जाब

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
10 Mar 2019 - 7:48 am

जाब
"ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू" तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता.
तो चिडला, वैतागला. त्याने जाब विचारायचे ठरविले. तो पळत निघाला. तो पळत होता. कितीतरी दिवस नुसता पळत होता. तो पळत पळत शेकडो मैल दूर आला. रोम खूप मागे राहीले होते. तो इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड या गावी आला. तो तिथे ट्रिनिटी चर्चपाशी गेला. तिथे त्याला विल्यम शेक्सपियरचे थडगे अशी पाटी दिसली. तो तिकडे धावला. तिथे त्याचा बाप गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते. तो चिरनिद्रेत होता. त्याने आपल्या बापाला उठविले.
"उठ उठ अरे उठ" त्याचा बाप काहीशा नाराजीत डोळे चोळीत उठला. त्याने आपल्या मुलावर नजर टाकली. त्याच्या शरीरावर घामाच्या धारा वाहत होत्या, तो पळून पळून थकला होता. तो बाप होता. काय झाले ते समजला. तो कुत्सितपणे हसला. त्याने चेहरा स्वच्छ धुतला. डोळे साफ केले.
"बोल का उठवलस मला?"
"तुला जाब विचारायचा होता"
"जाब? कशाचा?"
"तू मला का बदनाम केले?"
"मी बदनाम केले? तू तुझ्या कृत्याची फळे भोगतोस ब्रुटस."
"मान्य आहे माझे चुकले. मी चुकीच्या माणासांबरोबर जायला नको होते. त्याची केवढी मोठी सजा दिली तू मला. आज जगात मी विश्वासघाताचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. 'ब्रुटस दाउ टू' म्हणजे विश्वासघात."
"काय चूक आहे? तू तुझ्या जिवलग मित्राला सिझरला मारायच्या कटात सामील होता."
"सिझर बरोबर होता असे म्हणायचे का तुला? त्याची महत्वाकांक्षा वाढत चालली होती. तो रोमपेक्षा मोठा होत चालला होता. केवळ रोमच्या भल्यासाठी मी त्याला मारायच्या कटात सामील होतो."
"बरोबर आहे तुझ. सिझर योग्य होता तू चुकीचा होता असे मी म्हटलेच नाही. मार्क अँटोनी बोलला शेवटी एकट्या तुझ्या डोक्यात रोमच्या भल्याचा विचार होता. तू एक महान रोमन होता."
"तेही त्या अँटोनीलाच बोलावे लागले, मी मेल्यावर तेंव्हाच पटले साऱ्यांना. कितपत पटले ते माहीत नाही. मी जिवंत असताना ओरडून ओरडून सांगत होतो पण कुणाला पटले नाही. मूर्ख भावनाप्रधान माणसे. मी सिझरला मारायच्या कटात सामील व्हायला नको होते. एक चूक मरणोप्रांत सुद्धा मरणयातना देउन गेली."
"सिझरचे मरण अटळ होते. तू नाही कुणी दुसरा असता."
"मी तर नसतो. मी काहीच केले नसते. माझ्यासारख्या सज्जन सरदाराने या राजकारणात पडायलाच नको होते. माझ्या डोक्यात रोमच्या भल्याचा विचार होता हे पुरेसे होते. ते सिद्ध करायला काही करायची गरज नव्हती. मी निदान माझ्या मित्राशी तरी प्रामाणिक राहिलो असतो."
"मग ब्रुटस हे नावच नष्ट झाले असते."
"कदाचित ते चालले असते. एक चुकीचा निर्णय घेउन मेल्यावर सुद्धा विश्वासघाताच्या पातकाचे ओझे घेउन वाहण्यापेक्षा ते योग्य झाले असते."
"सिझरचे चुकत आहे हे माहीत असूनही तू गप्प राहिला असतास.”
"हो. तसेही सिझर चुकतोय ही माझी धारणा होती. ते योग्य, अयोग्य, सत्य, असत्य सार काही माझीच धारणा होती. कदाचित सिझर रोमच्या भल्याचाच विचार करीत असेल. मी दुर्लक्ष करणेच योग्य ठरले असते.”
"तू काहीही निर्णय न घेता गप्प बसणे पसंत केले असतेस.”
"हो.”
"चुकीच्या निर्णयापेक्षा अनिर्णीत अवस्था अधिक घातक असते. अनिर्णीत अवस्था म्हणजे अकार्यक्षमता, त्याने नरसंहार चुकत नाही. अनिर्णीत अकार्यक्षमतेपेक्षा एखादी चूक मी स्वीकारील.”
"तू बोलशील. जग तुला विश्वासघातकी म्हणत नाही. असली शाब्दीक पोपटपंची करायची सवय आहे तुला.”
"विश्वास ठेव. तू वावटळीत फसला असता. योग्य, अयोग्य, सत्य, असत्य हे सारं अस स्वचछ दिसण सोप असत अस वाटल तुला. खऱ्यात खोट, खोट्यात खर, अयोग्य आणि योग्य सार काही अस मिसळल असत कि ते वेगळ करण कठीण होउन बसत. मग सुरु होते ती मनातल्या आंदोलनाची अखंड मालिका. धुसर अशा दृष्यात काहीतरी ठोस अस शोधण्यासाठी; कधी कळलही तरी तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शेवटी सत्य तेच जे त्या क्षणी छातीवर हात ठेवला कि साद देते. तुला जे सत्य वाटले, तुला जे पटले ते तू केले म्हणूनच तू महान रोमन होता.”
"हूं, शब्द आणि भावनेची जोड घालून साहित्यिक वाक्यांची मालिका जुंपण्यात तुझा हात कोणी धरु शकत नाही.”
"नाही. चुकीचा निर्णय घेणाऱ्या एका सरदाराच्या दुःखापेक्षा निर्णय न घेउ शकलेल्या राजपुत्राचे दुःख अधिक मोठे आहे. त्याची अवहेलना मोठी आहे. हे मी जाणतो” ब्रुटसने मान हलविली. त्याला पटले नव्हतेच.
"विश्वास नाही बसत. तो पळत येतोय ना त्याला विचार. त्याचे नाव हॅमलेट. तो असाच धावत येत असतो सतत, मला झोपूच देत नाही रे तो. रोज एक नवीन प्रश्न. तो एक राजपुत्र होता. त्याच्या वडीलाचा खून झाला, ज्याने खून केला त्याच्याशीच त्याच्या आईने लग्न केले. हे सारे माहीत असूनही सत्य, असत्य, योग्य, अयोग्य अशा असंख्य प्रश्नांच्या जंजाळात तो गुंतला. मारल्या गेला. तुझ्यापेक्षाही भयानक शोकंतिका आहे. विचार त्याला..... आणि हो परत मला त्रास देउ नका झोपू द्या शांतपणे, ”
असे म्हणत त्याचा बाप तोंडावर पांघरुण घेउन झोपी गेला.

मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

कथालेख

प्रतिक्रिया

शाली's picture

10 Mar 2019 - 8:24 am | शाली

वा! सुरेख!

महेश हतोळकर's picture

10 Mar 2019 - 10:18 am | महेश हतोळकर

छान लिहीलय! आवडलं. आजून थोडं मोठं चालल असतं.

पुलेशु.

अनन्त अवधुत's picture

10 Mar 2019 - 1:34 pm | अनन्त अवधुत

आवडले. दुसरा भाग पण येऊ द्यात

सॅगी's picture

10 Mar 2019 - 7:48 pm | सॅगी

काहीच समजले नाही.

ज्योति अळवणी's picture

11 Mar 2019 - 8:53 am | ज्योति अळवणी

सुंदर लिहिलं आहे. आता हॅम्लेटचं मन देखील लिहाच

ज्योति अळवणी's picture

11 Mar 2019 - 8:53 am | ज्योति अळवणी

सुंदर लिहिलं आहे. आता हॅम्लेटचं मन देखील लिहाच

विजुभाऊ's picture

11 Mar 2019 - 12:56 pm | विजुभाऊ

आजच्या राजकारणाला बर्‍याच गोष्टी लागू पडतात

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2019 - 5:17 pm | चौथा कोनाडा

छान, सुरेख !

मित्रहो's picture

11 Mar 2019 - 7:58 pm | मित्रहो

धन्यवाद शाली, महेश हतोळकर, अनन्त अवधुत, ज्योति अळवणी, सागर गुरव, विजुभाऊ, चौथा कोनाडा.

@ सागर गुरव
अहो फार काही नाही शेक्सपिअरची दोन पात्रे ब्रुटस आणि हॅमलेट यांची तुलना आहे. ती पात्रे शेक्सपिअरला भेटतात आणि तो समजावून सांगतो.

सॅगी's picture

13 Mar 2019 - 8:32 am | सॅगी

मी यातले काही वाचलेले नाही, त्यामुळेच काही समजले नसावे बहुतेक

जालिम लोशन's picture

12 Mar 2019 - 2:54 pm | जालिम लोशन

पहिल्यांदा शेक्शपिअरने लिहलेल काहीतरी समजले..

जालिम लोशन's picture

12 Mar 2019 - 2:54 pm | जालिम लोशन

पहिल्यांदा शेक्शपिअरने लिहलेल काहीतरी समजले..