एकलव्य

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
18 Jun 2009 - 10:03 am

एकलव्य मध्यम बांध्याचा, हसतमुख आणि उत्साही तरुण होता. तो बुद्धिमान होताच, पण त्याचबरोबर, इतरांशीही मैत्रीचे, स्नेहाचे संबंध असायला हवेत असं त्याला वाटत असे. १९९२मध्ये मुंबईच्या ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून त्याने आर्किटेक्ट्ची पदवी संपादन केली होती. सात वर्षापासून तो ’पॅरेडाइज कन्स्ट्रक्शन कंपनी’त चीफ आर्किटेक्टच्या पदावर काम करत होता. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे इथपर्यंत पोचेपर्यंत त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. आपल्या योग्यतेच्या बळावर त्याने आपल्या कंपनीत विशेष स्थान निर्माण केले होते. आपले वरिष्ठ मिस्टर द्रोणनाथनना संतुष्ट ठेवण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असे.
एकलव्य एका छोट्या सोसायटीत रहात असे. त्याच्या घराचा जिना अरुंद आणि अंधारा होता. एका बेड रुमच्या फ्लॅटमध्ये तो आपले आई-वडील आणि धाकटी बहीण यांच्यासोबत रहात होता. त्याच्या घराजवळ एक बाग होती. तिथे तो नेहमी मॉर्निंग वॉकसाठी जात असे. घराची बल्कनी, ही त्याच्या दृष्टीने अशी जागा होती, की जिथे तो रिलॅक्स होऊन बसत असे. तिथून दिसणारं वरचं मोकळ आकाश आणि खालची हिरवळ बघून त्याला निसर्गाच्या सान्निध्याची जाणीव होत असे. तिथे बसून घर आणि ऑफीसमधल्या वेगवेगळ्या समस्या आणि जीवनातील विविध पैलूंवर विचार करायला त्याला आवडत असे.
रोजच्या सवयीनुसार सकाळी सकाळी एकलव्य फिरायला बाहेर पडला. कालच्या प्रमाणेच आजही रस्त्यात त्याची भेट ऊपरवाल्याशी झाली. त्याला पाहून एकलव्य खूश झाला. दोघांनी हसून एकमेकांना अभिवादन केलं. ऊपरवाला - कसा आहेस एकलव्या ?
" ठीक आहे ! " आपली संभ्रमित अवस्था लपवत एकलव्य कसा तरी म्हणाला.
एकलव्याचं ’ ठीक आहे ’ हे म्हणणंच अशा त-हेचं होतं, की त्याच्या बाबतीत काही ठीक चाललेलं नाही, हे लक्षात येत होतं. त्याच्या दबक्या आवाजावरून ऊपरवाल्याला त्याच्या दुःखाची जाणीव झाली. त्याचं दुःख काहीसं कमी करण्यासाठी ऊपरवाला म्हणाला, " काय झालं ? तुझं बोलणं आणि तुझ्या चेह-या वरचे भाव यात काही ताळ - मेळ वाटत नाहीये. तुझे शब्द काही वेगळच बोलताहेत आणि तुझे भाव काही वेगळच दर्शवताहेत. जर तुला संकोच होत नसेल, तर तू मला तुझ्या मनातली गोष्ट सांगू शकतोस. त्यामुळे तुझं मनंही थोडं हलकं होईल. ऊपरवाल्याची आत्मियता बघून एकलव्यालाही रहावलं नाही. आपला संकोच सोडून त्याने त्याला सांगायला सुरुवात केली.
एकलव्य - काल ऑफीसमध्ये आमच्या प्रमोशनची यादी लागली होती. माझं नाव यादीत असणार
याबद्दल माझी खात्री होती. पण प्रमोशनच्या यादीत माझ नाव नव्हतं. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. मिस्टर द्रोणनाथनचा खूप रागही आला. आजपर्यंत मी प्रामाणिकपणे आणि मन लावून काम केलं, त्याचं हेच फळ त्यांनी मला दिलं का ? माझ्या बाबतीतच असं का झालं ? या विचाराने कालपासून मी उद्विग्न आहे. मला हेच कळत नाही, की अशा त-हेने किती काळ मी असं त्रस्त जीवन जगत रहायचं ?
ऊपरवाला - जे काही होतय, ते तुझ्या प्रार्थनेचं फळ आहे.
ऊपरवाल्याचं हे बोलणं ऐकून एकलव्याला धक्काच बसला. हा असा कसा बोलतोय, म्हणून थोडा रागही आला. त्याची अपेक्षा होती, की ऊपरवाला त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याचं सांत्वन करेल. त्याच्या या समस्येवर काही उपाय सुचवेल. पण ऊपरवाल्याच्या या बोलण्याने त्याला ताबडतोब बोलायला भाग पाडलं.
एकलव्य - हे काय बोलता आहात आपण ?... मी तर ईश्वराकडे माझ्या उन्नतीसाठी प्रार्थना केली होती. पण माझी तर अवनतीच झाली. मेहनत आणि मनःपूर्वक काम करण्याचं हेच का फळ ईश्वराने मला दिलं ?याचा अर्थ असा आहे का, की मी ईश्वराजवळ चुकीची प्रार्थना केली ?
ऊपरवाला- नाही. तू अगदी बरोबर प्रार्थना केलीस, पण तुझी प्रार्थना ईश्वर आपल्या पद्धतीने पुरी करेल. तू आपल्या उन्नत्तीची प्रार्थना केलीस, पण याचा अर्थ असा नाही, की ती तुझ्या प्रमोशनच्याच मार्गेच पूर्ण होईल. तुझं प्रमोशन न होणं, हीसुद्धा तुझ्या उन्नतीची पायरी असू शकेल.
ऊपरवाल्याचंअसं वेगळ उत्तर ऐकून एकलव्याचे कान टवकारले. तो सावध झाला. त्याला वाटलं, ’ हे जे काही म्हणताहेत, त्यावर मी कधीच विचार केला नसता. त्यांनी माझ्या प्रमोशनच्या घटनेकडे बघण्याची एक वेगळीचदृष्टी दिलीय. एकलव्याच्या मनात एवढा वेळपर्यंत साचून रहिलेली चीड आता काहीशी कमी झाली. आपले बॉस मिस्टर द्रोणनाथन यांच्यावरचा रागही थोडासा कमी झाला आणि ऊपरवाल्याशी बोलणं पुढे चालू ठेवण्याच्या मनःस्थित तो आला.
एकलव्य - माफ करा. मी माझ्याच प्रश्नाने उद्विग्न झालो होतो. त्यामुळे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. आत्ता आत्ताच आपण म्हणालात, की जे काही घडतय, ते तुझ्याच प्रार्थनेचं फळ आहे. याबाबत आपण सविस्तरपणे काही सांगू शकाल ? प्रथम मला ही गोष्ट ऐकून काहीस विचित्र वाटलं, पण आता वाटतय, यातनिश्चितपणे असे काही पैलू सामावलेले आहेत, जे समजून घेणं आवश्यक आहे.
ऊपरवाला- अगदी बरोबर बोललास तू ! एका कथेच्या आधारे मी ही गोष्ट विस्तारपूर्वक संगतो. ऐक.

