढ्यात गनी म्हणाला
“त्यांचाही दोष नाही रे. एकदा अम्मी अब्बुंचे भांडण झाले होते. ते मिटवायला नानी आली होती. ती अब्बुंना म्हणाली ‘खुद हिजडा जना है और मर्दानगीकी बात करता है, शरम नही आती क्या?’. त्या दिवशी मी अब्बुंना पहिल्यांदा रडताना पाहीले. अब खुदाने ‘गलत बदन मे गलत रुह डाल दी’ यात त्यांचा काय दोष आहे? चांगले आहेत अब्बु. दुसरा कुणी असता तर मला आणि अम्मीला सोडुन दिले असते. आजुबाजुचे लोकही त्यांना ‘हिजड्याचा बाप’ म्हणुन चिडवतात तेंव्हा मजबुर होतात, शराब पितात रे मग खुप.”
माझे डोळे भरुन यायला लागले. मी डोळ्यातलं पाणी परतवण्यासाठी आंवढा गिळला. त्याचा विचित्र आवाज आला.
गनीने माझ्याकडे पाहुन म्हटलं “अप्पा असा रडतोस तू म्हणुन तुला काही सांगत नाही. पण असं दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी येणारी माणसे खुप पाक मनाची असतात. आपला शकील देखील एकदम सच्च्या दिलाचा मानुस आहे पण बचपनसे जो तालिम मिलती है ना त्याच्याबाहेर मन विचार करत नाही. म्हणुन तो तसा वागतो. तू समजुन घे सगळ्यांना.”
मला गनीचे हे बोलणे ऐकुण काल बाबांचे म्हणने आठवले. हा बाबांचेच विचार बोलत होता.
गनीने त्याचा स्वच्छ रुमाल मला दिला आणि म्हणाला “देख यार, तुझी अम्मी, शकील, माझे अब्बू यांची काही गलती नाही. मुझे खुद को कुछ समजमें नही आ रहा था शुरु में. आता आता मला लक्षात आलंय की काय होतय ते. नाहीतर खुदके साथही जंग चल रही थी मेरी कुछ साल. माझी घालमेल तुला सांगुनही समजणार नाही अप्पा, जे मलाच समजायला इतका वेळ लागला ते इतरांना तुरंत समजावे असं कसं म्हणता येईल?”
मी त्याचं बोलणं एकत होतो आणि हाताने चाफ्याच्या फुलांचा कुस्करा करत होतो.
ते पाहुन गनी म्हणाला “काय रे हे असं. किती फुले चुरडलीस. थांब.” म्हणत गनी उठला आणि त्याने दोन तिन चाफ्याची टपोरी फुले उचलली, त्यांच्या पाकळ्या मागच्या बाजुला दुमडुन देठात सरकवल्या आणि मला त्याच्या सुंदर पंचकोणी अंगठ्या करुन दिल्या. एक स्वतःच्या दोन बोटात पकडली. मी हसलो. गनी फार थोडं बोलला माझ्याबरोबर पण मी कल्पनाही करु शकणार नाही असे अनुभव त्याच्या गाठीला असणार हे मला जाणवले. त्या अनुभवांनी कोलमडुन न जाता हा जास्त विचारी, संयमी आणि प्रगल्भ झाला होता हे त्याच्या बोलण्यावरुन जाणवत होते. बुध्दीमत्ता तर असामान्य होतीच पण मनानेही फार निर्मळ होता गनी. त्याला रोजचे येत असणारे अनुभव लक्षात घेता तरीही त्याच्या मनात कुणाविषयी कधी राग दिसला नव्हता.
मी विषय बदलत गमतीने गनीला विचारले “तुला मुलं आवडतात कारे?”
तो हसुन म्हणाला “कुणाला नाही आवडत. निष्पाप असतात, आनंदी असतात.”
मी त्याच्या कुशीत बोट खुपसुन म्हणालो “उगाच भोळा बनु नको. म्हणजे तुला मुलं आवडतात का मुली? असं विचारतोय मी.”
गनी माझ्या दंडाला चिमटा काढत म्हणाला “तुला सिधासाधा समजत होतो मी अप्पा, तू तर बदमाषी करायला लागला. उठ जावूयात.”
आम्ही घरी आलो. मी त्याला अम्मीकडे यायचा आग्रह केला पण शकीलकडे यायचे टाळत तो म्हणाला “तू विचारुन बघ सरांना, पण त्यांना सगळी कल्पना दे. मी येईल तुझ्या वर्गात बसायला.”
कॉलेजला जायला बराच उशीर झाला होता. मी जेवूनही आलो नव्हतो. त्यामुळे अम्मीकडेच काहीतरी खावे व मग कॉलेजला जावे म्हणुन मी घरी आलो.
अम्मीला हाक मारुन काहीतरी खायला दे म्हणुन टेबलवर बसलो. अम्मीने मिरचीचे सालन आणि रोटी वाढली. पटकन एक अंडे तळुन दिले. माझ्यासमोरच गालावर हाताचा मुटका ठेवून बसली. मी घाईघाई जेवण संपवत होतो. ते पाहुन अम्मी म्हणाली
“अरे हळु हळु खा, खविस मागे लागल्यासारखा काय खातोस!”
मी मान डोलावली. अम्मी म्हणाली “गनीकडे गेला होतास का? बराच वेळ बसलास त्याच्याकडे?”
“हो गं. शाम आणि मी त्याला कॉलेजला बसायला सांगतोय. उद्या सरांना विचारले की झाले.” मी जेवता जेवता म्हणालो.
“जे काय करायचय ते विचार करुन कर बेटा. त्या गनीला आधिच खुप तकलीफ आहे, त्यात अजुन काही भर नको. कॉलेजचे इतके बच्चे, त्यात गनी आला तर खामखा परेशानी होगी. अल्लामिया आहे सोबत, पण अप्पा ये मसला थोडा अजीब है म्हणुन सांगते.”
हात धुताधुता मला एक जाणवले. कुणाचे लक्ष नाहीये आमच्याकडे असं जे मला वाटत होतं ते काही फारसे खरे नव्हते. अम्मी, अब्बु, गनीची आई, माझी आई, बाबा या सगळ्यांचे बारकाईने माझ्याकडे आणि शामकडे लक्ष होते आणि मी या सगळ्यांचा जीव टांगनीला लावला होता.
सकाळी सकाळी प्रार्थनेनंतर मी आणि शाम प्राचार्यांच्या ऑफीसमध्ये बसलो होतो. जोशीसरही शेजारी बसले होते. प्राचार्य आमच्याकडे डोळे विस्फारुन पहात होते. जोशीसरांची खुर्चीतल्या खुर्चीत अस्वस्थ चुळबुळ चालली होती. ते खिशातला पेन बोटांचा व्यायाम करावा तसा हातामधे फिरवत होते. प्राचार्यांनी पुन्हा एकदा टेबलवरचा काचेचा पेपरवेट उचलला आणि भोवऱ्यासारखा फिरवुन त्याचं फिरणं पहात बसले. मी शामच्या मांडीला बोटाने टोचले. शेवटी शामने जरा आगावूपणा करत समोर फिरणारा पेपरवेट हातानी धरला आणि बाजुच्या फाईलींवर ठेवला.
शेवटी प्राचार्यांनी दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून त्यावर हनुवटी ठेवली आणि जोशीसरांकडे पहात म्हणाले “काय करायचं जोशी या मुलांचे? बोला काहीतरी.”
जोशीसर हातातला पेन परत खिशाला लावत म्हणाले “मी काय बोलणार सर, या पोरांनी अगदी धर्मसंकटात टाकलय.”
प्राचार्य शामकडे पहात म्हणाले “तुम्ही हे जे काही आरंभलय त्याला गुरुजी, कुरेशीशेठ यांची मान्यता आहे का शामराव?”
