कविराज वसंत बापट गेले तेव्हा या ओळी लिहिल्या होत्या. मित्रवर्य तात्यासाहेब अभ्यंकरांच्या आग्रहाखातर त्या आज इथे देत आहे.
(वृत्त वसंततिलका)
गेला वसंत कविकोकिळ दूर गेला
काव्याम्रगंधतरु खिन्न उदास झाला
लावण्य-तेज-मधु-शब्द पदावलीस
गुंफील कोण कवितेत तया परिस
नूपूर आज गळले कवितारतीचे
झाले अबोल स्वर कोमल बासरीचे
ती शाहिरी सुभग सुंदर डौलदार
गेली कट्यार कलिजातचि आरपार
मेळ्यातली मधुर मंजुळ गोड गीते
आवेशयुक्त रणधुंद करी मनाते
झुंजार वीररस कोमल प्रेमबोल
तू लाविलास मधुछंद पदी अमोल
आता पुसेल जगि सह्यकडा कुणास
तेजोमयी सदन हे गगनी उदास
थांबेल हा क्षणभरी प्रिय मेघदूत
आकाशवेल चपला चमके क्षणात
तू सैनिका हसत जाय पुढे सदैव
भू इंच इंच लढवू निजदेश देव
श्रद्धांजली गुरुपदी मम भावभोळी
झाली अनाथ कविताच मराठमोळी
-- अशोक गोडबोले, पनवेल.
प्रतिक्रिया
19 Feb 2008 - 10:24 pm | विसोबा खेचर
धन्यवाद गोडबोलेमास्तर!
आता पुसेल जगि सह्यकडा कुणास
तेजोमयी सदन हे गगनी उदास
थांबेल हा क्षणभरी प्रिय मेघदूत
आकाशवेल चपला चमके क्षणात
केवळ अप्रतिम कविता...!
स्नेहांकित,
तात्या.
20 Feb 2008 - 12:18 am | चतुरंग
अशोकराव, वृत्तबध्द, डौलदार, गेय आणि सहज सोपी रचना केवळ सुंदर!
वसंत बापटांसारख्या कवीला ह्यापेक्षा सुंदर श्रध्दांजली काय असू शकते?
आपल्या कविता वाचण्यास उत्सुक आहे.
चतुरंग