<strong>आता रायगडावर रहावत नाही.....</strong>

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
3 Jun 2009 - 10:02 pm

आता रायगडावर रहावत नाही.....

आजच्या या इंग्रजाळलेल्या वातावरणात वाढलेल्या माझ्या तमाम भारतीय बांधवांनो आणि भगिनींनो , स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा तुम्हा सर्वांना नमस्कार !
तुमच्या हल्लीच्या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे , आज ६ जून २००९. म्हणजे आज आमचा राज्याभिषेक ३३६ वर्षांचा झाला - म्हणजेच आज ३३५ वा वर्धापन दिन !पर्यायाने तुमच्या हे ही लक्षात आलं असेलच की , आज ३३५ व्या वर्धापन दिनानिमित्त , आणि आमच्या निर्वाण दिनानंतर ३२९ वर्षांनी पण आमचा आत्मा तुमच्याशी संपर्क साधतोय म्हणजे ही सारी वर्षे आम्ही होरपळतोय ! आम्हांस अजून स्मरतो तो दिवस.....

सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर आम्ही ३२ मण वजनाच्या सिंहासनाकडे निघालो.माँसाहेबांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या ! सोयराबाई राणीसाहेब 'आपण महाराणी झाल्याच्या' तोर्‍यात आणि फणकार्‍यात होत्या.युवराज शंभुराजे मात्र ..रामराजांवर - होय , राजारामांस आम्ही कायमच रामराजे म्हणत आलोत्......तर युवराज मात्र आपल्या निर्मळ मनाने आपल्या रामराजांबरोबर वावरत होते.तमाम प्रजेचा आनंद गगनात मावत नव्हता.पण आम्ही?

सिंहासनाकडे पडणार्‍या प्रत्येक पावलागणिक आम्ही आठवत होतो , आमच्या स्वराज्यासाठी रंडक्या झालेल्या आमच्या आयाबहिणींचे ते उघडे बोडके चेहेरे ! नवर्‍यामागून सती गेलेल्या कित्येक माय्-भगिनी ! अरे, आम्ही छत्रचामरे धारण करण्यासाठी त्यांनी केलेला त्याग कुठे आणि आमची ही बिरुदावली कुठे? या मर्‍हाटमोळ्या गोरगरीब जनतेस एक रामराज्य आणणारा राजा हवा म्हणून आपल्या आयुष्याची होळी करणारे ते खंदे वीर थोर , की , 'त्यांच्यामागे आपल्या पोराबाळांची आणि आपल्या संसाराची काळजी वाहणारा पोशिंदा - हा शिवाजी समर्थ आहे' हा त्यांचा विश्वास थोर?

हरएक कठीण प्रसंगी आमच्या आधी स्वतःचे प्राण मृत्युशय्येवर झोकून देणार्‍या माझ्या सवंगड्यांनो , या रे, एक , फक्त एखादीच घटका या रे , आम्हांस आज तुमची सय येते आहे !.....

फत्तेखानास पुरंदराहून पळवून लावणार्‍या बाजी पासलकर काका , या, बघा तुमचे जावई कान्होजी जेधे पण संगे आणा , घटकाभर टेका आणि आपल्या नातवाचा सर्जेराव बाजी जेधे यांचा पराक्रम बघा !
गजापूरच्या घोडखिंडीत आम्हांस मारलीत ती जिवाभावाची तुमची शेवटची गळाभेट आठवते बांदलांच्या बाजीप्रभू देशपांडे , या बघा हो, तुम्हाविणा हा कोदंडधारी शिवाजी कसा बापुडवाणा आणि पोरका वाटतो आहे!
पुरंदर पडण्याआधी मुंडके छाटले गेले तरी आपल्या कबंधावर लढणार्‍या मुरारबाजी देशपांडे , या हो , आता तुमची दमदार तलवार खणखणाट करु दे !
कोंढाणा मध्यरातीस सर करणार्‍या माझ्या ढाण्या वाघा , ए तान्या रे , अरे असा कसा तू मावळलास रे? ये बघ तुझा जिगरी दोस्त राजा झाला पण त्यास खुशाल उभ्या उभ्या टेकावयास तुझा खांदाच सापडत नाहिये !
सहा वीरांसह बहलोल्खानांस संपविण्याच्या ईर्षेने पेटून उठत होरपळून जाणार्‍या वीर प्रतापराव या हो या, आम्ही नाही पुन्हा रागावणार आपणांस , पण या, एकदाच.....

हे सारे सवंगडी युध्दात मारले गेले - हाती शस्त्र होते , त्यामुळे मरणाची शक्यता जगण्याएव्हढीच पन्नास टक्केच होती.पण आम्ही पन्हाळ्याहून निसटलो तेंव्हा जाणूनबुजून सिद्दी जोहरच्या भेटीस त्याच्याच तंबूत जाऊन , हाती सापडून आमचे विशाळगडाकडे पोचणे सुकर होण्यासाठी वेळ काढणार्‍या आमच्याच अंगकाठी आणि चेहेर्‍यामोहर्‍याच्या , शिवा काशीद यांस तर पक्के ठाऊक होते , की आपण शिवाजी बनून जातोय याचा परिणाम आपल्या मृत्यूतच होणार आहे ! तरीही आमच्यासाठी गेलास - रे शिवा ये , एकदा तुज बघावेसे वाटते रे गड्या , ये !

आग्र्याहून पळालो तेंव्हा आमच्याच चेहेर्‍यामोहर्‍याचे साम्य साधत फुलादखानाच्या नजरकैदेतील आमच्या शय्येवर पहुडलेले हिरोजी फर्जंद आणि त्यांचा त्यागही तितकाच मोठा ! आमच्या सुदैवाने हिरोजी आणि मदारी मेहेतर आज हयात आहेत.

आणि आज?.....

आज ३३६ वर्षांनी या राज्याभिषेकाच्या ३३५ व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही सारे एकत्र याल , राज्याभिषेक सोहोळा पार पाडाल , आमच्या नावाचा जयजयकार कराल आणि परत उद्यापासून आमचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्याच्या मुद्द्यावरून एकेमेकांच्या ऊरावर बसाल ! आज 'शिवाजी भोसले' मराठा असण्याचा जावल्य अभिमान बाळगून ब्राह्मणांस , दादोजी कोंडदेवास नाकारणार्‍या आणि कोणी एक ईंग्रज जेम्स लेन याने आमच्याविरोधात काही लिहिले तर त्यांस त्याची शि़क्षा देण्याचे सोडून पुण्यातील भांडारकर संस्था जाळणार्‍या आणि आमच्याच मातीतील भक्त मंडळीस पाण्यात पहाणार्‍या याच मराठा ९६ कुळींत त्यावेळी भोसले हे नांव कुठे होते? आज एक अफझल लाखो निरपराध लोकांना मारूनही जिवंत आहे आणि शेकडो लोकांना मारून एक अझमल कसाब जिवंत आहे त्याच्याविरोधात का नाही उचलली जात रे तुमची ही शस्त्रे?कधी रे संपणार तुमचे हे आपसातले हेवेदांवे?इतका इतिहास घडून पण ज्यांस शहाणपण येईना त्यांस मराठी माणूस म्हणून इतरांनी ओळखावे आणि हिणवावे आणि ते आमच्या कानी यावे, नजरेस पडावे म्हणून का रे परमेश्वरा आमचा आत्मा तू अजून तळमळत ठेवला आहेस?

राजे झाल्या झाल्या आम्ही लगेचच क्षत्रिय कुलावतंस झालो तसेच गोब्राह्मण प्रतिपालक पण झालो?असतील शितं तर जमतील भुतं याचा प्रत्यय तर आम्हांस आम्ही राजे झाल्या क्षणापासून प्रत्यक्ष आमच्या घरापासूनच यावयास लागला !

आणि आम्ही म्हणतो कुणांस हवा हा अरबी समुद्रातील उंच पुतळ्याचा मान? कुणास हवाय हा पुतळा? आणि कशासाठी हवा आहे?तर आमच्या नावे अनन्वित भ्रष्टाचार
करता यावा यासाठीच ना हा अट्टाहास? १९ फेब्रुवारीला , ३ एप्रिल ला आणि फार फार तर १५ ऑगस्ट, २६ जानेवा री , ६ जून ला एक मोठ्ठा हार घातला आमच्या या पुतळ्यांस , तुमच्या आजच्या भाषेत एक फोटो सेशन झाले - ते सर्व प्रमुख वॄत्तपत्रांतून पहिल्या पानावर छापुन आणले की मग वर्षाचे उरलेले ३६० दिवस आमचा पुतळा महणजे असंख्य पक्षांसाठी एक "सुलभ शौचालय" असेल त्याचे सोयरसुतक कुणांस?

आम्ही एक सवाल पुसतो , की , ब्राह्मणांस हीन लेखून मराठा उच्च होतो का? वर्षानुवर्षे ज्या ब्राह्मणांकडून आपण सारा समाज पूजा-अर्चा, श्राध्दविधी करवून घेत आलो , त्यांच्यावोषयी इतकी ही घॄणा का? दादोजी कंडदेवांचे आमच्या जीवनातील स्थान वादातीत असतां ते नाकारून आमचा शूर मराठा कसा काय उच्च होईल्?आणि जे सत्य आहे ते कुणी नाकारू म्हटले तरी ते नाकारता येईल कांय? आम्हांस अफझलखानाच्या भेटीच्या वेळी तारणारा जिवा महाला हा मूळचा सकपाळ , ह्या आमच्या सवंगड्यांचे शौर्य काय आम्ही त्याच्या जातीच्या नावे ओळखावे काय? ज्या मोरोपंतांनी प्रतापगड उभा केला , त्याच मोरोर्पंतांनी जावळीच्या युध्दात मर्दुमकी गाजवली त्यास काय आम्ही ब्राह्मणी शौर्य म्हणावे काय?अरे आणि आम्ही ३३६ वर्षांपूर्वी जे अष्टप्रधान मंडळ नेमले त्यातील ७ मंत्री ब्रह्मण होते ते काय आम्हांस माणसांची परख असल्याविणाच?

अरे माझ्या सोन्यांनो , दीनदुबळ्यांचे रक्षण करण्यासाठी हाती तलवार धरलेला वीर मराठा आज जातीसाठी आरक्षण मागू लागला एव्हढी आमच्या तलवारीची धार बोथट कधी झाली?

आमच्या लेखी माणसंचे दोनच वर्ग असावेत - एक -गरीब आणि दुसरा म्हणजे लढवय्या-सेनानी-सैनिक ! जे दिवशी आमच्या या भारत देशात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि शौर्य गाजवलेल्या आणि देशासाठे लढलेल्या सैनिक्-सेनानींना - बस्स या दोनच वर्गांना सर्व ठिकाणी आरक्षण मिळेल ते दिवशी आमचा आत्मा मुक्ति पावेल !

त्या सुदिनाची वाट पहात , आमचा नश्वर देह आम्हांस सोडून गेला तरी आमचा आत्मा गेली उणीपुरी ३२९ वर्षे तळमळतोय ! बघा रे माझ्या सोन्यांनो , आमच्या रायगडावरील समाधीवर फुले उधळण्यापेक्षा मेघडंवरीवरील त्या कबबुतराकडे एक वार पाहिलंत तरी तुमच्या लक्षात येईल की त्याच्या इवल्याश्या देहातून आम्ही आम्हांस मुक्ति प्रदान करू शकणार्‍या एखाद्या शिवा काशिद किंवा जिवा महालास शोधतो आहोत ! कां?.....

अरे , आता हा तळमळणारा आत्मा घेवून आता रायगडी रहावत नाही रे , आता रायगडी रहावत नाही !.....

इतिहासलेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Jun 2009 - 11:32 pm | रेवती

आपले लेखन मनाला भिडणारे आहे.
शिवाजीमहाराजांनी त्यांचे मंत्रीमंडळ, सैन्य, प्रजाजनांचे व घरच्यांचे आशिर्वाद यांच्या जोरावर केलेलं कार्य वादातीत आहे.
त्यावरूनच सध्या वादविवाद चालू आहेत.:(

रेवती

विशाल कुलकर्णी's picture

5 Jun 2009 - 12:26 pm | विशाल कुलकर्णी

अगदी, खुप खेदजनक किंबहुना संतापजनक परिस्थीती आहे आज.
खुप छान लेख.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

निल७१३'s picture

12 Jun 2009 - 2:02 pm | निल७१३

सुंदर लिहीलय