✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचें गोंय - भाग ११ - कोंकणी भाषा – इतिहास आणि आज

ट
टीम गोवा यांनी
Mon, 02/18/2013 - 09:48  ·  लेख
लेख
*** आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा *** कोंकणी भाषा – इतिहास आणि आज गोव्यात आल्यानंतर अगदी ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे इथे बोलली जाणारी गोड काहीशी सानुनासिक कोंकणी भाषा. १९९२ साली तिला राजभाषेचा दर्जा मिळाला. पण ती मराठीला इतकी जवळची आहे की अजूनही कोंकणी ही स्वतंत्र भाषा आहे की नाही यावरून वाद होतात. खरं पाहता, मराठी ज्याला कळते त्याला जरा सावकाश बोललेली कोंकणी कळते. आपण सर्वांनीच मुंबई आकाशवाणीवरील 'कोंकणीतल्यान खोबरों' कधीतरी ऐकल्या असतीलच. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर गोव्यात महाराष्ट्रात विलीनीकरण आणि त्याच्या अनुषंगाने कोकणीचा स्वतंत्र चर्चा याबद्दल जोरात चर्चा सुरू झाल्या. यावरून हिंसक आंदोलनं सुद्धा झाली पण शेवटी १९७५ साली साहित्य अकादमीने कोंकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला. आणि नंतर १९८७ साली गोव्यात कोंकणीला राजभाषा म्हणून दर्जा मिळाला. कोकणी ही इंडो युरोपियन समूहातली इंडो आर्यन भाषा आहे. मराठी आणि कादोडी या तिच्या अगदी जवळच्या भाषा आहेत. मालवणी आणि कुडुंबी या भाषा सुद्धा कोंकणीच्याच गटात वर्गीकृत केल्या जातात. 'कोंकण' हे नाव कोकणे या आदिवासींवरून या प्रदेशाला मिळालं असावं असा अंदाज आहे. आता हे आदिवासी नासिक, डांग ठाणे या प्रदेशात मुख्यत्वेकरून आढळतात, पण प्राचीन काळात त्यांची वस्ती रत्नागिरीच्या आसपास होती असं म्हणतात. त्यांच्या भाषेचं कोंकणीशी काही साधर्म्य दिसतं. संस्कृत आधी वापरात आली की प्राकृत याबद्दल वाद आहेत, त्यात आपल्याला पडायचं नाही. पण प्राकृत ही मराठी आणि कोंकणी दोन्हीची जननी अहे अस एक समज आहे. परंतु, कोंकणीत काही शब्द संस्कृतमधून थेट आलेले आजही वापरात आहेत, ते मराठीत फार प्रचलित नाहीत, जसे की, 'उदक' म्हणजे पाणी 'हांव' म्हणजे मी हा तर सरळ अहम ला जवळचा आहे. आपय (आव्हय) म्हणजे बोलाव, रांध म्हणजे शिजव वगैरे. संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषा इ.स. २०० ते ४०० च्या आसपास कोकणात रहात असलेल्या लोकांच्या भाषा होत्या. पैकी संस्कृत ही पूर्णपणे नियमानी बांधलेली, तर प्राकृत ही सगळ्या लोकांच्या बोलण्यात असलेली. प्राकृतच्या अनेक उपशाखा होत्या. यातल्या शौरसेनी प्राकृत आणि महाराष्ट्री प्राकृत या दोन्हींचा कोंकणीवर खूप प्रभाव दिसून येतो. इ.स. ८७५ च्या आसपास महाराष्ट्रात महाराष्ट्री वापरात होती, या महाराष्ट्री प्राकृतमधून अपभ्रंश भाषा उदयाला आली. तिच्यात कोंकणीची काही बीजं दडलेली आहेत. सातवाहनांचं साम्राज्य गोव्यातही होतं हे लक्षात घेतलं तर प्राकृतमधून कोंकणीचा विकास झाला असावा असं मानण्याला जागा आहे. कारण सातवाहनांचा सर्व कारभार 'महाराष्ट्री मधून चालत असे. प्राकृत भाषेत लिहिलेल्या 'गाथा सप्तशती' मधे 'ण' चा वापर सढळ हस्ते होतो. गाथा सप्तशतीमधली णई म्हणजे नदी कोंकणीत येते ती न्हई होऊन. कोंकणीत नऊ ला "णव" म्हणतात आणि 'ण' या अक्षरापासून सुरू होणारे शब्द इतर कोणत्या भाषेत जवळ जवळ नाहीतच! शौरसेनीचा कोंकणीवरचा प्रभाव 'दांडो' 'सुणो' अशा 'ओ'कारान्त शब्दातून दिसून येतो, याच कारणाने म्हणजे शौरसेनीच्या प्रभावामुळे गुजराती आणि बंगाली