‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
28 Jun 2018 - 10:02 am

सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला. तो आधुनिक वैद्यकातील एक मूलभूत आणि महत्वाचा शोध असल्याने त्याच्या संशोधकाला त्याबद्दल नोबेल परितोषिक बहाल केले गेले.

या लेखात आपण ‘क’ चा शोध, त्याचे आहारातील स्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाचे परिणाम यांची माहिती घेऊ. शेवटी नवीन संशोधन, समज-गैरसमज आणि काही वादग्रस्त मुद्द्यांचा आढावा घेईन.

आहारातील स्त्रोत:
Citrus गटातील फळे म्हणजेच आवळा, लिंबू, संत्रे इ. याचे मुख्य स्त्रोत. त्यापैकी आवळा हा सर्वोत्तम म्हणता येईल. पण लिंबू हे स्वस्त आणि नेहमी उपलब्ध असल्याने ते सहज आणि सर्वांना मिळू शकते. या फळांतून ‘क’ व्यवस्थित मिळण्यासाठी ती ताज्या व कच्च्या स्वरूपात खाल्ली पाहिजेत. 'क' हे उष्णतेने लगेच नाश पावते. म्हणून शिजवलेल्या अन्नातून ते मिळणार नाही. आपला भात,वरण, तूप, मीठ व लिंबू हा पारंपरिक आहार परिपूर्ण आहे. फक्त त्यात लिंबू पिळताना पानातील भात व वरण हे कोमट झालेले असावेत. लिंबाचे लोणचे हा प्रकार मात्र त्यातील ‘क’ छान टिकवून ठेवतो.

‘क’ च्या शोधाचा इतिहास:
आपल्याला ‘क’ मिळण्यासाठी ताज्या फळांचे सेवन किती महत्वाचे आहे हे आपण जाणतो. १-२ शतकांपूर्वी सैनिकांना जहाजातून दीर्घ युद्धमोहिमांवर पाठवले जाई. तेव्हा आहारातील फळांच्या अभावाने ते सर्व खूप आजारी पडत. तेव्हा या समूह-आजाराला “Sailor’s scurvy” असे म्हटले गेले. पुढे संशोधनातून ‘क’च्या गोळ्या तयार झाल्या आणि त्या नौसैनिकांना मोहीमेवर नियमित द्याव्यात असा विचार पुढे आला. नेपोलियन व नेल्सनचे प्रसिद्ध युद्ध झाले त्यात नेल्सनच्या सैनिकांना ‘क’ नियमित दिलेले होते तर नेपोलियनच्या नाही. त्यामुळे नेल्सनने जो ऐतिहासिक विजय मिळवला त्यात त्याच्या डावपेचांच्या बरोबरीने ‘क’ चा वाटाही महत्वाचा होता !
त्यानंतर ‘क’ च्या गोळ्या अशा मोहिमांवरील सैनिकांना नियमित दिल्या जाण्याची पद्धत पडली.

शरीरातील कार्य:
१. ‘क’ चे सर्वात महत्वाचे कार्य हे शरीर-सांगाड्याच्या बळकटी संबंधी आहे. ही बळकटी Collagen या प्रथिनामुळे येते. हे प्रथिन शरीरात सर्वत्र आहे पण मुख्यतः ते हाडे व रक्तवाहिन्यांमध्ये असते. ‘क’ त्याला बळकट करते.

२. आहारातील लोहाचे व्यवस्थित शोषण होण्यातही ‘क’ची भूमिका महत्वाची आहे. विशेषतः शाकाहारातील लोहाच्या शोषणात ती अधिक महत्वाची आहे.

३. त्याचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते antioxidant आहे. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘क’ आणि त्याच्या जोडीने ‘इ’ व ’अ’ या जीवनसत्वांचे योगदान मोलाचे आहे.

४. आपली सर्वसाधारण प्रतिकारशक्ती मजबूत करण्यातही त्याचा मोठा वाटा आहे.

अभावाने होणारा आजार(Scurvy) :
आहारात ताजी फळे व भाज्यांचे सेवन नियमित असल्यास सहसा ‘क’ चा अभाव होत नाही. हा भाग एकट्या रहाणाऱ्या व्यक्ती, वसतीगृहातील मुले इ. च्या बाबतीत दुर्लक्षिला जातो. अशा कमतरतेतून होणाऱ्या अभावाला ‘bachelor’s scurvy’ असे म्हणतात.
या व्यतिरिक्त कुपोषण वा आतड्यांचा दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्ती ,गरोदर स्त्रिया आणि फक्त गाईच्या दुधावर पोसलेली तान्ही बालके यांत हा अभाव होण्याची शक्यता जास्त असते.

अभावाचे परिणाम असे असतात:
१. हिरड्यांचा दाह होणे, सुजणे वा त्यातून रक्तस्त्राव होणे
२. त्वचेखाली व अन्यत्रही रक्तस्त्राव होणे
३. जखमा लवकर न भरणे
४. सांधेदुखी
५. अशक्तपणा व थकवा.

pict

(चित्रः जालावरुन साभार )

औषधरूपातील ‘क’ आणि आजार प्रतिबंध :
‘क’ हे पाण्यात विरघळणारे असल्याने ते औषधरुपात जरी गरजेपेक्षा जास्त घेतले तरी बिघडत नाही. शरीराला गरज नसलेला जास्तीचा भाग लघवीतून बाहेर पडतो. त्याच्या या गुणधर्माचा गैरफायदा वैद्यकात बऱ्याचदा घेतला गेला आहे. आयुष्यात अनेक दीर्घकालीन कटकटीचे आजार आपल्याला सतावतात. त्यांच्यावर उपचार म्हणून विविध उपचारपद्धतींची औषधे आपण घेतो. तरीसुद्धा बऱ्याचदा रुग्णाचे पुरेसे समाधान होत नाही. तो कमीअधिक प्रमाणात पिडलेलाच असतो. मग अशा आजारांमध्ये पूरक उपचार म्हणून ‘क’ चा वापर केला जातो. त्याला फारसा शास्रीय पाया नसतो. पण, ‘क’चा एखादा गुणधर्म त्या आजारात “उपयोगी पडू शकेल” अशा आशेने ते मोठ्या डोसमध्ये दिले जाते. कधी आजार-प्रतिबंध म्हणून तर कधी ‘रामभरोसे’ उपचार म्हणून. त्यातूनच पुढे समाजात त्याबद्दलचे गैरसमज पसरतात. मग त्याचा उठसूठ गैरवापर होऊ लागतो.
आता अशा आजारांची यादी बघूया:

१. सर्दी-पडसे
२. कर्करोग
३. हृदयविकार
४. मोतीबिंदू व दृष्टीपटलाचे काही आजार
५. उच्च रक्तदाब .

यातील सर्दी वगळता बाकीच्या यादीकडे पाहिल्यास वाचकांच्या भुवया लगेचच उंचावतील ! तेव्हा त्यातील दोन आजारांचे वास्तव समजून घेऊ.

१. सर्दी : वरवर ‘साधा’ दिसणारा पण रुग्णास अगदी सतावणारा हा आजार. ऋतुबदलातील सर्दी तर बहुतेक सर्वांना होणारी. त्यावर नक्की उपाय काय हा अगदी पेचात टाकणारा प्रश्न. ‘क’ आपली साधारण प्रतिकारशक्ती वाढवते या तत्वास अनुसरून सर्दीच्या रुग्णांवर त्याचे प्रयोग झाले. त्यांचे निष्कर्ष उलटसुलट. आजमितीस एवढे म्हणता येईल की सर्दीचा प्रतिबंध काही ‘क’ देण्याने होत नाही. पण ती झाली असता तिची तीव्रता व कालावधी त्याच्या डोसने कमी होऊ शकतो.

२. कर्करोग : हा तर गंभीर आजार. त्याचे विविध उपचारही अंगावर काटा आणणारे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर संशोधनाचे लक्ष्य केंद्रित होणे स्वाभाविक आहे. गेल्या शतकापासून अनेकांनी त्यासाठी ‘क’ चा वापर करून पाहिला आहे. अलीकडे या रोगाच्या केमोथेरपी बरोबर ‘क’ चे पूरक उपचार करण्याचेही प्रयोग झाले आहेत. त्यांचे निष्कर्ष अद्याप तरी दखलपात्र नाहीत.
वरच्या यादीतील अन्य आजारांबाबतही यासंदर्भात कोणतेही ठाम विधान करता येत नाही. अनेक उलटसुलट दावे आणि अपुरे संशोधन यामुळे ‘क’ आणि गंभीर आजारांचा प्रतिबंध हा विषय सध्या वादग्रस्त आहे.

......
तर असे हे Ascorbic acid उर्फ ‘क’. स्वतः ‘तब्बेतीने’ नाजूक आहे खरे, पण आपल्याला कसे बळकट करून जाते !
*********************************************
पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ, पुणे.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

28 Jun 2018 - 10:20 am | कुमार१

मा. सा. सं,
माझा हा लेख यापूर्वीच्या ‘ड’ जीवनसत्वांच्या २ लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती.
एकूण ५ जीवनसत्वांवर लेख लिहिणार आहे.
आभार !

जेम्स वांड's picture

28 Jun 2018 - 12:08 pm | जेम्स वांड

सुटसुटीत अन फुकट फाफटपसारा नसलेला लेख आवडला डॉक्टर कुमार. व्हिटॅमिन सी खरोखर जीवनरक्षण करणारा देवदूत म्हणता येईल. मला काही प्रश्न आहेत. म्हणजे बघा व्हिटॅमिन सीचे व्यवच्छेदक म्हणता येईल असे लक्षण म्हणजे "आंबट चव" (त्याला कारणीभूत असलेलं आम्ल तत्व ह्यावर तुम्ही चांगले लिहिले आहे) आंबट चव असणाऱ्या इतर पदार्थात (रासायनिक नाही तर जैव-रासायनिक) ते आढळते का? उदाहरण द्यायचे झाले तर इडली डोश्याचे आंबवलेले पीठ, इतर आंबवलेले खाद्यपदार्थ, यीस्टमुळे येणारा पदार्थातील आंबटपणा, किंवा बियर, रेड वाईन सारखी आंबवून तयार केलेली पेये, थोडक्यात काय, तर व्हिटॅमिन सी फक्त नैसर्गिक स्रोतांत सापडते की आंबवणे वगैरे प्रक्रिया वापरून पाकसिद्धी केलेल्या पदार्थांत त्याचा काही लवलेश उपलब्ध असतो?

यीस्टमुळे येणारा पदार्थातील आंबटपणा, किंवा बियर, रेड वाईन सारखी आंबवून तयार केलेली पेये,>>>>>>>

नाही , हा आंबूसपणा 'ब-१' या जीवनसत्वाने येतो. त्याचे अधिक विवेचन लेखमालेत पुढे येईलच.

क = ताजी आंबट फळे.
इडलीबद्दल माहीत नाही, वाचून बघतो

जेम्स वांड's picture

28 Jun 2018 - 12:27 pm | जेम्स वांड

इडली संबंधी काही सापडले तर नक्की कळवा. प्रश्न वैयक्तिक आहे! हायपर ऍसिडिटीचा त्रास असल्यामुळे इडली खाऊच शकत नाही, खाल्ली की भयानक आंबट ढेकर, पोटात मरणाची जळजळ वगैरे सुरू होऊन जातं. तसेच हायपर ऍसिडिटी पेशंट्सने व्हिटॅमिन सी सिव्हीयर ऍसिड रिफ्लक्सेस टाळून कसे घ्यावे ह्यावरही थोडे सांगाल ही नम्र विनंती.

सुबोध खरे's picture

28 Jun 2018 - 1:00 pm | सुबोध खरे

यीस्ट किंवा किंवा यात अजीबात क जीवनसत्त्व नाही.
त्यामुळे आंबवून केलेल्या पदार्थात उदा इडली किंवा बियर यात क जीवनसत्त्व अजिबात मिळत नाही. पदार्थास आंबट चव असली कि त्यात क जीवनसत्त्व असते यास कोणताही आधार नाही. आंबट गोड बोरे किंवा चिंच यात फारसे क जीवनसत्त्व नाही.( यात इतर अनेक खनिजे असतात हा भाग वेगळा)
बाकी वर म्हटल्याप्रमाणे आवळा किंवा पेरू भरपूर खा.

सुबोध खरे's picture

28 Jun 2018 - 1:01 pm | सुबोध खरे
जेम्स वांड's picture

28 Jun 2018 - 9:24 pm | जेम्स वांड

डॉक्टर कुमार ह्यांचा वरील प्रतिसाद वाचून कळले, आभार.

कुमार१'s picture

28 Jun 2018 - 12:47 pm | कुमार१

@जेम्स,
थोडेफार गुगलल्यावर असे वाटते:

१. नैसर्गिकरीत्या पदार्थ आम्बावल्यावर त्यात विविध ‘ब’ आणि ‘K’ जीवनसत्वे तयार होतात.

२. ‘क’ आपण जैवतंत्रज्ञानाने करू शकतो. त्यात रासायनिक क्रिया अधिक आंबवणे असे करतात.
(https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/1368195)

म्हणून इडली करताना ‘क’ होत नाही हेमावैम. तरीही आहारतज्ञांचे मत वाचायला आवडेल.

सुबोध खरे's picture

28 Jun 2018 - 12:55 pm | सुबोध खरे

"क" जीवनसत्त्व यासाठी रोजचे प्रमाण साधारण ४० ते ६० मिग्रॅ आहे. तर गरोदर स्त्रीला हीच गरज ९० मिग्रॅ पर्यंत असते.
गमतीची गोष्ट म्हणजे साधारण पणे लिंबू किंवा संत्रे यात भरपूर क जीवन सत्त्व असते असे सांगितले किंवा शिकवले जाते परंतु १०० मिली लिंबाच्या/ संत्र्याच्या रसात ५५ मिग्रॅ क जीवन सत्त्व असते. १०० मिली लिम्बाचा रस काही कुणाला खाणे शक्य नाही. त्यामानाने एक संत्रे खाणे शक्य आहे.

याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते.

एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित फळ म्हणजे पेरू. यात १०० ग्राम मध्ये २२५ मिग्रॅ क जीवन सत्त्व मिळते. म्हणजेच पेरूच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी पुरेसे क जीवन सत्त्व मिळू शकते. आणि १०० ग्राम पेरू किंवा आवळे तर कोणालाही जाता जाता खाणे शक्य आहे( गरोदर स्त्री सुद्धा). आणि ज्यांना ऍसिडिटी/ आम्लपित्त आहे अशा लोकांना सुद्धा आवळा किंवा पेरू खाणे शक्य आहे.

जेम्स वांड's picture

28 Jun 2018 - 9:31 pm | जेम्स वांड

याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते.

हे म्हणजे लैच सणसणीत सांगितलं पाहा तुम्ही खरे साहेब. आवळा सहज आजकालच्या सॅव्ही भाषेत म्हणतात तसं "सुपर फूड" म्हणायला हरकत नसावी नाही का?

