सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आणि रात्री सूर्यास्ताबरोबर झोपावं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
21 Jul 2009 - 9:48 am

गेली तीस-पस्तिस वर्षं भाई नेरूरकर एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत.रोज पहाटे पांचला ऊठून दिवसाची सुरवात करायचे ते रात्री सर्व कामं आटपून झोपायला त्यांना अकरा वाजायचे.आणि परत दुसरा दिवस उजाडल्यावर परत तेच.
समाजातले सर्वच जण असंच करतात म्हणा.

भाई नेरूरकाराना मी म्हणालो,
"मला नेहमीच वाटतं की सकाळी सूर्योदय झाला की उठावं आणि सूर्यास्त झाला की झोपी जावं.ह्या माझ्या म्हणण्याचा खरा अर्थ काय असावा असं तुम्हाला वाटतं?"
"मला वाटतं, ते समजायला अगदी साधं आहे.रेखून दिलेला दिवसभरचा स्थापित केलेला कार्यक्रम जो आपल्या समाजावर लादला जातो त्या कार्यक्रमाला खंड आणण्याचा कुणीतरी प्रयत्न करायला हवाय असं मला वाटतं.असं मनात येऊन सुद्धा गेली तीस-पस्तिस वर्षं मी हेच करीत आलोय.आणि मी काही जगावेगळं करीत नाही."
असं भाईनी मला लागलीच उत्तर दिलं.
आणि पुढे म्हणाले,
"आता माझं पंचावन्न वय होत आलंय,आणि दिवसभरच्या समय-सारणी-schedule- शिवाय राहण्याच्या स्वातंत्र्याचा मला लाभ उठवावा असं वाटतं किंवा दुसर्‍या अर्थी सांगायचं झाल्यास निदान मी माझ्यासाठी तजवीज केलेली समय-सारणी वापरून रहावं असं वाटतं.माझ्या सारख्या पहाटे पांचला उठून कामाला लागणार्‍या शिक्षकाचे हे मनातले नुसते मांडेच होवू नये एव्हडंच. वर्षभरात जवळ जवळ नऊ महिने मी ह्या पहाटे उठण्याच्या बंधनात असतो.त्याचा आता मला पण कंटाळ येऊं लागलाय."
हे भाईंचं आरग्युमेंट ऐकून,ह्या वयावर भाईं सारख्या अनेक व्यक्ति असाच विचार करीत असावेत हे माझ्या केव्हाच लक्षात आलं.
मी भाई नेरूरकराना म्हणालो,
"आपला समाज समयामधे गुंतलेला असतो आणि त्यातच त्याचा व्यय झालेला असतो.आणि त्यामुळे लोक वर्तमानकाळात खर्‍या मजेत न राहता भविष्यात समय कसा जाईल ह्याच्या सततच्या विवंचनेत असतात.त्यांचं वर्तमान आरामात आणि निश्चिंत जाण्याऐवजी ते भविष्यात काय होणार आहे ह्या विचार्‍याच्या दबावाच्या दलदलीत रूतलेले असतात."

"माझ्या अगदी मनातलं बोललात."
असं म्हणत भाई मला म्हणाले,
"मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. दोन तिन मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो असताना आणि जुन्या बालपणाच्या आठवणी काढून आनंदात मश्गूल झालेलो असताना मधेच, राहून गेलेला घराचा हाप्ता पुढच्या आठवड्यात कधी भरूं? ह्या विवंचनेने मनावर दबाव आलेला होता, आराम मिळण्याऐवजी विवंचना वाढते.बॅन्केत तेव्हडे पैसे नाहित ह्या बद्दल काळजी वाढते.कारण पुढच्याच हापत्यात पैसे भरण्याचं समयाचं बंधन असतं ना!."
मी म्हणालो,
हा समय ज्यावेळी विस्मयाच्या वातावरणाने भरून गेला पाहिजे त्याचवेळी विवंचनेच्या भाराखाली डुबून जातो. आणि म्हणून काहीवेळां हा समाजाचा समय- सारणीचा कसूर कुणीतरी झुगारून देण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. असं तुम्हाला नाही का वाटत?"

भाई ह्याबाबतीत आपला निर्धार काय असावा ह्याचं विवेचन करताना मला म्हणाले,
"ही वेळ दाखवणार्‍या घड्याळाची बेडी मला नको होत आहे.मी मनगटात घड्याळ पण वापरत नाही.मी माझा सेल फोन पण बंद करून ठेवतो.ह्या सेल किंवा मोबाईल फोनचा अलीकडे होणारा उपयोग पाहून त्याला "सीन फोन" म्हणणं योग्य होईल असं मला वाटतं. कालातीत क्षेत्रात आता मी माझं अस्तित्व संभाळण्याच्या प्रयत्नात आहे,समय-सारणीचा विचार करीत नाही, कदाचीत माझ्या ह्या असं रहाणाच्या क्रियेला स्वेच्छेने राहणं असं म्हणता येईल.असं करायला खूप बरं वाटतं.खरंतर खूप मग्न झाल्यासारखं, खूप आनंदी झाल्यासारखं वाटतं.त्या त्या क्षणांना माझा तो निकृष्ट अहंभाव नाहिसा होतो आणि मी वर्तमानात असलेल्या क्षणात एकरूप होऊन जात आहे असं वाटतं.जीविताच्या,श्वसनाच्या आणि अस्तित्वाच्या चक्राकार गतीत आध्यात्मिक रूपाने ह्या सर्वांचा एकच हिस्सा झाल्यासारखं होतं, आणि समयाचा अंशच राहत नाही असं वाटतं."
किती गंभीरपणे भाईंनी विचार करून असा निर्धार केला आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकून मला पण अंमळ बरं वाटलं.

मी जाता जाता भाईना म्हणालो,
"म्हणूनच ह्या समाजातल्या सर्व संरचीत प्रतिबंधामुळे निर्माण झालेल्या समय-सारणीच्या दुर्गंधीचा निष्प्रभाव करून सूर्योदयाबरोबर उठणं आणि सूर्यास्ता बरोबर झोपी जाणं ही क्रिया मला ज्या सुगंधाचा वास हवा आहे त्याचं स्वातंत्र्य मिळवून देईल असं वाटल्यामुळे तुमचं काय मत पडतं हे मला पाहायचं होतं."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख