पुलं, निळा कोल्हा आणि.....

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जनातलं, मनातलं
17 Oct 2009 - 6:28 pm

पिपात पडलेल्या निळ्या कोल्ह्याचे पितळ अखेर उघडे पडले आणि सगळ्या कोल्ह्यांनी त्याला राज्यपदावरून पदच्युत करून हाकलून दिले.
निळा कोल्हा रानोमाळ भटकत निघाला आणि अखेर तो एका आमराईत आला.
आमराईत जरा विश्रान्ती घ्यावी म्हणून तो एका डेरेदार झाडाच्या दिशेने निघाला.
झाडाजवळ गेला आणि बघतो तर काय.. !
तिथे मध्यम वयाचा, चश्मा घातलेला आणि मिश्किल हसणारा एक माणूस एका चिमुरड्या मुलीबरोबर गाणे म्हणत होता. 'अरे, हे तर पुलं देशपांडे !' निळा कोल्हा म्हणाला आणि झाडाजवळ जाऊन पाहू लागला.
चिमुरडी अगदी जीव ओतून गाणे गात होती.
'नाच रे मोरा आंब्याच्या वनात,
नाच रे मोरा नाच.'
समोर मोर नाचत होता..
आपल्या गाण्यावर मोर खरोखरच नाचतो, याचे त्या चिमुरडीला भारी आश्चर्य वाटत होते! ती आपली गातच होती आणि मोरही नाचत होता. पुलंही ही जादू पहात बसले होते. कधी सम्पूच नयेत असे ते दिव्य क्षण होते..
एका झाडाआड लपून निळा कोल्हा हे पहात होता. त्याच्या अन्गाची लाही लाही होत होती.. एक यत्किन्चित मोर ! वर्षानुवर्षे या गाण्यावर नाचत बसला आहे... आणि 'तो' खेळिया ... दुनियाभरचे सारे प्राणी- विशेषतः कोल्हे सोडून त्या मोरालाच नाचवत बसला आहे... ते काही नाही... आपण त्याला सान्गायचे की आता नो मो(अ)र! नो मोर ! आता मोर नाही नाचणार, आपण नाचायचे !

