माझा भाऊ सुधाकर त्यादिवशी माझ्या घरी सहजच म्हणून मला भेटायला आला होता.त्याच्या बरोबर जी व्यक्ति आली होती तिला पाहून माझी स्मृती माझ्या तरूण वयात गेली.त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं.त्या हंसलेल्या त्याच्या चेहर्याकडे पाहून माझी स्मृती मला आणखी ताण द्यायला लागली.ह्याला पाहिलंय, पण कुठे ते आणि याचं नांव काय हे लक्षात येत नव्हतं.
"काय मला ओळखलं नाही?"
असा त्याने पहिला प्रश्न केल्यावर परत माझी आठवण मला त्याच्या आवाजाची माझ्या मेमरीतली लोकेशन त्रास द्यायला लागली.
मी थोडं शरमल्यासारखं करून गंमतीत म्हणालो,
"age became"
तो हंसला आणि म्हणाला,
"अरे बाबा! खूप दिवस गेले की नांव विसरायला होतं.
त्याला "इव्ह्यापोरेटीव्ह मेमरी" म्हणतात."
"आता लक्षात आलं.तू बबन सावरडेकर ना?"
असं मी त्याला उस्फुर्त विचारलं.
"अगदी बरोबर.एव्हडं काय तुला औपचारीक व्हायला नको मला तू "बबन्या" म्हणायचास,आठवतंना?"
आता माझी गाडी रूळावर आली.
"अरे पण तू सैन्यात गेला होतास ना? शिक्षणाचा तुला वैताग आला होता.काही तरी देशासाठी करावं आणि आपलाही रोजगार संभाळावा.असं काहीतरी तू बोलल्याचं आठवतं"
असं मी म्हणाल्यावर इतका वेळ गप्प बसलेला माझा भाऊ सुधाकर म्हणाला,
"अरे, हा कारगीलच्या फ्रंटवर गेला होता.मरणातून वांचला. बबन बाबा तुच तुझं सर्व ह्याला सांग."
बबन म्हणाला,
"मला एक छान पत्नी आहे,आणि तितकेच छान दोन मुलगे आहेत.मी तसा यशस्वी वकील आहे.
गेली कित्येक वर्षं आम्ही संसार करीत आलो आहो.आणि त्याच जागी आम्ही सोळा वर्षे राहत आलो आहोत.आता पर्यंत सर्व दिवस सुखदायक चालले आहेत.परंतु तसं नेहमीच चालत आलं आहे असं नाही."
"पण तू शाळा सोडल्यावर सैन्यात कसा वळलास?आणि कारगीलच्या युद्धात केव्हा सामील झालास?"
मोठ्या कुतूहलाने मी त्याला प्रश्नाचा भडिमार केला.
"ज्यावेळी मी मधेच शाळा सोडली,त्यावेळी मला जरूरी भासली तरी, तेव्हडे कोणही माझ्या मदतीला आले नव्हते.त्यावेळी माझ्यावर कुणाचा भरवंसा नव्हता असावा,आणि माझापण माझ्यावर विशेष भरवंसा नव्हता. परंतु,जीवनातल्या मार्गात वळणं आडवळणं असतात आणि आता मी जरा मागे वळून पाहिल्यावर,मी कुठून आलो ते आठवतं,आणि अजून मला त्या लोकांचे चेहरे आठवतात, ज्या लोकांचा माझ्यावर भरवंसा होता. माझ्यात काय क्षमता आहे ते त्यावेळी लोकांना माहित होतं पण मला नव्हतं.त्यांचे ते प्रोत्साहन देणारे दिवस मला अजून आठवतात.ते म्हणायचे,
"आम्हाला तुझ्यावर भरवंसा आहे."
हे चार महत्वाचे शब्द कुठल्याही भाषेत असायलाच हवेत असं आपलं मला वाटतं.काही गोष्टी माझ्यासाठी त्यावेळे महत्वाच्या होत्या. त्यावेळी जीवनाकडे पहाण्याची माझी दूरदर्शिता धूसर झाली होती, मला काहीशी अंधदृष्टि आली होती ती अशी की माझंच जीवन मला काय बहाल करतंय त्याकडे माझं लक्ष नव्हतं. मात्र कुणीतरी माझ्या भोवती दोर टाकून मला माझ्या नैराश्येतून मागे ओढून घेऊन म्हणायचं,
"मला तुझ्यावर भरवंसा आहे."
अगदी माझ्या सुरवातीच्या नोकरीत- कारगीलच्या युद्धात- मी जवळ जवळ म्रृत्यूच्या दाढेत गेलो होतो तेव्हा मला वांचवण्यसाठी सल्ला देऊन,
"मला तुझ्यावर भरवंसा आहे.प्रयत्न कर"
असं म्हटलेले ते माझ्या सहकार्याचे उद्गार मला अजून आठवतात.
