HR नावाचा जो काही प्रकार कोणत्याही कंपनीत असतो . त्याला डोकेदुखी सोडून दुसरं काही जमत नाही . म्हणजे , काही लोक असतात चांगले . शक्य तेवढी मदत करतात, माहिती देतात आणि पुढे काय होईल आणि काय नाही हे समजावून समोरच्याला शांत करतात. समोरचा कामगार .. (कामगार च कि . प्रोफाइल मध्ये जरी Senior Engineer असलं तरी शेवटी दिवसाच्या - आजकाल रात्र पाळीच्या रोजच्या हिशोबाने काम करणारे आम्ही कामगार ) का पेटलाय . आणि फक्त कंपनीचा फायदा न बघता त्याचाही कसा फायदा होईल हे सांगून देणारे काही दुर्मिळ प्राणी असतात काही कडे. आणि ते जिथे असतात तिथे कायम फायदाच दिसतो कंपनीचा . .. पण आता माझ्या समोर बसलेली बाई त्या पैकी नव्हती . दर महिन्यात कैच्याकाय नवीन खेकट काढून निस्ता ताप डोक्याला सगळ्यांच्या .. पण माझं काही काम अडकलं होतं PF चं . नेट वर माहिती मिळाली असतीच . पण समोर बसून कोणी सांगितलेल्या गोष्टीवर माझा कायम जास्त विश्वास. पण ते या बाईला विचारून उपयोग नाही .
मग वर सांगितलेल्या एका दुर्मिळ प्राण्याला फोन लावला . पुणे कोल्हापूर आणि आता परत पुणे . या फिरती मध्ये मधला २ वर्षाचा काळ घरी - बेळगावात राहून नोकरी करून काढला होता . आणि अगदी गुण्या गोविंदाने बाहेर पडलो होतो . म्हणलं तिथेच फोन करून तिथल्या HR ला विचारू . तसाही अधे मध्ये गप्पा मारायला फोन होतोच . मग ऑफिसच्याच नंबर ला फोन लावला . . आणि प्रधान ने फोन उचलला . . " अरे शाब , भूल गया क्या मेरेको . बहुत दिन कोई मिला नाही मच्ची साथ दारू पीने , कब आओगे इधर " . हे वाक्य त्याने भर ऑफिस मध्ये म्हणलं होतं . आजूबाजूला कमीत कमी ३० एक लोक , आणि सगळे मॅनेजमेंट आणि वरच्या पदावर असलेले असण्याची शक्यता होती. त्याचा प्रधान ला काही फरक पडला नसता हा भाग वेगळा . पण त्याला नसली तरी आम्हाला लाज होतीच .
भारोष डझेन्गपा प्रधान . वडील बंगाली , आई नेपाळी . दोघांनीही लहानपणीच टाकून दिल्यावर हा वाढला दार्जिलिंग मध्ये . कसाबसा दहावी पास झाला आणि मग सरळ आर्मी मध्ये . त्याच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या भागाबद्दल एवढीच माहिती आहे सगळ्यांना . . गेल्या वर्ष - दीड वर्षात हि भरपूर वेळा प्रयत्न केला खोदून माहिती काढण्याचा . पण नाही . पट्ठ्याने दाद नाही लागू दिली . असं म्हणतात कि ऑफिस मध्ये रोज आल्या आल्या तुमची जशी सुरुवात होते . त्याने पुढचा दिवस कसा जातो हे ठरतं . आमची सुरुवात व्हायची " गुम्बोर्निंग " ने . ऑफिसच्या बस मधनं उतरल्या उतरल्या हा समोर . उतरणाऱ्या प्रत्येकाला हा ६२ वर्षाचा माणूस " गुम्बोर्निंग शार ", " गुम्बोर्निंग मेम " म्हणायचा . पेपर वर याची पदवी ऑफिस बॉय ची . पण अगदी साहेबाच्या हस्ताक्षराच्या च्या चुका काढण्यापासून ते माझ्या सोबत सीसीटीव्ही कॅमेरा सेट करण्या पर्यंत , सगळी कामे करायचा .
बाजीप्रभूंनी म्हणे दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन गनीम कापला आणि खिंड पावन केली . याने आमच्या ऑफिस ची खिंड केली काम करून ... किंवा ती वेळेवर न करून . १० वाजता बस ऑफिस च्या दारात टेकली आणि लोक आपापल्या जागी पोचले कि चौफेर मारा चालू व्हायचा. .
प्रधान . मेरे प्रिंटर मी पेपर नही है . - परचेज
प्रधान वो १२ नंबर का फाईल ले के आना जल्दी . - HR
ए प्रधान .. हरामी माझा केलक्युलेटर कुठे विकून आलास काल . - अकाउंट्स
प्रधान जी कॉफी ?? - हे बहुतेकदा मीच . . कॉफी शिवाय काम सुरु नाही होत च्यायला .
