ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
_________________________________/\________________________________
हे सारं स्वान्तःसुखाय आहे. आपल्याला कोणाला काही पटवून द्यायचं नाहीये की कोणाचं काही मत खोडून काढायचं नाही. कोणाला वाटेल हे सारं टनाटनी आहे , कोणाला वाटेल हे अज्ञानमुलक स्वात्मरंजन आहे ! असो , आपला आता कोणताच अभिनिवेश नाही , खरेतर आहेच हे स्वात्मरंजन! आपल्याला कोणाला काही पटवुनच द्यायचं नाहीये.
फेसबुकवर कसे गेल्यावर्षी किंव्वा त्याही आधी आपण जे काही लिहिले , जे काही ट्रेक केले, जे काही आनंदचे दु:खाचे क्षण उपभोगले ते मेमरीज मध्ये परत परत वर येत रहाते आणि आपल्याला आपल्याच लेखनाचा , आपल्याच अनुभवांचा पुनःप्रत्ययाचा आनंद देत रहाते तसा काहीसा उद्देश आहे . आपल्याला आत्ता जेवढं समजतंय, जेवढं उमगतंय, जेवढं अनुभवाला येतंय, तेवढं लिहुन काढु , आपल्याच आनंदाकरिता आपल्याच चिंतनाकरिता. तुकोबा म्हणाले तसं - काही पाठ केली संतांची उत्तरे | विश्वासे आदरे धरोनियां || असे काहीसे करत राहु ! फेसबुक दरवर्षी आठवण करुन देत राहिलच ! कसं असतं की सगळ्याच गोष्टी पहिल्याच झटक्यात नाहीत लक्षात येत , वारंवार ऐकुन , विचार करुन हळु हळु आतवर झिरपत जातं .
आपल्याला कसे लहानपणी नानांनी "अ" काढायला एकदाच शिकवले , पण त्यानंतर कित्येक दिवस आपण नुसते अ गिरवत होतो . आता आपला अ खराब आला म्हणुन त्याने नानांनी शिकवलेला अ खराब होणार नाहीये पण खुप वेळा गिरवल्याने तुमचा अ नानांनी शिकवले तसा आखीव रेखीव कोरीव आला तर नानांसारखा अ आपल्याला कळाला असे आपण म्हणु शकु . आता सुंदर हस्ताक्षराचे मार्कही मिळणार नाहीयेत कि कोणी कौतुकही करणार नाहीये , हे सारं अगदीच स्वान्तःसुखाय आहे. :)
_________________________________/\________________________________
खरं तर एखादी ओवी बाजुला काढुन त्यावर काहीतरी लिहावे असा अमृतानुभव ग्रंथ नाही , इथली प्रत्येक ओवीच अफाट आहे , पण तरीही काहीकाही मात्र अगदी प्रकर्षाने लक्षात राहुन जातात मनात घोळत रहातं आणि वारंवार " कसं अफाट लिहिलंत हे, दुसरे शब्दच नाहीत" असा विचार मनात येत रहातो आणि आपण अजुनच विनम्र होत जातो..... पायीची वहाण पायी बरी ..... माऊली माऊली.
|| ॐ ||
ऐसी इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ॥ १-१ ॥
ज्यांना कोणतीही उपाधी चिकटतच नाही असे जे निरुपाधिक जागाचे मायबाप , समस्त जगाचे मुळ, शिव शक्ती त्यांना नमस्कार असो . पहिला मंगलाचरणाचा श्री गणेशवंदनाचा श्लोक वाचायची लहानपणापासुन सवय झालेली, अगदी ज्ञानेश्वरीतही देवा तुची गणेशु सुरुवात ! इथे मात्र सुरुवात शिवशक्ती नमनाने ! किंव्वा त्याच्याही आधीचे "यदक्षरमनाख्येयं आनंदजकेवलं | श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतंअमाश्रये ||" हा सद्गुरु स्तवनाचा श्लोक ! गणपती नाहीच ! मुळात शिव शक्तीच निरुपाधिक , मग गणपती बाप्पा तरी कोठुन असणार !!