शाम ऐवजी मी मधेच म्हणालो “सर, त्यांना विचारुनच आम्ही हा निर्णय घेतलाय. त्यांनीही ‘तुम्हाला योग्य वाटेल ते करा’ म्हणुन सांगितलय. म्हणुन तर आम्ही तुम्हाला विचारतोय सर. हवं तर गनीला येथे बोलावून घेता येईल. तुम्ही त्याची परिक्षा घ्या. खुप बुध्दीमान आहे सर तो.”
जोशीसर मधेच म्हणाले “अरे म्हणजे कुरेशीशेठ मोघमच बोलले ना!”
एवढ्यात “आत येवू का सर?” विचारत शकील ऑफीसमधे आला.
खुर्ची ओढुन घेत शकील म्हणाला “सर अब्बांशी मी रात्रीच बोललो आहे. काही महिने बसु द्या त्याला वर्गात असं त्यांचेही म्हणने आहे.”
शकीलला ऑफीसमध्ये पाहुन ते ही आमची बाजु घेवून बोलताना पाहुन मला आश्चर्यच वाटलं. या वेड्या फकीरावर अल्ला मेहरबान झाला की काय अचानक? मी त्याच्याकडे पाहीलं. त्याने माझ्या मांडीवर थोपटलं आणि हसला.
सर सुस्कारा टाकुन म्हणाले “आता मोठी मंडळीच याच्या पाठीमागे असतील तर आमची काहीच हरकत नाही. पण बाळांनो, तुम्हाला काही प्रश्न विचारतो. उत्तर नाही दिले तरी चालेल पण विचार मात्र जरुर करा. काय म्हणता जोशी?”
जोशीसरांनीही आमच्याबरोबर मान डोलावली.
प्रत्यक्षात प्राचार्यांऐवजी जोशीसरच म्हणाले “अप्पा शकील आणि शाम तुही ऐकरे. आपण अगदी लहान गोष्टींपासुन सुरवात करु. एक तर तुम्ही मुलं हा जो पायंडा पाडु पहाताय त्याला माझी पुर्ण संमती आहे, पाठिंबा आहे. पण ते आपल्या या छोट्या गावात करणे हे फारच धाडसाचं होईल. यातुन चांगलं काही निघाले तर शाळेचे, कॉलेजचे नावंच होईल. पण…”
सरांचा तो पॉझ आम्हाला फार मोठा आणि जीवघेणा वाटला पण आम्ही मध्ये काही बोललो नाही.
आमच्याकडे रोखुन पहात सरांनी पुढे सुरवात केली “पण जर काही विपरीत झाले तर यात फक्त त्या मुलाचा बळी जाईल हे लक्षात घ्या. त्या मुलाव्यतिरिक्त कुणालाही याचा फारसा त्रास होणार नाही.”
आम्ही अजुनही सरांच्या तोंडाकडेच पहात होतो.
जोशीसरांनी चश्मा काढुन पुसला, पुन्हा डोळ्यांवर चढवत म्हणाले “समजा त्याला वर्गात बसायची परवानगी दिली तर तो बसणार कुठे? मुलींमध्ये की मुलांमध्ये? एकतर तो स्वतःच मुलांमधे बसणार नाही आणि मुली त्याला आपल्यात बसु देतील की नाही शंकाच आहे?”
आम्ही एकमेकांकडे पाहीले.
सर म्हणाले “बरं ते राहुद्या. हा टॉयलेट नक्की कोणते वापरणार?”
जोशीसरांचा हा प्रश्न ऐकुन प्राचार्य एकदम हसले. शकीलने एक जळजळीत कटाक्ष टाकल्यावर मात्र त्यांना त्यांची चुक लक्षात आली. जोशीसरांनाही ते आवडले नाही.
शकीलने जोशीसरांना मधेच थांबवत म्हटलं “सर दिसताना जरी या समस्या वाटल्या तरी त्या समस्या नाहीएत. तुम्ही तुमची पुढची हास्यास्पद यादी वाचायची थांबवा आणि गनीला वर्गात बसायला परवानगी आहे की नाही हे सांगा फक्त.”
जोशीसर शर्ट झटकत उठले. बाहेर व्हरांड्यात जावून उगाचच ग्राऊंडवर नजर फिरवत राहीले व पुन्हा आत येवून खुर्चीवर बसले.
