चव

anandkale's picture
anandkale in जनातलं, मनातलं
28 Mar 2019 - 1:54 am

सोसायटीत बरीच भटकी मांजरे होती. शाळा सुटल्यावर आलेली मुले त्या मांजरांना खाऊ घाल, त्यांच्या अंगावरून हात फिरव वगैरे खेळ करीत. तसे बघितले तर सर्वच मांजरे लावारीस नव्हती. गुंड्या बोका चिपळूणकरांनी घरात उंदीर झाले म्हणून पाळला होता. पण पट्ठ्याने उंदरांना कधीच तोंड लावले नाही. त्याला पाहून कधी कुठला उंदीर जीव वाचवायला पळून गेलाय असे हि सहसा कुणाच्या दृष्टीस पडले नाही.

"गेल्या जन्मी उंदीर होता वाटतं, मेला एक उंदीर धरेल तर शपथ" असे चिपळी (उर्फ मिसेस चिपळूणकर) कधी कधी करवादायची.

कोपऱ्यावरच्या इराण्याकडे जातिवंत अल्सेशिअन कुत्रा होता. तो रोज सकाळी मालकाच्या जीपमधून बादशहाच्या तोऱ्यात उतरायचा आणि इराणी गल्ल्यावर बसल्यावर ओटीवरील त्याच्या ठरलेल्या जागेवर निवांत ऊन खात लोळत पडायचा. कधीतरी बच्चे कंपनी त्याच्याशी शेक हॅन्ड करायची.
त्याव्यतिरिक्त कुणाकडे काही पाळीव प्राणी किंवा पक्षी असल्याचे आठवत नाही.

तशी सगळ्याच मुलांना पाळीव प्राण्यांची आवड होती पण मध्यमवर्गीय आईबाप त्यांच्या उत्साहाला चाप लावायचे काम इमाने इतबारे करायची.
"माझ्या वाढदिवसाला मला पप्पी आणून द्याल?" असे स्वप्नीलने एकदा त्याच्या वडिलांना विचारले. त्यावर त्याच्या वडिलांनी पप्पी आणले तर त्याच्यावर कसा खर्च करायला लागेल याची मोठी जंत्री त्याला ऐकवली. त्यानंतर त्याने सोसायटीतल्या भटक्या मांजरांवरच समाधान मानून घेतले.

नवीनच राहायला आलेल्या कुटुंबात एक साताठ वर्षाचा तरतरीत मुलगा होता. सातपुड्यातील कुठल्याशा गावातून हे कुटुंब मुंबईत आले होते. नवरा मंत्रालयात वजन राखून होता. एकंदरीत अवतारावरून सधन वाटत होते. काही दिवस तो मुलगा बाहेरच नाही पडला. शहरात नव्याने आल्यामुळे बुजत असेल. पण सोसायटीतली कार्टी तर बुजरी नव्हती. त्यांनी सरळ घरात घुसून त्यांची ओळख करून घेतली आणि त्याला संध्याकाळी खेळायला ये असे फर्मानाच सोडले.

सुरवातीला फक्त धाकटा संग्रामसिंग खेळायला आला मग दोन तीन दिवसांनंतर त्याची मोठी बहीण रुपकुंवर पण मुलीत येऊन खेळू लागली. प्रमाणभाषेच्या बाहेरची त्यांची बोली ऐकून काही दिवस मुलांना गम्मत वाटली, थोडी टिंगलही झाली पण हळू हळू सर्वाना त्याची सवय झाली. तास दोन तास धावपळीचे खेळ झाल्यावर सर्व बच्चेकंपनी पाण्याच्या टाकीवर बसून गप्पा मारीत. संग्राम नवीन असल्याने त्याला त्याच्या गावची आठवण येई आणि तो गावाकडच्या गोष्टी सर्व मुलांना रंगवून सांगे.

