३: मंद गतीने पुढे जाताना
डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.
माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!
माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत
जून २०१६ मध्ये कडक ऊन्हात खूप मोठ्या गॅपनंतर परत धावलो. रनिंग जमतंय, पण तरीही अजून इतकं सोपं वाटत नाही. सायकल जशी कधीही चालवता येते, विचारही करण्याची गरज पडत नाही, तसं रनिंगचं नाही आहे. पण एकदा ज्या गोष्टीची चव मिळाली असेल, ती कशी सुटणार... त्यामुळे ऑगस्टपासून रनिंगमध्ये थोडी नियमितता आली. आणि माझं रनिंग जरा व्यवस्थित व नियमित होण्यामध्ये दोन धावपटू मित्रांचं खूप योगदान होतं. त्यांच्याविषयीही सांगेन. परभणीचे एक मित्र- संजयराव बनसकर जी अर्थात इथले भुजंगराव! पेशाने शिक्षक, पण मनाने खूप अष्टपैलू! ते माझे रनिंगचे मित्र आणि मार्गदर्शक झाले! अर्थात् त्यांच्यासोबत रनिंग करणं कठीण होतं, कारण ते मुरब्बी रनर होते आणि मी अगदीच नवशिका. पण तरीही त्यांच्या सोबतीने पळण्याचा उत्साह वाढला. एक प्रकारची भागीदारी सुरू झाली! रनिंग करण्यासाठी मनाची तयारी होत गेलं.
मोठी गॅप असूनही लवकरच परत चांगलं रनिंग करता आलं. अर्थात् वेळ फारच लागतोय आणि गॅपनंतर केल्यानंतर तर पाय खूप दुखतात. थकायलाही जास्त होतं. शरीराला थोडा त्रास होत असला तरी मनामध्ये मात्र रनिंगची इच्छा वाढते आहे. आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी मन अनुकूल असेल, तर हळु हळु आपण ती गोष्ट करू शकतो. सायकलिंगच्या संदर्भात रनिंग करताना बरं वाटतंय. कारण मी जसा जास्त पळू शकेन, तसा त्याचा सायकलिंग करतानाही उपयोग होईल.
रनिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये 'पेस' मात्र कळत नव्हती. रनिंग हे 'पेस' मध्ये बघितलं जातं. पेस म्हणजे एक किलोमीटर पळण्यासाठी लागणारा वेळ. सुरुवाला हे कळत नसल्यामुळे पेसवरून स्पीड काढून अंदाज घ्यायचो. म्हणजे जर ८ मिनिट/ किमी असा पेस असेला तर स्पीड सुमारे साडेसात किमी/ तास अशी असावी. हळु हळु रनिंग नियमित करत गेलो, तसं स्पीड वाढला आणि पेस कमी झाला, म्हणजे एक किलोमीटर पळण्यासाठी थोडा कमी वेळ लागू लागला. रनिंगमध्ये नवखा असलो तरी सायकलिंगचा चांगला अनुभव असल्यामुळे माहिती आहे की, स्पीड लवकर वाढत नाही. हळु हळुच वाढेल. आणि म्हणून मला स्पीडपेक्षा सातत्याकडे लक्ष द्यायला हवं. सायकलिंगमुळे हेही माहिती होतं की स्पीड- टायमिंग बघण्यापेक्षा प्रोसेसकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि ते एंजॉय करायला पाहिजे. रनिंगमध्ये विशेष हे वाटलं की व्यायामात आणखी विविधता आली आणि मजाही येऊ लागली! पावसाळी वातावरणात रनिंग करताना खूपच मस्त वाटलं! रनिंगही सायकलिंग इतकंच रोमँटीक आहे तर! छोटा डोंगर किंवा कच्च्या वाटेवरही पळताना मस्त वाटतंय!
ह्याच सुमारास माझे सन्मित्र- हर्षदजी पेंडसे अर्थात अनेकांना माहित असलेले- हर्पेन ह्यांच्या मोहिमेची माहिती मिळाली! ते लदाख़मध्ये खर्दुंगला चॅलेंजमध्ये ७२ किमी पळणार होते व एका सामाजिक विषयातही योगदान देत होते! त्यांची तयारी, त्यांचं तीस- चाळीस- पन्नास किमी रनिंग बघून वाटलं की, ह्या अभियानात सहभाग घेण्यासाठी मलाही कमीत कमी २१ किमी तरी पळालं पाहिजे. ११ किलोमीटर आरामात पळालो होतो. त्यामुळे हे थोडं कठीण असूनही शक्य होतं. नियमित प्रकारे छोटे रन केल्यानंतर १५ किमीसुद्धा पळू शकलो होतो. अर्थात वेळ दोन तास अकरा मिनिट लागला (आज जवळ जवळ इतक्याच वेळेत मी हेच अंतर चालत चालत पार करू शकतो)!! आणि जेव्हा माझी संजय बनसकर सरांसोबत मैत्री झाली, रनिंगच्या नवीन गोष्टी कळत गेल्या. स्ट्रेचिंग कसं करावं, तयारी कशी करावी हे शिकत होतो. त्यामुळे आता माझ्या रनिंगचं पुढचं उद्दिष्ट २१ किलोमीटर असं ठरवलं. हर्षद पेंडसेजी लदाख़ला निघण्याच्या आधीचा एक दिवस ठरवला. छोटे रन्स सुरू ठेवले.
पुढील भाग- माझं पलायन ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
29 Mar 2019 - 2:43 am | सोन्या बागलाणकर
बापरे!
तुमचं रनिंग बघून मला धाप लागली.
क्या बात है! लगे रहो.
हे खास आवडलं.
29 Mar 2019 - 9:13 am | shashu
पलायन चे तीनही भाग वाचले. खूप छान लेखन आणि अनुभव.
२०१६-१७ ला कामानिमित्त बाहेर जाणे झालेले, तेव्हा कार्यालयीन कामाशिवाय संध्याकाळी पुरेसा वेळ मिळायचा त्यामुळे तो सत्कारणी लावायचा म्हणून "माझे पलायन" सुरू केलेले. ३-४ महिन्यातच ६-७ किमी सलग पलायन करू laglelo. परंतु पुन्हा बदली आमच्या (नवी)मुंबईत झाली आणि माझे पलायन थांबले. कामावर जा यायच्या प्रवासा मध्येच ३-४ तास जावू लागले (ही माझी कारणे दाखवा नोटीस). पुन्हा सुरू करू करू म्हणून एक दीड वर्ष कसे निघून गेले कळाले सुध्धा नाही. गेल्या महिन्यात एका पहाटे ५:३० ला उठून गेलो सुद्धा पालयनाला. पण दुसऱ्या दिवसापासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आठवडाभर ५:३० चा गजर व्हायचा मी तो ६:१५/३० चा करायचो आणि मस्तप्पेकी निद्राधीन व्हायचो. ही लेखमाला वाचून पुन्हा माझ्या पलायन भावना जागृत होवू लागल्या आहेत. लवकरच त्या प्रत्यक्षात येतील असे वाटते. धन्यवाद.
29 Mar 2019 - 11:49 am | तुषार काळभोर
सायकलिंग-रनिंग...!
तुमच्याकडे ती मनाची अनुकुलता मुबलक प्रमाणात आहे. आणि शारिरीक हालचालींसाठी मनाची अनुकुलता माझ्याकडे ऋण प्रमाणात आहे :)
29 Mar 2019 - 12:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी !
30 Mar 2019 - 7:30 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ शशूजी, मस्तच! शुभेच्छा!
2 May 2019 - 2:45 pm | नया है वह
फोटो छान!