फिलिपाईन्सच्या दिवंगत माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी
दोन दिवसापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो काळाच्या पडद्याआड गेल्या. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी "लोकक्रांती"द्वारा (People Power) हुकुमशहा मार्कोस यांना चारी मुंड्या चित करून त्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या आधी मार्कोस यांनी अनेक कॢप्त्या लढवून निवडणूक "चोरण्या"चा प्रयत्न केला, पण तो लोकांनी हाणून पाडला. चुकीची मतमोजणी जारी ठेवावी म्हणून ज्या निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांवर दडपण आणले गेले ते कर्मचारी राजीनामे देऊन बाहेर पडले व मार्कोस यांचे पितळ उघडे पडले. वैधव्याच्या दु:खद अंधाराच्या गर्तेतून बाहेर पडून आपल्या देशाचे राष्ट्रपतीपद मिळवून आपल्या पतीचे स्वप्न साकार करणार्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बाईंच्या आयुष्यातील त्या दोन-तीन दिवसातील घटनांचा एक स्मृतीपट माझ्या डोळ्यांपुढून पुन्हा गेला. त्यातल्याच या कांहीं आठवणी.
१९८६ सालचा फेब्रुवारी महिना होता तो. मी इंडोनेशियाचे दुसर्या क्रमांकाचे शहर सुराबाया येथे काम करत होतो. सुहार्तो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष व "सर्वेसर्वा" हुकुमशहा होते. वृत्तपत्रे, नियतकालिके, रेडियो व दूरचित्रवाणी या सर्वांवर सुहार्तोंची पोलादी पकड होती व कुणालाही कुठलेही नागरी स्वातंत्र्य नव्हते. TVRI (टेलीव्हिसी रिपुब्लिक इंडोनेशिया) त्यांच्या "दुनिया दालाम बरिता (बातम्यातले जग)" या रात्री ९ वाजता दिल्या जाणार्या बातम्यांमध्ये जे दाखवील तेच फक्त पहायला मिळायचे. आमच्यासारखी परदेशी मंडळी "बीबीसी"वर बातम्या ऐकायचा प्रयत्न करत, पण ते स्टेशन कधीच नीट tune व्हायचे नाहीं त्यामुळे फारच निराशा व्हायची व असहायतेची भावना मनात यायची.
मला अजूनही १९८६ सालची फिलिपाईन्समधली ती लोकक्रांती स्पष्टपणे आठवते. TVRI वर दाखवलेल्या कितीतरी चित्रफिती (video-clips) आजही मनाच्या पटलावर कोरलेल्या आहेत. जवळ-जवळ दहा लाख निदर्शक "एपिफानिओ द लॉस सांतोस ऍव्हेन्यू (EDSA)" या राजवाड्यासमोरील हमरस्त्यावर जमून निदर्शने करीत होते. लष्करी जवान आपापल्या मशीनगन्स त्यांच्यावर रोखून उभे होते. निदर्शकातल्या एका स्त्री-निदर्शिकेने एका बंदूकधारी ’जवाना’च्या हातात कसले तरी फूल दिले आणि गंमत म्हणजे असे कांहीं होईल याची कल्पनाही नसल्यामुळे तो जवान गोंधळून गेला व त्याने ते फूल स्वीकारले आणि मग एकदम तिथला तणाव कमी झाला. ही हृदयस्पर्शी आठवण आजही अगदी ताजी आहे. हुकुमशहा मार्कोस आणि त्याचा लष्करप्रमुख जनरल व्हेर यांच्यामधले संभाषणही TVRI ने दाखविले होते. मार्कोसही या अनपेक्षित कलाटणीने गोंधळून गेला होता आणि त्यामुळे तो कुठलाच निर्णय ठामपणे देऊ शकला नाही व त्यामुळे व्हेर खूपच गोंधळून गेल्याचेही दिसत होते.
जसजसे लोक त्या चौकात "चोरून" निवडून आलेल्या मार्कोस यांच्या (खोट्या) विजयाच्या विरोधात येत राहिले तसतशी मार्कोसच्या पाठीराख्यांमध्ये फूट पडू लागली. तेही लोक मार्कोसच्या राजवटीला विटलेले होतेच, त्यात प्रचंड असंतोषाचे असे विराट दर्शन घडताच सर्वात प्रथम संरक्षणमंत्री एनरीले व पाठोपाठ लष्करी सेनानी जनरल रामोस हे दोघे मार्कोसची बाजू सोडून अक्वीनोबाईंच्या बाजूला आले. (पुढे रामोस राष्ट्रपतीही झाले.) अक्वीनोबाईंनी शपथविधीनंतर जेंव्हा ज. रामोस यांची पदोन्नती केली तेंव्हा त्यांनी पिवळ्या कपड्यात दृढपणे व सुसंस्कृतपणे ऐटीत उभ्या असलेल्या आपल्या नव्या "कमांडर-इन्-चीफ"ना (अक्वीनोबाईंना) ठोकलेला कडक सॅल्यूटही मला आठवतोय व स्त्रीसुलभ डौलात गोड स्मितहास्य करून तो (सॅल्यूट) त्यांनी स्वीकारल्याचे दृश्यही माझ्या मनावर कोरले गेले आहे. शेवटी मार्कोस यांनी फिलिपाईन्समधून पलायन करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला व त्याच्या निवडक कुटुंबियांना अमेरिकन तळावर घेऊन जाणारी हेलिकॉप्टर्स TVRI वर दिसली व आनंदाने अंगावर रोमांच उभे राहिले.
