फॅन च्या पुलीला लावलेल्या फ्लो मिटर वरचे रीडींग पाहिल्यावर त्याने सुस्कारा सोडला. चाळीस अंश तापमानाची वेधशाळेने शक्यता वर्तवली होती. मे महीन्यात .२९ डेन्सीटीने फार्मिंग ही आत्महत्या आहे हे माहीत असुन सुद्धा ८००० स्क्वेअर फुटात सुमारे २५००० पिल्ले घेण्याचा धोका पत्करला होता त्याने. अगदी आधुनिक फिडींग, वेंटीलेशन, ड्रिकींग कुलींग असले तरी आजवरच्या इतिहासात हा प्रयोग कुणीही करायला धजावले नव्ह्ते.
हॅचरी च्या मालकांनी फ्लॉक व्यवस्थित पाठवण्याचे आश्वासन दिले होते.
पण त्या आश्वासनाचे पालन म्हणजे एक योगायोग असतो हे गेल्या दोन वर्षात त्याला बरोबर माहीत होते.
शेड उघडुन आतले कामगार बरोबर जागृत आहेत की नाही ह्याची खात्री करुन तो फार्म हाउस कडे जाण्यास वळला. जाताना फार्मच्या गेटवर एक बाई पाण्याकरता आलेली दिसली. पाणी देणे हा काही मोठा विषय नव्हता. पण कुणालाही फार्मवर येउ देणे बायो सिक्युरिटी ला धोका दायक होते. आणि मे महीन्यात तर नाहीच नाही. जराशी चुक पण परवडणार नव्हती.
एका लेबर कडुन त्या बाईला एक हंडा पाणी द्यायला सांगुन तो फार्महाउस कडे आला. गावापासुन सुमारे १.५ कि.मी वर असलेला ह्या फार्मने घरटी एक नोकरी दिली होती. त्या मुळे गावात सुबत्ता आली होती. कामशेत पासुन सुमारे ४० कि.मी. टाटा धरणाच्याजवळ असलेल्या ह्या गावात मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. बाया बापबापड्यांचे खुप हाल व्हायचे. गावापासुन फक्त ७ कि.मी. वर एक घनदाट जंगल होते. पाउस भरपुर पण पाण्याचे नियोजन नाही. गावापासुन सुमारे ४० फुट खाली असलेल्या ह्या फार्म च्या आजुबाजुने बरेच ओहोळ जायचे. हे सर्व ओहोळ जोडुन फार्मच्या खालच्या अंगाला एक बंधारा बांधला तर विहीरीचे पाणी वाढेल हे त्याला माहीत होते. त्याने रात्री गावकर्यांची सभा बोलवली. त्यांच्या समोर कल्पना मांडली. कल्पना साधी होती. घरटी सुमारे रुपये १०० व श्रमदान केल्यास हा बंधारा होणे शक्य होते. कल्पना मांडल्यावर पहिल्यांदा सरपंचच बोलले.
सरपंच: अहो सायेब, तुमचा फार्म तिकडे ५० फुट खाली. तिते बांदारा बांदुन गावातल्या विरीवर्चे पाणी कसे काय वाडल.आनि संबर रुपये कोन देनार वो. तुमी बगताय ना आमचे हाल.
गेल्याच महीन्यात सरपंचाने लुना काढुन राजदुत विकत घेतली होती.
दारुचा दुकानदारः त्या पेक्षा तुम्ही अस करा साहेब, तुम्ही तुमच्या शेट्ना सांगा. त्यांना पण फायदा होईल की. गावासाठी काहीतरी केल्याचे पुण्य लाभेल म्हणावे.(हा मुंबईतुन स्थलांतरीत)
तो: अरे तुमच्या बायकांना त्रास होतो म्हणुन म्हटल.
गावच्या देवळाचे खजिनदारः ओ सायेब, माज्या आईने पण केल, माजी बायको पण करते, माजी सुन पन करल. तेंचा जलमच त्या साटी हाये.
त्याने काढता पाय घेतला.
शेठने आधीच भरपुर केले होते गावासाठी. आता त्याला आणखी २०००० रुपयाला खड्यात घालायचे कसे ह्या विचारात तो पडला.
