जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत. ती सर्व पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. साधारणपणे ती विशिष्ट आहारस्त्रोतांमध्ये एकत्रित आढळतात. त्यापैकी ६ पेशींतील ऊर्जानिर्मितीमध्ये योगदान देतात तर उरलेली २ DNAच्या उत्पादनात मदत करतात. ब-१ हे पहिल्या गटात मोडते. त्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख.
ब-१ चे अधिकृत नाव Thiamin असून त्यामध्ये गंधक हे मूलद्रव्य असते.
आहारातील स्त्रोत:
अख्खी (unrefined) धान्ये, मासे, मांस, अंडे, आणि सोयाबीन यांत ते विपुल प्रमाणात असते. जर गहू व तांदूळ ही नित्याची धान्ये ‘अख्ख्या’ स्वरुपात खाल्ली तर निसर्गाने दिलेला हा स्त्रोत सर्वांना सहज उपलब्ध आहे. पण, आधुनिक खाद्यशैलीत आपण ही धान्ये ‘शुद्ध’ आणि दिसायला चकचकीत करू लागलो तेव्हाच आपण हा निसर्गदत्त स्त्रोत गमावू लागलो. म्हणून आता ब-१ च्या इतर स्त्रोतांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यीस्ट हाही त्याचा एक उत्तम स्त्रोत आहे, जो ब्रेड तयार करताना वापरला जातो.
आहारातील काही पदार्थांमध्ये ‘ब-१ विरोधी’ रसायने असतात. चहा, कॉफी व विड्याचे पान हे ते पदार्थ. तसेच प्रक्रियाकृत खाद्यांमध्ये sulfite खूप प्रमाणात असते व तेही ब-१चा नाश करते. त्यामुळे या पदार्थांचे अतिसेवन टाळणे इष्ट.
शरीरातील कार्य:
पेशींतील जवळपास सर्व रासायनिक क्रिया या एन्झाइम्सच्या मदतीने होतात. या एन्झाइम्सना मदतनीस म्हणून जी द्रव्ये काम करतात त्यांना सह-एन्झाइम्स म्हणतात. सर्व ‘ब’ जीवनसत्वे सह-एन्झाइम्सचे काम करतात. ऊर्जानिर्मितीतील अत्यंत महत्वाच्या रासायनिक क्रियांमध्ये ‘ब-१’ चे योगदान मोलाचे आहे. जेव्हा काही कारणाने शरीरातील चयापचयाची गती खूप वाढते तेव्हा अधिक ऊर्जानिर्मितीसाठी ‘ब-१’चा पुरवठा वाढवावा लागतो. याव्यतिरिक्त ‘ब-१’ हे मज्जातंतूमध्येही असते आणि त्यांच्या संदेशवहनाच्या कामात मदत करते.
अभावाची कारणे :
१. कुपोषण व उपासमार
२. दीर्घकालीन अतिरिक्त मद्यपान : हा मुद्दा गरिबीने ग्रासलेल्या आणि मद्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना लागू होतो. त्यांची कमाई आधीच तुटपुंजी असते आणि त्यात व्यसनाधीनता. त्यामुळे कमाईतील बराचसा भाग दारूवर खर्च होतो. मग पोषक आहारासाठी पैसेच उरत नाहीत. त्यातून ‘ब-१’सह अनेक पोषकद्रव्यांचा अभाव होतो.
३. चयापचय गतिमान असणाऱ्या अवस्था: गरोदरपण व स्तनपान कालावधी, मोठा ताप आलेला असता आणि थायरोइड-अधिक्याची अवस्था. या सर्व अवस्थांत ‘ब-१’ चा आहारपुरवठा वाढवावा लागतो.
४. दीर्घकालीन जुलाब वा उलट्या होणे आणि काही मूत्रप्रवाह वाढवणाऱ्या औषधांचा दुष्परिणाम झाल्यास.
अभावाचे परिणाम:
या आजाराला ‘बेरीबेरी’ असे नाव आहे. हा मजेदार शब्द सिंहलीज भाषेतील असून त्याचा शब्दशः अर्थ “मी काहीच करू शकत नाही”, असा आहे. त्यात रुग्णाची अशी अवस्था होते कारण त्याला प्रचंड अशक्तपणा जाणवतो. ‘ब-१’च्या अभावाने पेशींतील ऊर्जानिर्मितीस खीळ बसते हे त्याचे मूलभूत कारण. त्याचा परिणाम शरीरातील सर्वच पेशींवर होतो. त्यातही मज्जासंस्था आणि हृदयावरील परिणाम गंभीर असतात. त्यानुसार या आजाराचे दोन मुख्य प्रकार आहेत:
कोरडी बेरीबेरी
ओली बेरीबेरी
कोरडी: यात प्रामुख्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यात अनेक मज्जातंतूंचा (विशेषतः पायाच्या) दाह होतो. परिणामी स्नायूदुखी होते. त्यात जर असा रुग्ण दारुडा असेल तर त्याच्यात मानसिक आजाराचीही लक्षणे दिसतात आणि त्याला विस्मरण होते.
ओली: यात प्रामुख्याने हृद्य व रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. हृदयाचे कार्य मंदावल्याने ते क्षीण होत जाते. तसेच हृदयस्नायुस इजा होते. परिणामी पायांवर सूज(edema) येते.
बेरीबेरीचा अजून एक गंभीर प्रकार बालकांत दिसू शकतो. २-४ महिन्यांची बालके ही फक्त मातेच्या दुधावरच अवलंबून असतात. जर स्तनपान देणाऱ्या आईमध्येच ब-१ ची कमतरता असेल तर तिच्या बाळास हा त्रास होतो. या बाळास पोटफुगी, उलट्या आणि कधीकधी फिट्स चा त्रास होऊ शकतो.
उपचार :
‘ब-१’ चे उपचार चालू केल्यावर रुग्णास लवकर आराम पडतो. सौम्य ते मध्यम आजारात गोळ्या देतात तर गंभीर स्थितीत इंजेक्शनद्वारा ते द्यावे लागते.
*******************
प्रतिक्रिया
19 Jul 2018 - 12:43 pm | कुमार१
मा सा सं
सादर विनंती
20 Jul 2018 - 2:58 am | ट्रेड मार्क
बी१ ची कमतरता असण्याची लक्षणं काय आहेत? सध्या सगळीच अन्नधान्य आणि भाजीपाला रासायनिक खाते वापरून पिकवला जात असल्याने त्यात असलेल्या व्हिटॅमिन्स वर काय परिणाम होत असेल? तुम्ही म्हणालात तसं अख्ख्या स्वरूपात पण धान्य मिळत नाही. तसेच भारतीय पद्धतीने अन्न शिजवताना आपण बरेच जास्त तापमान वापरतो, त्याचा यावर काय परिणाम होत असेल?
मासे वगैरे रोज खाणे शक्य नाही आणि त्यातही पाण्यातल्या अशुद्धीमुळे आणि रसायनांमुळे माश्यांवरही परिणाम होतोच. त्यातल्यात्यात अंडं खाणं हा जरा सोपा उपाय वाटतोय. तर पुरेसा बी व्हिटॅमिन्स चा (किंवा बी१ चा म्हणा) डोस मिळण्यासाठी किती रोज अंडी खावी लागतील? किंवा त्यातल्या त्यात बरे कॉम्बिनेशन काय असावे?
20 Jul 2018 - 9:16 am | कुमार१
ट्रे मा, चांगला प्रश्न.
फक्त ब१ मिळवण्यासाठी कोणताही एकच पदार्थ (अंडे) अति खाऊ नये. मी असे सुचवेन:
रोज 1 अंडे,
आठवड्यातून 3 वेळा विविध बीन्सची उसळ,
मोड आलेले कच्चे खाणे .
यीस्ट हा तर दमदार स्रोत आहे. तो घरच्या स्वयंपाकात वापरता येईल का हे मलाही जाणून घ्यायचे आहे.