पहिल्याच श्लोकाला समर्थांच्या आत्मारामाची आठवण आली -
" जयास लटिका आळ आला । जो माया गौरीपासूनि जाला ।
जालाचि नाही तया अरूपाला । रूप कैंचें ? ॥ श्रीराम ॥
बाकी ह्या अनुभवामृताचे एक मात्र आहे की केवळ फक्त पहिलेच प्रकरण नाही तर संपुर्ण ग्रंथातच ह्या ग्रंथाचा लेखक नाथसंप्रदायाचा कोणीतरी सिध्द योगी असावा असे जाणावत रहावे इतक्या अप्रतिम उपमा आहेत . म्हणजे अगदी अक्षरशः अमृतातेही पैजा जिंके !!
हा ठाववरी वोयोगभेडें । जें बाळ जगायेव्हढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥ १-६ ॥
हे शिवशक्ती एकामेकात इतके परिपुर्ण आहेत की ह्यांनी अख्खे जगायेवढे बाळ जन्माला घातले आहे तरीही ह्यांच्या मध्ये तिसरा असं कोणी उद्भवतच नाही . जे जी काही आहे ते ते सारे शिव आणि शक्ती च , तिसरं असं काही नाही.
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी ।
किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
शिवामुळे शक्ती परिपुर्ण होते तर शक्ती नसेल तर शिवही उरत नाही असे हे एकोपजीवी , एकामेकात गुंतुन असलेले असे आहेत !
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण येकलें नांदे ।
जग सकळ आधाधें । पणें जिहीं ॥ १-१७ ॥
दो दांडीं एकि श्रुति । दोहों फुलीं एकी दृति ।
दोहों दिवीं दीप्ति । येकीचि जेवीं ॥ १-१८ ॥
दो ओठीं येकी गोठी । दो डोळां येकी दिठी ।
तेवीं दोघीं जिहीं सृष्टी । येकीच जेवीं ॥ १-१९ ॥
दाऊनि दोनीपण । येक रसाचें आरोगण ।
करीत आहे मेहूण । अनादि जे ॥ १-२० ॥
शिव आणि शक्ती ह्या स्त्रीपुरुष नामभेदाने जरी हे वेगळे वेगळे वाटत असले तरी तेथे शिवपण हे एकटेच नांदत आहे , जसे की दोन टिपर्यांमधुन एकच ध्वनी निघतो , फुले दोन असली तरी सुगंध एकच असतो , दोन दिवे लावले तरी प्रकाश एकच असतो ! ओठ दोन असले तरी त्यातुन निघणारा शब्द एकच , डोळे दोन असले तरी दिसणारे दृष्य एकच तसे हे शिव शक्ती दोन भासत असले तरी ते एकच आहेत ! हे भासत दोन असले तरी शिवपण आपल्या अद्वैताच्या एकरसाचा उपभोग घेत आहे !
गोडी आणि गुळु । कापुरु आणि परिमळु ।
निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥
समग्र दीप्ति घेतां । जेविं दीपुचि ये हातां ।
तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवुचि लाभे ॥ १-२४ ॥
जसे की गोडी आणि गुळ , कापुर आणि सुगंध हे वेगवेगळे करता येत नाहीत ! जसे की दिव्याचा संपुर्ण प्रकाश हातात घ्यायला गेले तर दिवाच हातात येतो तसे शक्तीचे संपुर्ण आकलन करु गेल्यास हाती शिवपणच गवसते !
मन एकदम बाप्पाच्या मंदिरात जातं " आरती सर्वांपाशी येईल कोणीही मध्ये हात हालु नये" असे म्हणत गुरुजी आरतीचा दिवा घेऊन गाभार्यातुन बाहेर येतात - " श्री जगदंबे उदोस्तु अंबाबाई " ...मंदिरात कापुराचा सुगंध भरुन गेलेला असतो ... आपण मंत्रमुग्ध अवस्थेत आरती घेतो - समग्र दीप्ति घेतां । जेविं दीपुचि ये हातां । आहा ! गुरुजी आपल्याकडे पाहुन स्मित हास्य करतात , प्रत्यक्ष बाप्पाच हसत आहे असे वाटते ... नंतर साधासाच गुळ खोबर्याचा प्रसाद घेताना गोडी आणि गुळु ची आठवण येते ... सारेच कसे एकदम कनेक्टिंग द डॉट्स होत जाते ... सहजे आघवेची आहे ... अहाहा ...