एक मणूस रोज देवाची प्रार्थना करायचा, ’ देवा मला लॉटरी लागू दे. त्यामुळे माझ्या आर्थिक विवंचना दूर होतील आणि पैशाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेलं दुःख संपेल.’
दररोज ईश्वराला प्रार्थना करूनही काहीच घडलं नाही, तेव्हा एक दिवस तो हताश होऊन म्हणाला, ’ देवा तू माझी प्रार्थना ऐकत का नाहीस ? ’ त्याच वेळी आकाशवाणी झाली, की ’ प्रथम लॉटरीचं तिकीट तरी घे !’ रोज प्रार्थना करूनही त्याच्या लक्षातच आलं नव्हतं, की आपण अजून लॉटरीचं तिकीटच घेतलं नाही आहे. आकाशवाणी झाली, तशी तो धावत गेला आणि लगेचच लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. लॉटरी फुटण्याचा दिवस आला आणि गेला, पण त्याला काही लॉटरी लागली नाही. तो पुन्हा निराश झाला. त्याने ईश्वराला विचारलं, आता का नाही मला लॉटरी लागली ? त्याने प्रश्न विचारताच त्याला आवाज ऐकू आला, " घरातून बाहेर तरी पड. " घराबाहेर पडताच त्याला रस्त्यात एक टिफीन दिसला. त्याने टिफीन उघडून बघितलं, तर त्याला त्यात एक दिवा, कापसाची वात, तेल, काड्याची पेटी मिळाली. त्यात एक लॉटरीचं तिकीटही होतं. या सगळ्या गोष्टी पाहून तो खूश झाला. त्याला वाटलं,’ आता ईश्वराने स्वतःच लॉटरीचं तिकीट पाठवलय, तर मला लॉटरी नक्कीच लागणार. ’ पण नेहमीसारखीच लॉटरी उघडण्याची तारीख आली आणि गेली. त्याला लॉटरी काही लागली नाही. त्याला खूप वाईट वाटलं. कष्टी होऊन पुन्हा त्याने ईश्वराची करुणा भाकली. ’ माझी लॉटरी का लागली नाही ? ’ तो म्हणाला. पुन्हा आकाशवाणी झाली, ’ आधी दिवा तरी लाव. ’ आकाशवाणी ऐकून दिवा लावण्यासाठी त्याने दिव्यात तेल घातलं. कापसाची वात केली आणि ती पेटवण्यासाठी काड्याची पेटी उघडली, तर त्यात एक हिरा होता. हिरा मिळाल्याने तो अतिशय खूश झाला. त्याला वाटत होतं, की लॉटरी लागल्यानेच त्याची समस्या सुटू शकेल. पण ईश्वराने त्याची प्रार्थना अगदी वेगळ्या रीतीने, वेगळ्या त-हेने पूर्ण केली.
ही गोष्ट ऐकून तुझ्या लक्षात आलं असेल, की ईश्वर तुझी उन्नती कुठल्या तरी दुस-या मार्गाने पुर्ण करू इच्छितोय. तेव्हा सर्वात आधी या गोष्टीबद्दल दुःख करणं बंद कर. कदाचित काही दिवसांनी तुझ्याच कंपनीत तुला विशेष पद बहाल केलं जाईल किंवा कुठल्या तरी दुस-या कंपनीत, कुठल्या तरी उच्च पदावर तुझी नियुक्ती केली जाईल किंवा कदाचित तू स्वतःच एखादा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करशील. उन्नतीचा एक नाही, अनेक मार्ग आहेत.
एकलव्य- माझा स्वतःचा व्यवसाय ? उन्नतीचे अनेक मार्ग..... आपल्या विचारांबद्दल काय बोलावं ?
