आमचे गोंय - भाग ८ - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा
***
स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
१९ डिसेंबर १९६१ ला गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. भारतीय लष्कर पणजीच्या सचिवालयात पोचले तेव्हा गव्हर्नर जनरल तिथे नव्हते! त्यांच्या केबिनमध्ये कागदपत्रे पसरलेली होती आणि टेबलावर अॅचस्पिरिनच्या गोळ्या पडलेल्या होत्या. श्री. वामन राधाकृष्ण आपल्या "मुक्तीनंतरचा गोवा" या पुस्तकात म्हणतात, "विचार करून त्यांची डोकेदुखी वाढली असावी आणि त्यानी गोळ्या घेतल्या असाव्यात. पोर्तुगीजांची डोकेदुखी वाढली खरी पण गोव्यातली आणि भारतीय जनतेची डोकेदुखी मात्र कमी झाली."
भारताचे तेव्हाचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन म्हणाले, "आम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली. सामोपचाराची बोलणी केली. संधी दिली आणि अखेर आम्हाला कारवाई करावी लागली. कुठल्याही राष्ट्राच्या सार्वभौमत्त्वाला आम्ही बाधा आणली नाही. पोर्तुगालवर हल्ला केला नाही." पण आंतर्राष्ट्र्रीय प्रतिक्रिया मात्र अतिशय उद्बोधक होत्या! यावेळेला रशियाने अधिकृत रीत्या भारताचं समर्थन केलं, तर चीनने भारताच्या बाजूने किंवा विरुद्ध अशी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल आयुबखान म्हणाले, "भारताचा जर फायदा होणार असेल, आणि दुसरा पक्ष दुबळा असेल, तर भारत त्याच्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहाणार नाही, हे आम्हाला आधीच माहिती होतं!!!" आफ्रिकेतल्या अनेक देशानी भारताला आपला पाठिंबा दर्शवला. लंडनमधल्या "डेली टेलीग्राफ" या दैनिकाने गोव्यात झालेल्या सत्तांतराची तारीफ केली. गोव्यातील ज्या संस्था विविक्षित जातीच्या किंवा समाजाच्या कल्याणासाठी चालवण्यात येतील, त्याना प्रशासनाकडून कोनतीच मदत होणार नाही असं गोव्याच्या प्रशासनाने जाहीर केलं.
गोवा मुक्तीपूर्वी गोव्यातील लुझो इंडियन (अर्ध पोर्तुगीज) समाजाला बर्यााच सवलती होत्या, गोवा मुक्तीनंतर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातील या भीतीमुळे गोवा मुक्त झाला हे लुझो इंडियन समाजाला आवडलं नाही. त्यांची पोरं सालाझारचा जयजयकार करत फिरू लागली पण गोव्यातील आम जनतेने त्यांचा आवाज बंद पाडला. तरी 'हेराल्ड' हे पणजीतलं पोर्तुगेज दैनिक भारतविरोधी प्रचार करतच राहिलं. हेराल्डच्या विरोधकांनी आणि हेराल्डच्या बाजूच्या लोकांनी एकाच वेळी मोर्चे काढले. पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. पोर्तुगीजांच्या खोट्या प्रचाराला उत्तर म्हणून गोव्यातील २००० हून जास्त नागरिकांनी सह्या करून युनोच्या सरचिटणिसांना एक निवेदन सादर केलं. त्यात गोव्यातील जनतेची पोर्तुगीज अत्याचारांपासून सुटका केल्याबद्दल पंडित नेहरुंचे आभार मानले होते, आणि आनंद व्यक्त केला होता.
पंडित नेहरूनी एक निवेदन केलं की, " पोर्तुगीज स्थानबद्धाना गोव्यातून इतरत्र हलवून मग गोव्यातील सैन्य काढून घेतलं जाईल. प्रजासताकदिनाला म्हणजे २६ जानेवारी १९६२ ला गोवा दीव दमण इथल्या सर्व राजकीय कैद्याना माफी देण्यात आली. तर फोंडा इथे ठेवलेल्या सर्व पोर्तुगीज युद्धकैद्याना २ मे ते १५ मे च्या दरम्यान दाबोली ते कराची विमानाने आणि तिथून पुढे पोर्तुगालाकडे बोटीने पाठवण्यात आले. शेवटच्या फेरीत पोर्तुगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल व्हासाल द सिल्व्हा हे होते. या मुक्त केलेल्या युद्धकैद्यांबरोबर लुझो इंडियन लोकही पोर्तुगालला निघून गेले.
गोवा मुक्त झाल्याबरोबर गोव्याची भाषा कोणती याबद्दल वाद चालू झाले. मराठीवादी नेते लष्करी राज्यपालाना भेटले, तर कोकणीवाद्यानी आपली परिषद घेतली. तसंच गोवा कुठल्या राज्यात समाविष्ट करावा याबद्दलही चर्चा सुरू झाल्या. या वादात महाराष्ट्र आणि कर्नाटकानेही उडी घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांच्या कुंपणावरच्या जागेवरून म्हणाले "विलीनीकरणाचा प्रश्न सध्या नको." तर म्हैसूरचे मुख्यमंत्री कंठी म्हणाले, " गोव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यातले अधिकारी नेमू नयेत." गोव्याचे वेगळे अस्तित्व राहिले पाहिजे असं वाटणारा एक गट गोव्यात मूळ धरत होता, तर नॅशनल काँग्रेस (गोवा) या संस्थेला गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा असं वाटतं होतं. या संस्थेने तसा ठरावही ११ मार्च १९६२ या दिवशी केला. गोवा, दमण आणि दीव या प्रदेशात जन्मालेल्या लोकाना भारताचे नागरिकत्व दिल्याची घोषणा भारत सरकारने ९ एप्रिल १९६२ या दिवशी केली.
गोवा मुक्त झाला तरी अजूनही गोव्यात प्रवेश करायला परवाना लागत होता. हा परवाना म्हणजे नागरिकत्वाचा आणि भारताच्या एकात्मतेचा अपमान आहे असं म्हणून १० मे ला आपण परवाना न घेता गोव्यात जाणार असं मधू लिमयेनी जाहीर केलं. मधल्या संक्रमण काळात समाजविघातक लोकांनी गैरफायदा घेऊ नये म्हणून ती व्यवस्था होती असा खुलासा केंद्र सरकारने केला. १० मेला ठरल्याप्रमाणे श्री मधू लिमये परवान्याशिवाय गोव्यात आले आणि लागलीच केंद्र सरकारने परवाना पद्धत बंद केली. ७ जून १९६२ ला लष्करी राजवट संपली आणि श्री टी शिवशंकर यानी गोव्याचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कारभाराची सूत्रे हातात घेतली. याच दरम्यान गोवा मुक्तीसाठी लढलेल्या नॅशनल काँग्रेस (गोवा) या संघटनेच्या समितीने गोव्याचे वेगळे अस्तित्व ठेवावं आणि मराठी व कोकणी दोन्ही भाषांना गोव्यात उत्तेजन मिळावं असं निवेदन पंतप्रधान पं. नेहरू याना दिलं. गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं की महाराष्ट्रात सामील व्हायचं यावरून चर्चा सुरूच होत्या.
२१ फेब्रुवारी १९६३ ला संसदेत केंद्रशासित प्रदेशाना कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ देणारं विधेयक आलं आणि गोव्यात विधानसभा आणि मंत्रीमंडळ येणार हे स्पष्ट झालं. नॅशनल काँग्रेस (गोवा) ही संघटना ज्या हेतूने स्थापन झाली होती, तो आता साध्य झाला होतात्यामुळे ती विसर्जित करून गोव्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची शाखा स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. पुरुषोत्तम काकोडकर हे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले. २० मे १९६३ ला पं नेहरू गोव्यात आले. "गोव्याचे वेगळे अस्तित्व ठेवावे असं आमच्या सरकारने ठरवलं आहे, आणि या निर्णयाविरुद्ध चळवळ केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही." असं त्यानी सांगितलं.
