माझा निबंध

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
24 May 2019 - 8:28 pm

प्रेरणा: जी. ए. कुलकर्णी यांची एक गोष्ट, बहुदा माझीही मोट असे काही तरी नाव असावे. एक शहरात राहणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीच्या मुलाला शाळेत निबंध लिहावा लागतो तोही त्याने न अनुभवलेल्या जीवनासंबंधी.

दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आसपास एक गोष्ट हमखास पाहायला मिळते ती म्हणजे गहिवराचे कढ आणून लिहिलेल्या सुट्ट्यांच्या आठवणी. या वर्णनांमध्ये मामाच्या गावाला जरा विशेष स्थान असते. ते धूळभरल्या रस्त्यांनी कुठल्या तरी आडगावाला जाणे, मामानी स्वतः अथवा गड्याच्या मार्फत बैलगाडीने घरापर्यंत आणून सोडणे, आज्जी आणि/किंवा मामीने दारातच वाट पाहणे आणि नंतर भाकर तुकडा ओवाळून घरात घेणे हा झाला पहिला अंक.

त्या नंतर सुरु होतो तो प्रचंड कल्पना विलास. गावाकडच्या घरामध्ये दूधदुभत्याची रेलचेल असणे, गोठ्यामध्ये कपिला गाय असणे एकदम मस्ट. सध्या अशा नॉस्टॅल्जिक गोष्टी लिहिणारे किमान साठीच्या घरात असतील. त्यामुळे पहाटेच जात्याची घरघर आणि ओव्यामधून आपली सुटका होते अन्यथा अशा संस्कारी घरामध्ये आपला जन्म झाला नाही याची मला प्रचंड खंत वाटायची. तरीपण चुलाणावर दुधाचे स्वच्छ पितळी पातेले हवेच. आणि त्यातील दूध आज्जी किंवा मामी यांनी प्रेमानेच द्यायला हवे. हे दूध भेसळयुक्त नसल्यामुळे त्याची चव काहीतरी अमृतासारखी असते आणि नंतर उपड्या हाताने आपण मिशा साफ करतो (हि ओळ मुलीपण लिहू शकतात.)

असा हा संपन्न वाडा जिथे असतो तिथे उन्हाळ्यातही भरपूर पाणी असणारा डोह कमीतकमी असावा लागतो. नदी असेल तर वर्णन जास्तच जळाऊ क्षमतेचे होते. तिथे नंतर आपण जाऊन तासंतास डुंबायचे असते. नंतर घरी येऊन सुग्रास जेवण करायचे ज्यामध्ये घरातीलच अढी लावलेल्या आंब्याचा रस, वाफाळता भात वगैरे पदार्थ असतात. जोडीला आज्जीने निगुतीने केलेले लोणचे आणि वाळवण्याचे पदार्थ असतील तर फारच मज्जा (हे ब्राउनी पॉईन्टचे वाक्य आहे.) अजून ब्राउनी पॉईंट्स पाहिजे असतील तर गावाजवळ डोंगरावर करवंदाची जाळी असणे आवश्यक आहे आणि निदान या गोष्टीमध्ये तरी त्याला करवंद न म्हणता रानमेवा म्हणायला पाहिजे.

नंतर येतो तो म्हणजे एक्दम स्टिरिओटाईप प्रकार म्हणजे दुपारचे खेळणे. तेच ते लिंगोरच्या, रप्पा धप्पी वगैरे. असे करता करता सुटी कधी संपते ते कळतच नाही. मग येतो तो जाण्याचा दिवस. पोटात कालवाकालव होणे, आज्जीने तोंडावरून हात फिरवून निरोप देणे आणि पुढच्या सुट्टीची वाट पाहण्यासाठी घराची वाट पकडणे.

यातील बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी (पन्नास वर्षापूर्वीचे नगर शहर ज्यांना माहिती आहे त्यांना हे समजू शकेल) कल्पनेतदेखील शक्य नव्हते. तरी आमच्या निबंधांमधील सकाळ हि झुंजुमुंजूच असायची आणि आमच्या चित्रात थेट डोंगरावरून वाहत येणारी नदी असायची!

कथालेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

24 May 2019 - 8:38 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलं आहे.

40 वर्षांपूर्वीचा नगरचा उन्हाळा नकोसा होता हे नक्की. पण तरीही तिथल्या वेगळ्या आठवणी असू शकतील की सुट्टीच्या.

जहाल तिखट असलेली भरीत पार्टी आणि काकूंच्या घरातला उंचच उंच छपरी पलंग आठवतो मला

ज्योति अळवणी's picture

24 May 2019 - 8:38 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलं आहे.

40 वर्षांपूर्वीचा नगरचा उन्हाळा नकोसा होता हे नक्की. पण तरीही तिथल्या वेगळ्या आठवणी असू शकतील की सुट्टीच्या.

जहाल तिखट असलेली भरीत पार्टी आणि काकूंच्या घरातला उंचच उंच छपरी पलंग आठवतो मला

इतकं उचकून लिहायला काय झाले? =))
ज्यांनी असं आनंददायी बालपण अनुभवलं आहे त्यांना लिहू दे की तसं. काय बिघडलं?

तुम्ही तुमच्या आठवणी लिहा नगरच्या. कोणी नको म्हटलंय? त्या पण वाचू की आम्ही.

माथेरान/महाबळेश्वरचा/आणि कुठचातरी/ सूर्यास्त पाहून अर्धा लाख पाच दिवसांंत उडवून परत सुटीतल्या (महागड्या) क्लासला हजर राहायचं असतं आता.
असले निबंध वाचून काही मुलांना रडू यायचं.
------
पटलाय लेख.

त्याच गावी मामेभावंडं कशी मजा करत असत?
१)आइस्क्रीम पाट आणणे,
२) पिटातले पिच्चर बघणे,
३)एखादी जत्रा.

लॉल हे असले निबंध लेखक लय डोक्यात जातात :D

उन्हाळ्यात, दिवाळीत बायकोला आणि पोरांना तिच्या माहेरी पाठवण्यामागे 'आर्थिक' कारण किती प्रमाणात असते?
सुट्टी, सणावारात होणारा ज्यादा खर्च मुलीकडच्यांकडून वसूल करायचा. आम्ही तुमच्या मुलीला (आणि तिच्या पोरांना) १० महिने पोसतो, तुम्ही त्यांना २ महिने पोसा.
आमची गुजराती शेजारीण तर परत येताना स्वतःसाठी, मुलांसाठी वर्षभरचे कपडे घेऊन यायची.

परत मामाची शेती असेल तर त्यांनी जेकाही पिकवलं असेल ते वर्षभराचे धान्य या शहरकडच्यांना मिळत असू शकते. काकाकडून धान्य येते असे कधी ऐकण्यात आले नाही.

मायबोलीवर अतुल ठाकूर यांचा सांस्कृतिक भांडवल, भाषा आणि असमानता लेख आहे. ज्यांच्याकडे भाषा/शब्दसंग्रह जास्त आहे, मीडियाला ऍक्सेस जास्त आहे ते लोक ट्रेंड सेट करतात.

मराठी आंतरजालाच्या बाबतीतदेखील हे जाणवते. ९०च्या दशकात परदेशात गेलेली, शक्यतो पुण्यामुम्बैतली, उच्चशिक्षित,खाऊजाच्या आधीपासून ज्यांच्या आईवडलांची पिढी मध्यमवर्गात होती, शक्यतो एकाच जातीचे असे लोक इथे सर्वप्रथम आले. ते (किंवा खासकरून त्यांच्या घरबशा बायका) असले निबंध लिहू लागले, त्याखाली इतर तसलेच लोक वा वा करणार, माझेपण बालपणपण असेच गेले किंवा माझीपण आई/आजी/तत्सम कोणी स्त्री नातेवाईक अशीच होती सांगणार...
नंतर आलेल्या इतर लहान गावतल्याना 'अरे आपले बालपण/आई/आजी असली नव्हती म्हणजे आपण दुर्मिळ आहोत' असे वाटायला लागणार. खरंतर हे निबंध लिहणारेच दुर्मिळ होते, आहेत.े

मधाळ भाषा आणि ठराविक साच्याचे साहित्य हि बऱ्याच वर्षापुरते काही मासिकं आणि दिवाळी अंकांची मक्तेदारी होती.