रात्री नेमके शेठ फार्मवर आले. इंडस्ट्री मधील त्यांच्या सर्व मित्रानी त्यांचे क्रिया कर्माचे सामान तयार करुन ठेवले होते. रोज उठुन घेतलेल्या आव्हानाबद्दल चर्चा करुन थकलले दिसले. त्यांनी सर्व जण काय म्हणताहेत त्याचा वर्तावळा त्याला दिला.
तो: तु काही घाबरु नकोस. फ्लॉक निघाल्याशिवाय मी काही घरी जाणार नाही.
शेठः अरे पण वहीनी काय म्हणतील.
तो: काहीही म्हणणार नाही. तीला माझे किडे माहीत आहेत. मी सांगेतले ना तुला ही सर्व माझी जबाबदारी. तु लोक काय म्हणताहेत त्याच्या कडे लक्ष देउ नकोस. एक गोष्ट करायची आहे मला. सुमारे २०००० खर्च लागेल. मागच्या बाजुला एक बांध घालु.
शेठः त्यात माझा फायदा काय ते सांग.
त्याने ओळखले कालच्या मिटींग मधे शेठ चे हितशत्रु नी अथवा कॉम्पीटीशीन मधल्या हॅचरी ने कान भरले आहेत.
आता ह्याचे नेमके 'फायदेशीर' उत्तर काय द्यायचे हे त्याला कळेना.
तो: बॅगमधुन पेपर काढ. मी तुला लेखी मांडुन दाखवतो.
पेपर काढताना लागलेल्या वेळात उत्तर शोधणे भाग होते.
तो: तुझ्या दुसर्या बोर चे पीएच. जवळ जवळ आठ आहे. त्यामुळे बॅक्ट्रीयल मॅनीफेस्टेशन होते. मॉर्टॅलिटी वाढते. परत वॉटर ट्रीटमेंट चा खर्च आहेच आहे. पाण्याची पातळी वाढल्याने पीएच डायुल्युशन ने जरा जरी कमी झाले तर फायदाच होईल.(डायल्युशन ने ए पीएच कमी होते हा एक ऐनवेळी सुचलेली लोणकढी होती).
आणि हा फ्लॉक घेताना मला इतर गोष्टीची काहीच नाही.मी गेली दोन वर्षांची रिडींग तयार ठेवली आहेत. फक्त पीएच ची काळजी वाटते. मग दरवर्षी अशाच डेन्सिटीचा फ्लॉक घेउ. जुन महीन्यात माल कमी असल्याने रेट मीळतो. मी १०००० किलो माल जास्त काढणार आहे. कर गुणाकार. जास्तीचे चार लाख. काय बोल्तोस.
मात्रा बरोबर लागु पडली.
४ दिवसात बंधारा तयार झाला.
पुढच्या मे महीन्यात गावाच्या सर्व विहीरीना पाणी होते.
शेठच्या बोरच्या पाण्याचे पीएच. ७.७ झाले.
दोन्ही फ्लॉक ला शेठला एकंदरीत आठ लाखाचा वाढीव फायदा झाला.
श्रावणातल्या मंदी करता तरतुद.
तो २ महीन्याने घरी आला. त्याच्या हाताता सुकलेल्याफुलांचा बुके होता बायकोचे समाधान करण्याकरता. इंडस्ट्री ने सत्कार केला होता त्याचा. ह्या इंडस्ट्रीत एवढ्यावरच समाधान मानावे लागते ह्याची त्याला जाणीव होती.
प्रतिक्रिया
7 Oct 2009 - 2:07 pm | अवलिया
इंडस्ट्री ने सत्कार केला होता त्याचा. ह्या इंडस्ट्रीत एवढ्यावरच समाधान मानावे लागते ह्याची त्याला जाणीव होती.
सगळीकडे असेच हाल असतात.
उत्तम.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Oct 2009 - 2:21 pm | महेश हतोळकर
"त्याचे" अभिनंदन. आणि वहिनींचेही! सामान्यांचे असामान्य कर्तृत्व दुसरं काय.
