मा फलेषु ....

सचिन बोकिल's picture
सचिन बोकिल in जनातलं, मनातलं
9 Jun 2018 - 3:05 pm

माझ्या खाण्याशी संबंधित आठवणींमध्ये एक कप्पा फळं आणि त्यांच्याशी निगडीत आठवणीनी व्यापला आहे. फळं तरी आणि किती प्रकारची ! वेगवेगळी फळं आणि ती खाण्याच्या वेळा आणि प्रकार ह्याची माझ्या मनामध्ये अशी काही सांगड बसली आहे की जर मी तसा केला नाही तर मला ते फळ खाल्ल्यासाखंच वाटत नाही ! फळ हे मला तरी कधीच ते केवळ गोड किंवा आंबट किंवा तुरट आहे म्हणून किंवा त्यातून विटामिन्स मिळतात म्हणून खावसं वाटलं नाही. त्याचे रंग, वास आणि खाताना येणारा अनुभव हे पैलू माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत.
आणि आठवणी तरी किती ..
कोकणात भटकताना खाल्लेली करवंद आणि तो कधीच न चावला जाणारा बरका फणस, लद्दाख मधल्या लेह्बेरीज, पुणे-मुंबई रेल्वे प्रवासात पळसदरीला खाल्लेले जाम, महाबळेश्वरला तोंड आणि हात रंगेपर्यंत खाल्लेली तुती, मलेशिया मधल्या जंगलात खाल्लेले रंबुतान आणि ड्रेगनफ्रुट्स, जर्मनी मधल्या फ्रेश मार्केट मधली रसरसलेली सफरचंदं आणि पेअर्स, थायलंडची राजधानी बंकोक मधल्या चात्तोचाक वर काडीला टोचून खाल्लेले अवाढव्य पेरूचे काप आणि नारळा एवढे मोठे पण महाबेचव आंबे...

तो थाई बेचव आंबा सोडा पण आंबा म्हणल्यावर मला का कोण जाणे अस्सल हापूस किंवा गेला बाजार “पायरी सोडून” रायवळ आंबाच डोळ्यासमोर येतो. जुनाट वाडा, त्याचा मळकट चौक आणि त्या चौकात एक घंगाळात गार पाण्यात ओतलेले ते गोटी आंबे. माझ्याच वयाचे बाकीचे गुढगाभर उंचीचे मावळे वर मी म्हणणार ऊन आणि तो आंबा चोखत गल्लीभर फिरत घालवलेले ऊन्हाळयाच्या सुट्टीतले दिवस या माझ्या आंब्याच्या चवीवर गोंदल्या गेलेल्या आठवणी आहेत. आंबा हा असाच खातात यावर माझा इतका विश्वास आहे की कापलेले हापूस आंबे समोर आले की मला अगदी नेहेमीचा बनियन पायजमा घालणारा आणि ज्याला हाक मारण्या आधी भडव्या हा शब्द आपोआप जातो, तो मित्र थ्री पीस सुट घालून भेटायला आल्यासारखं वाटत. अश्या या मित्राला आपण ओळख देतो पण ते परकेपण जात नाही. हापूस आंब्याची पेटी उघडली आहे, त्याचा तो शब्दातून न सांगता येणारा वास आसमंतात भरून राहिला आहे आणि तो वास घेत घेत एक एक आंबा आपण नुसत्या हातानी सोलून फस्त करतो आहोत, आपल्या शर्टाला सुध्धा थोडा आंबा खिलवतो आहोत, ओठांच्या बाहेर रस जाऊन तो वाळला आहे आणि हातावर त्या अमृततुल्य रसाचे ओघळ आले आहेत. हे असं झाला की मला तो आंबा खरा खाल्ल्यासारखा वाटतो. ह्याउप्पर मग आंबरस, आंब्याच्या फोडींवर घातलेलं आईसक्रीम, मिल्क शेक, आंबा पोळी. गुळांबा, साखरांबा या सगळ्यातून पण मी आंबा खातोच पण त्याला आंबा खाल्ला असा म्हणणं हे जरा जास्त होत. हापूस, पायरी, रायवळ, लंगडा, मानकुराद, दशहारी, तोतापुरी आणि कितीतरी.. यातला एक तोतापुरी सोडला तर सगळे आंबे मला आवडतात. प्रत्येकाला स्वत:चाच एक तोरा आहे आणि त्यात डावंउजवं करणारा मी कोण! तोतापुरी फक्त त्या मोठ्या लोकात शोभत नाही. माझ्यामते तोतापुरी हे एक वेगळं फळ आहे, आंबा नव्हे तो.

