जनांचा प्रवाहो...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
21 Jun 2009 - 9:28 am

भर दुपारची वेळ. रणरणत्या उन्हामुळे रस्त्यावरची वाहतूक थंडावलेली. झाडाच्या आडोशाला, सावलीखाली उभ्या राहिलेल्या ट्रकखाली विश्रांती घेणारे ड्रायव्हर-क्‍लिनर सोडले, तर रस्त्यावर माणसांचा मागमूसदेखील नाही... मैलामैलांवर हीच स्थिती. शेगावकडे जाणारा रस्ता सुरू होतो आणि हे चित्र पालटून जातं. रणरणत्या उन्हात, माणसांचे घोळके संथ लयीत चालत असतात. तळपत्या उन्हात त्यांच्या हातातले भगवे झेंडे लांबवरून आणखीनच भडकभडक वाटू लागतात.
निवडणुकांचे दिवस आहेत, कार्यकर्त्यांच्या फौजा प्रचारासाठी बाहेर पडल्या असतील, असं क्षणभर वाटून जातं...पण विदर्भात रस्त्यावरून चालणारे, प्रचारासाठी चालत फिरणारे कार्यकर्ते दिसतच नाहीत. उन्हाच्या वेळा टाळूनच होणाऱ्या प्रचारासाठी देखील, वाहनांचे ताफेच दिसतात.
घोळक्‍यांचं अंतर कमी कमी होत जातं आणि हे कुठल्या पक्षाचे "प्रचारक' नव्हेत, हे चटकन लक्षात येतं.
आणि हे झेंडेही, "शिवसेनेचे भगवे' नव्हते, तर "भाविकांच्या भगव्या पताका' आहेत, हेही लक्षात येतं.
...राजकारण आणि निवडणुकांपलीकडे अलीकडे डोक्‍यात कुठलेच विचार नसल्याने, या झेंड्यांनाही आपण राजकारणाचाच रंग चढवला, असं वाटून मी उगीचच खंतावून जातो. घोळका रस्ता कापतच असतो.
हलक्‍या आवाजात, भजनाचा गजर सुरू असतो...
`गणगण गणात बोते'
घोळक्‍यात सर्वांत पुढे, कुठल्या तरी गावाच्या भाविक मंडळाचं नाव असलेला फलक. त्यामागे एकतारीचा किणकिणाट करत भजन सांगणारा म्होरक्‍या, मागे टाळ आणि पताका घेतलेले भाविक, आणि त्यांच्या मागून काही महिला...
खामगावच्या परिसरात शेगावच्या दिशेने जाणाऱ्या आणि शेगावकडून येणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर हेच दृश्‍य दिसतं. त्या रस्त्यावरून जाताना, मीदेखील राजकारण आणि निवडणूक विसरून गेलो.
रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता, "विदर्भाच्या पंढरी'चे हे वारकरी रस्ता कापत असतात. भर उन्हात, तापलेल्या, वाहनांची अजिबात वर्दळ नसलेल्या त्या रस्त्यावर फक्त भजनाचे, टाळ-ढोलक्‍यांचे सूर घुमत असतात. निवडणुकीचे सगळे रंग पुरते पुसलेले असतात. इतका, की या भाविकांच्या संगतीत, एखादा सरकारी अधिकारी, कर्मचारीही निवडणूक विसरून गेलेला असतो.
...बाळापूरच्या नाक्‍यांवरचं ते दृश्‍य मी पाहिलं आणि थक्क झालो.
रस्त्याच्या कडेला, एका मोठ्या झाडाच्या सावलीतच एक पोलिस चौकी आहे. वाहतूक पोलिसांचीही चौकी तिथंच आहे.
झाडाच्या पारावर, पाण्यानं भरलेला एक भलामोठा माठ...
झाडाखाली सावलीला विसावलेला पंचवीस-तीस भाविकांचा घोळका, आणि त्यांच्या गर्दीत, त्यांच्याशी चक्क आपुलकीनं गप्पा मारणारा, त्यांची विचारपूस करणारा एक पोलिस अधिकारी.
दुसरा शिपाई, त्या माठातलं पाणणी एकेका ग्लासमध्ये भरून प्रत्येक भाविकाच्या हातात देत असतो...
पोलिसांचं हे वेगळेच रूप मला त्या दिवशी दिसलं.
मी तिथं थांबलो. त्या घोळक्‍यासोबत बसलो. सहजच कुठून आले म्हणून विचारपूस केली.
नाशिकजवळच्या कुठल्या तरी गावातून विदर्भाच्या पंढरीला आलेली ती वारी होती.
या बायकापण तुमच्यासोबत चालतात? मी एकाला विचारलं.
त्याला बहुधा खोटं बोलवेना.
`नाही... मधूनमधून एखाद्या गाडीने प ्रवास करून पुढच्या टप्प्यापर्यंत जातात. तिथं पुन्हा आम्हासोबत येतात आणि दुसरा गट गाडीनं पुढं जातो... एवढं चालणं सगळ्यांना झेपत नाही.. लई उन हाये...' तो प्रामाणिकपणे म्हणाला.
तो पोलिस अधिकारी, घोळक्‍याच्या मधोमध टेबल-खुर्ची टाकून बसला होता.
`काय हो तुम्हाला आचारसंहिता नाही?' मी उगीचच त्याला म्हणालो.
भगव्या झेंड्यांनी घेरलेल्या घोळक्‍यात बसलेल्या त्या अधिकाऱ्याला आचारसंह�¤ �तेचं नाव काढल्यावर कदाचित भीती वाटेल, अशी माझी समजूत होती.
पण तो केवळ हसला.
`अहो, हाच आमचा नेहमीचा आचार आहे.. इथून रोज शेकडो भाविक महाराजांच्या दर्शनाला जातात. त्यांना पाणी दिलं, त्यांची सेवा केली, तर आचारसंहितेचा भंग होईल?.. त्यानं मला उलटा सवाल केला.
आणि त्यावर काय बोलावं हे न सुचल्यानं मी गप्प बसलो.
थोड्या वेळानं तो घोळका उठला.. पोलिस अधिकारी आणि तो शिपाईही उठले. एकमेकांचे हात हातात घेऊन ते नमस्कार करत परस्परांचा निरोप घेत होते. आणि टाळ वाजले...
`गणगण गणात बोते.' गजर झाला आणि घोळका पुढे सरकू लागला....
रस्त्यावर पुन्हा भगव्या पताका फडकू लागल्या....
.....................

