मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन
आजपर्यंत मिपाकरांनी एखाद्या लेखाचे किंवा कवितेचे विडंबन वाचले असेल किंवा केले देखील असेल. विडंबन म्हणजे एखाद्या प्रसिद्ध साहित्यप्रकाराचा निरागस (किंवा खोचक) विनोद निर्मितीसाठी केलेला व्यक्रोक्तिपूर्ण उपहास. विडंबन हे मूळच्या गंभीर विषय आणि शैली असलेल्या लेखन किंवा कविता अशा साहित्यप्रकाराचे करतात. मात्र मुळातच विनोदी आणि टवाळखोर पद्धतीने लिहिलेल्या एखाद्या कलाकृतीचे जी स्वतःच विडंबीत आहे अशा साहित्यिक प्रकाराचे सुडंबन करता येईल का?
अशाच एका मिपा प्रसिद्ध, अजरामर, यावच्चमिपा डेटाकरौ, अशा "मोकलाया दाहि दिश्या" या कवितेचे भावर्थासह सुडंबन करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. खरंतर ही कविता मला कित्येक दिवस कुन्वित होती परंतु या कवितेला हात घालायचा इतके दिवस धीर होत नव्हता.
मला कल्पना आहे की ही मूळ साहित्यकृती इतकी उत्तुंग आहे की असे काही करणे हे शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे त्यामुळे काही चुकभुल झाली तर सांभाळून घ्यावे, ही विनंती.
मूळ कविता -
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
सुडंबित कविता -
निसटले सूर ओंजळीतून ते मला खुणवीत आहे
श्वास घेतो मोकळे कि मी आता निवृत्त आहे
ऐकू द्या मज बासरी त्या बांबूच्या बेटातुनी
मृदगंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासातुनी
रात्रीच्या तिमिरात होती ढाळलेली जी आसवे
दवबिंदू होऊन भेटली मज उमलत्या पुष्पासवे
पानाफुलातून निर्झरातून श्रुष्टीची ही स्पंदने
उतुन्ग लता रानवारा देती मज ही आमंत्रणे
हळूच ते ढग चुम्बुनि जाती फुलांचे ताटवे
ओठ ओल्या पाकळ्यांचे धुंद होऊन थरथरावें
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाऊक होते
नियम आणि अनुशासनाच्या चौकटीतून मुक्त झालो
सोहळे ऋतूंचे बघया हा पहा मी चाललो
आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या
आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
विडंबित कविता -
निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे
ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे
ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी
बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी
रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख
तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख
गादी, उशा अन चादरीतून मुक्त त्यांचे विहरणे
झाडीतो लाथा, कसे शक्य आता शांत झोपणे
हळूच ते बघ चुंबती चादरीतील सर्वांग माझे
त्रस्त मी, क्लान्त मी, किती अन कुठे खाजवावे
अव्हेरले ते त्रास मी, माझ्या पलंगाचे पाश होते
पेस्ट कंट्रोल ला मज मनीचे गुज ठाऊक होते
ढेकणांच्या त्रासातून अखेर मी मुक्त झालो
झोकून द्यावया पलंगावर हा पहा मी चाललो
झोप झाली अनावर अन पापण्या झुकल्या जराशा
आता ना त्रास ढेकणांचा, झाल्या मोकळ्या साऱ्या उशा
विडम्बक्व्व्वी चामुंडचंदर जोष
कवी हा इमाने इतबारे चाकरी करणारा, नाकासमोर बघून चालणारा, पापभिरू मध्यमवर्गीय परंतु नोकरीच्या त्रासामुळे गांजलेला, निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा असलेला नोकरदार आहे असे एकंदरीत अनुमान आहे. नोकरीच्या त्रासांमुळे त्याची प्रिय झोप देखील हरवली आहे. जणू काही चादर हातातूनी निसटली आहे. ती निसटलेली चादर त्याला आता साद घालत आहे. ये वत्सा ये, मला तुझ्या कायेवर घे.
निसटली चादर हातातूनी ती मला कुन्वित आहे
असा हा त्रासलेला नोकरदार आता निवृत्ती घेतो आहे आणि नोकरीच्या कचाट्यातून मुक्त होतो आहे. आता त्याला ती कुन्वित असलेली चादर ओढून गाढ झोपायचे आहे. त्याच्या दृष्टीने हा मोठा आनंदाचा, सोनियाचा क्षण आहे. अशा भाव विभोर अवस्थेत त्याची काव्य प्रतिभा हे अनमोल काव्य प्रसवते आहे.
