मी आज अनुभवलेला 'ठग ऑफ हिंदुस्थान'

कलम's picture
कलम in जनातलं, मनातलं
26 Nov 2018 - 12:51 pm

माझं ऑफिस घरापासून २० किमी वर आहे आणि तिथपर्यंत पोहोचायला स्कूटर वरून ४५ मिनिटं लागतात. तर आज सोमवार असल्यानं अगदी जीवावर येऊन उठून, आवरून सकाळी ऑफिसला माझ्या स्कूटर वरून येत होते.ऑफसच्या रस्त्यावर एक सिग्नल लागतो आणि तो पार केला तर जवळपास ५ किमी पर्यंत जंगलासारखा एअर फोर्स चा भाग आहे जिथं आजूबाजूला काहीच नाही. तर त्या सिग्नल वरून १ कमी पुढं पर्यंत पोचले असताना दोन माणसं त्यांच्या दुचाकीवरून आली आणि माझ्या स्कूटर च्या मागच्या चाकाकडं खुणा करून काहीतरी सांगू लागली. कधी आपली ओढणी चुकून निसटली असेल तर ती चाकात जाऊ नये म्हणून बरेच जण खुणा करून ती व्यवस्थित घ्यायला सांगतात, पण मी तर आज ओढणी घेतलीच नव्हती. कदाचित मागच्या चाकातली हवा कमी झाली असेल किंवा ते पंक्चर झाले असेल आणि हेच सांगण्याचा ती माणसं प्रयत्न करीत असतील अश्या विचारानं मी बाजूला गाडी थांबवली आणि काय झालं हे त्यांना विचारलं. त्यांनी पण माझ्या शेजारी गाडी थांबवली आणि तेलुगू मध्ये एकदम पॅनिक होऊन म्हणू लागले, "तुम्हाला काय ऐकू येत नाहीये का? दोन किमी पासून आम्ही तुम्हाला बोलावतोय."

तो पर्यंत मी खाली उतरून मागचं चाक बघितलं तर हवा वगैरे सगळं ठीक वाटत होतं . मी त्यांना म्हटलं नक्की काय झालंय? तर परत (तेलगू मध्येच) म्हणायला लागले कि जर अजून थोडा वेळ गाडी अशीच चालवली असती तर गाडीला आग लागली असती. म्ह्णूनच तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही तसंच पुढं चाललाय.

मी सगळ्यात आधी म्हटलं कि मला तेलगू कळत नाही तेव्हा काय ते स्पष्टपणे हिंदी नाहीतर इंग्लिश मध्ये सांगा. तर त्यातला एक जण बोलला, "तुमच्या गाडीच्या पाठीमागं स्पार्क येतोय."

हे ऐकून खरं तर क्षणभर मी घाबरले. एक तर आपल्याला गाडीमधलं जास्त काही कळत नाही. आत्तापर्यंत ब्रेक केबल तुटली, पंक्चर झालं या पलीकडे जाऊन माझ्या गाडीनं मला कधीच धोका दिलेला नव्हता आणि त्यामुळं हा नवा प्रॉब्लेम (तो पण स्पार्क, गाडी जळेल वगैरे) ऐकून मी घाबरले. परत गाडी सुरु केली आणि खरंच काही झालं तर काय करायचं ह्या विचारानं गाडी पण सुरु करावीशी वाटेना. तरी पण त्या माणसाला म्हटलं, "तुम्ही एकदा गाडी सुरु करून दाखवा बरं, मी बघते कुठं स्पार्क येतोय ते." तर हा लगेच पुढं आला आणि म्हणाला, "तुम्ही थांबा, गाडी थोडी कडेला लावा. मी बघतो नक्की काय झालंय ते. मी पण मेकॅनिकच आहे आणि म्हणूनच मला कळलं कि काहीतरी लोचा आहे. तुम्हाला गाडीमधनं काही विचत्र आवाज ऐकू आला नाही का?" मी म्हटलं नाही आला तर तो म्हणाला, "कदाचित हेल्मेट घातल्यानं ऐकू आला नसेल. तुम्ही एक काम करा, गाडी त्या बाजूनं थोडी आडवी करा, आणि मला एक कापड द्या, मी बघतो नक्की काय झालंय ते." असं म्हणत स्वतःच्या हातातलं एक कापड घेऊन तो गाडीच्या उजव्या बाजूला वाकला पण. मी गाडीच्या डाव्या बाजूला जाऊन गाडी एका बाजूला झुकवली आणि कापड काढून देऊ लागले. तेवढ्यात तो माणूस म्हणाला, "मॅडम इकडं या, बघा हि पाईप निघून गेलीय." मी खाली वाकून बघितलं तर सायलेन्सर च्या वरच्या भागात असणारी एक पाईप गायब होती. गाडीची इतकी माहिती नसल्यानं नक्की काय झालाय हे मलाही कळेना. तेवढ्यात तोंडातून थोडी थुंकी माझ्या सायलेन्सर वर लावून त्यानं म्हटलं "बघा मॅडम, सायलेन्सर किती गरम झालाय. आणि आता ह्या पेट्रोलच्या पाइपमधनं जर पेट्रोल खाली सायलेन्सरवर पडलं आग नाही का लागणार?"

