"तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली."

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
5 Jun 2009 - 10:04 pm

आज मी गुरूनाथला विचारलं,
"तुझी ती गांधी टोपी,किंवा सफेद टोपी म्हणूया ती वापरायचं तू केव्हा पासून सोडून दिलंस?"
त्याच्या त्या सफेद टोपीची "ष्टोरी" माझ्या अजून लक्षात आहे हे समजल्यावर गुरूनाथ हंसायला लागला.
"अरे तू एव्हडा हंसतोस का?"
असं मी त्याला म्हणालो.
"ती टोपी आणि मी हंसतो कां? ह्या दोन्ही गोष्टी मी तुला सांगणार आहे."
असं म्हणून गुरूनाथने पहिल्या पासून सुरवात केली,
"आमच्या आजोळी खूप गाई-गुरं होती.सहाजीकच मी पण आमच्या गुराख्यांबरोबर रानात जात असे.ह्या गुराख्यांकडून मी त्यावेळी खूपच शिकलो.मी नेहमी पाहिलंय की माझ्या जीवनाच्या वाटेवर प्रत्येक पायरीवर कुणी तरी मार्ग दाखवायला यायचं.एकाअर्थी ते माझे संरक्षण करणारे जणू देवदूतच होते आणि मला योग्य मार्गदर्शन करायचे.मनाशी कोणताही प्रश्न न करता ही जीवनात येणारी विक्षिप्त वळणं मी स्विकार करीत असायचो."
मी म्हणलो,
"तू अगदी लहान होतास त्यावेळी."

"मी त्यावेळी दहाएक वर्षांचा असेन.त्यावेळी खानोलीच्या तरूआक्काचा बबन्या माझा मित्र होता. त्याने मला नदीतून मासे कसे पकडायचे,जाळं कसं फेकायचं,मोठा बुळबुळणारा मासा हातात कसा घट्ट धरून ठेवायचा,असल्या गोष्टी शिकवल्याच आणि त्यापुढे जाऊन प्रेमळ कसं असावं आणि जीवनात विपत्ति आल्यावर त्याला हंसत-खेळत तोंड कसं द्यायचं हे ही शिकवलं.
"अरे गुरूनाथ,मला आठवतं त्यावेळी खादी टोपी सर्रास लोक वापरायचे.शाळेत तर प्रत्येक मुलाच्या डोक्यावर खादीची टोपी असायची.काही त्याला गांधी टोपी पण म्हणायचे.मुंबईहून मी सुट्टीत गावाला आल्यावर तुम्ही लोक मला टोपी शिवाय पाहून बोडका म्हणून चिडवायचे."
हे मी बोलल्यावर गुरूनाथ परत हंसला,आणि म्हणाला,
"ती दिवाळसणाची वेळ होती.माझ्या वडीलानी मला एक पांढरी शुभ्र टोपी दिली होती.दुकानात निरनीराळ्या कपड्यांच्या टोप्या होत्या पण ही जाड खादीची शुभ्र टोपी मला जास्त आवडली.मी ती मोठ्या दिमाखाने डोक्यावर चढवायचो.मी त्या टोपीची नीट नीगा ठेवायचो.
त्यादिवशी आम्ही- माझी मामेबहिण यमी- तिच्याकडे जेवायला गेलो होतो.यमीताई माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती.मी तिच्या मुलांचा मामा असून त्या माझ्या भाचांच्याच वयाचा होतो.त्यादिवशी संध्याकाळी आम्ही बाजारातून आणलेली रताळी, कणगी,करांदे बाहेरच्या अंगणात शेकोटी सारखी आग करून त्यात भाजत होतो.अशी भाजून आलेली ही कंदमूळं खाताना गोड लागतात.बाहेर तसं बरंच थंड होतं.आम्ही सर्व इकडच्या तिकडच्या काटकोळ्या जमा करून त्या आगीत टाकण्यासाठी तयार ठेवीत होतो.
माझा एक भाचा -कुमार- आम्हाला जादूचे प्रयोग करून दाखवत होता.ते झाल्यावर त्या शेकोटीभोवती बसलो असताना दुसरी भाची-कल्पना- वि.स.खांडेकरांच्या पुस्तकातल्या वाचलेल्या लहान लहान गोष्टी सांगत होती.
तू सांगतोस तसं त्यावेळी आम्ही सर्व मुलं घराच्या बाहेर पडल्यावर डोक्यावर टोपी चढवून जात असूं. परत घरी येई पर्यंत टोपी डोक्यावरच असायची.मला तर टोपी खूपच आवडायची म्हणा.