अक्वीनोबाई स्वत: दु:खात बुडून गेलेल्या एक विधवा बाई होत्या. निवडणुकीचे डावपेच आखण्य़ासाठी त्यांच्या पतीला भेटायला घरी आलेल्या राजकीय मित्रांचा पाहुणचार करणे एवढाच त्यांचा तोपर्यंत राजकारणाशी संबंध. त्यांचे पती बेनीन्यो (निनॉय) अक्वीनो हे विरोधी पक्षाचे सिनेटर होते व जर मार्कोस य़ांनी "मार्शल लॉ" पुकारून ७३ साली घ्यायच्या निवडणुका रद्द केल्या नसत्या तर मर्कोसला हरवून ते राष्ट्रपतीही झाले असते. पण आधी देशद्रोहासारख्या खोट्या आरोपाखाली तुरुंगवास व नंतर अमेरिकेतल्या स्वत:हून घेतलेल्या हद्दपारीचा काळ संपवून हे निर्भय सिनेटर जिवावरच्या संकटाला न जुमानता १९८३ साली मनीलाला परत आले. त्यांना आपल्याला गोळ्या घातल्या जातील अशी शंका होती म्हणून विमानातून उतरायच्या आधी त्यांनी बुलेटप्रूफ जाकीटही घातले. पण त्यांच्या मानेत गोळ्या घातल्या गेल्या व ते मनीलाच्या विमानतळावर खाली उतरायच्या शिडीशेजारीच धारातीर्थी पडले. त्याच विमानात असलेल्या ’टाईम’ या अमेरिकन नियतकालिकाच्या वार्ताहाराने हे दृश्य विमानाच्या खिडकीतून पाहिले व त्यामुळे सर्व जगाला काय झाले याची माहिती मिळाली. (आज मनीला विमानतळाला उचितपणे त्यांचेच नांव दिलेले आहे.)
निनॉय अक्वीनो हे अतीशय लोकप्रिय सिनेटर होते व केवळ सत्तालालसे पायी त्यांचा निर्घृणपणे भर दुपारी वध करण्यात आला. सत्तापिपासू लोकांना कशी सदसद्विवेकबुद्धी नसते व खुर्चीसाठी ते कसे कुठल्याही थराला जाऊ शकतात याचे हे एक घृणास्पद उदाहरण आहे.
अगदी तरुण वयातही त्यांचा जनमानसावर चांगला पगडा होता. त्यांच्यावरील विश्वासामुळे व त्यांनी मध्यस्ती केल्यामुळे लुई तारुक या कम्युनिस्ट नेत्याने सरकारपुढे आत्मसमर्पण केले व त्यामुळे फाशीऐवजी केवळ तुरुंगवास भोगून तो बाहेर आला.
हद्दपारीच्या काळात अक्वीनो दांपत्य बोस्टनला रहात असे. त्यांच्या त्यावेळच्या शेजार्यांनी अक्वीनोबाईंच्या निधनानंतर खालील आठवण सांगितली. ते म्हणतात, "अक्वीनोबाई खूप साध्या बाई होत्या. लोकक्रांतीद्वारा राष्ट्रपतीपदावर चढलेल्यानंतर फिलिपाईन्सचे अध्यक्षपद त्या किती समर्थपणे पेलू शकतील याबद्दल सर्वांनाच शंका होती. पण त्या अतीशय सदसद्विवेकबुद्धीशील व कर्तव्यतत्पर असल्यामुळे ज्या गोष्टीत त्या लक्ष घालतील त्यात त्या यशस्वी होतीलच अशी खात्री तिला ओळखणार्या आम्हा सर्वांना होती." आणि तशा त्या यशस्वी झाल्याही.
फक्त फिलिपाईन्सच नव्हे तर सार्या दक्षिण-पूर्व आशियाखंडाने अक्वीनोबाई व त्याचे यजमान निनॉय याचे उपकार विसरू नयेत. कारण फिलिपाईन्सच्या पाठोपाठ या भागातल्या इतर राष्ट्रातही लोकशाही रूढ होऊ लागली.
त्यांच्या निधनाने एक लोकशाहीवादी ताराच निखळून पडला आहे. फिलिपाईन्सच्या लोकांच्या दु:खात अखिल जग आज सहभागी झाले आहे. सार्या दक्षिण-पूर्व आशियाखंडात मूळ धरलेली लोकशाही हीच त्यांनी जगाला दिलेली देणगी आहे. त्यांच्या आत्म्याला निरंतर शांती लाभो अशीच प्रार्थना सर्व लोक करतील!
सुधीर काळे, जकार्ता
प्रतिक्रिया
3 Aug 2009 - 9:00 pm | सनविवि
एवढ्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
3 Aug 2009 - 9:27 pm | प्रदीप
फिलीपिनो सगळ्याच बाबतीत अत्यंत रोमँटिक असतात, मग ते तरूण- तरूणींचे वैयक्तिक संबंध असोत अथवा देशाचा राज्यकारभार असो. त्यांच्या त्या रोमँटिसिझमचा पगडा हा लेख लिहीतांना आपल्यावर होता अशी जबरदस्त शंका आणणारी काही उडती विधाने आपण ह्या लेखात केली आहेत.
'कोरी' ही खरे तर साधीसुधी गृहिणी होती. ती व 'निनो' दोघेही वास्तविक अत्यंत सधन कुटुंबातून आले होते. पण मार्कोसच्या कारवायांमुळे त्यांना परागंदा व्हावे लागले. १९८३ साली मनिला विमानतळावर झालेल्या 'निनो'च्या खुनाची चित्रफीत मीही तेव्हा टी. व्ही. वर बघितलेली आठवते. 'कोरी' १९८६ साली जनतेच्या दडपणाखाली निवडणूक लढवून सत्तेवर येण्यास राजी झाली. मार्कोसचा पाडाव काही नुसताच जनक्षोभामुळे झाला नाही, तर सैन्यानेच शेवटी बंड पुकारले त्यामुळे झाला (अमेरिकेचाही ह्या सर्व घडामोडींत नेहमीप्रमाणे हात आहेच). कोरी प्रचंड जनमताच्या लाटेवर निवडून आली खरी, पण राज्यशकट चालवण्याची तिची कुवत नव्हती. तशात तिच्या १९८६ ते १९९२ ह्या सहा वर्षांच्या काळात तिच्याविरूद्ध ६ वेळा लष्कराच्या घटकांनी बंड पुकारले. ह्या सर्वातून ती तरली, एव्हढेच.