विचार पक्का करून तो उडी मारून पुलंच्या समोर जाऊन उभा राहिला... कोल्ह्याला बघताच मोर केकाटत दूरवर पळाला. चिमुरडी देखील दोन पिटुकल्या वेण्यांमधला गजरा साम्भाळत नाहीशी झाली...
कोल्ह्याने पुलंना अभिवादन केले. आपली सारी कर्मकहाणी त्याना सांगितली आणि मदत करण्याची विनन्ती केली.
'मी तुला काय मदत करणार ?'
'एक फक्कडसे गाणे लिहा माझ्यावर आणि मलाही नाचवा त्या मोरासारखा !'
'काय?'
' तुम्ही म्हणजे साक्षात विनोदी हृदय सम्राट... विनोदी लेखनाचा गड सर करणं म्हणजे काही चेष्टा नाही महाराजा ! भल्याभल्यांची 'भंबेरी' उडते! विनोदी लेखन म्हणजे मराठी प्रान्तातला 'भंबेरीगड'च म्हणायचा! मग तुमच्याशिवाय कोण करणार हे काम, भाई?'
'छ्या छ्या , मला नाही जमणार...!'
'कसे नाही जमणार? लोक तुम्हाला कोटी बहाद्दर म्हणतात.. मराठी लोक रोज नव्याने हिशोब मान्डतात... किती कोटी म्हणजे एक पुलं ? अजुन कुणाला गणित सुटले नाही... आणि तुमच्याकडे 'कोटी' असताना तुम्ही माझ्याकडे 'लक्ष' टाकू शकत नाही ?'
' पण आंब्याच्या वनात कोल्हा नाचवायचा? मोर उडून जाईल की मग!'
'मोर मोर मोर! तुम्ही वर्षानुवर्षे त्या मोरालाच का धरून बसला आहात? तुमच्या लोकशाहीमध्ये हा माझ्यासारख्या एका गुणी कोल्ह्यावर अन्याय नाही का ?ते काही नाही, तुम्ही मला नाचवलेच पाहिजे!'
कोल्ह्याने आपले घोडे पुढे दामटले.
'तू नेमका लोकशाहीतूनच आला आहेस की ठोकशाहीतून?.... हा प्रश्न पुलंच्या अगदी ओठांवर आला होता... पण दूरवरून वाघाची डरकाळी ऐकू आली आणि त्यांचे हृदय 'ठोक' 'ठोक' करत धडधडू लागले. त्यानी तो प्रश्न मुकाटपणे गिळून टाकला!
'पण कोल्हा कसा नाचेल?' पुलंचा केविलवाणा प्रयत्न..
' न नाचायला काय झाले? तुम्हीच तर गाण्यात म्हटलेले आहे... निळ्या सवंगड्या नाच! निळा सवंगडी म्हणजे निळा मोरच का ? निळा कोल्हा हा निळा सवंगडी का नाही होऊ शकत?'
कितीही झाले तरी निळा कोल्हा औट घटकेचं का होईना पण सरकार चालवून आला होता!
पुलं मुकाटपणे बसून राहिले!
त्यानी खिशातून कागद काढला, पेन काढले, दोनचार ओळी खरडल्या, तालासुरात म्हणून पाहिल्या आणि दूरवर पहात एक हाक मारली,
'आशा, ए आशा, अगं गाणं म्हणणार आहेस ना?'
'कुठलं?' दूरवरून प्रश्न आला.
'कोल्होबाचं गाणं..आता नवीन लिहिलंय... '
'कोल्होबाचं गाणं? मी नाही म्हणणार... मी इथे 'एका तळ्यात' पोहणारी ' बदके पिले सुरेख' बघत बसली आहे... आता मला वेळ नाही..'
ती येणार नाही हे पुलंनी ओळखले.
'धाकली असली तरी हट्टीपणाच्या बाबतीत मात्र थोरली हीच !' पुलं पुटपुटले आणि आलिया भोगासी असावे सादर हे ओळखून कोल्ह्याला म्हणाले..
'कोल्होबा, अहो, ती नाही म्हणते आहे.. मी गाणे म्हतले तर चालेल का?'
'म्हणा की! तुम्हीच काय, कुणीही चालेल आणि कुठलेही गाणे चालेल.. मला काय , फक्त नाचण्याशी मतलब.'

पुलं कोल्ह्याला घेऊन द्राक्ष्याच्या मळ्यात गेले.
'नाच रे कोल्ह्या द्राक्ष्याच्या मळ्यात
नाच रे कोल्ह्या नाच.'
त्यानी गाणे चालू केले.
कोल्हा त्यावर नाचू लागला.
'द्राक्ष्याची गोडी वाढली रे.
तुझी माझी जोडी जमली रे....'
.... पण....
पण काही केल्या कोल्ह्याची आणि नाचाची जोडी काय जमेना.. कोल्ह्याने मोरासारखा शेपटीचा पिसारा फुलवून पाहिला, दोन्ही कान भ्रूमध्यावर एकवटून त्याचा तुरा करण्याचा प्रयत्न केला.... नाचाच्या नावाखाली द्राक्षे काढण्याचा प्रयत्न केला. शेपटी तोन्डात धरून गोल गोल फिरून झाले. पण त्याला मोर काही होता येईना..
अर्धा एक तास या झटापटीत गेला.
कोल्हा दमला. पुलंही कमर्शियल ब्रेकसाठी थाम्बले.
नाचायचा पाठ पुरता गिरवल्याबिगार हा कोल्हा आपली पाठ सोडणार नाही, हे त्यानी ओळखले आणि सचिंत मुद्रेने ते तसेच बसून राहिले.