यावेळेला एक आगळी घटना घडली. पंडितजी मंगेशीच्या देवळात गेले होते. गोव्यात हरिजनांना सगळ्या मंदिरात प्रवेश अजूनही मिळत नाही. पंडितजी देवळात जात असताना 'आम्हाला मंदिर प्रवेशाला मदत करा' असे बोर्ड घेऊन काही हरिजन देवळच्या रस्त्यात उभे होते. पंडितजीनी त्यावर काही प्रतिक्रिया त्या वेळी दिली नाही. पंडितजी देवदर्शन घेऊन परत येत असताना एक हरिजन पंडितजीना म्हणाला," पंडितजी आपका दर्शन हुआ, भगवान का दर्शन नही हुआ." पंडितजी त्याला म्हणाले, "मैं आपसे सहमत हूँ." या वेळी "हरिजनांना मंदिर प्रवेश करू द्या" असं पंडितजीनी म्हणायला पाहिजे होतं असं अनेक लोकांना वाटलं. हे एक गालबोट वगळता पंडितजींचा गोवा दौरा यशस्वी झाला.
याच दरम्यान प्रजासमाजवाद्यानी गोव्यात आपली शाखा स्थापन केली आणि कम्युनिस्टानी 'शेतकरी पक्ष' या नावाचा एक पक्ष गोव्यात स्थापन केला. सर्वसामान्य जनता काँग्रेसच्या नावामुळे तिकडे आकर्षित व्हायला लागली होती. यावेळी श्री दयानंद म्हणजेच भाऊसाहेब बांदोडकर हे राजकारणात नव्हते. ते एक दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेले खाण मालक होते. भाऊंचा जन्म १२ मार्च १९११ चा. म्हणजेच या वेळेला ते ५२ वर्षांचे होते. काँग्रेसचे सरचिटणीस के.के.शहा पणजीला मांडवी हॉटेलात उतरले होते. आपणही काँग्रेसला मदत करावी या उद्देशाने भाऊ श्री के.के. शहा याना भेटायला मांडवीत गेले. या वेळेला शहा काही लोकांशी चर्चा करत होते. भाऊना कोणी बसा सुद्धा म्हटले नाही. ते थोडा वेळ ताटकळत बाहेर उभे राहिले. एवढ्यात बा.द. सातोस्करानी भाऊंना बाहेर उभे असलेले पाहिले. त्यानी भाऊना लगेच शहांकडे नेलं. पण आता भाऊसाहेब चिडले होते. ते म्हणाले, "मी काँग्रेसला मदत करायला आलो होतो, पण मला काँग्रेसमधे अशी वागणूक मिळणार असेल, तर तुम्ही सामान्य लोकांना कशी वागणूक द्याल हे समजलंच."
गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईतील काही लोकांनी 'महाराष्ट्रवादी' पक्ष स्थापन करायचं ठरवलं होतं. भाऊसाहेबांनी या पक्षाला सर्वतोपरीची मदत केली आणि ६ मार्च १९६३ ला म्हार्दोळ इथे 'महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षा'ची स्थापना झाली. खरं पाहता गोव्यातील भा.रा. काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात विलीनिकरण करण्याचा विचार असलेली मंडळी बहुमतात होती, पण पंडितजींच्या भूमिकेमुळे त्यांना जाहिरनाम्यात तसं म्हणता येईना! गोव्याचे महाराष्ट्रात विलीनिकरण होऊ नये असं बहुसंख्य ख्रिश्चन लोकांना वाटत होतं. त्यांच्यापैकी काहीनी एकत्र येऊन युनायटेड गोवन्स पक्ष स्थापन केला. गोव्यातलं पहिलं मराठी दैनिक 'गोमंतक' २४ मार्च १९६२ ला सुरू झालं तर पहिलं इंग्लिश दैनिक 'नवहिंद टाईम्स' १८ फेब्रुवारी १९६३ ला सुरू झालं. अशातच निवडणुका जाहीर झाल्या.