प्रधान मेरा टेबल साफ नाही किया क्या !! - असाच एक काम कमी पण आवाज जास्त असलेला साहेब .
८० पैकी कमीत कमी ३०-४० लोक तरी एकाच वेळी याच्या नावाने बोंब मारत असायचे . आणि हे महाराज ? दारात थांबून तंबाखू मळत " अरे शार कितना चिल्लाता है . आ राहा हू ना ??" असं आपल्या तीन पोजिशन वर असलेल्या साहेबाच्या वरच्या पट्टीत आवाज चढवून ओरडायचा . नेपाळी , बंगाली , ओडिया , कन्नड, गुजराती , मराठी ,हिंदी . आणि इंग्रजी . या सगळ्या भाषा लिहिता वाचता बोलता येत असणारा ऑफिस बॉय मी पहिल्यांदाच बघीतला.
जवळपास २ वर्ष त्या कंपनी साठी "नेटवर्क इंजिनियर " या पदवीवर काम करत होतो . पण एकुणात कंपनीतल्या इतर लोकांसारखंच ती फक्त एक फॉर्मॅलिटी होती . मुख्य व्यवसाय पॉवर जनरेशन आणि ट्रेडिंग , जोडीला वेगळ्या नावाखाली होमगार्ड सेक्युरिटी ट्रेनिंग आणि आजूबाजूच्या राज्यातल्या पोलीस फोर्स साठी ऑफिशियल फायरिंग रेंज आणि इतर ट्रेनिंग अश्या आणि इतर हि बऱ्याच गोंधळात हात घातलेल्या या कंपनी मध्ये आम्ही .. म्हणजे मी , माझे एक सिनियर. जे पेपर वर Sales & Business head होते . . सुरुवातीचे २ महिने आमच्या सिनियर नि थोडं लक्ष ठेवलं माझ्या कामावर . पण नंतर माझी गोंधळ घालण्याची आणि ते निस्तरण्याची क्षमता बघून जे काही छोटं IT डिपार्टमेंट होतं ते माझ्यावर ढकललं. हवे ते निर्णय घेण्याची मोकळीक दिली आणि वेळ पडल्यास पूर्ण पाठिंबा हि दिला . त्यामुळे मग मी माझ्या खाली २ इलेक्ट्रिशियन मागितले. इकडून तिकडून ओळखी झालेले २ इलेक्ट्रिशियन , यातला एक आपला नेहमीच वायरमन होताच पण सोबत साऊंड सिस्टम ची चांगली माहिती होती . दुसरा होता एसी टेक्निशियन . कारण असं . कि जवळपास १५० एकर जागा होती . कंपनीच्याच लोकांसाठी एक छोटा रिसॉर्ट हि होता . अशी ४ लोकांची आमची टीम . आमचे स्वतःच ठरलेलं काम सोडून सगळ्या गोष्टीत चालेले किडे बघून बॉस सांगून टाकलं . हे रिसॉर्ट तुम्हीच मेंटेन करा . इथले सगळे एसी, फोन लाईन्स , नेटवर्क, आणि मुख्य म्हणजे लिकर स्टोर तुम्हीच बघा . आणि काही अडलं कि प्रधान ला घ्या सोबत . त्याला सगळी माहिती आहे . कंपनीच्या सुरुवातीपासून आहे तो इथे .
असा एक तरी माणूस असतोच सगळीकडे . ज्याला कुठली वीट खोदून काढली कि त्यातून किती कचरा बाहेर पडेल याची सगळी माहिती असते . तसाच हा . आता इतक्या वयस्कर माणसाला अरे तुरे करायचं कारण हि असंच . त्याने कधी त्याचं वयाचं मोठेपण जाणवू दिलं नाही . आणि आम्ही कधी आमचं सो कॉल्ड पद त्याच्या समोर नाचवलं नाही . दार २-३ महिन्यात कंपनीच्या रिसॉर्ट मध्ये देश भर आणि बाहेर असलेले आमचेच लोक यायचे . तत्यांचे ३-४ दिवसांचे इव्हेंट हि व्हायचे . मग त्यात अगदी सरकारी अधिकारणी , नेते मंडळींपासून ते मोठ्या मोठ्या कंपन्यांचे लोक हि असायचे . आता या सगळ्यात आम्हाला हि कामे दिलेली . त्यामुळे ते चार दिवस आमचा मुक्काम ऑफिस कॅम्पस मधेच . तसंही कॅम्पस मुख्य गावापासून २५ किलोमीटर लांब एका खेडेगावाबाहेर होतं . त्यामुळे रात्री ३ वाजता घरी जाऊन ७ ला परत येण्यात काही अर्थ नव्हता . मग त्याच रिसॉर्ट च्या २ खोल्यांमध्ये आमची ४ जणांची सोय असायची . आणि प्रधान ला इतर तिथेच राहून काम करण्याऱ्या लोकांसारखं एक छोटं खोपटं बांधून दिलं होतंच कंपनीने . त्यामुळे मग रात्री हे सगळे "मोट्ठे लोक " झोपी गेले कि मग आमची पार्टी सुरु .
