माणसाच्या ज्ञानाला मर्यादा.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
19 Jul 2009 - 7:49 am

"माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो."

आज बाहेर फारच उष्मा होत असल्याने मी प्रो.देसायांना म्हणालो,
"भाऊसाहेब आज तळ्यावर जाण्याचं रद्द करून आपण इथे आमच्याच घरी चर्चा करूंया"
"तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.अहो, मी तुमच्या घरी येईपर्य़ंत मला इतकं गरम झालं की सहन होई ना!.तरूणपणात भर उन्हात आमच्या गांवाला एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर चढून जाण्याची आमच्यात शर्यत लागायची.दोन तीन बाटल्या पाणी ढोसल्यावर जीव शांत व्ह्यायचा.पण एव्ह्डी कोलाहल होत नसायची."
मी म्हणालो,
"भाऊसाहेब आता "age became" हेच त्याचं कारण आहे."
"ते राहू दे,पण तुम्हाला आज कशावर चर्चा करायची आहे ते सांगा." इती प्रोफेसर.

" मानवजात अन्नशृंखलेच्या सर्वांत वरच्या पातळीवर असल्याने,तसंच "सर्वोच्य" बुद्धिमत्तेचं मानवजातीला रूप मिळाल्याने कुणालाही नेहमी असंच वाटतं की हे ज्ञानाचं ओझं आपलंच आहे.कुणाला वाटतं की जगाला ज्ञान देणं हे त्याचंच जणू कर्तव्य आहे, आणखी असं वाटत असतं जेव्हडं म्हणून कुणाला ज्ञान मिळवता येईल तेव्हडं ह्या- पृथ्वीगोलाचा नाश होई तो पर्यंत- मिळवलं पाहिजे.त्यामुळे कुणी बर्‍याच गोष्टींचा पाठपूरावा करीत असतो.पण त्यालाही मर्यादा आहेत. तुम्हाला कसं वाटतं?"
असा मी प्रोफेसरांना सरळ सरळ प्रश्न केला.

"पूर्वी माझा समज होता की मला सर्वच काही माहित आहे. हा माझा भ्रम आहे हे समजायला माझा तोडा वेळ गेला. आणि हे पण समजलं की वाळुतल्या कणा एव्हडं पण प्राप्त होऊं शकणारं ज्ञान सुद्धा मी मिळवू शकणार नाही. आणि हे मी आता मनापासून मानायला लागलो आहे."

असं बोलून झाल्यावर भाऊसाहेबांनी थंड पाण्याची बाटली उघडून जवळ जवळ अर्धी बाटली पिऊन टाकली.
"भाऊसाहेब, आज माझ्या मुलीने बटरस्कॉच आइस्क्रिम आणलं आहे.ते खाण्यासाठी थोडी जागा पोटात ठेवा म्हणजे झालं."
हे माझं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा फुलला.त्यांना बटरस्कॉच आइस्क्रिम विशेष आवडतं, असं मला त्यांच्या मुलीने एकदा सांगितलं होतं.म्हणून माझ्या मुलीला मी ते मुद्दाम आणायला सांगितलं होतं.

चर्चेचा मुद्दा पुढे सरकवीत मी भाऊसाहेबांना म्हणालो,
"काही गोष्टी अगदी उघड उघड आपल्या नियंत्रणाच्या पलिकडच्या असतात. काही गोष्टी जीवविज्ञानाच्या आज्ञेत असतात. आणि आपण काही ही करूं शकत नाही. सर्वच गोष्टींचं ज्ञान असणं कठीण आहे,मग ते बौद्धिक असेल,किंवा व्यावहारीक असेल किंवा आध्यात्मिक असेल.वाटेत खूपच अडथळे येत असल्याने प्राप्त होण्यायोग्य ज्ञान प्राप्त करणं जड जातं. "

थोडा विचार करून प्रोफेसर म्हणाले,
"मी तुम्हाला रोज चालवत असलेल्या आपल्या गाडीचं उदाहरण देतो.
जशी कुणाची गाडी साठ,सत्तर मैलांच्या वेगाने जात आहे,आणि अधून मधून आपल्या समोर असलेली गाडी ब्रेक लावित राहते.त्यामुळे कुणाला आपली स्पिड कमी करावी लागते,वा जबरदस्तीने थांबवावी लागते,किंवा मग ट्रॅफिक जाम झाल्याने अडकून बसावं लागतं. कुणी तिथेच विचार करीत राहतात.कदाचीत असंच कुणीतरी आपल्या जीवनाची गाडी अशाच रफ्ताराने नेत असावे.निस्सन्देह इतर उत्तरदायित्वपूर्ण वाहक ज्या ठिकाणाला जात असावेत त्यांच्या सोबत हे ही जात असावेत.आणि अडथळे येत असावेत.त्यामुळे तुम्ही म्हणतां तसं वाटेत खूपच अडथळे येत असल्याने प्राप्त होण्यायोग्य ज्ञान प्राप्त करणं जड जातं. "