तो म्हणतो -
ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे
अशा मुक्त मोकळ्या अवस्थेचा आनंद लुटण्यासाठी त्याला काय काय करायचे आहे हे तो पुढे सांगतो आहे. नोकरीच्या प्रदीर्घ कालावधीत कदाचित हे सर्व त्याला शक्य झाले नसेल त्यामुळे आता त्याला या सर्व राहून गेलेल्या गोष्टी - गेले करायचे राहुनी - त्याच्या टमरेल लिस्ट मधील करायच्या आहे. मुळातच कवी जन सामन्यातील निम्न मध्यम वर्गीय असल्याने त्याची लिस्ट काही फार मोठी नाहीय्ये. त्यामुळे त्याला त्या लिस्ट साठी बकेटची गरज नाही तर टमरेल पुरेसे आहे म्हणून टमरेल लिस्ट म्हटले आहे. या इंद्रियगोचर गोष्टींची यादी तो पुढे देतो आणि त्याची सुरवात ऐकण्यापासून होते. काय ऐकायचे आहे कवीला ?
ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी
नोकरीच्या त्रासाने गांजला असल्याने आणि त्यातच ढेकूण भरलेल्या खाटे वर झोपावे लागत असल्याने त्याला शांत झोप मिळणे दुरापास्त असावे त्यामुळे मी माझे घोरणे ऐकावे अशी त्याची इच्छा आहे. हि इच्छा पूर्ण करण्यासाठी कवीला त्रयस्थाची मदत घ्यावी लागेल असे दिसते आहे. त्याचे घोरणे रेकॉर्ड करून नंतर जागेपणी त्याला ऐकवले तरच हे शक्य दिसते अन्यथा स्वतःचे घोरणे स्वतः झोपेत ऐकणारा मनुष्य विरळा.
ऐकण्याची कर्णेच्छा पूर्ण झाल्यावर त्याला घ्राणेन्द्रीयाची इच्छा पूर्ण करण्याची आस लागली आहे. ढेकणांनी त्रास देऊन झोप हरवल्याने त्याला त्यांचा नायनाट करायचा आहे. ढेकूण मारल्यावर येणार वास त्याला आता कुन्वित आहे. त्याची सुडाची भावना एव्हढी तीव्र आहे कि ढेकूण मारल्यावर येणार दुर्गंध देखील त्याला मोहक वाटतो आहे. तो म्हणतो -
बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी
इतके वर्षं ढेकणांचा त्रास सहन करून देखील कवीची काव्य प्रतिभा मात्र अजूनही टवटवीत आहे. ढेकणांनी चावून चावून पिलेल्या त्याच्या रक्ताबद्दल त्याला रात्रीच्या तिमिरात ढाळलेल्या आसवांचा आठव येतो. ढेकणांनी चावून, डंख मारून माझे रक्त प्यायले आहे असा त्याचा आक्रोश तो जोरकसपणे मांडतो.
रात्रीच्या तिमिरात प्यायले जे रक्तबिंदू मारुनी डंख
आणि सकाळी हेच रक्तबिंदू झोपेत मारलेल्या आणि रक्त पिऊन टम्म फुगल्यावर अंगाखाली चिरडलेल्या ढेकणांमुळे पडलेल्या लाल रक्ताच्या डागांच्या स्वरूपात त्याच्या समोर येतात तेव्हा तर त्याच्या काव्य प्रतिभेला बहर येतो, जणू काही रक्ताचं लाल भडक अग्नी मध्ये रूपांतर होऊन रक्ताग्नीला पंख फुटले आहेत.
तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख
अशा रीतीने कवीची कर्णेच्छा, घ्राणेच्छा आणि नेत्रेच्छा (हे तीन शब्द लिहायला फार कष्ट पडले ब्बा) अशा सगळ्या इंद्रिय गोचर इच्छा पूर्ण करण्याची आस कवीला आहे. नोकरीच्या त्रासातून सुटला असला तरी या नव मुक्त कवीचा ढेकणांचा त्रास काही संपलेला नाही. रात्रीच्या अंधारात अजूनही गादी, उशा आणि चादरीतून ढेकणांचा स्वैर, स्वछंद वावर त्याला जाणवतो आहे.
गादी, उशा अन चादरीतून मुक्त त्यांचे विहरणे
दिवसभर नोकरीत केलेल्या कष्टानंतर कवी शांत झोपण्याच्या अपेक्षेने पलंगावरील गादीवर पाठ टेकवतो खरा परंतु शांत झोप कुठे बिचाऱ्याच्या नशिबात आहे? ढेकणांनी चावून बेजार केल्यामुळे तो तळमळतो आहे. शांत झोप देखील त्याला दुरापास्त झाली आहे.
