"इजय असो"

विसुनाना's picture
विसुनाना in जनातलं, मनातलं
21 Dec 2011 - 2:14 pm

रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?)
गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली.
कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं. डोईवर्नं पदर घिऊन दिसभर "इजय असो" बोंबलायला तिच्या बाचं काय जातंय? म्याबी कारखान्यातला ओवरटाईम बंदच केलता. मालकाला शाप सांगिटलं, "सांच्याला सा वाजल्यापास्नं आमची डुटी हाये फाटे दोन वाजेपावतर. सकाळच्याला येयाला जरा उशीर व्हईल. ओवरटाईम जमायचा न्हाई. बगा, जमतंय तर. न्हाईतर दुसर्‍या कुनालाबी ठिवा कामावर." मालकबी काय बोलतुया? त्योबी काय दादासायबांचा सबूद मोडल व्हय? घास न्हाई तेचा. उगीच सब्शिडी खातुय काय त्योबी?

हितं गांधी हायस्कुलात दांडगा मांडाव घातल्याला - 'नगरपालिका निवड्नुक अ वॉर्ड पक्ष कार्यालय' म्हनून लै मोटा बोर्ड लावल्याला. तेच्यावर दादासायबांचा हात जोडल्याला मोट्टा फटू आनि खाली आमच्या चार उमेदवारांची डोचकी.काय म्हंत्यात ते - फिलेक्स. रातीचं तितंच पडीक की आमी. काय जेवान म्हनायचं का काय राव. ह्ये मोटीमोटी भगुनी भरून मटान शिजत हुतं. गावातल्या समद्या खानावळी बंद केलत्या. पाडल्याली सगळी बकरी हिकडच की वो. काई न्हाई म्हन्लं तरी रोच्चं पाचसातशे गडी तरी वरपत असतील की रस्सा. आनि पिन्याचं तर काय इचारूच नगासा. निस्तं हूं म्हनलं की भरलाच गिलास.

बायकूबी काय बोलत न्हवती. तिच्यायला, न्हायतर जरा कुटं दोन थेंब घेटली की कटकट सुरूच तिची. पर फुकाट भाईरच्या भाईर सम्दं चाल्लय आनि वर्नं नवरा नोटाबी आनतोय म्हनल्यावर तीबी इचारायची,"काय वो, निगा की आता परचाराला. सा वाजून ग्येलं की." ह्येला म्हनायचं सूक!

त्येचं काय हाय, आदीच त्यो आन्ना हाजार्‍या लै बोंबा मारतोय फुडार्‍यांच्या नावानं. त्यात आमच्या दादांचं तिकीट कटलं खासदारकीचं. फुडं आमदारकीला बगू म्हनलं तर धाकले सावकार- म्हंजे दादांचं पोर्गं हो - अवो, ते पडलं की त्या निवड्नुकीत. काय तरी गोमगाला झाला तवा. इतकं कमी का काय? पक्षानं तेन्ला झिल्लाधेक्ष पण क्येलं न्हाई! आता बगा - समद्या म्हाराष्ट्रात फुडारी आमचं दादा. त्येला डिवचल्यावर सोडतंय काय त्ये. त्ये म्हनलं, आता काय बी झालं तरी नगरपालिकेत झ्येंडा लागलाच पायजेल. पैसा निस्ता वतला वो - नदीला पन कमी पूर येत असंल. काय नाय तरी शे दिडशे कोटी तरी आत बगा. वर्नं सवता दादा म्हनाले, "घरटी धा हज्जार देतो." बास का? आनि काय पायजेल?