भाषांमधे असे 'ओ'कारान्त शब्द सापडतात. महाराष्ट्री मधून मराठी आणि कोंकणी भाषा वेगवेगळ्या विकसित झाल्या असाव्यात, मराठी आणि कोंकणीमधे लक्षात येण्यासारखा ठळक फरक म्हणजे “मी येतो” आणि “मी येते” या दोन्हीसाठी कोँकणीत आहे “हांव येतां”. भूतकाळ आणि भविष्यकाळाची रूपे करताना मात्र “आयलो/आयले” आणि “येतलो/येतले” हे दोन्ही भाषांत सारखंच आहे. काही ठिकाणी 'आसा' म्हणजे 'आहे' याचा उच्चार 'आहा' असा करतात. यावरून मराठी आणि कोंकणीत किती थोडा फरक आहे हे लक्षात यावे. पण या दोन्हीं भाषांच्या मधला दुवा म्हणजे 'पैशाचिक प्राकृत'. गोव्यात कोंकणी भाषेत उपलब्ध असलेलं पहिलं लिखाण म्हणजे 'कृष्णदास शामा' याने १५ व्या शतकात लिहिलेले गद्य महाभारत आणि रामायण. यांची भाषा खूपशी पैशाचिक प्राकृतला जवळची आहे असं वि. का. राजवाडे यांनी म्हटलं आहे. ही पुस्तके पोर्तुगालमधे संग्रहालयात आहेत असे म्हणतात, पण त्या भाषेचा नमुना सध्या उपलब्ध नाही. आजच्या काळातली मालवणी बोली सुद्धा मराठी आणि कोंकणी यांच्या अधेमधे कुठेतरी येते. चक्रधरस्वामींनी आपल्या शिष्यांना उपदेश केला, "कर्नाटकदेशी न वचावे" हे 'वच' म्हणजे 'जाणे' कोकणीत जसेच्या तसे आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या रचना 'अमृतानुभव' आणि ज्ञानेश्वरी' प्राकृतात केल्या असं म्हटलं जातं. अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी दोन्हीत कोकणीला जवळचे अनेक शब्द आहेत. त्यांची उदाहरणं इथे देण्याचा मोह आवरत नाही. 'नेणों' म्हणजे "माहिती नाही", बाईल म्हणजे स्री, राति म्हणजे रात्र, दिवो म्हणजे दिवा, नीद म्हणजे झोप, मसी म्हणजे शाई, सोयरिक म्हणजे नातं, आणि असेच कितीतरी शब्द! 'निदेचे जाउपे' ही शब्दयोजना म्हणजे निद्रेचे अपत्य, अर्थात अशा तर्‍हेची शब्दयोजना कोकणीत आजही आहे, ती 'करप म्हणजे करणे, 'खावप' म्हणजे खाणे इ. ज्ञानेश्वरीत शब्दांची 'ठावो' 'दिवो" अशी 'ओ'करान्त रूपे येतात ती तशीच्या तशी आजच्या कोंकणीतही वापरात आहेत. किंबहुना कोंकणी नीट बोलता यायला लागली त्यानंतरच ज्ञानेश्वरीचा अर्थ सोपेपणाने समजायला लागलाय. काळाबरोबर गोव्यातले राज्यकर्ते बदलत गेले तसे, कोंकणी भाषेत आणखी अनेक शब्दांची भर पडत गेली. शेतीशी संबंधित शब्द गोव्यातल्या मूळ रहिवाशांच्या बोलीतून कोंकणीत आले, जसे की, कुमेरी, मेर, खाजण. तसंच तांदूळ, नाल्ल (नारळ) ढोल इ. शब्दांचा उगम द्रविड लोकांकडे आहे. इतिहासात कधीतरी सुमेरियन लोक कोंकणात आले असावेत असा एक कयास आहे. कोंकणीतले काही शब्द सुमेरियन भाषेतून आलेले आहेत असे श्री अनंत शेणवी धुमे यांचे म्हणणे आहे. मूळ कर्नाटकातल्या कदंबांचं गोव्यावर राज्य होतं, तेव्हा काही कन्नड शब्द कोंकणी भाषेत येणं अपरिहार्यच होतं! जसे भांगर म्हणजे सोनं, तांती म्हणजे अंडे, मॉड म्हणजे ढग. तसेच अरब व्यापार्‍यांनी आपल्याबरोबर दुकान, जवाब. कबूल, चाबूक असे शब्द आणले ते मराठीतही त्याच अर्थाने वापरले जातात. पोर्तुगीज भाषेतले अनेक शब्द कोंकणीत सामावून गेले, जसे, जनेल म्हणजे खिडकी, कदेल म्हणजे खुर्ची, आलमारी म्हणजे कपाट, कोपेल म्हणजे चॅपेल, पाव म्हणजे पाव वगैरे. पोर्तुगीजांच्या स्थानिक भाषा नाहीशा करण्याच्या धोरणामुळे कोंकणीत असलेलं प्राचीन साहित्य नाहीसं झालं. पोर्तुगीजांच्या अमदानीत संस्कृत, मराठी किंवा कोंकणी पुस्तक जवळ बाळगणं हा गुन्हा समजला जात असे, आणि जी पुस्तकं जप्त होत ती पोर्तुगीजानी नष्ट करून टाकली. आजही गोव्यातले अनेक लोक पंढरीची वारी करतात, पूर्वीही करत असत, त्यामुळे मराठी संतसाहित्य मौखिक स्वरूपात गोव्यात जिवंत राहिलं. कृष्णदास शामाची कोंकणी कृती 'महाभारत' पोर्तुगालमधल्या एका संग्रहालयात राहिली त्यामुळे त्याचं नाव तरी राहिलं. मराठी आरत्या ज्याच्या नावावर प्रसिद्ध आहेत तो 'विष्णुदास नामा' याच्या नावावर काही कोंकणी रचना आहेत. पोर्तुगीज काळात कोंकणी ही फक्त बोलीभाषा राहिल्यामुळे कोंकणीला स्वतःची अशी लिपी विकसित करता आली नाही. कदंबांच्या काळात 'गोंयकानडी' नावाची एक लिपी वापरात होती, आता ती अस्तित्त्वात नाही. साधारणपणे देवनागरी ही नंतरच्या काळात कोंकणीची लिपी म्हणून प्रामुख्याने वापरली गेली. काही पोर्तुगीजानी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कोंकणी भाषा शिकून घेतली. मग फादर स्टीव्हन्स याने कोकणी व्याकरणाची आणि कोंकणी भाषेवरच्या ग्रंथाची रचना रोमन लिपीत लिहिलेल्या कोंकणीत केली. १६२२ साली प्रकाशित झलेलं हे पहिलं कोंकणी भाषेतील पुस्तक. सध्या कर्नाटकाच्या किनारी भागात कोंकणी लिहायला कानडी लिपी वापरली जाते तर केरळच्या किनारी भागात मल्याळम लिपी. अगदी थोड्या प्रमाणात अरेबिक लिपीही कोंकणीसाठी वापरली जाते. पोर्तुगीजांच्या अत्याचारांनंतर २० व्या शतकाच्या सुरुवातीला कोंकणीभाषिकांची अस्मिता जागृत झाली. कोंकणी भाषेच्या संवर्धनासाठी मोठं कार्य केलं ते शणै गोंयबाब अर्थात वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर (१८७७-१९४६) यानी. त्यानी कोंकणीच्या संदर्भात मुंबईत राहून फार मोठं कार्य केलं पण त्याचा पाया मराठीचा द्वेष हा होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं होतं आणि आयुष्य मुंबईत गेलं पण त्यानी आयुष्यात कधी एकही मराठी शब्द उच्चारला नाही असं म्हणतात. त्यांच्या नावावर २९ कोंकणी पुस्तकं जमा आहेत. कोंकणी भाषेच्या संदर्भात आणखी मोठं कार्य करणारे लेखक म्हणजे माधव मंजुनाथ शानभाग यानी कारवारला राहून आपलं कार्य चालवलं. यानी १९३९ साली कारवार इथे पहिली अखिल भारतीय कोंकणी परिषद भरवली. शब्दप्रभू बा. भ. बोरकर म्हणजे बाकीबाब यानी आपल्या काही कविता कोंकणी भाषेत लिहिल्या आहेत. ‘सासय’ या कोंकणी कवितासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. हल्लीच्या काळात मनोहरराय सरदेसाय, शंकर रामाणी, नागेश करमली, जे बी मोराईस इत्यादीनी उत्तमोत्तम साहित्य निर्मिती कोंकणीत केली आहे पण यावर कळस चढवला तो रवीन्द्र केळेकराना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने. १९६१ साली पोर्तुगीजांच्या पराभवानंतर गोवा हे स्वतंत्र राज्य ठेवावं का या प्रश्नावरून आणि भाषेच्या प्रश्नावरून खूप राळ उडाली. १९६६-६७ आणि १९८६ मधे भाषिक दंगलीही झाल्या. पैकी १९८६ ची दंगल राजभाषेच्या प्रश्नावरून झाली होती. शेवटी राजभाषा म्हणून कोंकणी आणि मराठीला समान दर्जा अशी तोड निघाली. राज्यव्यवहाराची भाषा म्हणून कोंकणी कधीच फार वापरात आली नाही. या पार्श्वभूमीवर अज कोंकणी कुठे उभी आहे? २००१ च्या जनगणनेमधे गोव्याची लोकसंख्या सुमारे १३.४८ लाख होती. यापैकी गोव्यात ७.७० लाख लोकांची मातृभाषा कोंकणी म्हणून नोंदली गेली तर ३.०४ लाख लोकांची मातृभाषा मराठी नोंदली गेली. कोंकणी भाषा बोलणारे ७.६८ लाख लोक कर्नाटकात होते तर ६.