मैत्र - ७

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
8 Mar 2019 - 4:42 pm

इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा, पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो.
सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला…

मी आणि शकील बाहेर आलो. शाम्या इन्नीच्या हातातून दंड सोडवायचा प्रयत्न करत होता. इन्नी घाबरली होती, रडतही होती. शाम्याच्या खांदा हलवण्याबरोबर ती पुढे मागे धडपडत होती पण तिने शामचा दंड दोन्ही हातांनी अगदी गच्च पकडला होता.
“तू बाजूला हो गं इन्ने” म्हणत शकीलने एका हाताने शामचा दंड पकडला आणि दुसऱ्या हाताने शर्टची कॉलर पकडली आणि त्याला बाजूच्या बाकावर बळेच दाबून बसवले. शाम्याची अस्वस्थ चुळबूळ सुरु होती. इन्नी भेदरून बाजूला उभी होती. मी ठोब्बाने आणलेले पाणी शामसमोर धरले
“घे, थोडं पाणी पी, बरं वाटेल शाम.”
पण त्याचे लक्षच नव्हते. कुठेतरी शुन्यात पाहत त्याने मी समोर केलेला पाण्याचा ग्लास हाताने झिडकारला. डोळ्यातल्या पाण्याबरोबर आता त्याचे हुंदकेही सुरु झाले होते. ओठ गच्च आवळल्याने त्याचा चेहरा विचित्र दिसत होता. त्याचा एकूण रागरंग पाहून माझ्या छातीत धस्स झाले. मी असहाय नजरेने शकीलकडे पाहीले. त्याने ठोब्बाच्या हातातला पाण्याचा जग घेतला आणि सरळ शामच्या डोक्यावर ओतला.
“ऐ शाम, शाम्या. अरं काय झालं? बोलल्या बिगर कसं कळंन आम्हाला?” म्हणत दत्त्या त्याच्या दोन्ही गालांवर हलकेच थोपटत होता, तर राम त्याच्या पाठीवरुन हात फिरवत नुसताच भांबावल्यासारखा उभा होता. एवढ्या वेळात ठोब्बाने जोशीसर कोणत्या वर्गात क्लास घेत होते ते शोधून त्यांना घेऊन आला. इन्नी हाताची गच्च मुठ तोंडावर दाबून पहात होती. तिच्या डोळ्यातली भिती स्पष्ट दिसत होती. सरांच्याही लक्षात आलं की काहीतरी गंभीर प्रकार असावा. त्यांनी ठोब्बाला प्रथम इन्नीला वर्गात न्यायला सांगीतले.
शकील माझ्याकडे पाहून जवळ जवळ ओरडलाच “पागल, तुला गाडी काढायला सांगीतली होती ना?”
मी त्याच्याकडे पाहुन माझा प्लॅस्टर केलेला हात वर केला. इतक्यात कुणाला काही समजायच्या आत शाम मुसंडी मारल्यासारखा उठला आणि धावत सुटला. ते पाहून दत्त्याही धावला. त्याच्या मागे शकील आणि शकीलच्यामागे हात सांभाळत मीही धावलो. मी व्हरांड्यातुन उतरता उतरता रामला मळ्यातुन धोंडबाला बोलवायला पिटाळले. इन्नी वर्गात गेली होती पण खिडकीतून ती आमच्यावर लक्ष ठेवून होती. आम्ही सगळे शामच्या मागे धावल्याचे पाहून तीही आमच्यामागे पळत आली. ना तिला चप्पलचे भान होते ना ओढणीचे. शाम शांत होता पण भानावर नव्हता. दत्ताला बुलेट चालवता येत नव्हती आणि माझा हात प्लॅस्टरमधे होता. शकील काही शामला सोडायला तयार नव्हता. दत्ताने आणि शकीलने शामचे दोन्ही दंड धरले होते. मी आणि इन्नी त्यांच्या सोबत चाललो होतो. दत्त्या सारखा “शाम अरं बोल तं खरं. काय झालं?” विचारत होता. त्याला शकीलने गप्प केले. डेअरीच्या शेजारुन गावात जायला एक छोटासा रस्ता होता. त्यावरुन आम्ही घरी निघालो. डेअरी मागे पडली, तेवढ्यात मागून धोंडबा आणि राम सायकलवरुन आले. आम्हाला मधेच थांबवत धोंडबाने सायकल रामच्या अंगावर सोडली आणि त्याने शामचे दोन्ही खांदे धरले.
“शाम्या, काय रं? काय झालं?” शाम अजुनही शुन्यातच कुठेतरी पहात होता.
धोंडबाने इन्नीला विचारले “काय गं, काय झालं? हे राम्या बी काय सांगंना. माझा जीव थाऱ्यावं ऱ्हाईना मळ्यातून येवूस्तवर.”
इन्नी प्रथमच बोलली “धोंडीदादा, काही झालं नाहीए. तुम्ही सगळे शांत रहाल का? आपण घरी जाऊ अगोदर. राम तू पुढे जा सायकल घेऊन आणि मोडककाकांना घरी बोलाव.”

इन्नी बरीच सावरली होती. आमच्याही डोक्यात डॉक्टरांना बोलवायचे आले नव्हते. आम्ही घरी पोहचलो तर काकू आणि राम ओट्यावरच उभे होते. काकू घाबरलेल्या दिसत होत्या. या राम्याने काय काय सांगितले होते त्यांना कोणास ठाऊक. त्यांनी पायरीवरच शामवरुन भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. “इथेच थांबा, मी अंगारा आणते.” म्हणत त्या परत आत गेल्या. शकीलने शामला ओट्यावर बसवले. आम्हीही काळजीत तसेच बसुन होतो. इन्नी आत गेली होती काकूंच्या मागे. मोडककाका अजुन आले नव्हते. शामचे हुंदके आता थांबले होते. आमचे लक्ष नव्हते. त्याने डोळे मिटले आणि तो एका बाजूला कलंडला. एका बाजूला शकील बसला होता पण दुसऱ्याबाजूला कुणी नव्हते. शकीलच्या लक्षात काही यायच्या आत शाम ओट्यावरुन खाली कोसळला. ओटा किमान पाच फुट तरी उंच होता. शाम चांगलाच जोरात खाली आपटला आणि त्याचे उरलेसुरले भानही हरपले.
धोंडबा धावला. तो प्रथमच शकीलवर चिडला “ध्यान कुठं असतं रं कसाया तुझं?” म्हणत धोंडबाने शामला उचलले आणि घरात नेले. कुणीतरी चिंतूकाकांना निरोप पाठवला होता. तेही घाई घाईत आले. त्यांनी रामाचा अंगारा शामच्या कपाळावर लावला. एवढ्यात मोडककाकाही आले. आम्ही शामभोवती कोंडाळे केले होते. त्यांनी आम्हाला प्रथम बाहेर काढले. काही मिनिटे तपासल्यानंतर त्यांनी शामला एक इंजेक्शन दिले आणि “काळजी करण्यासारखे काही नाही.” म्हणत शकीलला जीप आणायला पिटाळले. आम्हाला थोडा अंदाज आला की काहीतरी गडबड आहे. पण आम्हीच ढेपाळलो असतो तर काकूंचे काही खरे नव्हते. मोडककाका घरी गेले. त्यांनी तेथून तालूक्याला फोन करुन तेथील डॉक्टरांना थोडीशी कल्पना दिली आणि ते त्यांची ॲम्बॅसीडर घेऊन आले. आम्ही शामला डॉक्टरांच्या गाडीत व्यवस्थीत बसवले. मागे धोंडबा आणि दत्ता बसले. चिंतूकाका डॉक्टरांच्या शेजारी बसले. इन्नीला काकूंसोबत ठेऊन मी, राम आणि ठोब्बा शकीलच्या गाडीतुन निघालो. मी शकीलला गाडी थांबवायला सांगुन खाली उतरलो. काकू आणि इन्नी अजुन ओट्यावरच उभ्या होत्या. काकूंचा पदर सारखा डोळ्यांकडे जात होता.
मी आवाजात जरा सहजता आणून म्हणालो “काकू, काही चिंता करु नका. शामला फक्त धक्का बसलाय कसलातरी. आम्ही संध्याकाळी येताना त्याला सोबतच घेऊन येतो.” काकूंनी डोळे पुसत फक्त मान हलवली.
मी इन्नीकडे पहात हसत म्हणालो “इन्ने, काकू रामरायाला पाण्यात ठेवतील लगेच. त्यांना ठेऊ देऊ नको. आधी पाण्यात ठेवायचा आणि मग पुरणावरणाचा नैवेद्य दाखवायचा. वैतागेन अशाने रामराया.”
इन्नीने कसाबसा हसायचा प्रयत्न करत मान डोलावली आणि म्हणाली “काय होतय ते लगेच फोन करुन सांग अप्पा मोडककाकांकडे. नरु निरोप देईल लगेच.”