हे भाऊसाहेबांचं उदाहरण मला माझ्या चर्चेच्या विषयाला फिट्ट वाटलं.आणि मी म्हणालो,
"भाऊसाहेब,तुमच्याकडून मला अशा समर्पक उदाहरणाची अपेक्षा होती.
परत त्या तुमच्या गाडीचं उदाहरण पाहिल्यास समोरच्या वाहकाला जसं कुणी टाळू शकत नाही.त्याने परतपरत ब्रेक लावावेत हे कुणाच्या हातात नाही.पण त्या वाहकाने तुमच्या वेगावर नियंत्रण आणलं असतं हे मात्र नक्की.
आणि तुम्हाला त्याप्रमाणे प्रतिक्रिया देणं भाग पडतं.शिवाय,त्याला टाळून पुढे जाता येत नाही कारण जवळच्या सर्व लेन्स गाड्यांनी भरलेल्या असतात. अगदी असंच जीवनाच्या गाडीचं आहे."

"वाः! तुम्ही माझ्या उदाहरणाचा चांगलाच अर्थ काढलात."असं खूशीने म्हणत,प्रोफेसर म्हणाले,
" सत्य समजून घ्यायला हवं असेल तर आपण चौकस राहिलं पाहिजे.निदान एव्हडं समजायला पाहिजे की आपल्याला त्याची माहिती आपल्या मित्रांकडून, आईवडीलांकडून,आणि इतरांकडून ज्या सर्वांना आपल्या मार्गात भेटतो त्यांच्याकडून घ्यायला शिकलं पाहिजे.
ज्या ह्या ग्रहाला आपण धरती म्हणतो त्या धरतीचे आपण निवासी आहोत.माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे . आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो.

बरं ते राहूंदे बटरस्कॉच आइस्क्रिम कुठे आहे ते आणा पाहूं"
मी समजलो चर्चा इथेच थांबवून आइस्क्रिमवर तांव मारण्याची वेळ आली होती.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

ज्ञानाचा सागर अथांग आहेच, आपण सर्व बाजूंनी इतर लोकांच्या बरोबर बांधले गेलो असल्यामुळे सुसाट धावू शकत नाही हे सुद्धा खरे आहे, पण त्यामुळे आपल्या मर्यादा फार फार तर थोड्याशा संकुचित होतात. ही बंधने नसली तरी आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक मर्यादा असतातच. आपण दिलेले उदाहरण घेतले तर रस्त्यावर कर्फ्यू असला आणि आपण पोलिसांच्या गाडीतून निघालो तरी तासाला हजार मैलांचा वेग घेऊ शकणार नाही. उभ्या आणि आडव्या रस्त्यांची एकंदर लांबी दहा कोटी मैल असेल तर आपल्या आयुष्यभरात त्या सर्व रस्त्यांवरून जाऊ शकणार नाही.
आपली मूलभूत क्षमता हीच मुख्य मर्यादा आहे असे मला वाटते. पण तिचा सुद्धा पुरेपूर उपयोग करून न घेता इतरांना दोष देणे हा सोपा मार्ग आहे. ट्रॅफिक जॅमचे कारण दाखवून आपण घराबाहेर पडतच नाही ही सर्वात मोठी चूक आपण करतो.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

Nile's picture

19 Jul 2009 - 9:04 am | Nile

पण तिचा सुद्धा पुरेपूर उपयोग करून न घेता इतरांना दोष देणे हा सोपा मार्ग आहे. ट्रॅफिक जॅमचे कारण दाखवून आपण घराबाहेर पडतच नाही ही सर्वात मोठी चूक आपण करतो.

घारे साहेबांशी सहमत आहे. मर्यादा असण्यापेक्षा त्या रुंदावता येतील का, याचा विचार व त्या दृष्टी ने प्रयत्न महत्त्वाचे. खरंतर मर्यादा उमजुन केलेले प्रयत्न हे एक उत्तम उदाहरणच होईल, जे वास्तवदर्शी असेल.