वैद्यकाच्या इतिहासात जीवनसत्वांचे शोध क्रमाने लागत असताना १९२२मध्ये ‘इ’चा क्रमांक लागला. सुरवातीस ते निरोगी प्रजोत्पादनास आवश्यक असावे असा तर्क होता. नंतर ‘इ’ हे एकच रसायन नसून ८ रसायनांचे एकत्र कुटुंब आहे असे लक्षात आले. तरीसुद्धा त्याचे शरीरातील नक्की कार्य समजत नव्हते.
त्यावेळेपर्यंत अ, ब, क आणि ड या जीवनसत्वांचे कार्य व्यवस्थित समजले होते आणि त्यांच्या अभावाने होणारे विशिष्ट आजारही प्रस्थापित झाले होते. ‘इ’च्या अभावाचा विशिष्ट आजार मात्र संशोधकांना जंग जंग पछाडूनही सापडत नव्हता. त्याच्या शोधानंतर कित्येक वर्षे असे म्हटले जाई की ‘इ’ हे “आजाराच्या शोधात असलेले” जीवनसत्व आहे !
अलीकडील संशोधनातून संबंधित आजारांवर काही प्रकाश पडला आहे. तसेच ‘इ’ व त्वचेचे आरोग्य यावर वैद्यकात बराच उहापोह होत असतो. त्वचेचे ‘सौंदर्य’ वाढवणाऱ्या अनेक प्रसाधनांत ‘इ’ घातलेले असते. त्यांच्या जाहिरातींत ही बाब ठळकपणे दाखवून दिली जाते. पण त्याच्या त्यातील उपयुक्ततेबाबत उलटसुलट मते आहेत. त्यादृष्टीने ‘इ’चा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी हा लेख.
आहारस्त्रोत:
अख्खी धान्ये, स्वयंपाकाची नेहमीची तेले आणि पालेभाज्यांतून आपल्याला ‘इ’ व्यवस्थित मिळते.
शरीरातील कार्य:
त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे पेशींत antioxidant म्हणून कार्यरत असणे (antioxidant म्हणजे काय याचे विवेचन यापूर्वीच्या ‘क’ व’अ’ च्या लेखांत आले आहे). याचा एक दूरगामी परिणाम कोलेस्टेरॉलच्या संदर्भात होतो. रक्तातील बरेचसे कोलेस्टेरॉल हे LDL या रेणूमध्ये असते. पेशीतल्या ऑक्सिजनच्या माऱ्यामुळे LDLमध्ये काही अनिष्ट बदल होत असतात. जर का ते रोखले गेले नाहीत तर त्यातूनच पुढे कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यात साठू लागण्याची प्रक्रिया वाढते. त्याची परिणती प्रथम धमनीकाठीण्य व पुढे करोनरी हृदयविकारात होते. ‘इ’ हे सर्व अनिष्ट बदल रोखते. त्यामुळे ते या आजाराला प्रतिबंध करते, असे गृहीतक आहे. अर्थात याबाबत तज्ञांमध्ये मतांतरे आहेत.
प्रतिकारशक्तीचे संवर्धन:
या संदर्भात रक्तातील lymphocytes प्रकारच्या पांढऱ्या पेशी महत्वाची भूमिका बजावतात. त्यांची वाढ आणि कार्यामध्ये ‘इ’चे योगदान आहे. तसेच प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या काही रासायनिक घटकांचा ते नायनाट करते.
रक्तातील बिम्बिकापेशींच्या संदर्भातही त्याचे काम आहे. जर बिम्बिका अतिरिक्त प्रमाणात विनाकारण एकत्र जमू लागल्या तर त्यातून रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. ‘इ’ च्या प्रभावाने ही प्रक्रिया काही प्रमाणात मंदावते.
अभावाचे परिणाम:
‘इ’ नेहमीच्या खाद्यांमध्ये मुबलक असल्याने सहसा त्याचा अभाव दिसत नाही. पचनसंस्थेच्या काही आजारांत आहारातील मेदांचे शोषण होत नाही आणि त्यामुळे ‘इ’ सुद्धा शोषले जात नाही. अशा रुग्णांत अभाव जेव्हा तीव्र होतो तेव्हाच लक्षणे दिसतात.
१. अभावाचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यातून शरीराच्या हालचालींवरचे नियंत्रण सुटते. डोळ्यांच्या हालचालीवर मर्यादा येऊ शकतात तसेच स्नायूदुखी होते.
२. मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमध्ये ‘इ’ चा साठा कमी असतो. त्यामुळे त्यांच्या लालपेशींवर परिणाम होऊन त्या दुबळ्या होतात. त्यातून रक्तन्यूनता होते
“इ’ आणि त्वचेचे आरोग्य: समज व गैरसमज
मुळात ‘इ’ शरीराच्या सर्व पेशींत antioxidant चे काम करते. हे कार्य त्वचेलाही लागू आहे. त्वचेवर थेट सूर्यप्रकाश पडतो आणि त्यात नीलातीत किरण असतात. जर हे किरण अतिरिक्त प्रमाणात त्वचेवर पडत राहिले तर त्यातून इजा होऊ शकते. जर त्वचेत पुरेसे ‘इ’ असेल तर या इजेला प्रतिबंध होतो.