ऊपरवाला- माझं बोलणं अजून पूर्ण कुठे झालय ? पुढे ऐक.
माणसांकडून नेहमी ही चूक होते, की तो ईश्वराची प्रार्थना करतो आणि त्यालाच आपल्या प्रार्थनापूर्तिचा मार्गही सांगून टाकतो....’ या ... या... पद्धतीने माझी अमूक तमूक समस्या सोडव. ’ ही कथा या गोष्टीकडे संकेत करते, की तुम्ही ईश्वराकडे फक्त दुःखमुक्त होण्यासाठी प्रार्थना करा..... दुःखमुक्तिचा रस्ता दाखवू नका. ईश्वराला वाटेल त्या पद्धतीने तो तुमचे दुःख दूर करेल, कारण ईश्वराचा मार्गच सर्वोत्तम आहे. परिपूर्ण आहे.
एकलव्य - अपल्या बोलण्यामुळे माझी ’प्रमोशन’च्या बाबतीतील चिंता एकदम दूर झाली. आजपर्यंत मी समजत होतो, की प्रमोशन हेच माझ्या उन्नतीचं द्योतक आहे. पण आज आपल्याबरोबर बोलून मला एक वेगळीच दृष्टी मिळाली. घटनेकडे बघण्याचा एक नवाच पैलू दृष्टोत्पत्तीस आला. मी फक्त ईश्वराकडे प्रार्थना करायची आहे. ती कशा त-हेने पूर्ण होईल, याबद्दल मी विचार करायचा नाही.
ऊपरवाला - या कथेत आणखी एक संदेश लपला आहे. जेव्हा माणूस आपल्या जीवनात ज्ञानरुपी खुशीचा दिवा लावतो, तेव्हा त्याला केवळ हिराच नही, तर परीसही प्राप्त होतो. परीस रूपी ज्ञान मिळवून तो पुढे येणा-या दुःखापासूनही मुक्त होऊ शकतो.
कोणत्याही परिस्थितीत आपण खूश रहायला हवं, हे नेहमी लक्षात ठेव, कारण खुशी आपला मूळ स्वभाव आहे. मूळ स्त्रोत आहे. पाण्याचा स्वभाव जसा ओलं रहाण्याचा असतो, त्याचप्रमाणे, स्व, सत्य, ईश्वर,अनुभव, जे काही आपल्या आत आहे, त्याचा स्वभाव आहे, प्रेम, खुशी आणि आनंदात रहाणे. आपण वस्तुस्थिती विसरून मानलेल्या गोष्टींमध्ये हरवून जे दुःख मानतो, ते अगदी खोटं आहे. ते स्वविस्मरण आहे.
एकलव्य - आपलं बोलण ऐकताना चांगलं वाटतं, पण त्यात अनेक शब्द असे आहेत, जे मला अगदी अपरिचित वाटताहेत. आपलं बोलणं अगदी सरळ आहे, पण...दुःखात खूश रहायचं कठीण आहे.
ऊपरवाला - माणूस दुःखात खूश राहू शकत नाही, कारण त्याचं मन प्रत्येक गोष्ट आपल्या तराजूतून पारखून घेऊ इच्छितो. मन विचार करते, प्रथम मी हे पाहीन... प्रथम मी हे जाणून घेईन..... प्रथम मी हे मिळवीन..... प्रथम माझ्या समस्येचं निवारण व्हावं. प्रथम मी ही गोष्ट नक्की करेन, की जे संगिललं जातय, तेखरोखरच सत्य आहे. मग मी नव्या पद्धतीने जगेन. मनाच्या या सवयीमुळेच माणूस खूश होण्यासाठी वाट बघत बसतो. जे लोक वाट न बघता लगेचच खूश होतात, त्यांना परिणाम दिसू लागतो. त्यांना सकारात्मक पुरावे मिळतात आणि खूश रहाणं, त्यांच्या जीवनाचं अंग बनतं.