५८ लाख महाराष्ट्रात. याचाच अर्थ हा की कोंकणी मातृभाषा असणारे लोक गोव्यापेक्षा इतरत्रच जास्त आहेत! कोंकणी भाषेची चळवळ खरं तर कर्नाटकातून जास्त प्रमाणात चालवली गेली. केरळच्या किनारपट्टीवरही सुमारे ६१००० लोकांची मातृभाषा कोंकणी आहे. गमतीची गोष्ट ही की या जनगणनेमधे भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ०.२४% लोकांची मातृभाषा कोंकणी होती तर सिंधी ०.२५% आणि नेपाळी ०.२८% पूर्वापार, म्हणजे पोर्तुगीज अमदानीतच गोव्यात मराठी भाषेतल्या शाळा सुरू झाल्या होत्या. या शाळानी गोव्यात भारतीय संस्कृती टिकवायला मोठा हातभार लावला. स्वातंत्र्यानंतर या शाळांना सरकारी अनुदाने सुरू झाली. काही शाळा अनुदान मिळवण्यासाठी नावापुरत्या कोंकणी भाषेच्या माध्यमात सुरू झाल्या. प्रत्यक्षात त्यांचं काम इंग्लिशमधूनच चालत असे. गोव्यातल्या याआधीच्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या एका गटाने इंग्लिश माध्यमाच्या शाळाना अनुदान देण्यासाठी सरकारवर दबाव आणला. पण त्याबरोबर सरकारने असा निर्णय घेतला की नवीन शाळाना अनुदान देणार नाही, तर आता आहेत याच शाळातील मुलांच्या पालकांनी आपल्याला कोणतं माध्यम पाहिजे ते लिहून द्यावं. जी भाषा १० पेक्षा कमी पालक एखाद्या वर्गासाठी मागतील, ती भाषा बंद करण्यात येईल. यानंतर भाषिक सार्वमताच्या वेळी झाली तशी मोठी रणधुमाळी उडाली. तत्कालीन सरकारचं म्हणणं असं होतं की सर्व पालकांना फक्त इंग्रजीच माध्यम म्हणून हवं आहे. एका धार्मिक संस्थेच्या एकूण १७७ शाळांपैकी सर्व शाळांमधे इंग्रजी माध्यम म्हणून लिहून द्यावं असं फर्मान काढण्यात आलं. प्रत्यक्ष आकडे जेव्हा आले, तेव्हा असं लक्षात आलं की इंग्रजी माध्यम म्हणून एकूण २९५५७ पालकांनी मागितलं, मराठी ३१७५९, तर कोंकणी फक्त २५०२!! कन्नड माध्यम मागणार्‍यांची संख्या कोंकणी मागणार्‍यांपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ३००० होती. सरकारच्या या निर्णयाची अम्मलबजावणी झाली तर कोकणी भाषेवर दूरगामी परिणाम होतील हे सांगायला कोणी तज्ञ नको. आधीच्या सरकारने या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्यामुळे आताचे पर्रीकर सरकार पेचात सापडले आहे कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान बंद केले तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा आहे. गोव्यात रोजच्या वापराची भाषा मुख्यतः कोंकणी आहे, पण मराठी भाषिकही पूर्वापार आहेत. आता त्यात कन्नड, आणि मल्याळम तसंच हिंदी भाषिकांची मोठी भर पडत आहे. याला कारण म्हणजे गोव्यात रेल्वेबरोबर मोठ्या प्रमाणात येणारे कामगारांचे आणि बेकारांचे लोंढे. त्यातून राजकारण्यानी आपल्या स्वार्थासाठी या सर्व विस्थापिताना गोव्यात रहाणारे म्हणून सामावून घेतलंय. याबद्दल कोणाचा विरोध नाही पण या सगळ्या प्रकारात गोव्यातल्या स्थानिक संस्कृतीचं रूप धूसर होत चाललंय. बरं कोंकणी माणूस कमालीचा सहिष्णु. तो सगळ्यांनाच आपल्यासारखे समजतो. आताच बाजारात, बसमध्ये, सगळीकडे सर्रास हिंदी वापरली जाते. २०२० साली गोव्यात भूमीपुत्र अल्पसंख्य असतील असा अंदाज आहे. त्यामुळेच कोंकणी भाषेचं भविष्य खूपच खडतर दिसतंय. मराठी मातृभाषा म्हणणारे सुमारे ७ कोटी लोक असताना मराठीची दुरवस्था झाली असं आपण म्हणत असतो. तिथे जेमेतेम २५ लाख लोक बोलतात त्या लहानसा जीव असणार्‍या कोंकणीने कोणाच्या तोंडाकडे पहावं? क्रमशः ** विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.
- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )

Book traversal links for आमचें गोंय - भाग ११ - कोंकणी भाषा – इतिहास आणि आज

  • ‹ आमचें गोंय - भाग १० - गोव्याची खाद्यसंस्कृती
  • Up
  • आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
वाङ्मय
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
माहिती

प्रतिक्रिया द्या
57685 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

चित्पावनी भाषेतील एक लोकप्रिय गाणे

सुनील
Mon, 02/18/2013 - 20:07 नवीन
  • Log in or register to post comments

ही चित्पावनी नाहीये हो

प्रीत-मोहर
Mon, 02/18/2013 - 20:10 नवीन
ही चित्पावनी नाहीये हो सुनीलजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मग कुठली?

सुनील
Mon, 02/18/2013 - 20:14 नवीन
मग कुठली आहे? धड ना कोंकणी धड ना मराठी!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

हो

प्रीत-मोहर
Mon, 02/18/2013 - 20:22 नवीन
फारतर मराठी शब्द पेरलेली कोकणी म्हणेन मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

इथे मला मराठीच्या अजुन एका

प्रीत-मोहर
Mon, 02/18/2013 - 20:07 नवीन
इथे मला मराठीच्या अजुन एका बोली भाषेचा उल्लेख करावासा वाटतोय. गोव्यात पद्ये व कर्‍हाडे ब्राह्मण ही बोली बोलतात ब ह्या बोलीला भटी भाषा म्हणतात. उदा. मला समजले नाही. ==> मज समज्लें नाय बाबा अंघोळीला गेले आहेत ==> बाबा न्हावयास/ न्हावया गेले हाय.
  • Log in or register to post comments

प्रीत-मोहर,बरें केलें हां बाय

पिशी अबोली
Mon, 02/18/2013 - 20:27 नवीन
प्रीत-मोहर,बरें केलें हां बाय तुवें येथे सांगून..खुब्ब जणां खबरच नसते ही अजुन एक बोली हाय म्हणून.. त्यांस बरी मज्जा दिसणा..तशें भटीतय खूप रस घेवपासारके हाय म्हटल्या.. :) पद्ये बोली खूप गोड आहे.पण गोव्यातील कर्‍हाडे मात्र मराठीच बोलतात.किंवा अगदी जुने कर्‍हाडे 'कर्‍हाडी'बोली बोलतात. कर्‍हाडी जवळपास नामशेषच होत चालली आहे म्हणा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

सामके कोकणीं उलयतानाही पळयलां

यशोधरा
Mon, 02/18/2013 - 20:36 नवीन
सामके कोकणीं उलयतानाही पळयलां हां कर्‍हाड्यांक.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

:)

पैसा
Mon, 02/18/2013 - 20:42 नवीन
बघता बघता आणखी ४ बोलींची नावे आली! चित्पावनी, भटी, कर्‍हाडी आणि ब्राह्मणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

पिशी अबोली
Mon, 02/18/2013 - 20:56 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे थोडं कठीण वाटतय पचणं..कर्

पिशी अबोली
Mon, 02/18/2013 - 20:49 नवीन
हे थोडं कठीण वाटतय पचणं..कर्‍हाडे आवर्जून मराठी बोलतात घरात.. यशोताई तुला भट्टप्रभूंबद्दल बोलायचय का?ते कोंकणी बोलतात अगदी अस्सल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१११

प्रीत-मोहर
Mon, 02/18/2013 - 20:54 नवीन
जितक्या कर्‍हाडे ब्राह्मणांना मी ओळखते ते सगळे भटी भाषा विथ कर्‍हाडी वेरियेशन बोलतात. भटप्रभू मात्र कोकणी बोलतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

नाही. आमचं पौरोहित्य करतात ते

यशोधरा
Mon, 02/18/2013 - 20:56 नवीन
नाही. आमचं पौरोहित्य करतात ते कर्‍हाडे आहेत. व्यवस्थित कोकणीच बोलतात घरी दारी. :) गोव्यात बर्‍याच देवळांमधून सहसा कर्‍हाडेच पौरोहित्य करतात आणि त्यांना नेहमीच कोकणी बोलताना पाहते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

आश्चर्य आहे. भट्टप्रभू

पिशी अबोली
Mon, 02/18/2013 - 21:02 नवीन
आश्चर्य आहे. भट्टप्रभू साधारणपणे असंच सांगतात की ते कर्‍हाडे आहेत.एका मोठ्या ग्रुपशी आयडेन्टिफाय होणे असाही भाग असतो त्यात.असं काही नाहिये ना?काही मुख्य देवळांची नावं सांगितली तर कदाचित काय ते कळू शकेल.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नाही गं, कर्‍हाडेच आहेत आमचे

यशोधरा
Mon, 02/18/2013 - 21:12 नवीन
नाही गं, कर्‍हाडेच आहेत आमचे पुरोहित. आता ह्या वेळी जाईन तेह्वा त्यांना विचारेन माहिती म्हणून. इतका घरोबा नक्कीच आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

नक्कीतेवढी माहितीत भर माझ्या.

पिशी अबोली
Tue, 02/19/2013 - 01:54 नवीन
नक्की:)तेवढी माहितीत भर माझ्या.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अगो तुज्या खवत लिहलें हाय.