आपले वरील विधान तसेच कुणीतरी सोनियाच्या बाबतीतही करू शकेल अशी मला भीति वाटते.
फिलीपीन्सवरून बोध घेऊन इंडोनेशिया, तैवान, द. कोरिया, मलेशिया ह्या आ. आशियातील इतर देशात लोकशाही स्थापित होऊ लागली ह्या विधानाला कसलाही आधार नाही. इंडोनेशिया व मलेशिया येथे अनुक्रमे सुहार्तो व डॉ. महाथिर महमद ह्यांनी इतके एकखांबी तंबू उभारले होते, की वयामुळे त्यांच्या पकडी ढिल्या झाल्या व नव्या घड्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यातील इंडोनेशिया बर्याच अंतर्गत उलाढालींनंतर आताच थोडासा सावरलेला दिसतो. मलेशियात कसली लोकशाही आहे? (हिंदराफची काय फरफट चालली आहे? अन्वर अहमदची काय फरफट चालली आहे? शरियाचा अंमल कूठे संपतो आणि सिव्हिल न्यायपद्धति कुठे सुरू होते...इ. अनेक प्रश्न तेथे सध्या उभे आहेत). थोडक्यात त्या त्या देशांत तेथील अंतर्गत बाबींमुळे बरे वाईट नवे वारे वाहू लागले. फिलीपीन्सच्या 'संग्रामा'तही अजूनपर्यंत तेथील लष्कराचा हात राहिला आहे. आणि द. कोरिया व तैवान ह्यांचा व फिलीपीन्सच्या अंतर्गत घडामोडींचा दूरान्वयेही संबंध लावणे हास्यास्पद ठरावे. (ह्यावरून सुचले: जगातील सर्वात 'मोठेठी लोकशाही मग आपल्या आजूबाजूंच्या देशांना तसेच उद्युक्त का करू शकलेली नाही?)
शरण आलेल्या कम्युनिस्ट नेत्याला निनोने/ कोरीने अभय दिले वगैरे सर्व ठीक आहे, पण कम्युनिस्टांची चळवळ सुरूच आहे. त्यातून भर म्हणून आता दक्षिणेतील प्रांतात मुस्लिम फुटिरवाद्यांचा धुमाकूळ चालू आहे. सध्याच्या ग्लोरिया माकापागल अरोयो ह्या राष्ट्राध्यक्ष स्त्रीला तर मुस्लिमांशी वेगळा करार करायचा होता. पण सुप्रिम कोर्टाने ते रोखून धरले आहे.
3 Aug 2009 - 9:40 pm | सुधीर काळे
No comments.
Sudhir Kale
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
3 Aug 2009 - 9:45 pm | प्रदीप
आपण जी विधाने लेखांतून करतो, त्यांच्या समर्थनार्थ काही मांडता यावे. अगदी दुवेच हवेत असे नाही, कारण अनेक जुन्या घटनांविषयी काही जालावर अगोदर लिहून झालेले असेलच असे नव्हे. तरीही काही भरीव माहिती असावी ही अगदी माफक अपेक्षा आहे.
3 Aug 2009 - 10:03 pm | सुधीर काळे
अहो साहेब, जे TVRI वर पाहिलं त्याच्या फक्त आठवणी मी लिहिल्या आहेत. त्याखेरीज टाईमचा मी गेली ४० वर्षे वाचक आहे, त्यात वाचलेला भाग त्यात घातला. या लेखात "माझ्या" अशा फक्त आठवणीच आहेत.
कोरीबाईंच्या राजकीय कारकीर्दीचे मूल्यमापन मी केलेलं नाहीं. ते आपण केलेलं आहेच. पण त्यावर शेरा मारण्याइतका माझा आभ्यास नाहीं, नाहीं तर मी माझा शेरा लिहिला असता.
मी जे उन्मादपूर्ण क्षण अनुभवले व जे मला भावले ते लिहिले. या सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोरून गेल्या असे लिहिले आहेच ते तुम्ही miss केलेत कां?
तुम्ही शेरा लिहिलात तो वाचला पण त्याला उत्तर द्यायला माझ्याकडे शब्द नव्हते म्हणून मी "no comments" असे लिहिले. तर त्यालाही तुम्ही आव्हान दिलेत हे कांहीं कळलं नाहीं.
आणि तुम्ही एक काँमेट लिहिला कीं मी त्याला उत्तर दिलेच पाहिजे असा हट्ट कां? आपला असला अभिनिवेश मला कांहीं वेगळाच वाटतो!
इतके शेरे तारीफ करणारे येतात त्यालाही मी उत्तरे देत नाहीं. कारण किती लोकांना असे मी लिहिणार?
मागेही मी कुठल्या विषयावर लिहावे याबद्दलही आपणा (प्रेमळ) हट्ट धरलात.
असो. आता एवढे पुरे.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
4 Aug 2009 - 7:59 am | प्रदीप
मी 'साहेब' नाही, तरी संदर्भ पहाता हे मला उद्देशून आहे, असे वाटले म्हणून हे लिहीत आहे.
सर्वप्रथम तुमच्या वैयक्तिक आठवणी लिहीहेल्या आहेत त्या आवडल्या (माझ्या प्रतिसादाच्या मथळ्यातच मी ने नमूद केले होते). पण त्या नुसत्या आठवणीच राहिल्या असत्या तर त्याबद्दल कौतुकाचे लिहून इतर काही लिहीण्याचा प्रश्नच उद्भवला नसता.
ज्या विधानांविषयी मी काही आक्षेप घेतलेले आहेत, त्या आपल्या वैयक्तिक आठवणी नव्हेत, तसेच आपली अॅनेकडोटल निरीक्षणेही नव्हेत. ही विधाने सरसकट माहिती देण्याचा प्रयत्न करतात व ती माहिती अपूरी अथवा चुकिच्ची आहे, असे मला दर्शवायचे आहे. तेव्हा अशी टिका जर आवडत नसेल, तर आठवणींच्या लेखात असली विधाने आणतांना काळजी घेतलेली बरी.
आपले लेख अभिनिवेशपूर्ण असतात त्यामुळे त्यांच्यातील माहिती देऊ इच्छिणार्या विधानांविषयी कुणी आवेशपूर्ण प्रतिसाद दिला, तर त्यात गैर आहे असे मलातरी वाटत नाही.
आपण हा लेख काही फिलीपिनोंना दाखवलात आणि कुणी इतर देशीय गृहस्थ आपल्या देशाविषयी काही असे लिहीतोय, ह्याचे त्यांना कौतुक वाटले, ते साहजिकच आहे. पण पुढे जाऊन 'त्यांनी ह्यात काहीही फॅक्चुअल चुका नाहीत' असे म्हटल्याचे सांगून आपण सुटका करू पहाता आहात, तो प्रयत्न केविलवाणा वाटतो. एकतर त्या विधानांविषयी काही चर्चा करू या, अथवा ती फारशी मनावर घेण्यासारखी नव्हती, असे तरी म्हणूया.
4 Aug 2009 - 8:35 am | नंदन
प्रदीप यांच्याशी सहमत आहे. कोरी अक्विनोंबद्दल विशेष माहिती नसणार्या आमच्यासारख्या अनेकांनी आपल्या आठवणी, ही एक ठोस माहिती म्हणून स्वीकारली. जसं छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे, हे मानण्याकडे प्रारंभी कल असतो; पण एकदा तसं नाही हे समजल्यावर खर्या बातमीकडेही साशंक नजरेने पाहिले जाऊ शकते (उदा. टाईम्स ऑफ इंडियामध्ये किंवा संध्यानंदमध्ये एखादी सनसनीखेज बातमी आली तर आजच्या घडीला किती लोक विश्वास ठेवतील); तसेच वरवर माहितीपूर्ण वाटणारे लेख वाचतानाही होऊ शकते.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Aug 2009 - 10:20 pm | सुधीर काळे
खरं तर या लेखाचा इंग्रजी तर्जुमा मी माझ्या धंद्यातल्या कांहीं फिलिपिनी मित्रांना पाठवला, त्यातले तर कांहीं लोक ८६ सालच्या निदर्शनात स्वतः सहभागी झालेले होते. त्यांना मी लिहिलेला लेख खूप आवडला व त्यांनी एका "non-Philipino" ने (मी) असा लेख लिहिल्याबद्दल माझे आभारही मानले. मी त्यांना माझ्या लेखात कांहीं "factual errors" आहेत का असेही विचारले, तर त्यांनी नाहीं असे उत्तर दिले. मगच मी हा लेख इथे चढवला (upload केला).
पण मी लिहिलेला लेख सर्वंकश नाहीं हे मला माहीत आहे. कारण माझा आभ्यास सीमितच आहे.
जे त्या दोन दिवसात घडलं ते अभूतपूर्व होतं. त्याची पुनरावृत्ती तेहेरानला होईल अशी आशा होती. पण मुसावींच्या मागे इतके लोक नव्हते जितके कोरीबाईंच्या मागे होते. नाहीं तर इराणमध्येही इतिहासाची पुनरावृत्ती झाली असती. यातच कोरीबाई व निनॉय यांची थोरवी जाणावी.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
4 Aug 2009 - 7:18 am | सहज
कोरी अक्वीनो यांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
पण प्रदीप यांचे मुद्दे महत्वाचे आहेत. विशेषता - फक्त फिलिपाईन्सच नव्हे तर सार्या दक्षिण-पूर्व आशियाखंडाने अक्वीनोबाई व त्याचे यजमान निनॉय याचे उपकार विसरू नयेत. हे जरा पचायला जड आहे.
4 Aug 2009 - 8:37 am | सुधीर काळे
Is it telepathy? Pl read the link.
http://www.thejakartapost.com/news/2009/08/04/the-mother-people%E2%80%99...
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
4 Aug 2009 - 9:25 am | सहज
कोरी व निनॉय यांचे परदेशातुन मायदेशात लोकशाही प्रक्रियेत भाग घ्यायला जीवाचा धोका असताना आगमन (समांतर - जसे नुकतेच उदाहरण बेनझीर भुट्टो) व संघर्ष लढा. याबद्दल नक्कीच आदर आहे.
जसे एखाद्या सभेत भाषणात सर्व जुन्या / मोठ्या आदरणीय व्यक्तिंना (गांधी, नेहरू, यशवंतराव, इ इ इ किंवा वेगळ्या सभेत सावरकर, गुरुजी,पटेल इ इ टॉप टू बॉटम, पास्ट टू प्रेसेंट, नॅशनल टू लोकल) श्रेय, हार तुरे घालणे देणे होते. तसे वृत्तपत्रांनी देखील कोरी अक्विनो यांच्या त्याग व धैर्याची (पुन्हा समांतर - सोनीया गांधी) व घालून दिलेल्या आदर्शाची थोरवी गायली तर आश्चर्य नाही. सोनीयाजींचे पती यांचे असेच निधन झाले त्यादेखील कोरीप्रमाणे सत्ताधारी आहेत(माझामते जास्तच प्रभावी) अर्थात आता सोनीयाची सत्तेत असल्याला किमान ७ वर्षे (??)झालीत. आपण असे म्हणू का दक्षीण आशीयायी देशात सोनियाजींचा मोठा प्रभाव आहे? मान्य आहे की भारतात राजीवजींच्या काळात हुकूमशाही नव्हती पण कोरी-निनॉय यांच्या संघर्षात होती. तरीही उपकार्-मोठा प्रभाव पाडू शकण्याइतके कार्य जरा तपासुन पाहीले पाहीजे.