एक तर पेट्रोलची पाईप सायलेन्सरवर असू शकत नाही हा common sense चा भाग आहे. दुसरं म्हणजे गाडीतलं पेट्रोल तर कमी झालेलं वाटत नव्हतं. जर हि पाईप कुठं पडून गेली असेल तर धबाधबा पेट्रोल वाहून गेल्यानं आत्तापर्यंत पेट्रोलची टाकी रिकामी व्हायला हवी होती. एका बाजूला तो सांगतोय हे चुकीचं आहे असं वाटत होतं तर दुसऱ्या बाजूला "काय माहित, खरं सांगत असेल तर गाडी सुरु केल्यावर accident होईल" ह्याची भीती पण वाटत होती.

मी त्याला म्हटलं "ठीक आहे, मी गाडी ढकलत पुढच्या एका सर्विसिंग च्या दुकानात घेऊन जाते आणि ठीक करून घेते, तुम्ही जावा." तर तो म्हणाला, "एवढं कशाला मॅडम, हा (त्याच्याबरोबरच्या माणसाकडे हात दाखवून) गाडीवरून जाऊन ती पाईप घेऊन येईल. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही चालत जाऊन घेऊन या. मी नक्की काय घेऊन यायचं ते सांगतो. पण मॅडम, तुम्ही इतक्या लांब चालत जाऊन येईपर्यंत खूप वेळ लागेल, तुम्ही त्याला पैसे द्या, तो घेऊन येईल. हवं तर बिल पण आणून देईल." मी म्हटलं, "अंदाजे किती पैसे होतील? तर तो म्हणाला, "मॅडम पाच-सहाशे होतील."

त्यावेळी मला थोडी शंका आली. मी विचारलं, "इतके पैसे?' तर म्हणाला, "मॅडम, कॉपर ची पाईप असते त्यामुळं तेवढे पैसे लागतातच. हवं तर तुम्ही पण ह्याच्या बरोबर जावा." मला त्याच्याकडं पैसे द्यायला पण नको वाटू लागलं आणि गाडी इथं अशीच ठेवून जायची पण भीती वाटू लागली. मनात म्हटलं, 'काय व्हायचं ते होऊ दे, आपणच आपल्या गाडीवरून जाऊ. जवळजवळ १०-१२ किमी गाडी चालवली पण इतका वेळ स्पार्क मुळं काही झालं नाही, बघूया आता काय होतंय ते.' असा विचार करून गाडी सुरु करायला गेले तर गाडी पण सुरु होईना.

सगळ्यात आधी नवऱ्याला फोन केला, काहीबाही मराठीतून बोलल्यासारखं केलं आणि त्या माणसाकडं बघून सांगितलं कि "तुम्ही इथंच थांबा, माझा नवरा इथून ४ किमी च्या अंतरावर आहे आणि तो ५ मिनिटात इथं येईल. तो आल्यावर कसली पाईप आणायची ते सांगा, तो घेऊन येईल आणि तुम्ही ती बसवून द्या हवं तर." असं म्हटल्या म्हटल्या दोघांनी गाडीवर टांग टाकली आणि म्हणाले, "जर तुमचा नवरा येणार असेल तर ठीक आहे, तुम्ही काय ती दुरुस्ती करून घ्या, आम्ही निघतो." एवढा वेळ माझी आणि माझ्या गाडीची इतकी काळजी असल्याचं दाखवणारा आणि गाडी दुरुस्ती साठी अजून तास भर पण थांबू शकतो असा अविर्भाव असलेला तो माणूस दोन मिनिटांत गायब झाला.

तो निघून गेल्यावर मी नवऱ्याला झालेला सगळा वृत्तांत सांगितलं. त्या माणसानं 'गाडीला काय झालंय' हे बघायचं नाटक करून ती पाईप काढून घेतली असेल हि शंका पण व्यक्त केली. नवरा खूप दूर त्याच्या ऑफिसपाशी असल्यानं येण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी मागं वळून गाडी १ किमी ढकलत नेण्याचा निर्णय घेतला. अर्धा तास गाडी ढकलून मी एका सर्विसिंग शॉप मध्ये घेऊन गेले. त्या मेकॅनिकला विचारल्यावर असं कळलं कि ती एअर पाईप आहे. मी त्याला विचारलं कि ती पाईप अशीच निघून पडू शकते का? त्यावर त्यानं सांगितलं कि हि पाईप अशीच पडणे खूप अवघड आहे, कुणीतरी ती उचकटून काढल्याशिवाय ती निघू शकत नाही. आणि आता गाडीला हवेचा सप्लाय नसल्यानं गाडी सुरु होत नव्हती. शेवटी ६० रुपये देऊन मी नवीन पाईप घालून घेतली आणि लाखो रुपयांचा अनुभव पदरात पडून घेऊन ऑफिस ला २ तास उशिरा पोचले.

आजपर्यंत असला कुठलाच अनुभव मला आलेला नाही. हैद्राबाद शहरात फसवणूक करणारी, जाता- येता काहीतरी घाणेरडी comments करणारी माणसं एकूणच खूप कमी असल्यानं आजपण 'आपल्या मदतीला येणारा माणूस हा genuine आहे' हा माझा विश्वास चुकीचा ठरला. शक्यतो बाई माणसांना गाडीची तितकीशी माहिती नसते. एकाकी रस्त्यावर गाडी बंद पडली तर त्या नक्कीच घाबरून जातात आणि अश्या वेळी समोर मदतीचा हात पुढं करणाऱ्या माणसावर भरवसा ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडं नसतो. ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्या माणसानं एका क्षणी गाडीची पाईप काढून घेतली आणि ६० रुपयांच्या पाईपचे सहाशे रुपये आणि वरून ती बसवून देण्याचे १००-२०० त्यानं मागितले असते असे ८०० रुपयांचा चुना लावायचा प्रयत्न केला. असं जरी त्यानं दिवसातून ४ गाडयांना केलं तर त्याला किती तरी पैसे मिळतील.

या अनुभवातून शिकलेल्या काही गोष्टी:

१. काहीही होवो कुणालाही आपल्या गाडीला हात लावू देऊ नये.

२. कुणी आपल्याला घाबरवण्यासाठी काही बोललं तर घाबरून जाऊ नये, थंड डोक्यानं त्याचा विचार करावा.

३. काहीही झालं तरी पैसे काढून देऊ नये किंवा आपली गाडी रस्त्यावर एकटी टाकून जाऊ नये.

४. आपण चालवत असलेल्या गाडीची किमान माहिती ठेवावी. सगळ्याच समस्यांचं trouble shooting आपल्याला माहित असणं अपेक्षित नसलं तरीही एक गाडीचालवताना कुठकुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात याची माहिती जरूर ठेवावी.

५. सांगायला खूप वाईट वाटतं , पण समोरच्या माणसांवर विश्वास ठेवू नये.

एकूणच काय "दुनिया बदल रही है." हेच खरं

कथाअनुभव

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

26 Nov 2018 - 1:07 pm | विनिता००२

सावध रहावं हे बरं :)

प्रसांगवधान दाखवून सुरक्षित राहीलात, काळजी घ्या पुढे पण!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2018 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरं आहे.

आपण जी वस्तू वापरतो तिच्याबद्दल थोडीफार माहिती आणि छोट्याछोट्या बिघाडांची (जवळपासच्या मेकॅनिकची मदत मिळेपर्यंयची) जुजुबी दुरुस्ती करता येणे जरूर आहे. तुम्ही नशीबाने व प्रसंगावधान दाखवून थोडक्यात वाचलात, हे फार चांगले झाले... दर वेळेस असेच होईल असे नाही.

कलम's picture

26 Nov 2018 - 1:43 pm | कलम

खरं आहे

आणि परत फक्त पैश्यासाठी हे सगळं केलं असेल तर ठीक आहे.

