इंग्रजी मालिका - ब्रॉडचर्च

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
20 Apr 2019 - 10:59 pm

ब्रॉडचर्च ही मालिका पूर्ण पाहून झाली ... बरीच गंभीर होती .. पण काही हलकेफुलके सीन्सही होते .. 3 सिजन्स मध्ये 3 वेगळ्या केसेस होत्या . पहिल्या एपिसोड मधल्या खुनाच्या गुन्ह्याचा गुन्हेगार आठव्या एपिसोड मधे समजतो ... दुसरा सिजन पूर्ण त्याची कोर्टात केस आणि दुसरी एक सेपरेट इन्वेस्टीगेशन केस .. तिसरा सिजन एक वेगळी केस असं आहे ...

आधी पाहिलेल्या सगळ्या सिरिअल्स पेक्षा वेगळी होती .. गुन्ह्यांचा खोलवर शोध हे तर वैशिष्ट्य आहेच पण ते क्राईमच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येईल कदाचित..... त्यात फार विशेष काही नाही ... अर्थात तेही गुंगवून ठेवणारं होतंच . पण हिचं दुसरं अनोखं वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध बऱ्यापैकी उलगडून दाखवले आहेत ... त्यातून त्या त्या माणसांचे स्वभाव , त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन , अपेक्षा , स्वप्नं , अणि प्रत्यक्षात वाट्याला येणारं आयुष्य , त्यातल्या अनपेक्षित समस्या हे सगळं पाहायला मिळालं .. तरुण वयात ठराविक पॉइंटवर आयुष्यात सगळं सुरळीत गोड होणार आहे असं वाटत असतं पण जसा जसा काळ जातो तशा विचारही केला नव्हता अशा समस्या पुढे येतात ... सगळ्याच घटकांवर माणसाचा ताबा राहत नाही ... कदाचित या समस्यांना आपापल्या कुवतीनुसार तोंड देणं , त्यांनी बदलवलेल्या आयुष्याशी ऍडजस्ट करत करत त्यातही आनंद शोधण्यासाठी धडपडणं म्हणजेच आयुष्य असंही मालिका बघताना एकदा पुसटसं वाटून जातं ...

आधुनिक युरोपियन समाजातील नवरा बायको , आई वडील - मुलं , शेजारी / वर्षानुवर्षे मैत्रीचे संबंध असलेली माणसं यांच्यातील परस्परसंबध ज्या पद्धतीने दाखवले आहेत तसे याआधी कुठल्या मालिकेत पाहिले नव्हते ... पहिल्या सिजन मध्ये सीआयडी डिटेक्टिव्ह एली मिलर हिच्या 11 वर्षे वयाच्या निरागस मुलाचं पात्रं भेटतं ... 2 सिजन मध्ये पात्र प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी ओळखीचं होतं , आवडू लागतं .. तिसऱ्या सिजन मध्ये 15 वर्षे वय दाखवलं आहे .. त्याच्या आईला शाळेत येऊन भेटण्याची सूचना येते , हा मुलगा आणि मित्र इतर मुलांना मोबाईल मध्ये पॉर्नचे व्हिडीओ देत असल्यामुळे एक आठवड्यासाठी सस्पेंड केलं आहे म्हणून सांगतात , आई फोन जप्त करून घेते पण मुलगा तिने लपवलेला फोन पुन्हा घेऊन तसलेच व्हिडीओ पुन्हा त्यात घेतो .... हे समजल्यावर एली हातोड्याने त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप ठोकून ते उपयोगशून्य करून टाकते आणि यापुढे शाळेच्या अभ्यासासाठी कॉम्प्युटरची गरज असेल तर शाळेतला कॉम्प्युटर वापरायचा आणि स्मार्टफोन नाही असं ठणकावते ... मुलाला घाबरून आईपुढे मान खाली घालून निमूट ऐकून घेताना पाहून मनोरंजन झालं . एरवी मुलाशी हसूनखेळून असलेली आई याबाबतीत कठोर होते आणि मुलगाही उलट उत्तरं न देता आईच्या धाकाखाली ऐकून घेतो हे पाहणं सुखद होतं .

दुसरं पात्र डिटेक्टिव्ह अलेक हार्डी याचा घटस्फोट झाला आहे .. त्याची 17 - 18 वर्षांची मुलगी आईशी पटत नाही म्हणून तिसऱ्या सिजनमध्ये त्याच्याबरोबर राहायला येते आई दुसऱ्या शहरात पोलीस खात्यातच असते .. आपल्या मुलीवर त्याचा फार जीव आहे .... नवीन कॉलेज, नवीन वातावरणाशी जुळवून घेत असतानाच तिचा मोबाईल फोन कुणीतरी परस्पर घेऊन त्यातला एक खाजगी असा सेल्फी वर्गातल्या सगळ्यांना फॉरवर्ड करतं .. परिणामी सगळे मुलगे तिला कॉलेजात आणि येताजाता वाटेवर त्रास देऊ लागले आहेत ... घटना घडल्यावर 2 आठवड्यांनी वडिलांना सांगते आणि आता हे झाल्यानंतर या कॉलेजमध्ये जुळवून घेणं कठीण आहे आपण परत आईकडे जातो म्हणून सांगते . इतक्या उशिरा का सांगत आहेस विचारल्यावर तुमच्या केसपुढे तुमच्याकडे वेळ कुठे आहे काही सांगायला असा प्रश्न करते .... तिने जाऊ नये म्हणून तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो .. समाजात राहताना असे प्रश्न कधीतरी येणारच , कधीतरी त्याला तोंड द्यायला शिकायचंच आहे , किती दिवस तू अशी तुझ्या आईकडून माझ्याकडे , माझ्याकडून तिच्याकडे अशी कसरत करणार ? मी आहे तुझ्याबरोबर , दोघे मिळून ह्या प्रश्नाला तोंड देऊ असा आधार देण्याचा प्रयत्न करतो ...

हा प्रसंग पाहत असताना भारतातल्या अगदी सुशिक्षित कुटुंबातही याच परिस्थितीत भारतीय वडिलांची प्रतिक्रिया कशी झाली असती हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही , 90 % सुशिक्षित बापांनीसुद्धा आधी मुलीवर आगपाखड केली असती की मुळात असला नसता फोटो काढलासच का म्हणून ? मोबाईल काढून घेणे पासून तो फोडून टाकणे इतपत टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या ... तेव्हा अलेक हार्डीचं मुलीला धीर देणं , मृदूपणे समजावणं मनाला स्पर्श करून गेलं .... मुलगी दुसऱ्या दिवशी जायचं तिकीट काढते तेव्हा तिची मनधरणी करताना , आपलं पेसमेकर बसवण्याचं ऑपरेशन यशस्वी झालं , जीवनाची दुसरी संधी देवाने / नियतीने दिली तिचा अर्थ मी इथे असायला हवं आहे , तुझी काळजी घेणं हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला ही दुसरी संधी दिली गेली आहे असं मला वाटतं असं सांगून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो ... त्याची सहकारी एली मिलर मी तुझ्या जागी असते तर तिकीट फाडून टाकलं असतं , प्रत्येक गोष्ट काय मुलांची ऐकायची म्हणून सांगते तेव्हा " काहीतरीच काय ? मी अशी तिला मनाविरुद्ध जबरदस्तीने नाही थांबवू शकत" म्हणतो .

शेवटी तिला स्टेशन वर सोडताना तिच्या वर्गातले मुलगे रस्त्यावर दिसतात , त्यांना बघून ती नर्वस होते ते बघून गाडी थांबवून त्यांना सज्जड दम भरतो आणि आपल्या मुलीला जराही त्रास झाल्याचं कानावर आलं तर परिणाम भोगण्याची तयारी ठेवा असं बजावतो . गाडीत परत येऊन मुलीचं तिकीट फाडून टाकून तू कुठेही जाणार नाहीयेस असं सांगतो आणि तिची मनमानी थांबवतो ...

तसे मालिकेत अनेक सुंदर सिन आहेत पण हे 2 - 4 मला विशेष भावले ....

तिसऱ्या सिजनमध्ये रेपच्या केसचं इन्वेस्टीगेशन दाखवलं आहे... रेपच्या विक्टीम ठरलेल्या स्त्रियांसाठी जी सपोर्ट यंत्रणा दाखवली आहे - कुठलाही आर्थिक मोबदला न घेता , संपूर्ण निरपेक्ष भावनेतून कार्य करणारी , त्या स्त्रीला सतत भेट देऊन , तिला मानसिक आधाराची गरज असेपर्यंत तिच्या संपर्कात राहणारी , पावला पावलावर तिला धक्क्यातून - ट्रॉमामधून सावरण्यासाठी तिची पोलिसात तक्रार करण्याची इच्छा नसेल तर त्या इच्छेचा मान राखून संपूर्ण गुप्तता राखणारी , फक्त तिला आधार देऊन परत उभी करण्यावर संपूर्ण फोकस ठेवणारी संस्था ती बघून अपार कौतुक आणि आदर वाटला .... भारतात अशा काही संस्था कार्यरत आहेत का याबद्दल काही माहिती नाही ... परदेशातल्या स्त्रियांबाबत ही एक बाब तरी नक्कीच हेवा करण्यासारखी वाटली ..