सस्नेह's picture

29 Jun 2018 - 5:07 pm | सस्नेह

याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते.

आवळा शिजवून केलेल्या मोरावळ्यातून क जीवनसत्व याच प्रमाणात मिळते का ?

सुबोध खरे's picture

29 Jun 2018 - 8:25 pm | सुबोध खरे

क जीवनसत्व (ऍस्कॉर्बिक ऍसिड) हे १९० अंश सेल्सियस ला वितळते आणि त्याच्यावर उष्णतेचा परिणाम फारसा होत नाही परंतु ते पाण्यात विद्राव्य असल्यामुळे तुम्ही जर आवळे उकडून पाणी फेकून दिलेत तर ४५ ते ६० % क जीवनसत्व त्या पाण्यातून बाहेर जाईल. तेंव्हा मोरावळा जर पाणी फेकून न देता तयार केला तर क जीवनसत्व व्यवस्थित शिल्लक राहील.( मोरावळा कसा करतात हे माहित नाही त्याबद्दल क्षमस्व)
खालील दुवा पहा.
https://cooking.stackexchange.com/questions/17379/how-does-boiling-remov...

१. सर्व जीवनसत्वांमध्ये ते उष्णतेने सर्वात जास्त अस्थिर होते. (most unstable)
( Handbook of Vitamins textbook : लेखक सध्या आठवत नाही).

२. ७० C तापमानाला ते नाश पावते (http://www.dietitian.com/vitaminc.html#.WzZMFtUzaUk)

३. ‘क’ असलेल्या भाज्या शिजवायच्याच असतील तर मंद आचेवर, खूप कमी पाण्यात आणि कमीतकमी वेळ शिजवावे.
(http://www.ijstr.org/final-print/nov2013/Effect-Of-Heating-On-Vitamin-C-...)

४. तेव्हा कच्ची फळेच उत्तम हेमावैम.

५. आवळा शिजवाण्याबाब्त काही वेगळी मते आहेत पण मूळ संदर्भ मला मिळालेला नाही म्हणून मत देत नाही.

मोरावळा करताना आवळे वाफवून त्याच पाण्यात साखर घालतात व साधारण वीस मिनिटे उकळतात. अर्थात १०० डिग्रीला. पण पाणी टाकले जात नाही.
आवळा पेठा किंवा कँडी करताना मात्र वाफवलेल्या आवळ्याचे पाणी बाजूला काढून त्याचे सरबत केले जाते.

टर्मीनेटर's picture

28 Jun 2018 - 1:04 pm | टर्मीनेटर

छान माहिती कुमारजी....@ जेम्स वांड , दक्षिण भारतातील शाकाहारी लोकांचे मुख्य अन्न भात आहे. त्यातून शरीराची जीवनसत्वांची गरज भागात नसल्याने त्यांच्या आहारात चिंच व आंबवलेल्या डाळ आणि तंदुळाच्या पीठापासून तयार केलेल्या ईडली डोसा सारख्या पदार्थांचा समावेश असतो असे कुठेतरी वाचल्या सारखे आठवतंय.

लई भारी's picture

28 Jun 2018 - 2:21 pm | लई भारी

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख आणि चर्चा.

एस's picture

28 Jun 2018 - 2:52 pm | एस

चर्चा आवडली.

अनिंद्य's picture

28 Jun 2018 - 3:57 pm | अनिंद्य

@ कुमार१,

नेहेमीप्रमाणेच अभ्यासू, समजण्यास सोपा, सुटसुटीत वगैरे लेख.
‘bachelor’s scurvy’ वाचले होते.

स्वतःला पेरू, संत्री, आवळा फारच आवडत असल्यामुळे आणि भरपूर खातही असल्यामुळे बहुतेक 'क' कमी कसावे सॉरी नसावे :-)

पु भा प्र,

अनिंद्य

चांगली चर्चा व पूरक माहीती.
क साठी आवळा सर्वोत्तम आहेच, फक्त तो नेहमी मिळत नाही.

झेन's picture

28 Jun 2018 - 5:41 pm | झेन

तुमचे लिखाण नेहमीच सुटसुटीत, माहितीपूर्ण आणि उपयोगी असते.
आवळ्याच्या रसाने आवळ्या इतका नसला तरी फायदा होतो का ?

कुमार१'s picture

28 Jun 2018 - 6:00 pm | कुमार१

आवळ्याच्या रसाने आवळ्या इतका नसला तरी फायदा होतो का ?>>>
'क' मिळण्याबाबत नक्कीच होईल.
बस्स, तो शुद्ध मिळावा इतकेच .

झेन's picture

30 Jun 2018 - 9:00 am | झेन

धन्यवाद कुमार१

प्रसाद गोडबोले's picture

28 Jun 2018 - 6:04 pm | प्रसाद गोडबोले

वाह !

खुपच माहीतीपुर्ण लेख !