शारीरिक हल्ला केला तर काय करायचं?

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2018 - 1:12 pm | चौथा कोनाडा

खतरनाक किस्सा आहे. तुम्ही चतुराईनं प्रसंगावधाना दाखवलेत म्हणून बचावलात.
भुरट्याचोरांची अशीच मोडंसऑपरेंडी असते. अतिशय निरागस चेहरे करून विश्वास बसेल असे बोलणे असते. भलेभले याला हातोहात फसतात.
असे प्रसंग आपली परिक्षा घेणारे असतात. निर्णय घेताना आपली थोडीजरी चूक झाली तर खुप महागात पडते.
ओघवतं लिहिलं आहे !

मलासुद्धा अगदी असाच अनुभव आलेला आहे मी एक दा सहकुटुंब कल्याण होऊन येत होतो. दोन दुचाकीस्वारांनी मला सहकुटुंब पाहून असाच हात देऊन थांबवले आणि गाडी च्या इंजिन मधून धूर येत असल्याचे सांगितले. हा प्रकार खाडीच्या पुलाच्या अलीकडे झालेला असल्यामुळे मी गाडी थांबवली आणि खरच बघायला लागलो त्यांनी मला इंजिन सुरू करायला लावले आणि हातातील फडक्याने आग पेटवून दाखवली. इंजिनच्या वरचा एक पार्ट खराब झाल्याचे सांगून त्याने तो काढून घेतला आणि मी लगेच बदलून आणतो म्हणून जोडीदार निघून गेला मी प्रचंड गोंधळलो होतो दहा मिनिटात त्याने नवीन पार्ट बसवला. आणि त्या पार्टचे बाराशे रुपये मागू लागला मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला दहा मिनिटात याला बाराशे रुपयांचा कुठून मिळाला मी त्याला सांगितले आपण एटीएम वर जाऊ आणि तिथे मी पैसे काढून देतो सुदैवाने त्याकाळी माझे सासरे कल्याण मध्ये पोलीस खात्यात नोकरीस होते तिथपर्यंत गाडी पळवली आणि जशी पोलिस स्टेशन जवळ गाडी लावली तसेच मागून येणाऱ्या दोघांनी पळ काढला. त्यानंतर जवळच्या कारागिराला गाडी दाखवली योग्य असल्याची खात्री केली आणि मग पुढचा प्रवास सुरु केला पण मनात धाक धुक होती की ते दोघे पुन्हा येतात की काय. नाशिकला आल्यावर कंपनी शोरूम मध्ये जाऊन नीट तपास केला तर इंजिनला इतक्या सहजपणे आग लागणे अशक्य असते आणि हां प्रकार निव्वळ फसवणुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.

कलम's picture

26 Nov 2018 - 1:46 pm | कलम

इंजिनला इतक्या सहजपणे आग लागणे अशक्य असते

मला पण त्या पाईप लावून देणाऱ्या मेकॅनिकने हेच सांगितलं

हे असे प्रकार सुमारे २००८ मध्ये विक्रोळीच्या हायवेवर फार होते .. महिन्याकाठी तीन चार प्रकरण दाखल असायची .. तत्कालीन अंमलदाराने फिल्डिंग लावून त्या टोळीचा असा काही बंदोबस्त केला कि विचारून सोया नाही .. आता तुमच्याकडून इतक्या वर्षांनी हे ऐकतो आहे .. चांगलाच गाजलं होत तेव्हा हे प्रकरण .

मला पण मुम्बैमधे आलेला असा अनुभव.
वॅगॉनार होती भावाची माझ्याकडे. २ सिग्नलला सलग दोघांनी हात दाखवला म्हणून गाडी थांबवली, तर सेम गाडीतुन धुर येतोय वगैरे सांगितल.
जवळच मॅकॅनिक आहे वगैरे नेहमीचा प्रकार. मी मुंबैत नवीन, त्यामुळे काही झाले तरी गाडी अनोळखी माणसाच्या हातात द्यायची नाही हे ठरवुन ठेवलं होतं.

मेव्हण्याला फोन केला, त्याने विचारलं, गाडी सुरु होते आहे का? म्हणलं हो. मग तशीच घरी घेऊन ये, मग बघु म्हणाला. मेव्हणा येतोय म्हणल्यावर असेच दोघे गायब.
दुसर्‍या दिवशी हायवे वर दाखवलं मॅकॅनिक ला, त्याने सांगितलं की तुम्ही बॉनेट उघडून गाडीतुन बाहेर येईपर्यंत त्यने स्पार्कप्लग काढुन ठेवला होता.
नशिबाने इन्जिन वेगळे होते म्हणून गाडी सुरू झाली इतकेच.

नंतर टीमबीएच्पी वर बघितलं तर अशी टोळीच बर्याच राज्यात कार्यरत अहे असे कळले.
त्यांना परत भेटायची इच्छा आहे. बघुया.

कलम's picture

26 Nov 2018 - 1:41 pm | कलम

बापरे सगळेच अनुभव भयानक आहेत.

जर हे सगळं रात्री घडलं असत तर काय करायचं होतं मी, ह्या विचारानेच धडकी भरतेय आता.

अभिजित - १'s picture

26 Nov 2018 - 1:54 pm | अभिजित - १

घोडबंदर रोड ठाणे इथे गेलो होतो. डीमार्ट च्या बाहेर पडलो रात्री ९ वाजता. कार घेऊन. हवा भरायला गेलो. अस्लम किंवा उस्मान असे काहीतरी त्या दुकानाचे नाव होतं. १२/१४ वर्षाचा मुस्लिम पोरगा. पुढच्या चाकात हवा भरताना म्हणाला - हवा भरायच्या आधीच - टायर पंक्चर है. मी त्याला बोललो - तू हवा भर, मी नंतर बघतो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत टायर बघितला. हवं फुल. थोडक्यात तो १२ वर्षाचा मुलगा चुतिया बनवत होता. परत तिकडे CAR घेऊन गेलो. त्याला शिव्या घातल्या आणि एक जोरात कानाखाली वाजवली !!

शक्यतो बाई माणसांना गाडीची तितकीशी माहिती नसते

गैरसमज. पुरुषमाणसेही या प्रकारे फसलेली आहेत. पुरुष माणसांना गाडीची अंतर्गत फार माहिती असते हा गैरसमज आहे. मी पुरुषमाणूस असूनही तुम्ही लिहिलेल्या मोडस ऑपरेंडीला फसलो आहे. दुचाकीऐवजी चारचाकी इतकाच फरक. बाकी आग, ठिणग्या, वाटेत थांबवून इशारा, जवळच मेकॅनिक, पार्ट बदलणे / बसवणे.. सर्व तसंच. कोणताही पार्ट काढलाही नाही त्याने. एक डमी पार्ट नुसता बसवल्याचं नाटक केलं. नंतर बघितलं तर तो पार्ट नुसता खोचून ठेवला होता. खरं तर दीड हजार होतात पण आत्ता आहेत तितके द्या, बाकीचे उद्या गॅरेजवर द्या, इथेच ब्रिजखाली आहे वगैरे बोलून उलट मला उधारीवर काम करून दिल्याचा आवही आणला.

तुम्ही फायनली फसला नाहीत, मी फसलो हाही एक आणखी फरक. :-)

नंतर माहितीतले अनेक इतर जण तस्सेच फसल्याचं कळत गेलं. काहींना तर निर्जन जागा असल्याचा फायदा घेऊन धमकावून पैसे घेतले असंही कळलं.

कलम's picture

26 Nov 2018 - 3:11 pm | कलम

>> काहींना तर निर्जन जागा असल्याचा फायदा घेऊन धमकावून पैसे घेतले असंही कळलं.

हे खरच भयानक आहे

खूप वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्यानं त्याच्या गादीवर एका कॉलेजच्य मुलाला लिफ्ट दिलेली होती. तेव्हा त्या मुलानं मागं बसून नवर्याच्या सॅक मधून ५००० रुपयांची hard drive लाटली होती. कुणाला लिफ्ट देणंही अवघड झालंय.

म्हणजे आपणही आपला चांगुलपणा दाखवू नये आणि दुसऱ्याच्या चांगुलपणावरही विश्वास ठेवू नये.

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2018 - 5:33 pm | चौथा कोनाडा

त्याच्या गादीवर एका कॉलेजच्य मुलाला लिफ्ट दिलेली होती.

अरे वा, गादीवर लिफ्ट !
:-)))

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Nov 2018 - 3:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

सेम अनुभव, आमच्या सिंहगड रोडवर नवश्या मारुती मंदीराच्या सिग्नलला दुचाकीवरुन काहे जण मागुन येतात आणि सांगतात की चाक पंक्चर आहे. ते असे सांगतानाच समोर आपल्याला टायर दुरुस्तीचे दुकान दिसते. तिथे गाडी थांबवली की हवा भरणारा माणुस सुध्दा पंक्चर आहे असे सांगतो. अर्थात आपली खात्री होते की खरोखर चाक पंक्चर आहे. चाक खोलल्यावर दोन तीन चार कितीही पंक्चर सापडतात.

जर गाडी थांबवली नाही तर मात्र चाक ठणठणीत असते. स्थानिक नगरशेवक आणि पोलीसांच्या कानावर हा प्रकार घातल्यावर काही दिवस बंद झाला होता. आता परत त्याच चौकात परत एकदा हा खेळ सुरु झाला आहे.

पैजारबुवा,

आनन्दा's picture

26 Nov 2018 - 3:48 pm | आनन्दा

मी एकच गोष्ट पाळतो.
अनोळखी शहरात कम्पनीचे सर्व्हिस सेन्टर सोडुन आपली गाडी कोणाच्यही ताब्यात देउ नये. हा नियम पाळला म्हणून मी वाचलो. जसे फॅमिली डॉ ला विच्यारल्याशिवाय आपण काही निर्णय घेत नाही तसेच आहे हे.

फसवायच्या हमखास जागा

जुना खंडाळा घाट
साकी नाका
पवई
विक्रोळी
सायन धारावी
कुर्ला प्रिमिअर सिग्नल ते बैल बाजार
घोडबंदर - गायमुख - भाग

दोन दुचाकीस्वार गाडीचे चाक वेडेवाकडे धावत आहे वा इंजिनमधून ठिणग्या पडत आहेत/ धूर येत आहे असे सांगतात.

चाक डुग्डुगत असेल तर ते कुणी सांगायला लागत नाही
ओव्हरटेक करणारे वा समोरुन येणारे दोघांनाही इतक्या कमी वेळात आग वा धूर दिसू शकत नाही जो चालकाला सुद्धा दिसत नाही. मुळात इंजिन तापले तर डॅश बोर्ड वर इशारा मिळतो.

अजिबात लक्ष न देता धन्यवाद म्हणुन प्रवास सुरु ठेवायचा.

आपण प्रसंगावधान दाखवले ते पण अशा निर्जन ठिकाणी याबद्दल आपले कौतुक आहे.

सगळीकडेच असे प्रकार सुरु आहेत. पुण्यात कात्रज बायपासला बावधन च्या नवीन मोठ्या पूलावर दुचाकी वर बसलेले दोघे जण आम्हाला सांगत होते की कारचे चाक पंक्चर आहे. मी दुर्लक्ष केले तर आम्हाला साईडला घेण्याचा आग्रह करत होते. मी असे प्रकार ऐकल्यामुळे तसाच पुढे गेलो तर जिथे पूल संपतो(चांदणी चौकाच्या थोडे आधी) तिथे एका पंक्चर दुकानाच्या बाहेर बऱ्याच कार विशेषतः बाहेरच्या पासिंगच्या उभ्या होत्या. मला प्रकार लक्षात आला.
मी ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूम ला फोन करून कळवल होतं हे, त्यांनी लगेच चेक करतो असं सांगितलं होत, पुढे काय झालं काय माहित.

अनोळखी ठिकाणी हवा चेक करताना तर किती लुबाडतात याचे अगदी ठरलेले प्रमाणबद्ध किस्से आहेत, त्यामुळे ट्युबलेस टायर असणाऱ्यांनी अगदीच गरज नसेल तर अनोळखी ठिकाणी बिलकुल जाऊ नये. त्यातल्या त्यात अनोळखी पेट्रोल पंप बरा.

साबु's picture

27 Nov 2018 - 12:11 pm | साबु

अनोळखी ठिकाणी हवा चेक करताना तर किती लुबाडतात याचे अगदी ठरलेले प्रमाणबद्ध किस्से आहेत, त्यामुळे ट्युबलेस टायर असणाऱ्यांनी अगदीच गरज नसेल तर अनोळखी ठिकाणी बिलकुल जाऊ नये. त्यातल्या त्यात अनोळखी पेट्रोल पंप बरा.->+१