मातृदिन

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
10 May 2009 - 9:03 am

"अगं, आई!
कमलमूखी तू सुंदर असता
रूप विधात्याचे कसे वेगळे?"

ह्याचं उत्तर जाणण्यासाठी,
आईला "आई"च का म्हणतात हे जाणण्यासाठी,
ज्यांची आई हयात आहे त्या सौभाग्यांसाठी,
ज्यांची आई हयात नाही त्या माझ्यासारख्या
अभाग्यांसाठी,
"बाळा! तुला लागलं कारे?" हा आईचा प्रश्न जाणण्यासाठी
आईची व्यथा जाणण्यासाठी,
आईचे डोळे नेहमीच ओले का असतात हे समजण्यासाठी,
चिमुकली तनुली आईला काय सांगते हे समजण्यासाठी,
प्रत्येक व्यक्तिच्या पोटावरची खूण कां आहे? ते जाणण्यासाठी,
"आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते…!"
हा माझा लेख वाचला असेल तर आज परत वाचण्यासाठी,
वाचला नसेल तर प्रथम आज जरूर वाचण्यासाठी,
प्रत्येकाची आई अगदी अशीच असते.
आजच्या मातृदिना सारखा जरूर आठवण आणणारा दिवस चुकवून कसं चालेल?
आईला ह्या मातृदिनी आठवणार ना?

आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.
मॉं (ऊली) याने आई म्हणजे सबकुछ माऊली!
"आई, आई .... (मै आई,बेटा मै आई)"
म्हणजेच,
"अगं मी येते!, अरे मी येते! "
असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती "आई"
तिच माऊली,
तिच मॉं,
तिच माय,
म्हणजेच "my"- माय- माझी,
MOM म्हणजेच My Own Mother तिच शब्दशः आई.

नुसता "आई" हा शब्द्च पहाना,
पहिलं अक्षर, "आ" म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली.
दुसरं अक्षर "ई" म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.
म्हणूनच ती "आई."

आईचे गोडवे किती गावेत.आई बद्दल कुणी कुणी आणि किती किती लिहावं.किती कविता आहेत किती लेख असतील.तरीपण
"मी पण आणखी लिहू कां?"
असे कुणाला नाही का वाटणार?
आणि कुणीही कितीही लिहीलं तर ते पुरं पडतं का?

आता,माझी आई हयात नसलेल्याना मला, कवी माधव ज्युलियनची ही कविता प्रकर्षाने जाणवते.
"प्रेम स्वरूप आई
वात्सल्य सिंधू आई
बोलावू तुज आता
मी कोणत्या उपायी
आई!"
असं लिहून झाल्यावर,
अण्णा (भालचंद्र ) पेंढारकरांचा "दीगू" गातो ते आठवतं,
"आई... तुझी, आ..ठ..व..ण येते
सुखद स्मृतींच्या कल्लोळानी
काळिज का जळते
आई काळिज का जळते"

असं म्हणून झाल्यावर कुणी म्हणतं,

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"
किंवा कुणीतरी सवाल केला आहे,
"कुबेरानं आपलं सर्व धन देऊ केलं तरी आईचे उपकार फिटतील का?"

नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन) मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज,
" बाळा,तुला लागलं का रे? " असं सुद्धा विचारतं,
अशी जी दंतकथा आहे त्यातून पण माणुसकीचा परमोच्य असलेल्या आईचं वर्णन पराकोटीचं नव्हे काय?.
ती प्रेयसी-म्हणजेच पुढे होणारी तिच्या बाळाची "आई" - त्या मुलाची निघृण कृती पाहून,
"मी सांगितलं म्हणून माझ्यावर प्रेम दाखवायला खरंच एव्हडया पराकाष्टेला जाशील असं मी स्वप्नात सुद्धा आणलं नव्हतं "
असं म्हणून ती त्याला झिडकारते हा या दंतकथेचा पुढला भाग वेगळा म्हणा!.

"मानव कुठले?देव देवताही
फुलती तुझ्याच पदरी
दुनियेत हा स्वर्ग असे
पायतळी तुझ्याच तो वसे

ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगं,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप "देवाचे "कसे वेगळे?"

