रेल्वे कोणाची हो ! रेल्वे आमच्या बापाची....

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
5 Jul 2018 - 10:41 am

भारतीय रेल्वेच्या प्रवासातील हा एक प्रसंग. मी एका प्रवासास प्रारंभ केलेला. गाडीत मध्यम स्वरूपाची गर्दी होती. माझा डबा आरक्षित स्लीपर गटातला होता आणि त्यातली काही आसने रिकामी होती. अशातच तीन हिंदी भाषक माझ्या डब्यात आले आणि माझ्या समोरील रिकाम्या आसनांवर बसले. ते बसल्यानंतर थोड्याच वेळात आमच्या आसपासची शांतता भंग पावली. ते तिघे मोठमोठ्या आवाजात असभ्यपणे हिंदीतून बडबडू लागले. त्यांच्या संभाषणातून ते रेल्वेचेच कर्मचारी असल्याचे समजले. तसेच ते ‘रेल्वे आपल्या ‘बा’चीच आहे’ असे त्यांच्या वर्तनातून जाणवून देत होते. आम्ही प्रवासी ते निमूटपणे सहन करत होतो.

थोड्याच वेळात त्यांना एक खेळ खेळण्याची हुक्की आली. त्यासाठी त्यांच्यापैकी दोघे एका बाजूला व तिसरा त्यांच्यासमोर असे बसण्याची गरज होती. मग त्यांच्या म्होरक्याने मला मानेनेच उठण्याची खूण करून दुसऱ्या बाजूस बसण्याचा इशारा केला. मी सहकार्याच्या भावनेतून ते लगेच मान्य केले. ते तिघे खेळायला लागले की निदान शांत तरी बसतील आणि आमचा प्रवास सुखकर होईल, अशी वेडी आशा मला होती. आता त्यांच्या खेळाला सुरवात होणार होती. मग त्यातल्या एकाने अन्य एका प्रवाशाकडून त्याचे बॉलपेन मागून घेतले. आता माझी अपेक्षा होती की कुठूनतरी ते कागद शोधून आणतील. पण छे ! त्यातील एक जण चक्क त्या पेनाने बाजूच्या रिकाम्या आसनावर मोठ्या रेघा ओढू लागला. मला ते असह्य झाले आणि खरे तर एक तिडीक मस्तकात उठली. मी लगेच त्याला हरकत घेतली.

“ अहो, असे करणे बरोबर नाही. ते आसन खराब होईल. त्या पेनाची तिथे उठलेली शाई नंतर तिथे बसणाऱ्याच्या कपड्यांना लागेल,” असे मी ताडकन म्हणालो.

त्यावर तो आसनावर रेघा ओढतानाच मला मग्रुरीने म्हणाला, “ चलता है, कोई फरक नही पडता. और ये शाई कपडेको नही लगती”.
यावर माझ्या अन्य दोघा सहप्रवाशांनी चूप बसणेच पसंत केले.

आता व्यवस्थित रेघा ओढून त्या उर्मटांचा खेळ सुरु झाला. त्यामध्ये त्यांनी रुपयाची तीन नाणी, कागदाचे तीन छोटे बोळे आणि पिस्त्याची तीन टरफले असे चौकटींत मांडले होते. तो खेळ मी पूर्वी कधी पाहिलेला नव्हता. त्यामुळे तो काय आहे हे जाणून घेण्याची खरे तर उत्सुकता होती. प्रवासात अशा प्रकारे ज्ञानार्जन होतच असते. परंतु, त्या तिघांच्या उर्मटपणाचा मला प्रचंड राग आलेला असल्याने मी त्यांच्या खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो.

जरा वेळाने तिकीट तपासनीस आले. त्यांनी आमची तिकीटे तपासली. त्या तिघांकडे त्यांनी पाहताच त्यांनी “ हम अगले स्टेशनपर उतरनेवाले है,” असे थाटात सांगितले. त्यावर तपासनीसानेही त्यांचा ‘स्टाफ पास’ वगैरे पाहण्याची तसदी घेतली नाही आणि तो पुढे निघून गेला. त्यांनी आसनावर ओढलेल्या रेघा त्याला बहुधा दिसल्याच नसाव्यात !