सरांनी घसा साफ केला आणि म्हणाले “हे बघ शकील, मी अगोदरच सांगितलय की तुमचा जो काही उद्योग चाललाय तो मला आवडला. मी तुम्हाला जे शिकवतोय ते अजिबात वायाला जात नाही हेच यावरुन दिसतय. पण मी स्पष्टच सांगतो, यात खुप अडचणी आहेत. मुलं तुमच्या गनीला खुप त्रास देतील, पालकांच्या तक्रारी येतील, सगळेच शिक्षक माझ्या विचारांचे आहेत असं समजु नकोस त्यामुळे शिक्षकांकडुनही त्याला त्रास द्यायचा प्रयत्न होईल. असा त्रास ज्याची तक्रार करता येणार नाही. म्हणजे वेगळी वागणूक देणे, दुर्लक्षीत करणे, टाकुन बोलणे वगैरे, ज्यावर प्राचार्यही काही ॲक्शन घेऊ शकणार नाहीत. यात त्या बिचाऱ्या मुलाची फार घुसमट होऊन जाईल. तुम्ही सगळ्यांनी याचा विचार करावा, निदान तुमच्या मित्रासाठी तरी विचार करावा असं मी म्हणेन. यावर तुमची मर्जी. अप्पा, हवं असेल तर मी गनीला घरी येऊनपण शिकवायला तयार आहे. पण त्यासाठी मलाही खुप त्रासाला सामोरे जावे लागेल. मी तुम्हाला फुले शिकवले म्हणजे मी स्वतः तेवढा मोठा आहे असं नाही होत.”
आमच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहुन जोशीसर म्हणाले “बाहेर व्हरांड्यात बसा बाकावर किंवा लायब्ररीत बसा. विचार करा आणि मला सांगा काय करायचे ते. मला आता वर्गावर गेलं पाहिजे. तुम्ही या तासाला नाही आलात तरी चालेल. घाई नाही. उद्याही सांगितले तरी चालेल.”
आम्हाला विचारात गुंतवुन सर टेबलवरच्या वह्या उचुलून शांत पावले टाकत बाहेर गेले. आम्हीही बाहेर येवून बाकावर बसलो. आमची डोकी काम करेनाशी झाली होती. आम्ही अजुन का येत नाही हे पहायला रामने ठोब्बाला बाहेर पाठवले होते, तो आला. आम्हाला बाकावर बसलेले पाहुन तोही चुपचाप समोरच्या व्हरांड्याच्या खांबाला एक पाय वर घेवुन टेकुन उभा राहीला. मग नेहमीप्रमाणेच ठोब्बा का आला नाही हे पहायला राम आणि दत्त्याही बाहेर आले. त्यांनाही उत्सुकता होती काय होतय याची.
आमचे चेहरे पाहुनच दत्त्या म्हणाला “हात् च्यायला! गेला वाटतं तुमचा गाडा कावळीत! काय म्हणलं सर? का, मोठमोठ्या गप्पा हानुन लावला चुना समद्यांना?”
मी आपला दत्त्याच्या बोलण्यावर कसानुसा हसलो. शकील पायाने बाकडा वाजवत होता. ती ठकठक त्रास देत होती कानाला.
शाम्या म्हणाला “चला रे, जावून बसु वर्गात. उद्या विचार करु यावर. गनीही कुठे पळुन चालला नाही आणि कॉलेजही कुणी रात्रीतुन चोरुन नेणार नाही. उठ दत्त्या तू अगोदर.”
एवढ्यात ग्रामपंचायतीमधे प्युनचे काम करणारा संपत धावत हाका मारत आला. आम्ही वर्गात निघालो होतो तो तेथेच थबकलो. संपत आमच्या समोर उभा राहुन, दोन्ही गुडघ्यावर हात टेकवुन “अप्पा, अप्पा” करत धापा टाकत राहीला.
दत्त्या त्याला बाकड्यावर बसवत म्हणाला “आता तू कंच भुत पाह्यलं संप्या?”
संपत त्याला हाताने खाणाखुणा करुन थांबायला सांगत होता. कधी गावाकडे खुणा करत होता. काय झाले ते समजायला मार्ग नव्हता.
दोन मिनिटांनी संपत सांगायला लागला “अप्पा, शकीलभौ लवकर चला. त्या टग्यांनी तुमच्या मित्राला मारलय.”
शाम्या म्हणाला “अरे कोण मित्र संपत? कोणी मारलं? कशासाठी?”
शकीलने शाम्याला मध्येच थांबवलं आणि संपतला व्यवस्थित बोलायला सांगितलं.
संपत शकीलला म्हणाला “आवो तुमचा तो नातेवाईक नाय का? तोच. पंचायतीच्या वट्यावर बसत्यात त्यांनी झोंबी केली त्याच्यासंग. नुसता गदारोळ केलाय. पघा तुम्ही.”
हे ऐकताच माझ्या डोक्यात लख्ख ट्युब पेटली. मी दत्त्याला म्हणालो “अरे गनीला त्रास दिलाय वाटतं. चल लवकर.”
“यांच्यायला, या टग्यांचा बंदोबस्त करायलाच पायजे कव्हातरी.” म्हणत दत्त्याने सायकल काढली आणि तो मधल्या वाटेने पंचायतीकडे धावला. मी आणि शाम शकीलच्या बुलेटवर निघालो. वेशीतुन आत जाताना समोर धोंडबा गिरणीपुढे उभा दिसला. त्याला “पंचायतीवर ये. पोरांनी दंगा केलाय काहीतरी” म्हणत आम्ही न थांबताच पंचायतीवर पोहचलो. मागोमाग दत्त्याही आला. ओट्यावर काही रामोसआळीतली तर काही सुतारआळीतली मुलं बसली होती. यांचा रोजचा धंदा म्हणजे पत्ते कुटायचे, पान खावून थुंकायचे आणि रात्री दारु पिवून गोंधळ घालायचा. दत्त्याने एक शिवी हासडत त्यातल्या एकाला ओट्यावरुन खाली ओढले. धोंडबाही पोहचला. येतानाच त्याने दस्तगिरच्या दुकानातला रॉड उचलुन आणला होता. तोही धावला. मी आणि शाम “अरे जरा थांबा” म्हणत होतो तोवर दत्त्याने आणि धोंडबाने दोनतिन जनांना चांगलच बुकलून काढलं होतं. पंचायतीतली माणसे धावली. त्यांनी त्या पोरांना धोंडबा आणि दत्त्याच्या तावडीतुन कसेबसे सोडवले. तरीही शकीलने पळणाऱ्या पोरांच्या पायावर दोन दोन फटके मारलेच. गोंधळ जरा शांत झाला. आमच्या मागे मागे पळत आलेले संपत आणि ठोब्बाही तेथे पोहचले होते. काय झालं हे संपतच सांगु शकणार होता. मी ठोब्बाला आणि धोंडबाला गनीच्या घरी पिटाळले.
जणू काही या सगळ्यात संपतचीच चुक आहे अशा आवाजात दत्त्या म्हणाला “संप्या आता बैजवार सांग नायतर तुलाच पयलांदा विहिरीत उलटा टांगतो.
संपत म्हणाला “माझी काय चुके? तुमचा मित्र चाल्ला होता. ही कार्टी वट्यावरच बसली व्हती. त्यातलं कुनी तरी विचकाट गानं म्हनत त्याच्या अंगावं पान थुकलं. तो पळायला लागला तर त्याला धरुन त्याच्या कपाळावर कुंकू फासलं. दोन्ही गालालाबी लावलं. ते पोरगं जीव खावुन पळालं तर कुणीतरी त्याची बंडी धरुन ओढली. अर्धी बंडी फाटून याच्या हातात आली तसं ते पोरगं धुम पळालं. आन हे सांगायला मी तुमच्याकं धावलो. पुढचं मला काय बी माहीत नाय. देवाच्यान.”