अगदी २-३ मुलं असण्याच्या काळातदेखील अवि आणि अरुणा आपापल्या आई वडिलांची एकुलती एक अपत्यं असत. दोन खोल्यांचं सुबक घर, अवि सावळा असला तरी राजबिंडा आणि रुबाबदार आणि त्याची ती कपाळावरती रुळणारी झुलपं! अरुणा देखणी ते लाखात एक अशी (पुढे जाऊन काय ट्विस्ट असणार आहे यावर हे देखणेपण अवलूंबन असायचे). अविच्या बाबांची गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि त्यामुळे बुलेट बाळगणारा अवि. या आणि अशा प्रकारचे साहित्य आणि त्याची भाषा हे कधीच प्रमाण म्हणून मानले जावे एवढ्या वकुबाची नव्हती.

म्हणून कुठे तरी मुक्तपीठ मध्ये एखाददुसरा लेख लिहीणार्या लोकांची भाषा एव्हडीच त्या भाषेची धाव होती आणि आहे. त्यातही 'आम्ही दोघं' असं सहज सोपं लिहिण्या ऐवजी 'आम्ही उभयतां' असं वाचनात आले कि समजावे कुठली तरी परदेशवारीची आठवण वाचावी लागणार आहे!

तुषार काळभोर's picture

25 May 2019 - 7:55 am | तुषार काळभोर

मी माझ्या नागपूर/पुणे/मुंबई/नाशिक च्या आत्याकडे सुट्टीला गेलो, असं पण असायला हवं ना!

कोणीतरी डेंगळेवाडी बुद्रुकच्या मामाकडे जातो तर त्या मामाच्या मुलांनी आटपाट नगरातल्या आत्याकडे जायला पाहिजे.

नूतन's picture

25 May 2019 - 10:22 am | नूतन

गावाकडची मुलं जिवाची मुंबई करायला येतातच की! त्याबद्दल ही लिहावं.

नगरमध्ये नदी ... वाचूनच हसू आले - सीना नावाचा एक प्रकार होता खरा पण तिथे लोखंडी पुलाला पाणी लागले की तो प्रत्येक नगरकराच्या चर्चेचा विषय होत असे, पण फक्त एकच दिवस, दुसऱ्या दिवशी पुन्हा नदीत एक बादली पाणी मिळेल तर शपथ.

मग आम्ही रात्री हजारे बंधू भेळवाले यांची हातगाडी घेऊन निघायचो, त्या गाडीवर घरातली सगळी रिकामी भांडी, बादल्या लादायच्या आणि नगरपालिकेच्या दारात एक बुचाचं झाड होतं, त्याच्या तळाशी एक हौद होता. त्यात 12 महिने पाणी असे. त्यानं सगळी भांडी भरायची आणि पाणी सांडत सांडत घरापर्यंत हातगाडी आणायची.

पुढे प्रत्येक घरात छोट्या मोटारी थेट नळाला लावण्याची फॅशन आली, आणि त्यातून वाचण्यासाठी सकाळी सगळ्या भागाची वीज घालवण्याची शक्कल फक्त नगरकरांच्याच डोक्यात येऊ शकते. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी ...

आणि सध्या ही परिस्थिती आहे ->

राहुल कुलकर्णी यांचा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील एक अनुभव Whatsapवर इंग्रजीत लिहिलेल्या भावपत्रात वाचनात अाला. त्यातले हेलावून टाकणारे वास्तव अधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठीत केला आहे हा स्वैर अनुवाद
*- मंगेश जांबोटकर
------------------------------
"अहमदनगर ते नांदेड असा माझा रेल्वेने प्रवास चालू असतांनाचा हा प्रसंग ! अत्यंत कडक ऊन आणि उष्म्याने अत्युच्च पातळी गाठलेली !
धावत्या गाडीत वा-यासाठी दरवाज्याकडे उभा राहिलो मात्र, त्या उष्ण हवेच्या एका श्र्वासातच आगीचा लोळ छातीत घुसल्यागत झालं आणि मी झटकन मागे फिरलो. अजून चार तासांचा प्रवास करायचा बाकी होता नि या उष्म्याला तोंड देणं भाग होतं. वेळ मजेत घालवण्यासाठी उत्तम साधन म्हणजे माझा मोबाईल ! पण त्याची बॅटरीच निष्प्रभ झाली होती. जाम कंटाळा आला होता. पाण्याने अर्धी भरलेली बाटली हातात धरून त्या गरम पाण्याचे दोन दोन घोट घेऊन तहान काही भागत नव्हती. थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन डब्याडब्यातून फिरणारे विक्रेतेही फिरकत नव्हते.
अाता मनात होता एकच विचार .... जास्तीत जास्त वेगात ही गाडी चालावी अाणि लवकरात लवकर हा प्रवास एकदाचा संपावा!
अशा विमनस्क अवस्थेत बसल्यावर माझी नजर बाकाखाली पडलेल्या एका जुन्या वर्तमानपत्राच्य
ा चुरगळलेल्या पानावर पडली. वेळ काढण्यासाठी मी ते उचलून वाचायला घेतलं. एक एक बातमी वाचतांना मी हादरूनच गेलो. भयानक दुष्काळी परिस्थिती अाणि परिणामी होणाऱ्या शेकडो शेतक-यांच्या आत्महत्या ! दिवसरात्र खपून धान्य पिकविणा-या, लोकांना अन्न देणा-या शेतक-यावरच उपासमारीत मरण्याची वेळ यावी हे अत्यंत क्लेशकारक होतं. धावत्या गाडीच्या खिडकीतून दोन्ही बाजूंना दूरवर, अगदी क्षितीजापर्यंत दिसणारी सर्वच शेतं उजाड अाणि रखरखीत दिसत होती ! मराठवाडा आणि विदर्भाने गेल्या पाच वर्षांत पाहिलेला हा सर्वात भीषण दुष्काळ !
अशा विचारांमध्ये मग्न असतांना अचानक गाडीचा वेग मंदावला अाणि गचका देऊन गाडी थांबली ! कडक उन्हाळ्यामुळे गाडीत प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. गाडी थांबताच प्रचंड आरडाओरडा ऐकू आला तो गाडीबाहेर जमलेल्या गर्दीचा ! गाडी स्थानक सोडून मधेच कुठेतरी थांबली होती.
अनेक बायका, मुले नि काही वयस्क माणसे धावत पळत गाडीत चढली. बायकांच्या हातात बादल्या अाणि मुलांच्या हातात बाटल्या होत्या.
वयस्क माणसे आणि मुलांनी संपूर्ण डब्यात भिरभिरत्या नजरेने बाकाखाली प्रवाशांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांत उरलेले काही पाणी मिळते का याचा शोध घेत काही बाटल्या गोळा केल्या आणि बायका झटपट संडासातल्या नळातून त्यांच्या बादल्यात पाणी भरायला लागल्या !
हेच पाणी पिण्यासाठी आणि अन्न शिजविण्यासाठी पुरवून पुरवून वापरणार होते ते ! अांघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी पाणी तर त्यांना स्वप्नातही दिसणार नाही. आमच्या डब्याच्या संडासाजवळ माझे आसन होते. त्यांची गडबड, गोंधळ मी पहात होतो. माझ्या हातातल्या बाटलीत जेमतेम एकदोन घोट पाणी होतं. तेवढ्यात एका वयस्क माणसाने हळूच माझ्या खांद्यावर थोपटून विचारलं की माझ्या हातातली बाटली मला ठेवायची आहे का टाकायची आहे. मी ती बाटली त्याच्या हातात देताच त्याने ती तोंडाला लावली. केवळ दोन घोट पाणी केवढा मोठा आनंद आणि समाधान देऊ शकतं हे मला त्याचा चेहरा पाहिला तेव्हा कळलं. माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, "देव तुझं भलं करो !" आणि उतरून गेलाही. माझ्या डोळ्यांतली आसवं मात्र ओघळतच राहिली.
एका बाईने कडेवर घेतलेली एक छोटी मुलगी आशाळभूत नजरेने एकटक माझ्याकडे पहात होती. तिच्या नजरेतच मला जाणवलं की ती तहानलेली आहे. मी लगेच माझ्या बॅगेतली दुसरी पाण्याने भरलेली बाटली काढून तिच्या हातात दिली. दोन्ही हातांनी उराशी घट्ट कवटाळून तिने ती बाटली अशी धरली होती की जणू तिला जगातील एक अमूल्य ठेवाच मिळाला आहे !
तिकीट तपासनीस रेल्वे पोलिसाबरोबर येतांना दिसताच सर्व मंडळी भराभर खाली उतरून पसार झाली.... जमेल तेव्हडे पाणी घेऊन आणि पाण्याचा एकही थेंब खाली न सांडता !
तिकीट तपासनीसाशी बोलतांना कळलं की काही माणसं मागच्या स्थानकात गाडीत चढतात आणि साखळी अोढून या ठिकाणी गाडी थांबवितात, जिथे पाण्यासाठी ही मंडळी गर्दी करून वाट पाहत असतात ..... असे गेले काही अाठवडे नित्याचे झाले होते . माझ्या सहप्रवाशाने विचातलं की त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही म्हणून. त्यावर त्या तिकीट तपासनीसाने सांगितलं की निसर्गाने दुष्काळाचा सर्वात मोठा तडाखा या भागाला दिलेला आहेच आणि जगण्यासाठी धडपडणाऱ्या या माणसांविषयी माणसांमध्येच माणुसकी हवी ना ! तो पुढे म्हणाला, "थोडा वेळ देऊन, आम्ही धाक दाखवून त्यांना गाडीतून उतरावयास भाग पाडतो... नियम माणुसकीपेक्षा का कधी मोठे असतात !"

हीच आठवण मी विजय तेंडुलकरांनी 1990 च्या सुमारास लिहिलेल्या रामप्रहर सदरात वाचली आहे. ती अजून कुणाचीतरी आहे आणि बहुदा 1970 च्या दशकातली किंवा आधीची आहे. यंदाच्या दुष्काळाची भीषणता याने कमी होत नाही, पण ज्याचे श्रेय त्याला मिळावे म्हणून इथे प्रतिक्रिया टाकतो आहे. मूळ पुस्तक सापडले तर ती मुळातून टाकेन इथे.

विजुभाऊ's picture

30 May 2019 - 10:27 am | विजुभाऊ

नळाला मोटार लावण्याअगोदर नगरचे लोक नळ असेल तेथे रस्त्यावर खड्डा करून त्यातून नळाच्या कॉकची लेव्हल जमिनीलगत ठेवून त्या खड्ड्यातून पाणी भरत ते आठवले.

अभ्या..'s picture

30 May 2019 - 11:16 am | अभ्या..

पुढे प्रत्येक घरात छोट्या मोटारी थेट नळाला लावण्याची फॅशन आली, आणि त्यातून वाचण्यासाठी सकाळी सगळ्या भागाची वीज घालवण्याची शक्कल फक्त नगरकरांच्याच डोक्यात येऊ शकते. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी ...

जशा टूल्लू मोटरी प्रचलनात आल्या तसे पाणी यायच्या वेळेस लाईट घालवायची एमेसीबीची आयडीया सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आणि जवळपास सर्वच मराठवाड्यात पहिल्यापासून आहे. त्यावर उपाय म्हनून पेट्रोल जेनसेट बसवणे हेही पाहण्यात आहे. पैसे देउन एक्स्ट्रा जोड घेणे, पाईपचा व्यास मोठा घेणे, खड्डा करुन पाणी ओढणे, जी लाईन जवळ तेथुन चोरुन पाईप जोडणी करणे, चेकिंगला आले असता पैसे चारणे अशा आयडीया तर घराघरात वापरल्या जातात.