प्रीत-मोहर
Mon, 02/18/2013 - 20:49 नवीन
अगो तुज्या खवत लिहलें हाय. मात्शी खव बघ बघुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

(No subject)

पिशी अबोली
Mon, 02/18/2013 - 20:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

वाचले. हा भाग समजायला जरा वेळ

रेवती
Mon, 02/18/2013 - 20:19 नवीन
वाचले. हा भाग समजायला जरा वेळ लागला पण आवडला. प्रतिसादही तितकेच वाचनीय आहेत.
  • Log in or register to post comments

परिसंवाद

अभ्या..
Tue, 02/19/2013 - 00:13 नवीन
छान आलाय हा भाग पण. बरीच माहीत नसलेली माहीती पण कळली. ह्या सगळ्या कोंकणी तायाबायांनी गप्पा मारत मारत सुध्दा बरेच अपडेट केलेत.
  • Log in or register to post comments

चित्पावनी

राही
Wed, 02/20/2013 - 23:50 नवीन
आधुनिक चित्पावनीचा एक नमुना थोडीशी शोधाशोध करून मिळाला,तो देत आहे. ही चित्पावनी मला मराठीळलेली वाटली. पन्नास-साठ वर्शांपूर्वीची भाषा आणि आजची भाषा यात फरक पडणे नैसर्गिक आहे. असो मी तुम्हाला चित्तपावन बोलीचा एक नमुना दाखवतो.--मँ तुमला चित्तपावन भाशाचो एक नमुनो दाखयसां. माझा मुलगा आय.टी शिकतो.--मझो बोड्यो आय टी शिकसे. त्याला ही आमची चित्तपावनी अजिबात येत नाही.--तेला ही आमची चित्तपावनी भाशा अजिबात येत नाय. पुढच्या मुलांना कळायला हवी म्हणून चित्तपावनी बोलीतली काही वाक्ये लिहून ठेवायला हवी.--पुढले भुरगेंना कळे हवी म्हणी चित्तपावनीत्लीं थोडींतरी वाक्यां लिवनी ठेंवें हवीं. माझी आई चित्तपावनी भाषा चांगली बोलते.--माझी आई चित्तपावनी बरीsssबोलसे. माझ्या बायकोलासुद्धा चित्तपावनी बोलता येते.--माझ्या बायलालासुद्धा चित्तपावनी बोले येसे. आम्ही तिघे चित्तपावनीत बोलू लागलो की मुलगा आ वासून आमच्याकडे बघत रहातो.--आमी तिघांय चित्तपावनी बोलों लागलों की मझो बोड्यो तोंण उघडां घालनी आमचेकदे बघीतच र्‍हेसे. ही भाषा ऐकायलाही गोड आणि समोरच्याला भावणारी आहे.--ही भाशा आय्केय बरी अणी पुढेंत्लेलेला आपलोसो करणारी अशी से. ही भाषा आता कुठेतरी लोप पावत चालली आहे म्हणून हा माझा प्रपंच.--ही भाशा ऐतां केतरी नायशी होत चायलीसे असां माला दिसलां म्हणीनच माझो हो वावर. तसे बघायला गेले तर ही भाशा कठीण नाही.थोडीशी मराठी भाषा ज्याला येत असेल त्याला ही पटकन कळेल.--तसां बगे गेले ही भाशा तितलीशी कठिण नाय.ईवळी मराठी भाशा जेंनां येत सयेल तेंनां ही भाशा रोक्डीच कळेल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 00:20 नवीन
ही बोली मराठीला जास्त जवळची आहे. अर्थात भुरगे, रोकडीच, बरी, तितली, इवळी (इल्ली) हे कोंकणी शब्द आहेत. दाखयसां = दाखयतां आसा, शिकसे = शिकत असे अशी मूळ रचना असावी. मधल्या अक्षराचा लोप होऊन दाखयसां, शिकसे अशी रूपे झाली असावीत. तसे पाहिले तर कोंकणी आसां हा शब्द काही लोक आहां असाही उच्चारतात. म्हणजे बोलताना स चा ह किंवा ह चा स होतो. ग्रेट! असा तंजावर मराठीचा नमुना कुठे बघायला मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

हे पण सांगा

अभ्या..
गुरुवार, 02/21/2013 - 00:47 नवीन
चांगली गोड आहे तर बरी म्हणता. मग बरी असेल तर काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरं?

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/21/2013 - 00:59 नवीन
कोकणीत काहीच नुसतं 'ब'रं नसतं. तो एक भुक्कड मराठी शब्द आहे!;) कोकणी माणूस एकतर जयजयकार करी करतो नायतर सामको धिक्कार तरी!! (आणि धिक्कार करतांना आधी अँख! असा मराठीला माहीत नसलेला आवाज काढतो, माहितीये!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 08:54 नवीन
=)) पाड पडू! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

'बरी' च्या वेगवेगळ्या डिग्री

पिशी अबोली
गुरुवार, 02/21/2013 - 01:13 नवीन
'बरी' च्या वेगवेगळ्या डिग्री आहेत. नुसतं 'बरी' म्हणजे बरी. 'बssरी' म्हणजे चांगली. आणि 'बsssssरी' म्हणजे उत्तम.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुपरलेटीव

अभ्या..
गुरुवार, 02/21/2013 - 01:41 नवीन
बsssssरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