आंबा खूप खाऊन झाल्यावर कलिंगड दिसणं हा मोठाच अत्याचार आहे कारण आंब्यांनी भरलेल्या पोटावर जितकं कलिंगड खाता येतं त्यानी मन भरणं अशक्यचं. भलंथोरलं कलिंगड कापून त्याचे नीटस तुकडे करून त्याच्या बिया काढून ते चीनी मातीच्या बोल मध्ये थोडं मीठ मिरी शिंपडून पुस्तक वाचत वाचत खाण्याची माझी जुनी सवय आहे. आणि हे कापून, बिया काढून, बोल भरून हातात द्यायचे काम दुसर्‍यानी केलं तर मग त्यासारखं सुख नाही . आपण आपलं खावं आणि पुस्तकात रममाण व्हावं. मा‍झ्या आठवणीत कलिंगड हौसेनी आणून कापून मा‍झ्या हातात देणारे माझे आजोबा आणि कलिंगड खाण्याच्या आठवणी याचं असंच नातं आहे ! दुसरं तसलंच प्रकरण म्हणजे दुसर्‍या कोणीतरी बिया काढलेलं सीताफळ आणि सोलून वाटीत घालून दिलेले डाळींबाचे टपोरे लालचुटुक दाणे. कारण सोलून ते खाणं महा कर्मकठीण आणि किचकट. हि फळं एकट्यानी खायची !

आता हा आंबा हा फक्त २-३ महिनेच मिळायचा आणि तो संपला की शाळा पण सुरु होत असे. तेव्हा पाउस यायचा आणि जांभळं पण. मा‍झ्या एका लांबच्या काकांकडे मी नेहमी जायचो पण पावसाळ्यात तर विशेषच. त्यांच्या छोट्याश्या काम्पौंद नसलेल्या बंगली समोर एक अवाढव्य जांभळाचं झाड होतं. होतंच म्हटलं पाहिजे कारण ते एके दिवशी कोसळून विजेच्या तारा तुटल्या होत्या.. तर त्याची लाखो जांभळं रस्त्यावर पडून तो काळा कुळकुळीत रस्ता जांभळा आणि पाण्धूरका होत असे. दगड मारून पाडलेली ती जांभळं न धुता तशीच खाऊन कधी कोणी आजारी पडल्याचा ऐकीवात नव्हतं. फळं न धुता खाल्ली तर चालतात ह्या माझ्या अजूनही शाबूत असलेल्या समजाचा उगम हे बहुधा त्यात असावा. चण्यामन्या आणि टपोरी मोठी बोरं ही खाल्ल्याशिवाय तर शाळेचा एक दिवस जात नसे. ही कधीच घरात बसून खाल्ल्याचं आठवत नाही पण वर्गात खाल्ल्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. त्याच बरोबर एका कळकट गाडीवर ऊसाचे करवे लिंबू पिळून खात आणि त्यातला सगळा रस संपल्यावर पंधरा शुभ्र चोथा थुंकत चिकट झालेले हात चड्डीला किंवा (दुसर्‍याच्या) शर्टला पुसण्याची रीत होती. उस खाऊन हात बेसिन मध्ये धुणे हा फाऊल आहे !

लातूरला एका उसाच्या शेतात गुळ करण्यासाठी जी काहील लावली होती त्यातून हवा तेवढा उसाचा रस फुकट प्या अशी ऑफर असताना एक लोटीभर रस पिऊन नंतर तिथेच काढलेली झोप आठवते आणि मग रसवंती मधला आले लिंबू आणि बर्फ टाकलेला रस कृत्रिम वाटायला लागतो. पण तरी मी तो पितोच म्हणा.