निवड्नुकीच्या दिशी आमीबी मजाच क्येली. आयला, ही सुक्काळीची पाच-पाच वर्सं आमाला धुत्यात, म्हनलं आपुनबी धुवावंकी हेन्ला. सोडतोय काय? ग्येलोच न्हाई मतदानाला. तिकडं दुपारचं तीन वाजलं तरी कोन काळं कुत्रं न्हाई. तवा दादांनी पाठिवल्या की गाड्या. चला, चला म्हनायला लागलं. तवा आमी समद्यांनी म्हनलं," हिकडं धा-धा हजार ठिवा की आलोच." झक मारत धाधा लाल गांधीबाबा ठिवले हातावर तवा आमीबी "इजय असो" म्हनत गाडीत बसल्यालो. इचिभनं, मतदान हा मूलभूत हक्क हाये आनि ते पवितर करतव्य पन हाये असं कुनीतरी म्हनत व्हतंच. हक्काचे पैसे मिळाल्यावर घालाया पाहिजे बाबा, कुनाला तरी मत. आपन तसे लै पारमानिक हावोत.

हां,आता त्यो कोन - दाभाड्यांचा किरन्या म्हनून हाये. हाय, बरं हाय पोर्गं. गेल्या टायमाला वॉर्डात आल्ता निवडून. आमच्या गल्लीत रस्ता केल्ता, टुबा बशिवलेल्या. पान्याच्या पायपाबी टाकल्यावत्या तेनं. त्ये झालं खरं, पन आता ईजच न्हाई तवा टुबा काय करत्यात? रातच्याला अंधारच अस्तुया हिकडं. आनि नळाला पानीपन पयले आट दिस आलं कसंतरी. जितं समद्या गावालाच दोन दिसातून येकडाव पानी येतंया थितं आमच्या गल्लीत कुठलं पानी येयाला? त्यो किरन्याबी आमच्या दादांच्या नावानं बोंबलत हुता कायम. दादांनी नगरपालिका बुडिवली, ह्यो कारखाना खाल्ला, त्यो रस्ता गिळला, हिकडचा माळ हाडपला म्हनून. त्येनं यंदा एक सुराज्य आगाडी काढली हुती, दादांच्या इरोधात. दादांनी दातच धरलाता. काय हुनार? पडलं बेनं. पार सपाट. त्येच्या डोचक्यावर परिनाम झाला निवडनुकीच्या निकालानंतर. आमीच धरून घरात सोडलं त्येला तेच्या. बिच्चारं. न्हाईतरी ते तसं कामातनं ग्येलेलंच होतं म्हना. दुसरं काय हुनार, दादान्ला डिवचल्यावर?

मग पटलं न्हवं - आमची दिवाळी परवाच्याला सपली. म्हैनाभर दिवाळी हुती नुस्ती.
लै भारी. तेज्यायला, हे निवड्नुकाचं झेंगाट लै बेस हाय राव. म्या तर म्हंतो, कस्ली ना कस्ली तरी निवड्नुक दर सा मैन्यांना व्हायला पायजे.ग्रामपंचायत हाये, नगरपालिका हाये, म्हानगरपालिका हाये, पंचायत समिती हाये, झिल्ला परिशद हाये, झालंच तर ते काय - हां, इधानसभा हाये, लोकसभा हाये. येक ठराव करून सम्द्या देशात या निवड्नुका अशा दर सा मैन्यांना एक ठिवाव्यात. म्हंजे आमाला बरं हुईल.

ते खुळं आन्ना उगा उनातानात, थंडीपावसात उघड्यावर बसून उपोषान करतया. आनि ती शेरातली चार टाळकी कायतरी टायम्पास म्हून जात्यात तेच्यामागं. म्हनं भ्रस्टाचार नगो. काय ते - जनलोकपाल पायजेल. त्येंचाबी किरन्या दाभाड्या हुनार ह्ये नक्की. च्यायला, हितं कोन म्हंतोय भ्रस्टाचार नगं म्हनून? अवो, भ्रस्टाचार पायजेलच. पायजेल म्हंजे पायजेल. आनि निवड्नुक बी पायजेल दर सा मैन्याला. न्हाईतर आमच्यासारक्यांचं कसं हुईल? निवडनुक म्हंजे निस्तं वडायचं हो! द्या टाळी. ह्ये, ह्ये, ह्ये.