24 Jul 2018 - 6:37 am | सुधीर कांदळकर
केलेले पदार्थ उदा. इडलीडोसे, आंबोळ्या, ढोकळा इ. पदार्थातील ब व्हिटॅमिने वाढतात काहो?
गव्हाचे सत्त्व तर अख्खे गहू आंबवून बनवले जाते, ते स्वादिष्ट देखील असते.
नाचणीचे सत्त्व कोकणात फार पौष्टिक म्हणून मानले जाते.
या सर्व पदार्थात आंबवल्यामुळे ब जीवनसत्त्वे वाढतात का?
यीस्ट मॉलमध्ये पॅकिंग केलेले मिळते. फक्त एक्सपायरी बघून घ्यावे. वरील पदार्थ नैसर्गिक रीत्या रात्रभर आंबवले जातात. हेच पदार्थ आपण यीस्ट वापरून केवळ तासादोनतासात आंबवू शकतो. फक्त एकदोन फसलीले प्रयोग करावे लागतील. परंतु शुद्ध स्टेन वापरल्यामुळे चव चांगली असेल.
दुपारी वामकुक्षीपूर्वी मी टीव्हीवरचे पाकविषयक कार्यक्रम पाहतो. त्यात तंदुरी रोटी यीस्ट वापरून तव्यावर भाजून बनवलेली दाखवली होती. फक्त पाकिटावरच्या सूचना वाचून वापरावे लागते. अर्धी वाटी साखरयुक्त कोमट पाण्यात वीस मिनिटे ठेवून वगैरे. आठवड्यातून एकदोन वेळा पोळी/चपाती ऐवजी आपण तंदुरी रोटी करू शकतो. यात फक्त मळलेली कणीक काही वेळ ओल्या फडक्याखाली ठेवावी लागते.
जीवनसत्त्वयुक्त अशा या अनोख्या पण चविष्ट मेजवानीत आणखी एक चविष्ट पदार्थ सादर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील भागांची वाट पाहतो आहे.
25 Jul 2018 - 3:32 pm | मराठी कथालेखक
मी यीस्ट वापरुन अनेकदा 'आप्पम' बनवले आहेत त्यामुळे मी याबद्दल सांगू शकतो.
अर्धा वाटी कोमट पाण्यात चमचाभर यीस्ट घालून दहा मिनटे थांबतो. नंतर हे पाणी आप्पमच्या वाटलेल्या मिश्रणात घालून ते ढवळतो आणि मिश्नणाचे पातेले झाकण लावून ठेवतो. रात्रभर असे ठेवल्यानंतर सकाळी या मिश्नणात भरपूर फेस तयार झालेला असतो. या फेसामुळे आधी जे पातेले ७०~७५% भरलेले होते तेच आता जवळपास १००% भरलेले असते. या फेसामुळे आप्पम लुसलुशीत आणि जाळीदार होतात. पण तरीही ते खूप आंबट नसतात. यानंतर दुपारपर्यंत जर हे मिश्रण राहिले तर ते बर्यापैकी आंबट होते.
यीस्टमुळे आंबटपणा फारसा येत नाही तर मिश्रण फेसाळते व ते एक दोन तासात होत नाही.
25 Jul 2018 - 4:19 pm | कुमार१
आता तुमचे अप्पम खायला आले पाहिजे ! ☺️
25 Jul 2018 - 7:14 pm | मराठी कथालेखक
नक्कीच... आपले स्वागत आहे !!
24 Jul 2018 - 7:15 am | कुमार१
प्रतिसादाबद्दल आभार ! जेव्हा यीस्ट निर्मिती होईल तिथेच जीवनसत्वे तयार होतील हे मा वै म .
25 Jul 2018 - 10:19 pm | नाखु
यीस्ट लावलं आहे
नित वाचक नाखु मिपाकर
26 Jul 2018 - 8:04 am | कुमार१
आणि सर्वांचे आभार. या पुढील जीवनसत्व (इ) इथे आहे:
https://www.misalpav.com/node/43068