थोड्या वेळाने पुढचे स्थानक येताच ते तिघे उतरून गेले. मग मी माझ्याजवळील वृत्तपत्राचा कागद वापरून त्या आसनावारील रेघा पुसण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अर्थातच यश आले नाही. त्या रेघा आता आसनावर अजरामर झाल्या होत्या ! आता बाजूला बसलेल्या एका बाईंना कंठ फुटला. त्या मला म्हणाल्या, “ अहो, ही तरुण मंडळी गरम डोक्याची असतात; आपण त्यांना काही चांगले सांगायला गेलो तर त्यांना खूप राग येतो”. मी त्यावर फक्त ‘हूं’ म्हणालो आणि गप्प बसून चरफडत राहिलो.

रेल्वेच्या कर्मचार्यांनी बेफिकीरीने रेल्वेचीच, म्हणजे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करण्याचा हा प्रसंग खूप चीड आणणारा होता. एक नागरिक म्हणून मी तो होऊ न देण्याचा असफल प्रयत्न केला होता. यापेक्षा दुसरे माझ्या हातात तरी काय होते? आणि माझ्या आजूबाजूच्या सहप्रवाशांचा निव्वळ बघेपणा... त्यावर काय बोलणार? तोही अपेक्षितच म्हणायचा.
......

आपल्याकडील एकंदर झुंडशाही बघता वरील प्रसंग फार ‘किरकोळ’ वाटू शकेल, याची मला कल्पना आहे. गेल्याच वर्षी आपण नव्याकोऱ्या ‘तेजस’ एक्सप्रेसमध्ये समाजकंटकांनी घातलेला हैदोस आणि गाडीचे केलेले नुकसान पहिले होते.
वरील प्रसंगातून खुद्द सरकारी कर्मचाऱ्यांचीच बेपर्वा वृत्ती आणि मग्रुरी जाणवली. ती आपल्यापुढे मांडली आहे, इतकेच.
**************************************************************
पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ, पुणे.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

रेल्वेच्या डब्यात लिहिलेले असतेच - 'भारतीय रेल आपकी संपत्ती है' - काही प्रवासी ते 'आपकी' ऐवजी 'बापकी' वाचत असावेत त्यामुळे असे वागण्यास बळ मिळत असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2018 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

बेजबाबदारपणा आपल्या समाजात इतका खोलवर रुतला आहे की. "जरा जबाबदारीने वागा" असे म्हणणे लोकांना घोर अपमान केल्यासारखे वाटते... आणि जबाबदारीने वागणे भेकडपणाचे लक्षण आहे असे वाटते ! :(

अनिंद्य's picture

5 Jul 2018 - 3:41 pm | अनिंद्य

+ १

सार्वजनिक सुविधा बेजबाबदारपणे वापरण्याच्या बाबतीत आपल्यात गट-तट नाहीत, अगदी आसेतुहिमालय सारखीच वागणूक.

अपवाद फारच थोडे :-(

पुंबा's picture

5 Jul 2018 - 5:40 pm | पुंबा

सखेद सहमत...

जेम्स वांड's picture

6 Jul 2018 - 10:43 am | जेम्स वांड

दुःखद सहमती.

कुमार१'s picture

5 Jul 2018 - 3:21 pm | कुमार१

आपकी' ऐवजी 'बापकी' वाचत असावेत >>>> अगदी बरोबर!
अनिंद्य व डॉ सुहास, सहमत.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 7:52 pm | सुबोध खरे

एक आगाऊ सल्ला -- त्या तिघांचे फोटो काढायचे. उतरून गेल्यावर सीटवरची नक्षीचे फोटो काढायचे आणि ट्विटरवर रेल्वे मंत्रालयाकडे पाठवायचे. काही होईल कि नाही ते माहित नाही. पण काही तरी केल्याचे समाधान नक्की मिळेल.
मी अशा गोष्टी करतो. रात्री १० नंतर ढोल ताशे वाजत असतील तर मुलुंड पोलीस स्टेशन ला आणि मग १०० नंबर वर फोन करतो. त्याने हि काही झाले नाही तर पोलीस आयुक्तांना ट्विटरवर तक्रार करतो. १०० % वेळेस ढोल ताशे थांबले.
एकदा तर १०० नंबर १७ मिनिटे उपलब्ध नव्हता त्याबद्दल नंतर नंबर उचलला तेंव्हा तेथील पोलीस महिलेला झाडले आणि वर त्याचा १७ मिनिटे उपलब्ध नव्हता स्क्रीन शॉट पोलीस आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना पाठवला. पुढे काय झाले ते माहिती नाही पण आपण खारीचा वाटा उचलल्याचे समाधान झाले हेही नसे थोडके.

सोमनाथ खांदवे's picture

6 Jul 2018 - 10:55 am | सोमनाथ खांदवे

बरोबर आहे . ट्विटर योग्य तक्रार करणे माझा जबरदस्त आवडीचा विषय आहे व ट्विटर वर तक्रार केल्याने 100 % गैरसोयी दूर होतात आणि रेल्वे चे ट्विटर अकाउंट चांगलेच ऍक्टिव्ह आहे . पण महाराष्ट्रातील फक्त पोलीस डिपार्टमेंट ट्विटर वर ऍक्टिव्ह आहे , बाकी च्या मंत्रालयाचे अकाउंट च नाही व फडणवीस साहेब सुद्धा निगरगट्ट पणे ट्विटर वरील तक्रार बेदखल करतात.
मी पूर्वी ची घटना पुन्हा सांगतो . संध्याकाळ ची वेळ मार्केटयार्ड पुणे मधील भारत पेट्रोलियम पंप . टॉयलेट मध्ये लघवी च्या पॉट मध्ये कोणीतरी 2 नं केली होती , मॅनेजर कडे तक्रार केली तर त्याने " तुम्हीच साफ करा " अस म्हणून वर
" कुठे तक्रार करायचे ते करा " ऐकवलं होत .
माझ्या सुदैवाने त्या पंपावर ' स्वच्छ भारत ' असा मोदी साहेबांचा फोटो असलेला मोठा फ्लेक्स होता . प्रत्येक पंपावर ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी पेट्रोलियम कं च्या रीजीनल मॅनेजर चा फोन नं व मेल आयडी असतो , तर मी त्या मेल अड्ड्रेस चा , स्वच्छ भारत फ्लेक्स आणि टॉयलेट चे फोटो काढून त्या मॅनेजर समोर च पेट्रोलियम मंत्री प्रधान व भारत पेट्रोलियम चा ट्विटर अकाउंट वर ' देखीये स्वछ भारत ' असा मेसेज करून पाठवून दिले .
दुसऱ्या दिवशी जे दणादण !! फोन यायला लागले म्हणता . पेट्रोलियम मंत्रालय आणि भारत पेट्रोलियम कं दोन्ही जाम पेटले होते . त्यांनी मला तक्रार माघे घेऊ नका म्हणून सांगितले व पंपा च्या मालकाला 25 हजारांचा दंड करून पुणे जिल्ह्यातील भारत पेट्रोलियम च्या सगळ्या पंपवल्यानां वॉर्निंग मेल आले होते .
नंतर त्या पंप वर गेलो असता त्या मॅनेजर ने असे काही लोटांगण घेतले की मलाच विचित्र वाटत होतं .

कुमार१'s picture

6 Jul 2018 - 11:23 am | कुमार१

अभिनंदन

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2018 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुजाण आणि सजग नागरिकाचे कर्तव्य केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार !

नंतर त्या पंप वर गेलो असता त्या मॅनेजर ने असे काही लोटांगण घेतले की मलाच विचित्र वाटत होतं

अश्या प्रसंगांत अजिबात विचित्र वाटून घेऊ नका. त्या कृतीचा अहंकार नको, पण ती केल्याचे समाधान मात्र नक्की वाटायला हवे ! कोणत्याही देशात प्रत्येक ठिकाणी सरकार पुरे पडत नाही... सरकारनेच सर्व ठिकाणी पोलिसिंग करायचे म्हटले तर आताच्या पाचपट कर भरायला लागेल... तरीही तो पुरा पडेल की नाही हा संशय आहेच ! प्रत्येक स्वच्छ, शिस्तबद्ध आणि सुरक्षित देशात त्या अवस्थेमागे सुजाण आणि सजग नागरिकांचे अमोल सहकार्य असतेच असते. तसे सहकार्य असले म्हणजे, "कोणाच्या तरी माझी चुकीची कृती लक्षात येईल व तिची माहिती योग्य त्या अधिकार्‍यापर्यंत पोहोचेल" ही जाणिवच बहुतेक सर्व प्रतिबंध करून जाते.

कुमार१'s picture

5 Jul 2018 - 9:08 pm | कुमार१

रात्री १० नंतर ढोल ताशे >>>>
हे मीही करतो. आपण एकटे प्रवास करताना मात्र परिस्थिती चमत्कारिक असते

नाखु's picture

5 Jul 2018 - 9:44 pm | नाखु

अनुभव

पावसाळ्यात रस्त्यावर वाहणारे पाणी जाण्यासाठी भूमिगत गटार बांधलेल्या आहेत, त्यांच्या करिता चौका चौकात योग्य ठिकाणी वरती छिद्रे असलेल्या झाकणांची व्यवस्था केली आहे ( अतिरीक्त पाणी रस्त्यावर न राहता थेटपणे या गटारात जावे म्हणून).
आमच्या परिसरात भावी व माजी (दोन्ही अर्थांनी) नगरसेवकांचा भरणा आहे,त्यातील एकाने अनधिकृत टपरी याच झाकणांवर (तीन चार शेजारी आहेत) बांधली आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही तेच पाणी घराच्या पार्किंग मध्ये येऊ लागले म्हणून मनपा पोर्टल वर तक्रार केली.
#####
दोन दिवसांनी
#######
"साहेब मी @@@ आपल्या परिसरात आलो आहे,पाणी तुंबल्याची तक्रार होती म्हणून"
पण मी आत्ता कामावर आहे इति मी
ठीक आहे उद्या १० वाजता घरी थांबा मी येतोय
"नाही ,तुम्ही फक्त कुठं आहात ते कळवा मी घरी फोन करून मुलाला पाठवतो"
मुलगा चौकात जाउन कुठे पाणी तुंबते,आणि तो भाग दाखवून तिथं थांबला.
त्या इसमाने मुलाला "तू जा घरी,मी करतो प्रॉब्लेम साल्व"असं सांगून पिटाळले.
दहा मिनिटांनी मला पुन्हा त्याच माणसाचा फोन.
साहेब तुम्हाला तिथं अतिक्रमण झालं आहे अशी तक्रार द्यायला लागेल,
(समोर कचरा साचलेला असूनही याला काढता येत नव्हता,हे मला मुलानं घरून कळवले होते)
तुम्हाला दिसतोच आहे ना मग घ्या एक्शन मी म्हणालो.

नाही अशी डायरेक्ट एक्शन नाय घेता येत, तुम्ही लेखी तक्रार द्या.
नाव वगैरे विचारयला सुरुवात केली ( फोनवर आजूबाजूला कुणीतरी चढ्या आवाजात,कुणाची कंप्लेंट आहे,नाव ईचारून घे,मी ऐकले)
मग मीच म्हणालो तुम्हाला जर अतिक्रमण दिसत नसेल आणि त्याचाच पाण्याला अडथळा निर्माण होत नाही असं वाटतं तर तसं लिहून द्या मी मुलाला पाठवतो,आणि पंधरा मिनिटांत मीही पोहोचतो.

नाही तुम्ही फक्त तुमचं नाव, पत्ता सांगा.मी तक्रार लिहून घेतो नंतर सही करा

मग मी स्पष्टपणे सांगितले "तूम्ही ज्यानं अतिक्रमण केले आहे त्यांच्याबरोबर आहात आणि त्यांना माझं नांव पत्ता सांगण्यासाठी हा खटाटोप करत आहात,पोर्टलवर तक्रार ओपन राहीली तर मी जबाबदार नाही,घरचे कुणीही येऊन , तुम्हाला लिहून देणार नाही.
त्यानंतर आजतागायत फोन आला नाही,
टपरी सुखनैव चालू आहे.

दुसर्या नगरसेवकांना कळविले आहे

पुन्हा एकदा पाणी तुंबण्याची वाट पाहत आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2018 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन नाखुजी.

यावेळेस जरी काही कारवाई झाली नसली तरी, पुन्हा असे काही करण्याअगोदर तो गुंड नेता नक्कीच परत परत विचार करेल. असे जर अनेक नागरिकांकडून वारंवार झाले तर, काही नाही तरी मते घटण्याच्या भितीने, अश्या नेत्यांना पायबंद बसायला सुरुवात होईल. रानात वणवा लागण्याचि सुरुवात छोट्याश्या ठिणगीनेच होते !

जयन्त बा शिम्पि's picture

6 Jul 2018 - 6:17 am | जयन्त बा शिम्पि

आपल्या जीवाची पर्वा असेल तर एकच मंत्र " जाने भी दो यारो " . अशा प्रवासात आपण जर एकटे असलो तर हाच मंत्र जपायचा. इतर प्रवाशांची साथ असेल तरच दो दो हाथ करण्यासाठी पुढे व्हावे. एकट्या दुकट्याला गाडी धावत असतांना, दंडेली करुन गाडीबाहेर फेकण्याचे प्रसंग वाचलेच असतील ना ?

कुमार१'s picture

6 Jul 2018 - 7:36 am | कुमार१

नाखु, तुमच्या मनस्तापात सहभागी आहे ! ते काम कधीतरी होवो.

जयंत, बिलकूल सहमत. म्हणून तर फक्त ‘सांगून बघितले’. ती आपली मर्यादा.

मला तरी वरील प्रसंगा मधे लेखक मजकुरांचा दोष दिसतो आहे. त्यांनी रेल्वे प्रवासाचे तिकीट काढले होते. पण एकंदर लिहीण्याचा रोख असा आहे की तिकीटा बरोबरच अख्ख्या रेल्वे गाडीची मालकी त्यांना मिळाली. त्या तीन गरीब बिचार्‍या इसमांनी विरंगुळा म्हणुन थोडासा खेळ आरंभला तर लागले यांचे पोट दुखायला. दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानायला आपण कधि शिकणार कोण जाणे? सगळेच जण काही प्रवासादरम्यान मेणाचे पुतळे होउन बसू शकत नाहीत. मला तरी ते लोक सभ्य असावे असे वाटले कारण त्यांनी ती रेशांची नक्षी रेल्वेच्या सीटवरच काढली जर ते गुंड प्रवृत्तीचे लोक असते तर त्यांनी इतर प्रवाश्यांचे सामान ओढून त्यावर काढली. असती. हा प्रसंग शेजारी बसलेली बाई तिकीट तपासनिस यांनी देखिल तो प्रकार पाहिला. पण ते सुध्दा काहीही बोलले नाही. याचाच अर्थ ते तीन इसम जे काही करत होते त्यात काही गैर नव्हते.

या वर खरे सरांचा सल्ला म्हणजे तर कहरच आहे. म्हणे त्यांचे फोटोकाढून रेल्वेच्या ट्विटर वर टाकायचे. अरे? त्या सरळ, साध्या, सभ्य लोकांचे असे धिंडवडे काढायचा अधिकार आपल्याला कोणी दिला? व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या मुलभूत तत्वांच्या हे अगदी विरुध्द आहे.

ढोल ताशे वाजवण्यावरुनही तेच. ते लोक तुमच्या घरात येउन ढोल ताशे वाजवतात का? नाही ना? मग? आणि समजा वर्षातून एखाद दुसरा दिवस धार्मिक कार्याचा भाग म्हणून जर ढोलताशे वाजवले तर काय बिघडलं? काही माणुसकी वगेरे आहे की नाही? आणि ते लोक देवाचच काम करतात ना ते? उलट आपणही अशा धर्मकार्यात सहभागी व्हावे व थोडे पुण्य कमवून घ्यावे. उगाच पोलीसात तक्रार वगेरे कशाला द्यायची? खरे सर लक्षात ठेवा देव वरुन सगळे पहात असतो. (तो सुध्दा निमूट पणे.)

तोच प्रकार नाखु काकांचा... एखाद्या गरीबाच्या पोटावर कशाला पाय द्यायचा? प्रत्येकालाच काही दुकाने विकत घेउन व्यवसाय थाटता येत नाही. दुकाने काय फक्त श्रीमंतांनीच काढायची का? पुण्यात जागांचे भाव काय झाले आहेत? गरीबाला कसे परवडणार? मग गरीबाने पोटापाण्यासाठी श्रीमंतांची गुलामगिरी करायची का? गुलामगिरीच्या प्रथेचा पुरस्कार करणे नाखुकाका तुमच्या कडून तरी अपेक्षीत नव्हते. आणि पुण्यात पाउस काय रोज पडतो का? एखादा दिवस पाणी तुंबले तर सार्‍या यंत्रणेलाच वेठीला धरायचे? सरकारी कर्मचार्‍यांना इतरही महत्वाची कामे असतात. समाजात रहायचे तर जराशी सहनशक्ती नको का वढवायला?

मला तर वरील चर्चा आणि प्रतिसाद पटले नाहीत. स्वभावतःच मी न्यायप्रिय असल्याने मला वरील चर्चा खटकू लागली म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.

पैजारबुवा,

गामा पैलवान's picture

6 Jul 2018 - 12:05 pm | गामा पैलवान

ज्ञापै,

तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. हेच बघा ना बिचाऱ्या संजूबाबाला कसं पिडतात लोकं. कुठलेसे हातगोळे घरी ठेवले म्हणून चक्क पाच वर्षांचा तुरुंगवास? ३/१३ रोजी २५७ निरपराध माणसं मेली ती काय संजूबाबाच्या घरचे हातगोळे फुटल्याने थोडीच? संजूबाबाने एके ५६ चालवली तरी का कुणावरही? कोणतरी काहीतरी करतो आणि आळ मात्र संजूबाबावर. जमाना बहुत नाइन्साफी है.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2018 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो ना !

कोण्या एका काळविटाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आणि लोकांनी निष्कारण त्याची हत्त्या बनवून, पुरेसे कपडे घालणेही शक्य नसलेल्या एका गरीब सज्जन कलाकाराला, त्या प्रकरणात गुंतवले आहे. या जगात सज्जन लोकांना जगणे मुश्किल झाले आहे, हेच खरे !

राजस्थानातल्या पॅलेस ओन वील्स गाडीत काही फुकटे प्रवासी असतात ते वरून ओळख काढून घुसतात. मंत्र्यांचेच लोक असतात.

यावरुन मला खालील दोन प्रसंग आठवले.
१- मी कामानिमित्त मुंबै लोकल ने प्रवास करत होतो. माझ्याबरोबर माझा उत्तरभारतिय मित्र होता. आम्ही ठाणे ते अंधेरी तिकिट काढले. अंधेरीला उतरल्यावर माझ्या उत्तरभारतिय मित्राचे उद्गार होते, ''अरे यार तिकट निकाल के घाटा हुआ, टीसी तो आया ही नही!''

दुसरा प्रसंग लीहीतो थोड्या वेळाने

सुबोध खरे's picture

6 Jul 2018 - 6:27 pm | सुबोध खरे

त्याला एकच विचारायचे.
दो ढाई घंटे कि मन कि शांती कि किंमत क्या करोगे?
क्योंकी कोई भी काला कोट पहनने वाला आदमी अंदर आने पे दिल कि धडकन जो बढ जाती है उसका खामीयाजा बुढापे मे ही समझ मे आता है.
यावर बरेच लोक गप्प होतात

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2018 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

"जागतिक स्तराच्या वाहतूक व्यवस्थेची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणार, तशी व्यवस्था आपल्या इथे नाही म्हणून (स्वतः सोडून इतरांना) दोष देणार आणि वर तिकिट काढणे टाळता आले तर बेमुर्वतपणे तेही करणार" अश्या सर्व गोष्टींबद्दल त्याचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे पाठवायला हवे असे तुमच्या मित्राला सांगा.

अर्थात, असे करणारे बरेच भारतिय त्याच्याबरोबर प्रतिस्पर्धेत आहेत, दुर्दैवाने ! :(

गेल्या कित्येक वर्षांपासून ( ? २५ वर्षे? ) अवघा २५० रु आहे.
आता तो १००० करावा असा प्रस्ताव प. रेल्वे ने मांडला आहे.

तो जरूर वाढवला पाहिजे .

सतिश पाटील's picture

6 Jul 2018 - 5:49 pm | सतिश पाटील

कॉलेजला असताना दुपारी एकदा वडाळा ते पनवेल लोकल मध्ये एक 6 फूट दणकट व्यक्ती बूट घालून समोरच्या सीटवर पाय ठेऊन बसली होती ट्रेन 80 % रिकामी.
त्याला म्हटले ऐ पाय खाली ठेव, तर तो माजलेल्या हरयाणवी भाषेत 'रेल्वे पोलीस है हम, तकलीफ है तो दुसरी जगह जाके बैठो, मग मी पण मुंबई स्टाईल दादागिरी सुरू केली, पैर नीचे रखना होगा, पोलीस हो तो पोलीस जैसे रहो, एकही दुसरा व्यक्ती मध्ये पडला नाही, 5 मिनिट वादानंतर तो पाय खाली ठेऊन शांत बसला होता, त्याला विचारले कुठे उतरणार ? तो म्हटला वाशी. मी एक मंद स्मित केले, म्हटलं अच्छा हुआ, नाम क्या है? तर तो सांगेना.

मग त्याने झोपेचे सोंग घेतले. बाजूचा एक भैय्या म्हटला जाणे दो पुलीस वाला हैं, मी मोठ्याने म्हटले अच्छा हुआ उसने ये बता दिया को वो पुलीस वाला है, और मै भी वाशी उतरुनगा, उसने अपनी पहचान बतायी लेकीन मैणे अभी अपनी पहचान नही बतायी एवढं बोलून मी त्याचा फोटो घेतला मोबाईल मध्ये घेतला. थोड्या वेळाने उठून माझ्याशी मैत्रीपूर्ण संवाद सुरू केला, आप क्या करते हो ? पिताजी क्या करते है, म्हटलं सब पता चलेगा वाशी आणे दो.
मानखुर्द क्रॉस झाल्यावर एक कॉल लावून बाजूला जाऊन बोलून पुन्हा जागेवर येऊन बसलो आणि पुन्हा त्याच्याकडे बघून एक मंद स्मित केले, वाशी आल्यावर त्याच्या मागेच उतरायला उभा राहिलो त्याला म्हटले, उतरणे के बाद मेरे साथ चलना जरा काम है. चालत्या ट्रेन मधून उतरून 80 च्या स्पीड ने फरार झाला.

बरेच किस्से आहेत. वेळ मिळेल तसं सांगेन

हा खतरनाक होता. मानलं तुम्हाला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jul 2018 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार

जबरदस्त, हा प्रयोग प्रचंड आवडल्या गेला आहे.
तो परत कधी असा वागणार नाही याचा चांगला बंदोबस्त केलात.
यांची मिजास अशीच उतरवली पाहिजे.
पैजारबुवा,

नाखु's picture

7 Jul 2018 - 11:27 am | नाखु

काम केलं, भारीच आहे.

नाखु

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2018 - 4:48 pm | टवाळ कार्टा

कधी कधी बुमरँग होउ शकते

कुमार१'s picture

6 Jul 2018 - 6:14 pm | कुमार१

वाचनीय आहेत. जरूर लिहा. वाचतोय

कुमार१'s picture

8 Jul 2018 - 9:53 am | कुमार१

चर्चेत सहभागी सर्वांचे आभार. समाजातील बेशिस्त, दिरंगाई, फसवणूक इ. बाबत बरेच मिपाकर जागरूक नागरिकाचे कर्तव्य बजावत आहेत हे चर्चेतून कळाले. त्या सर्वांचे पुन्हा अभिनंदन !

आता समारोपादाखल थोडे मनोगत.

हा लेख काही वर्षांपूर्वी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाला होता आणि त्यावर ‘इ-सकाळ’ मध्ये बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील दोन अगदी लक्षात राहण्याजोग्या होत्या त्या अशा:

१. अहो, हे जे काही प्रकार होतं ना, त्यात काही आश्चर्य नाही. कारण आपण भारत नावाच्या जंगलात राहतो.
२. भारताला आता हिटलरसारख्या हुकुमाशहाचीच गरज आहे.

आपल्या वरील चर्चेत सुद्धा काही प्रतिसाद हे गमतीशीर उपरोधाने लिहिलेले आहेत. वरवर पाहता असे वाटेल की अशा प्रतिसादांतून आपण हा विषय हसण्यावारी नेऊ पाहतो किंवा “आहे हे असेच चालायचे” असा अंतिम सूर काढतो. पण थोडा खोलवर विचार केल्यास असे जाणवेल की ते ‘तसे’ नाहीये.

आपल्यासारख्या सुजाण नागरिकांना हे सर्व मनापासून खटकत असते. कारण आपल्या दैनंदिन व्यवहारांत आपण बऱ्यापैकी शिस्तपालन करतो. आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा अनेक गचाळ वागणुकीचे प्रकार दिसतात, तेव्हा आपला सात्विक संताप होतो. मग काही जण शांततामय मार्गाने असे प्रकार हाताळतात आणि ‘वर’पर्यंत नेतात, तर अन्य काही हताशपणे त्याकडे दुर्लक्ष करतात. कायदा तर आपण हातात घेऊ शकत नाही आणि काही समाजकंटक कायद्याला भीक घालत नाहीत हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहावे लागते.

मग आपल्या हातात राहते ते फक्त चरफडणे आणि निषेध करणे. एक प्रकारची हतबलता आपल्याला ग्रासते आणि त्यातून वरील प्रकारचे टोकाचे प्रतिसाद उमटतात.
असो. जेवढा जमेल तितका जागरूकतेचा वाटा आपण उचलत राहू.

वन's picture

16 Nov 2018 - 4:05 pm | वन

एसी डब्यांतून 14 कोटी रु चे सामान चोरीस...

https://m.maharashtratimes.com/india-news/lakhs-of-towels-bedsheets-miss...

खरे आहे, रेल्वे आपल्या बापाचीच !

सुबोध खरे's picture

16 Nov 2018 - 7:22 pm | सुबोध खरे

वातानुकूलित डब्यात प्रवास करणारे लोक गरीब किंवा गरजू नक्कीच नाहीत

म्हणजेच हे लोक "चोर" आहेत.

माणसाची खरी पारख ती कोणी बघत नसताना कसे वागतो त्यावर होते हे १००% सत्य आहे.

कुमार१'s picture

16 Nov 2018 - 7:40 pm | कुमार१

आहेत हे आपण सारेच जाणतो !

चांगली चर्चा चालू आहे. मला आवडलेले भारतीय रेल्वेचे काही व्हिडियो आणि एक दुसरा लाइव्ह व्हिडियो देउन जातो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akh Lad Jaave... :- Loveyatri

कुमार१'s picture

16 Nov 2018 - 9:38 pm | कुमार१

लै भारी हैत तुमचे व्हिडीओ. निवांत बघणार .