कदाचित हे लवकर होत असेल अजुन काही दशकांनी कोरी, निनॉय अक्विनो यांनी "दक्षिण-पूर्व आशियाखंडावर न विसरता येण्यासारखे केलेले उपकार" निट तपासता येतील.
भले लोकशाही लोकशाही डंका पिटू दे, पण पाश्चात्यांनी कित्येक वर्षे त्यांना हवे तिथे हवे त्या तडजोडी केल्याच कधी लोकशाहीवाल्यांचा साथ कधी हुकूमशाहीचा. अजुन एक समांतर - माध्यमांना एखादी नवी कथा घेउन दाखवायला आवडते. तेव्हा कोरी व निनॉय एक्वीनो फ्लेवर होता. सध्या इराण मधील लोकशाही संघर्ष आहे. प्रदीपजी म्हणाले ते रोमँटिसिझम असेच काहीसे असावे.
मात्र कोरी, निनॉय अक्विनो यांचा संघर्ष, त्याग याबद्दल आदर आहे यात शंका नकोच.
जाताजाता - बुशला (४३) कितीही नावे ठेवली (जी बरेच ठीकाणी योग्यच आहे) तरी त्याने निदान सातत्याने सर्व जगात लोकशाही / लोकांनी चालेले राज्य यावे हाच मुद्दा जिथे तिथे जाहीर मांडला आहे. बघु इतिहास त्यांना नेमके कसे लक्षात ठेवतो :-) संघर्ष, प्रभाव, प्रेरणा म्हणाल तर मला तर नेल्सन मंडेला व आंग सांग स्यु ची यांच्या कार्याबद्दल जगभरात जास्त प्रभाव,आदर व प्रेरणा आहे असे वाटते.
4 Aug 2009 - 10:55 am | सुधीर काळे
सर्वच प्रतिक्रियांचा मी योग्यसा परामर्ष घेत आहे. जरासा वेळ लागेल.त्याबद्दल क्षमस्व.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
4 Aug 2009 - 11:22 am | सुधीर काळे
Also read the link below that replies to some of the points of Mr Pradip. (Please note: I am not the author)
http://www.thejakartapost.com/news/2009/08/04/lessons-philippines.html
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
4 Aug 2009 - 11:36 am | सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
4 Aug 2009 - 12:37 pm | सुधीर काळे
खरं सांगायचं तर मी ओबामावरील माझ्या लेखाच्या प्रतिक्रियांना अगदी मुद्देसूद उत्तरे दिली व मला माझ्या "सकारत्मक स्वभावा"बद्दल (positive attitude) एकाचा तसा अभिप्रायही आला, पण प्रदीपजींच्या अभिप्रायाचा "tone" जरा वेगळा होता व त्या आधीच्या आम्हा दोघांमधील वैयक्तिक पत्रव्यवहाराचा इतिहासही होता. म्हणून माझी प्रतिक्रिया जराशी चिडकी झाली हे खरे. मी जोवर लिहीतो तोवर टीकेला तयार असले पाहिजे हेही खरे व टीके-टीकेत फरक असतो हेही खरे. तरी क्षमस्व.
पण मी फिलिपाईन्सच्या उदाहरणाच्या परिणामाबद्दल लिहिले आहे ते मात्र कांहींसे स्वत: अनुभवले आहे. जेंव्हा मार्कोस पडला तेंव्हा मी सुरबायाला होतो व त्या घटनेचा येथील लोकांवर काय परिणाम झाला ते मी प्रत्यक्ष पाहिले आहे व खासगीत त्यावर चर्चाही केलेली आहे. (खुल्लम-खुला चर्चा करण्याची सोयच नव्हाती, इतके लोक भिऊन असायचे.) एकंदर "असं होऊ शकतं तर" हा भाव सगळ्यांच्या मनात होता.
<<इंडोनेशिया व मलेशिया येथे अनुक्रमे सुहार्तो व डॉ. महाथिर महमद ह्यांनी इतके एकखांबी तंबू उभारले होते, की वयामुळे त्यांच्या पकडी ढिल्या झाल्या व नव्या घड्या राजकारणात सक्रिय झाल्या.>>
आजच्या जकार्ता पोस्ट चे संपादकीय मी वेगळे पाठविले आहे. त्यात मी म्हणालो त्यापेक्षा वेगळे काय लिहिले आहे? कमीत कमी इंडोनेशियाने तरी अक्वीनोबाईंकडून स्फूर्ती घेतली असे जकार्ता पोस्ट ने म्हटले आहे. त्याशिवाय आणखी एक लेखही पाठवला आहे. ही सर्व व्यावसायिक पत्रकारांची मते आहेत, माझ्यासारख्या अनभिज्ञ व हौशी लेखकाची मते नाहींत हे लक्षात घ्यावे.