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2009 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील अनुभव चांगला असला तरी, सर्वच पोलीस चांगलेच असतात असा अर्थ मात्र आम्ही वरील अनुभवातून घेणार नाही. :)

-दिलीप बिरुटे

प्रशु's picture

21 Jun 2009 - 11:40 am | प्रशु

गण गण गणात बोते..

प्रमोद देव's picture

21 Jun 2009 - 12:20 pm | प्रमोद देव

पोलिस असला तरी तो एक माणूसच असतो आणि भाविकही असू शकतो. तो पोलिस अधिकारीही कदाचित त्या पंथातला असेल कुणी सांगावे! म्हणूनही ती आपुलकी असू शकते.
मला तरी ह्या गोष्टीचे फारसे नवल नाही वाटले. :)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2009 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>पोलिस असला तरी तो एक माणूसच असतो आणि भाविकही असू शकतो.

मान्य आहे. पण याच माणसाच्या अंगात खाकी कपडे असले की अंगात लै मस्ती येते, असे वाटते.

अवांतर : औरंगाबादेत मानसी देशपांडे खून प्रकरणात पोलिसांना तपास सुरु करुन दहा दिवस झाले, आरोपींचे काहीच धागेदोरे मिळाले नाही अजून. त्यांचा निषेध करण्यासाठी गेलेल्या महिलांची मंगळसुत्र चोर म्हणून तपासणी केली गेली. त्यांची झडती कशी घेतली गेली ते नाही लिहित इथे...च्यायला या पोलिसांच्या....

पाहा बातमी.

-दिलीप बिरुटे