तेवढ्यात तिथे सुलोचनाबाई चव्हाण आल्या.
त्यानी पाहिलं. द्राक्ष्याचा मळा, पुलं आणि कोल्हा... त्यांना काहीच समजेना..
'काय भाई, इकडे कुठे?' त्यानी पुलंना विचारले.
पुलंनी सगळी कहाणी त्यांना सांगितली.
ते ऐकून सुलोचनाबाई खो खो हसत सुटल्या.
'काय पुलं, तुम्ही पण.. अहो कोल्हा द्राक्ष्याच्या मळ्यात कसा नाचेल? कोल्ह्याला द्राक्षे आंबट माहीत नाही का तुम्हाला?'
'मग कुठे नाचवायचा आता त्याला..? आंब्याचे वन झाले, द्राक्ष्याचा मळा झाला.. आता त्याला राजी करायला काकडीचे शिवार शोधू की काय?'
'तेही खरंच म्हणा.'
बाईदेखील सचिंत बसून राहिल्या.
दोन चार क्षण असेच गेले.
'भाई, एक विचारू?'
'काय?'
'कान इकडे करा.. कानात सांगते..'
'.........'
'काही तरीच काय, बाई? असं कसं होईल?' पुलं चित्कारले.
'पुलं, अहो गाजराची पुंगी. वाजली तर वाजली.. तुम्ही अडलेले आहात.. मीही अडलेली आहे... प्रयत्न करायला काय हरकत आहे?'
'पण तो आहे कोल्हा, त्यात राजकारणी.. त्याचा काय भरवसा? भाई भाई म्हणत जवळ आला. आता भाईला पळता भुई थोडी झाली आहे.'
'ते सगळं माझ्यावर सोपवा. दिवाळी तोंडावर आली आहे. भाऊबीजेची ओवाळणी समजून मला मदत करा, भाई.'
'बरं बघू..' पुलं म्हणाले आणि दूरवर बसलेल्या कोल्ह्याकडे गेले.

सुलोचनाबाई, पुलं आणि कोल्हा अशी वरात निघाली..
मैलभर रपेट झाली.
बाई एका झाडाखाली थांबल्या. पुलंना त्यानी जवळ उभं केलं.
कोल्ह्याला बाईंनी हातानेच त्याची जागा दाखवली.
कोल्हा आपल्या जागेवर गेला.
तिरपी मान करून कोल्ह्याने आजूबाजूला पाहिले..
हिरवागार ऊस तरारला होता....
बाईंनी नुसत्या नजरेनेच कोल्ह्याला खूण केली आणि ताल मात्रा यांचा अंदाजही पुलंना न देता डायरेक्ट गाण्यालाच खड्या आवाजात आपला गळा भिडवला..

'फड सांभाळ तुर्‍याला गं आला.
तुझ्या उसाला लागंल कोल्हा...'

.... आणि अंगात हीव भरावी तसा निळा कोल्हा सोंगाड्यागत नाचू लागला..! आता त्याला ना मोराचा पिसारा हवा होता, ना तुरा..

आपल्यामागची ब्याद टळली, हे पुलंनी ओळखले.
आणि आपली ही नवी कोरी लावणी आता सोंगाड्याविना तटणार नाही, हे ओळखून सुलोचनाबाईही गालातल्या गालात हसल्या.
भाईंनी दिलेल्या ओवाळणीमुळे त्यांची भाऊबीज दिवाळीच्या आधीच साजरी झाली.

पुलंच्या निळ्या सवंगड्याला रिटायर करू पहाणारा निळा कोल्हा आजही सुलोचनाबाईंच्या लावण्यांवर सोंगाड्या म्हणून नाचतो आहे म्हणे!

कथाविनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

17 Oct 2009 - 6:34 pm | श्रावण मोडक

भारी! एका दगडानं अनेक पक्षी...

अवलिया's picture

18 Oct 2009 - 10:59 am | अवलिया

असेच म्हणतो.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

देवदत्त's picture

17 Oct 2009 - 7:55 pm | देवदत्त

अरे वा,
ही आहे का ह्या गाण्यामागची कहाणी ?:)

प्रमोद देव's picture

17 Oct 2009 - 8:07 pm | प्रमोद देव

निळ्या कोल्ह्याची कहाणी आवडली.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Oct 2009 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे

लांडग आल कि मंग त्याला बी नाचवायच .लबाड लांडग ढ्वाँग करतय लगीन करायच स्वाँग करतय!
सुलोचना बाईंच तुझ्या उसाला लागल कोल्हा हे अगदी संस्मरणीय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धनंजय's picture

17 Oct 2009 - 10:38 pm | धनंजय

चटपटीत आणि गमतीदार.