इवलीशी भर

राही
गुरुवार, 02/21/2013 - 09:11 नवीन
ईवळी हा शब्द कोंकणीत इल्ली तर मराठीत इवली असा होतो.कोंकणीतला इल्लीशी मराठीत इवलीशी,उलूशी होतो.रोकडे हा शब्द हा शब्द सध्याच्या बोलभाषा मराठीत वापरात नसला तरी जुन्या ग्रांथिक मराठीत आहे. तो थेट,लगोलग,समोरासमोर, ताबडतोब अशा अर्थछटांनी वापरला गेला आहे. उदा. रोकडा प्रत्यय.(व्युत्पत्तीकोशात शोधायला वेळ मिलाला नाही पण रोकड म्हणजे नगद पैसा हा विद्यमान मराठी अर्थसुद्धा लागलीच मिळणारा पैसा,थेट पैसा, बार्टर नव्हे, या अर्थाने गेल्या तीनचारशे वर्षांत म्हणजे नाणी वापरणे तळागाळात पोचल्यावर प्रचारात आला असावा.) भुरगें,बुरगें हे मराठीत पोरगें बनून येते. माझ्या आठवणीप्रमाणे याचे मूळ कानडीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इंटरेस्टिंग

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 09:17 नवीन
कानडीत 'भुरगा' शब्द "हुडगा-हुडगी" असा आहे. म्हणजे पुन्हा मुलगा-मुलगी याला जवळचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

मात्शी आणखी भर

राही
गुरुवार, 02/21/2013 - 09:37 नवीन
पोर,पोरगे,पोरटे,पोरटी,पोट्टी,पोट्टा या शब्दांचे मूळ एकच असावे.मलयालीत-विशेषतः क्रिस्टिअन मलयालीत मुली साठी मोळ्ळे,मोळ्ळी अशी संबोधने आहेत. इंग्लिश मध्ये त्याचे मॉली केले जाते. हिंदी ज्यूली चित्रपट ज्यावरून निघाला त्या मूळ मलयाली सिनेमाचे नाव चट्टाकारी(मला वाटते त्याचा अर्थ खालच्या/क्रिस्टिअन जातीची मुलगी,पोरी असा होता) होते. चट्टा,चट्टी,चेडूं,चडूं,चलो,चली हे शब्द एकाच कुळातले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त!

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 09:44 नवीन
तसाच मालवणीतला "झील"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

बंगालीत मुलगा आणि मुलगी यांना

बॅटमॅन
गुरुवार, 02/21/2013 - 11:34 नवीन
बंगालीत मुलगा आणि मुलगी यांना अनुक्रमे छेले आणि मेये असे शब्द आहेत. तेदेखील इथे उल्लेखिलेल्या शब्दांशी तसे थोडेफार जवळचेच वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ऑऽऽऽव!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/21/2013 - 00:17 नवीन
हो अकरावो भाग बोअरिंग वाटलो. (म्हणान आम्ही जुनो दहावो भाग जावंन पुन्हां एकदा वाचलो!!! :)) असो. बाराव्या भागासाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

एक शंका

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/21/2013 - 01:08 नवीन
बाकी 'टीम गोवा'साठी एक शंका आहे... म्हणजे पैसा आणि प्रिमो यांच्यासाठी, बिकाला याचं उत्तर येणार नाही याची खात्री आहे!!!:) कोकणीत एक 'इकाळ्या पावसाचो' आशी एक फ्रेज आशील्ली. आमी न्हान आंसतेवेळी आमची आज्जी आमकां नेहमीच तसां म्हणी... तेंचो मराठीत नेमको अर्थ काय?
  • Log in or register to post comments

खरां सांगू?

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 12:25 नवीन
तर माका म्हायत नाय! पण संदर्भ बघता "अवकाळी" किंवा वळवाचा पाऊस म्हणजे बेभरवशी माणूस असा काहीतरी अर्थ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

इक्क्काळ्या पावसाचो

रघुनाथ.केरकर
Sat, 08/31/2013 - 00:09 नवीन
नक्कि कित्या हुन्तता म्हायत नाय...पन पयल्या पावसात इकाळे मान्डके भायर पडतत..इक म्हनजे सुध मर्हाटीत विष. तेच्याचवर्सुन काय तरी अस्ताला..फाल्या आमच्या आयेक इचारुन सान्गतय.. बाकी तळ्कोकणातली माल्वणी वाय्च वाय्च कोन्कणी वाटता.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मराठीत सुक्काळीच्या अशी एक

राही
गुरुवार, 02/21/2013 - 13:27 नवीन
मराठीत सुक्काळीच्या अशी एक सौम्य शिवी आहे्. हे प्रकरण देखील तसेच काहीसे विकाळीच्या किंवा अवकाळीच्या स्वरूपाचे असावे. कोंकणी आणि मालवणीत ओसाड पडो,ओसाडी येवो या अर्थाने वशाड, वशाडी अशा गाळी आहेत.वशाडीचो असेही कधी कधी ग्राम्य भाषेत म्हटले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

राहीजींनी चित्पावनीचो बरोच

प्रीत-मोहर
गुरुवार, 02/21/2013 - 13:35 नवीन
राहीजींनी चित्पावनीचो बरोच नमुनो दिलोन से. आमचेत्त्यां अशीच बोलसत ईकाच्या पावसाचो आमच्याकडे कमीच वापरतात. पण आमच्या कामवाल्या काकुंना शिवी म्हणुन वापरताना पाहिलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