लहानपणी आज्जी सकाळी सकाळी मोरावळा खायला द्यायची त्याची आठवण झाली :)

कुमार१'s picture

28 Jun 2018 - 7:54 pm | कुमार१

स्वतःला पेरू, संत्री, आवळा फारच आवडत असल्यामुळे >>>>>>>
चांगले आहेत हे डोहाळे ! कायम चालू ठेवा....

लहानपणी आज्जी सकाळी सकाळी मोरावळा खायला द्यायची त्याची आठवण झाली >>>>>
अगदी अगदी ! माझी आज्जी पण....

होण्यास मदत झाली. लिंबात आवळ्यात व्हिटॅमीन सी असते हे शालेय पुस्तकात वाचले आहे. पण पेरूत इतके भरपूर असते हे ठाऊक नव्हते. डॉ. खरेंनी तर नेमके प्रमाणही दिलेले आहे. शालेय पाठ्यपुस्तकातली माहिती प्रमाणासह अपडेट करणे आवश्यक दिसते आहे. मोरावळा आणि च्यवनप्राश यातले व्हिटॅमीन सी कसकसे कमी होत जाते याचा तक्ता संशोधन करून बनवणे आवश्यक आहे.

असो छान लेखाबद्दल आपल्याला आणि उत्कृष्ट पूरक माहितीबद्दल डॉ खरेंना अनेक धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

29 Jun 2018 - 6:54 am | सुधीर कांदळकर

पॅपिलॉन या गाजलेल्या कादंबरीत तुरुंगातला एक कैदी व्हिटॅमीन सी मिळावे म्हणून भरपूर लिंबे खायला घातल्यावर काय झाले ते डॉक्टरना एका मस्त विनोदातून सांगतात ते आठवले. तो कैदी स्वतःच्या पार्श्वभागात लिंबाच्या झाडाची फांदी घालतो आणि तुमच्या शिफारसीवरून तुरुंग प्रशासनाने लिंबे जास्त खायला घातल्यामुळे हे असे इथे लिंबाचे झाड उगवले म्हणून डॉक्टरांना सांगतो.

सुधीर , मस्त किस्सा.
नियमित प्रतिसादाबद्दल आभार

कुमार१'s picture

29 Jun 2018 - 10:27 am | कुमार१

पोहे हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता न्याहारीचा पदार्थ. त्यांत काही प्रमाणात लोह असते. आता आपली फोडणीचे पोहे खाण्याची पारंपरिक पद्धत पहा. बशीत घेतल्यावर आपण त्यावर लिंबू पिळतो. लिंबातील ‘क’ मुळे पोह्यातील लोहाचे शोषण वाढते.

मात्र एक काळजी घ्यायची. गरम पोहे कढईत असताना त्यावर नाही लिंबू पिळायचे; ते बशीत वाढून घेतल्यावर काहीसे कोमट झाल्यावर त्यावर पिळायचे.

सुबोध खरे's picture

29 Jun 2018 - 8:34 pm | सुबोध खरे

एक विशेष सूचना-- क जीवनसत्व (ऍस्कॉर्बिक ऍसिड) हे Ascorbic acid is a six carbon compound related to glucose, and strong reducing agent असल्याने आपण मूत्राची तपासणी करण्याच्या अगोदर भरपूर आवळे किंवा पेरू खाऊन गेला असाल किंवा क जीवनसत्व याची गोळी घेऊन गेला असाल तर आपल्या "लघवीत साखर" आहे असा निष्कर्ष येऊ शकतो.

साधारण पणे लघवीत साखर नसते. लघवीत साखर येणे म्हणजे आपली रक्तातील साखर हि १८० पेक्षा वर जाणे असा अर्थ आहे.

मधुमेही व्यक्तींनी याबद्दल सावधान राहणे आवश्यक आहे.

पहा-- Influence of Vitamin C on Urine Dipstick Test Results.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/26275689

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2018 - 9:17 pm | प्रसाद गोडबोले

असेच व्हिटॅमिन्स्च्या अतिसेवनाचे दुष्परिणाम्ही असतात ना , त्या विषयीही लिहावे ही नम्र विनंती .
" अति" म्हणजे किती ?
सी व्हिटॅमिन वॉटर सोल्युबल असते ना , त्याच्या अतिसेवनचेही काही तोटे होतात कि अति शरीराबाहेर आपोआप फेकले जाते ?

चांगला प्रश्न. सविस्तर लिहीतो ........

कुमार१'s picture

29 Jun 2018 - 9:41 pm | कुमार१

१३ जीवनसत्वांचे २ गटांत वर्गीकरण:

१. मेदात विरघळणारी : A, D, E, K.
ही यकृतात वा मेदात साठवली जातात. म्हणून गरज नसताना त्याच्या गोळ्या दीर्घकाळ खाल्ल्यास नक्की दुष्परिणाम होतात.

२. पाण्यात विरघळणारी : सर्व B आणि C. इथे B-१२ चा अपवाद वगळता ती साठवली जात नाहीत. म्हणून गरज नसतानाही जास्त खाल्लीत तर नको तो भाग सरळ लघवीतून बाहेर जातो.
त्यामुळे या गटाचे सहसा दुष्परिणाम नाहीत.

३. पण, ‘क’ बाबत थोडा इशारा: शरीरात त्याचे oxalate मध्ये रुपांतर होते. हे संयुग मूतखडे होण्याशी निगडीत आहे. तेव्हा संबंधित संवेदनशील व्यक्तींनी आणि मूत्रपिंडाचे आजार असलेल्यांनी जरा जपून राहावे इतकेच.

४. मुळात पाण्यात विरघळतेय म्हणून उगाचच गोळ्या दीर्घकाळ कधीही खाऊ नयेत.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2018 - 10:53 pm | प्रसाद गोडबोले

धन्यवाद :)

सोमनाथ खांदवे's picture

29 Jun 2018 - 10:05 pm | सोमनाथ खांदवे

अस वाटतय डॉक्टरचं साहित्य संमेलन भरले आहे , वाचकांच्या निरोगी आयुष्या साठी शांततेत चर्चा चालू आहे , बरेचसे वाचक मूकपणे माहितीपूर्ण चर्चेचा आस्वाद घेऊन स्वतः च्या ज्ञानात भर घालत आहेत.
पण या साहित्य संमेलनात एक ही श्रीपाल सबनीस नाही ही आनंदाची बाब आहे .

क जीवन्सत्वामुळे लोहाचं शोषण वाढते हेमोग्लोबिन वाढते.लेख उत्कृष्ट आहे.

सोमनाथ, संमेलनातील या चर्चेत तुमचेही स्वागत !

डॉ. रवी, आभार व सहमती.
उपयुक्त चर्चा.

नाखु's picture

30 Jun 2018 - 11:42 am | नाखु

त्या (फुकाच्या) तात्विक वाद चर्चांपेक्षा या तात्विक ( सत्व युक्त) चर्चा मिपाचे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल असे वाटते

सात्विक आहार प्रेमी नाखु पांढरपेशा

या विषयावरील अनेक संस्थलांचा धांडोळा घेतल्यावर एक सोपा निष्कर्ष निघतो. तो म्हणजे भाज्या ‘उकळून शिजवण्या’ ऐवजी वाफावून (steaming) घेणे चांगले.

‘क’ च्या बाबतीत हे अधिकच लागू होते.

कुमार१'s picture

4 Jul 2018 - 11:35 am | कुमार१

उपयुक्त चर्चा
आणि पूरक माहितीची भर घातल्याबद्दल सर्वांचे आभार !

श्वेता२४'s picture

5 Jul 2018 - 4:27 pm | श्वेता२४

तुमचे लेख व त्यावरील चर्चा वाचून ज्ञानात खूप भर पडतेय. ही माहीती सर्वांना असणे गरजेचे आहे. इतक्या साध्या सोप्या भाषेत असा विषय मांडल्याबद्दल तुमचे आभारच मानायला हवेत.

कुमार१'s picture

5 Jul 2018 - 5:13 pm | कुमार१

अभिप्रायाबद्दल आभार. तुमचेही चर्चेत स्वागत.

तुमच्यासारख्या उत्साही वाचकांचे प्रतिसाद मला जीवनसत्त्वासमान आहेत . ☺

charming atheist's picture

5 Jul 2018 - 5:25 pm | charming atheist

Metabolic acidosis हा आजार सध्या मोठ्या प्रमाणात दिसतो.यात किडनीचे फंक्शनींग बिघडल्याने किंवा इतर कारणाने रक्ताची आम्लता वाढते. यावर citric acid + sodium bicarbonate (baking soda) म्हणजेच लिंबाचा रस आणि खाण्याचा सोडा असे मी दिवसातून दोनदा घेतो .सोडीयम बायकार्बोनेटपेक्षा sodium citrate सेफ आहे असे वाचल्याने हा उपाय नुकताच सुरु केला आहे.माझा प्रश्न असा आहे की हा उपाय करणे सुरक्षीत आहे का.? रोज दोन छोटे चमचे सोडा आणि एका लिंबाच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब वाढू शकतो का? माझा थोडा जास्त येत आहे. एकंदर लाँग टर्ममध्ये कितपत सेफ आहे?

मला सध्या कोणताही किडनीविकार नाही पण आहार ॲसिडीक असल्याने ॲसिडोसीसचा त्रास होत आहे.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 7:42 pm | सुबोध खरे

आपल्यास ऍसिडिटीचा त्रास आहे कि ऍसिडोसिसचा हे नक्की खात्री करून घ्या.
कारण ऍसिडिटी हा आजार सामान्य आहे आणि ऍसिडोसिस हा गंभीर आजार आहे.
Metabolic acidosis is a condition that occurs when the body produces excessive quantities of acid or when the kidneys are not removing enough acid from the body. If unchecked, metabolic acidosis leads to acidemia, i.e., blood pH is low (less than 7.35) due to increased production of hydrogen ions by the body or the inability of the body to form bicarbonate (CO3−) in the kidney. Its causes are diverse, and its consequences can be serious, including coma and death. Together with respiratory acidosis, it is one of the two general causes of acidemia.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 7:43 pm | सुबोध खरे

ऍसिडिटी हि जठरात असते आणि ऍसिडोसिस हे रक्तात असते.