आम्ही हॉस्पीटलला पोहचलो तेंव्हा तिथले डॉक्टर तयारीतच होते. शामला लागलीच ॲडमीट करुन घेतले. आम्ही वेटींगरुम मधे बसलो होतो. अर्ध्यातासाने मोडककाका बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हसु पाहून आमचा सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. मी घाईने विचारले “काका, व्यवस्थीत आहे ना शाम? मी करु का फोन घरी? काकू काळजीत असतील फार.”
मला हातानेच थांबवत काका म्हणाले “हे पहा, शाम व्यवस्थीत आहे. कसलातरी शॉक बसला आहे त्याला. शिवाय एक्सरे काढावे लागतील. पडला होता ना तो? काही इनज्युरीज असतील, ते तासाभरात कळेल. पुण्याला न्यावे लागणार नाही हे नक्की.”
आमच्या पुन्हा वेटींगरुममधे येरझाऱ्या सुरु झाल्या. ताण थोडासा कमी झाला होता. तरीही जरा मोकळेपणा यावा म्हणून मी दत्ताला विचारले “काय दत्ता, भुक वगैरे नाही ना लागली?”
दत्त्या एकदम अंगावर आल्यासारखा बोलला “आयला, कुनाला कशाचं अन् बोडकीला केसाचं. गप बसशीन का अप्पा उलसाक.”
एकून डॉक्टरांनी नक्की काही सांगीतल्याशिवाय कुणाच्या डोक्यावरचा भार उतरणार नव्हता. एकाचे दोन तास झाले. मला वाटले मी त्या वेटींगरुममधे युगानूयुगे बसुन आहे आणि कुठे काहीही होत नाहीए. एकदाचे मोडककाकांचे बोलावणे आले. मी आणि शकील डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेलो तेंव्हा काकांबरोबर अजुन एक डॉक्टर बसले होते. चिंतूकाकाही बसले होते. आम्ही बसल्यावर एका मुलीने कॉफीचे कप आणून आमच्यापुढे ठेवले. कॉफी संपेपर्यंत कुणीच काही बोलले नाही. मग मोडककाकांनी आम्हाला सगळे सविस्तर सांगीतले. शामला कसलातरी मानसीक धक्का बसला होता पण आता तो बराचसा ठिक होता. पण ओट्यावरुन पडल्यामुळे त्याच्या उजव्या हाताचे हाड मनगटाच्या वर मोडले होते. हलकासा क्रॅक होता. प्लॅस्टर केले होते. पण त्याला झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे आम्ही आज त्याला भेटू शकणार नव्हतो. म्हणजे फक्त पाहू शकत होतो. इतर ऑब्जर्व्हेशनसाठी त्याला आज आणि उद्या हॉस्पीटलमध्येच रहावे लागणार होते. चिंता करण्याचे काहीही कारण नव्हते.
आम्ही हुश्श करत बाहेर आलो. मागोमाग चिंतूकाकाही बाहेर पडले. दत्त्या, राम, धोंडबा आमच्या तोंडाकडे पहात होते. शकीलने मानेनेच सांगीतले “सब ठिक।”

दोन दिवसानंतर दिवेलागनीला शामला घरी आणले. आम्ही सगळेच हॉस्पीटलेमध्ये आळीपाळीने थांबलो होतो. इन्नीही दोन दिवस हॉस्पीटलमधेच होती. फक्त काकूंनी शामला गेले दोन दिवस पाहीले नव्हते. शाम आता बराच सावरला होता. चेहऱ्यावर थोडासा तजेला आला होता. मात्र तो दोन दिवस मंद हसण्याव्यतीरिक्त काही बोलला नव्हता आणि त्याला कुणी काही विचारलेही नव्हते. शकीलने घरासमोर जीप थांबवली. धोंडबाने आणि इन्नीने शामला हात देवून खाली उतरवले. मागोमाग मी, दत्ता, राम होतो. काकू दारातच उभ्या होत्या. त्या रडतही होत्या आणि हसतही होत्या. आम्ही आत गेलो. काकूंनी लाकडी पलंग बाहेरच्या दालनात हलवून घेतला होता. शामला त्यावर बसवले. इन्नीने आम्हाला पाण्याचे घंगाळे ओट्यावर आणून दिले. आम्ही पायावर पाणी घेऊन शामच्या पलंगांच्या आसपास निवांत बसलो. दोन दिवस कुणालाच झोप, विश्रांती, जेवण काहीही व्यवस्थीत मिळाले नव्हते. चिंतूकाका अंघोळीला जाता जाता म्हणाले “अगं, पोरं सकाळपासून उपाशी आहेत. जरा तिखटाचा सांजा कर.”
“हो की, माझ्या मेलीच्या कसं लक्षात आलं नाही.” म्हणत काकू पदर सावरीत लगबगीने आत गेल्या. जाताना जरा दारात थांबून म्हणाल्या “येथेच बसा रे. बाहेर ओट्यावर बसून खाता अन् मग असं काहीबाही होतं. कुणाची नजर कशी तर कुणाची कशी.”
काकू आत गेल्यावर शकीलही उठला.
“शाम, तू आराम कर. मीही सकाळपासून अंघोळ वगैरे केली नाही. मी येतो घरी जाऊन. तासाभरात परत येतो.” म्हणत त्याने सँडल पायात चढवले. इन्नीने ते पाहीले मात्र, ती घाईत उठली आणि तिने शकीलचा हात धरला.
“ते पायातले सँडल काढ अगोदर आणि तिथे बस गुपचुप. आलाय मोठा अंघोळ करणारा.” म्हणत तिने शकीलला पुन्हा मागे ओढले. माझ्या लक्षात सारा प्रकार आला. काकू काही आज ओट्यावर बसुन खाऊ देणार नव्हत्या आणि चिंतूकाकांना शकीलचे उष्टे घरात सांडलेले आवडणार नव्हते. त्यामुळे शकीलने अंघोळीची पळवाट काढली होती. पण इन्नीही इरेला पडल्यासारखी वागत होती.
शकील कळवळून म्हणाला “सुन तो इन्ने। तू तो सब जानती है। मी तासाभरात परत येतोना. अप्पालाही घरी सोडवायचे आहे अजुन.”
पण इन्नी निग्रहाने म्हणाली “मला सगळं माहितये. तू बस अगोदर अप्पाशेजारी. मी आईला मदत करतेय आत, गेला तर बघ.”
शकील नाईलाजाने सँडल काढून माझ्या शेजारी बसला. आम्ही सगळेच खाली बसलो होतो मात्र दत्त्या शामशेजारी पलंगावर बसुन हे सगळं पहात होता.
शकील थांबलेला पाहून त्याने शामकडे मोर्चा वळवला. “काय शाम्या, लेका दोन दिवस पार आमचा घामटा काढला राव तू.”
मग माझ्याकडे पहात म्हणाला “अप्पा, कायबी म्हण, नजर लागली कुनाची तरी. अदुगर तू हात गळ्यात बांधून घेतला. तुझं कमी व्हतं म्हनुन आता या बामनानं नंबर लावला.” इतक्यात चिंतूकाका कसलेसे स्तोत्र पुटपुटत बाहेर आले. त्यांना पाहून दत्त्याने जीभ चावली.
चिंतुकाका हसत म्हणाले “काय रे घेणेकऱ्या, काय घोडे मारले तुझे ब्राम्हणांनी?
दत्त्या चाचरत म्हणाला “नाय, ते आपलं चुकून ग्येलं तोंडातून काका.”
काकांनी हातातली सतरंजी शकीलच्या हातात देत म्हटलं “शकील ही सतरंजी अंथर व्यवस्थीत. मी निरांजन लावतो रामापुढे मग करु पोटपुजा. दत्ता, नुसता बसलायस काय, उठ, दुसरे टोक धर सतरंजीचे.”
काकांचे हे बोलणे ऐकून शकील बरोबर मीही भांबावलो. शकील निमूट उठला. त्याने आणि दत्त्याने सतरंजी अंथरली. इन्नीही आतुन सांज्यांच्या प्लेट्स घेऊन आली.
“जसा लागेल तसा घ्या रे हाताने. मला कामे आहेत आत.” म्हणत काकूंनी एका मोठ्या थाळीत सांजा आणून मध्ये ठेवला.
चिंतूकाकांचीही दिवाबत्ती झाली होती. बाहेर येऊन त्यांनी शामच्या कपाळावर अंगारा लावला. त्याच्या जीभेवरही अंगाऱ्याचे हलकेसे बोट टेकवले आणि आमच्यातच बसत म्हणाले “अरे वास तर छान येतोय आज. छान झाला असणार सांजा.”
इन्नीने काकांच्या हातात एक प्लेट दिली आणि एक प्लेट हातात घेऊन ती शामला भरवायला त्याच्या शेजारी बसली.
“वाढलय ना सगळ्यांना? मग करा सुरवात” म्हणत काकांनी पहिला घास घेतला. मग आम्हीही सुरवात केली. नुसतं तिखट मिठ घालूनही सांजा अप्रतिम झाला होता. धोंडबा आणि दत्ता पलंगाला टेकून बसले होते तर मी आणि शकील काकांच्या दोन्ही बाजूलाा बसलो होतो. काकांच्या शेजारीच काय समोरही शकीलने कधी काही खाल्ले नव्हते. आज मात्र एकदम काकांच्या मांडीला मांडी लावून सांजा खाताना शकील भयंकर संकोचला होता. गप्पा मारत आम्ही खात होतो.
काका शामला म्हणाले “शाम, अरे या दत्ताकडून रामरक्षा घोटून घे रे जरा.”
दत्त्या हसत म्हणाला “काय उपेग नाय काका. कितीका रामरक्षा म्हना, तुमचा राम काय पावायचा नाय आपल्याला. आपल्यासाठी तुमचा राम फक्त सुंठवड्यापुरता.”
काका हसुन म्हणाले “अरे गाढवा, राम व्हायचा तेंव्हा होईल प्रसन्न पण जरा जीभेला वळण तरी लागेल. काय बोलतो काही समजत नाही कधी कधी.”
सगळ्यांच्याच प्लेटमधला सांजा संपत आला होता. काकूंनी मला दारातूनच नजरेने खुणावले. मी डाव्या हाताने थाळीतला सांजा अगोदर काकांच्या प्लेटमध्ये वाढला. मग शकीलकडे वळालो.
इतक्यात काका गडबडीने म्हणाले “अरे, विचारुन वाढावे रे अप्पा. मला भुक नाहीए अजिबात. तुमच्यासाठी बसलो होतो.”
इन्नी म्हणाली “काही होत नाही बाबा. खा तेवढा आता.”
“नाही सरणार गो. काय करावे या अप्पाला?” म्हणत काकांनी कुणाला काही समजायच्या आत त्यांच्या प्लेटमधला निम्मा सांजा शेजारी बसलेल्या शकीलच्या प्लेटमधे टाकला.
शकील एकदम बावरुन काकांकडे पहायला लागला.
काका म्हणाले “काय पहातोस शकील, माझ्या उष्ट्या ताटातले नकोय का तुला? अरे वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद असतात रे.”
हे सगळं पाहून आम्ही सारेच चक्रावलो. काकू दारात उभ्या होत्या. त्यांनी हात जोडत अज्ञातातल्या रामरायला हवेतल्या हवेत नमस्कार केला. इन्नीच्या डोळ्यातही टचकन पाणी भरुन आले. तसं हे आक्रीतच घडलं होतं. इन्नी आणि काकूंना चिंतूकाकांचे शकीलबरोबरचे वागणे आवडत नव्हते पण बोलताही येत नसे. तेवढे जेवणाचे सोडले तर काकांचा आमच्या सगळ्यांपेक्षा शकीलवर जास्त विश्वास असायचा. पण स्वयंपाक घर मात्र त्याला आजवर निषिध्द होते.
“डोळ्यातलं पाणी पडतय बघ सगळं प्लेट मधे. खारट होऊन जाईल सगळा सांजा. अगोदर खा मग रड हवं तितकं.” म्हणत इन्नी मोठ्याने हसली. मागोमाग आम्ही हसलो. इतक्यावेळ अगदी निर्विकार होऊन आमच्या गप्पा ऐकणाऱ्या शामच्या चेहऱ्यावरही प्रथमच हसू उमटले.
काका धोतर झटकत उठले आणि म्हणाले “पोटभर खारे सगळे. मी बसतो जरा ओट्यावर हवेला. खाऊन झाले की या बाहेर.”
आमचं खाऊन झालं. काकू रिकाम्या प्लेटस् न्यायला आल्या. त्यांच्या डोक्यावरचा भार उतरला होता आता. त्यामुळे कुणाकुणाचा राग आता जरा बाहेर आला.
प्लेट घेऊन जाताना इन्नीच्या पाठीत जोरात धपाटा घालत त्या म्हणाल्या “काढ आता याच्याही हातावर रांगोळ्या. जीभ काळी आहे की काय कार्टीची कुणास ठाऊक.”
इन्नी चांगलीच कळवळली पण दत्त्या “आंगं आश्शी!” म्हणत जोरात खिदळला त्यामुळे तिलाही हसावे लागले.