वेळ आणि जागा पण माझ्यासाठी महत्वाच्या असतात. काही रस्ते मी केवळ आवडत नाहीत म्हणून लांबच्या रस्त्यानी जातो आणि काही फळांच्या वाटेला आत्तापर्यंत फिरकलो नाही, का कोणास ठाऊक पण रस्त्यावर बोरं आणि पेरू खाऊ शकतो मी पण द्रारस्त्यावर द्राक्षं आणि अंजीर नाही. पेरू हे पण माझ्यासाठी एक खास फळ आहे. सुरीनी कापलेले पेरू तिखट मीठ लावून छान लागतो पण मला न कापलेला पेरुच ओरीजीनल वाटतो. तो हातात धरून थेट खाण्यात जी मजा आहे ती खरी. आणि पेरू पण कसा हवा, थोड्या गाठी असलेला, कडक आणि कधीकधी अर्धा कच्चा सुद्धा. पिकलेला पिवळट पेरू कोशिंबिरीत घालायला बरा ! झाडावरून तोडून खाल्ला तर अजून मस्त आणि एखादी बी हटकून अडकतेच दातात आणि जीभ नंतर तासभर तिचा शोध घेत बसते आणि तिला स्थानभ्रष्ट करायचा निष्फळ प्रयत्न करते. मग हार मानून डोळे टाचणी शोधू लागतात.
चिंचा आणि आवळे पण त्याच वर्गातले. न धुतलेले आणि झाडावरून तोडून थेट तोंडात टाकायचे. हे खाताना बरोबर मित्र हवेत आणि बेताल बडबड हवी. चिंचा, आवळे, बोरं, पेरू, जांभळा ही गपचूप बसून खायची फळं नव्हेत.. तोंड खाताना आणि बोलताना सतत व्यस्त राहायला हवं. चिंचा बोरं खूप मिळतात पैसे टाकले की पण असे मित्र नशिबात असावे लागतात. होंगकोंग मध्ये चेरीचा गुच्छ घेऊन एक एक चेरी खाताना पण मला असाच वाटलं. तिथेही लोकांची अशीच टकळी चालू होती पण त्यात माझे मित्र नव्हते. चेरी छान होती तरी पैसे वाया गेल्यासारखं उगीचच वाटलं.

पैसे वाया गेले असं म्हणायची वेळ अननसानी माझ्यावर अनेकदा आणली आहे कारण तो कापल्यावरच समजतं की तो आंबट आहे ! आणि समजल्यावर फारसं करण्यासारखं काही उरत नाही. पण जर हे वेळ त्यानी आपल्यावर जर नाही आणली तर मग मात्र मजा आहे. रंग, वास आणि चव यात मी अननसाला खूपच वरच्या दर्जाचा समजतो आणि कापण्याच तंत्र जर का जमलं तर मग त्या मजेला काहीच सीमा नाही. अननस देठाच्या बाजूनी कोरून काढून त्यात वोडका भरून आणि कोरलेल्या अननसाचे तुकडे टाकून वरचा तुकडा परत टेप नि चिकटवून मस्त फ्रीज मध्ये सकाळी ठेवायचा आणि दिवसभर उन्हातान्हात मरमर काम करून संध्याकाळी तो उघडून त्यातले वोडका मध्ये डुंबत असलेले तुकडे खात खात गप्पा हाणायच्या हे देखील एकट्यानी करायचं काम नव्हे. पण एकाच कामावर असलेली टीम हे करू शकते, मित्रच हवे असं काही नाही ! चिकमंगळूर जवळ सकलेशपूर नावाच्या छोट्या गावाजवळ अरेकेरे नावाचं एक खेड आहे. मी बंगलोर मध्ये आर्कीटेक्ट म्हणून काम करत होतो तेव्हा त्या अरेकेरे मधे एका फार्महाउसचं काम चालू होतं. एकदा मी आणि माझा बॉस रुटीन व्हिजीट साठी गेलो असताना त्या फार्महाउसच्या मालकांनी आम्हाला हा मेनू संध्याकाळी ऑफर केला होता. त्या सिमेंट कॉन्क्रीट च्या सकाळीच कास्ट केलेल्या स्लाब वर आम्ही हे लाइव-लोड संध्याकाळीच अप्लाय केलं. तेव्हा पासून कुठल्याही स्लाब चेकिंगला गेलो की ती वोडका-युक्त आठवण वाहू लागते.