कुमार१'s picture

5 Jul 2018 - 6:21 pm | कुमार१

आहार ॲसिडीक असल्याने ॲसिडोसीसचा त्रास होत आहे. >>>>

हे विधान तितकेसे पटले नाही. अमोनियम क्लोराईड आणि तत्सम रसायने बरीच acidic आहेत. पण, sodium citrate तितके नसावे असे वाटते. आपल्या रक्ताचा pH ही खूप critical बाब आहे. तो दीर्घकाळ ७.३५ पेक्षा कमी राहिल्यासच Acidosis झालाय असे म्हणतात.

तुम्हाला मोठा आजार नाही असे म्हणताय. मग खरेच रक्त-pH मोजलाय का रुग्णालयात जाऊन ? कारण ही सामान्य (ओपीडी) पातळीवरची तपासणी नाही. त्यासाठी “रोहिणी” तून रक्त काढावे लागते !

की तुम्हाला निव्वळ जठरातील acidity म्हणायचे आहे? Metabolic acidosis आणि पोटातील acidity यात महदंतर आहे !
याचा खुलासा व्हावा. मग मी sodium citrate बद्दल वाचून बघतो.

चमचे सोडा आणि एका लिंबाच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब वाढू शकतो का?
>>>

निरोगी अवस्थेत नाही. रुग्णाचे बाबतीत तपासणी करून उत्तर द्यावे लागेल. मुद्दा NaHCO३ चा आहे. लिंबाच्या रसाचा याच्याशी संबंध नाही.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 7:44 pm | सुबोध खरे

+१००
आपण नीट तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या आणि स्वतः वर उपचार टाळा.

मला पोटातील आम्लता म्हणायचे नाही आहे .मला रक्तातील आम्लता म्हणायचे आहे. Metabolic acidosis ची लक्षणे मला आहेत .सांधेदुखी ,श्वसनाचा जास्तीचा वेग आणि आहाराच्या बाबतीत पालेभाज्या अजिबात नसणे ,सतत मीट आणि आम्लीय पदार्थ खाणे असं एकंदर आहे. Self diagnosis करणे घातक आहे मान्य पण मी बायो केमिस्ट्रीचा अभ्यास कॉलेजमध्ये केला असल्याने थोडे ज्ञान आहे.
Sodium citrate हे ॲसिड सॉल्ट असल्याने रक्तात शोषले गेल्यास बेसिसीटी वाढवण्यास् मदत करते असे मी ncbi मध्ये असलेल्या स्टडीजमध्ये वाचले आहे.ब्लड pH नॉर्मल रहाण्यास मदत होते असे वाचले आहे. Oral sodium citrate चे स्टडीजही पोझिटीव्ह आहेत. तुमचे कुमार१ आणि खरे ,दोघांचे काय मत आहे हे मला विचारायचे आहे. मी इथे ncbi ची लिंक देतो.

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 8:36 pm | सुबोध खरे

जालावर मी अभिप्राय देत नाही. असे करणे धोक्याचे आहे.

आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा असाच कळकळीचा सल्ला देईन.

जालावर केलेलं स्वनिदान धोक्याचे असते

https://www.misalpav.com/node/31038

कुमार१'s picture

5 Jul 2018 - 8:49 pm | कुमार१

सहमत. तसेच या मुद्द्यावर अधिक चर्चा करत बसलो तर धाग्याचा मूळ हेतू ('क ' ची उपयुक्तता ) पासून आपण फार भरकटू.
अन्य वाचकांना ते अस्थानी वाटेल.
लोभ असावा

कुमार१'s picture

5 Jul 2018 - 8:27 pm | कुमार१

तपासून तो ७.३५ पेक्शा कमी असल्यासच (दीर्घकाळ ) Metabolic acidosis चे निदान होते. हा मूलभूत मुद्दा आहे.

कुमार१ आणि खरे दोघांचे आभार.

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2018 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे व्हिटॅमिन क वरची चर्चा ! हा अत्यंत उपयिक्त धागा बनला आहे !

सर्वात महत्वाचा मुद्दा : सर्दीसाठीबद्दल चा गैरसमज दूर केलात, कारण किमान १० जणांना तरी रोज सांगतो की लिंबं, आवळे आणि पेरू खात जा !!

कुमार१'s picture

11 Jul 2018 - 12:35 pm | कुमार१

धन्यवाद ! सहमत.

कुमार१'s picture

11 Jul 2018 - 12:47 pm | कुमार१

डॉ श्रीहास,
क' ने सर्दीची तीव्रता कमी होण्याबाबत तुमचा अनुभव असल्यास जरूर लिहा

कुमार१'s picture

11 Jul 2018 - 2:36 pm | कुमार१

धन्यवाद !

आंबट खाल्याने आमवात होतो असे ऐकले आहे. संधीवात आणि आमवात एकच का? संधीवात असेल तर लिंबू आवळा चालतो का?

कुमार१'s picture

11 Jul 2018 - 3:56 pm | कुमार१

क्षमस्व. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदिक तज्ञ देउ शकतील.