आहारातले ‘इ’ शोषण होऊन त्वचेत पुरेसे पोचायला काही मर्यादा पडू शकतात. यातूनच त्वचेला बाहेरून ‘इ’ चोपडण्याची कल्पना पुढे आली.
मग ‘इ’ युक्त अनेक प्रसाधनांचा बाजारात सुळसुळाट झाला. पुढे “आमचे लोशन त्वचेला नियमित लावा आणि त्वचेचे सौंदर्य खुलवा,” अशा जाहिरातींचा भडीमार सुरु झाला. यामुळे सामान्यजनांत संभ्रम होतो.
तेव्हा यातले तथ्य समजून घेऊ. मुळात याबाबतचे संशोधन अद्याप अपुरे आहे. आता तरी कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही. काही चर्चेचे मुद्दे असे आहेत:
त्वचेतील ‘इ’ चे प्रमाण वाढत्या वयानुसार कमी होते.
‘इ’ त्वचेवर चोपडलयास तिथले त्याचे प्रमाण वाढते.
त्वचेवर पडणारे नीलातीत किरण तिथल्या ‘इ’ चाही नाश करतात. त्यामुळे लोशनमधले ‘इ’ हे पुरेसे आणि पक्क्या (stable) स्वरूपाचे असले पाहिजे.
जर ‘इ’ लावलेल्या त्वचेवर ते किरण जास्त प्रमाणात पडले तर तिथे त्रासदायक रासायनिक क्रियाही (reaction) होऊ शकते. त्यातून फायद्याऐवजी तोटाच व्हायची शक्यता जास्त.
सारांश : अद्याप हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. लोशन वगैरेत घातलेल्या ‘इ’चे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
26 Jul 2018 - 8:35 am | कुमार१
.मा सा. सं,
माझा आजचा 'इ' जीवनसत्वाचा लेख यापूर्वीच्या जीवनसत्वांच्या लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती.
आभार !
26 Jul 2018 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर मालिकेतील अजून एक उपयोगी माहितीचा लेख.
इ जीवनसत्वाचा उपयोग सद्या तरी इतरांपेक्षा जास्त ते विकणार्या कंपन्यांनाच होत आहे !
26 Jul 2018 - 2:46 pm | कुमार१
डॉ सुहास, सहमत आहे.
26 Jul 2018 - 3:49 pm | खिलजि
डॉक्टर साहेब , आपण पुढे जाऊन कोलेस्टरॉलबद्दल लिहाल का ? नाही म्हणजे त्याचे पण काही प्रकार असतात , कोणते धोकादायक ठरू शकतात आणि कोणते नाही , याबद्दल जरा माहिती पाहिजे होती . आपण जर आधी लिहिले असेल तर तसे सांगा , मी आपली वाचनखूण शोधून काढीन . बाकी आपली समाजसेवा मला फार आवडते आणि माझ्या शुभेच्छा सदैव आपल्यासोबत असतील . छान माहितीपूर्ण लेख .
26 Jul 2018 - 3:58 pm | कुमार१
खिलजी, आभार. कोलेस्टेरॉल चा समग्र वृत्तांत इथे आहे:
https://www.misalpav.com/node/41421
26 Jul 2018 - 4:05 pm | खिलजि
धन्यवाद साहेब. साठवून ठेवतो .
26 Jul 2018 - 5:03 pm | सोमनाथ खांदवे
सगळेच लेख महत्वपूर्ण माहितीचे आहेत , खूप छान काम करताय .
27 Jul 2018 - 5:29 pm | अनिंद्य
‘इ’ हे “आजाराच्या शोधात असलेले” जीवनसत्व आहे !
:-)
छान माहिती देत आहात.
एक प्रश्न :- 'बिम्बिकापेशी' म्हणजे काय ? विंग्रजीत सांगाल का ?
27 Jul 2018 - 5:44 pm | कुमार१
बिम्बिकापेशी' म्हणजे काय ?>>>> Platelets .
रक्तात 3 प्रकरच्या पेशी असतात: लाल, पांढऱ्या व बिंबिका. या तिसऱ्या पेशी जखमेनंतर रक्त गोठण्यास मदत करतात.
प्रोत्साहनाबद्दल आभार!
27 Jul 2018 - 7:20 pm | सुधीर कांदळकर
हाही लेख उत्कृष्टच. उपलब्ध माहितीच्या मर्यादा स्पष्ट उघड करणे हा आधुनिक विज्ञानाचा मोठा गुण इथे अधोरेखित झाला आहे. जाहिरातीत तसेच पारंपारिक विज्ञानात उगीचच औषधाच्या गुणधर्माचे उदात्तीकरण केले जाते. तसे आपल्या कोणत्याही लेखात झालेले नाही. धन्यवाद.
आवडले.
27 Jul 2018 - 7:54 pm | कुमार१
सोमनाथ व सुधीर,
मनमोकळ्या अभिप्रायाबद्दल व सातत्यपूर्ण प्र बद्दल आभार!
सुधीर, सध्या कोकण अगदी निसर्गरम्य असणार आहे. तेव्हा एखाद्या लेखाद्वारे आम्हाला तिथली सचित्र सफर घडवाच ☺️
2 Aug 2018 - 10:00 am | कुमार१
या लेखमालेतील पुढचे जीवनसत्व (अ) इथे आहे:
https://www.misalpav.com/node/43108