त्याच्या घरी गाई म्हशींनी भरलेला गोठा होता. तो दुपारी वासरांबरोबर खेळतो हे ऐकून सगळ्यांचेच डोळे विस्फारले. डाव्या हाताने रुमाल फडकावीत उजव्या हाताने नागाची शेपटी पकडून त्याला पकडणाऱ्या भिवाची गोष्ट जरा जास्तच वेळ रंगली. त्याच्या शेतावर हरिण आणि काळवीट येतात हे ऐकल्यावर तर सगळ्या पोरांना त्याच्या शेतावर सुटी घालवावीशी वाटू लागली. चिपळूणकर काकांच्या घरातल्या उंदरांचा संग्रामने बरोबर बंदोबस्त केला, कुठे कुठे तुरटी, फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे वगैरे लावून आणि पिंजरे लावून चांगले पाच सहा उंदीर एका आठवड्यात पकडले. कौतुकाने चॉकलेट हातावर ठेवले तर संग्राम म्हणाला, हे नको. खारीक खोबरे द्या, याने दात किडतात. हे ऐकून काका काकू दोघांनाही आपले बालपण आठवले.

संग्रामच्या नादाने सगळी पोरे घरात तक्रार ना करता भाजी पोळी खाऊ लागली. त्यांच्या आयांना आणि बापांना पण आश्चर्य वाटले पण खायला काही ना मिळाल्यामुळे झाडाचा पाला खाऊन राहणाऱ्या बारकू पारध्यांची गोष्ट ऐकून सगळ्या पोरांना अन्नाची किंमत कळली होती.

एकंदरीत शहरातल्या कातडीबचाऊ पोरांपेक्षा जास्त बिनधास्त असल्याने हळहळू संग्रामला टीम चा कप्तान होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होती. पण सरळपणे मान्य करतील तर ती पोरटी कुठली. आधी त्याला नवीन बॅट आणायला लावली, मग बॉल, मग फुटबॉल. कॅट आणि कॅरम तर होतेच त्याच्याकडे मग सर्व गॅंग मध्ये गुप्त खलबते झाली आणि शेवटी त्याला पाळीव प्राणी आणायला सांगायचे ठरले कारण कुणाकडेच काहीच नव्हते. संग्रामच्या गावी गाई म्हशी, कुत्री मांजरे, मुंगूस इत्यादी असल्याने त्याचे आई बाबा परवानगी देतील हाही कयास त्यामागे होता.

"तुला कप्तान व्हायचे असेल तर तुझ्याकडे सर्वांपेक्षा वेगळे काहीतरी पायजे"

" म्हणजे कय रे भौ"

"म्हणजे तुझ्याकडे पाळीव प्राणी पाहिजे"

"असं व्हय"
"कुंचा प्रानी"

"कुठलाही चालेल"

"मांजर नको आणि कुत्राही नको"

हो सोसायटीत असलेलेच प्राणी कशाला!

"आणि त्याच्याशी खेळता यायला पाहिजेल"

पोरांनी सावध पवित्र घेतला. नाहीतर नाग साप काहीतरी येऊन पडायचा गळ्यात!

"ससा चालेल"

"बरं बघतो" म्हणून संग्राम घराकडे पळाला.

आता बापाला कसा पटवायचा याचा विचार करत तो घरात पोचला.

" बाबा मजा वाढदिवस आलाय नव्ह"

"आता परवाच तर झाला कि लेका नवी ब्याट आणली नई का तुला"

"ते झालं सोसायटीतलं, पण शाळेत कायपण नाय केलं"

"मग आता आणि काय करायचं बे"

"शाळेत समद्यांना पेन्सिल वाटायची आणि नवीन कायतरी घ्यायचं"

बाबाला भारी कौतुक वाटलं पोराचं .

"काय घ्यायचं म्हणं ?"

"बाबा मला ससा पायजे"

बाबाला अगदी भरून आलं.

"बर बर आणतो तुला ससा. तुझ्या मायले सांग पेन्शील घिऊन द्याला"

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येताना पाटीलसाहेब हातात एक मोठी कापडी पिशवी घेऊनच आले. घरात येऊन त्यांनी पिंजरा बाहेर काढला. त्यात दोन धष्टपुष्ट गुबगुबीत ससे होते.
"घरात आणू नका घाण ती भायेरच ठेवा" इति घरमालकीण

सशांचा पिंजरा पाहून मुले गोळा झाली. पुढचे तीन चार दिवस सशांबरोबर खेळण्यात गेले. त्यांना गाजर खाऊ घालणे, पिंजरा साफ करणे इत्यादी कामे संग्राम अगदी उत्साहाने करीत होता. तीनचार दिवसात पोरांचा उत्साह मावळला. सशांचा पिंजरा कोपऱ्यात पडला आणि पोकेमॉन सुरु झाला.

शनवार आला आणि संग्रामचा काका आला. सोबत भरपूर खाऊ आणि काय काय घेऊन आला. संध्याकाळी काकाच्या बुलेट वर बसून संग्राम लांबपर्यंत फिरुन आला. घरात येताच मटणाचा खमंग वास दरवळला. घाईघाईने हातपाय धुवून तो जेवणाच्या खोलीतच घुसला.

"अरे हो हात पाय पूस तरी" आई ओरडली पण संग्रामाचे लक्ष कुठे!

"काही म्हणा पाटील पोरांन बापाचा खवैय्येपणाचा गुण मात्र बरोबर उचलला" काका म्हणाले.

"व्हय खरं. इत आल्यापासनं नुसतं चिकन चिकन, त्वांडाची चव मराया लागलीवती बगा, दोन भरू का?"

बऱ्याच दिवसांनी दोन्ही मित्रांनी चिअर्स केले. मटणावर आडवा हात मारत असताना गावाकडच्या हरणा डुकरांची शिकार दोघांना आठवत होती.

"कारभारणी, तुज्या हाताला लय झ्याक चव हाय बग " हा मध्येच बायकोला मस्का लावण्याचा प्रयत्न.

तुडुंब पॉट भर मटन हादडून दोघे व्यवस्थित दात कोरत बसले. संग्राम आधीच पेंगुळला होता, त्यात मटणाचे जेवण झाल्यावर तो अगदी शांत झोपला होता.

"कुटनं मिळालं म्हणं?" मित्राची पृच्छा.

"इत क्राफ़र्ड मार्कीट हाय तीत समदे जनावर मिळतात. लय महाग हायेत पण आमदार सायबास्नी पायजेल म्हणून काढले दोन."

दुसऱ्या दिवशी सकाळी संग्राम उठून ससे पाहायला गेला तर दोन्ही ससे, पिंजरा सर्व गायब. दुसरीकडे ठेवले असतील म्हणून घरभर शोधले पण कुठेच दिसेनात.

"माय सस कूट गेलं ग?"

"काल रात्री काय हांनलास मग?"

आदल्या रात्री खाल्लेले मटण त्याच दोन सशांचे होते हे लक्षात आल्यावर संग्रामने भोकाड पसरले. आईने रागावून तापलेला कालथा घेऊन मारले. तिच्या दृष्टीने ससे म्हणजे अन्न होते. त्यांना पाळायचे म्हणजे काय !

सायंकाळी पाटीलसाहेब आमदारसाहेबांना सशाचे चवदार मटण पोहोचवून आले तो घरात हा ड्रामा!

शेजारी पाजारी कुजबुज सुरु झाली.

"अहो त्या पाटील बाईंनी दोन्ही ससे घरात मारले आणि मटण केलं म्हणे !"
"हो ना आम्ही दारावर नुसता बाजार घेतला तरी तो चौथया मजल्यावरच्या गुजराती बोंबाबोंब करतो. आता काय करतोय बघूया. "

रविवारी सकाळी सोसायटीची अर्जंट मीटिंग भरली.

"हे साला खरगोस घरात आणून कापते कायपण करते हे चालणार नाय!" गुजराती तावातावाने भांडत होता.
"तुमि सगळे नॉन वेज लोक सोसायटीची बरबादी करते. आमचा धर्म भ्रस्ट करते. हा बरोबर नाय"

मीटिंगमध्ये पाटीलसाहेबांची एन्ट्री होईपर्यंत कुजबुज चालू होती. पाटीलसाहेब आल्यावर एक्दम पिन ड्रॉप सायलेन्स. पाटीलसाहेबांनी मिशीच्या झुबक्यावरून हात फिरवला.

"काय गडबड झाली म्हण?"

घास खाकरत बिल्डिंगचा सेक्रेटरी बोलला " तुम्ही घरात आणून ससे मारले अशी तक्रार आहे."

काका असतंय सरसावून पुढे जाणार तेवढ्यात त्याला पाटीलसाहेबांनी आवरले.

"कुणाची तक्रार आहे?"

आपोआपच सगळ्या नजरा गुजरात्यांकडे वळल्या. पाटीलसाहेबांसमोर आवाज लावायची हिम्मत नसलेल्या गुजरात्याने फक्त मन डोलावली.