आमच्या डोक्यावरून एक काळा गरूड पक्षी उडत उडत निघून गेला.त्याची ती लांबच लांब आणि काळीकूट्ट पंख हलत असताना मोठ्ठा आवाज झाला.आणि झपकन माझ्या डोक्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला.क्षणभर सगळेच आवाक झाले.आणि एकामागून एक माझ्या टोपीकडे बघून हंसायला लागले.कां ते कळायला मला वेळ लागला नाही.कारण तोपर्यंत मला टोपीच्या खालच्या भागात गरम वाटत होतं,आणि दुर्गंधीचा दर्प येऊं लागला.
लगेचच उठून मी आणि यमीताईचा गडी -भगवान- विहीरीकडे धांवत गेलो.आणि कळशीभर पाणी काढून टोपी साफ करायला लागलो.पण वरची घाण जरी निघून गेली तरी त्याचा डाग काही जाई ना.त्या गरूड पक्षाने जे काय खाल्लं होतं ते जब्बर होतं. आमच्या शिकोटीच्या वरून उडताना त्यांच्या अंगाला आगीची धग लागली असावी आणि घाबरून त्या पक्षाने हा प्रकार केला असावा.
भगवानाने माझी टोपी त्याच्या जूनकट राठ हातात घेऊन तो त्या डागावर घासायला लागला. घासता घासता त्याच्या चेहर्‍यावरचं ते दांतविचकतानाचं हंसं मला अजून आठवतं.आणि माझी समजूत घालण्यासाठी मागाहून बोलल्याचं ते धीर देणारं वाक्य आठवतं,
"तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली."
बोलून झाल्यावर परत आपले डोळे मिचकावत तोंडावर हंसं आणून मग मोठमोठ्यांदा हंसायला लागला.
"मग ती टोपी तू टाकून का दिली नाहीस?"
असं मी विचारल्यावर गुरूनाथ म्हणाला,

"नंतर ती माझी टोपी माझ्या जवळ खूप दिवस होती.आणि त्यावर आणखी खूप डाग ही पडले होते.परंतु,त्या पहिल्या डागाचा धडा मी कधीच विसरलो नाही.ते त्या भगवानाचे शब्द पूढे कसल्याही संतापजनक प्रसंगातून सावरायला मला उपयोगी पडले.मला ते त्याचं वाक्य, मी आणि माझं स्वामित्व ह्या मधलं खरं अंतर दाखवत राहिलं.
माझ्या मनासारखं काहीही झालं नाही तर चेहर्‍यावर हंसूं आणण्याची मला आता संवय झाली होती.
त्या संवयीमुळेच मी आता मनासारखं झालं किवा नाही झालं तरी हंसत रहातो."
गुरूनाथचं हे हंसत रहाण्याचं तंत्र मला आवडलं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

5 Jun 2009 - 10:10 pm | रेवती

छान वेगळीच कथा!

रेवती

टारझन's picture

5 Jun 2009 - 10:13 pm | टारझन

वा !! छाण ... थोडक्यात मजा आलीये !

अनंता's picture

6 Jun 2009 - 9:44 am | अनंता

खास श्रीकृष्ण सामंत टच!!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

chipatakhdumdum's picture

8 Jun 2009 - 1:38 am | chipatakhdumdum

पण टोपी वापरायची का सोडून दिली ?