अननसा सारखाच मोठं आणि अनाकलनीय फळ म्हणजे फणस ! तो एकतर नुसता बघून कापा आहे का बरका आहे हे मला(तरी) कळत नाही आणि हे समजलं तरी तो पिकलेला आणि खाण्याजोगा आहे का हे समजणार कोणाला ? बरं आणि समजलं तरी घरी आणून तो कापणं हे कोण करेल ?. हात कपडे चाकू सुरी विळी याचं तळपट व्हायची जवळपास खात्री असते वर घरच्यांच्या शिव्या. तुला इंजीनिअर कोणी केला असं माझ्या एका मित्राला त्याचे वडील त्यानी उभ्या घराची फणस कापून दुर्दशा केल्यावर संतापून म्हणाले होते आणि फणस कापायला इंजीनिअरिंगला शिकवत नाहीत चारही वर्षात असं त्यांनी सांगितल्यावर तर ते अजूनच सरकले होते ! त्यापेक्षा गाडीवर गरे विकत घेऊन ते घरी आणून खावेत किंवा फणसपोळी हा एक अतिशय सुंदर कधीही तोंडात टाकण्यासारखा मेवा घेऊन ठेवावा.

फणसपोळी सारखाच कधीही खाता येण्यासारखं सुकं या विशेषणाला साजेसं दुसरं फळ म्हणजे अंजीर. याला वास फार नसतो पण चव एक नंबर असते. हे किंवा जर्दाळू हळू हळू चावत चघळत सिनेमा बघणे मला फार आवडतं. घरी हिरवी द्राक्षं खात खात टीव्हीवर सिनेमा बघणं हा पण एक छान अनुभव आहे. पण यात काळी द्राक्षं बसत नाहीत. टरबूज किंवा खरबूज किंवा पपई यांच्याविषयी मला मतच नाहीये. त्यांनी ना माझ्या मनावर कधी फुंकर घातलीये ना ओरखडा काढलाय.. हि काळी द्राक्षं पण कशी आणि कुठे खावीत यावर माझा अजूनही गोंधळच आहे. त्यासाठी लागणारा सेट अजूनही माझ्या लक्षात आलेला नाही. तीच गोष्ट किवी, प्लम किंवा आलुबुखार (हे एकाच आहे का निराळं?) यांची. मला हे कधी , कुठे आणि कसं खावं तेच अजून नित उमजलेलं नाहीये.

या उलट, संत्री आणि मोसंबी जरी एकाच प्रकारची असली तरी चवीत आणि वासात खूपच वेगळी. रेल्वे मधून जाताना सेकंड क्लास च्या डब्यात उघड्या खिडकीतून वारा अंगावर घेत संत्र सोलायचं आणि मस्त आस्वाद घेत घेत बिया खिडकीतूनच बाहेर थुन्कायच्या. संपलं की नवीन सोलायचा आणि परत हेच करायचं. शेवटी सगळाच बाहेर भिरकावून द्यायचं आणि मस्तपैकी डुलकी काढायची. रेल्वेचा प्रवास हा माझ्यासाठी असाच असू शकतो. पारीस ते नुरेन्बर्ग टीजीवी मध्ये एक तर वारा आत येऊ शकत नव्हता आणि आला असता तर सगळे प्रवासी उडून गेले असते, पण म्हणून मी तरी पण संत्र बरोबर घेऊनच गेलो आणि ते खाल्ल्यावर जरा मला बरं वाटलं पण थोडा विरस झालाच. मोसंबी अशी खाऊ शकत नाही मी. ती कोणी दिली तरच, स्वतःची स्वतः नाही. नाही म्हणायला होगारडन बिअर मध्ये मोसंबीची फाक टाकून देतात आणि जर ती नसेल तर मगच तिची खरी किमत कळते. आजारपणाशी याचं एक उगीचच नातं आहे. पण याचा ताजा रस मात्र अमृतातेही पैजा जिंकणारा असतो. स्कॉच सारखाच स्टीलच्या ग्लासात तो शोभत नाही. बिअरमग किंवा उभा उंच ग्लास असेल तरच मजा आहे. नळी टाकून पीत असाल तर त्याची चव वेगळी आणि सरळ ग्लासाला तोंड लावलंत तर अजून वेगळी.
हे शहाळ्याच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. मला शहाळं प्यायची खरी मजा त्याला तोंड लावून पिण्यात आहे असं वाटतं. त्यात ती प्लास्टिक ची नळकांडी टाकून आपण त्याच्या चवीपासून आणि गंधापासून दूर जात आहोत असा एक अकारण भाव वातावरणात येतो. मला आपलं ते शहाळं तोंडाला लावून त्यातलं पाणी हनुवटीवरून ओघळून शर्टात लुप्त होत असताना पिण्याची अनोखी तऱ्हा जास्त भावते. त्याला मातीचा स्वाद अलगद चिकटतो. माती म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर मातकट चिकू येतोच येतो. कधी कोणी कापलेले चिकू आपल्याला ऑफर केले आहेत असं मला आठवत नाही पण मी कापले तर त्याच्या त्या काळ्या चकचकीत बिया मला भुरळ घालतात आणि मी बराच वेळ त्या फेकायच्या बेताला नाकारत असतो. जहाल तिखट इडलीवडा सांबर खाल्ल्यावर चिकू मिल्कशेक फार मस्त असं माझं अनुभवांती मत झालं आहे. दुसरं म्हणजे तो फ्रुटसालेड मध्ये हवाच हवा. त्याशिवाय फ्रुटसालेडला बेस येत नाही. चिकू नसलेलं फ्रुटसालेड मी एका गुजराती लग्नात खाल्ल्यावर मला चिकूचं महत्त्व एकदम जाणवलं आणि पटलं पण होतं त्यामुळे गुजराती लग्न आणि चिकू अशी एक जोडी माझ्या मनामध्ये तयार झाली आहे.