तवा बोला- भारतीय लोकशाहीचा इजय असो. भ्रस्टाचाराचा इजय असो. निवडनुकांचा इजय असो.

***

टीप - नुकताच गावी गेलो होतो. तिथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा हा खराखुरा चेहरा दिसला. सर्वसामान्य मतदार राजा इतका सूज्ञ झाला आहे हे पाहून आनंद झाला. तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे. आपला मूर्खपणा कळून आल्यावर मग मलाही मोठ्याने आणि आनंदाने ओरडावेसे वाटले - भारतीय लोकशाहीचा विजय असो. भ्रष्टाचाराचा विजय असो. निवडणुकांचा विजय असो.

केवळ (मला वाटणार्‍या) जनलज्जेस्तव सर्व नावे बदललेली आहेत. बाकी घटना व व्यक्तीरेखा खर्‍याच आहेत - यात वेगळे सांगण्यासारखे काही नाही.

समाजजीवनमानसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनअनुभव

प्रतिक्रिया

'सत्य'कथा आवडली विसुनाना.

सर्वसामान्य मतदार राजा इतका सूज्ञ झाला आहे हे पाहून आनंद झाला. तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे.

हे बाकी खरयं.

अन्या दातार's picture

21 Dec 2011 - 2:48 pm | अन्या दातार

विषण्ण करणारी तरीही सत्य स्थिती.

देविदस्खोत's picture

21 Dec 2011 - 2:53 pm | देविदस्खोत

महोदय,, आजचा आपला भारतीय लोकशाहीचे विनोदी शैलीने पण सत्य व यथार्थ स्वरूप दाखविणारा लेख उत्कृष्ट वाटला. वाचनीय तसाच मननीय आहे. असा हा लेख वाचायला मिळाल्याबद्द्ल """ आपला विजय असो !!!! """ तसेच असे उत्कृष्ट साहित्य वाचावयांस मिळत आहे म्हणून "मिपा" चा ही " विजय असो !!!" पुन्हा एकदा " आपला व मिपाचा विजय असो" !!!!!! असे म्हणण्याचा मोह आवरत नाही.

यशोधरा's picture

21 Dec 2011 - 2:58 pm | यशोधरा

पर्फेक्ट.

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2011 - 8:40 pm | नगरीनिरंजन

पर्फेक्ट.
जुलूस ऐन रंगात आला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2011 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार

नान ओ नाना...

एकदम खळ्ळ खट्याक लेख.
बेष्ट येकदम.

मोहनराव's picture

21 Dec 2011 - 3:03 pm | मोहनराव

>>तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे.

पटतंय!! इजय असो. इजय असो.
मस्त लेख.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2011 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा ह्ये लै ब्येस क्येल बगा तुमी...कंदी कंदी असं खरंखर बी कळाया पायजे जन्तेला... अबिनंदन तुमचं :-)

वसईचे किल्लेदार's picture

21 Dec 2011 - 3:57 pm | वसईचे किल्लेदार

>>तिथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा हा खराखुरा चेहरा दिसला. ...
अगदी यथार्थ चित्रण विसुनाना. थोड्याफार फरकाने सगळीकडे हीच परीस्थीती दिसुन येते. आमच्याकडे अजुनही बंदुकधारी प्रेमळ मनुक्श येतो मते मागायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2011 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्याही तालुक्याच्या गावी नगरपालिका निवडणूकीचा नुकताच आम्हीही अनुभव घेतला. खूप वाईट अनुभव आला. जरा वेळ मिळाला की तपशिलवार अनुभव ड्कवतो. लोकशाहीच्या आपण मोठ्या गप्पा मारतो. पण,प्रत्यक्षात अनुभव खूप वेगळेच असतात.

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

21 Dec 2011 - 7:29 pm | मराठी_माणूस

आदीच त्यो आन्ना हाजार्‍या लै बोंबा मारतोय फुडार्‍यांच्या नावानं.

तशे काही शेरी लोक हाईत आपल्या बाजुने म्हंजे डाईरेक्ट न्हाई पन त्ये काय करत्यात तर कुरापती काढत्यात . कशा तर ,
"अन्ना म्हंजे काय देवदूत हाय काय ? त्यांची मान्स अशी हाईत तशी हाईत ? त्ये म्हनतील तसे केल तर सगळ नीट हुईल कशावरन?"

चित्रा's picture

21 Dec 2011 - 7:43 pm | चित्रा

लोकशाहीबद्दल सिनिकल (किंतु मनात येणे याखेरीज मराठी शब्द सुचत नाही) होण्याची वेळ यावी याबद्दल वाईट वाटले.

मन१'s picture

21 Dec 2011 - 8:50 pm | मन१

!

फारएन्ड's picture

21 Dec 2011 - 9:04 pm | फारएन्ड

मस्त लिहीले आहे, आवडले एकदम! "गांधी हायस्कूलात" चाललेले प्रकार वाचून जबरी विरोधाभास जाणवतो :)

प्राजु's picture

22 Dec 2011 - 12:34 am | प्राजु

खरंय!!
जे आहे ते असंच आहे. काय करणार!

सन्जोप राव's picture

22 Dec 2011 - 5:45 am | सन्जोप राव

नुकताच गावी गेलो होतो. तिथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा हा खराखुरा चेहरा दिसला. सर्वसामान्य मतदार राजा इतका सूज्ञ झाला आहे हे पाहून आनंद झाला. तुम्हा-आम्हा तथाकथित पांढरपेशांना जे सत्य कळले नाही ते त्याला स्वच्छ कळले आहे. आपला मूर्खपणा कळून आल्यावर मग मलाही मोठ्याने आणि आनंदाने ओरडावेसे वाटले - भारतीय लोकशाहीचा विजय असो. भ्रष्टाचाराचा विजय असो. निवडणुकांचा विजय असो.
केवळ (मला वाटणार्‍या) जनलज्जेस्तव सर्व नावे बदललेली आहेत. बाकी घटना व व्यक्तीरेखा खर्‍याच आहेत - यात वेगळे सांगण्यासारखे काही नाही.

तंतोतंत हेच म्हणतो. बदललेली बरीच नावे कळाली. निवडणुकीचा हा चेहरा मलाही (गावाकडेच!) दिसला. तुम्ही माझे लिहिण्याचे कष्ट वाचवले. अर्थात इतके गमतीदार मला लिहिता आले नसते हा भाग वेगळा. धन्यवाद.

स्वाती२'s picture

22 Dec 2011 - 6:43 am | स्वाती२

खिन्न करणारे वास्तव!

पाषाणभेद's picture

22 Dec 2011 - 7:26 am | पाषाणभेद

फारच मस्त सत्य कथा.

विसुनाना's picture

22 Dec 2011 - 11:45 am | विसुनाना

"आता तुम्ही सांगशीला, 'अरे, मतदान गुप्त असतें. पैसे घेऊन का होईना पण योग्य उमेदवाराला मत दिलें असतेस तर समजलें असतें कां कोणालां?' -- आमाला काय खुळं समजताय का काय राव? तुमाला वेव्हार आजाबात कळत न्हाई. अवो, आमी पारमानिक हावोत यात येक गोम हाय. काय म्हनून काय इचारताय? पारमानिक न र्‍हाऊन चालतच न्हायी. र्‍हावंच लागतं. पैसं घिऊन पन हुबारलेला गडी पड्ला तर दादा काय सोडतील काय आमास्नी? तकडं 'क' वॉर्डात पडलं की दोघं असंच. मग काय इचारता? घराघरात जाऊन दादांचे कारेकर्ते आदुगर दिल्याले धाधा हज्जार रुप्पय वसूल करत हुते. हायसा कुठं? मंग? आमच्यासारक्या गरीबांनी कुठनं आनायचं हो धा हज्जार? ह्यॅ,ह्यॅ,ह्यॅ...त्येच्यापरास पारमानिक र्‍हावं, खालेल्या मिटाला जागावं मान्सानं."