<<त्या अतीशय सदसद्विवेकबुद्धीशील व कर्तव्यतत्पर असल्यामुळे ज्या गोष्टीत त्या लक्ष घालतील त्यात त्या यशस्वी होतीलच अशी खात्री तिला ओळखणार्या आम्हा सर्वांना होती." आणि तशा त्या यशस्वी झाल्याही.>>
हे माझे मत नाहीं. ते त्यांच्या माजी शेजार्याचे आहे हे लक्षात असावे. पण अतीशय क्रूर अशा हुकुमशाहीनंतर गादीवर आलेली ही स्त्री सहा वर्षे टिकली याचेच तिला मोठे श्रेय द्यायला हवे. नाहीं कां?
<<आपले वरील विधान तसेच कुणीतरी सोनियाच्या बाबतीतही करू शकेल अशी मला भीति वाटते.>>
सपशेल चूक. फार तर हे विधान आपण राजीव गांधींच्याबाबतीत करू शकतो, सोनिया गांधींच्या बाबतीत नाहीं. तेही पाच वर्षे तरलेच ना?
<<मार्कोसचा पाडाव काही नुसताच जनक्षोभामुळे झाला नाही, तर सैन्यानेच शेवटी बंड पुकारले त्यामुळे झाला>>
मीही तेच लिहिले आहे, पण फरक इतकाच कीं "सरशी तिथे पारशी" या न्यायानुसार संरक्षणमंत्री व रामोस दोघेही आधी बरेच दिवस "कुंपणा"वर बसले होते. जेंव्हा जनक्षोभ किती सखोल आहे हे जेंव्हा त्यांच्या लक्षात आले तेंव्हाच ते "जगजीवन राम स्टाईल"मध्ये अक्वीनोबाईंच्या बाजूला आले. (Remember the "Ram Leaves Sita" banner at the "Talk of the Town" restaurant in Mumbai's Marine Drive?) तेंव्हा "मुर्गी पहिली कीं अंडे" हा न्याय तपासून पहावा लागेल.
अक्वीनोबाईंच्या मागे जसा जनसमुदायाचा त्यांच्या समर्थनार्थ उभा राहिला तसा ब्रह्मदेशात किंवा इराणमध्ये उभा राहिला असता तर दलबदलू लष्करी सेनानी असेच Aung San Suu Kyi यांच्या (या नावाचा बरोबर उच्चार काय?) किंवा मुसावी यांच्या मागे आले असते. सगळे कुंपणावर बसले आहेत. पण म्यानमारमध्ये व इराणमध्ये जनक्षोभ दडपण्यात लष्करी "हुंता" व इराणी सैन्य व निमलष्करी सैन्य/गुंड यशस्वी अनुक्रमे यशस्वी झाले. म्हणजे असा जनसमुदाय आकर्षित करण्याची क्षमता अक्वीनोबाईंच्याकडे व इंडोनेशियन निदर्शकात होती व ते यशस्वी झाले. मग ती त्यांची होती असे म्हटल्यास काय चुकले?
<<मलेशियात कसली लोकशाही आहे? हिंदराफची (?) काय फरफट चालली आहे? अन्वर अहमदची (इब्राहिम?) काय फरफट चालली आहे? शरियाचा अंमल कूठे संपतो आणि सिव्हिल न्यायपद्धति कुठे सुरू होते...इ. अनेक प्रश्न तेथे सध्या उभे आहेत.>>
असतील. पण त्यामुळे तिथे लोकशाही नाहीं असा निष्कर्ष होतो का? तिथे नक्कीच लोकशाही आहे व सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोक निवडूनही येतात. नजीकच्या भविष्यकाळात अन्वर इब्राहिम मलेशियाचा प्रधान मंत्री होऊ शकेल. त्याला महंमद महाथीर यांनी तुरुंगात घातले, त्याचे अनन्वित हाल केले हे खरे. पण म्हणून तिथे लोकशाही नाहीं असे नाहीं. त्यांच्या ISA कायद्याबाबत तक्रारी आहेत. आपल्याकडेही MOCCA कायदा होताच. कायद्यानुसार कारवाई केली गेली. कायद्याचा दुरुपयोग सगळेच सत्ताधारी करत असतात. पण हुकुमशाही व लोकशाहीत गल्लत करू नये.
सिंगापूरचे माझे खूप मित्र आहेत. त्यांना मी जेंव्हा लोकशाहीबद्दल विचारतो तेंव्हा त्यांचे ठराविक छापचे उत्तर असते. ते म्हणतात कीं आम्हाला फक्त business मध्ये interest आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टीत लक्ष घालायला वेळ कुणाला आहे? अर्थात हे सर्व सिगापूरच्या सर्व जनतेचे प्रातिनिधिक मत आहे कां? कुणास ठाऊक? मी ज्यांना भेटतो ते माझ्या व्यवसायातले माझे मित्र आहेत. "तळा-गाळा"तल्या लोकांची मला माहिती नाहीं. प्रदीपजीना आहे कीं नाहीं ते मला माहीत नाहीं. असल्यास त्यांना ती सांगण्याची विनंती.
<<शरण आलेल्या कम्युनिस्ट नेत्याला निनोने/ कोरीने अभय दिले वगैरे सर्व ठीक आहे, पण कम्युनिस्टांची चळवळ सुरूच आहे.>>
ही गोष्ट मी निनॉय अक्वीनोंची ते तरुण असतानापासून कशी "वट" होती हे सांगण्यासाठी लिहिली आहे. त्या माणसाचे कार्यक्षेत्र मोठे होते, पण त्यांचा निर्घृणपणे वध करण्यात आला म्हणून ते ऐन् उमेदीच्या काळातच संपले.
आज भारतातही नक्षलवादी चळवळ कांहीं-कांहीं भागात जोरात आहे. पण कांहीं-कांहीं भागातली कमीही झाली आहे. तेंव्हा या वाक्यातून प्रदीपजींना काय सांगायचे आहे ते माहीत नाहीं.