शहाळं सोलून चौकोनी कापून फ्रीज मध्ये ठेवून गार करून पिण्याची अचाट पद्धत सर्वप्रथम बहुधा सिंगापोरनी प्रस्थापित केली! सिंगापोर मध्ये कुठल्याही फूड मॉल किंवा हॉकर सेंटरला फळांचा वेगळा कट्टा असतो आणि तिथे ताजा रस पण मिळायची सोय असते . बरीचशी फळ नीटसपणे कापून काचेच्या पेटीत ठेवली असतात . कलिंगड, अननस, किवी, लीची, सफरचंदा, पेअर्स आणि बरच काही. त्यातलं कलिंगड सोडून खही खावं असं मला कधीच वाटलेलं नाही. कलिंगडाच्या फाका खात खात ओरचर्द रोड वरून निरुद्देश भटकणं हा सिंगापोर पाहण्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि असायला देखील पाहिजे. पण लोक उगीच रंगवलेले पक्षी आणि युनिवर्सल स्तुदिओ बघून डोसा आणि ‘ब्रीयानी’ खातात आणि काही बाही गोष्टी विकत घेऊन दुरीअन नावाचा उग्र वासाचा फणस न खाता सिंगापोर पाहिलं असं म्हणून परत जातात याला काय करावं ! त्याचा तो उग्र आणि गोड वास जर आला नाही तर सिंगापोरला गेल्यासारखंच वाटत नाही. मला त्याची चव आवडत नसली तरी एखादा तुकडा मी नक्की खातो. मातकट, पिठूळ गोड आणि अतिउग्र अशी एकत्रित चव आणि वर तो भयंकर वास याचा अनुभव घेणं ही सिंगापोर बघायची एक अटच असायला हवी.

पैसे नसताना केलेली भटकंती विविध गोष्टी शिकवते. जेवणासाठी पैसे नसताना केळं हे एक उत्तम अन्न आहे असा शोध मला बंगलोर मध्ये आर्कीटेक्ट म्हणून काम करत असताना लागला होता. केळीची गाडी धरून ३-४ केळी खाल्ली की पोटाला आधार मिळतो हे मला तिथे समजलं होतं आणि मी हे ज्ञान लगेच बाकीच्यांबरोबर शेअर पण केलं. कसं आहे की केळं हे एक अतिपरिचयात अवज्ञा असं झालेलं फळ आहे. १२ महिने मिळत असल्यामुळेच त्याची किंमत नाही आपल्याला. त्याचा तो थोडासा उग्रच म्हणावा असा आंबटगोड वास, भरभरीत पोत, गोड आणि थोडीशी पिठूळ पण मसालेदार चव आणि खाण्यातला सोपेपणा मला फार आवडतो. अगदी शाळा सुटल्यावर सायकल चालवत चालवत केळं खात घरी मी किती तरी वेळा गेलो आहे. गाडीवर एकाच केळं विकत घेऊन तिथेच खाऊन त्याच साल भिरकावून द्यायची मजा पण वेगळीच होती पण आता तेवढी एक गोष्ट मी करत नाही. शिकरण आणि पूजेतल्या प्रासादातल केळं, बनाना मिल्क शेक आणि बनाना स्प्लीट मधला केळं, केळंयाचे वेफर्स आणि गोड दह्याच्या कोशिम्बिरीतलं केळं. वेगवेगळ्या अवतारात आणि वेगवेगळ्या चवीत अगदी सहज सामावून जाणार हे फळ. पण वाटीची कड त्याचे पातळ काप करायला वापरून त्यात सायीसकट दुध आणि साखर टाकून बोटांनी ढवळून केलेली शिकरण, त्याबरोबर आजीच्या हातची गरम गरम पोळी जिथे जमिनीवर बसून असंख्य वेळा खाल्ली ते ठाण्यामधलं कौलारू घर आणि अधलीमधली कौल काढून तिथे लावलेल्या प्लास्टिकच्या पारदर्शक कागदाचे ४-४ थर ओलांडून हवेतून धुळीचे कण टोकरत हळुवार त्या ताटाच्या अवती भवती पाझरणारे कवडसे हे अजूनही आठवणीतून गेले नाहीत. केळ्याची शिकरण अजूनही कधी कुठे खाल्ली तर माझे डोळे आसपास माझी आजी आणि ते मउ प्रकाशाचे कवडसे शोधू लागतात.