असं मी माझ्या,
"माझी सुंदर आई"
ह्या कवितेत भारावून जाऊन लिहीलं ते आठवलं.
एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले,
"खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं.
देव आहे हे आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवतं माझी आई सांगायची की,
"देव खूपच सुंदर दिसतो"
असं सांगून भाऊसाहेब म्हणतात,
खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?"
पण त्या लहान बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की,
"आई मी काही देवाला पाहिलं नाही पण खरं सांगू, तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस"
हे सर्व भाऊसाहेबांकडून ऐकून मला एक हिंदी सिनेमातलं गाणं सुचलं.
" ओ मॉं! तेरी सुरतसे अगर,भगवान की सुरत क्या होगी"
आणि कविता सुचण्याअगोदर,असा सीन मी माझ्या डोळ्यासमोर आणला,
"लहान बाळाला आपल्या पदराखाली घेऊन, त्याला आई जेव्हा दुध पाजत असते, तो तिचा फुटलेला पान्हा मनोमनी पिणाऱ्या त्या बाळाचं लक्ष, तिच्या चेहऱ्याकडे केंद्रित झालेलं असतं, अशावेळी माझ्या मनात त्या बाळाच्या मनातले विचार येवून वाटलं की ते बाळ जणू आईला आठवण करून विचारतं,

" आई कोण हा देव? ज्याची तू नेहमी प्रशंसा करतेस?"
ह्यावर आई त्या बाळाला सांगते,
"बाळा, तू त्याला पाहिलं नाहीस, आणि मी पण पाहिलं नाही रे!. पण माझ्यावर विश्वास ठेव.
आई गाण्याच्या दोन ओळीत सांगते,

"स्वरूप त्याचे किती मनोहर
रती मदनाहूनी किती तरी सुंदर"

देव असा आहे असं म्हणतात.
आपल्या आईकडे टकमक पाहाणारं ते बाळ आईला म्हणतं,
" नसेल पाहिले त्या देवाला जरी
परि पहाण्याची असे काय जरूरी
अगं,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रुप देवाचे कसे वेगळे ?"

पृथ्वीला तिन फेऱ्या घालून पैजे साठी गेलेला श्रीगणेशाचा भाऊ, आणि आपल्या आईला तिन फेऱ्या घालून तोच उद्दयेश साध्य करणारा श्रीगणेश!, किती श्रद्धा आईवर त्या गणेशाची?.

"रक्तहि जेथे सूड साधते,तेथे कसली माया
कोण कुणाची बहिण भाऊ,पती पुत्र वा जाय़ा"

ही ह्या दोन ओळीत आईचीच व्यथा आहे. कारण सूड साधणारी आई होऊच शकत नाही, असं कवीला म्हणायचं आहे.
आईचे डोळे प्रत्येक प्रसंगात ओलेच झालेले दिसतात. ते आनंदाश्रु अथवा दुःखाश्रु असतात.त्या तिच्या नेत्राश्रुमधे अंतरातलं कारुण्य,तृप्ती आणि शाबासकीचे भाव असतात.
मूल जन्माला येताना आईला किती व्यथा होते.मुलाचा जन्म होईतो ती वेदनेने रडत असते. आणि जन्माला आल्यावर तिचं मुल रडतं.
रडताना ते मूल आईला जणू सांगत असतं,

" प्रथम पाहिले तुला मी रडताना
जन्म देऊनी भाग्यवान मला करताना
मी पण रडलो तुला पाहूनी
माझ्यासाठी तू कण्हताना

सुखदुःखाच्या तुझ्या अश्रूमधला
फरक मला कळेना
नेत्रात तुझ्या सदैव अश्रू असती
कारुण्याचे,तृप्तीचे अन शाबासकीचे "
आणि नंतर मोठं झाल्यावर ते मूल नेहमीच म्हणतं,

"कधी दुःखाचे ऊन असे
कधी नैराश्याचा मेघ बरसे
हे कमलहस्त तुझ्या दुवांचे
सरसावती मम माथ्यावरती"

आणि पुर्ण मोठं, झाल्यावर तिच्या झालेल्या उपकाराची जाणीव म्हणून म्हणतं,
"असतां जवळी दुनियेची दौलत जरी
तुझ्यापुढे आम्हा त्याची काय जरुरी
अगं,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रुप विधात्याचे कसे वेगळे? "

आंधळ्या आई बाबाना तहान लागल्याने आपला बाळ झऱ्यावरून पाणी आणतो आणि पाणी देताना आपल्याशी का बरं बोलत नाही? हे पाहून त्या श्रावणबाळाची आई त्याला अतिशय सद्गदीत होवून विचारते,

"बाळा तू असा आमच्याशी बोलत का नाहीस?आमची सेवा करताना तुला खूप कष्ट होतात का रे? "

दशरथ राजाला हे त्यांचे उद्गार ऐकून हुंदका दिल्याशिवाय राहवत नाही. आणि मग तो खरा प्रकार त्याना सांगतो,नंतर मुलाच्या दुःखाने ते मातापिता प्राण सोडतात.ह्या कथेवरून आईच्या प्रेमाचं महत्व कळतं.

अशी पण एक आईवर माझी कविता....

आई कुणा म्हणूनी
मी आईस हांक मारू?
येईल कां ती मज जवळी
ही ऐकुनी आर्त हांक

आई तुझ्या उच्चारात
"ब्रम्ह"दिसे मजसी
"आ" मधूनी दिसे ते आकाश
अन
"ई" मधूनी भासे तो ईश्वर

"आई","आई" असे म्हणूनी (मै आई)
येतेस तूं सदैव कामा
तुझ्या कष्टाला नसे कसली सीमा
अन
तुझ्या त्यागाल नसे कसली तमा
तुझ्या ममतेला नसे कसली तुलना
अन
तुझ्या कर्तव्यापुढे न येई आड भावना

तूं जन्म देतेस थोराना
शूर आणि थोर
कधीही तुला विसरेना

आई,थोर तुझे उपकार
कुणी ते फेडू शकेल का?
ऐरावती वरचे रत्न देऊनी
कुबेरही ऋणमुक्त होईल का?

किंव येते त्या अभाग्यांची
नसे ज्याना ती माउली
दुर्भागी ते असती
नसे ज्याना तिची साउली

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी

कचेरीत जाताना आई बाळाला आजीकडे ठेवून जाते,अशावेळी बाळाच्या मनातले विचार असे आहेत अशी मी कल्पना करून ह्या कवितेतून मांडले आहेत.

रविवारच्या दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
इतर दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी

मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
"नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण असे मी जवळी
तिच्या वेळी अवेळी"

"पक्षिण उडे आकाशी
परी लक्ष असे पिल्लाशी
आहे ना मी तुझ्या जवळी
मग का होतेस तू अशी अळकुळी
येइल तुझी आई संध्याकाळी"

प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले,
"आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया.
मी म्हटलं, "आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात"
तसं काही नाही ,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय.
ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दुःखात अश्रु ढाळण्याचं क्षमता दिली आहे.
शास्त्रज्ञ म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस आपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न करतो.
माणूस दूःखात नक्कीच रडतो.खुपच आनंद झाल्यास माणूस डोळ्यात अश्रू आणताना मी पाहिलं आहे.
आणि ते पण अपवादाने.

एक व्य्क्ती अशी आहे की आनंदात आणि दुःखात डोळ्यात अश्रू आणून आपल्या "पदरानें "पुसते तुम्ही नक्कीच पाहिली असेल.
"भाऊसाहेबांचा ईशारा मला कळला."
"ओळखा पाहूं "
असे म्हणण्या पूवीच मी समजलो होतो. मला हंसताना पाहून ते चटकन म्हणाले
"ओळखा पाहूं मला कोणत्या व्यक्ती बद्दल म्हणायचं आहे?"
मी पटकन म्हणालो,
"अहो, माय माऊली आपली आई"

"तुम्हाला कसं पटकन कळलं ?"
त्यावर मी म्हणालो
"भाऊसाहेब.अशी आपल्याच पदरानें डोळे पुसणारी दुसरी कोणच व्यक्ती असूं शकत नाही."
"अगदी बरोबर "
प्रोफेसर म्हणाले.
"लहानपणी बघा, मी विचारत असे माझ्या आईला"
"आई,मी तुला दुःख दिलं तरी तूं रडतेस,
आणि मी तुला आनंदाची बातमी दिली तरी तूं मला जवळ घेवून पदरानें डोळे पुसतेस.
असं का गं करतेस आई?"
त्यावर ती फक्त हंसायची.
"हे काय गुढ आहे ते तुम्ही कवितेतून सांगा."
यश आणि अपयश मिळालेलं पाहून आईचे डोळे ओले होतात.त्यावर मला खालील कविता सुचली.
मुलगा आईला म्हणतो.

नको रडूं तूं आई
मी तुला दुःख देणार नाही.
कळत नाही मला
तुझ्या दुःखाचे कारण काही.

पाहिले प्रथम तुला रडताना
जेव्हां होऊन मी भाग्यवान
तूं घालीशी जन्मा मला
मी पण रडलो
तुला पाहुनी
माझ्यासाठी कण्हतानां

सुख दुःखाच्या अश्रू मधला
फरक मला कळेना
यशापयशाच्या प्राप्ती
मधला अर्थ जूळेना

काय चुकले माझ्याकडूनी
गोंधळतो मी तुला पाहूनी
पदराने डोळे पुसताना

कळले आता विचारांती
आईच्या अंतरी असते
अश्रूंची नेहमी भरती

जरी होई माझी
प्रगती अथवा अधोगती
नेत्रात तुझ्या सदैव
अश्रू भरून असती
कारुण्याचे अन त्रुप्तीचे

प्रत्येक व्यक्ति रोज स्नान करताना आपल्या पोटावरच्या नाभिकडे-बेंबीकडे- बघून आपल्या आईला म्हणत असावी अशी कल्पना,

"तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण
दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण
नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण
विसरून जाईन कधितरी तुझी आठवण
म्हणुनच ठेवली का गं? आई!
ही माझ्या उदरावर कायमची खूण?"

"म्हणून आयुष्यातली एखादी घडी आपल्या आईसाठी ,तिच्या सन्मानासाठी ,कौतुकासाठी अधून मधून असू दे.या जगातील इतर कोणतीही व्यक्ती आईची जागा घेवू शकत नाही.
स्वतःवर जितकं प्रेम करतो त्याहूनही अधीक प्रेम तिच्यावर करूया.
कारण आई शिवाय जीवन निरर्थक आहे."

श्रीकृष्ण सामंत

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

समिधा's picture

10 May 2009 - 10:12 am | समिधा

आईची आठवण येतच होती पण तुमचा लेख वाचुन लगेचच आईला भेटण्याची ओढ लागली.
(भारतात असते तर भेटले असते आईला.):(
बाकी तुमचा लेख छानच आहे.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

पर्नल नेने मराठे's picture

10 May 2009 - 10:23 am | पर्नल नेने मराठे

ह्म्म्.....सेम हीयर :(
चुचु

क्रान्ति's picture

10 May 2009 - 10:14 am | क्रान्ति

लेख खूप आवडला. आईबद्दल जेवढं लिहावं/बोलावं तेवढं कमीच! आजच वाचलेला हा एक दुवा
http://124.7.88.101/ESakaal/2009/05/09110537/features-current-affairs-ab...

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com

अवलिया's picture

10 May 2009 - 10:30 am | अवलिया

वा ! सामंतकाका !! सुरेख लेख !!

--अवलिया

कपिल काळे's picture

10 May 2009 - 3:38 pm | कपिल काळे

सुंदर लेख,
स्वामी तिन्ही जगाचा आइविना भिकारी.

मराठमोळा's picture

10 May 2009 - 8:16 pm | मराठमोळा

सुंदर लेख. आवडला.
आईच्या प्रेमासारखं सुंदर जगात दुसरं काही आहे का?

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सँडी's picture

10 May 2009 - 8:41 pm | सँडी

हेच म्हणतो.

-संदीप.
काय'द्याच बोला.

आनंद घारे's picture

10 May 2009 - 10:27 pm | आनंद घारे

मन हेलावणारा लेख
माझ्या मनात उठलेल्या भावना व्यक्त करायचा एक दुबळा प्रयत्न करीत आहे

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

टारझन's picture

10 May 2009 - 10:35 pm | टारझन

सामंतकाका ... काळजाला हात घातलाय ...
झकास हो :)

राघव's picture

11 May 2009 - 9:23 am | राघव

मनापासून लिहिलेलं पोचतंय अगदी! आवडले. :)

राघव

सहज's picture

11 May 2009 - 9:34 am | सहज

समयोचित लेख असला तरी जरा जास्तच मोठा वाटला.

नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन) मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज,
" बाळा,तुला लागलं का रे? " असं सुद्धा विचारतं,

ही गोष्ट सांगून आईने खूप रडवले होते मला. :-)

लेखाबद्दल धन्यु.

प्रमोद देव's picture

11 May 2009 - 11:30 pm | प्रमोद देव

सामंतकाका,मस्तच लिहीलंय.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

श्रीकृष्ण सामंत's picture

12 May 2009 - 7:19 am | श्रीकृष्ण सामंत

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com