(वर श्रामो म्हणत असल्याप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचा प्रकार दिसतो. पैकी खुद्द पुलांनाही दगड मारलेला दिसतो!)

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Oct 2009 - 11:20 pm | ब्रिटिश टिंग्या

छान लेख!

अवांतर : पु ल नव्हे...भाईकाका म्हणा :)

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2009 - 8:36 am | llपुण्याचे पेशवेll

अवांतर : पु ल नव्हे...भाईकाका म्हणा
हो नाहीतर दगड अजून कुठेतरी लागेल.
लेख छानच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

मी-सौरभ's picture

17 Oct 2009 - 11:45 pm | मी-सौरभ

सौरभ

मदनबाण's picture

18 Oct 2009 - 1:27 pm | मदनबाण

छान लेख...

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
देव न करो
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=164...

स्वाती२'s picture

18 Oct 2009 - 5:13 pm | स्वाती२

मजेशिर कहाणी

पाषाणभेद's picture

18 Oct 2009 - 5:24 pm | पाषाणभेद

लोकप्रभात असलच कायतरी वाचलं. आपनच लिवलय काय?

JAGOMOHANPYARE's picture

19 Oct 2009 - 10:52 am | JAGOMOHANPYARE

लोकप्रभा? मी लोकसत्ताला पाठवले होते.... त्यात आले असले तर माहीत नाही........ जरा डिटेल द्या शक्य असल्यास.........

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

Nile's picture

19 Oct 2009 - 12:51 am | Nile

वा कल्पक! मजा आली. :)

shweta's picture

19 Oct 2009 - 5:46 am | shweta

खुप छान लिहिल आहे.

प्राजु's picture

19 Oct 2009 - 7:22 am | प्राजु

छान आहे.. आवडलं!
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

हर्षद आनंदी's picture

19 Oct 2009 - 10:16 am | हर्षद आनंदी

'फड सांभाळ तुर्‍याला गं आला.
तुझ्या उसाला लागंल कोल्हा...'

लय भारी, पण लिवण्यामागचा उद्देश नाय समजला राव किंबहुना कथा म्हणुन रोचक वाटले पन नाय समजली भौ.

जमल्यास खरडीत अर्थ साभार कळवा.

JAGOMOHANPYARE's picture

19 Oct 2009 - 2:56 pm | JAGOMOHANPYARE

पुलं सध्या मालदीव मध्ये असतात...... धीरागु मोबाईलच्या जाहीरातीत ते मॉडेल म्हणून काम करतात... हा फोटो... :)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

गणपा's picture

19 Oct 2009 - 3:50 pm | गणपा

लावणीची (पडद्या मागची जन्म) कहाणी आवडली.

सहज's picture

20 Oct 2009 - 7:19 am | सहज

कसे काय?

फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

हे गाणे गदिमांचे आहे ना?

काही समजले नाही. इनोसंस लॉस्ट ??    मराठी गाणे, साहीत्य, संगीत कुठून कुठे आले आहे यावर भाष्य वगैरे आहे का? अन्यथा लेख डोक्यावरुन गेलाय.

विनायक प्रभू's picture

19 Oct 2009 - 4:09 pm | विनायक प्रभू

भारी

प्रमोद देव's picture

19 Oct 2009 - 4:46 pm | प्रमोद देव

डॉक्टरसाहेब अभिनंदन!
हीच आपली कथा सकाळच्या दिपोत्सवात छापून आलेय.

JAGOMOHANPYARE's picture

20 Oct 2009 - 10:10 am | JAGOMOHANPYARE

धन्यवाद........

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

अन्वय's picture

20 Oct 2009 - 7:12 pm | अन्वय

चांगली बालकथा
आवडली