ओके. मला ही शंका आली कारण हाडांसाठी आंबट चांगल आहे हे वाचल पण संधीवातात आंबट खायला बंदी असते. कदाचीत वात हा आजार वेगळा असेल व वाताला आंबट चालत नसेल.

कुमार१'s picture

11 Jul 2018 - 4:55 pm | कुमार१

या शब्दांमुळे घोळ होतो खरे !
Arthritis = सांध्यांचा दाह , असे साधारण भाषांतर. या आजाराची कारणे असंख्य.
'वात' हा आयुर्वेदिक शब्द.

दोन भिन्न शास्त्रांची सांगड घालणे तसेच इंग्लिश चे मराठी करताना घोळ होतो.
पथ्याच्या कल्पनाही भिन्न असतात.

माहितगार's picture

11 Jul 2018 - 4:23 pm | माहितगार

आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की काही अपवाद आहेत. कारण वर मर्यादीत फळांची चर्चा झाल्याचे दिसते. आहारातील टमाटे, चिंच, आमसूल , आंबट चुका, आंबट झालेले दही/ताक आणि क जिवनसत्व याबद्दल या निमित्ताने माहिती मिळावी हि विनंती.

आहार विषयक चांगल्या चर्चा मालिकेसाठी धागा लेखकाचे अनेक आभार.

आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की >>>>
नाही होऊ शकत. आंबटपणा अनेक प्रकारच्या आम्लांमुळे असू शकतो. पण ज्यांत Ascorbic acid आहे तेच फक्त ‘क’ होय.

दही- ताकाचा आंबटपणा Lactic acid मुळे आहे.

ओह ओह, मला वाटायचे कोणतेही आंबट खाल्ले की येत असणार क जिवनसत्व मी तर आंबट चिक्कार खातो, आणि मला काय
क जिवनसत्वाची फिकिर, सुरवातीस धागा उघडण्याचेही कष्ट घेतले नव्हते :) बरे झाले प्रश्न विचारला. माझी अनेक वर्षांची चुकीची समजून दूर केल्या बद्दल खूप खूप आभार.

सुबोध खरे's picture

11 Jul 2018 - 6:54 pm | सुबोध खरे

पदार्थास आंबट चव असली कि त्यात क जीवनसत्त्व असते यास कोणताही आधार नाही. आंबट गोड बोरे किंवा चिंच यात फारसे क जीवनसत्त्व नाही.( यात इतर अनेक खनिजे असतात हा भाग वेगळा)

माहितगार's picture

11 Jul 2018 - 9:29 pm | माहितगार

किती नकळत चुकीचे समज डोक्यात फिट होतात, इथून पुढे काळजी घेता येईल. माहितीसाठी अनेक आभार.

कुमार१'s picture

11 Jul 2018 - 5:36 pm | कुमार१

ही घ्या ‘क’ ची फळयादी :

आवळा, लिंबू, संत्रे
पेरू, काळ्या मनुका
किवि, स्ट्राबेरी
पपई , लाल ढोबळी मिरची .

माहितगार's picture

11 Jul 2018 - 5:56 pm | माहितगार

अनेक आभार

जागु's picture

12 Jul 2018 - 11:38 am | जागु

आता सोप झाल.

कुमार१'s picture

13 Jul 2018 - 8:03 am | कुमार१

सध्या पेरुचा हंगाम
आहे. तेव्हा मस्तपैकी पेरुंचा आस्वाद घ्या आणि ‘क’-समृद्ध व्हा ! या सदिच्छा सह इथला समारोप करतो.

सर्वांचे आभार .
या मालेतले पुढचे जीवनसत्व (ब१२) इथे आहे :

https://www.misalpav.com/node/42982

कुमार१'s picture

27 Sep 2022 - 12:32 pm | कुमार१

तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखात खालील उल्लेख आहे

औषधरूपातील ‘क’ आणि मोतीबिंदू प्रतिबंध
>>>
या संदर्भातील काही नवीन संशोधनाची भर घालतो. मोतीबिंदू होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख म्हणजे वाढत्या वयानुसार होणारा. यात डोळ्याच्या भिंगातील दीर्घकालीन ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे मोतीबिंदू होण्याची प्रक्रिया सुरू होते असे मानतात.
क जीवनसत्वाला ऑक्सिडेशन विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया मंद करता येईल का आणि त्यामुळे मोतीबिंदू १० वर्षांनी पुढे ढकलला जाईल का हा उत्सुकतेचा विषय आहे.परंतु अलीकडील संशोधनानुसार असा निष्कर्ष निघालेला नाही.

मोतीबिंदू होण्याच्या अन्य एका कारणाबाबत आशादायक परिस्थिती आहे. दृष्टीदोषाच्या काही रुग्णांवर डोळ्यांची एक विशिष्ट शस्त्रक्रिया केली जाते (vitrectomy). त्याचा दुष्परिणाम म्हणून पुढे मोतीबिंदू होतो. अशा रुग्णांना जर शस्त्रक्रियेनंतर क जीवनसत्व औषध रूपात दिले तर दुष्परिणामामुळे होणारा मोतीबिंदू टाळता येईल.