काबुल सारखी फळफळावळ उभ्या हिंदुस्थानात मिळत नाही असं म्हणत इथे राज्य स्थापन करूनही काबुलला जाण्याची आणि शेवटचा श्वास घेऊन तिथल्याच मातीत एकरूप होऊन जाण्याची अनिवार ओढ लागलेल्या सम्राट झहीरुद्दिन मोहम्मद बाबरच्या आठवणींमधे सुद्धा एक् मोठा भाग असलेली अशी ही फळं !

आता बाबरनामा परत एकदा वाचण्यासाठी एक मस्त रसरशीत कलिंगड घेऊन घरी जाणार आणि ते खातखात तो वाचून कलिंगड खाण्याच्या आठवणींमध्ये भर टाकण्याचा बेत करतोय मी ..

@सचिन बोकील

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

तुमचा बेत सुफळ होवो. छान लेख.

सचिन बोकिल's picture

9 Jun 2018 - 4:33 pm | सचिन बोकिल

धन्यवाद !

manguu@mail.com's picture

9 Jun 2018 - 4:31 pm | manguu@mail.com

छान. आता टरबूज आणले आहे.

सचिन बोकिल's picture

9 Jun 2018 - 4:35 pm | सचिन बोकिल

वा वा .. मजा आहे !!!

उगा काहितरीच's picture

9 Jun 2018 - 5:04 pm | उगा काहितरीच

वा ! मस्त लेख . अगदी "रसरशीत" झालाय .

सचिन बोकिल's picture

9 Jun 2018 - 6:27 pm | सचिन बोकिल

धन्यवाद !

शाली's picture

9 Jun 2018 - 6:18 pm | शाली

मज्जा :)

सचिन बोकिल's picture

9 Jun 2018 - 6:27 pm | सचिन बोकिल

हा हा!!! Thanks !

श्वेता२४'s picture

9 Jun 2018 - 6:55 pm | श्वेता२४

अप्रतिम लेख लिहिलाय अत्यंत आवडला

सचिन बोकिल's picture

9 Jun 2018 - 8:38 pm | सचिन बोकिल

धन्यवाद ...!

Nitin Palkar's picture

9 Jun 2018 - 7:57 pm | Nitin Palkar

लेख वाचल्यावर तोंडात आंबा, अननस,सीताफळ आणि इतर आवडत्या फळांची चव आली.

सचिन बोकिल's picture

9 Jun 2018 - 8:39 pm | सचिन बोकिल

हा हा !! सुख म्हणजे अजून वेगळं काय असतं ?

प्रभू-प्रसाद's picture

9 Jun 2018 - 9:16 pm | प्रभू-प्रसाद

छान जमलाय लेख.

शिकरणाच्या आठवणी बाकी अगदी अश्याच आहेत. फक्त पोळ्या आईच्या हाताच्या असायच्या व असतात.

सचिन बोकिल's picture

9 Jun 2018 - 10:10 pm | सचिन बोकिल

धन्यवाद! या आठवणी थोड्या फार फरकांनी सगळ्यांच्याच असतात, तपशील थोडे वेगळे.. त्या वेगळेपणात पण एक मजा असते ....

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 8:49 am | सचिन बोकिल

धन्यवाद ...