ऊपरवाल्याचं बोलणं ऐकून एकलव्य खूपच प्रभावित झाला. उपरवाल्याने सांगितलेल्यापैकी काही गोष्टी एकलव्याच्या समजण्याच्या पलिकडच्या होत्या, तरी त्या गोष्टी त्याला खूप चांगल्या वाटल्या. आजपर्यंत तो जसा जगत आला, त्याचे परिणाम तर तो बघतच होता. आता त्याचा दृढ निश्चय होऊ लागला, की जीवनात काही नवीन बघायचं असेल, तर नव्या पद्धतीने विचार केला पहिजे. एकलव्याने विनवणीच्या स्वरात ऊपरवाल्याला विचारलं....
एकलव्य -अशा त-हेने रोज आपल्याला भेटता येईल का ? आज मला आपण सांगितलेल्या गोष्टी ऐकून एक वेगळीच मनःशांती लाभल्यासारखं वाटतय. माझी इच्छा आहे, की त्याप्रमाणे वागून आपल्या जीवनातील दुःख दूर करावी आणि इतरांसाठीही दुःखमुक्तीचं कारण बनावं.
ऊपरवाला - का नाही ? सोमवार आणि शुक्रवार सोडून आठवड्यातील इतर वारी यावेळी जरूर भेटू शकू.
एकलव्य - या दोन वारी आपण कुठे बाहेर जाणार आहात का ?
ऊपरवाला - नाही. बाहेरच्यांना आत बोलवायला जातो.
ऊपरवाल्याचं बोलणं एकलव्याच्या नीटसं ध्यानात आलं नाही. त्याने ऊपरवाल्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हंटलं,
एकलव्य - ठीक आहे. पण आपण बाकीचे पाच दिवस तरी याल ना ?
ऊपरवाला - हो ! आवश्य ! पण आणखीही एक गोष्ट ऐकून ठेव. दर महिन्याच्या एक तारखेला आणि पंध्रा तारखेला येऊ शकणार नाही.
वरील गोष्टीबद्दल फारसा विचार न करता ऊपरवाल्याने आठवड्यातील पाच दिवस येण्याचं आश्वासन दिल्यामुळे एकलव्याच्या अनंदाला पारावार राहिला नाही. त्याने ऊपरवाल्याला धन्यवाद दिले

(क्रमशः)

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

केळ्कर साहेब फार छान ले़ख लिहिला आहे.
च्यामारी ते क्रमशः काढुन टाका.

माझी खात्री आहे सगळे एकलव्य तुमच्या पुढ्च्या लेखाची वाट बघत आहेत.

लवकरात लवकर पुढचा भाग टाकावा ही विनती.

नितिन थत्ते's picture

18 Jun 2009 - 1:45 pm | नितिन थत्ते

हेच म्हणतो. उत्तम मांडणी आणि प्लॉट.

खराटा
(रंग माझा वेगळा)

टुकुल's picture

19 Jun 2009 - 3:38 am | टुकुल

वाचतो आहे.. अजुन येवुद्यात..

--टुकुल

शाहू's picture

19 Jun 2009 - 4:29 am | शाहू

जीवनात काही नवीन बघायचं असेल, तर नव्या पद्धतीने विचार केला पहिजे.

पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.