शाळेच्या शेवटच्या वर्षात मला वाटू लागलं होतं,की मी यातून काही यशस्वी होऊन बाहेर पडणार नाही,आणि मी त्या रात्री एका बारमधे बसून भरपूर नशा करीत होतो, माझा सैन्यात जाण्याचा विचार मी कुणाला तरी सांगावा म्हणून इकडे तिकडे बघत होतो. अशावेळी योगायोगाने एक अनोळखी व्यक्ति माझ्या जवळ येऊन बसली मी त्या व्यक्तिला माझ्या मनातला विचार सांगितला. त्यावर ती व्यक्ति मला म्हणाल्याचं आठवतं,
"हे बघ,तुला मी पूर्ण ओळखत नाही.पण कदाचीत तू काय विचार करीत आहेस ते तुझ्याच ध्यानात येत नसावं.तुला काय हवंय ते तुला माहित आहे.तू कुठे चालला आहेस ह्याची ही तुला जाणीव आहे.आणि जरी तुला माहित ही नसलं,किंवा अन्य कुणाला माहित नसलं,तरी,
"मला तुझ्यावर भरवंसा आहे."
मी बबनला म्हणालो,
"कारगीलचं युद्ध संपल्यावर तूं सैन्यातून सुट्टी घेतलीस हे मला कुणी तरी सांगितलं होतं.मग तू सुट्टी घेऊन पूढे काय करीत होतास?"
"कारगीलचं युद्ध संपल्यानंतर मी बरेच दिवस बेकारच होतो.पण मी नंतर जीद्दीने माझं कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.
माझ्या मनात वकील व्हायचं होतं पण त्या नैराश्येत मी तो विचार जवळ जवळ सोडून द्यायचं ठरवलं होतं.मी हा विचार माझ्या होणार्या सासर्या जवळ बोलून दाखवला होता. त्यावेळचे माझ्या भावी सासर्यांचे उद्गार मला आठवतात,
"मला तुमच्यावर भरवंसा आहे."
हे वरचेवर त्यांच्याकडून ऐकून मी वकीली परिक्षा द्यायची ठरवली.आणि शेवटी वकीलांच्या बारचा सभासद झालो.
संसाराच्या धकाधकीत खर्चाची जुळवाजुळव करताना मेटाकुटीला यावं लागायचं.पण मित्रमंडळीकडे बघून त्यांच्या नवं घर घेण्याच्या प्रयत्नाकडे बघून माझ्या मनातली स्वप्नं बाजूला ठेवून नेटाने काम करावं लागलं.वकिली चांगली चालते असं पाहून मला सुद्धा नवं घर घेण्याचं मनात यायला लागलं.माझं हे मत पाहून माझी पत्नी मला जोराने प्रोत्साहन देताना तिचे शब्द मला अजून आठवतात,
"मला तुमच्यावर भरवंसा आहे."
आता पन्नास अधीक वर्षात अनुभवाने शिकून मी सांगू शकतो की,एखाद्याल्या त्याच्या अडचणीतून बाहेर काढायला, त्याची संसराची गाडी पटरीवर आणायला, त्याला स्वतःला काहीतरी बनायला एखादी "ठिणगी" द्यायला विशेष काही लागत नसावं.एखाद्या खर्चीक कलाविवरणाची,किंवा एखादी अपव्ययी चलाखीची, किंवा फुकाच्या भाषणांची जरूरी लागत नाही.जे काय लागतं ते त्या व्यक्तिच्या नजरेत नजर घालून म्हणावं,
"मला तुझ्यावर भरवंसा आहे."
ह्या चार शब्दात एखाद्याच्या आयुष्यात बदलाव आणण्याची क्षमता आहे.माझ्यात तरी तसं झालं."
सुधाकर म्हणाला,
"बबन्या,नशा करायला तू बार मधे जायचास.आणि त्याच बारमधे तुला एका अनोळख्याने ते तुझे चार जादूचे शब्द सांगितले,
"मला तुझ्यावर भरवंसा आहे"
आणि तेच जादूचे शब्द तुला भावी सासर्याने सांगितले. पण फरक एव्हडाच झाला की तो "नशेचा बार" सोडून तू "वकीलाच्या बारमधे" सामील झालास.आहे बाबा! त्या चार शब्दात खरीच जादू"
हा सुधाकरचा विनोद ऐकून आम्ही सगळेच हंसलो.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
30 May 2009 - 9:09 am | क्रान्ति
"मला तुझ्यावर भरवंसा आहे."