"तुम्ही यांचा धर्म भ्रष्ट केला अशी तक्रार आहे."

पाटीलसाहेब काही बोलणार तेवढ्यात काकाने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. पनवेल पनवेल एवढेच लोकांच्या कानावर पडले पण तेव्हढ्यानेच तो गुजराती पंधरा फटक पडला.

पाटीलसाहेब म्हणाले " आता काल आम्ही ससे खाल्ले. पर्वा पनवेलमध्ये चिकन लॉलीपॉप खाल्ले आणि धमाल केली, खर कि नाही शेठ"

"जर पनवेलमध्ये धर्म भ्रस्ट नाही झाला तर इथे कसा होईल?"

जास्त सविस्तर ना सांगताच लोकांना कळले. गुजरात्याने त्याची तक्रार ताबडतोब मागे घेतली.

"पुढच्या वेळेला बनवलं तर आम्हाला पण पाठवा वाटीभर, म्हणजे चवीपुरतं" इति सेक्रेटरी.

"आता वाटीभर कशाला चांगल गाव जेवणच घालू कि समद्या बिल्डिंगीला"

सर्वाना शांत करून पाटीलसाहेब घरी पोहोचले. हुंदके देऊन थकलेल्या संग्रामला जवळ घेतले.

"आर पोरा तुला सस आवडत्यात खेळायला पण मला खायाला आवडत्यात."

ऐकून घेण्याखेरीज काही दुसरा मार्ग नसल्याने संग्राम चुळबुळत बसून राहिला.

"तुला खेळाया आवडत असाल तर पुढल्या महैण्याला आणखीन आणतो, आधी तू खेळ मग आपन खाऊ"

संग्रामला हा पर्याय फारच फायद्याचा होता. आधी खेळ नंतर चविष्ट मटण. त्यासाठी कप्तानकी सोडायला त्याची काही हरकत नव्हती. पण बच्चेकंपनीच्या मनात वेगळेच काही होते.

"तुला कप्तान बनवू पण आधी आम्हाला सगळ्यांना ससा खायला मिळाला पाहिजे !".

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

28 Mar 2019 - 6:34 am | आनन्दा

आवडेश

>>>"तुला खेळाया आवडत असाल तर पुढल्या महैण्याला आणखीन आणतो, आधी तू खेळ मग आपन खाऊ"

हे म्हणजे अगदी जबराच होतं!!

सिरुसेरि's picture

28 Mar 2019 - 1:06 pm | सिरुसेरि

मस्त लेखन .

खंडेराव's picture

28 Mar 2019 - 3:42 pm | खंडेराव

आवडली!

जानु's picture

29 Mar 2019 - 2:11 pm | जानु

मस्त ...

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Mar 2019 - 4:17 pm | ज्ञानोबाचे पैजार

जबरा लिहिली आहे.
या सशांची वीण जबरदस्त असते हा हा म्हणता तुफान वेगाने वाढतात.
पैजारबुवा,

शलभ's picture

29 Mar 2019 - 5:20 pm | शलभ

सही. आवडली.

यशोधरा's picture

29 Mar 2019 - 5:47 pm | यशोधरा

कथा आवडली.

अवांतर: सश्यांना का मारून टाकले :(

anandkale's picture

29 Mar 2019 - 6:57 pm | anandkale

ससे, मोठे बेडूक हे अजूनही ग्रामीण भागात चवीने खाल्ले जातात.

पाश्चात्य पद्धत पळून कोंबड्या किंवा डुकरे मांस उत्पादन करण्यासाठी न वापरता ससे वाढवले तर फारच कमी खर्चात मांस उत्पादन होऊ शकते.

मी सावरकर भक्त असल्याने माझ्यासाठी हे सर्व उपयुक्त पशु आहेत. (हो गायसुद्धा)

यशोधरा's picture

29 Mar 2019 - 7:05 pm | यशोधरा

हो, ठीक आहे.
ससा मारणे जीवावर येईल माझ्या.

एमी's picture

29 Mar 2019 - 6:12 pm | एमी

:D :D आवडली!

संजय पाटिल's picture

30 Mar 2019 - 10:15 am | संजय पाटिल

भारीच...