आम्ही ओट्यावर येऊन हात धुतले आणि काकांशेजारी बसलो. काकांनी शकीलला स्वतःच्या शेजारी बसवून घेतले. जरा वेळ त्याच्या पाठीवर थोपटत राहीले.
“आवडला ना रे सांजा तुला?”
शकीलने फक्त मान डोलावली. तेवढ्यात दत्त्या म्हणाला “तिखट शिऱ्याचं काय नाय ओ काका, त्याला डाळ भात द्या फक्त इन्नीच्या हातचा.”
या दत्त्याला कधी प्रसंगाचे गांभीर्य येणार ते देवच जाणे.
काका हसत म्हणाले “असु दे, असते आवड ज्याची त्याची.”
काकांनी शकीलचा हात हातात घेतला आणि म्हणाले “शकील, तू मागे बरेचदा वाद घातलास माझ्याशी की नाथांनी गाढवाला गंगाजल पाजले मग तुम्ही असे का वागता?”
शकील मध्येच काहीतरी बोलायला लागला. त्याला मध्येच थांबवत काका म्हणाले “थांब, मला बोलूदे आज. मी तुझ्या प्रश्नाला कधी उत्तर दिले नाही. आज देतो.”
त्यांनी दोन्ही तळवे एकमेकांवर चोळले आणि स्वतःच्या चेहऱ्यावर फिरवले. मग शांत आवाजात म्हणाले “हे बघ बाळ, नाथमहाराज काय, माऊली काय, ती माणसे मोठी, त्यांचे अधिकार मोठे. त्यांना अशा गोष्टींनी दोष लागत नाही. आपण सामान्य माणसे. होता होईल तो धर्माने घातलेली बंधने पाळावीत. त्यानेच निर्माण केलेल्या या विश्वात कोण वाईट असेल? हे नियम कुणी वाईट आहे म्हणून किंवा कुणी त्याज्य आहे म्हणून नाही पाळायचे, तर ते आपल्या आत्मशुध्दीसाठी पाळायचे असतात. शिवाय त्यात संस्कारांचाही भाग असतोच की नाही. शाम तुम्हा सगळ्यांबरोबर रहातो, अभक्ष्यही खातो हे मला माहीत आहे. मला फारसे वाईट वाटत नाही. दिवस बदलतायेत. पण माझ्यावर माझ्या वडीलांचे, आजोबांचे संस्कार आहेत. त्यातले काही चुकीचेही असतील पण ते आता अंगात मुरले आहेत. मी तुला असं वागवलं इतके वर्षं पण तू कधी वाईट वाटून नाही घेतले. माझ्यापेक्षा तुच मोठा आहेस शकील. तू नक्कीच गतजन्मीचा कुणीतरी भ्रष्ट साधक असशील. तुझे आमच्याशी काहीतरी पुर्वजन्मीचे ऋणानुबंध असतील म्हणूनच इतका खपतोस आमच्यासाठी.”
काकांचा आवाज भरुन आला. तरीही ते म्हणाले “मला सांगता येत नाहीए व्यवस्थित शब्दात शकील पण माझ्या असं वागण्यामागे अजीबात तिरस्कार नव्हता कधी एवढेच समजुन घे. आणि आजपासुन तुला ओट्यावर बसुन खायची किंवा हिला तुमच्या घरी डबा पाठवायची काही आवश्यकता नाही. तुझंच घर आहे हे.”
काकांनी धोतराच्या सोग्याने डोळे पुसले. शकील काहीच बोलला नाही. इन्नी आणि काकू दारात उभ्या राहून ऐकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तसं वातावरण गंभीरच होतं पण दत्त्याच्या नेहमीच्या सवयीने वातावरण क्षणात निवळले. दत्त्या म्हणाला “हे एक बरं झालं. काय तो एकदाचा कंडका मोडला. इन्नी पार वैतागली व्हती डाळ भाताचे डबे या मियाच्या घरी पोचवुन पोचवुन. नाय तं काय!”
काका उठत म्हणाले “चला बरं, निघा आता सगळे. अंधार पडलाय किती. आणि हो शकील, भाभींना सांग शामच्या आईने बोलावले आहे म्हणून. त्यांच्याही जीवाला घोर लागला असेल या शाममुळे. काय?”

एकूण इतके वर्ष असलेली आमची अडचण आजच्या या ओटाकट्यावर एकदाची सुटली. शामचे हात मोडणे आमच्यासाठी इष्टापत्तीच ठरली.
आठ दहा दिवस झाले. शाम आता कॉलेजला यायला लागला होता. महत्वाचे म्हणजे त्याने गेल्या काही दिवसातला बराचसा अभ्यास भरुन काढायला सुरवात केली होती. शकील त्याचे नोटस् काढत होता तर इन्नी माझे नोटस् काढत होती. शामला नक्की काय झालं हे कुणीही त्याला या दिवसात विचारले नव्हते. अगदी दत्त्यानेही. आम्हा दोघांचे गळ्यात बांधलेले हात सोडले तर बाकी सगळं अगदी नेहमी प्रमाणे चालले होते. मात्र एक झालं होतं, शाम त्या दिवसापासुन खुपच अबोल झाला होता. दहा वेळा काही विचारले तर एका वाक्यात उत्तर द्यायचा. हसनं खेळनं तर बंदच झाले होते. या सगळ्याचा श्रीपादबरोबर काहीतरी संबंध होता हे आमच्या लक्षात आले होते पण इन्नीने कुणालाही तो विषय काढायचा नाही अशी तंबीच दिली होती.

एका रविवारी आम्ही ओट्यावर बसलो होतो. काकूंनी मला आणि शकीलला काकांनी बोलावल्याचे सांगीतले. आम्ही माडीवर गेलो तर काका काहीतरी वाचत बसले होते. आम्हाला पाहून हातातली पोथी कपड्यात गुंडाळून ठेवत त्यांनी बसायला सांगीतले. विषय शामचाच असणार हे सांगायची गरज नव्हती. काकांनी एकदाचे विषयाला तोंड फोडले.
“हे बघ अप्पा, शामचे काहीतरी बिनसलय हे तर तुम्ही पाहताच आहात. पण त्याचे जेवणही खुप कमी झालेय. कॉलेजमधून आला की कुठे बाहेर जात नाही. आईबरोबर, बहिणीबरोबर जास्त बोलत नाही. घरातली शांतता खायला उठते रे बाळांनो. बरे त्याला त्याच्या काकांकडे पाठवले असते पण हात असा गळ्यात बांधलेला. कसं पाठवायचं?”
काकांनी आवंढा गिळला. त्यांनी उगाचच जानव्याच्या किल्ल्या खुळखूळवल्या आणि म्हणाले “आता तुम्ही दोघे बोला त्याच्या बरोबर काय ते. असं कोठवर चालेल? हळवं आहे रे पोरगं. आणि त्याला त्याच्या हळवेपणाची लाज वाटते म्हणून असा व्रात्यपणा करत असतो सारखा. पण आता सगळेच कसे ठप्प झालय. त्याच्या कलाकलाने घेत पहा, काय खातय त्याच्या मनाला. एकदा तो मन मोकळं करुन बोलला की मग अडचण नाही.”
“आम्ही बोलतो काका त्याच्या बरोबर.” एवढं बोलून आम्ही जीना उतरलो. यापेक्षा जास्त काही बोलायला आमच्याकडेही फारसे काही नव्हते.

एक रविवार पाहून दत्त्याने मळ्यात ‘खळगोटा’चा कार्यक्रम आखला. खळगोट (कांद्याची मसालेदार रस्साभाजी) आणि खरपुस भाकरी म्हणजे शामचा जीव की प्राण.
इन्नीने दुपारीच त्याला विचारले होते “दादा, आईने मळ्यात बोलावलेय जेवायला आज. काय सांगू दत्तूदादाला? येशील ना तू?”
शामने मुक्यानेच मान हलवून ‘होकार’ दिला होता. तेवढ्याच आधारे आम्ही संध्याकाळी मळ्यात निघालो होतो. रामला आणि ठोब्बाला शकीलने वगळले होते पण शामला अंदाज आला होता. त्यामुळे त्याने आवर्जुन सगळ्यांना सोबत घ्यायला सुचवले होते. तो निदान काहीतरी सुचवतोय हेच पाहून मला फार बरे वाटले होते. सहा साडेसहालाच आम्ही दोन कंदिल घेवून बारवेवर जावून बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. अंधारुन आलं होतं. दत्ताने आणि त्याच्या भावाने भाजीचे भांडे, भाकरीचे टोपले आणि पितळ्या आणून दिल्या. तवलीभरुन दही आणुन दिले. कधी नव्हे ते इन्नी आज बारवेवरच आमच्यासोबत जेवायला थांबली होती. आम्ही वाढून घेत होतो इतक्यात दत्ताच्या भावाच्या मुलीने ‘भाजलेले बोंबील आणि बिबड्या’ आणुन दिल्या तोंडी लावायला. मी इन्नीकडे पाहीले. पण तिने आज काही बोंबिल पाहून नाक नाही मुरडले. आमची हसत खेळत जेवणे उरकली. भाकरीच्या टोपलीत खाली ठेवलेले भाजलेले शेंगदाने आणि गुळ काढून दत्त्याने केळीच्या पानात काढून घेतले आणि टोपली झाकून ठेवली. मळ्यात जेवायला असलो की दत्ताची आई नेहमी एका माणसाचे जेवण जास्त करत असे. पण आज भाजीच्या पातेल्यात काहीही शिल्लक राहीले नव्हते. टोपल्यात सुध्दा इन्नीने ऐनवेळी अन्नपुर्णेसाठी बाजूला काढलेला भाकरीचा लहान तुकडा राहीला होता फक्त. सगळेच तब्बेतीने जेवले होते. शामही नेहमीसारखा जेवला होता. हे चांगले लक्षण होते. इन्नीने सगळी भांडी आवरली व निघाली तो दत्त्याने तिला थांबवून घेतले. तिलाही थांबायचेच होते. मी वाकळ गुंडाळून उशाला घेतली होती आणि मोटेसाठी बांधलेल्या दगडी जोत्याला रेलून छोटे छोटे दगड बारवेत टाकत होतो. त्यांचा येणारा डुबूक टुप्पूक आवाज ऐकत सगळेच काही क्षण बसून राहीले. किती वेळ बसून रहाणार म्हणून मी निट बसत काहीतरी म्हणनार तोच शकीलने माझ्या मांडीवर हात ठेवून गप्प बसायला सुचवले. मला न सांगता त्याचे आणि दत्ताचे काही ठरले असावे बहूतेक. त्याने खाली पडलेली काडी दत्त्याच्या अंगावर फेकली. दत्त्याला तेवढा इषारा पुरेसा होता.
बसल्या जागीच दत्त्या दोन्ही हात जमिनीवर टेकवत पुढे सरकला आणि म्हणाला “हे पघ शाम, तु जो काय खेळ चालावलाय तो आता बास झाला. दोन हफ्ते झाले या इन्नीच्या आन काकूच्याबी पोटात काय सुकाचा घास नाय. चिंतूकाकान्ला काय रडायचं गागायचं असन ते रामाच्या देवळात रडत असतीन. तो मानूस काय घरी कळू द्यायचा नाय कवा. आरं मी काय म्हन्तोय समजांतय का शाम्या?”
“ऐकतोय, तू बोल.” म्हणत शाम परत हातातल्या वाळलेल्या पानाचे तुकडे करायला लागला.
माझ्याकडे पहात दत्त्या म्हणाला “मला आता काय बोलायचंच नाय. तुला वाटलं तं मनाची गाठ सोड. काय असंन ते बोल. याउपरबी तुझं मन तुला खात असंन तर सरळ या बारवंत उडी मार. कोन तुला आडवायला येनार नाय. कसं शकील!”
मला वाटले आता इन्नी मध्ये पडते की काय पण ती शांत बसुन राहीली. दत्त्याचे शेवटचं वाक्य शकीलला उद्देशून असुनही त्याने मान वर केली नाही. सगळेच शांत बसुन राहीलो. उगाचच अस्वस्थ करणारी शांतता रातकिड्यांच्या आवाजाने अजुनच अस्वस्थ करत होती. पलिकडच्या शेतातल्या घराच्या अंगणात दत्त्याचा भाऊ आणि वहिणी बसलेले दिसत होते. त्यांनाही पोरांचे काय चाललय हे समजत नव्हते.
शाम्याचा चेहरा प्रथम विचारी झाला. मग बदलत बदलत केविलवाना झाला. हुंदका आवरन्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ओठ वेडेवाकडे झाले. हा परत त्या दिवशी सारखं करतो की काय असं अम्हाला वाटायला लागले पण तोवर त्याने डोळ्यातले पाणी मागे परतवले आणि गंभीर होत पुन्हा शांत झाला. दत्त्याला काही ही जिवघेणी शांतता सहन होईना.
तो अगतिक होऊन म्हणाला “बामनदेवा, ऐकूद्या तुमची वानी आमच्या कानांना.”
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन शाम म्हणाला “अप्पा तुला आठवतय, येथेच आपण इर्जीकच्या वेळेस शेकोटी केली होती. कॉलेजमध्ये स्पर्धा होती.”
मला आता साधा हुंकार देवूनही त्याला बोलताना थांबवावे वाटत नव्हते. मी नुसतीच मान डोलावली. शामलाही बहुतेक ऐकणाऱ्यांचे हुंकार नको होते. त्याचे सगळेच बोलणे नाटकातले स्वगत असल्यासारखे सुरु होते.
शाम दुरच्या रस्तांवरील दिव्यांकडे पाहून म्हणाला “आपण कुणीच भाग घेणार नव्हतो म्हणून तुम्ही सगळे स्टेज सजवायला मदत करत होता. अप्पाने पाणी मागीतले म्हणून मी पाण्याच्या टाकीकडे गेलो.”
मला आता अचानक आठवले. सगळेच स्टेजवर असल्याने मी शामकडे पाणी मागीतले होते. पण तो अर्धातास झाला तरी फिरकलाच नव्हता. स्पर्धेच्या धामधूमीत माझ्याही ते लक्षात आले नव्हते.
शामचे स्वगत सुरु होते “मी पाणी पिलो, अप्पासाठी जग भरुन घेतला तर श्रीपादन थांबवले. खुप घाईत आहे सांगुनही तो बळेच गार्डनमध्ये घेऊन गेला. खुप महत्वाचे काम आहे, आजच केले पाहीजे म्हणत होता. ही ब्याद अशी टळणार नाही म्हणून मग मीही त्याच्या सोबत गेलो. त्याचे म्हणने होते की कॉलेजला आणि घरच्यांना धक्का द्यायची एक आयडीया आहे त्याच्याकडे पण नक्की काय करावे हे समजत नाही. आणि कल्पना होती सगळ्यांनाच चकीत करेल अशी आत्महत्या करायची. पण सगळ्यांना चकीत करेल, कायमची लक्षात राहील अशी आत्महत्या कशी करावी हे त्याला सुचत नव्हते. मला सुरवातीला तो काय म्हणतोय तेच समजेना. मग वाटले की हा आपली टिंगल करतोय. पण तो अगदी काकूळतीला येवून विनवायला लागला. मग मात्र मला त्याचा राग आला खुप. वैतागून म्हणालो की एवढाच जीवावर उदार झालाय तर जा पुण्याला आणि शनिवारवाड्यात जावून आत्महत्या कर. तसंही नारायणरावांच्या मृत्युनंतर वाड्यावर एवढा सणसणाटी मृत्यू झाला नाही. किंवा त्यापेक्षा असं कर, ज्या नगारखान्यातून दिल्लीच्या मोहीमांचे नगारे झडले त्या नगारखान्यातुन दिल्लीकडे तोंड करुन मार खाली उडी. असेल तुझ्या नशिबात तर जाईल तुझा जीव. मग तुझ्या वडिलांना सांगून आम्ही तिथे तुझी समाधी बांधू” एवढं बोलून शाम थरथरत राहीला.
आम्ही कंदिलाच्या अंधूक प्रकाशात शामकडे पहात होतो. हे ऐकून आमचे आ वासले गेले. इन्नीही शहारल्यासारखी दिसत होती. आम्ही सगळेच मित्र तसे फार उपद्वापी होतो पण तो रात्रीचा अंधार, कंदिलांचा प्रकाश, शेजारचे अंब्याचे झाड आणि आम्ही बसलो होतो ती विहिर या सगळ्या पार्श्वभुमीवर शाम जे काही सांगत होता ते भयकथेसारखं वाटत होतं. माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाल्यासारखे वाटत होते. पण शामची गेले पंधरा दिवस जी अवस्था होती त्यावरुन आणि तसाही त्याचा स्वभाव लक्षात घेता तो खोटं बोलणं शक्य नव्हते. ठोब्बा आणि इन्नी चांगलेच गांगरले होते. इतक्या वेळ मारे रुबाबात शाम्यावर ओरडणारा दत्त्या तर दातखीळी बसल्यासारखा गप्प होता. शकीललाही हे अनपेक्षीत होते. थोडी थरथर सोडली तर शाम बराच धिर धरुन होता.
समोर तसेच पडलेले शेंगदाने, गुळ बाजूला सारीत धोंडबा म्हणाला “इच्या भन या शीरप्याच्या. मंग पुढं!”
“मला टाळी देत ‘हे बेस्ट सगळ्यात’ म्हणत श्रीपाद हसत हसत गेला तेथून. पुढचं सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने नगारखान्यातूनच उडी घेतली रे.” शाम एवढं वाक्य बोलला आणि मग इतकावेळ त्याने आणलेले अवसान गळून पडले. त्याच्या डोळ्यातून वहाणाऱ्या पाण्याच्या धारा कंदिलाच्या लाल प्रकाशात चमकू लागल्या. तो लहान मुलासारखा हुंदके देत रडू लागला. पण यावेळी त्याचे रडणे अगदी मोकळे होते. त्यात कुठेही विक्षिप्तपणा नव्हता. पंधरा दिवसांचा त्याच्या मेंदूवरच्या ताणाचा प्रत्येक हुंदक्यातून निचरा होत होता. त्याला कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. दहा मिनिटात त्याचे हुंदके कमी कमी होत थांबले. अधुन मधून डोळे मात्र भरुन येत होते. दत्त्याला हे ऐकून काही सुचेना तसं त्याने एकेका कंदीलाची काच काढून कपड्याने साफ करायला सुरवात केली. काजळी काढल्याने आता कंदिलांचा प्रकाश लख्ख पडला होता. इन्नीला मात्र तो सर्व ताण जरा असह्य झाला होता.
तिने धोंडबाला विचारले “धोंडीदादा, उशीर झाला रे फार. निघायचे का आपण?”
पण धोंडबा ऐवजी दत्त्याच म्हणाला “व्हय धोंडबा, इन्नीला नेवून घाल घराकं. आन इन्ने, तू झोप बिनघोर. शकील सोडंन सगळ्यांना. तसाही अप्पा रामच्याच वखारीत झोपन आज. सकाळी भाकर खावूनच जावू कालेजला. ऐ ठोब्बा, तुबी जा.”
आम्ही बराच वेळ धोंडबाच्या हातातला बांधाबांधाने जाणारा हलता कंदिल पहात राहीलो.
इतक्यावेळ शकील काहीच बोलला नव्हता. तो म्हणाला “बघ शाम, जो हुआ त्यावरुन कुणाचाही होईल तसाच तुझाही समज झालाय. यात तुझी गलती नाही. और मै किसीका वास्ता नही देता हू कभी, पण आमच्या पेक्षा शिरप्या मोठा आहे का तुझ्यासाठी? जे झालं ते वाईटच झालं लेकीन कितने दिन दिल को लगाए बैठेगा यार तू?”
आज शकीलची गाडी सारखी हिंदीवर जात होती त्यावरुन माझ्या लक्षात आलं की त्याचा सुलझा हुवा दिमाग पण आज चांगलाच उलझन मध्ये आहे.
शेवटी मीच मधे म्हणालो “हे बघ शाम, तू त्याला सुचवलं म्हणून त्याने असं केलं असं म्हणनं चुकीचे आहे. त्याच्या डोक्यात किती दिवस चालले असेल हे कुणास ठाऊक. एखाद्या कथा-कादंबरीत वाचून त्याने असं काही केलं असतं तर काय तू त्या कादंबरीच्या लेखकाला दोष दिला असता का? तसाही शिरप्या आचरटच होता.”
शाम भरलेल्या आवाजात म्हणाला “आचरट होता म्हणूनच असं अपराधी वाटते रे अप्पा. त्याला जर अशी विचित्र कल्पना मी सुचवली नसती तर ‘मरण्यात काय गम्मत नाही’ म्हणून त्याने विषय सोडून दिला असता रे. मी त्याला वैतागून का होईना हे सुचवलं तेंव्हा त्याचे डोळे कसे विलक्षण चमकले होते ते तू पहायला पाहीजे होतं अप्पा.”
शामचा मुद्दा मला पटत होता पण समजुन घ्यायचा नव्हता. कारण शामच्या डोक्यातले हे विचार काढले नाही तर काय होईल ते मी पंधरा दिवस रोज पहात होतो.
दत्त्या मधेच म्हणाला “आयला हे साऱ्या गावावरुन ववाळून टाकलेलं बेनं. त्याचं काय मनावं घेतो शाम्या. तू नसतं सांगीतलं तरी चाराठ दिसात त्यानं टाळकं लावलच असत की. च्यायला, बाराचं गेलं तरी तरास संपना त्याचा.”
शाम म्हणाला “हे बघ दत्ता, तो कितीही नालायक असला तरी मला काय अधिकार हे असलं काही सुचवायचा? त्याने उडी मारली काय आणि मी त्याला ढकलले असते काय, दोन्ही तेवढेच गंभीर आहे. उद्या त्याच्या सांगण्यावरुन आपल्यातल्या कुणी असं काही केलं असतं, तर दत्ता, सगळ्यात पहिल्यांदा तुच त्याच्या पोटावर धोंडा बांधून या विहिरीत ढकलला असता की नाही?”
मला एवढ्या गंभीर वातावरणात देखील शामचे हसू आले. तो कुणाची तुलना कुणाबरोबर करत होता. पण ते दत्त्याच्या नेहमीप्रमाणे लक्षात आले नाही.
तो म्हणाला “एकदा का चारदा टाकला असता. भले वरीसभर यीहीर वापरता आली नसती तरी. हैला, जीव यांच्या पोरानं द्यायचा आन तरास आपल्याला का? आता काय त्याच्या बापाचे पाय धरायचे का?”
दत्त्याचे बोलणे ऐकून शामचे डोळे एकदम चमकले. कधी नव्हे तो या पंधरा दिवसात पहिल्यांदाच चेहऱ्यावर उत्साह दिसला.
तो घाईने दत्त्याला म्हणाला “काय म्हणालास दत्ता?”
दत्त्या गडबडला “हे पघ शाम्या, तुझा शामळू सभाव तुह्याकडंच राहूदे. आयला रागावायची पन चोरी झाली की काय आता. तू लेका, मस्त तोंड शिवून बसला व्हता पंधरा दिस पन आमच्या उरावं सारी जिनगानी पेटायची बाकी राह्यली व्हती. उगा या सगळ्यांपाई गप राह्यलो नायतर पयल्या दोन दिवसातच खेटारनार होतो तुला. पोपटावानी बोल्ला असता.”
शाम म्हणाला “रागावलो नाही रे दत्त्या. शकील, आपण त्याच्या वडिलांना काय ते खरं सांगून माफी मागूयात. आई बाबांनाही खरं काय ते सांगूयात. त्याशिवाय माझ्या मनावरचा हा भार काही कमी नाही होणार रे. अप्पा, तुलातरी समजतेय का मी काय म्हणतोय ते?”
मला सगळं काही समजत होते, शकीललाही लक्षात आले चटकन शाम काय म्हणतोय ते. पण आम्हा दोघांनाही ही कल्पना पटली तर नाहीच, उलट भयानक वाटली. पण आता हे माफीप्रकरण शामच्या चांगलच डोक्यात बसलेलं दिसत होतं.
दत्त्याने तर ही कल्पनाच पार उडवून लावली “खड्यात जावा तुमी. आपल्या बाच्याने हे व्हनार नाय आन कुनी मला यात वढू बी नका.”
मरता क्या न करता सारखी आमची अवस्था झाली होती. अजुन काही वेळ जर कुणी काही बोलले नाही तर शाम्या मैत्रीची शप्पथ वगैरे घालून “याच साठी मैत्री केली का?” वगैरे विचारायला कमी करणार नाही हे दिसतच होतं. दत्त्याने अंग काढून घेतले होते. धोंडबा इन्नीला पोहचवून परत आलाच नव्हता. आणि रामच्या चेहऱ्यावरुनच कळत होतं की त्याच्यातला ‘हरिश्चंद्र’ जागा झालाय ते. शेवटी असं ठरलं की मी आणि शकीलने काका काकूंना जमेल तसं सांगायचे आणि श्रीपादच्या वडीलांकडे अम्मीने आणि मोठ्याईने जायचे. सोबत गुर्जी असतील. तेंव्हा कुठे शाम ऊठला. रात्रीचे दिड वाजून गेले असावे. घरी जाताना आम्ही बांधावरुन चाललो होतो. सगळ्यात पुढे दत्ता कंदील घेवून चालला होता, त्यामागे शाम आणि मी, मागे राम आणि शकील. मघाशी शामची ही माफी मागायची कल्पना मला भयानक वाटत होती पण आता बांधावरुन चालताना शाम ज्या उत्साहात चालला होता ते पाहून मला तो निर्णय घेतल्याचे खुप समाधान वाटत होते. शकीलने मळ्याच्या बाहेर जीप काढली तेंव्हा शामचा चेहरा फाशीची शिक्षा माफ झालेल्या गुन्हेगारासारखा दिसत होता.

मी आणि शकील रामाच्या देवळाच्या ओवरीत बसलो होतो. आम्ही दोघांनीही ‘काकांना कसं सांगायचं?’ याची मनातल्या मनात हजारदा तरी उजळणी केली होती. जरा वेळाने काका पुजेचं तबक घेऊन बाहेर आले. सोवळे नेसलेले काका आज प्रसन्न दिसत होते. शामच्या वागन्यात दोन दिवसात झालेला बदल पाहून त्यांची चिंता बरीच कमी झाली होती. बहुधा त्यामुळेच आज त्यांची पुजा घटकाभर लांबली असावी.
आम्हाला ओवरीत बसलेले पाहून ते म्हणाले “अरे येथे काय करताय? आणि अप्पा, आज इतक्या सकाळी गावात आलास ते?”
आम्हाला गप्प बसलेले पाहून ते म्हणाले “काय रे शकील, बोलेनासे झालात ते. काही बोलायचे आहे का? चला घरी जावूयात.”
“नाही काका, येथेच बोलूयात. दहा मिनिटे लागतील.” असं म्हणून मी शकीलला कोपराने ढोसले.
आमच्या ‘तु सांग. नाही, तु सांग’ अशा खाणाखुणा पाहून काका म्हणाले “बोला रे पटकन. मी सोवळ्यात आहे. काही झालय का?”
शेवटी शकीलने खसा साफ केल्यासारखे करुन एकदाची सुरवात केली. त्याने जमेल तितक्या कमी आणि सौम्य शब्दात ‘काय झाले’ ते सर्व सांगीतले. तो जसं जसं बोलत होता तसतसे काकांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.
काका ताम्हणातील फुले उगाचच निवडल्यासारखे करत गंभीर आवाजात म्हणाले “असो! बरे केलेत सर्व सांगितले ते. पाहूया रामराया काय करतो ते.”
मागे वळून त्यांनी रामरायाला हातातले ताम्हण कपाळाला लावत पुन्हा नमस्कार केला आणि “जानकी जीवन स्मरण…” असं पुटपुटत घराकडे चालू लागले.

मी कालच आई बाबांना सर्व सांगीतले होते. ते ऐकून बाबाही गंभीर झाले होते.
चिडून ते म्हणाले होते “हजारदा तुम्हा मुलांना कुसंगती करु नका सांगीतले होते. त्यात परत बोलायचा पाचपोच कसा तो नाहीच. आम्ही तुमच्या वयाचे नव्हतो का कधी? आता हे काय होऊन बसलेय पहाताय ना?”
कधी नव्हे ते आई माझी बाजू घेत म्हणाली “ते पाटलाचे पोर तसं अवगुणीच होते. आपल्या पोरांनी काही मैत्री वगैरे केली नव्हती त्याच्या सोबत. आपण रस्त्याच्या कडेने व्यवस्थीत चाललेलो असताना समोरुन एखादा सांड हुंदाडून गेला तर आपला काय दोष? काही चुकलं नाही आपल्या मुलांचे. मी येते रे अप्पा उद्या त्या पाटलांना भेटायला.”
मी दुपारी आईला घेऊन अम्मीच्या घरी गेलो. शकीलनेही आज कॉलेजला दांडी मारली होती. आज कसही करुन आम्हाला हे प्रकरण संपवायचे होते. आम्ही आल्यावर शकीलने गफुरला श्रीपादच्या वडीलांना बोलवायला पाठवले.
अम्मी आणि आई चहा पित बसल्या होत्या. आम्ही तेथेच रेंगाळत होतो.
आई चिडून म्हणाली “तुम्ही काय करताय येथे? जा, बाहेर जावून बसा. तुम्ही करा आणि आई बापाला निस्तरायला लावा. निघा येथून.”
आम्ही दोघेही निमूटपणे माडीवर जाऊन बसलो. दोघांच्याही मनावरचा ताण वाढत होता. हे नसतं खटले आमच्या गळ्यात मारुन शाम मात्र निवांत झाला होता. आम्ही दोघे काहीही न बोलता माडीवरच्या सज्जात उभे राहून खाली रस्त्याकडे पहात होतो. काही वेळाने गफूरच्या मागे मागे दमल्या सारखे चालत येणारे पाटीलकाका दिसले. त्यांनी पायरीखाली चप्पल काढल्याचे आम्ही पाहीले आणि आम्ही दोघेही जीन्यात येऊन बसलो. तेथून बाहेरच्या खोलीत बसलेले पाटीलकाका दिसत नव्हते पण अम्मी आणि आई दिसत होती. आईने लहान मुलीसारखा अम्मीचा हात धरला होता. ते पाहून माझ्या पोटात कालवले. शाम्यामुळे या साध्या भोळ्या मानसांना किती त्रास होत होता ते पाहून मला भयानक राग आला त्याचा. बाबांनाच पाटीलकाकांबरोबर बोलायला सांगायला पाहीजे होते असं मला क्षणभर वाटून गेलं. पंधरा विस दिवसांपुर्वी ज्याचा एकूलता एक मुलगा गेला त्याच्या पुढे आई-अम्मी काय बोलणार? तिकडे आईने अम्मीचा हात धरला होता तर इकडे शकीलने माझा.
अम्मी आणि आईने आळीपाळीने पाटीलकाकांना जे घडले ते सांगीतले. पाटीलकाकांचा काही आवाज येत नव्हता.
आई म्हणाली “दादा, तुम्हाला जे घडलं ते सगळं सांगीतले आहे. माफी मागायला आम्हाला तोंड नाही. श्रीपादच्या बाबतीत जे झाले ते फारच वाईट झाले पण चिंतूकाकांचे सगळे घर गेले काही दिवस ज्या अवस्थेतून चालले आहे तेही फार वाईट आहे. हे सगळं आमच्या ऐवजी चिंतूकाकांनी बोलायला हवे खरं तर पण ते तुमच्यासमोर उभेही राहू शकणार नाही. बोलायचे दुरच.”
काही वेळाने पाटीलकाकांनी जोरात नाक शिंकरल्याचा, खसा साफ केल्याचा आवाज आला. बहुतेक रडत असावेत. मग त्यांचा खोल गेलेला आवाज आला “कुणाला दोष द्यायचा आता? दैवच रुसले. भाभी तुम्ही सांगीतलं म्हणून मला हे सर्व कळलं, मला काहीच माहीत नव्हते या बाबत. मीच काकांची माफी मागायला हवी खरं तर. आमच्यामुळे त्या देवमानसाला किती त्रास झाला याचं वाईट वाटतय. या सगळ्यात माझीच मोठी चुक झाली. नको ती गोष्ट मी प्रतिष्ठेची केली. आणि आजही हे सगळ्या गावापासुन लपवून ठेवलं. पण यामुळे एक सज्जन ब्राम्हण जर स्वतःला त्रास करुन घेत असेल तर मला बोलावेच लागेल. नाहीतर मला नरकातही जागा मिळायची नाही. एका ब्राम्हणाचे शाप नाही घ्यायचे मला.” एवढं बोलून पाटीलकाका थांबले. आई अम्मी गोंधळलेल्या दिसत होत्या. आम्हीही इकडे जीन्यात बावचळलो होतो. हे काय नविनच काढलेय पाटीलकाकांनी? की श्रीपादच्या जाण्यामुळे असं वागतायेत ते? काही समजेना. इतक्यात अम्मीने हाक मारली “शकील बेटा पाणी आण थोडे काकांसाठी.”
शकील किचनमधून पाणी घेवून आला. त्याच्या मागोमाग मीही बाहेरच्या खोलीत आलो. श्रीपादच्या प्रसंगानंतर मी त्यांना प्रथमच जवळून पहात होतो. आजारी माणसा सारखे, अगदी खंगलेले दिसत होते.
ते गळ्याची घाटी वर खाली करत पाणी प्यायले. बाहीनेच तोंड पुसत म्हणाले “तुम्हीही बसारे बाळांनो.”
आम्ही निमुटपणे बसलो. काका म्हणाले “चिंतूकाकांच्या मुलाने हे सगळं इतकं मनाला लावून घ्यायला नको होतं. पण हाच त्या माणसांचा मोठेपणा आहे. माझ्यासारखा कुणी असता तर कोडग्यासारखा विसरुन गेला असता. श्रीपादचं वागणं गेले वर्षभर विचित्र होतं. गेल्या सहा महिन्यात ते जरा जास्तच होत चालले होते. अगोदर दुर्लक्ष केलं पण शेवटी पुण्याला डॉक्टरकडे नेलं. त्यांनी रोगाचं कसलंस नाव सांगुन मानसोपचारतज्ञाकडे पाठवले. त्यांनीही तपासुन सांगीतले होते की प्रकरण गंभीर आहे. त्याच्या स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवालाही धोका होईल. त्याला काही दिवस पुण्यातच ठेवा. पण मी घाबरलो. आपला पोरगा वेडा झालाय हे गावात कळालं तर काय अब्रू राहील? बरं त्याच्या थोरल्या दोन बहिणींचीही लग्ने करायचीत अजुन. त्याचे वेड गावभर झाले असते तर पोरी आयुष्याच्या घरी बसल्या असत्या. शेवटी आठवड्यातुन एकदा पुण्याला न्यायच्या अटीवर डॉक्टरांनी सोडलं. औषधं घेतली की बराच शांत असायचा. पण महीनाभराची औषधे त्याच्या पुस्तकांमधे सापडली. घेतलीच नव्हती त्याने. फार हुषार होता हो. नाव काढलं असतं घरादाराचं. पण नशिबाने खो घातला. मी त्याला पुण्याला ठेवायला हवा होता हो. या अब्रुपायी मीच मारलं हो माझ्या पोराला, मीच मारलं त्याला.” म्हणत पाटील काका हमसुन हमसुन रडायला लागले.
बऱ्याच वेळाने ते शांत झाले. अम्मीने त्यांना सरबत प्यायला दिले. मी आणि शकील सुन्न झालो होतो. सरबत पिवून झाल्यावर काका म्हणाले “शकील तु चल माझ्यासोबत. त्याची फाईल देतो मी तुझ्याकडे. मला त्यातले काही कळत नाही. ती फाईल दाखव चिंतूकाकांना आणि शामला. म्हणावे उगाच माझ्या पापाची शिक्षा तुम्ही भोगू नका.”

मी, शकील, इन्नी आणि शाम चिंतूकाकांच्या समोर बसलो होतो. “अरे, तुम्ही सांगा रे तोंडाने. मला अडाण्याला यातले काय कळणार आहे?” म्हणत काका फाईल चाळत होते. त्यांना त्यातले काही समजत नव्हते. मग इन्नीने वाचायचा प्रयत्न केला पण त्यातले बरेचसे शब्द ती पहिल्यांदाच वाचत होती. मी आणि शकील खुश असल्याने ‘काळजीचे कारण नाही’ एवढेच सगळ्यांना कळत होते. शेवटी शामने ती फाईल हातात घेवून चाळली. मेडीकलला जायचे असल्याने त्याने मेडीकलवरची मिळतील ती पुस्तके ‘अवांतर वाचन’ म्हणून वाचायला सुरवात केली होती वर्षभर. तरीही त्याला व्यवस्थित वाचता आले नाही पण मतिथार्थ मात्र सजमला. त्याचे डोळे भरुन आले. फाईल बाजूला ठेवत तो उठला आणि “बाबा, रामरायाने तारले हो शेवटी” म्हणत काकांच्या पाया पडला. मग शकीलने काकूंनाही बोलावून घेतले आणि पाटीलकाकांनी सांगितलेले सर्वकाही अगदी इत्यंभुत सर्वांना सांगीतले. क्षणात तेथे दिवाळीचे वातावरण तयार झाले.
काका म्हणाले “अरे रे, बिचारे पाटील. असो. रामरायाने परिक्षा घेतली म्हणायचे आपली. पण जरा अवघड पेपर काढला यावेळी त्याने. शाम, उठ, देवापुढे साखर ठेव अगोदर. आणि शकील संध्याकाळी भाभींना बोलाव जेवायला. सगळ्यांच्याच घरी सांगून ये. नैवद्य करुयात. गेले महिनाभर बिचाऱ्या रामरायाला निट स्नान नाही की नैवेद्य नाही या धावपळीत”
काका आनंदाने उठले. बाहेर जाता जाता म्हणाले “अगो, थोड्या पुरणाचे दिंडेही कर हो. त्या दत्ताला आवडतात फार.”
कितीतरी दिवसांनी संध्याकाळी आमचा ओटाकट्टा आनंदाने भरला होता आणि आतमध्ये तव्यावर पुरणपोळी चरचरत होती. आमच्या गप्पांबरोबर आत कटाच्या आमटीलाही ऊत आला होता.

कथालेख

प्रतिक्रिया

खूप छान ओघवत्या शैलीत लिहीता होतुम्ही. अगदी समोर बसून संगितल्यासारखे

छानच लिहिले आहेत तुम्ही, आणि जास्त उत्कंठा ताणून ना ठेवल्याबद्दल धन्यवाद.

प्रमोद देर्देकर's picture

9 Mar 2019 - 5:14 pm | प्रमोद देर्देकर

कितीदा तरी डॊळे पाणावले हो हा भाग वाचता वाचता .

आणि यांचे किमान 50 भाग तरी हो वू द्या.
तुम्ही खरंच पुस्तक काढा हो कारण
पुन्हा पुन्हा मागील भाग वाचण्यासाठी मागे जावं लागतं त्यापेक्षा पुस्तक जवळ ठेवता येईल .

सुरेख. संपले का? इथे क्रमशः नाही म्हणून विचारते.

शाली's picture

9 Mar 2019 - 6:53 pm | शाली

मैत्रचे साधरण २१ भाग आहेत. क्रमश: लिहायला विसरलो.

संजय पाटिल's picture

10 Mar 2019 - 5:45 pm | संजय पाटिल

मस्तच...
लवकर लवकर टाका पुढचे भाग.....

श्वेता२४'s picture

12 Mar 2019 - 4:28 pm | श्वेता२४

याचे पुस्तक काढा. खूपच छान लिखाण

शित्रेउमेश's picture

8 Apr 2019 - 3:30 pm | शित्रेउमेश

हि लेखमाला संपवु नका....

नाखु's picture

9 Apr 2019 - 5:36 am | नाखु

अतिशय आवश्यक आहे.
जबरदस्त खिळवून ठेवते हीच वैशिष्ट्य आहे या लेखमालाचे

वाचकांची पत्रेवाला नाखु