सोमनाथ खांदवे's picture

10 Jun 2018 - 11:47 am | सोमनाथ खांदवे

लहानपणी मी आणि एका मित्राने झाडांवर असलेल्या एका मधमाशा च्या पोळातून भरपूर मध काढला व त्यातील किमान अर्धा लिटर तर मी पिऊन घरी गेलो . कपडे इस्त्री करायला सुरुवात केल्या नंतर गुंगी आल्यामूळे इस्त्री चालू ठेवूनच झोपलो .शेवटी घराच्या नीं तोंडा वर तांब्याने पाणी मारून मारून उठवले पण तरी सुद्धा 4 / 5 तास नशेतच होतो
तुमच्या या लेखा मूळे दुर्मिळ आठवण जागी झाली .

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 8:48 am | सचिन बोकिल

अशी आठवण असायला हवी होती माझी असं फार वाटून राहिलंय !

कुमार१'s picture

10 Jun 2018 - 12:27 pm | कुमार१

चांगले लिहिलंय.

केळं मला आवडत नाही पण त्याचे एक वैशिष्ट्य आवडते. प्रवासात खायला ते एक उत्तम फळ आहे. ते खाताना आपले हात वा ते फळ यातलं काहीच धुवायची गरज नसते !

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 8:50 am | सचिन बोकिल

धन्यवाद ! हो.. अगदी खरं आहे .

विजुभाऊ's picture

10 Jun 2018 - 6:23 pm | विजुभाऊ

खूपच सुंदर लेख.

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 8:50 am | सचिन बोकिल

धन्यवाद !

भंकस बाबा's picture

11 Jun 2018 - 8:02 am | भंकस बाबा

माझ्या आज्याच्या आंब्याच्या बागा होत्या , हापुस आम्ही एका बैठकिला डजनावारी उड़वायचो , आता विकत घेऊन हापुस खाताना डोळे पाणावतात

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 8:52 am | सचिन बोकिल

एखाद्या छोट्या लेखात शब्दबद्ध करता आली तुमची भावना तर वाचायला खूप आवडेल.

खूप सुंदर लेख. फळांच्या खूप आठवणी जागवल्या.

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 10:40 am | सचिन बोकिल

धन्यवाद ..

भंकस बाबा's picture

11 Jun 2018 - 9:34 am | भंकस बाबा

संगणकावर टायपाचा भारी कंटाळा आहे, पानभर जरी लिहायचे म्हटले तरी तीन चार तास नक्की जातील

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 10:44 am | सचिन बोकिल

सर..मोबाईलवर व्हॉइस asisted टायपिंग बऱ्यापैकी सोपं आहे

अनिंद्य's picture

11 Jun 2018 - 11:36 am | अनिंद्य

@ सचिन बोकिल

लेख मस्त, आवडला. लहानपणी फळविक्रेत्यांकडची प्रचंड व्हरायटी बघून मोठेपणी फळाचे दुकान टाकावे असे माझे स्वप्न होते :-)

अननस कोरून त्यात व्होडकास्नात अननसाचे सचैल तुकडे - मेनू फार आवडला आहे.

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 12:56 pm | सचिन बोकिल

:) नक्की करून बघा ! आवडणार !!!

अनिंद्य's picture

11 Jun 2018 - 11:41 am | अनिंद्य

काळी द्राक्षं कशी आणि कुठे खावीत ...... त्यासाठी लागणारा सेट अजूनही माझ्या लक्षात आलेला नाही.

हरिवंशराय, रुमी, मीर अश्या महारथींनी सुचवल्याप्रमाणे, प्रेयसी / प्रियकरासोबत, एकांतात. .... सब मजे दरकिनार आलम के .... यार जब हमकिनार होता है ;-)

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 1:01 pm | सचिन बोकिल

काळी द्राक्ष हा खरंच जटिल विषय आहे.. रुमी म्हणालात म्हणून आठवलं run inward as unripe grapes hurry towards their own sweetness .. सोपं आणि अवघड एकत्र आहे !
आणि प्रियकर, प्रेयसी, एकांत ही बाजू उलगडून बघायची इच्छा अजूनतरी झाली नाहीये.. व्हावी असं वाटतंय ..

चांदणे संदीप's picture

11 Jun 2018 - 1:59 pm | चांदणे संदीप

अप्रतिम लेखन!

Sandy

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 2:54 pm | सचिन बोकिल

धन्यवाद ! :)

वीणा३'s picture

11 Jun 2018 - 9:55 pm | वीणा३

छान लेख

सचिन बोकिल's picture

11 Jun 2018 - 11:15 pm | सचिन बोकिल

@वीणा3 .. धन्यवाद !