एकुण प्रकरण बरचं गंभीर होतं. मला आणि शामला एकदम गनीची काळजी वाटायला लागली. जे झालं होतं ते संपत सांगत होता तेवढं सरळ साधं नव्हतं. गनीच्या अंगचटीला यायचा प्रयत्न झाला होता. गनीचा कुर्ता फाडला होता. आणि “ही तर सुरवात आहे.” अशी एक सुप्त धमकी किंवा सुचनाही होती. गनीची काय अवस्था झाली असेल त्याचा विचार करुनच माझ्या अंगावर काटा आला. मी शकीलला गाडी मोहल्ल्याकडे घ्यायला सांगितली.
आठ दिवस झाले. आम्ही गनीचा शोध घेत होतो. त्यादिवशी गनी पंचायतीसमोरुन पळाला तो दहा मिनिटासाठीच घरी गेला होता. त्याच्या आईने त्याला खुप विचारुनही त्याने काही सांगितले नव्हते. दोन कपडे पिशवीत भरुन हा अम्मीकडे गेला. तिच्याकडुन काही पैसे मागुन घेतले. अम्मीलाही त्याने काही सांगितले नाही. तिला मिठी मारुन तो जो अम्मीकडुन निघाला तो आजवर त्याचा काही तपास लागला नव्हता. आम्ही पंचायतीवरुन घरी पोहचलो तो पर्यंत गनी गेला होता. त्याला एसटीस्टँडवरही जावून शोधले पण तो दिसला नाव्हता. त्याने घरुन कपडे आणि अम्मीकडुन पैसे नेल्याने पोलिस तक्रार केली नव्हती. त्याच्या घरी मी दोन तिन वेळा चक्कर मारली. त्याचे वडील घरात आढ्याकडे पहात बिड्या ओढत होते आणि आई स्वयंपाक करत होती. दोघांनाही वाईट वाटले असणारच पण त्यांचे एकुन वागणे हे “बरी ब्याद गेली” असे होते. निदान मला तरी ते तसे वाटत होते. विषेश म्हणजे या आठ दिवसात इन्नी खुप शांत होती. मी एकदा तिला चिडुन विचारलेही होते “गनी गेला त्याचं तुला काहीच कसं वाटत नाही गं? काळजाच्या जागी दगड ठेवलाय का देवाने?”
तर शांतपणे म्हणाली “अप्पा जरा विचार कर, त्या दिवशी जो प्रकार झाला सगळे असताना तो किती वाईट होता. पुढेही यापुढे जावून काही झालं असतं तर. किंवा झालं नसतं याची तुला खात्री आहे का? गनी तुला एकदा म्हणाला होता तसं “चुकीच्या शरीरात चुकीचा आत्मा टाकला देवाने त्याचा” हे खरय अप्पा पण देवाने त्याला चुकीच्या समाजात देखील टाकलं. तो गेला ते बरं झालं. बहुतेक तो तिकडेच सुखी राहील. शिक्षण नाही मिळालं म्हणून काय झालं. निर्मळ मनाची माणसे कुठेही आनंदीच रहातात.” पंधरा दिवसांनी “येथे पोट भरनं जमत नाही” असं कारण सांगुन गनीच्या आई-वडीलांनीही गाव सोडलं. मी हे घरी सांगितलं तेंव्हा बाबा फार हळहळले. एखाद्याच्या सगळ्या संसाराचीच अशी परवड झालेली पाहुन खुप कळवळले. आईलाही वाईट वाटले. तिला गनीचा राग होता पण असं काही झालेलं तिलाही त्रास देवून गेले.
मधे अजुन पंधरा विस दिवस गेले. गनीला गाव सोडुन आता दिड महिना झाला होता. जो तो आपापल्या व्यापात गुंतला होता. आम्हालाही कधी कधी गनीची आठवण यायची. दिवाबत्ती करताना “जिथे असेल तिथे आनंदात असुदे बापडा” अशी प्रार्थना इन्नी करायची तेवढीच गनीचे आठवण राहीली होती.