पहिल्या सिजन मध्ये ब्रॉडचर्च या लहानशा युरोपियन गावात एका 11 वर्षे वयाच्या मुलाचा खून झाला आहे आणि त्या गुन्हेगाराचा शोध घेणं हे मुख्य कथानक आहे ... या गावात सगळे लोक पिढ्यानपिढ्या एकमेकांना परिचित जवळचे आहेत , खेळीमेळीने प्रेमाने राहतात .... असा गुन्हा इथे कधीही झालेला नाही ... एकूणच गुन्हेगारीचं प्रमाण अगदी नगण्य आहे.. अशा या गावात ही घटना फार खळबळ उडवणारी आहे.. संशयाची सुई मुद्दामून अनेक पात्रांवर नेण्याचं तंत्र वापरलं आहे... पहिल्या सिजनच्या शेवटच्या म्हणजे आठव्या एपिसोड मध्ये खुनी कोण ते समजतं ... अनपेक्षित धक्कातंत्राचा यशस्वी वापर केला आहे . तिसऱ्या सिजन मध्येही रेपच्या गुन्हेगाराचा शोध घेताना हेच तंत्र वापरलं आहे ... शेवटच्या एपिसोडमध्ये गुन्हेगार कळतो तेव्हा मिनिटभरासाठी डोकं बधीर होतं ..

डिटेक्टिव्ह अलेक हार्डी आणि डिटेक्टिव्ह एली मिलर यांच्यात वाढत जाणारी मैत्री ही खूप रिफ्रेशिंग वाटली पाहायला .... कुठलाही रोमँटिक रंग देण्याचा प्रयत्न न करता मेल आणि फिमेल कॅरॅक्टर मधली ऑनस्क्रिन निखळ मैत्री आधी पाहिलेल्या मालिकांमध्ये फारशी कुठे आढळली नव्हती .... त्यामुळे एक वेगळा अनुभव वाटला ..

एली मिलरचं काम केलेल्या अभिनेत्रीला दुसऱ्या कुठल्यातरी रोल साठी ऑस्कर मिळालेलं आहे .. तिचा अभिनय अतिशय जिवंत , नैसर्गिक आहे ... अलेक हार्डीचं काम डेव्हिड टेनॅन्ट या माझ्या आवडत्या अभिनेत्याने केलं आहे ... खरं म्हणजे जेसीका जोन्स ह्या मालिकेचा पहिला सिजन ब्रॉडचर्च पूर्वी पाहिला .. त्यातलं डेव्हिड टेनॅन्टचं काम प्रचंड आवडलं ... दुसऱ्या आणि तिसऱ्या सिजनमध्ये तो नाही म्हटल्यावर पुढे पाहण्याचा इंटरेस्टच गेला ... मग त्यानेच काम केलेलं दुसरं काहीतरी शोधताना ब्रॉडचर्च सापडली .. पण एकूण मालिका म्हणूनच खूप पसंतीस उतरली ...

ब्रॉडचर्च पाहून झाल्यावर टेनॅन्टचीच दि एस्केप आर्टीस्ट ही तीन एपिसोडची मालिका पाहिली, तिने मात्र साफ निराशा केली , कोर्टाचे नियम अजिबात समजले नाहीत आणि चिडचिड झाली , जो शेवट केला तो ओढूनताणून जमवल्यासारखा वाटला ... उलट ब्रॉडचर्चच्या दुसऱ्या सिजनमध्ये तब्बल 8 एपिसोड कोर्टाची केस दाखवली आहे आणि त्यात पुराव्यांचा शोध , कोर्टाचे नियम , साक्षीदार , साक्षी , उलटतपासणी या सगळ्यात न समजण्यासारखं काहीच नव्हतं आणि ते बघायला भयंकर इंटरेस्ट वाटत होता , दोन्ही वकिलांची पात्रं अप्रतिम होती , एकीचा आक्रमक सूर तर दुसरीचं शांतपणे पुराव्यांची एक एक वीट रचून लॉंग टर्म खेळी खेळणं ... सर्वच बाबतीत ब्रॉडचर्च अपेक्षांना खरी उतरली . एकूण 24 च एपिसोड आहेत .. आणखी सिजन्स हवे होते असं वाटलं मालिका संपल्यावर ... हा मालिकेच्या यशाचा पुरावा म्हणता येईल .

कलाप्रकटनसमीक्षालेख

प्रतिक्रिया

निशापरी ताई इथे स्पॉयलर्स आहेत का हो?

नाही म्हणजे स्पॉयलर्स असतील तर पुढे वाचत नाही कारण स्पॉयलर्स वाचायचे नसतात म्हणे.
मागचा एक धागा वाचून आता थोडी प्रगती आहे खरी परंतु अजूनही पूर्णपणे "क्लास" मध्ये प्रवेश मिळाला नाहीय्ये म्हणून विचारले.

नाही , काही स्पॉईलर्स नाहीत ... जपून लिहिलं आहे , स्पॉईलर येऊ देणं कटाक्षाने टाळलं आहे .

विनिता००२'s picture

22 Apr 2019 - 11:04 am | विनिता००२

हिं दीत आहे का?

निशापरी, तुमचे लेख वासून इंग्रजी मालिका पहाव्याशा वाटू लागल्यात. गेम ऑफ थ्रोन त्या पैकी एक :)

:) धन्यवाद .. हिंदीत नाही आहे ... पण इंग्रजी सबटायटल्स आहेत .. फारसं कठीण इंग्लिश नाही आहे ... आणि इंग्लिश मालिका या जवळजवळ 99 % मराठी आणि 70 % हिंदी मालिकांशी तुलना करता कितीतरी पटीने चांगल्या असतात ... बऱ्याच वेळा वाटतं असं काहीतरी दाखवणं मराठी / हिंदी मालिकांच्या दिग्दर्शकांना का नाही सुचत किंवा जमत ? विषयांमध्ये इतकं वैविध्य असतं .... उलट बहुतेक मराठी हिंदी मालिकांमध्ये एक तर प्रेम प्रकरण किंवा कौटुंबिक कारस्थानं याशिवाय दुसरे काही विषय नसतात , त्या पहाव्याशाही वाटत नाहीत .

मराठीतील अग्निहोत्र ही एक अप्रतिम मालिका होती , हॉटस्टार वर तिचे फक्त 66 च एपिसोड आहेत ... जर आधी पाहिली नसेल तर पहा , नक्की आवडेल .... त्या मालिकेच्या तोडीस मराठी मालिका गेल्या 4 - 5 वर्षात तरी झालेली नाही . एका लग्नाची दुसरी गोष्ट इतर मालिकांशी तुलना करता खूपच बरी होती पण मध्यंतरात काहीशी रटाळ झाली , तरीसुद्धा एक चान्स द्यायला हरकत नाही ...

हिंदीतली माझी ऑल टाईम फेव्हरेट म्हणजे बा बहू और बेबी ही मालिका ... कुटुंबावर आधारीत मालिका असूनही कुठलीही कारस्थानं नाहीत आणि हलकीफुलकी पण बाष्कळ विनोदासाठी विनोद नाहीत , तरीही खूप हसवणारी , काहीवेळा इमोशनल करणारी अप्रतिम मालिका होती , हॉटस्टार वर सगळे एपिसोड आहेत .

यासारख्या मालिका प्रेक्षक उचलून धरून नाहीत बहुतेक , म्हणून यांचं प्रमाण नगण्य आहे मराठी हिंदीत :( .

ब्रॉडचर्च आवडेलच जर पाहिलीत तर पण मराठी , हिंदीतल्या ह्या पाहिल्या नसतील तर पहा नक्की .... एका लग्नाची दुसरी गोष्ट झी च्या चॅनेल वर आहे ...

विनिता००२'s picture

22 Apr 2019 - 4:44 pm | विनिता००२

नक्कीच बघेन तुम्ही म्हणताय तर :)

धन्यवाद !!

लई भारी's picture

30 Apr 2019 - 4:55 pm | लई भारी

कुठे बघितली तुम्ही?
नेटफ्लिक्स नाही आहे माझ्याकडे :)

अग्निहोत्र टाकलीय watchlist मध्ये!

टॉरेंट वरून डाउनलोड करून पाहिली .

मालिकेची फार सुरेख ओळख करून दिली आहे. आज नेटफ्लिक्सवर मालिकेचे तीनही सीझन्स पाहून झाले. खूपआवडली. अजून सीझन्स हवे होते असंच वाटलं.