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥
काय सुंदर उपमा आहे ! मुळ शिवपण अरुप आहे , निराकार आहे हे पाहुन जणु शक्तीलाच लज्जा उत्पन्न झाली आणि म्हणुन मग तिने हे अख्खे जगायेवढे लेणे (दागिना) तयार केले नाम रुपाचे !
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।
सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
ही शक्ती आहे म्हणुन तर आपण शिवपणाच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो , कारण हीच जर नसेल तर मग शिवपणाला त्या आनंदाचाही स्पर्ष होत नाही ! शिवपण दुखःपासुन निर्लिप्त आहेच पण आनंदापासुनही तितकेच निर्लिप्त आहे !
जैसि कां समिरेंसकट गति । कां सोनियासकट कांति ।
तैसे शिवेसिं शक्ति । अवघिचि जे ॥ १-४१ ॥
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु ।
तैसा शक्तींसिं केवळु । शिवुचि जो ॥ १-४२ ॥
जसे वार्या मध्ये गती आहे , सोन्यामध्ये लकाकी आहे , तसे शिव आहे तेथे शक्ती आहे आणि जसे कस्तुरी मध्ये सुगंध आहे , आगीमध्ये धग आहे तसे शक्ती आहे तिथे शिवही आहेच आहे !
तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा ।
तही लिंगभेद पहा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥
परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥
आता अशा शिवशक्तीला नमस्कार करु गेल्यास आपण ह्यांच्या शिवाय दुसरे काही नाही असे लक्षात येते मग नमस्कार करणारा तरी असा तिसरा कोणी असणे शक्यच नाही ! पण तरीही जसे सोन्याचे अलंकार निर्माण केले म्हणुन त्याचे सोने असण हरवत नाही तसेच माझे हे नमन करणे आहे !
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु काइ केला चिरटिया ? ।
कीं 'णकार' तिरेघटिया । भेदवला काई ? ॥ १-५८ ॥
ॐकारामध्ये अ उ म ह्या तीन मात्रा असतात म्हणुन काय त्याने ॐकार फाटतो का ? कि ण हे अक्षर काढताना तीन रेघा काढाव्या लागल्या म्हणुन णकार भंग पावतो ?
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे ।
तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥
म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि ।
मी रिघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ १-६० ॥
आणि असे जर मग असेल की ऐक्याचा भाव हरपत नसेल आणि साजिरेपणाचा लाभ लाभत असेल तर मग नमन करण्यास काय हरकत आहे ! संथ असलेल्या पाण्यात तरंग उमटले म्हणुन त्याचे पाणी असणे भंग पावत नाही तर मग पाण्याने अशा तरंगांच्या कमळांचा शृंगार करायला काय हरकत आहे ?
म्हणुन मी भूतेश आणि भवानी ह्यांना ( आणि माझ्याही त्यांच्याशी असलेल्या एकात्मभावाला न विसरता ) त्यांचे एकपण जाणुनच मी नमन करतो !
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
जसे एकदा मीठाने मी पणाचा मोह सोडला की ते समुद्रच होऊन जाते तसे मी माझा मी पणाचा अहंकार अलिप्ततेची जाणीव त्यागुन शंभु आणि "शांभवी" होऊन गेलो !!
थोडकयात आहे हे असं आहे .
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
मागे एकदा ही ओवी लिहिताना गडबडीत ठ टायपायचे विसरुन गेलो अन तसेच प्रकाशित केले . आणि परत वाचताना एकदम भारी वाटले ! मी पणाचा हा जो काही लोभ आहे , जी काही आसक्ती आहे तिचा त्याग करुन मीठासारखे विरघळुन जायचे आहे . आणि एकदा का संपुर्ण नि:शेष विरघळुन गेलो की मग सिंधुत्वाचा लाभ होणार आहे !
आता मग कसला आलाय अभिनिवेश अन कसली आलीय स्वमतांधता ?
हे सारं स्वान्तःसुखाय आहे , कोणालाही काहीही पटवुन देणारे आपण कोण ? रादर आपलं आपल्याला पटल्यावर दुसर्याला काहीतरी पटवुन द्यायला आपण उरणारच कोठे आहोत ? आणि 'दुसरं' असे तरी कोण उरणार आहे !
|| पांडुरंग पांडुरंग ||
_______________________/\_________________________
संदर्भ :
१) अमृतानुभव - सत्संगधारा http://satsangdhara.net/dn/amrut.htm
२) अमृतानुभव - हभप.दत्तराज देशपांडे संपादित - https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti
३) अमृतानुभ - श्री. राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या सुमधुर आवाजात ध्वनीफित - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8
४) व्हॉट्सॅपवरुन अडीअडचणींना मदत पुरवणारे आणि अवघड शब्दांचे अर्थ सांगणारे मित्र आणि त्यांचे संदर्भग्रंथ
५) समान विषयावर असलेला समर्थांचा अप्रतिम ग्रंथ - आत्माराम - http://satsangdhara.net/db/atmaram.htm
_________________________________/\________________________________
(क्रमशः .... बहुतेक)
प्रतिक्रिया
11 Apr 2019 - 6:03 am | सोत्रि
|| पांडुरंग पांडुरंग ||
_/\_ _/\_ _/\_
-(हभप) सोकाजी
11 Apr 2019 - 6:14 am | कंजूस
पोहोचले.
11 Apr 2019 - 8:10 am | प्रचेतस
क्या बात है मार्कस सर...
पुभाप्र
11 Apr 2019 - 8:26 am | शाली
वाह! फार सुरेख
क्रमश: बहुतेक?
पुढच्या भागाची वाट पहातो आहे.
11 Apr 2019 - 8:52 am | यशोधरा
वाचते आहे. लिखाण अर्धवट मात्र सोडू नये.
ते मधले मधले हात जोडल्याचे लांबलचक ईमोजी वाचताना रसभंग करतात, टाकायचेच असले तर लहान आकारातील टाकावेत ही विनंती, हे असे - _/\_.
11 Apr 2019 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार
संदर्भग्रंथांच्या यादीत आत्मारामही आहे. त्या बद्दलही जमेल तेव्हा लिहा.
पुढच्या सर्व भागांची आतुरतेने वाट पहात आहे.
ही लेख माला वाचताना :-
अग्निसंगें लोहो पिटे । तेणें तयाचा मळ तुटे ॥
मग परिसेसीं झगटतां पालटे । लोखंडपण तयाचें ॥
असा काहिसा अनुभव येईल अशी अपेक्षा आहे.
पैजारबुवा,
11 Apr 2019 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. सध्या नुस्तं ओम नमोजी इमोजी पाहून गेलो.
- दिलीप बिरुटे
(वाचक)
11 Apr 2019 - 1:02 pm | चौथा कोनाडा
ते काही मधले मधले हात जोडल्याचे लांबलचक ईमोजी नाहीत काही ....
_______________________/\_________________________
ते ब्रेक / पॅराग्राफ ब्रेक्स आहेत, मला आवडले बुवा.
11 Apr 2019 - 1:15 pm | यशोधरा
तेच हो ते. ईमोजी म्हणा, ब्रेक्स म्हणा. मुद्दा पोचल्याशी मतलब.
11 Apr 2019 - 1:06 pm | चौथा कोनाडा
:-)))
डॉसाहेब .... _______________________/\_________________________
11 Apr 2019 - 9:01 am | अर्धवटराव
अनेकदा असं वाटतं कि या ओव्यांचा अनुभव घेणारे नेमके काय अनुभवत असतील... :)
11 Apr 2019 - 10:53 am | रोमना
नमस्कार,
लेखन कार्य असेच प्रवाही ठेवणे
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
धन्यवाद
11 Apr 2019 - 11:21 am | सतिश गावडे
कालौघात धारणा बदलल्याने व्यक्तिशः हे कालविसंगत वाटत असले तरी एके काळी हा ग्रंथ आणि एकंदरीतच नाथ संप्रदाय हा जिव्हाळ्याचा विषय होता त्यावरुन सांगतो, खुप छान लिहिलं आहे.
तुमचा व्यासंग दांडगा तर आहेच पण असं सहज लेखन तेव्हाच घडतं जेव्हा आकलन आत अगदी खोलवर झिरपलेलं असतं.
पुढील भाग लिहिलात तर आवर्जून वाचेन _/\_
11 Apr 2019 - 12:22 pm | खिलजि
आईची आन , मित्रा काय लिवलंयस यार .. तुल्ला तर माझ्या तर्फे कधी इथे भारतात भेटलास ना तेही मुंबैत तर एक कालाखट्टा गोल्ला फिर्री.. बोलायचंच काम न्हाय .. जल्ला माझ्यासारख्या अडाण्याला एव्हढं कल्लेलं तर या मिपानगरीत कितीतरी इद्वांन हैत त्याबद्द्ल तर बोलायलाच नको ...
जब्बराव जब्बराव जब्बराव
खिलजी बहुत खुश हुआ
11 Apr 2019 - 1:14 pm | चौथा कोनाडा
२% समजलंय, उरलेलं ९८% कधी समजेल ते पाहायचं !
(स्व-गतः हे असले ग्रंथराजू आमी कायमच ओप्शनला टाकलेत, टाळक्यात शिरेल तर शप्पत !)
बोला, पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, श्री ज्ञान ➜ देव, तुका ➜ राम, पंढरीनाथ महाराज की जय !
11 Apr 2019 - 2:40 pm | चित्रगुप्त
मिपावर असे सकस लिखाण येत रहाणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या वाचनखूण साठवलीय. जरा सावकाशीने मन लावून अभ्यासण्याचा विषय आहे हा.
15 Apr 2019 - 7:23 pm | राघव
खरंय. मन लावून अभ्यासण्याचाच हा विषय आहे.
12 Apr 2019 - 5:27 pm | अन्या बुद्धे
खूप छान.. पू भा प्र
12 Apr 2019 - 9:44 pm | रविकिरण फडके
ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव हे थोर ग्रंथ आहेत असे मी गेले ५० वर्षे ऐकत आलो आहे. पण ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली तर ओ का ठो कळत नाही. माझा एक मित्र म्हणतो, दडपून वाचत राहायचे की कळते, हे खरे आहे का? बरे, माझे वाचन कमी आहे असेही नाही. भरपूर वाचतो. (फक्त मराठी व इंग्लिश.) अकरावीपर्यंत संस्कृत शिकलेलो आहे. पण हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे असे दिसते.
तर, ज्ञानेश्वरी समजण्याची काही युक्ती असेल तर अवश्य सांगा, अशी विनंती. (इतरांनी लावलेले अर्थ नकोत आम्हाला.)
धन्यवाद.
15 Apr 2019 - 7:28 pm | राघव
बेलसरे बाबा म्हणतात, ज्ञानेश्वरी-गाथा-नाथभागवत-दासबोध हे सगळे अनुभवण्याचे विषय आहेत. त्यात मी सगळे समजून वाचेन असं म्हटलं तर काहीही समजणार/उमजणार नाही. त्या माऊलीची प्रार्थना करून "समजावून द्या" असं शरणागतच व्हायला लागतं. माय तर द्यायला तयारच आहे, आपण घेणारेच कमी पडतो.
18 May 2021 - 6:32 pm | गॉडजिला
ति वाचायच्या फंदात न अडकता अनुभवायला शिका. एक तरि ओवी अनुभवावी असे उगाच म्हटले जात नाही. फक्त अनुभवा तठस्तपणे... तठस्तपणा गेला की वर्तमानाशी संबंध सुटुन जातो म्हणून फर्स्ट
वॉच द थिंकर,
देन यु विल्ल लँडप ऑन ओब्जरवर हु इज वॉचिंग द थिंकर
कॉल इट द वॉचर
अँड वॉच द वॉचर हु इज वॉचींग द थिंकर.
बाकी सर्व व्यर्थ.....