Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by यशोधरा on Fri, 10/28/2016 - 21:57
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
माध्यमवेध
मत
माहिती
संदर्भ
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत. आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे. इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती. मी सुरुवात करते. ह्या वर्षी खूप अंक विकत घेतले नाहीत, किंमती खूपच वाढल्यात. हंसचा अंक ३००/- रुपयांना आहे! लोकसत्ताचा अंक घेतलाय आणि खूप आवडलाय. संग्रही ठेवण्यासारखा आहे. भटकंतींवरचे लेख, देशोदेशींच्या "ट्रंप" मानसिकतेच्या नेत्यांबद्द्लचे लेख, काही कंपन्यांच्या कार्य संस्कृतीवरचे लेख, नेताजींच्या फाईल्ससंबधित लेख. त्या शिवाय शेक्स्पिअरचा शोध हा माधव वझेंचा लेख, शैलेंद्र आणि त्याच्या तीसरी कसमबद्दलचा लेख, गिरिश कुबेर ह्यांच्या पुतिन युगावरील आगामी पुस्तकातील काही भाग, अजूनही काही लेख... आणि अर्थात वार्षिक राशिभविष्य! त्याशिवाय डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक अतिशय सुरेख आहे, खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/ तसंच अजून एक अक्षरनामा म्हणून अजून एक ऑनलाईन अंक आला आहे - http://www.aksharnama.com/client/diwali_2016 मेहता ग्रंथजगतचाही दिवाळी अंक आजच घरी येऊन पोचलाय, त्याबद्दल वाचल्यावर. तोवर तुम्हीही आपल्या आवडत्या अंकांबद्दल आणि त्यातील साहित्याबद्दल लिहा.
  • Log in or register to post comments
  • 34988 views

प्रतिक्रिया

Submitted by पुंबा on Wed, 11/02/2016 - 11:39

In reply to मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, by यशोधरा

Permalink

बाप रे..

बाप रे..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sat, 11/05/2016 - 10:54

In reply to मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, by यशोधरा

Permalink

हायल्ला..

तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... अकु आता दिवाळी अंकांतूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध करायला लागले? चांगली प्रगति आहे!!
  • Log in or register to post comments

Submitted by उल्का on Fri, 11/04/2016 - 14:56

Permalink

अ‍ॅन्ड्रॉइड वर दिवाळी अंक

Link इथे सर्व कृती दिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 11/05/2016 - 09:07

Permalink

छान धागा.

दिवाळी अंक यायला लागले आहेत. वाचून काही वाटलं तर लिहीन. तो पर्यंत केवळ पोच. धाग्यावर लक्ष ठेवून आहे. ( सो ही पोच) \ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Sat, 11/05/2016 - 09:22

Permalink

उपलब्ध इअंकांमध्ये -

उपलब्ध इअंकांमध्ये - साधनाच्या अंकातली मराठा आंदोलनावरची डॉ. कसबेंची मुलाखत चांगली आहे. विनय हर्डीकरांचा शरद जोशींवरचा लेख पसरट आहे, पण काही मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. साधनाच्या युवा अंकातल्या मोनिका लेविन्स्कीच्या भाषणाचा अनुवाद उत्तम. मूळ भाषण - https://www.ted.com/talks/monica_lewinsky_the_price_of_shame?language=en 'मौज' मधला नरेंद्र चपळगावकरांचा नेहरू आणि पटेलांवरचा लेख माहितीपूर्ण आणि संतुलित वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/05/2016 - 09:24

In reply to उपलब्ध इअंकांमध्ये - by विशाखा पाटील

Permalink

मौज चा इ अंक पण आहे?

मौज चा इ अंक पण आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 11/05/2016 - 15:29

In reply to मौज चा इ अंक पण आहे? by यशोधरा

Permalink

'मौज' मधला रवींद्र

'मौज' मधला रवींद्र अभ्यंकरांचा गोनिदांवरचा लेख सुरेख आहे. नरेंद्र चपळगावकर पास. विनया जंगले यांचा फुलपाखरे विषयावरच लेख सुरेख माहितीपूर्ण. इतर नामावली चांगलीच आहे. आशा बगे, अनिल अवचट, इरावती कर्णिक, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, गोविंद तळवलकर. यशवंत मनोहर, लक्ष्मिकांत तांबोळी... उफ्फ.. टंकाळा आला. लेख छान आहेत, पण अंकाची मांडणी विस्कळीत वाटली. तरीही वाचनीय.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 11/05/2016 - 16:07

In reply to 'मौज' मधला रवींद्र by सस्नेह

Permalink

http://www.reshakshare.com

http://www.reshakshare.com/2016/11/blog-post_22.html
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 11/05/2016 - 16:30

In reply to http://www.reshakshare.com by आदूबाळ

Permalink

एकंदरीत, अंक भरगच्च आहे !

एकंदरीत, अंक भरगच्च आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 11/05/2016 - 17:27

In reply to एकंदरीत, अंक भरगच्च आहे ! by सस्नेह

Permalink

अहो,

ते संजोपराव उर्फ़ जालावरचे रावसाहेब जे लेखक आहे त्यांना मौज या दिवाळी अंकाचं विनाकारण कौतुक करायची सवय आहे, आपली अभिरूची कशी उच्च आहे, वगैरे तो प्रकार असतो. त्यांचं लेखन वाचून अंक खरेदी करू नका. आपली आवड़ पाहुन दिवाळी अंक खरेदी करावा असे सुचवीन. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 11/05/2016 - 17:12

In reply to http://www.reshakshare.com by आदूबाळ

Permalink

लेखकराव!

लेखकराव!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 11/05/2016 - 10:01

Permalink

digitaldiwali पेक्षा

digitaldiwali पेक्षा aksharnama चा अंक जास्त आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 11/05/2016 - 15:29

In reply to digitaldiwali पेक्षा by एस

Permalink

aksharnama ऑनलाईन आहे का ?

aksharnama ऑनलाईन आहे का ? असल्यास लिंक द्या ना.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/05/2016 - 15:31

In reply to aksharnama ऑनलाईन आहे का ? by सस्नेह

Permalink

ताई, वाचा की वर ;)

ताई, वाचा की वर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/05/2016 - 15:46

In reply to aksharnama ऑनलाईन आहे का ? by सस्नेह

Permalink

नाय म्हंजी लेख वाह्चीतच न्हाय

नाय म्हंजी लेख वाह्चीतच न्हाय का वगीच आसं करता वं ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 11/05/2016 - 16:17

In reply to नाय म्हंजी लेख वाह्चीतच न्हाय by यशोधरा

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Sat, 11/05/2016 - 17:45

In reply to digitaldiwali पेक्षा by एस

Permalink

अक्षरनामा पोर्टलही चांगले आहे

अक्षरनामा पोर्टलही चांगले आहे. http://www.aksharnama.com/
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/05/2016 - 18:00

In reply to अक्षरनामा पोर्टलही चांगले आहे by विशाखा पाटील

Permalink

मनापासून आभार! डॉ. रा. चिं.

मनापासून आभार! डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे संपादित अंश मिळाले तेथे. ह्या लिंका मी ज्ञानब्रह्मापुढे आहुतीच्या तयारीनं उभा …तर ती जगण्याशी प्रतारणा ठरेल! मी महासमन्वयाचा लहानसा दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/05/2016 - 16:23

Permalink

आपल्या स्वातीताईचा लेख काही

आपल्या स्वातीताईचा लेख काही संस्करण करून माझी सहेली ह्या दिवाळी अंकात आला आहे. खाली मूळ लेखाची लिंक दिली आहे, अभिनंदन स्वातीताई! http://www.misalpav.com/node/30637
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 11/06/2016 - 15:05

In reply to आपल्या स्वातीताईचा लेख काही by यशोधरा

Permalink

धन्यवाद.

यशो, धन्यवाद, त्या अंकातच स्नेहांकिताचाही लेख आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Sun, 11/06/2016 - 14:43

Permalink

अंतर्नाद चांगला आहे.

भानू काळेंच लिखाण मला नेहमीच आवडतं त्यामुळे आवडतो अंक तो बाकी वाचून पहा. आणि अक्षर चांगला जमलाय .
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 11/07/2016 - 14:23

Permalink

तूर्तास

मेनका अंक वाचत आहे. गुरुनाथ तेंडुलकर कथा ठीक ठाक्,रुस्तुम सिनेमा ज्या घटनएवर आहे त्याचा लेखा जोखा करणारा तपशीलासह लेख आला आहे आणि वाचनीय आहे. दुसरी देशमुख यांची कथा ठीक पण अजून काही वाचावा असा वाटला नाही.कदाचित एखादा विनोदी अंक वाचण्याचा इरादा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Mon, 11/07/2016 - 20:02

Permalink

दिवाळी अंक

डिजीटल दिवाळी बघितला - मला वाटत हेच बरोबर आहे. प्रकाशित लेखांचे (अभि?)वाचन ह्या स्वरुपाचा दिवाळी अंक आहे. ह्रुषिकेश जोशीेचे मद्यपानवरील विवेचन आवडले. इतर ठिक ठाक आहे. अक्षरनामा फक्त इरावती कर्णिक यांचे मनोगत वाचले आणि आवडले. इतर वाचतोय सवडीने. लोकसत्ता अनवट भटकंती आवडली. या देशात कधी जाणे होइल असे मात्र वाटत नाही. सुदानवरील लेख हा भटकंती पेक्षा लेखकाला त्याच्या कामाच्या निमित्ताने आलेला काही व्यक्तींचा अनुभव आहे. शैलेंद्रवरील तिसरी कसमचा लेख जुनीच माहीती देत असला तरी फिल्मी पद्धतीने लिहिल्याने वाचायला मजा येते. म्हणजे बोलता तो मधेच उठून गेला किंवा त्याने सिगरेट शिलगावली सारखी वर्णने. नेताजींच्या मृत्युविषयीचा लेख तोचतोच आहे. मुळात या विषयात नेहमी तेचतेच मुद्दे येत राहतात. ज्यांचा नेताजींचा मृत्यु अपघातात झाला यावर विश्वास नाही ते कधीच विश्वास ठेवनार नाही हेच हा लेख सांगतो. पुतीन वरील लेख वाचायला सुरवात केली आणि सोडून दिला. कंटाळा आला. लोकमत मित्राकडे चाळला, वाचला नाही. फार जास्त बुद्धीजीवी किंवा माहीतीपर वाचायचा कंटाळा आला आता. बुद्धीच्या खाद्याची सीमा संपलीय. आता फारकाही पचवू शकनार नाही तरीही अनुभव अजून वाचायचा आहे. साधना किंवा अंतर्नाद बोलावून ठेवून नंतर कधीतरी सहा महिन्यानी वाचू असा विचार सुरु आहे. 'आवाज' अजून घरी पोहचला नाही. 'कॉमेडी कट्टा'मधे पुलंच्या गाठोड या पुस्तकातला 'रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त' हा लेख प्रचंड विनोदी आहे. हे पुस्तक मी या आधी वाचले नव्हते त्यामुळे लेख पण वाचला नव्हता. 'व्हाट्सअप दिनचर्या' फार्सिकल आहे काही पंचेस मस्त आहे. वाचन सुरुच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Fri, 11/11/2016 - 21:24

In reply to दिवाळी अंक by मित्रहो

Permalink

लोकप्रभा

अंतर्नाद आणि आवाज आज आले. अंतर्नाद तर आरामात दोन तीन महीन्यानी वाचायचे ठरवलेय. इतर वाचतोय हळूहळू.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Mon, 11/21/2016 - 12:50

In reply to दिवाळी अंक by मित्रहो

Permalink

दिवाळी अंक

दोन दिवस आजारी होतो तेंव्हा पडून पडून काय करायचे म्हणून अंतर्नाद सोडला तर होते ते सारे वाचून काढले. डिजीटल दिवाळी अभिवाचनाव्यतिरीक्त इतरही लेख त्यात आहेत. वर म्हटल्याप्रमाणे खादाडीला वाहीलेला अंक. मालिकेतले स्वयंपाक घर हे शुभांगी गोखले यांचे अभिवाचन मस्त आहे. लिहिलेही छान आहे आणि संयत अभिनयासहीत अभिवाचन आहे. मस्त आहे. इतरही काही लेख किंवा अभिवाचन चांगले आहेत. महेश एलकुंचलवारांची मुलाखत सहजच वैदर्भिय खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देते. अनुभव कथा विभाग यथा तथाच आहे. मला एकही कथा फारशी आवडली नाही. अरुणाचलच विषयीचा अनुभव चांगला आहे. नेहमीचे प्रवास वर्णन नाही किंवा शाळेत न येनारे विद्यार्थी नाहीत. १२ तास ब्रम्हपुत्रेचा प्रवास, किंवा ऑपरेशनचा अनुभव मस्त आहे. साधना शिलेदार यांचा कुमार गंधर्व आणि देवास वरचा लेख सुरवातीला नेहमीसारखा आहे म्हणजे हीच ती वास्तू जिथे कुमार गंधर्वानी गायन शिकले किंवा म्हटले. इत्यादी. नंतर लोकसंगीताच्या शोधार्थ आसपासच्या गावागावात केलेली भटकंती मस्त आहे. कदाचित हा एका वेगळ्या लेखाचा विषय होउ शकेल. अनिल अवचट यांचा स्टॉइनबर्ग वरील लेख मस्त आहे. एक व्यंगचित्रकार त्याने काढलेल्या रेषांपेक्षा न काढलेल्या रेषातून जे सांगतो ते अप्रतिम. मस्त आहे. त्याचे चित्र मस्त समजावून सांगितले आहेत.मुकुंद टाकसाळे यांची मेलामेली पण मस्त आहे. अमेरीका किंवा इतर लेख ठिकठाक आहे. मुशाफिरी मधला ट्रेक केल्यानंतर खायच्या चांगल्या किंवा वाइट जागा यावर लेख आहे. नवीन माहीती आहे. आवाज हल्ली विनोदी कथा त्याच त्याच प्रकारात मोडनाऱ्या असतात. गावातला इरसाल पाटील आणि त्याचे एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स, प्रेमकथा आणि ट्रिक्स, काही इरसाल पोर. आवाजचा हा अंकही त्याला अपवाद नाही. मंगला गोडबोलेंची कथा किंवा लेख वेगळा आहे. २०५० साली मराठी संस्कृतीचे मुझियम वगेरे असली कल्पना आहे. इतर कथा नेहमीच्या लेखकांनी नेहमीच्या पद्धतिने लिहिलेल्या आहेत.त्यातल्या त्यात मिलिंद शिंत्रे यांची कथा चटकदार संवादामुळे मजेशीर आहे. चित्रे वगेरे आवाज सारखीच. लोकप्रभामधे कथा स्पर्धेतल्या कथांव्यतिरीक्त फार काही वाचले नाही. लहान मुलांचे म्हणून असनारे अंक wimpy kid किंवा geronimo stilton वाचनाऱ्या हल्लीच्या मुलांना वाचावयावसे वाटत नाही. आता अंतर्नाद सहा महिन्यांनंतर, डोक्याला थोडी विश्रांती हवी. तेंव्हा दिवाळी अंक वाचन जवळ जवळ संपले.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 11/21/2016 - 14:43

In reply to दिवाळी अंक by मित्रहो

Permalink

आवाजबाबत

सहमत. अगदी गंडलेला आणि खिडकीचित्रे विनोदी कमी ओंगळ जास्ती आहेत कथा भागात आनंदी आनंद आहे. कथाश्री वाचला काही कथा छान आहेत आणि चक्क सकारात्मक आहेत त्या मुळे आवडल्या "दवणे"वगळता बहुतांश वाचल्या (आणि पश्चाताप झाला नाही)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 11/21/2016 - 12:54

Permalink

'माहेर' वाचला.

'माहेर' वाचला. केवळ अनुल्लेखनीय ! मांडणी विस्कळित. जाहिराती मायंदाळ ! दर्जा घसरलाय. २-३ कथा/लेख चांगले आहेत. बाकी ठीक.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 11/21/2016 - 13:01

In reply to 'माहेर' वाचला. by सस्नेह

Permalink

काय सांगतेस! :(

काय सांगतेस! :(
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 11/21/2016 - 13:10

In reply to काय सांगतेस! :( by यशोधरा

Permalink

:(

:(
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 11/21/2016 - 13:02

Permalink

कोणी कालनिर्णय वाचला का?

कोणी कालनिर्णय वाचला का?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 11/21/2016 - 21:28

Permalink

आज मौज दिवाळी अंक आणला आहे.

आज मौज दिवाळी अंक आणला आहे. कथा, कविता ह्यासोबत रेखाटने, ललित लेख आणि वैचारीक साहित्य असे बरेच काही आहे असे दिसतेय. मिलिंद बोकीलांची सरोवर ही लघुकादंबरी.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 11/27/2016 - 15:25

In reply to आज मौज दिवाळी अंक आणला आहे. by यशोधरा

Permalink

मौज वाचते आहे आणि आवडतो आहे.

मौज वाचते आहे आणि आवडतो आहे. कथांमध्ये - आशा बगे आणि शर्मिला फडके ह्यांच्या कथा वाचून झाल्या आहेत आणि आवडल्यात. बाकीच्या २-३ अजून वाचायच्या आहेत. कविता विभागामध्ये - चिमण्या (सतीश काळसेकर), सुंदर (वि ज बोरकर), अर्पण (वसंत वाहोकार), स्वातंत्र्य (नीलिमा गुंडी) ह्या मला आवडलेल्या. बाकीच्याही चांगल्या आहेत. ललित लेख - सगळेच वाचनीय. कथा फुलपाखरांची हा विनया जंगले ह्यांचा फुलपाखरांच्या जगाविषयीचा लेख अत्यंत सुरेख जमलाय, पुन्हा पुन्हा वाचावा असा. डॉ अरूण टिकेकरांवरचा - विवेक पेरणारे गुरु हाही एक जमलेला लेख. एक उत्तम, साक्षेपी संपादक आपल्या सहकार्‍यांनाही किती अनुभवसंपन्न आणि शहाणे करुन सोडतो हे सांगणारा संयत भाषेतला लेख. रवींद्र अभ्यंकरांचा अप्पांच्या आठवणी, अवचटांचा साधना आणि शांता शेळक्यांच्या घरा आणि घरातल्यांविषयींचे लेखही आवडले. बर्‍याच काळानंतर अवचटांचे काहीही उपदेशपर नसलेले लेखन वाचायला आवडले. उर्वरित अंक संपल्यावर...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sat, 11/26/2016 - 19:47

Permalink

अंतर्नाद, लोकसत्ता

निवृत्त न्यायधिश नरेन्द्र चपळगांवकर ह्यांचा राजाजींच्या राजकीय जीवनावर लिहीलेला विस्तृत व माहितीपूर्ण लेख, तसेच भानू काळेंच्या आगामी "अंगारवाटा: शोध शरद जोशींचा" ह्य चरित्रात्मक पुस्तकातील,जोशींच्या पंजाब-स्वारीबद्दलचा प्रदीर्घ लेख अंतर्नादचे वैशिष्ट्य ठरावे. ह्याचबरोबर, विनय हर्डीकरांचा गोविंदराव तळवलकरांवरील लेखही वाचनीय आहे. अंजलि कीर्तने त्यांच्या आनंबईबाई जोशींवर काढलेल्या लघुपटाबद्दल माहिती देत आहेत; दीपक करंजीकरांच्या आयुष्यातली अचानक आलेली वळणे त्यांनी कथिली आहेत. जे. के. रोलीगवर विवेक गोविलकरांचा लेख आहे. विजय पाडळकरांनी हायकूबद्दल स्फूटलेख लिहीला आहे. अवधूत परळरांनी,, सुहास बहुलकरांच्या चित्र-शिलप कलेसंदर्भतील तीन पुस्तके लिहीली आहेत, त्यांजविषयी थोडक्यात पण अचूक माहिती देणारा चांगला लेख लिहीला आहे. ह्यातील दोन पुस्तके, चित्रकार देऊसकर, व शिल्पकार करमकरांच्या कलाप्रगतीचा आढावा घेणारी आहेत, त्यात सदर कलाकारांच्या त्यांच्या कलेशी निगडीत आयुष्याचा धांडोळा घेतला आहे, हे परळकरांनी मुद्दाम नजरेत आणून दिले आहे. तिसरे पुस्तक जे. जे. स्कूलच्या भोवती केंद्रीत झालेल्या 'स्कूल ऑफ आर्ट'विषयीचे आहे. त्यात बहुलकरांनी ह्या स्कूलने कुठल्या वाटा चोखाळल्या, त्याबद्द्दल टिपण्णी केली आहे. शैलेश माळोदे ह्यांचा भारतात गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या, मग इथेच स्थायिक होऊन कार्यरत असलेल्या आफ्रिकन लोकांविषयी लिहीलेला लेख अनोखी माहिती देतो. गिरीश कुबेरांच्या पुतीनकालीन रशियावरील आगामी पुस्तकातील एक मोठा उतारा लोकसत्तेचे वैशिष्ट्य आहे. विजय पाडळकरांनी शैलेंद्रच्या 'तीसरी कसम' च्या निर्मीतीची हकिकत सांगणारा लेख आहे, ज्यात शैलेंद्र ह्य निर्मीतीच्या उद्योगात कसा भरडून निघाला, व त्यातच त्याचा शेवटी दुर्दैवी अंत कसा झाला, त्याविषयी सविस्तर माहिती आहे. जुने व जाणते रंगकर्मी माधव वझे ह्यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर लिहीलेला लेख व ताज्या दमाचे रंगकर्मी अतुल पेठे ह्यांचा कलाकारांच्या सर्जनक्रियेची उहापोह करणारा लेख, दोन्ही अनोख्या विषयांवरील आहेत. सत्यशील देशपांडेंनी 'ख्याल गायकी'वरील चिंतनाविषयी लिहीले आहे. ह्याव्यतिरीक्त ह्या अंकात तीन विषयांवरील लेखांचे संकलन आहे. पहिला विषय, अनोख्या देशांत सफर करून आलेल्यांनी तेथील अनुभव व त्यांची तेथील जीवनवैशिष्ट्यांबद्दलची टिपणे. ह्यांतील अफगानिस्तान, सुदान, कंबोडिया व उझबेकिस्तानवरील लेख उल्लेखनीय वाटले. दुसरा विषय राजकीय आहे: वेगवेगळ्या देशांत नवे राजकीय प्रवाह आणणार्‍या पुढार्‍याविषयी ह्या लेखांत आढावा घेतला गेला आहे. तिसरा विषय आहे, पाशिमात्य देशांतील कॉर्पोरेट जगतांतील कार्यसंकृती. ह्यांत गूगल, मेड-एल इलेक्ट्रॉनिक्स व कमिन्स येथे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या तरूण मराठी व्यक्तिंची कथने आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Sat, 11/26/2016 - 20:01

In reply to अंतर्नाद, लोकसत्ता by प्रदीप

Permalink

दोन्हीही वाचावेसे वाटताहेत..

दोन्हीही वाचावेसे वाटताहेत.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 11/30/2016 - 19:23

Permalink

सामनामधील उल्लेखनीय लेख -

सामनामधील उल्लेखनीय लेख - संजय नहार ह्यांचा 'तोपर्यंत कश्मीर असेच जळत राहील' हा लेख. वीरांच्या गावा जावे हा मिलिटरी अपशिंगे ह्या सातार्‍यापासून १७ किमी अंतरावर असलेल्या गावावरचा लेख. गॉडमदर हा शिरिष कणेकरांचा लतावरील लेख. कथा - कंसातील वाक्यं - मंगला गोडबोले आणि ललाटीचे लेख(क) - अजय पुरंदरे. मिपाकर प्रसन्न केसकरांचा सेल्फीचा धूमधडाका हा लेखही आहे ह्या अंकात.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Sat, 12/03/2016 - 17:39

Permalink

जीवनज्योत दिवाळी अंक २०१६

लोकमान्य सेवासंघ विलेपार्ले, मुंबई वाचनालयात दर वर्षीप्रमाणे यंदाही १५० रुपयात १५० दिवाळी अंक ही योजना चालू आहे. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंक घरी नेता येतील (नाव नोंदणी अजूनही शक्य आहे). कालच मी जीवन ज्योत हा अंक आणला. डॉक्टर विद्याधर ओक यांचा '२२ श्रुती संशोधन' हा लेख अत्यंत माहितीपूर्ण वाटला या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. दुसरा चांगला लेख म्हणजे मुकुंद सराफ यांचा 'वाटचाल भावगीतांची १९२६-२०१६.'
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 12/03/2016 - 17:47

In reply to जीवनज्योत दिवाळी अंक २०१६ by श्रीनिवास टिळक

Permalink

कोणते संकेतस्थळ?

कोणते संकेतस्थळ? जसे अंक वाचाल, इथे माहिती लिहित जावी अशी विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Sat, 12/03/2016 - 18:15

In reply to कोणते संकेतस्थळ? by यशोधरा

Permalink

जीवन ज्योत दिवाळी अंक २०१६

क्षमस्व; हे संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Sat, 12/03/2016 - 22:12

In reply to कोणते संकेतस्थळ? by यशोधरा

Permalink

संकेत स्थळ

संकेत स्थळ www.22shruti.com
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Sat, 12/03/2016 - 22:02

Permalink

जीवन ज्योत दिवाळी अंक २०१६

क्षमस्व; हे संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाजी on Sun, 12/04/2016 - 18:01

Permalink

ग्राहकहीत दिवाळी अंक

गेले दोन दिवस ग्राहकहितचा दिवाळीअंक वाचत आहे. अर्धा जाहिरातींनीच भरला आहे. उरलेल्यात "असे वक्ते अशी भाषणे", "माय होममिनिस्टर" व "ध्यास गाथा" असे तीन विभाग आहेत. असे वक्ते मधे मला वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा भगतसिंह, डॉ.केशवराव हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेड्कर, सी.डी. देशमुख याची भाषणे विशेष आवडली. अर्थात अजून पुष्क्ळच वाचन बाकी आहे. विभागात एकूण २४ भाषणे आहेत. होम मिनिस्टर या विभागात के.एम. संचेती, नितिन गडकरी, प्रकाश जावडेकर, आदेश बांदेकर, सुबोध भावे अशा राजकारण व मनोरंजन क्षेत्रातील १४ व्यक्तींनी पत्नीबद्दल लिहिलेले लेख आहेत.ध्यास या विभागात रा.चि. ढेरे, शि.द.फडणीस, अरुण टिकेकर व पं. मधुकर धुमाळ यांच्याबद्दल लेख आहेत जे मी अजून वाचले नाहीत. जे काही वाचले आहे त्यावरून हा अंक मला संग्राह्य वाटत आहे. आता अर्थातच अंक मिळेल ह्याची खात्री नाही. मीही वाचनालयातूनच आणला आहे. गंभीर व विचारप्रव्रुत्त वाचकांना हा अंक जरूर आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sun, 12/04/2016 - 19:53

In reply to ग्राहकहीत दिवाळी अंक by प्रियाजी

Permalink

अंक

नक्कीच वाचनीय दिसतोय. पुढेमागे वाचला पाहिजे ह्याची नोंद केली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/09/2016 - 19:49

Permalink

आज लोकमत दि अं घेतलाय वाचायला

आज लोकमत दि अं घेतलाय वाचायला. रस्किन बाँड बद्दल शर्मिल फडकेंनी लिहिलेला लेख आणि गिरिजादेवींची, वंदना अत्रेंनी घेतलेली लेखवजा मुलाखत वाचून झाली. पैकी गिरिजादेवींना त्यांच्या गायन प्रवासाबद्दल अधिक बोलकं करायला हवं होतं, असं वाटून गेलं. लोकमतच्या अंकाचं मुख्यपृष्ठावरील सायकलीचा हाय अ‍ॅंगलने घेतलेला फोटो भारी आवडला. कल्पकतेला दाद.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 12/09/2016 - 19:52

In reply to आज लोकमत दि अं घेतलाय वाचायला by यशोधरा

Permalink

रस्किन बाँड बद्दल शर्मिल

रस्किन बाँड बद्दल शर्मिल फडकेंनी लिहिलेला लेख
कशाबद्दल आहे लेख? (मी रस्किन बाँडचा फ्यान आहे...)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/09/2016 - 19:54

In reply to रस्किन बाँड बद्दल शर्मिल by आदूबाळ

Permalink

मी पण :) शर्मिला त्यांना

मी पण :) शर्मिला त्यांना भेटायला गेली होती, त्यांची मुलाखतवजा लेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 12/12/2016 - 20:06

In reply to आज लोकमत दि अं घेतलाय वाचायला by यशोधरा

Permalink

लोकमतमधील अजून एक वाचनीय लेख

लोकमतमधील अजून एक वाचनीय लेख म्हणजे एन एच ४४. लोकमतची टीम आसेतूहिमाचल- कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सामान्य भारतीयाचे आयुष्य न्ह्याहाळत/ वेगवेगळे अनुभव घेत फिरली, त्यावर आधारीत लेख. ह्याशिवाय क्यों - कांझा जावेद, फिक्सर्स - शची मराठे, रानोमाळ - वैशाली करमरकर हे लेख आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Fri, 12/09/2016 - 20:23

Permalink

रस्किन बॉण्ड

ऑल्वेज रॉक्स . बाकी ग्राहकहित चा अंक वाचण्यात येईल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sat, 12/10/2016 - 10:33

Permalink

कालनिर्णय, ऋतुरंग

कालनिर्णयच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी लेखमाला म्हणजे सिनेमावरील लेख. ह्यात संजय छाब्रिया ह्यांनी प्रचलित मराठी सिनेमाच्या अर्थशास्त्राविषयी माहिती दिली आहे. राजन जयकरांनी मूकपटांविषयी लिहीले आहे, नरेंद्र बंडबे ह्यांचा स्टॅनली क्युब्रिकवरील लेख आहे. ह्याव्यतिरीक्त अंकामधे आरती कुळकर्णींनी केलेले इजिप्तच्या अनोख्या प्रवासाचे वर्णन आहे. न्या नरेंद्र चपळगांवकरांचा वल्लभभाई पटेलांच्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीचा आढावा घेणारा प्रदीर्घ लेख आहे. पुणेकरांना आवडावा असा तेथील पूर्वीच्या एका कट्य्ट्याच्या दिवसांची आठवण काढणारा 'कट्य्ट्याचे दिवस' हा श्रीरंग गोडबोलेंचा लेख आहे. एकंदरीत अंकाची मांडणी, विषयांची निवड ह्यात फारसे सुसूत्र ह्या अंकात दिसत नाही. 'ऋतुरंग' एकाच विषयाला वाहिलेल्या लेखांनी भरलेला आहे. विषय कुणालाही अतिशय जिव्हाळ्याचा वाटावा असा आहे-- आपला बाप. ह्यांत आपापल्या वडिलांविषयी, त्यांच्या व स्वतःच्या नातेसंबंधांविषयी समाजातील अनेक क्षेत्रांतील, व अनेक प्रवृत्तिच्या व्यक्तिंनी लिहीले आहे-- गुलजार, लता मंगेशकर, शरद पवार, यशवंतराव गडाख, सुशिलकुमार शिंदे, जवेद अख्तर, राजीव खांडेकर, विद्या बालन, जॉनी लिव्हर, नागराज मंजुळे, सिसिलिया कार्व्हालो, संदीप वासलेकर, सतीश भावसार, सदानंद मोरे, तौफिक कुरेशी, ज्ञानेश्वर मुळे, अमृता सुभाष, तसेच कलबर्गी, पाणसरे व नरेंद्र दाभोळकरांच्या मुलांनीही त्यांच्या वडिलांवर लिहीले आहे. ह्यातील काही लेख अतिशय उत्कट आहेत, ज्यांतून लेखक्/लेखिका व वडिल ह्यांच्या नातेसंबंधावर बरावाईट प्रकाश पडतो-- लताबाई, सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, संदीप वासलेकर, यशवंतराव गडाख ही ह्यांतील ठळक उदाहरणे. इतर काही लेख तर निराशा करणारे आहेत. उदा. गुलजार सरळच सांगतात की त्यांचा व त्यांच्या वडिलांचा फारसा संबंध आलाच नाही, विद्या बालनांचा लेख थोडा ओढूनताणून लिहीलला वाटतो. आणि हो, ह्याच मालिकेत शोभा डे ह्यांचाही त्यांच्या वडिलांच्या आठवणी सांगणारा लेख आहे !
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com