<<त्यातून भर म्हणून आता दक्षिणेतील प्रांतात मुस्लिम फुटिरवाद्यांचा धुमाकूळ चालू आहे. सध्याच्या ग्लोरिया माकापागल अरोयो ह्या राष्ट्राध्यक्ष स्त्रीला तर मुस्लिमांशी वेगळा करार करायचा होता. पण सुप्रिम कोर्टाने ते रोखून धरले आहे>>
याचा माझ्या लेखाशी काय संबंध?
<<त्यांच्या त्या रोमँटिसिझमचा पगडा हा लेख लिहीतांना आपल्यावर होता अशी जबरदस्त शंका आणणारी काही उडती विधाने आपण ह्या लेखात केली आहेत.>>
मी बहुतेक सर्व विधानांचा परामर्ष घेतला आहे. ते वाचून वाचकांनीच जास्त रोमॅंटिसिझम कुणात आहे, कोण जास्त भावनाविवश झाले आहे याचा निर्णय कारायचा आहे. मला सांगायचे होते ते आतापुरते तरी संपले.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
4 Aug 2009 - 2:36 pm | प्रदीप
छे, छे. तसे मला अजिबात वाटले नाही. माझाच स्वर जरा चढा होता हे खरे आहे. कारण मला वाटते, आपल्या लेखात नुसत्या आठवणी असत्या तर ते वेगळे होते. इथे अनेक जण आठवणी सांगणारे लेख लिहीतात. पण त्यात ह्या विधानांची गल्लत होती. मग आपण एकदा 'त्या माझ्या आठवणी आहेत, विधानांविषयी चर्चा करणे शक्य नाही' असा सूर लावलात. लगेच नंतर त्या विधानांची सत्यता आपल्या काही फिलीपिनो मित्रांनी पडताळून पाहिली आहेत असेही सांगितलेत. तेव्हा पडोसनच्या मेहमूदप्रमाणे 'ये फिर गडबडा... या तो आठवणीं पे रहो, या तो विधानों पे, ये आठवण, विधान क्या गडबड है जी..' असे म्हणावेसे वाटले :) पण हे वैयक्तिक घेऊ नये, मीही ते तसे घेत नाही. असो.
बरोबर. त्यांच्या कार्याचा निश्चीतच गौरव व्हावा, ह्याबद्दद्ल वाद नाही. पण तुम्ही प्रोजेक्ट करता आहात, एव्हढी थोर वगैरे कुवतीची तिची राजवट झाली नाही. ती निस्पृह होती ह्यात शंकाच नाही. उदा. अलिकडच्या माकापागलच्या सरकारच्या धोरणांचा निषेध म्हणून (बहुधा तिच्या सांगण्यावरून) तिच्या कुटुंबियांनी सरकारी इतमामाने केले जाणारे दफनविधी नाकारले. तिच्या प्रामाणिकतेविषयीही शंका नाही. पण तिची कारकीर्द बरीचशी समयोचित निर्णय घेण्याची अक्षमता ह्यामुळे गाजली. म्हणून तिला १९९२ साली निवडणूकीत हरावे लागले (व आता हे आठवणीतून लिहीतो आहे) रामोस राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हा ती प्रामाणिक जरूर होती, आणि निनोबरोबर राहून तिने सुखसोईंचा त्याग जरूर केला आहे, पण '[त्या] कर्तव्यतत्पर असल्यामुळे ज्या गोष्टीत त्या लक्ष घालतील त्यात त्या यशस्वी होतीलच' इथे दुमत आहे. कारण असे काही झाले नाही, असे इतिहास सांगतो.
हे अगदी झालेल्या इतिहासाचे सुलभीकरण झाले, हे चुकते आहे. इथे नुसते जनप्रक्षोभ, अॅक्विनो- विधवा आणि मार्कोस व इमेल्डा (व तिच्या हज्जार चपला...) ह्यांचा परस्परसंबंध होता असे नव्हे. तर अमेरिकेच्या खेळीही होत्याच की. शेवटी अमेरिकेने (रेगन ह्यांच्या सरकारने) मार्कोसला 'आता तुम्ही येथून जावे' अस सल्ला दिला, त्याला हवाई बेटांवर आश्रय दिला, म्हणून तो पटकन निघून गेला, हे विसरू नये. अमेरिकेचे सैनिकी तळ पूर्वीपासून (बहुधा दुसर्या महायुद्धापासून) फिलिपिन्समधे होते. अगदी आता नक्की कारण माहिती नाही, हे नुसते स्पेक्युलेट करतोय, शक्य आहे की आपले तळ तेथे आहेत तसेच रहावेत ह्या हेतूने अमेरिकेने जनतेशी जमवून घेत मार्कोसला बाय-बाय केले असावे. अॅक्विनोचे लढा सुरू ठेवण्याचे कार्य मी कमी लेखीत नाही, पण तिच्या शौर्यामुळे केवळ मार्कोस गेला हे अजिबात पटणारे नाही.
(Aung San Suu Kyi हे 'आँग साँग स्यु ची' असे उचारले जाते).
इराण व म्यानमार येथे हे इतके सोपे नाही, अमेरिकेने सांगितले आणि जुलुमशहा पळाला अशी परिस्थिती नाही, हा महत्वाचा फरक आहे. तसेच मुळात ते जे जुलुमशहा असतात त्यांचे क्रौर्य कितपत आहे, हेही विचारात घेतले पाहिजे. थोडे अवांतर करून लिहीतो-- व्हिएटनाममध्ये अमेरिकेने जे अपिरिमीत क्रौर्य दर्शवले तिथे महात्मा गांधींची त्यांनी आपल्या येथे चालवली अशी चळवळ यशस्वी झाली असती काय? हो ची मिन्ह असे म्हणाल्याचे स्मरते की 'गांधीजी तेथे एक दिवसही टिकले नसते'. परत हेही सुलभीकरणच झाले--- गांधीजी तेथे असते तर अर्थातच त्यांनी तेथील परिस्थितीनुसार वेगळीच व्यूहरचना केली असती. तरीही मुद्दा हा क्रौर्याच्या तीव्रतेचा आहे.
मी व्यावसायिक पत्रकार नाही, आणि हैशी लेखकही नाहीच नाही. पण मी बरेच वाचतो, व त्यावरून शक्य तेव्हढ्या साधकबाधक विचारांती माझी मते बनवतो. म्हणून कुठल्या वर्तमानपत्रात आलेली मते पूर्णपणे ग्राह्य धरणे तसे थोडे जीवावर येते. एखादी व्यक्ति गेली, की तिच्याविषयी चांगले लिहायचे, तिच्या असणार्या व नसणार्या गुणांचा उदो उदो करणारा अग्रलेख लिहायचा (आणी व्यक्ति जर अगोदरपासूनच आजारी असेल, तर तो लेखही अगोदरच तय्यार होऊन असतो) ही सर्वसाधारणपणे कुठच्याही सभ्य वर्तमानपत्रांची/ नियतकालिकांची जुनी परंपरा आहे, आणि ती सभतेच्या चौकटीला धरूनच आहे. आपण सुराबायात स्वतः जे अनुभवले, ते अर्थातच कुणी नाकारू शकत नाही. पण एक सांगा, त्या घटनेपासून त्या व्यक्तिपासून स्फूर्ति घेऊन इंडोनेशियातील राजकिय उलथापालथ झाली का? किंवा मलेशियातील तशी झाली का? अन्यत्र कुठे तशी झाली.
खरे तर अशा उलथापालथी होण्यास त्या त्या देशांतील जनताच 'ड्रायव्हिंग इंजिन' असावी लागते, बाहेरून कुणीही ते काम प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या करू शकत नसते. ह्यात प्रत्येक देशाची परिस्थिती, तेथील जनतेची मानसिकता, त्यांच्या नेत्यांचा आवाका, तेथील राजवटीची जुलुम- अत्याचार करण्याची क्षमता ह्या बर्याच बाबींवर उलथापालथ होईल का, हे अवलंबून असते. आणि फिलिपीन्सच्या घडामोडी कितीही रोमहर्षक असल्या तरी तो देश म्हणजे काही चीन अथवा भारत नव्हे, की त्यापासून कुणी स्फूर्ति घेऊन आपल्या देशातील जुलुमी राजवटीस धक्के देण्याचे कार्य सुरू करावे? मी गेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एका मोठ्ठ्या देशात, आपल्या भारतात प्रचंड उलथापालथ ६० वर्षांपूर्वी झाली, तिच्यापासून आपल्या कुठल्या शेजार्याने बोध घेतला? एकाही नाही. अमेरिकेच्या सगळ्या लोकशाहीच्या व प्रगतिच्या कळा अगदी जवळून पाहूनही क्युबामध्ये तसेच का नाही काही झाले?
ह्याचा संबंध समजला नाही.
आपल्या विस्तारित प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
4 Aug 2009 - 3:03 pm | सुधीर काळे
इथेही पुन्हा मुर्गी पहिली कीं अंडे हाच प्रश्न येतो. रेगनना जेंव्हा कळले कीं आपल्या "बाळा"चे प्रताप जरा जास्ताच झाले आहेत, तेंव्हाच त्यांनी हा निर्णय घेतला. इंडोनेशियातही असेच झाले. त्रीसक्ती युनिव्हर्सिटीत जेंव्हा विद्यार्थ्यांचे बळी पडले ती "उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी" होती. सुहार्तो इजिप्तला गेलेले असताना ही घटना घडली. विरांतो या त्यांच्या विश्वासातल्या जनरलला परिस्थिती हाताळता आली नाहीं. मग त्यांनाही जायला सांगितले गेले.
पण त्याआधी निदर्शकांनी इंडोनेशियाच्या लोकसभा इमारतीचा ताबा घेतला होता व सर्व प्रतिनिधी आत अडकले होते. सुहार्तोंनी अशी सुखासुखी खुर्ची नाहीं सोडली.
पण मार्कोसच्या मानाने सुहार्तो हे फारच चांगले होते यात शंका नाहीं. त्यांना मी benevolent dictator असेच म्हणतो. त्यांना खूप मान होता. त्यांच्या मुलांनी अती हावे पोटी (too much greed) त्यांना सिंहासनावरून उतरविले. ९ वर्षांनंतर ते निधन पावले. त्या वेळीही "ते चांगले होते" असे म्हणणार्या पत्रांची संख्या "ते वाईट होते" असे म्हणणार्या पत्रांपेक्षा २:१ अशी होती. अलीकडे त्यांच्या सिंहासनावरोहणाच्या वाढदिवशी मेट्रो या खासगी टीव्ही चॅनेलने ज्या मुलाखती घेतल्या त्यातही सुहार्तोच्या कालखंडाबाबत चांगले म्हणणार्यांची संख्या जास्त होती. माझ्या ड्रायव्हरसारखे गरीब लोकही मला असेच सांगतात. (मला खूष करण्यासाठी नक्कीच नाहीं). म्हणूनच ते कुठेही पळून गेले नाहींत.
त्यांच्या नंतरच्या राष्ट्रपतींची जी हालत झाली (हबीबी, गुस डुर व मेगा) त्या मानाने अक्वीनोंची कारकीर्द झकासच झाली असे म्हणावे लागेल.
पण हा वैयक्तिक मतांचा प्रश्न आहे.
<<शेवटी अमेरिकेने (रेगन ह्यांच्या सरकारने) मार्कोसला 'आता तुम्ही येथून जावे' अस सल्ला दिला>>
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.