7 Oct 2009 - 2:28 pm | विजुभाऊ
सत्काराला बहुतेक ठिकाणी हार आणि मेमेंटो म्हणून लाकडाचे फळकूट मिळते.
सत्काराच्या ठीकाणी येण्याजाण्याचाच खर्च त्यापेक्षा बराच जास्त होतो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
7 Oct 2009 - 2:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(विजूभाऊ, टॅग उघडा टाकलात).
डायल्यूशनने पी.एच. कमी होणार नाही? कळ्ळं नाही.
त्रास कमी झाला असेल ना तेव्हा? आज होतो का?? का बायाबापड्यांना किमान पुढच्या उन्हाळ्यात वणवण करावी लागली नाही याचा जास्त आनंद झाला?
अदिती
7 Oct 2009 - 4:02 pm | विनायक प्रभू
त्यावेळी तो अंदाज.
नंतर खरा निघाला.
बंधार्याने झिरपलेल्या पाण्याने कदाचित होइल असे तेंव्हा वाटले होते नक्की माहीत नव्हते.
7 Oct 2009 - 2:39 pm | चेतन
अभिनंदन आणि मस्त
चेतन
7 Oct 2009 - 3:22 pm | सहज
लेख वेगळा, चांगला पण शेवटच्या वाक्याने "ह्या इंडस्ट्रीत एवढ्यावरच समाधान मानावे लागते ह्याची त्याला जाणीव होती." काहीसा निराशाजनक वाटला.
पैसा आपल्याकडे कसा खेचुन आणायचा ते टॅलेंट वेगळे, फार थोड्या लोकांकडे ते असते. अमेरिका बघा की १ टक्के लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी बाकीच्या ९५% लोकांची मिळुन :-)
चांगले काम, शिक्षण वाया जात नाही इतकेच म्हणतो.
7 Oct 2009 - 4:21 pm | प्रमोद देव
अनुभव छानपैकी व्यक्त केलाय आणि मास्तर तुमची डोकॅलिटी पण जबरी आहे.
तुमच्या डोकॅलिटीला सलाम.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
7 Oct 2009 - 4:37 pm | नंदन
अनुभव, प्रकटीकरणही मस्त. ' त्या'चे अभिनंदन.
>>> (डायल्युशन ने ए पीएच कमी होते हा एक ऐनवेळी सुचलेली लोणकढी होती).
हॅचरी आणि गावाचं भलं व्हावं म्हणून हे एक 'पिल्लू' सोडून दिलं असं म्हणायला हरकत नसावी :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
7 Oct 2009 - 5:07 pm | श्रावण मोडक
सहमत.
7 Oct 2009 - 4:46 pm | स्वाती२
अभिनंदन!
7 Oct 2009 - 4:57 pm | समंजस
मास्तर, तुमच्या पोतडीत असे आणखी किती अनुभव आहेत? :)
तुमचं अभिनंदन करावं तरी किती!! =D>
7 Oct 2009 - 6:57 pm | धमाल मुलगा
'तो' तसाही अंमळ 'हा'च!
स्वतःच्या खिशाला खार लागला तरी घेणं देणं नाही...झपाटल्यागत ह्याचं भलं कर त्याचं भलं कर करत हिंडणारा... बरं हे करुन चेष्टा-कुचेष्टाही सोसणारा!!!
२६/११ नंतर झालेल्या 'अवलिया' होण्याच्या चर्चेचे संदर्भ आजकाल हळुहळु लागायला लागले आहेत.
प्रभुबाबा,
पुन्हा नि:शब्द झालो आपल्यापुढं.
_/\_
7 Oct 2009 - 7:09 pm | चतुरंग
मास्तर, मी सुद्धा कामशेत भागात भर उन्हाळ्यात काम केलंय ग्रीनहाऊसेस करता त्याची आठवण झाली.
चतुरंग
7 Oct 2009 - 8:44 pm | क्रान्ति
आवडला. अभिनंदन!
क्रान्ति
अग्निसखा
7 Oct 2009 - 8:44 pm | टुकुल
बरेच दिवसानी लिहिल मास्तर.. पण नेहमीप्रमाणे तुमचे अनुभव जबराच..