झाडीतो लाथा, कसे शक्य आता शांत झोपणे
मात्र अशा त्रासिक अवस्थेतही त्याला सुंदर उपमा सुचतात. ढेकणांचा चावा त्याला प्रियतमेच्या चुंबना सारखा वाटतो आहे. आणि तेही फक्त ओष्ठ चुंबन नाही तर सर्वांगाचे चुंबन. काय कमाल आहे प्रतिभेची ! म्हणजे प्रज्ञेची, अहो ... म्हणजे कवीच्या बुद्धिमत्तेची .. असं म्हणायचंय मला.
हळूच ते बघ चुंबती चादरीतील सर्वांग माझे
कवी पुढे म्हणतो मी आता खरोखरच या ढेकणांमुळे त्रासलो आहे, दमलो आहे, थकलो आहे, बेजार झालो आहे. ढेकणांनी सर्वांगावर घेतलेल्या चुंबनांमुळे (हि कवीची प्रतिभा, प्रज्ञा बर का!) जागोजागी ओष्ठ चिन्हे उमटली आहेत आणि त्या चिन्हांवर त्याला नखांचे घर्षण करावे लागत आहे.
त्रस्त मी, क्लान्त मी, किती आणि कुठे खाजवावे
कितीही उत्तुंग प्रतिभेचा कवी असला म्हणून काय झाले? सांसारिक जीवनाचे पाश त्याला थोडेच चुकलेत? त्या पलंगाचे पाश त्याला जखडून ठेवत आहेत. परंतु आता मात्र त्याने निर्धार केला आहे. नोकरीचे पाश तोडून जसा तो मुक्त झाला आहे अगदी तसंच त्याला ह्या पलंगाचे पाश तोडून या त्रासातून मुक्त व्हायचे आहे.
अव्हेरले ते त्रास मी, माझ्या पलंगाचे पाश होते
अखेर त्याने निर्णय घेतला आहे. परंतु पलंगाचे पाश तोडण्याची खरंच गरज आहे का? या ढेकणांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्याने पलंगाचे पाश तोडण्याऐवजी पेस्ट कंट्रोल ला पाचारण केले आहे. जणू काही आपल्या मनीचे गुज प्रेयसी समोर उघड करणाऱ्या प्रियकरा सारखे या त्रासलेल्या कवीने आपले ढेकूण मुक्तीचे गुज त्याच्या समोर उघड केले आहे.
पेस्ट कंट्रोल ला मज मनीचे गुज ठाऊक होते
कवीच्या जीवनात अखेर तो दिवस उजाडला आहे ज्याची त्याला इतके दिवस प्रतीक्षा होती. नोकरीतील निवृत्ती बरोबरच पेस्ट कंट्रोलच्या कृपेने कवीला ढेकणांपासून कायमची मुक्ती मिळाली आहे. त्याचा पलंग, गादी, उशा, चादरी ढेकूणमुक्त झाल्या आहेत.
ढेकणांच्या त्रासातून अखेर मी मुक्त झालो
आज कवी मोठा आनंदात आहे. त्याच्या साठी सोनियाचा दिन म्हणजे खरतर रात्र आहे. आनंदाची देही आनंद पलंग. आता त्याला काय करायचे आहे तर त्याला पलंगावर स्वतःला झोकून द्यायचे आहे आणि गाढ झोपायचे आहे. केव्हढा उत्तुंग विचार आहे बघा. ध्येयामागे झोकून दिल्यामुळे मिळालेले हे यश त्याला झोपून साजरे करायचे आहे. त्याच्या टमरेल लिस्ट मधील आणखी एक गोष्ट त्याने पूर्ण केली आहे.
झोकून द्यावया पलंगावर हा पहा मी चाललो
इतक्या दिवसांचा ढेकणांचा त्रास, तळमळत काढलेल्या रात्री, इतक्या दिवसांची झोपेची वानवा त्यामुळे आता त्याला झोप अनावर झाली आहे. डोळे अगदी मिटायला आले आहेत. एखाद्या भुकेलेल्याच्या समोर पंचपक्वान्न असलेले ताट यावे आणि त्यावर कधी तुटून पडतोय असे व्हावे अशी त्याची अवस्था झाली आहे.
झोप झाली अनावर अन पापण्या झुकल्या जराशा
या कवितेचा शेवट कवीने ढेकणांत.. आपलं .. ते हे.. सुखांत केला आहे. त्याचा पलंग, गादी, चादर, घोंगडी, कांबळ, वाकळ आणि साऱ्या उशा आता ढेकणांपासून मुक्त झाल्या आहेत. तो आता पलंगावर शांतपणे झोपण्यास मोकळा झाला आहे.
आता ना त्रास ढेकणांचा, झाल्या मोकळ्या साऱ्या उशा
जीवनातील नोकरीचा आणि ढेकणांचा असे दोन अध्याय मागे पडल्यावर कवीला मुक्त, मोकळे वाटते आहे. अशा स्वच्छंद अवस्थेत त्याला त्याची प्रतिभा "अशा तळमळल्या रात्री" असे मुक्तसुनीत लिहिण्यासाठी कुन्वित आहे.
प्रतिक्रिया
1 Apr 2019 - 2:44 am | सोन्या बागलाणकर
बाबौ, खतरनाक!
मूळ कलाकृती इतकी परिपूर्ण आहे की तिच्या जवळपास कुठलंही विडंबन जाऊ शकत नाही.
तरीही, सुडंबन आणि विडंबन आणि रसग्रहण आवडले.
1 Apr 2019 - 6:20 am | चामुंडराय
धन्यवाद सोन्या बागलाणकरसर
हे अगदी खरे आहे कि मूळ साहित्यकृती हि अत्त्युच आहे त्यामुळे असे काही करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.
आणि तसा मी यथाशक्ती अल्पसा प्रयत्न केला आहे. आपल्याला माझा प्रयत्न आवडला याचा आनंद आहे.
1 Apr 2019 - 10:14 am | ज्ञानोबाचे पैजार
अत्यंत परिश्रम पूर्वक संशोधन करुन मोठ्या चिकाटिने लिहिलेले विडंबन आणि रसग्रहण आवडले. साहित्याप्रति असलेली आपली निष्ठा पाहून आम्ही सदगदित झालो.
बग गंध मोहक
ही संकल्पनाच भयंकर आवडली आहे. ढेकूणा चिरडल्यावर येणारा वास बराच वेळ नाकातून जात नाही.
उन्हाळ्यात संध्याकाळी विजेच्या दिव्यांवर उड्या मारणारे टणक पाठीचे किडे असतात काळसर रंगाचे. त्यांना चिरडले की पण असाच धुंद गंध येतो.
लहान पणी ते किडे काड्यापेटीच्या डबीते ते किडे भरायचो व हळूच मित्रांच्या कपड्यांवर चिरडायचो. दिवसभर त्यांच्या अंगाला तो वास येत रहायचा.
मेलेला किडा चिरडला तर त्याचा वास येत नाही हा शोधही बालपणी लागला होता.
पैजारबुवा,
1 Apr 2019 - 11:08 am | सोन्या बागलाणकर
पैजारबुवा,
आपला किड्यांबद्दलचा व्यासंग आवडला.
लहानपणी बरेच किडे होते वाटतं....आपल्या घराजवळ =))
4 Apr 2019 - 5:12 pm | चामुंडराय
>>>> साहित्याप्रति असलेली आपली निष्ठा पाहून आम्ही सदगदित झालो. >>>>
कसचं... कसचं ...
1 Apr 2019 - 12:17 pm | तुषार काळभोर
मोकलायाचं सुडंबन- मग त्याचं विडंबन - मग त्या विडंबनाचं रसग्रहण -
लै पेशन्स ब्वॉ तुमच्यात!!
2 Apr 2019 - 7:07 am | चामुंडराय
पैलवान,
होय, हे खरंच मोठ्या पेशन्सचं काम होतं असं आता मागे वळून बघताना वाटतंय.
मी असं म्हणतो आहे कारण हे लिहायला मला खूप दिवस लागले. पहिल्यांदा हि प्रसिद्ध कविता वाचल्यावर सगळी व्यवस्थित (म्हणजे सुडंबन) लिहून काढावी असा विचार आला. ती लिहिल्यावर विडंबन करायला चांगले मटेरियल आहे असा विचार चमकला. मग एकेका ओळीपासून सुरवात केली. सगळी कविता पूर्ण व्हायला बराच कालावधी लागला. नंतर प्रत्येक ओळीवर विवेचन लिहावे असा विचार केला. कार्यबाहुल्यामुळे सलग वेळ देता आली नाही.
हि सगळी प्रोसेस पूर्ण करायला बरेच दिवस लागले. त्यामुळे खरोखर पेशन्सचे काम होते. बऱ्याच वेळा epidural घ्यावे कि काय असा विचार मनात आला.
11 Apr 2019 - 10:50 am | खिलजि
हायला , हे मी आत्ता बघतोय राव ,, खत्रूड लिवलंय .. जब्बराव जब्बराव जब्बराव ,, खिलजी सकाळी सकाळी खुश झाला ..
13 Apr 2019 - 8:35 am | चामुंडराय
धन्यवाद खिलजी. अशा प्रोत्सहनामुळे लिहायला हुरूप येतो.
मग भले कोणी "अनाकलनीय नवकाव्य कंडु" म्हणो अथवा "कुंथुनी मग ते शिळकट पाडू" म्हणो :)