ह्या चार शब्दात एखाद्याच्या आयुष्यात बदलाव आणण्याची क्षमता आहे.
लेख नेहमीप्रमाणेच खास!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
30 May 2009 - 3:10 pm | अरुण वडुलेकर
खरोखर "मला तुझ्यावर भरवंसा आहे." या चार शब्दांच्या जादूचा अनुभव मी घेतलेला आहे.
माझ्या मॅट्रिकच्या परिक्षेच्या निकालाचा दिवस होता. मी सकाळपासूनच अस्वस्थ होतो. कारण
परीक्षेत मी काय दिवे लावले होते ते माझे मला पुरते ठाऊक होते. त्या काळी निकाल वर्तमान पत्रातून
छापून येत असें. मी घरा बाहेर पडायलाच तयार नव्हतो. तेंव्हा माझी आई मला हेंच म्हणाली होती,
"जा तू. पेपर घेऊन ये. तू नक्की पास झाला असशील. मला तुझ्यावर भरवंसा आहे.
आणि खरोखर मी पास झालो होतो. स्पेशल भूगोल या विषयांत, जो पेपर मला अवघड गेलेला होता,
मला केवळ ३६ मार्क होते. पण मी पास झालो होतो.
30 May 2009 - 4:02 pm | बापु देवकर
नेहमीप्रमाणे खास आहे....
30 May 2009 - 6:40 pm | मीनल
तुमच्या कडे अनुभवाचा साठा आहे. तसा तो सर्वांकडे लहान मोठ्या फरकाने असतो. पण त्या अनुभवाची घटना, त्यातील संवाद तुमच्या लक्षात राहिलेले दिसतात.ते शब्दात अचूक मांडता आणि एवढच नाही तर त्यातून तुम्ही घेतलला बोध आम्हा सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो.
प्रतिसाद किती, कसे याच्याशी तुम्ही जास्त संवेदनाशील नाही असे दिसते.
आम्ही वाचतो, आणि शिकतो ही आपल्या लिखाणातून.पण प्रत्येक वेळी प्रतिसाद देतोच असे नाही.
तरी लिहित रहा.
मीनल.
30 May 2009 - 6:57 pm | रेवती
सामंतकाका,
आपण नेहमी घरगुती आणी छान लिहिता.
Age became या विनोदावर भरपूर हसले.
कथा छानच!
रेवती
30 May 2009 - 9:21 pm | श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रियेबद्दल आपल्या सर्वांचे आभार.
मीनल,
माझे लेख जास्त "पारदर्शक"असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया जास्त आकर्षित होत नसाव्या.प्रतिक्रियाच हवी असल्यास तसंच लेखन लिहिण्याची कुवत अंगात असावी लागते.ती माझ्यात नसावी.
एकदा प्रसिद्ध संगीततज्ञ श्रीनिवास खळे यांना हिंदी सिनेमात गाणी लिहिण्याचा आग्रह एका हिंदी प्रोडयुसरने केला.
"आप पहिले ट्युनें करो,बादमे हम आपको गानेके लब्झ -शब्द- देयेगे"
असं तो प्रोडयुसर खळ्यांना म्हणाला.
खळे म्हणाले,
"ट्युनें??" "ऐसा हमने कभी किया नही.
हम को माफ करना.जो लोग ऐसा कर सकते आहे उनकी तारिफ होना चाहिये"
नंतर खळे म्हणतात.
"अहो शब्दांनंतर सूर येतात.त्या शब्दांत सूरांचा आत्मा असतो. मग "टुयने" शब्दांच्या अगोदर कशी लिहायची?"
"प्रतिसाद मनी धरोनी,कुणी लेख लिहित नसावे"
ही माझी कविता (May 15,2009) माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर जाऊन मुद्दाम वाचावीस.ब्लॉगच्या मार्जीनमधे search मधे "प्रतिसाद" लिहून सर्च करावेस.
प्रतिसादबद्दलच्या तुझ्या संदर्भामुळे असं लिहिण्याचा माझा प्रपंच एव्हडेच.तुझ्या सुचनेनुसार लेख लिहितच रहाणार.असाच लोभ असावा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
30 May 2009 - 9:26 pm | मीनल
यातूनही खूप शिकायला मिळाला.
अधून मधून मी तुमचा ब्लॉग वाचते. आता पुन्हा पाहेन.
धन्यवाद.
मीनल.
31 May 2009 - 4:11 am | प्राजु
खरंच या शब्दांत खूप ताकद असते.
"एखाद्याला आपल्यावर भरवसा आहे" ही गोष्टच जगण्याला एखादे कार्य करण्याला बळ देणारी आहे.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 May 2009 - 10:59 am | अनंता
मजा आली !!
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)