शिल्पा ब's picture

22 Dec 2011 - 12:44 pm | शिल्पा ब

कोपरगावातली जुनी गोष्ट. माझ्या मावशीच्या वार्डात एक बाई उभी होती अन सगळ्यांना साड्या वाटल्या. निवडणुकीत पडली. मग घरोघरी जाऊन तिने स्वतः दिलेल्या साड्या अगदी अंगावरच्यासुद्ध ओढू ओढू काढल्या.
हसावं कि रडावं काही समजेना ...

लेख भन्नाट .. प्रा. डॉ. यांच्या लेखाच्या प्रतीक्षेत.

अविनाशकुलकर्णी's picture

22 Dec 2011 - 1:16 pm | अविनाशकुलकर्णी

नाना तोडलत..
अन आंतर्मुख का म्हनतात ना त्ये बी केलत..

लेखन आवडले..

चिगो's picture

22 Dec 2011 - 1:26 pm | चिगो

"आता तुम्ही सांगशीला, 'अरे, मतदान गुप्त असतें. पैसे घेऊन का होईना पण योग्य उमेदवाराला मत दिलें असतेस तर समजलें असतें कां कोणालां?' -- आमाला काय खुळं समजताय का काय राव? तुमाला वेव्हार आजाबात कळत न्हाई. अवो, आमी पारमानिक हावोत यात येक गोम हाय. काय म्हनून काय इचारताय? पारमानिक न र्‍हाऊन चालतच न्हायी. र्‍हावंच लागतं. पैसं घिऊन पन हुबारलेला गडी पड्ला तर दादा काय सोडतील काय आमास्नी? तकडं 'क' वॉर्डात पडलं की दोघं असंच. मग काय इचारता? घराघरात जाऊन दादांचे कारेकर्ते आदुगर दिल्याले धाधा हज्जार रुप्पय वसूल करत हुते. हायसा कुठं? मंग? आमच्यासारक्या गरीबांनी कुठनं आनायचं हो धा हज्जार? ह्यॅ,ह्यॅ,ह्यॅ...त्येच्यापरास पारमानिक र्‍हावं, खालेल्या मिटाला जागावं मान्सानं."

हे एकदम झक्कास.. बादवे, माझ्या एका मित्राने सांगितल्यप्रमाणे, पुण्याजवळील एका नगरीत एकाच पॅनलचे सगळे उमेदवार निवडून आलेत म्हणे. आधी गुटख्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि आजकाल बाटलीबंद पाणी विकणार्‍या उद्योगपतीचे पॅनल आहे हे.. त्याच्या सांगण्यानुसार प्रत्येक मताला रु.२५०० ते रु.१०,००० इतका भाव मिळाला.. (च्यायला, हे त्रांगडं कळलं नाही ब्वॉ आपल्याला. सगळ्यांना शेम रेट लावावा का नाय ;-)) आणि सगळे उमेदवार (पडलेले आणि निवडून आलेले) भ्रष्टाचारविरोधी आणि अण्णा-समर्थक होते म्हणे.. :-D

साती's picture

22 Dec 2011 - 2:53 pm | साती

खरीखुरी आणि मस्त कथा.
आवडली.
मतांच्या प्रामाणिकपणाचं कारण भारीच.

मस्त कथा, हल्लीच इथं पण एकाचा किरण दाभाडे झाला असं ऐकण्यात आहे...

पैसा's picture

23 Dec 2011 - 10:31 pm | पैसा

लोकशाईचा इजय असो! मला 'बिनकामाचा नवरा' या तुफान विनोदी सिनेम्यातले रंजना-अशोक सराफचे 'लोकशाई'बद्दलचे ड्वायलॉक आठवले.

विसुनाना's picture

24 Dec 2011 - 11:00 am | विसुनाना

सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसाददात्यांना धन्यवाद.