नयन मोहणारे नैनीताल - भाग १

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
13 May 2009 - 10:09 pm

मी येथे माझ्या प्रवासाबद्दलचे विचार सांगण्याच्या फंदात जास्त पडणार नाही. फक्त अनुभव नमुद करण्याचा प्रयत्न करीन. कारण विचार, प्रतिक्रिया, कोट्या या भरपूर असतात, आहेत; आणि त्या सांगत बसल्यास मूळ विषयावरून मी भरकटतो. असे प्रस्तुत लेखात झाल्यास तसे मला वाचकांनी सांगावे ही विनंती.
मागच्या महिन्यात नैनीतालला जाऊन आलो. तेथे जाण्यासाठी आधी पूर्णपणे ए.सी. असणाऱ्या ए.के.राजधानी मधून प्रवास घडला व दिल्लीत उतरणे झाले. त्यामुळे दक्षिण ध्रुवाकडे जात असताना मध्येच वाळवंट लागावे, तशी गत झाली. दिल्लीच्या निझामुद्दीन स्टेशनवर उतरुन जवळच्या कमसुम कॅफेमध्ये जेवलो. तिथून नॉन एसी बसमधून आम्ही रामनगर या जिम कॉरबेट पार्कच्या हद्दीजवळील ठिकाणी गेलो. मध्येच बस खराब झाल्याने आम्हाला रामनगरात पोचायला रात्रीचे 10.30 वाजले.
त्या हॉटेलात तंबू आणि कॉटेजस मध्ये राहायची सोय होती. माझ्या नशिबात तंबू होता. का कोण जाणे, पण प्रचंड उत्साह, काहीतरी ऍक्टीव्ह वाटण्याजोगे करण्याची ईच्छा आणि तसेच शारीरिक तयारी असूनही, लगेच झोप लागली. माझा तर रात्रीतच अंाघोळ करायचा इरादा होता. कारण ए.के.राजधानीत व बसमध्ये न्हाणीघराची व्यवस्था नव्हती. पण रामनगरचं पाणी एवढं थंडगार होतं, की मी केवळ स्पर्शानेच थरथरू लागलो. तेव्हा म्हटलं, बाबा झोप पत्करली.
दुसऱ्या दिवशी आम्हाला पाच वाजता ऊठून पावणे सहा पर्यंत सर्व काही आटपायचं होतं. पण आम्ही पक्के सूर्यवंशी निघालो ना! आमची स्वारी पावणे सहा वाजताच ऊठली. दहा-पंधरा मिनिटांत सर्व व्यवहार उरकले. आंघोळ करायला नंतर वेळ देणार होते. पण नाहीतरी आंघोळीची घाई कुणाला होती. आधीच चार चार कपडे अंगावर चढवूनसुद्धा आम्ही कुडकुडत होतो.
आम्हाला एकूण पाच जिप्सी गाड्यांत बसवण्यात आले. आणि त्या ज्या काही भरधाव वेगात सुटल्या म्हणता! आम्ही जंगल सफारीला निघालो होतो. एका जिप्सी गाडीत कमीत कमी सहा प्रवासी, चालक आणि वाटाड्या. मी थोड्या वेळाने उभा राहिलो. दोन्ही हात टायटॅनिकच्या पोझमध्ये पसरवले, आणि त्या बोचऱ्या वाऱ्याला आव्हान देत तसाच उभा राहिलो होतो, जोवर गाडीने मध्येच ब्रेक मारल्याने माझ्या केंद्रस्थानी गाडीचा एक आडवा रॉड लागला, आणि मला माझे हात तिथे सुरक्षेसाठी धाडावे लागले. आम्हाला सतर्क राहण्यास सांगितलेले होते, व एखादा प्राणी वा पक्षी दिसल्यास गोंगाट न करता, खुणेने इतरांचे लक्ष तिथे वेधण्यास सांगितले होते. पण एखादा प्राणी दिसेल तर ना! आम्हाला दिसले काय, तर लंगूर आणि डरे. ज्यांनी आम्हाला आधी पाहिले आणि त्यांच्या ऐवजी आम्हालांच घाबरून वेग वाढवावा लागला. काही वात्रट नगांनी शेवटी कंटाळून वाटेल तिथे बोट दाखवून ""ए तो बघ घोडा!'' किंवा ""ए ते बघ रानडुक्कर!!'' असे ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकदा गाड्या विनाकारण थांबल्या. शेवटी आम्ही सगळेच मनाला वाटेल त्या प्राण्याचे नाव घेऊन वाट्टेल तिथे बोटे दाखवायला सुरुवात केली.
मी कॅमेरा घेऊन गेलो होतो, पण फोटो काढायच्या मुडमध्ये बिलकुल नव्हतो. आधीच्या माझ्या मोजक्या अशा काही प्रवासांतून मला असा अनुभव आला, की फोटो काढायच्या फंदात पडल्याने, आपली उघड्या डोळ्यांनी निसर्गाची रचना व सौंदर्य पाहून घेण्याची संधी हुकते. ती संधी यावेळी मला काहीही करून हुकवायची नव्हती.
आम्हांला तेव्हा काही मोजकेच प्राणी दिसले. उदा. पाच सहा मोर-लांडोर, हरिण (काहीजण उगाच त्याला बार्किंग डीयर म्हणत होते. पण ते फक्त आम्हांला नैनीतालच्या झूमध्येच पाहायला मिळाले), साप(मेलेला), माकडे, एक गाय, बास! याउपर आम्हांला काहीही दिसले नाही. एक गोष्ट मानली पाहिजे, की आम्हांला जिथे नेले होते तिथे दुतर्फा असलेल्या जंगलाचे सौंदर्य मोहून टाकणारे होते. निदान मी तरी, उभा असल्याने, अगणित पक्षी पाहिले. त्यांची नावे येथे दिली असती, पण मलाच माहित नसल्याने देत नाही.
सफारी चांगले दोन ते तीन तास चालली. बोरिवलीच्या नॅशनल पार्कची लायन किंवा टायगर सफारी, जिच्यात एकटे दुकटे वाघ-सिंह असतात, त्यात पाच-दहा मिनिटातच झोप येते. पण या सफारीने मात्र माझी अन्‌ सर्वांचीच झोप उडवली. सफारीहून परत आल्यावर आम्ही हॉटेलमागच्या नदीत बराच वेळ डुंबलो. नदीत शेवाळे भरपूर वाढले होते. ते सहज हातात यायचे. ते एकमेकांवर, एकमेकांच्या चड्डी नि सदऱ्यात फेकून आम्ही भयंकर मस्ती केली. नदीतून बाहेर आल्यावर सर्वांनी पुन्हा बाथरूमात जाऊन आंघोळी केल्या. पण माझ्या हुशार सहप्रवाशांना याची कल्पना नव्हती, की नदीतील वाहते शुद्ध पाणी म्हणजे काही स्वीमिंग पुलामधील क्लोरिनेटेड वॉटर नव्हे. आणि त्या नदीचे पाणी खरोखर स्वच्छ आणि शुद्ध होते. तसेच बाथरूमच्या थंड पाण्यात आंघोळ करण्याच्या भितीला निमित्त म्हणून नदीचे पाणी मी कल्पनेनेच शतपटींनी शुद्ध झाल्याचे अनुभवले व आपण आंघोळ न केल्याची कारणमीमांसा केली.
त्यानंतर रामनगरबद्दल जास्त काही सांगण्यासारखे नाही. आम्ही तिथून दुपारी दोन किंवा तीन वाजता निघालो. तोवर पत्ते, गप्पाटप्पा, यातच वेळ गेला. संध्याकाळी सहाच्या सुमारास नैनीतालला पोचलो. आम्हांला तेव्हा सांगण्यात आले, की नैनीताल शहर हे एरियल व्ह्यु ने पाहायला मिळेल अशा उंच ठिकाणी आमचे हॉटेल आहे. आणि खरोखरच ते हॉटेल नैनीताल शहरामधील उंचावरील वास्तूंपैकी एक होते. आम्हांला हॉटेलच्या पुढल्या भागात उभे केले व प्राथमिक स्वरूपाच्या ओळखी-पाळखी करुन दिल्या. मग आम्हांला आमच्या डॉर्मिटरीज्‌ दाखविण्यात आल्या. त्या छान होत्या. आमचे सामान त्या डॉर्मिटरीज्‌ मध्ये ठेवल्यानंतर आम्ही हॉटेलच्या पाठच्या भागात गेलो. आणि आम्हांला जे दृश्य दिसले, त्याने आम्ही इतकी वर्षे मुम्बईत बसून फुकट घालवली असे वाटू लागले.
Nainital and lake in the winterImage via Wikipedia (हे हिवाळ्यातील दृश्य आहे. उन्हाळ्यातील दृश्य माझ्याकडे असले तरी ते येथे कसे द्यावे हे मला माहित नाही)

त्या दिवशी आम्हाला विश्रांतीसाठी मोकळीक दिली होती. पण विश्रांती घ्यायची कुणाला होती लेकाला? नैनी तलावाचे मायावी दर्शन आणि त्यालाच लागून असलेल्या क्रिकेटचे मैदान इतक्या वरून पाहिल्यानंतर कुणाला एका जागेवर स्वस्थ बसवेल?
सर्व सहप्रवासी एव्हांना चांगलेच मित्र झाले होते. त्यामुळे हसत-खेळत, खिदळत, दिवस निघून गेला आणि रात्र झाल्याचं कुणाच्या लक्षातही आलं नाही. रात्री आम्हांला गरम गरम टोमॅटोचं सूप ब्रेडच्या तुकड्यांबरोबर दिलं. ते आम्ही इतक्यांदा परत मागून घेतलं, की अर्ध्या तासाच्या आत सर्व सूप संपलं. रात्री आम्ही पत्ते खेळत जागत होतो. कारण अंगाअंगात रोमांच भरलं होतं. कुणाला झोपच येत नव्हती. शेवटी हॉटेलच्या दीपक सरांनी येऊन दमदाटीच्या स्वरूपात सांगितलं, की दुसऱ्या दिवशी आम्हांला पाच वाजता उठणे अत्यावश्यक होतं. शेवटी नाईलाजास्तव आम्ही खाटेवर पाठ टेकवली. तरी रात्रभर एकमेकांवर टॉर्चचा प्रकाश मारणे, उश्या चोरणे, खाट जोरजोरात हलवणे असे अक्षरश: पोरकट चाळे आम्ही चालू ठेवले.

उरलेलं, वाचकांस उत्सुकता असल्यास, क्रमश:
(टाईप करता करता मलाच झोप आलीय, माझा टायपिंगचा वेग अतिशय कमी आहे.)

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

13 May 2009 - 11:09 pm | प्राजु

वाचतो आहोत.. येऊद्या अजून.
नैनीताल मीही पाहीले आहे... स्वर्ग आहे स्वर्ग!!
फोटो चढवण्यासाठी तुमचे फोटो फ्लिकर वर आधी चढवा. मग त्या फोटोवर टिचकी मारून, राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये त्या फोटोची लिंक दिसेल ती, फोटो चढवण्याच्या खिडकीत डकवा.. फोटो इथे दिसेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

13 May 2009 - 11:27 pm | यशोधरा

>>उरलेलं, वाचकांस उत्सुकता असल्यास,

हो आहे तर उत्सुकता, लिहा लवकर लवकर!

सहज's picture

14 May 2009 - 8:05 am | सहज

अजुन येउ दे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

और भी आने दो !

स्वाती दिनेश's picture

14 May 2009 - 8:28 pm | स्वाती दिनेश

उरलेलं, वाचकांस उत्सुकता असल्यास, क्रमश:
उत्सुकता आहे, येऊ दे पुढचा भाग..
स्वाती