एस. एम. जोशी नेते असलेल्या प्रजासमाजवादी पक्षाबरोबर मगोपने युती करून निवडणूक लढवली आणि २८ पैकी १४ जागा जिंकल्या. २ प्रजासमाजवादी जिंकले आणि युनायटेड गोवन्स चे १२ जण निवडून आले. कोंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.या निवडणुकीएत एक मजेशीर गोष्ट घडली. काँग्रेसचं प्रचारसाहित्य घेऊन वसंतराव नाईक गोव्यात आले, आणि राहिले ते भाऊसाहेबांच्या घरी! काँग्रेसच्या कमिटीत याला आक्षेप घेतला गेला. त्यावर वसंतराव नाईक म्हणाले," भाऊसाहेब माझे मित्र आहेत. त्यांच्या घरी रहाणे म्हणजे मगोप चा प्रचार नव्हे!" तर मगोप विजयी होताच भाऊसाहेब 'कोणाला मुख्यमंत्री करावे' याचा सल्ला घेण्यासाठी धावले ते वसंतराव नाईकांकडे! काँग्रेसच्या वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्री होण्यासाठी मगोपच्या भाऊसाहेब बांदोडकरांचे मन वळवले.
२० डिसेंबर १९६३ ला भाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याचं पहिलं मंत्रीमंडळ स्थापन झालं. मगोपचा विजय हा विलीनीकरणवाल्यांचा विजय अशी घोषणा भाऊसाहेबांनी केली. तर काँग्रेसच्या नेत्यांनी विलीनीकरणाचा प्रश्न १० वर्षे पुढे ढकलावा अशी भूमिका घेतली. युनायटेड गोवन्सने विलीनिकरण नकोच अशी भूमिका घेतली. वास्तविक निवडून येताच ६ महिन्यात मगोपच्या सर्व आमदारानी राजीनामे देऊन राजकीय पेचप्रसंग निर्माण करायचा असं निवडणुकांपूर्वीच ठरलं होतं. पण कुठेतरी माशी शिंकली आणि मगोपचं सरकार सुरू राहिलं. २३ जानेवारी १९६५ ला गोव्याच्या विधानसभेत गोव्याचं महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावं अशा आशयाचा ठराव मंजूर झाला. तर महाराष्ट्र विधानसभेने १२ मार्च १९६५ ला गोव्याचं असं विलीनीकरण व्हावं आणि त्यानंतर गोव्याला विशेष दर्जा द्यावा असा ठराव मंजूर केला.
- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )/em
Book traversal links for आमचे गोंय - भाग ८ - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
वर्गीकरण
प्रतिक्रिया
निवांत वाचण्यासारखा लेख.
असेच म्हणतो. माहितीचे उत्तम
निवांत वाचण्यासारखा लेख.
विनंती
माहिती वाचताना गुंगून गेले.
मंदीर प्रवेश
अगदी खरं
सुंदर !
लेखमाला चांगली सुरू आहेच.
हा भाग चांगला उतरला आहे.
दुरुस्ती
घ्या काका!
धन्यवाद.
वाचते आहे..
स्वातंत्र्यानंतरच्या गोव्याचा
आधिच्या भागां इतका
वाचतोय...
कोंकणी मराठी
प्रसिद्ध लिंग्विस्ट एस एम
त्याचं कारण
महाराष्ट्री प्राकृतपासून
हम्म...
एक भाषा दुसरीपासून संपूर्ण
मराठीतला सर्वात जुना शिलालेख
पूर्ण शिलालेखाच्या पाठासाठी
तुळपुळ्यांच्या मते
अच्छा, धन्यवाद पाहिले पाहिजे
>>
याचं कारण खूपच सरळ आहे.कन्नड
धन्यवाद!