या अश्या ४-५ इव्हेंट्स च्या वेळी आमची आणि प्रधान ची मैत्री जमली . आणि मालक हि याचं कैच्याकाय बोलणं का ऐकून घेतो हे समजत गेलं . या १५० एकर मध्ये पसरलेल्या रिसॉर्ट आणि ऑफिस कॅम्पस ची सफाई आणि इतर देखरेख . खुद्द रिसॉर्ट मध्ये सर्व्हिस वगैरे साठी मणिपूर , आसाम वगैरे राज्यातून आलेली ३०-४० मुलं मुली होत्या . यांना आपली स्वतःची भाषा सोडून इंग्रजी काय ती थोडी फार येते . त्यामुळे हे लोक पटकन कोणात मिसळायचे नाहीत . पण मग काही अडलं तर सांगायचं कोणाला ? प्रधान ला . याला एक तर त्या सगळ्या पाच पन्नास भाषा बोलता यायच्या . त्या सगळ्या देशाच्या दुसऱ्या टोकाहून आलेल्या मुलांसाठी प्रधान म्हणजे संत होता . त्यांचा बाप होता . या मुलांसाठी मालकांशीही भांडण्यात यांनी कमी ठेवली नव्हती . स्वतःच्या लहानपणी ज्या हाल अपेष्टा बघितल्या. त्या या मुलांना दूर देशात येऊ नयेत, आल्याचं तर कमीत कमी याव्यात . याची पूर्ण काळजी घ्यायचा . इतर वेळी आम्ही काम सांगितलं कि " अभि टाइम नहीं है . बाद मे मूड हुआ तो करेगा " असं सरळ सांगणारा माणूस. या मुलांनी काही मदत मागितली कि सगळं सोडून धावत पळत जायचा . या सगळ्यात एक गोष्ट प्रधान ने शिकवली . एक वेळ आपल्या मॅनेजर शी उद्धट बोलू शकता . पण ऑफिस बॉय आणि इतर कामे करणाऱ्या लोकांशी कायम आदराने च वागलं पाहिजे .. अक्षरश: ऑफिस बंद पडू शकतात च्यायला . . पण वेळ पडल्यास हेच लोक सर्वात जास्त मदत हि करतात. त्यात माझ्या कामात तर अशी ऐन वेळी मिळालेली मदत म्हणजे खजाना होता . असाच एक किस्सा अगदी लक्षात राहिलाय प्रधान आणि या मुलांचा . एप्रिल महिन्यात हि सगळ्यांची पगार वाढ होते दर वर्षी. त्यात या ४० पैकी अर्ध्यांचा झाला आणि अर्ध्यांचा नाही. ऍडमिन आणि इतर मॅनेजर लोकांना विचारून हि काही होत नव्हतं . शेवटी माझ्या टीम ला मदत करताना एकाने मला हे सांगितलं . मी तरी काय करणार म्हणा . मी ते जाऊन प्रधान ला सांगितलं . बादशहा सरळ घुसला बॉस च्या केबिन मध्ये . पुढचा अर्धा तास जो काही आरडा ओरडा आतून ऐकू येत होता त्यावर कोणाचाच विश्वास बसत होता . आज वर आम्हाला हे नाही समजलं कि याला अशी काय गोष्ट माहिती आहे कि बॉस समोर हि असा बोलू शकतो . कधी सांगितलं नाही . आम्हीही मुद्दाम विचारलं नाही . पण पुढच्या महिन्यात सगळ्या ४० मुलांचा पगार ५हजारांनी वाढला होता . मी उगाच पिन टाकली . कि माझा हि वाढूवून दे बॉस ला सांगून .. तर म्हणतो " ऑफिस बॉय बनो .. फिर जो चाहे मदत करेगा . . " .. याची रॉबिनहूड ची तर आता .. असो
पुन्हा एकदा नोकरी सोडायची वेळ आली होती , आणि पुन्हा एकदा मी अडचणीत होतो . म्हणजे काही गोंधळ नव्हता झाला . पण समोरच्या माणसाला कसं सांभाळू हे समजत नव्हतं . नोकरी चांगलीच होती . पगार हि चांगला, काम हि फारसं त्रासदायक नव्हतं . पण मग . . सध्या सगळं आरामात चाललंय म्हणून सुखात राहायचं ? कि ५-७ वर्षानंतर काय ? हा विचार करून दुसरी नोकरी बघून पुढे सरकायचं . हे ठरवण्यातच ३-४ महिने घातले. आणि मग पुढची शोधाशोधी आणि पन्नासकडून नकार मिळाल्या नंतर हि एक नवीन नोकरी मिळाली . पण मागचे अनुभव बघता . अगदी हजर होण्याची तारीख हातात येई पर्यंत कोणालाही सांगितलं नव्हतं . आणि मग एके दिवशी घरातल्यांपासून ते HR पर्यंत सगळ्यांवर गोळा टाकला . हे समजल्यावर जे अपेक्षित होतं तसेच लोक प्रतिक्रिया देत होते. कोणी अभिनंदन करत होतं . कोणी वाकड्यात शिरून "तुला कशी काय मिळाली दुसरी नोकरी " असं हि बोलून बघत होते . पण , या सगळ्यांपेक्षा मला बघायचं होतं प्रधान काय करतो ते .
मला वाटलं कि म्हणेल " शाब अच्छा लगा साथ मे काम करके " . किंवा मग . नेहमीप्रमाणे काही विचित्रपणा करून वळून हि बघणार नाही .
पण एकदम मिठीच मारली . " बोहोत साल के बाद दोस्त मिला था शार . " आणि निघून गेला . ते परत संध्याकाळी बस मध्ये बसे पर्यंत दिसला नाही कोणाला . . आजवर खूप लोक भेटले . स्वतःला मित्र म्हणवून गेले . अगदी आयुष्यभराची दोस्ती असेल असं म्हणून आज आमचे दसरा दिवाळी ला फॉर्वर्डस होतात फक्त .
पण हा ६२ वर्षाचा म्हातारा साला कधी मित्र झाला काही समजलं नाही . .
प्रतिक्रिया
26 Dec 2018 - 8:29 am | तुषार काळभोर
मस्त लिहिलंय.
लिहीत राहा, राव!
वी मिस युअर लेखन.
26 Dec 2018 - 9:32 am | यशोधरा
मस्त लिहिलं आहे!
26 Dec 2018 - 9:46 am | सुबोध खरे
छान लिहिलंय
26 Dec 2018 - 10:05 am | राजाभाउ
मस्त लिहिलंय
26 Dec 2018 - 10:41 am | नाखु
"अद्या"गत पुनरागमन.
भन्नाट स्फुट
वाचकांची पत्रेवाला नाखु
26 Dec 2018 - 1:53 pm | किसन शिंदे
मस्तच लिहीलंय
26 Dec 2018 - 1:59 pm | अनिंद्य
तुमचा प्रधान आवडला, प्रत्येक आस्थापनात एखादी अशी 'हरफनमौला' व्यक्ती असतेच :-)
26 Dec 2018 - 8:35 pm | उगा काहितरीच
लै भारी लिहीलंय राव ! मस्तच !! असा प्रधान मित्र म्हणून मिळायला पत्रिकेत खूपच चांगले ग्रह लागतात राव. हेवा वाटतोय तुमचा.
26 Dec 2018 - 10:15 pm | सस्नेह
भारी रे अद्द्या !
खूप दिवसांनी वाचलं तुझं लेखन.
26 Dec 2018 - 11:46 pm | जेडी
प्रधान डोळ्यासमोर उभा राहिला
27 Dec 2018 - 3:56 am | टवाळ कार्टा
आणि अद्द्या लिहिता झाला.... :)
भारी लिवलयं
27 Dec 2018 - 6:06 am | प्रचेतस
कडक लिहिलंस...लैच भारी बे.
27 Dec 2018 - 10:07 am | चांदणे संदीप
असा प्रधान असतोच बऱ्याच अस्ताव्यस्त ऑफिसच्या पसाऱ्यामध्ये.
प्रधान पाहिलेला...
Sandy
27 Dec 2018 - 10:09 am | टर्मीनेटर
छान लिहिलंय, व्यक्तिचित्रण आवडले!
27 Dec 2018 - 10:11 am | सही रे सई
झकास लिहिलं आहे.. अगदी डोळ्यासमोर उभा केला प्रधान
असंच लिहीत रहा
27 Dec 2018 - 10:52 pm | अद्द्या
सगळ्यांना धन्यवाद :)
2 Jan 2019 - 1:07 pm | दुर्गविहारी
खूपच छान जमून आलेले व्यक्तिचित्र. पु.ले.शु.
2 Jan 2019 - 1:33 pm | अभ्या..
छान लिहिलंस अद्द्या.
आवडले.
2 Jan 2019 - 1:41 pm | गवि
उत्तम व्यक्तिचित्र..
5 Jan 2019 - 2:48 pm | मुक्त विहारि
व्यक्ती चित्रण जमले आहे. ..