नेहमीप्रमाणे मी कॉलेजवरुन घरी आलो. बाबांनी हातात अंतरदेशीय पत्र ठेवले. “कुणाचे आहे रे” असं विचारत आईही शेजारी येवून उभी राहीली. मी सॅक जागेवर ठेवून पत्र उघडलं. अतिशय बारीक पण कमालीच्या वळणदार, लफ्फे असलेल्या उर्दुत पत्र होतं. गनीचे अक्षर ओळखायला मला वेळ लागला नाही. आई तिरकी मान करुन पहात होती. मी हसत तिच्या हातातच पत्र दिलं आणि म्हणालो “तुच वाच मोठ्याने. मी ऐकतो.” पत्रातलं उर्दु पाहुन आईने डोक्याला हात लावला व पत्र माझ्याकडे दिलं. तिला म्हणालो “अगं गनीचे पत्र आहे. काय म्हणतोय ते सांगतो नंतर.”
मी टेरेसवर गेलो आणि निवांत पत्र वाचायला घेतलं. अतिशय सुंदर अक्षरात, मुद्देसुद आणि चपखल शब्द वापरत गनीने पत्र लिहिलं होतं…
(माझ्या भाषेत…)
“अप्पा, मी खरं तर तुला सांगुन यायला हवे होते पण जे काही झाले ते तू पाहीलेच. मी मुंबईला परतलेय. येथे आल्यावर तुला लगेच पत्र लिहिणार होते पण दोन कपड्यांशिवाय माझ्याकडे काहीच नव्हते. एक वेळ जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे त्या धावपळीत अडकले. गेला दिड महिना अत्यंत घाईत आणि चमत्कारावर विश्वास ठेवायला लावणाऱ्या प्रसंगांनी गेलाय. मी ईकडे माझ्या माणसांमधे पोहचले आहे. (तुला कळाले असेलच कुणाकडे ते.) कधी न पाहिलेली ही माणसे, पण त्यांच्यात मला अगदी सुरक्षीत वाटते आहे. येथेही एक ‘अम्मी’ आहेत. त्यांच्याकडेच सगळे रहातो आहोत. महत्वाचे म्हणजे मी मला हवे ते कपडे घालते आहे. एक संस्था आहे जीने माझ्या शिक्षणाची सोय केली आहे. संस्थेतच एक मॅडम शिकवायला येतात. आमच्या इतर प्रश्नांवरही या संस्थेतल्या दिदी काम करतात. तुम्हा सगळ्यांची खुप आठवण येते पण आता इकडे छान रमले आहे. कदाचित माझे हे तुला शेवटचे पत्र असेल. शकीलच्या अम्मीला, तुझ्या बाबांना, दत्ताला आणि सगळ्यांनाच सांग मी आठवण काढली म्हणुन. खास करुन इन्नीदिदीला हे पत्र मराठीत वाचुन दाखव. तिला एकदा पहायची खुप इच्छा आहे. तिची आठवण आली की कधी कधी रडु येते. रडण्यावरुन आठवलं, अप्पा तुही जरा कणखर हो. मनातली मानुसकी जप नेहमी. आपली कधी आयुष्यात भेट होईल की नाही माहित नाही पण तुला, इन्नीला कधीच विसरु शकणार नाही. तुझीच लिहणार होते आता त्यावरुन आठवलं, अम्मीने माझे नावही बदलले आहे. हळु हळु धर्मही सुटेल. कारण नमाज पढने शक्य नाही. रोजेही ठेवता येणार नाही बहुतेक. कारण तुला माहितीच आहे. आमचे मौलवी मुळात ‘ही आमच्या धर्माची आहे’ हेच कबुल करणार नाही. तसही अल्लाकडे जायला मला कुणा मौलवीची गरजही नाही. नाव नाहीच सांगत आता. एकच सांगेन अप्पा, असाच मानुस म्हणुन रहा नेहमी. तुझ्या आई बाबांची काळजी घे. सगळे मित्र नेहमी एकत्र रहा. मी रोज दुवा करते तुम्हा सगळ्यांसाठी. इन्नीला हे पत्र मिळताच लगेच सांग.
(पत्राचा शेवट करुनही अजुन बरेच काही आहेच. हे सगळे पत्र वाचताना तुला माझी ‘आले-गेले’ ही भाषा एकदम विचित्र वाटली असेल ना वाचायला? मग विचार कर अप्पा ईतके वर्ष मी किती गोष्टींसाठी स्वःताशीच झगडले असेल, तेही इतरांना कळु न देता. तुला पत्रोत्तर देता येणार नाही कारण मी पत्ता देत नाहीये. माझी आठवण एक चांगली व्यक्ती म्हणुने नेहमी ठेव अप्पा.)
प्रतिक्रिया
3 Apr 2019 - 9:48 am | प्रमोद देर्देकर
दंडवत साहेब तुम्हाला.
तुमच्या लिखाणाचा मी मोठा पंखा झालोय.
सगळं कसं डोळ्यादेखत घडतंय असं ओघवते लेखन आहे तुमचे .
तुम्हाला भेटायला आवडेल.
3 Apr 2019 - 11:19 am | राजाभाउ
+१ असेच म्हणतो.
खरच तुम्हाला भेटायला आवडेल ...
3 Apr 2019 - 3:00 pm | सरल मान
तुम्हाला भेटायलाच पाहिजे.....
3 Apr 2019 - 4:51 pm | सुचिता१
मनाला भिडणारं लीहीता तुम्ही. पुन्हा वाचायलाही आवडतं.
3 Apr 2019 - 5:17 pm | अन्या बुद्धे
भारी लिहिलंय..
3 Apr 2019 - 6:53 pm | झेन
तुमचं लिखाण जबरदस्त खिळवून टाणारं असतं पण एका जिवाची त्याला संभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाची घुसमट... वाचून अस्वस्थ वाटते. आपण काही करूही शकत नाही आणि दूर्लक्षही करू शकत नाही :-(
3 Apr 2019 - 7:47 pm | शाली
सगळ्यांचे खुप धन्यवाद!
3 Apr 2019 - 9:49 pm | अश्फाक
दर्जेदार लेेखन
वाचताना रामदास यांच्या लेखना ची आठवण येत राहिली
4 Apr 2019 - 10:45 am | लई भारी
काय बोलू!
या दोन वाक्यात सगळं सामावलंय असं वाटलं...
4 Apr 2019 - 6:43 pm | ट्रम्प
कथा वाचताना आपल्या आजुबाजुला घडत आहे असे वाटत होते !! जबरदस्त ताकत आहे तुमच्या लेखनी मध्ये .
किन्नरांची व्यथा पहिल्याच वेळी अनुभवली !! खुप वाइट वाटले गनी ची अवस्था बघून !!
5 Apr 2019 - 3:44 pm | गोरगावलेकर
किन्नरव्यथा वाचून डोळ्यात पाणी आले. कथा आवडलीच.
9 Apr 2019 - 9:31 am | शित्रेउमेश
डोळ्यात पाणी आले.
10 Apr 2019 - 3:00 pm | सुजित जाधव
खरंच डोळ्यात पाणी आलं ही कथा वाचून..... सगळे भाग एकत्र करून एक पुस्तक लिहा ....
11 Apr 2019 - 1:35 am | वीणा३
शाली दादा - अतिशय ओघवतं सुंदर लिहिता तुम्ही. तुमचं नाव वाचलं कि लिहिलेलं सगळं वाचते. प्रतिक्रिया द्यायला जमतच असं नाही दार वेळा. पण लिहीत रहा, खूप चॅन लिहिता तुम्ही.
या लेखात फार वाईट वाटतं अशा लोकांचं, किती त्रास होत असेल, वाईट वाटतं असेल, किती घाबरत असेल त्यांचा जीव. खासकरून टीनएजर मुलं. आधीच गोंधळलेली असतात ती, त्यात घरचे लोकच जर वाईट वागत असतील तर काय हाल होत असतील देव जाणे.
29 May 2019 - 3:03 pm | जगप्रवासी
सुंदर लिहिलंय