सौम्य शिवी

सुबोध खरे
Mon, 03/04/2013 - 11:15 नवीन
सुक्काळीच्या हि सौम्य शिवी नाही. सुक्काळी म्हणजे जी फक्त चांगल्या काळाच्या लोकांशी संबंध ठेवते.म्हणजेच गणिका आणि तिचा पुत्र म्हणजे वरील शिवी(पत्नी हि पतीला बर्या किंवा वाईट दोन्ही काळात साथ देते) (याचा अर्थ शिंच्या या शिवी सारखाच आहे (शिं म्हणजे शिंदऴकी करणारी आणि तिचा पुत्र म्हणजे शिंच्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

सौम्य-झणझणीत

राही
Mon, 03/04/2013 - 13:51 नवीन
प्रतिसाद लिहिताना अगदी हाच शब्द सुचला होता.पण 'फोडिले शिव्यांचे भांडार' असे व्हायला नको म्हणून त्याचा उल्लेख केला नाही.शिंचा किंवा शिंदळीचा म्हणजे शिंदळकी करणारीचा ही शिवी सौम्यच नाही तर काय.एक तर ती कोंकणात आणि इतरत्रही सररास,मुलाबाळांसमोर वापरली जाते आणि आई,बहीणीचा उल्लेख असणार्‍या 'अमुक ठि़काणी गमन करणारा' अशा अर्थाच्या शिव्यांच्या मानाने सौम्यच. रांx ,रांxचा',रांxरू'हे शब्दही सौम्यच म्हटले पाहिजेत.तेही असेच उघडपणे वापरात असलेले आणि वापरून वापरून झणझणीतपणा घालवून बसलेले.विधवांना वेश्येसमान लेखणे हा आपल्या गतजीवनाचा एक अविभाज्य भाग होता याची दु:खद आठवण करून देणारे हे शब्द. अवकाळी पावसामुळे अशी परिस्थिती आली की गणिकेलाही कोणाहीबरोबर संबंध ठेवणे भाग पडले. अशा संबंधातून जन्मलेला तो अवकाळीचा असा अर्थ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

>>'इकाळ्या पावसाचो' >>

यशोधरा
गुरुवार, 02/21/2013 - 20:16 नवीन
>>'इकाळ्या पावसाचो' >> :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बुकमार्क्ड

सुमीत भातखंडे
गुरुवार, 02/21/2013 - 13:35 नवीन
बाकी जबरदस्त लेखमाला आहे ही... पुढील भागच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

पुन्हा जी.एस्.बी

राही
Mon, 03/04/2013 - 18:45 नवीन
वरती कुठेतरी श्री.सुबोध खरे यांच्या प्रतिसादात 'गौड प्रांतात अकरा वर्षे भीषण दुष्काळ पडला (दुर्गादेवीचा दुष्काळ)आणि त्या काळात गौड लोक इतरत्र पांगता पांगता राजस्थानात आले. त्यावेळी सरस्वती नदी राजस्थानातून वहात होती.' असा काहीसा उल्लेख आहे. यातल्या दुर्गादेवीच्या दुष्काळाची काळनिश्चिती १३९६ ते १४०७ अशी झालेली आहे.या काळात सरस्वती नदी राजस्थानातून वहात नव्हती. सारस्वतांचा संबंध सरस्वती नदीशी लावणे हे मला तरी इतिहासाला धरून वाटत नाही. उत्तर भारतात सारस्वत ब्राह्मण ही एक मोठी जात आहे आणि तिचा भौगोलिक विस्तारही बराच आहे. त्यातले काही गौडदेशी कालौघात दक्षिणेकडे आले असतील. महाभारतादि पुरातन वाङ्मयाचा आधार घेतला तरी म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच सरस्वती गुप्त झाली होती हे सिद्ध होते.(ही घटना त्याहूनही बरीच जुनी आहे.) म्हणजे सारस्वतांचा दक्षिणेत येण्याचा काळ दोन अडीज हजार वर्षे इतका मागे जातो. हे तर्कसुसंगत वाटत नाही. अति अवांतर : मुळात सरस्वती नदीवरचे सर्व आधुनिक संशोधन हे मुळात एक थियरी समोर ठेवून त्याच्या सिद्धतेसाठी पुरावे गोळा करीत केलेले असे संशोधन वाटतें. सरस्वतीची स्थाननिश्चिती करताना नदीस्तुती श्लोकांवरच प्रामुख्याने भर आहे जो योग्य वाटत नाही.बाकी सॅटेलाइट इमेजिन्ग वगैरे पुरावे लक्षात घेऊनही हेल्मंड हीच वैदिक सरस्वती असावी हा अल्पमतातील तर्क मला स्वतःला स्वीकारार्ह वाटतो. अर्थात हे अगदी वैयक्तिक मत आहे,धाग्याशी अजिबात सुसंगत नाही, तेव्हा गदारोळ कृपया नको.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सुधीर
Mon, 03/04/2013 - 18:56 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा