"आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो."
अरविंद चिटणीस ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला.सुरवाती पासून त्याला कुणालातरी शिकवायची आवड होती.वर्गात मॉनिटर म्हणून राहिल्यास मुलांना कसली ना कसली तरी गोष्ट सांगण्यात स्वारस्य घ्यायचा.माझ्या वर्गात असताना हा त्याच्या अंगचा गूण मी पाहिला होता.
आमचे क्लास टिचर नंतर प्रसिद्ध झालेले कवी कारखानीस होत.
क्लास टिचर किंवा दुसरा कसलाही तास घेणारे शिक्षक त्यादिवशी गैरहजर असले तर आमचे हेड्मास्तर श्री. नाबरसर त्या क्लासाला यायचे.त्यांचा शिरस्ता म्हणजे ते हातात एक नवी "लायन" ची पेन्सिल घेऊन यायचे.आणि त्या तासात एक किंवा दोन गोष्टी सांगायचे.गोष्ट सांगून झाल्यावर दहा प्रश्न विचारायचे.ज्यांची दहाही प्रश्नांची उत्तर अचूक येतील त्यांना ते ती नवीन पेन्सिल द्यायचे.कधी कधी समयसुचकता जाणण्यासाठी मुलांना कोडी घालून विचारायचे.अचूक उत्तर दिल्यास आणखी एक पेन्सिल द्यायचे.
मला आठवतं एकदा नाबरसरानी एक अतिरंजीत करून, विमान अपघात होण्याचा कसा टाळला गेला ही कल्पित गोष्ट सांगितली होती.आणि गोष्ट सांगून झाल्यावर एकच प्रश्न विचारला होता.त्याचं अचूक उत्तर फक्त अरविंद चिटणीसच देऊ शकला.
"ह्या गोष्टीचा मी एकच प्रश्न विचारणार"
असं त्यांनी अगोदरच सांगून टकलं होतं.
त्या वयांवर आमच्या बुद्धिची पातळी तेव्हडीच असल्याने हेडमास्तर नाबरसर जे सांगत ते आम्हाला खूपच वाटायचं.
त्या न झालेल्या विमान अपघाताची गोष्ट ऐकण्यात आम्ही सर्व एव्हडे गुंग झालो होतो की जर नाबरसरानी प्रश्न विचारला तर त्यांचं अचूक उत्तर देण्यासाठी शक्यतो प्रत्येक मुद्यावर ध्यान ठेवून ऐकत होतो.ते विमान जंगलातल्या एका पठारावर सुरक्षीतपणे उतरून रात्रीच्यावेळी लोकांची त्रेधा कशी उडाली ह्याचं त्यांच्याकडून वर्णन ऐकण्यात बरचसे आम्ही गुंगून गेलो होतो.
आम्हाला वाटलं विमानात माणसं किती होती हे त्यांनी सांगितलं होतं त्याचा आंकडा विचारतील.किंवा रात्री किती वाजता ते विमान त्या जंगलात उतरलं होतं त्याची वेळ त्यांनी सागितली होती ती वेळ विचारतील म्हणून आम्ही ती वेळ लक्षात ठेवली होती. विमानात बायका आणि मुलं किती होती त्याचा आकडा सांगितला होता तो प्रश्न विचारतील म्हणून तो आंकडा आम्ही लक्षात ठेवला होता.
पण कुठचं काय आणि कुठचं काय?
त्यांनी एकच प्रश्न केला तो असा विक्षीप्त होता की तो प्रश्न ऐकून आम्हाला वाटलं कुणालाही त्याचं उत्तर माहित नसावं आणि ही नवी पेन्सिल ह्यावेळी नाबरसर कुणालाही देणार नाहित.
सरांनी विचारलं,
" विमान चालवणार्या पायलटचं नांव काय?"
उत्तर देण्यासाठी कुणी ही हात वर केला नाही फक्त एक अरविंद वगळता.नेहमी पेन्सिल बक्षीस घेणारा अरविंद चिटणीस ह्यावेळी असफल होणार अशी आमच्या सर्वांची बालंबाल खात्री झाली होती.
अरविंद हात वर करून म्हणाला सर मी सांगू का? कुणास ठाऊक एरव्ही नाबरसरांचा अरविंदच्या समयसुचकतेवर विश्वास असला तरी ह्यावेळी त्यांना खात्री नसावी असं आम्हाला वाटलं. सांग, म्हणून नाबरसर म्हणाले. आम्ही सर्व अरविंदकडे
आं-वासून बघत होतो.
तो म्हणाला,
"सर त्या पायलटचं नांव आहे नाबरसर"
हे उत्तर ऐकून नाबरसरांना खरोखरच कौतुक वाटलं.
ते म्हणाले,
"अरविंद तुझं उत्तर अगदी बरोबर आहे.आणि ही घे पेन्सिल."
नाबरसर निघून गेल्यावर आम्ही अरविंदला घेराव टाकला आणि विचारलं,
"खरंच अरविंद तुझी कमाल आहे हे नांव तुला कसं कळलं?"आम्हाला एव्हडं सोपं कसं माहित झालं नाही?"
अरविंद म्हणाला,
"सर जेव्हा रात्रीचा तो जंगलातला प्रसंग रंगवून, रंगवून सांगत होते,त्यावेळी त्यांची आपल्या सर्वांच्या कुतहलाकडे नजर होती. आणि स्पष्ट-अपस्पष्ट आणि झटकन सर बोलून गेले होते,
"ते विमान मी चालवत होतो"
ते ऐकून मला त्यावेळी जरा विक्षीप्त वाटलं होतं,पण मी ते लक्षात ठेवलं होतं."
अरविंदला कथा-कहाण्या खूप आवडायच्या.अलीकडेच तो त्या शाळेचा हेडमास्तर होऊन रिटायर्ड झाला होता.
त्याच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला तो माझ्या कडे आला होता.मी त्याला जुन्या आठवणीचा उल्लेख व्हावा या दृष्टीने म्हटलं,
"या कथाकार आज काय विशेष?"
आमंत्रण देऊन झाल्यावर मी त्याला बसवून घेतलं.आणि म्हणालो,
" जरा जुन्या गप्पा मारूंया."
मी दिलेला टोमणा लक्षात ठेवून मला म्हणाला,
"तू मला वाटलं तर कहाणीकार किंवा कथाकार म्हण. शिक्षक असल्याने मी रोज वर्गात एक कथा सांगत असायचो.कधी मी एखादी गोष्ट वाचून सांगायचो.पण बहुदा मी गोष्ट सांगत होतो.जेव्हा मी गोष्ट सांगतो तेव्हा न चुकता एखाद-दुसर्य़ा विद्यार्थ्याकडून किंवा विद्यार्थिनीकडून,
"ही गोष्ट खरी आहे कां?"
असं विचारलं जायचं.आणि मी नेहमीच होय म्हणायचो.
मी गोष्ट खरी नसून खरी आहे असं सांगितल्यावर ती आश्चर्य चकित चेहरा करून माझ्याकडे बघत असायची.
मनुष्य स्वभाव, आवश्यकता,आणि जी वैशिष्ट -वाचकाला किंवा ऐकणार्याला- अभिज्ञेय असतात त्यांच्या भोवती एखादी अद्भुत आणि अत्यंत कल्पनाशील कथा सुद्धा, परिभ्रमण करीत असते.
आपले नाबरसर होते.ते नेहमी कथा सांगत. माझ्या अनेक शिक्षकामधे ह्या शिक्षकाची मला नेहमी आठवण येत असायची.अजून पर्यंत त्यांच्या कथा माझ्या लक्षात आहेत.
कधी कधी नाबरसर अशा कथा सांगत असत की त्यातून संस्कार,धडे आणि युक्त्या ते व्यक्त करीत आणि कधी कधी मला वाटतं अंमळ आम्हाला करमणुकीच्या आनंदात टाकण्यासाठी नेहमीच्या वाकप्रचाराची प्रचुरता वापरून कथा सांगत.
तू म्हणशील मी रिटायर्ड होऊन झालो तरी क्लासात बोलल्या सारखा तुला लेक्चर देत आहे.पण खरं सांगू,अश्या आपल्या ह्या कथा म्हणजे भूत आणि भविष्याला बांधलेली गांठ समजली पाहिजे.आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो.वर्षानुवर्ष समाजाने ह्या कथांच्याद्वारे आपली जीवन-शैली एका पिढीतून दुसर्या पिढीत व्यक्त करण्यासाठी वापरली आहे. ज्या समाजाने आपल्या कथा हरवल्या आहेत तो समाज आपलं अस्तित्वच हरवून बसला आहे.हरवलेल्या कथांची आठवण येऊन एकदा मी बराच दुःखी झालो.ज्यांच्या त्यावेळच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा आपण जागृत नव्हतो अशा प्राचीन लोकांची आठवण काढून हे दुःख मला करावं लागलं.त्यांच्या कहाण्या ह्या आपल्याच आहेत ह्यावर मी आता भरवंसा करायला लागलो आहे.मला वाटतं अख्या जगात एखाद्या गोष्टीचा विषय आणि मूलभाव लक्षात घेऊन त्याचा प्रतिलेख लिहिला जातो. वाटलं तर मानवजातिचं अध्ययन करणार्याला विचारल्यास तो नक्की असंच सांगेल."
मला वाटतं,प्राचिन प्रवाश्यानी आपल्या कहाण्या,त्यांच्या नंतर येणार्या पिढीजवळ हस्तांतरीत केल्या परत त्या पिढीने नव्या पिढीजवळ तसंच केलं असावं आणि अखेर मला त्या कथा मिळण्याची सोय केली.तुला कदाचीत माहित नसेल मी अलीकडे "नवीन कथा"नांवाचं पुस्तक लिहित आहे.मी जरी त्यात नवीन कथा लिहिली तरी ती तशी नवीन नसते उलट पूर्वापारच्या मानवी विचारधारेतून निर्माण झालेल्या असंख्य कहाण्यामधून कल्पित करून तयार झालेली असते.
हल्लीची परिस्थिती पाहून माझ्या मनात काय येतं ते तुला सांगतो.
ह्या कथा आपलं जीवन संपन्न करतात.टीव्ही आणि चित्रफितीतून आधूनिक पद्धतिने ह्या कथा फैलावल्या जात आहेत.साध्या सरळ शब्दातून सांगितलेल्या ह्या कहाण्या मात्र आपल्याच अंतरात वास करतात. आपल्यावर दबाव आणून मेंदूतल्या कल्पकतेच्या साधनाला परिश्रम घ्यायला उत्तेजीत करतात.
मला वाट्तं मुलं ह्या कहाण्या ऐकणार.तासन-तास टीव्ही पहात असणारी मुलं पण कहाण्या ऐकणार,अगदी एखादं दुर्लक्षीत झालेलं किंवा भूकेलेलं मुलसुद्धा ह्या कहाण्या ऐकत राहाणार.माझा अगदी विश्वास आहे की ह्या कथाच आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवणार आहेत आणि यात संदेह नाही."
मी अरविंदाला म्हणालो,
"अरविंदा, हे पण तू चालता चालता काहाणी सांगितल्या सारखंच केलंस.मी तुला सुरवातीला कथाकार म्हणालो ते माझ्या पचनी पडलं म्हणायचं"
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
27 Jun 2009 - 2:47 pm | दशानन
>>ह्या कथा आपलं जीवन संपन्न करतात
१००% सहमत.
मला ही कथा खुप आवडतात व आवडत होत्या.. लहानपणी मी चांदोबाच्या कथा वाचून रंगून जात असे.. कधी कधी आई-बाबा गोष्टी सांगायचे ते आठवले... माझ्या बाबांनी मला फक्त एकदाच कथा सांगितली होती चल रे फुटाण्या.. आता ती गोष्ट पुर्ण आठवत नाही पण तो काळ देखील आता माझ्या आठवणीच्या खजानातील अनमोल रत्न आहे.. काही कथा जिवन बदलून टाकतात तर काही कथा निखळ मनोरंजन करतात... कथा हेच माझं विश्व होते लहानपणी... लहानपण जसं जसं हरवत गेलो तस तसे त्या कथा देखील मागे राहत गेल्या.. तुमच्या ह्या लेखामुळे.. मला परत एकदा कथा वाचाव्यात असे वाटू लागले आहे... चांदोबा मागवावा लागेल.. नाही तर सिहासंन बत्तीशी... :)
थोडेसं नवीन !
27 Jun 2009 - 5:19 pm | वेताळ
मस्त लेख लिहला आहे काका तुम्ही.
वेताळ
28 Jun 2009 - 1:08 pm | अरुण वडुलेकर
ह्या कथा आपलं जीवन संपन्न करतात.टीव्ही आणि चित्रफितीतून आधूनिक पद्धतिने ह्या कथा फैलावल्या जात आहेत.साध्या सरळ शब्दातून सांगितलेल्या ह्या कहाण्या मात्र आपल्याच अंतरात वास करतात. आपल्यावर दबाव आणून मेंदूतल्या कल्पकतेच्या साधनाला परिश्रम घ्यायला उत्तेजीत करतात.
१००० टक्के सहमत.
या आनंदाचा पुनःप्रत्यय घ्यायचा असेल तर आपणही अशा लहान पणी ऐकलेल्या कथा मिपावर द्यायला, एक नवा प्रवाह सुरू करायला काय हरकत आहे? :)
28 Jun 2009 - 9:57 pm | लिखाळ
वा वा .. उत्तम !
खरे आहे आपले म्हणणे.
आपल्या लेखनामागे सुद्धा अशीच काही प्रेरणा असावी.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
9 Jul 2009 - 3:39 pm | मिसळभोक्ता
समजा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर एक विमान कोसळले. त्यात ३७ हिंदू आणि ३ मुसलमान होते. काही प्रवासी मेले, आणि काही वाचले. तर वाचलेल्यांना पुरणार की जाळणार ? आणि पायलटचे काय करणार ?
- अरविंद उर्फ मिसळभोक्ता
9 Jul 2009 - 4:04 pm | वेताळ
कोसळल्यावर काय शिल्लक राहणार? =))
वेताळ
9 Jul 2009 - 4:05 pm | वेताळ
कोसळल्यावर काय शिल्लक राहणार? =))
वेताळ
10 Jul 2009 - 5:45 am | मदनबाण
काका छान लेख. :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka